माननीय अध्यक्ष महोदय,
सर्वप्रथम, मी राष्ट्रपतींचे त्यांच्या अभिभाषणासाठी आभार मानू इच्छितो आणि हे माझं सद्भाग्य आहे की मला यापूर्वीही अनेकदा राष्ट्रपतींचे त्यांच्या अभिभाषणासाठी आभार मानण्याची संधी मिळाली आहे. मात्र यावेळी आभाराबरोबरच राष्ट्पती महोदयांचं मला अभिनंदन देखील करायचं आहे. आपल्या दूरदर्शी भाषणात राष्ट्रपतींनी आपल्या सर्वांना आणि कोट्यवधी देशवासियांना मार्गदर्शन केलं आहे. प्रजासत्ताकाच्या प्रमुख म्हणून त्यांची उपस्थिती ऐतिहासिक आहे आणि देशातील कोट्यवधी भगिनी आणि मुलींना प्रेरणा देणारा खूप मोठा सुयोग आहे.
माननीय राष्ट्रपती महोदयांनी आदिवासी समाजाचा मान तर वाढवलाच आहे, पण आज स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर आदिवासी समाजात अभिमानाची भावना वाढीस लागली आहे, त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यासाठी हे सभागृह आणि देशही त्यांचे ऋणी राहतील. राष्ट्रपतींच्या भाषणात 'संकल्प ते सिद्धी' या प्रवासाचं एक अतिशय सुरेख चित्रं रेखाटण्यात आलं होतं, यामुळे एक प्रकारे देशासमोर विकासाच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडण्यात आला आणि प्रेरणाही दिली गेली.
माननीय अध्यक्ष महोदय,
इथे सर्व सन्माननीय सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला, प्रत्येकानं आपापल्या परीनं गोळाबेरीज मांडली, आपापले युक्तिवाद केले आणि आपापल्या कलानुसार, प्रवृत्तीनुसार प्रत्येकाने आपले मुद्दे मांडले आणि या गोष्टी लक्षपूर्वक ऐकून घेतल्यावर, समजून घेण्याचा प्रयत्न केल्यावर. कुणाची क्षमता किती आहे, कुणाची योग्यता काय आहे, कुणाला समज कितपत आहे आणि कुणाचा नेमका हेतू काय आहे हे देखील लक्षात आले. या सर्व गोष्टी उघड झाल्याशिवाय रहातच नाहीत. आणि देश या सर्व बाबींचं मूल्यमापनही अगदी चांगल्या प्रकारे करतो. चर्चेत भाग घेतलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो. पण मी पाहत होतो की काल काही लोकांच्या भाषणानंतर अशा मनोवृत्तीचा संपूर्ण गोतावळा, पाठीराखे नाचत होते, त्यांना उकळ्या फुटत होत्या आणि काही लोक तर आनंदाने बोलतही होते,आत्ता कसं छान झालं! बहुतेकांना झोप चांगली लागली असेल, काही जण तर त्या सुखद भावनेच्या दुलईतून बाहेर पडून आज उठूनही बसू शकले नसतील!. आणि अशा प्रकारच्या लोकांसाठी असं म्हटलं गेलय, खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं गेलं आहे-
ये कह-कहकर हम दिल को बहला रहे हैं,
ये कह-कहकर के हम दिल को बहला रहे हैं, वो अब चल चुके हैं,
वो अब चल चुके हैं, वो अब आ रहे हैं।
म्हणजे असं की वारंवार बोलून आपण आपल्याच मनाचं समाधान करत असतो, की ते आता निघाले आहेत, थोड्याच वेळात येऊन पोहोचतील. थोडक्यात काय तर कधी नं कधी आपल्याला बरे दिवस येतील अशा कल्पनाविलासातच काही जण, त्यासाठी प्रत्यक्ष काहीही प्रयत्न न करता दंग असतात.
माननीय अध्यक्ष महोदय,
राष्ट्रपतींचं भाषण सुरू असताना काही लोकांनी आपलं तोंड लपवलं आणि एक बडा नेता तर महामहीम राष्ट्रपतींचा अपमानही करुन बसला. यातून आदिवासी समाजाविषयी द्वेषही दिसून आला आहे आणि त्यांचे आपल्या आदिवासी समाजाविषयीचे विचार काय आहेत, ते ही समजलं. पण जेव्हा टीव्हीसमोर अशा गोष्टी बोलल्या गेल्या तेव्हा आतमध्ये दडलेली द्वेषाची भावना , सत्य बाहेर आल्याशिवाय राहिलं नाही. आनंद आहे, ठीक आहे, नंतर पत्र लिहून बचावाचा प्रयत्न तरी झाला आहे.
माननीय अध्यक्ष महोदय.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा ऐकत असताना मला वाटलं की भाषणातील अनेक गोष्टी कुठल्याही मतभेदाविना स्वीकारल्या गेल्या आहेत. म्हणजे एकप्रकारे सर्वांचं भाषण ऐकत असताना मला जाणवलं की राष्ट्रपतींच्या भाषणावर कुणालाही आक्षेप नव्हता, कुणी टीका नाही केली. भाषणातील प्रत्येक बाब, आता राष्ट्रपती काय म्हणाल्या ते पहा, मी त्यांचेच शब्द उद्धृत करतो. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात म्हटलं होतं की, एकेकाळी आपल्या बहुतांश समस्या सोडवण्यासाठी इतरांवर अवलंबून असलेला भारत आज जगाच्या समस्या सोडवण्याचं माध्यम बनत आहे. ज्या मूलभूत सुविधांची देशातील अनेक जणांनी अनेक दशकं वाट पाहिली, त्या सुविधा या अलिकडच्या वर्षांमध्ये मिळाल्याचही राष्ट्रपती म्हणाल्या. देश आता मोठमोठे घोटाळे आणि सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार या समस्यांपासून मुक्त होत आहे, ज्यातून सुटका होण्याची देशाची इच्छा होती. धोरण-लकव्याच्या काथ्याकुटातून बाहेर पडून आज वेगवान विकास आणि दूरदृष्टीने घेतलेल्या निर्णयांसाठी देश ओळखला जाऊ लागला आहे, देशाची ओळख वाढत आहे. आत्ता मी वाचत असलेला परिच्छेद, राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील परिच्छेदच उद्धृत करत आहे. आणि मी साशंक होतोच की इथे नक्कीच काही गोष्टींवर आक्षेप घेणारे काही लोक निघतील, राष्ट्रपती असं कसं काय बोलू शकतात असं म्हणत विरोधही करतील. पण मला आनंद वाटतोय की कुणीही विरोध केला नाही, सर्वांनी भाषणातील मुद्दे स्वीकारले, सर्वांनी मान्य केले. आणि माननीय अध्यक्ष महोदय , मी 140 कोटी देशवासियांचा आभारी आहे की सर्वांच्या प्रयत्नांमुळे आज या सर्व गोष्टींना संपूर्ण सभागृहाची मान्यता मिळाली आहे. यापेक्षा आणखी गौरवास्पद बाब ती काय असू शकते?
आदरणीय अध्यक्ष महोदय,
सभागृहात हास्य-विनोद, चेष्टा-मस्करी, टीका-टिप्पणी, शाब्दिक चकमकी होतच असतात. मात्र आपण हे विसरता कामा नये की आज एक राष्ट्र म्हणून एक अभिमानास्पद संधी आपल्यासमोर उभी आहे, आपण अभिमानास्पद क्षण जगत आहोत. राष्ट्रपतींच्या संपूर्ण भाषणात नमूद केलेल्या गोष्टी म्हणजे 140 कोटी देशवासियांसाठी आनंद साजरा करण्याची संधी आहे,आणि देशानं हा आनंद साजरा देखील केला.
माननीय अध्यक्ष महोदय,
100 वर्षानंतर आलेला हा भयंकर रोग, महामारी, दुसरीकडे युद्धाची परिस्थिती, दुभंगलेलं जग, अशा परिस्थितीतही या संकटाच्या वातावरणात देशाची ज्या प्रकारे काळजी घेण्यात आली, ज्या प्रकारे देशानं स्वतःला सावरलं आहे, त्यामुळे संपूर्ण देश आत्मविश्वासाने भरलेला आहे, अभिमानानं भरलेला आहे.
माननीय अध्यक्ष महोदय.
आव्हानांशिवाय जीवनाला अर्थ नाही, आव्हाने येतच राहतात. मात्र 140 कोटी देशवासीयांची दुर्दम्य इच्छाशक्ती या आव्हानांपेक्षाही अधिक प्रबळ आहे. 140 कोटी देशवासीयांचं सामर्थ्य आव्हानांपेक्षाही अधिक मजबूत, मोठं आणि क्षमतांनी परिपूर्ण असं आहे. एवढ्या मोठ्या महामारीमुळे,जगात युद्धामधून झालेल्या विध्वंसामुळे, अनेक देशांमध्ये अस्थिरतेचं वातावरण आहे. अनेक देशांमध्ये प्रचंड महागाई, बेरोजगारी, खाण्यापिण्याचं दुर्भिक्ष्य आहे आणि आपल्या शेजारीपाजारी जी दूरवस्था झाली आहे, अशा परिस्थितीत माननीय अध्यक्ष महोदय, कुठल्या भारतीयाला अभिमान वाटणार नाही की अशा विपरित काळातही देश जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आज संपूर्ण जगात भारताबद्दल सकारात्मक भावना आहे, आशा आहे, विश्वास आहे. आणि माननीय अध्यक्ष महोदय, ही आनंदाची बाब आहे की आज भारताला जगातील श्रीमंत देशांच्या G-20 समूहाचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली आहे.
ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. 140 कोटी देशवासीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. पण मला वाटते की, या पूर्वी मला वाटत नव्हते , पण आता असे वाटते आहे की, कदाचित काही लोकांना यामुळेही दुःख होत असेल. 140 कोटी देशवासीयांमध्ये कोणालाच दुःख होणार नाही. जे कोण लोक आहेत ज्यांना याचेही दुःख होत आहे त्यांनी आत्मपरीक्षण करावे.
माननीय अध्यक्ष महोदय ,
आज जगातील प्रत्येक विश्वासार्ह संस्था, सर्व तज्ञ जे जागतिक परिणामांचा खूप सखोल अभ्यास करतात. जे भविष्याचा अंदाजही खूप चांगल्या प्रकारे वर्तवू शकतात .आज त्या सर्वांना भारताबद्दल खूप आशा, विश्वास आणि मोठ्या प्रमाणात उत्साह देखील आहे.आणि हे सर्व कशासाठी ? हे असेच झालेले नाही. आज संपूर्ण जग भारताकडे अशा प्रकारे मोठ्या आशेने का पाहत आहे? यामागे एक कारण आहे. याचे उत्तर भारतात आलेले स्थैर्य , भारताच्या जागतिक प्रतिष्ठेमध्ये , भारताच्या वाढत्या सामर्थ्यामध्ये आणि भारतात निर्माण होत असलेल्या नवीन संधींमध्ये आहे.
माननीय अध्यक्ष महोदय ,
आपल्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टींची चर्चा होते आहे, जर मी तेच शब्दबद्ध केले आणि काही गोष्टी उदाहरणांसह समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही बघा, भारताची एक, दोन-तीन दशके अस्थिरतेची राहिली आहेत. आज स्थैर्य आहे, राजकीय स्थैर्य आहे, स्थिर सरकारही आहे आणि निर्णायक सरकार आहे, आणि त्याचा विश्वास स्वाभाविक आहे. निर्णायक सरकार, पूर्ण बहुमताने चालणाऱ्या सरकारमध्ये राष्ट्रहिताचे निर्णय घेण्याचे सामर्थ्य असते.आणि हे असे सरकार आहे जे बळजबरीने नाही तर दृढविश्वासाने सुधारणा करणारे आहे. आणि या मार्गावरून आपण बाजूला हटणार नाही आणि वाटचाल करत राहणार आहोत . काळाच्या मागणीनुसार देशाला जे काही हवे आहे ते देत राहणार आहोत.
माननीय अध्यक्ष महोदय ,
मला आणखी एका उदाहरण द्यायचे आहे या कोरोनाच्या काळात मेड इन इंडिया लस तयार करण्यात आली. भारताने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली आणि इतकेच नाही तर आपल्या कोट्यवधी नागरिकांचे विनामूल्य लसीकरण करण्यात आले.इतकेच नाही तर या संकटाच्या वेळी आपण 150 हून अधिक देशांना जिथे गरज होती तिथे औषध पोहोचवली गेली , जिथे गरज होती तिथे लसमात्रा पुरवण्यात आल्या. आणि आज जगात असे अनेक देश आहेत, जे जागतिक मंचावर मोठ्या सन्मानाने भारताचे आभार मानतात, भारताचे गौरवगान गातात.याच प्रकारे तिसऱ्या पैलूकडे लक्ष द्या. या संकटकाळात भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांनी आज ज्या वेगाने आपली ताकद दाखवली आहे.आधुनिकतेच्या दिशेने परिवर्तन केले आहे. संपूर्ण जग त्याचा अभ्यास करत आहे. मी अलीकडेच जी -20 शिखर परिषदेसाठी बाली येथे होतो. चारही बाजूंनी डिजिटल इंडियाची प्रशंसा होत होती. आणि खूप उत्सुकता होती की हा देश कशा प्रकारे चालला आहे? कोरोनाच्या काळात जगातील मोठे मोठे देश, श्रीमंत देशांना त्यांच्या नागरिकांना आर्थिक मदत करायची होती. नोटा छापायचे ,पण वितरित करू शकत नव्हते. देशवासीयांच्या खात्यात एका सेकंदात लाखो कोटी रुपये जमा करणारा हा देश आहे. हजारो कोटी रुपये हस्तांतरित होतात. एक काळ असा होता जेव्हा देश लहान-लहान तंत्रज्ञान मिळवण्यासाठी तिष्ठत राहात होता. आज देशात मोठा फरक जाणवत आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देश मोठ्या ताकदीने पुढे जात आहे.कोविन, जगातील लोकांना त्यांचे लसीकरण प्रमाणपत्रही देता येत नव्हते. आज आपले लसीकरणाचे प्रमाणपत्र आपल्या मोबाईल फोनवर दुसऱ्या सेकंदाला उपलब्ध आहे. ही ताकद आपण दाखवून दिली आहे.
माननीय अध्यक्ष महोदय ,
भारतात नव्या संधी आहेत. जगाला सक्षम मूल्य आणि पुरवठा साखळी त्यात आज संपूर्ण जगाने, या कोरोनाच्या काळात पुरवठा साखळीच्या मुद्द्यावरून जगाला हादरवून सोडले आहे. ती पोकळी भरून काढण्याच्या सामर्थ्यासह आज भारत वाटचाल करत आहे अध्यक्ष महोदय, हे समजायला अनेकांना खूप वेळ लागेल. आज भारत या दिशेने एक उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे आणि जगाला भारताच्या या समृद्धीमध्ये आपली समृद्धी दिसत आहे.
माननीय अध्यक्ष महोदय ,
निराशेच्या गर्तेत बुडालेले काही लोक या देशाच्या प्रगतीचा स्वीकारही करू शकत नाहीत. त्यांना भारतातील लोकांची कामगिरी दिसत नाही.अरे, 140 कोटी देशवासीयांच्या प्रयत्नांच्या विश्वासाचे हे फळ आहे, त्यामुळे आज जगात डंका वाजू लागला आहे.. भारतातील लोकांच्या प्रयत्नांच्या मेहनतीने मिळवलेले यश त्यांना दिसत नाही.
माननीय अध्यक्ष महोदय ,
गेल्या 9 वर्षात भारतात 90 हजार स्टार्टअप निर्माण झाले आणि आज आपण स्टार्टअप्सच्या जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत.आज देशातील श्रेणी 2,श्रेणी 3 शहरांमध्येही एक प्रचंड मोठी स्टार्टअप व्यवस्था पोहोचली आहे.भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. भारतातील युवा सामर्थ्याची ओळख बनत आहे.
माननीय अध्यक्ष महोदय ,
इतक्या कमी वेळात आणि कोरोनाच्या गंभीर काळात 108 युनिकॉर्न तयार झाले आहेत. आणि युनिकॉर्न म्हणजे ज्या उद्योगाचे मूल्य 6-7 हजार कोटींपेक्षा अधिक असते . हे या देशातील तरुणांनी दाखवून दिले आहे.
माननीय अध्यक्ष महोदय ,
आज भारत मोबाईल उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. देशांतर्गत हवाई वाहतुकीमध्ये आज आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत.ऊर्जेचा वापर हा प्रगतीचा एक मापदंड मानला जातो. आज भारत हा ऊर्जा वापरात ग्राहक म्हणून जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत आपण जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. खेळामध्ये आपली कधीच ओळख नव्हती, कोणी विचारतही नसे .आज क्रीडा जगतात भारतीय खेळाडू प्रत्येक स्तरावर आपला दबदबा दाखवत आहेत. आपले सामर्थ्य दाखवत आहेत.
आज भारत शिक्षणासह प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. प्रथमच माननीय अध्यक्ष महोदय, अभिमान वाटेल, उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या पहिल्यांदाच चार कोटींच्या पुढे गेली आहे. इतकेच नाही तर मुलींचा सहभागही समान होत आहे. अभियांत्रिकी असो, वैद्यकीय महाविद्यालय असो की व्यावसायिक महाविद्यालये, त्यांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे.खेळांमध्ये भारताची शान वाढत आहे,ऑलिम्पिक असो, राष्ट्रकुल असो, सर्वत्र आपल्या मुला-मुलींनी चमकदार कामगिरी केली आहे.
माननीय अध्यक्ष महोदय,
कोणत्याही भारतीय नागरिकाला अशा अनेक गोष्टींची गणती करून दाखवू शकतो. राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. देशात प्रत्येक पातळीवर, प्रत्येक क्षेत्रात आशादायक परिस्थिती दिसून येत आहे. आता हा देश विश्वासाने ओतप्रोत भरलेला आहे. आता आपला देश स्वप्ने आणि संकल्प यांच्यासह वाटचाल करत आहे. मात्र इथे काही लोक निराशेच्या गर्तेत बुडाले आहेत. काका हाथरसी यांनी एक गमतीदार गोष्ट सांगितली होती. काका हाथरसी म्हणाले होते-
'आगा-पीछा देखकर क्यों होते गमगीन, जैसी जिसकी भावना वैसा दीखे सीन'।
म्हणजेच, ‘पुढे मागे पाहत राहून का दुःखी होता, ज्याच्या मनात जशी भावना असेल तसाच समोरचा आहे असे तुम्हांला वाटते’
आदरणीय अध्यक्ष महोदय,
खरेतर ही निराशा देखील उगीचच आलेली नाही,याच्या मागे देखील एक कारण आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा जनादेश आहे, आणि पुनःपुन्हा मिळालेला जनादेश आहे. त्याच बरोबर या निराशेच्या मागे अंतर्मनात दडून राहिलेली अशी एक गोष्ट आहे जी या लोकांना सुखाने झोप लागू देत आणि ती म्हणजे 2014 च्या आधीच्या दहा वर्षांत म्हणजे 2004 पासून 2014 पर्यंतच्या काळात, भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. दहा वर्षांत महागाईचा दर दोन अंकी झाला. म्हणून जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडते तेव्हा तर यांची निराशा अधिक दाटून येते. आणि ज्यांनी बेरोजगारी दूर करण्याचा शब्द दिला होता त्यांचे काय...
माननीय अध्यक्ष महोदय,
एकदा दोन तरुण जंगलात शिकारीसाठी गेले आणि बंदुका खाली उतरवून जंगलात जरा फेरफटका मारू लागले. त्यांना वाटलं, अजून खूप लांब जायचं आहे तर थोडे हातपाय मोकळे करून घेऊया.वाघाची शिकार करण्यासाठी दोघे निघाले होते आणि त्यांनी विचार केला की आता थोडे पुढे गेले की वाघ दिसेलच. पण झालं असं की, त्यांना तिथेच वाघ दिसला. ते नुकतेच तर गाडीतून उतरले होते आणि बंदूका गाडीतच राहून गेल्या होत्या आणि वाघ दिसला, अरे बापरे, आता काय करावे? तर त्या दोघांनी वाघाला बंदुकीचा परवाना दाखवला, की पहा आमच्याकडे बंदुकीचा परवाना आहे. या लोकांनी देखील बेरोजगारी दूर करण्याच्या हेतूने तयार केलेला कायदा दाखवला, की पहा आम्ही कायदा तर तयार केला आहे. यांची हीच पद्धत आहे की एकदाची स्वतःची सोडवणूक करून घेतली की झाले. वर्ष 2004 ते 2014 हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात अधिक घोटाळ्यांचे दशक आहे, सर्वात मोठ्या घोटाळ्यांचे दशक. ती 10 वर्षे, संयुक्त पुरोगामी आघाडीची ती 10 वर्षे, ज्यामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत भारताच्या प्रत्येक काना-कोपऱ्यात दहशतवादी हल्ल्यांच्या घटना एकामागोमाग एक सुरूच राहिल्या, सलग दहा वर्षे... देशातील प्रत्येक नागरिक या काळात असुरक्षित होता, अनोळखी वस्तूला हात लावू नका, अशा वस्तूंपासून लांब रहा, अशा सुचनांचा मारा चहूबाजूंनी होत होता. त्याच संदर्भातील बातम्या प्रसारित होत होत्या. या 10 वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरपासून ईशान्य प्रदेशापर्यंत सर्वत्र हिंसेचा संचार होता. या दहा वर्षांमध्ये जागतिक मंचावर भारताचा आवाज इतका दुबळा होता की जग आपले म्हणणे ऐकून घेण्यास देखील तयार नव्हते.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
काही लोकांच्या या निराशेचे एक करण हे देखील आहे की आज जेव्हा देशाच्या क्षमतेची जाणीव होत आहे, 140 कोटी देशवासीयांचे सामर्थ्य उमलून येत आहे, स्वच्छपणे प्रकट होत आहे. पूर्वीदेखील देशामध्ये सामर्थ्य होतेच. पण 2004 सालापासून 2014 पर्यंत या लोकांनी त्याबाबतीतल्या सगळ्या संधी वाया घालवल्या. आणि प्रत्येक संधीचे संकटात रुपांतर करणे हीच संयुक्त पुरोगामी आघाडीची ओळख बनून गेली. जेव्हा तंत्रज्ञान माहितीचे युग मोठ्या वेगाने वाढत होते, उसळी घेत होते तेव्हा हे लोक 2जी तंत्रज्ञानात अडकून राहिले, संधीचे संकटात रुपांतर. नागरी अण्वस्त्र करार झाला, जेव्हा या कराराविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती तेव्हा हे लोक कॅश फॉर वोट च्या उद्योगात व्यस्त होते. असा खेळ सुरु होता.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
वर्ष 2010 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यावेळी देशातील युवकांच्या सामर्थ्याचे सादरीकरण करण्याची फार मोठी संधी भारताच्या हाती होती. पण पुन्हा एकदा, संधीचे संकटात रुपांतर, आणि राष्ट्रकुल घोटाळ्यामुळे आपला देश जगात बदनाम झाला.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
कोणत्याही देशाच्या विकासात उर्जेला स्वतःचे असे एक वेगळे स्थान असते. आणि जेव्हा भारताच्या उर्जा सामर्थ्याला उभारी देण्याविषयी चर्चा होण्याची गरज होती तेव्हा या शतकाच्या दुसऱ्या दशकात हिंदुस्थानची चर्चा ब्लॅकआऊटच्या संदर्भात झाली. संपूर्ण जगात ब्लॅकआऊटच्या त्या दिवसांची चर्चा झाली. कोळसा घोटाळा देखील चर्चिला गेला.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
देशावर कितीतरी दहशतवादी हल्ले झाले. 2008 मधील दहशतवादी हल्ला तर कोणीच विसरू शकत नाही. पण त्या वेळी, निधड्या छातीने दहशतवादाच्या डोळ्याला डोळा भिडवून प्रतिहल्ला करण्याची शक्तीच नव्हती. दहशतवादाच्या आव्हानाला आव्हान देण्याचे सामर्थ्य त्यावेळी कोणातच नव्हती. त्यामुळे दहशतवाद्यांची हिम्मत आणखी वाढत गेली आणि संपूर्ण देशात दहा वर्षांपर्यंत माझ्या देशातील निर्दोष लोकांचे रक्त सांडत राहिले, असे दिवस होते ते.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
जेव्हा नियंत्रण रेषा तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा यांच्या माध्यमातून भारताच्या सामर्थ्यात वाढ करण्याची संधी होती तेव्हा, संरक्षण सामग्रीच्या व्यवहारातील घोटाळे, हेलिकॉप्टर घोटाळे यांच्यात सत्तेवर नियंत्रण ठेवणाऱ्या लोकांची नावे कोरली गेली.
आदरणीय अध्यक्ष महोदय जी,
जेव्हा देशाला गरज होती आणि निराशेच्या मुळाशी या सर्व गोष्टी दाबून राहिलेल्या होत्या त्या सर्व आता उसळून वर येत आहेत.
आदरणीय अध्यक्ष महोदय जी,
वर्ष 2014 च्या आधीचे जे दशक होते ते लॉस्ट डीकेड म्हणजेच पराभूत दशक म्हणून हिंदुस्तान दर क्षणी लक्षात ठेवेल आणि कोणीच या गोष्टीला नाकारू शकत नाही की 2030 चे जे दशक असेल ते संपूर्ण जगासाठी भारताचे दशक’ असेल.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
लोकशाहीमध्ये टीकेला असलेल्या महत्त्वाचा मी आदर करतो.आणि मला नेहमी असे वाटते की, लोकशाहीची जननी म्हटला जाणारा भारत शेकडो वर्षांपासून आपल्या लोकशाहीच्या रंगांमध्ये वाढला आहे.आणि म्हणूनच मी असे मानतो की, टीका एका अर्थी लोकशाही मजबूत करण्यासाठी, लोकशाहीच्या वाढीसाठी, लोकशाहीच्या उर्जेसाठी आवश्यक आहे, टीका म्हणजे एक शुद्धीकरण करणारा यज्ञ आहे. आपण टीकेला त्याच रुपात बघतो आहोत. मी अनेक दिवस प्रतीक्षा करतो आहे की कोणीतरी खूप अभ्यास करून येईल, कोणी विश्लेषण करेल तर कोणी अशी टीका करेल ज्यापासून देशाला काहीतरी लाभ होईल.पण यांनी 9 वर्षे टीका, आरोपांमध्ये घालवली. आरोप करणे, शिवीगाळ, काहीही बोलणे, याशिवाय काहीच केले नाही. चुकीचे आरोप आणि शिव्याशाप, या निवडणूकीत तुम्ही हरणार, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र खराब आहे, निवडणुकीत हरलात तर द्या शिव्या निवडणूक आयोगाला, ही काय पद्धत आहे. न्यायालयात आपल्या बाजूने निकाल लागला नाही तर सर्वोच्च न्यायालयावर टीका करा.
माननीय अध्यक्ष महोदय,
जर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी केली जात असेल तर तपास यंत्रणांना नावे ठेवा, जर भारतीय सैन्याने पराक्रम केला, धाडसाचे दर्शन घडवले आणि त्या कामगिरीच्या माध्यमातून देशाच्या जनमानसात नवा विश्वास निर्माण केला तर सैन्यावर आरोप करा, असे सुरु आहे.
कधी आर्थिक, देशाच्या प्रगतीच्या बातम्या आल्या, आर्थिक प्रगतीविषयी चर्चा सुरू असो, जगातल्या सर्व संस्थांनी भारताच्या आर्थिक प्रगतीचे कौतुक केले, तर इकडून बाहेर पडले की आरबीआयला शिव्या दिल्या जातात, भारतातल्या आर्थिक संस्थांना लाखोली वाहिली जाते.
माननीय अध्यक्ष महोदय,
गेल्या 9 वर्षात आम्ही पाहिले आहे की, काही लोक दिवाळखोरीत निघाले आहेत. एका भरीव, विधायक, रचनात्मक टीकेची जागा अनिवार्य टीकेने घेतली आहे. आणि मारून मुटकून टीका करण्याच्या कामातच हे मग्न आहेत, त्यातच ते हरवले आहेत.
माननीय अध्यक्ष महोदय,
सभागृहामध्ये भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या संस्थांविषयी खूप काही बोलण्यात आले आणि मी पाहिले, विरोधकांमधील बहुतांश लोक या विषयावर सुरात सूर मिसळत होते. ‘मिले मेरा- तेरा सूर।’
आदरणीय अध्यक्ष महोदय,
मला असे वाटत होते की, देशातील जनता, देशात झालेल्या निवडणुकांचे निकाल अशा लोकांना नक्कीच एका व्यासपीठावर आणतील. परंतु तसे झाले तर नाही. मात्र या लोकांनी ‘ईडी’ ला धन्यवाद दिले पाहिजेत. कारण ईडीमुळे हे लोक एका मंचावर आले आहेत. ईडीने या लोकांना एका मंचावर एकत्रित केले आहे. आणि म्हणूनच जे काम देशाचे मतदार करू शकले नाहीत, ते काम ईडीने केले आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
मी अनेकवेळा ऐकत आलो आहे, इथे काही लोकांना हार्वर्ड अभ्यासाचे खूप ‘वेड’ आहे. कोरोना काळामध्ये असेही सांगितले होते आणि कॉंग्रेसने म्हटले होते की, भारताच्या विनाशावर हार्वर्डमध्ये ‘केस स्टडी’ होईल आणि काल पुन्हा सभागृहामध्ये हार्वर्ड विद्यापीठातील स्टडीवर चर्चा झाली. माननीय अध्यक्ष महोदय, गेल्या वर्षांमध्ये हार्वर्डमध्ये एक अतिशय चांगला अभ्यास झाला आहे. अतिशय महत्वपूर्ण विषयावर अभ्यास केला गेला आहे. आणि या अभ्यासाचा विषय काय होता, तो मी सभागृहामध्ये अवश्य सांगू इच्छितो. आणि हा अभ्यास झाला आहे, या अभ्यासाचा विषय आहे - ‘‘द राईज अॅंड डिक्लाईन ऑफ इंडियाज् कॉंग्रेस पार्टी’’ यावर अभ्यास केला गेला आहे. आणि मला विश्वास आहे, अध्यक्ष महोदय, मला विश्वास आहे , भविष्यामध्ये कॉंग्रेसच्या विनाशावर फक्त हार्वर्डच नाही तर इतरही मोठ-मोठ्या विद्यापीठांमध्ये अध्ययन केले जाणार म्हणजे जाणारच आहे. आणि कॉंग्रेसला बुडवणाऱ्या लोकांवरही अभ्यास केला जाईल.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
या प्रकारच्या लोकांसाठी दुष्यंत कुमार यांनी अतिशय उत्तम ओळीत काही गोष्टी सांगितल्या आहेत. आणि दुष्यंत कुमार यांनी जे काही म्हटले आहे, ते इथे अगदी चपखल बसते. त्यांनी सांगितले आहे की, -
‘तुम्हारे पॉंव के नीचे, कोई जमीन नहीं,
कमाल ये है कि, फिर भी तुम्हें यकीन नहीं।
आदरणीय अध्यक्ष महोदय,
या लोकांना शेंडा -बुडखा नसलेल्या विषयावर बोलण्याची सवय आहे, त्यामुळे त्यांना आपण काय बोललो, हेही लक्षात रहात नाही; आणि आपण बोललेल्या विधानाशीच विसंगत बोलतात. आपण जे बोलतो, त्याच्याच बरोबर उलटेही बोलतात. कधी एक गोष्ट तर कधी दुसरी गोष्ट, कधी एका बाजूने तर कधी दुसऱ्या बाजूने बोलतात. शक्य असेल तर त्यांनी आत्मचिंतन करावे आणि स्वतःमध्ये जो विरोधाभास आहे, त्यालाही दुरुस्त करावे. आता 2014 पासून ही मंडळी सातत्याने टीका करत आहेत. प्रत्येक वेळी टीका करतात की भारत दुबळा होत आहे, भारताचे कोणी ऐकायलाही तयार नाही. भारताची विश्वामध्ये काही प्रतिमा, पत-वजनच राहिले नाही. असे बरेच काहीबाही बोलत असतात. आणि आता काय म्हणत आहेत, आता म्हणत आहेत, भारत इतका शक्तिशाली झाला आहे की, इतर देशांना धमकावून निर्णय घेत आहे. अरे, प्रथम हे तर ठरवा की, भारत दुबळा झाला आहे की शक्तिशाली झाला आहे.
माननीय अध्यक्ष महोदय,
कोणतीही जिवंत संघटना असते, ती एक जिवंत व्यवस्था असते, ती जमिनीशी जोडली गेलेली व्यवस्था असते. आणि या व्यवस्थेमध्ये जनता -जनार्दनामध्ये नेमके काय सुरू आहे, लोकांमध्ये काय चर्चा सुरू आहे, याचे चिंतन करीत असते, त्यातून काही शिकण्याचा प्रयत्न केला जात असतो आणि आपला मार्गही काळानुरूप बदलण्याचं काम ही व्यवस्था करीत असते. परंतु जे अहंकारामध्येच गुंग झाले आहे, जे काही आहे, ते ज्ञान आपल्यालाच आहे, आम्हीच योग्य आहोत, अशा विचारांमध्ये जगत असतात, त्यांना वाटते की, मोदी यांना शिव्या दिल्या की, आपला मार्ग मोकळा होईल. मोदींवर खोटे आरोप लावले, वाट्टेल तशी चिखलफेक केली की, आपला मार्ग प्रशस्त होईल. आता 22 वर्ष झाली आहेत, ही मंडळी अशाच खोट्या समजुतीमध्ये बसली आहेत.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
मोदींवर असलेला विश्वास वर्तमानपत्रातल्या ठळक बातम्यांवरून निर्माण झालेला नाही. मोदींवरील विश्वास या टी.व्ही.वर चमकणाऱ्या चेहऱ्यांवरून केला जात नाही. यासाठी संपूर्ण जीवन खर्ची घातलं आहे. क्षण-क्षण खर्च केला आहे. देशाच्या लोकांसाठीच खर्च केला आहे, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्य खपवले आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय, देशवासियांचा मोदीवर असलेला विश्वास, ही गोष्ट या लोकांच्या समजण्याच्याही पलिकडे आहे आणि समजण्याच्यापेक्षा जास्त उंचीवर आहे. असे खोटे आरोप लावणा-यांवर मोफत अन्नधान्य घेणारे माझ्या देशातले 80 कोटी देशवासी कधीतरी यांच्यावर विश्वास ठेवतील का?
आदरणीय अध्यक्ष महोदय,
‘वन नेशन- वन रेशनकार्ड’. संपूर्ण देशभरामध्ये कोठेही गरीबातल्या गरीबाला आता अन्नधान्य मिळत आहे. मग तुमच्या खोट्या गोष्टींवर, तुमच्या चुकीच्या आरोपांवर कसा काय विश्वास ठेवला जाईल.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
जे लोक काल नाईलाजाने रस्त्यावर- पदपथावर जीवन जगत होते, झोपडपट्ट्यांमध्ये कसेबसे जीवन जगत होते अशा तीन कोटींपेक्षा जास्त लोकांना आता पक्की घरकुले मिळाली आहेत. हे लोक, तुम्ही देत असलेल्या शिव्या, तुमचे हे खोटे आरोप यावर विश्वास ठेवतील का, अध्यक्ष महोदय?
आदरणीय अध्यक्ष महोदय,
नऊ कोटी लोकांना मोफत गॅस जोडणी मिळाली आहे. ते लोक तुमच्या असत्याचा कसे काय स्वीकार करतील? 11 कोटी भगिनींना घर देवून प्रतिष्ठा मिळाली आहे. शौचालय मिळाले आहे. तुमच्या असत्याचा त्या कसा काय स्वीकार करतील?
आदरणीय अध्यक्ष महोदय,
स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली. 8 कोटी परिवारांना आज नळाव्दारे पाणी मिळत आहे. त्या माता तुमच्या खोट्या बोलण्याचा कसा स्वीकार करतील. तुमच्या शिव्यांना, तुमच्या शापांना कसे स्वीकारतील? आयुष्मान भारत योजनेतून दोन कोटी परिवारांना मदत पोहोचली आहे. त्यांचे जीवन वाचले आहे. त्यांच्या संकटाच्या वेळी मोदी उपयोगी पडले आहेत, तुमच्या शिव्या ते कशा स्वीकारतील, कशा स्वीकारतील ?
आदरणीय अध्यक्ष महोदय,
तुमच्या शिव्यांना, तुम्ही केलेल्या आरोपांना या कोटी-कोटी भारतीयांना तोंड देऊन जावे लागेल. ज्यांना अनेक दशके संकटमय, बिकट परिस्थितीमध्ये आयुष्य जगण्यासाठी तुम्ही भाग पाडले होते.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
काही लोक आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी खूप काही नष्ट करण्याचे काम करीत आहेत. आपल्यासाठी आणि आपल्या परिवासाठीच ही मंडळी जगत आहेत. अहो, मोदी तर या 25 कोटी देशवासीय कुटुंबातले सदस्य आहेत.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
140 कोटी देशवासियांचे आशीर्वाद हे माझे सर्वात मोठे, मजबूत सुरक्षा कवच आहे. आणि शिव्यांच्या शस्त्राने, खोट्या आरोपांच्या शस्त्र-अस्त्रांनी या सुरक्षा कवचाला तुम्ही कधीच भेदू शकणार नाही. हे विश्वासाचे सुरक्षा कवच आहे आणि या अशा शस्त्रांनी तुम्ही कधीच ते भेदू शकणार नाही.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
आमचे सरकार काही गोष्टींसाठी कटिबद्ध आहे. समाजातील वंचित वर्गाला प्राधान्य देण्याचा संकल्प घेऊनच आम्ही जगतो आहोत, हाच संकल्प घेऊन पुढे वाटचाल करतो आहोत. कित्येक दशकांपासून दलित,मागास, आदिवासी अशा सर्व घटकांना ज्या अवस्थेत सोडून दिलं होतं, घटनाकर्त्यांनी ज्या सुधारणांची अपेक्षा केली होती,ज्या सुधारणा त्यांनी घटनेमध्ये नमूद केल्या होत्या, त्या सुधारणा झाल्याच नाहीत. मात्र 2014 नंतर गरीब कल्याण योजनांचा सर्वाधिक लाभ माझ्या ह्याच कुटुंबांना मिळाला आहे. दलित, मागास, आदिवासी अशा लोकांच्या वस्त्यांमध्ये पहिल्यांदा वीज पोहोचली आहे अध्यक्ष महोदय! कित्येक मैल त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असे. पहिल्यांदाच नळाने पाणी त्यांच्या घरापर्यंत पोहोचले आहे, माननीय अध्यक्ष महोदय. कित्येक कुटुंबे, कोट्यवधी कुटुंबे पहिल्यांदाच आज पक्क्या घरात येऊ शकले आहेत, तिथे राहत आहेत.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
ज्या वस्त्या आपण सोडून दिल्या होत्या. ज्यांची आपल्याला केवळ निवडणुकीच्या वेळीच आठवण येत असे. अशा वस्त्यांमध्ये आज रस्ते, वीज, पाणी इतकेच नाही तर 4जी इंटरनेट सेवाही पोहोचली आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
आज जेव्हा एक आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर बसलेल्या आपण बघतो, तेव्हा संपूर्ण देशाला त्याचा अभिमान वाटतो. सगळा देश त्यांचा गौरव करतो. आज देशात, मातृभूमीसाठी ज्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं, बलिदान दिलं अशा आदिवासी जमातीच्या स्त्री-पुरुषांचा गौरव केला जात आहे. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले त्यांचे पुण्यस्मरण केले जात आहे. आणि आमच्या आदिवासींचा गौरव दिवस साजरा केला जात आहे. आणि मला अत्यंत अभिमान वाटतो की, अशा आपल्या अत्यंत महान आदिवासी परंपरेच्या प्रतिनिधी म्हणून एक महिला देशाचे नेतृत्व करत आहेत. राष्ट्रपती म्हणून काम करत आहेत. आपण त्यांना त्यांचा हक्क दिला आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
आपण पहिल्यांदाच बघतो आहोत. एक गोष्ट ही देखील बरोबर आहे. हा केवळ माझाच अनुभव आहे असे नाही, तर आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा आई सशक्त असते, तेव्हा पूर्ण कुटुंब सशक्त, सक्षम बनते. कुटुंब सक्षम बनते, तेव्हा संपूर्ण कुटुंब सक्षम होते, कुटुंब सक्षम होते, तेव्हा संपूर्ण समाज सक्षम होतो आणि तेव्हाच देशही सक्षम होतो. आणि मला अतिशय समाधान आहे, की, माता-भगिनी, मुली यांची सर्वात जास्त सेवा करण्याचे सौभाग्य आमच्या सरकारला मिळाले आहे. आम्ही प्रत्येक छोटी अडचण दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अतिशय संवेदनशीलतेने आम्ही त्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
कधी कधी थट्टा केली जाते. हे कसे पंतप्रधान आहेत, लाल किल्ल्यावरुन शौचालयाविषयी बोलतात. त्याची खूप थट्टा केली असती. माननीय अध्यक्ष महोदय, हे शौचालय, हे इज्जत घर, ही माझ्या या माता-भगिनींची क्षमता, त्यांच्यासाठीच्या सुविधा, त्यांची सुरक्षितता या सगळ्यांचा सन्मान करणारी गोष्ट आहे. एवढंच नाही, माननीय अध्यक्ष महोदय, जेव्हा मी सॅनिटरी पॅड्स विषयी बोलतो, तेव्हा लोकांना वाटतं की पंतप्रधान अशा विषयांवर का बोलतात?
माननीय अध्यक्ष महोदय,
सॅनिटरी पॅड्सच्या अभावी गरीब घरातील बहिणी-मुली, किती अपमान सहन करत असत, किती आजारांचा सामना करत असत. माता-भगिनींना धुरात कित्येक तास काम करावं लागत असे. त्यांचे आयुष्य या चुलीच्या धूरात अडकले होते. त्यातून मुक्ती देण्याचे काम, या गरीब माता-भगिनींना साठी सौभाग्य आपल्याला मिळाले आहे. आधी तर त्यांचे संपूर्ण आयुष्य यातच संपून जात असे. अर्धा वेळ पाणी आणण्यात, अर्धा वेळ केरोसिनच्या रांगेत उभे राहण्यात. आज त्यापासून माता-भगिनींना मुक्ती देण्याचे समाधान आम्हाला मिळाले आहे.
माननीय अध्यक्ष महोदय,
आधी जे चालत होते, तेच आम्हीही सुरू ठेवले असते, तर कदाचित आम्हाला कोणी प्रश्न विचारले नसते, की मोदीजी हे का नाही केले, ते का नाही केले, कारण आपण तर देश अशा स्थितीत आणून ठेवला होता, की त्यातून कोणी बाहेर निघूच शकत नव्हते. अशा निराश मनःस्थितीत देशाला ढकलून दिले होते. आम्ही उज्ज्वला योजनेतून धुरातून मुक्ती दिली. जल जीवन मधून पाणी दिले. भगिनींच्या सक्षमीकरणाचे काम केले. नऊ कोटी भगिनींना स्वयंसहायता बचत गटांशी जोडणे. खाणकामापासून ते संरक्षण क्षेत्रापर्यंत आज माता-भगिनींसाठी, मुलींसाठी नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ह्या संधी खुल्या करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
आपण जर आज तो काळ आठवला तर, आपल्या लक्षात येईल की मतपेटीच्या राजकारणाने कधीकधी देशाच्या सामर्थ्यालाही खूप मोठा खोलवर आघात केला आहे. आणि त्याचाच हा परिणाम आहे, की देशात जे व्हायला हवे होते, योग्य वेळी व्हायला हवे होते, त्यासाठी आज खूप उशीर झाला आहे. तुम्ही बघा, मध्यम वर्ग.. दीर्घकाळ मध्यम वर्गाला पूर्णपणे नकार देण्यात आला. त्यांच्याकडे बघितले सुद्धा गेले नाही. जणू ते हे समजून चालले होते, की आपल्याला कोणी वाली नाही. आपल्या मनगटाच्या बळावर जे काही होऊ शकेल, ते करत चला. आपली संपूर्ण शक्ती ते बिचारे खर्च करत असत. मात्र, आमच्या सरकारने, रालोआ सरकारने मध्यमवर्गाच्या प्रामाणिकतेची दखल घेतली. त्यांना सुरक्षितता दिली आहे. आणि आज आमचा परिश्रमी मध्यम वर्ग देशाला नव्या उंचीवर घेऊन जात आहे. सरकारच्या विविध योजनांमुळे मध्यम वर्गाला किती लाभ मिळाला आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मी 2014 च्या आधीच्या जीबी डेटाचे उदाहरण देतो, कारण आज जग आमूलाग्र बदलले आहे. ऑनलाईन जग सुरू आहे. प्रत्येकाच्या हातात आज मोबाइल आहे. काही लोकांचे तर खिसे फाटलेले असतील, तरी त्यांच्याकडे मोबाईल असतो.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
2014 च्या आधी जीबी डेटाची किंमत 250 रुपये इतकी होती. आज ही किंमत केवळ दहा रुपये आहे. आपल्या देशात साधारणपणे एक व्यक्ती सरासरी 20 जीबीचा उपयोग करतो. त्या हिशेबाने जर आपण पाहिले, तर सरासरी प्रत्येक व्यक्तीचे 5 हजार रुपये वाचले आहेत.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
आदरणीय अध्यक्ष महोदय,
जन औषधी विक्री केंद्रे आज संपूर्ण देशभरात आकर्षणाचे कारण ठरले आहेत, कारण मध्यमवर्गीय कुटुंबात जर ज्येष्ठ नागरिक असेल, मधुमेहासारखा आजार असेल, तर हजार, दोन हजार,अडीच किंवा तीन हजार रुपयांची औषधे घ्यावी लागतात. जी औषधे बाजारात 100 रुपये दराने मिळतात, तीच औषधे, जनऔषधी केंद्रात 10 रुपयांत,20 रुपयांत मिळतात. आज जनऔषधीमुळे मध्यम वर्गाचे 20 हजार कोटी रुपये वाचतात.
माननीय अध्यक्ष महोदय,
प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबांचं एक स्वप्न असतं की त्यांचं स्वतःचं एक घर बनावं आणि म्हणूनच शहरी भागात, गृहकर्जाची व्यवस्था करण्याचे काम आम्ही केले. त्यातही रेरा कायदा बनवला आहे. गृहखरेदीत, मध्यम वर्गातील लोकांची आयुष्यभराची कमाई कित्येक वर्षे, अडकवून ठेवली जाई, त्यातून त्यांना मुक्ती देत, एक नवा विश्वास देण्याचे काम आम्ही केले. आणि म्हणूनच, स्वतःचे घर बनवण्यासाठी आम्ही त्यांची सोय केली आहे.
आदरणीय अध्यक्ष जी,
प्रत्येक मध्यम वर्गीय कुटुंबाचा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी एक मनसुबा असतो.आज वैद्यकीय महाविद्यालये असोत, अभियांत्रिकी महाविद्यालये असोत, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची संख्या वाढवण्यात आली आहे, जागा वाढवण्यात आल्या आहेत.त्यामुळे मध्यम वर्गाच्या आकांक्षांची उत्तम रीतीने दखल घेण्यात आली आहे.आपल्या मुलांचे भविष्य निश्चितच उज्वल आहे असा विश्वास या वर्गात निर्माण झाला आहे.
आदरणीय अध्यक्ष जी,
देशाला पुढे न्यायचे असेल तर भारताला आधुनिकतेचा मार्ग चोखाळण्यावाचून पर्याय नाही. आता वेळ वाया घालवू शकत नाही, ही काळाची गरज आहे.म्हणूनच आम्ही पायाभूत सुविधांकडे लक्ष पुरवले आहे.एके काळी गुलामीच्या कालखंडापूर्वी हा देश स्थापत्या साठी,पायाभूत सुविधांसाठी,जगभरात त्याची ताकद होती, त्यासाठी ओळख होती. गुलामीच्या काळात हे सर्व नष्ट झाले. देश स्वतंत्र झाल्यानंतर ते दिवस पुन्हा येतील अशी आशा होती मात्र तो काळही गेला. जे घडायला हवे होते,ज्या वेगाने घडायला हवे होते, ज्या प्रमाणात व्हायला हवे होते ते आपण करू शकलो नाही. आज यामधे मोठे परिवर्तन या दशकात दिसून येत आहे. सागरी मार्ग असोत, रस्ते असोत, व्यापार असो, जल मार्ग असोत, प्रत्येक क्षेत्रात आज पायाभूत सुविधांमध्ये कायापालट दिसून येत आहे. महामार्ग क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक होत आहे.
माननीय अध्यक्ष जी,
जगभरात रुंद रस्त्यांची व्यवस्था असे, भारतात रुंद रस्ते,महामार्ग, द्रुतगती महामार्ग आज देशाची नवी पिढी पाहत आहे.भारतात जागतिक स्तरावरचे उत्तम महामार्ग, द्रुत गती मार्ग व्हावेत या दिशेने आमचे काम सुरू आहे. पूर्वी इंग्रजानी ज्या रेल्वे पायाभूत सुविधा निर्माण केल्या होत्या तिथेच आपण थबकलो होतो, त्याच आपण चांगल्या मानल्या.गाडी चालत होती.
आदरणीय अध्यक्ष जी,
त्या काळात,ज्या सुविधा इंग्रज सोडून गेले होते त्या तशाच ठेवत आपण आयुष्य कंठात राहिलो आणि रेल्वेची ओळख काय निर्माण झाली होती ?रेल्वे म्हणजे धक्का-बुक्की, रेल्वे म्हणजे अपघात, रेल्वे म्हणजे उशिरा धावणाऱ्या गाड्या. एके काळी दर महिन्याला अपघाताच्या वारंवार घटना घडत असत. एक काळ होता तेव्हा नशिबी अपघात असत. मात्र आता रेल्वे मध्ये वंदे भारत, प्रत्येक खासदार आमच्या इथे वंदे भारत सुरु करा म्हणून मागणी करतो. आज रेल्वे स्थानकांचा कायापालट होत आहे. सत्तर वर्षात सत्तर विमानतळ,नऊ वर्षात सत्तर विमानतळ. देशात जलमार्गही तयार करण्यात येत आहेत,जल मार्गांनी आज वाहतूक होत आहे. आदरणीय अध्यक्ष जी, देशात आधुनिकता आणण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांवर भर देत आमची वाटचाल सुरु आहे.
आदरणीय अध्यक्ष जी,
माझ्या सार्वजनिक जीवनात, सार्वजनिक जीवनात मला 4-5 दशके झाली असतील, हिंदुस्तानच्या गावा-गावामधून मी फिरलो आहे. या प्रवासात,प्रदीर्घ कालखंडात प्रत्येक स्तरातल्या कुटुंबासमवेत संवाद साधण्याची संधी मिळाली आहे आणि म्हणूनच प्रत्येक भागातल्या समाजाच्या भावना जाणतो. याच आधारावर सांगू शकतो आणि अतिशय विश्वासाने सांगू शकतो की भारतातल्या जनसामान्यांच्या जीवनात प्रचंड सकारात्मकता आहे. सकारात्मकता हा त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या संस्काराचा भाग आहे. भारतीय समाज नकारात्मकता सहन करतो मात्र ती स्वीकारत नाही, हा त्याचा स्वभाव नाही. भारतीय समुदाय हा स्वभावाने प्रसन्न राहणारा,स्वप्ने पाहणारा,पापभिरू समाज आहे. सृजनात्मक कार्य करणारा समाज आहे. जे लोक स्वप्न बाळगतात की कधी इथे बसत होते, परत कधी संधी मिळेल, अशा लोकांनी 50 वेळा विचार करावा, आपल्या पद्धतीविषयी जरा फेरविचार करावा. लोकशाहीमध्ये आपल्यालाही आत्मचिंतनाची आवश्यकता आहे. आधार आज डिजिटल व्यवहारांचा महत्वाचा भाग बनला आहे. आपण त्यालाही निराधार ठरवले. त्याच्याही मागे लागला होतात. त्यासंदर्भात अटकाव करण्यासाठी कोर्ट-कचेऱ्याही केल्यात. जीएसटी ला तर काय-काय म्हटले गेले, कोण जाणे मात्र आज हिंदुस्तानची अर्थव्यवस्था आणि जनसामान्यांचे जीवन सुखकर करण्यामध्ये जीएसटीची मोठी भूमिका आहे. त्या काळात एचएएल संदर्भात किती शंका-कुशंका उपस्थित केल्या गेल्या,मोठ-मोठ्या मंचांचा दुरुपयोग केला गेला. आज हेलीकॉप्टर निर्मितीचे ते आशियातले सर्वात मोठे केंद्र ठरले आहे. जिथे शेकडो तेजस विमानांची निर्मिती होत आहे, भारतीय सैन्याच्या हजारो-हजारो कोटी रुपयांच्या ऑर्डर आज एचएएलकडे आहेत. भारतामध्ये एक सळसळता संरक्षण उद्योग उदयाला येत आहे. आज भारत संरक्षण क्षेत्रात निर्यात करू लागला आहे. माननीय अध्यक्ष जी, हिंदुस्तानच्या प्रत्येक युवकाला अभिमान वाटतो. निराशेच्या गर्तेतल्या लोकांकडून अपेक्षा नाहीत.
आदरणीय अध्यक्ष जी,
आपण जाणताच, काळच सिद्ध करत आहे, जे कधी इथे बसत असत ते तिथे जाऊनही नापास ठरले आहेत आणि देश विशेष प्राविण्यासह पास होत चालला आहे. म्हणूनच काळाची गरज आहे की आज निराशेच्या गर्तेत असलेल्या लोकांनी शांत चित्ताने आत्मचिंतन करावे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
इथे जम्मू-कश्मीरची देखील चर्चा झाली आणि जे आता नुकतेच जम्मू-कश्मीरला जाऊन आले आहेत , त्यांनी पाहिले असेल की तुम्ही किती रुबाबात आणि अभिमानाने जम्मू-कश्मीरला भेट देऊ शकता, तिथे फिरू शकता.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
गेल्या शतकाच्या उत्तरार्धात मी देखील जम्मू-काश्मीरमध्ये यात्रा काढली होती आणि लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा संकल्प केला होता. आणि तेव्हा दहशतवाद्यांनी पोस्टर लावले होते आणि म्हणाले होते की बघू कोणामध्ये, किती दम आहे आणि कोण लाल चौकात येऊन तिरंगा फडकवणार आहे? असे पोस्टर्स लावले होते आणि तो दिवस 24 जानेवारी होता, मी जम्मूमध्ये एका सभेत बोललो होतो. अध्यक्ष महोदय. मी गेल्या शतकाबद्दल बोलत आहे. आणि तेव्हा मी दहशतवाद्यांना सांगितले की, कान उघडे ठेवून ऐका, मी 26 जानेवारीला सकाळी 11 वाजता लाल चौकात पोहोचेन, कुठल्याही सुरक्षेशिवाय येईन, बुलेटप्रूफ जॅकेटशिवाय येईन आणि निर्णय लाल चौकात येईन, पाहू कुणामध्ये किती दम आहे . तो काळ होता.
माननीय अध्यक्ष महोदय,
आणि जेव्हा श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला गेला, त्यानंतर माध्यमातील लोक विचारू लागले , तेव्हा मी म्हटले होतं की साधारणपणे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी जेव्हा भारताचा तिरंगा फडकवला जातो , तेव्हा भारताची शस्त्रास्त्रे , भारताच्या बंदुका सलामी देतात, आवाज करतात. मी म्हणालो, आज जेव्हा मी लाल चौकात तिरंगा फडकावतो, तेव्हा शत्रू देशाचा तोफखानाही सलामी देत आहे , गोळीबार करत आहे , बंदुका आणि बॉम्ब फोडत आहेत.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
आज तिथे जी शांतता नांदत आहे, त्यामुळे आज तणावाशिवाय जाऊ शकतो, शेकडोच्या संख्येने जाऊ शकतो. असे वातावरण आणि पर्यटनाच्या बाबतीत जम्मू-काश्मीरने अनेक दशकांनंतर सर्व विक्रम मोडले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये आज लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय ,
आज जम्मू-काश्मीरमध्ये हर घर तिरंगाचे यशस्वी कार्यक्रम होत आहेत. मला आनंद आहे की, असे काही लोक आहेत, जे एकेकाळी म्हणायचे की, तिरंग्यामुळे शांतता भंग होण्याचा धोका उदभवू शकतो. मात्र आजचा काळ पहा, आता ते देखील तिरंगा यात्रेत सहभागी होत आहेत.
आणि आदरणीय अध्यक्ष महोदय ,
वर्तमानपत्रात एक बातमी आली होती, ज्याकडे कदाचित कोणाचेही लक्ष गेले नसेल. आदरणीय अध्यक्ष महोदय, जेव्हा हे लोक टीव्हीवर चमकण्याचा प्रयत्न करत होते , त्याच वेळी वर्तमानपत्रात एक बातमी आली होती. त्याच वेळी श्रीनगरमध्ये अनेक दशकांनंतर थिएटर हाऊसफुल गर्दीने सुरु होती. आणि फुटीरतावादी दूर-दूर वर कुठेच दिसत नव्हते. आता हे इतर देशांनी पाहिले आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय ,
आताच आमचे मित्र, आमचे सन्माननीय सदस्य ईशान्येबाबत बोलत होते. मी म्हणेन ईशान्येला एकदा जाऊन या . तुमच्या काळातील ईशान्य प्रदेश आणि आजच्या काळातील ईशान्य प्रदेश बघून या. आधुनिक रुंद महामार्ग आहेत, रेल्वेचा आरामदायी प्रवास आहे. तुम्ही आरामात विमानाने जाऊ शकता आज ईशान्येच्या काना – कोपऱ्यात फिरू शकता, आणि मी अभिमानाने सांगतो की, स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी होत आहेत, तेव्हा मी अभिमानाने सांगतो की, हिंसाचाराच्या मार्गावर जे चालले होते, अशा जवळपास 7500 लोकांनी 9 वर्षात आत्मसमर्पण केले. आणि फुटीरतावादी प्रवृत्ती सोडून ते मुख्य प्रवाहात आले.
आदरणीय अध्यक्ष महोदय ,
आज त्रिपुरातील लाखो कुटुंबांना पक्की घरे मिळाली आहेत, त्यांच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मला मिळाली. जेव्हा मी त्रिपुरात हीरा योजनेबद्दल बोललो होतो, तेव्हा मी हायवे-आयवे-रेल्वे आणि एअरवे हिरा म्हटले होते, आज त्रिपुराच्या भूमीवर हा हिरा भक्कमपणे चमकत आहे. त्रिपुरा आज वेगाने भारताच्या विकासाच्या प्रवासात भागीदार बनला आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय ,
मला माहित आहे की, सत्य ऐकण्यासाठी देखील खूप सामर्थ्य लागते. आदरणीय अध्यक्ष महोदय, खोटे, घाणेरडे आरोप ऐकण्यासाठी देखील खूप संयम लागतो आणि ज्यांनी घाणेरड्या गोष्टी संयमाने ऐकण्याची ताकद दाखवली त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो, ते अभिनंदनास पात्र आहेत. मात्र ज्यांच्याकडे सत्य ऐकण्याचे सामर्थ्य नसेल , ते किती निराशेच्या गर्तेत बुडाले असतील याचा पुरावा आज देश पाहत आहे.
माननीय अध्यक्ष महोदय ,
राजकीय मतभेद असू शकतात, विचारसरणीचे मतभेद असू शकतात, मात्र हा देश अमर आहे. चला आपण 2047 समोर ठेवून पुढे जाऊया, आपण स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करू, तेव्हा एक विकसित भारत बनवून दाखवू. एक स्वप्न समोर ठेवून चालूया , संकल्प घेऊन चालूया, , पूर्ण सामर्थ्याने चालूया आणि ज्यांना गांधींच्या नावाने पुन्हा पुन्हा भाकरी भाजायची आहे - त्यांना मला सांगायचे आहे की , त्यांनी एकदा गांधी यांना वाचावे. महात्मा गांधींबद्दल वाचावे, महात्मा गांधी म्हणाले होते- जर तुम्ही तुमचे कर्तव्य बजावले तर त्यातच इतरांच्या हक्काचे रक्षण अंतर्भूत आहे. आज आपण कर्तव्य आणि हक्क यांच्यातील लढाई पाहत आहोत, कदाचित देशाने एवढा असमंजसपणा पहिल्यांदाच पाहिला असेल.
आणि म्हणूनच माननीय अध्यक्ष महोदय ,
मी पुन्हा एकदा आदरणीय राष्ट्रपतीजींचे अभिनंदन करतो, राष्ट्रपतींचे आभार मानतो, आणि देश आज इथून एका नव्या उमेदीने, नव्या विश्वासाने , नवा संकल्प घेऊन पुढे मार्गक्रमण करत आहे. खूप खूप धन्यवाद !