
माझ्या प्रिय बंधू, भगिनींनो पराक्रम दिवसानिमित्त शुभेच्छा !
आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मजयंतीच्या या पवित्र प्रसंगी संपूर्ण देश त्यांचे श्रद्धापूर्वक स्मरण करत आहे. मी नेताजी सुभाषबाबूंना श्रद्धापूर्वक नमन करतो. या वर्षी पराक्रम दिनाचा भव्य सोहळा नेताजींच्या जन्मभूमीवर होत आहे. याबद्दल मी ओडिशाच्या जनतेचे आणि ओडिशा सरकारचे अभिनंदन करतो. कटकमध्ये नेताजींच्या जीवनाशी संबंधित एक मोठे प्रदर्शनही भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात नेताजींच्या जीवनाशी संबंधित अनेक स्मृती एकत्रितपणे जतन करण्यात आल्या आहेत. अनेक चित्रकारांनी नेताजींच्या जीवनातील घटनांचे चित्र कॅनव्हासवर रेखाटले आहेत. यासोबतच नेताजींवरील अनेक पुस्तकेही संग्रहित करण्यात आली आहेत. नेताजींच्या जीवनयात्रेचा हा संपूर्ण वारसा माझ्या युवा भारताला एक नवीन ऊर्जा देईल.
मित्रांनो,
आज आपला देश विकसित भारताच्या संकल्पसिद्धीसाठी कार्यरत असताना नेताजी सुभाष यांच्या चरित्रातून आपल्याला निरंतर प्रेरणा मिळते. नेताजींच्या जीवनाचे सर्वात मोठे उद्दिष्ट होते- स्वतंत्र भारत. त्यांनी आपल्या संकल्पसिद्धीसाठी आपला निर्णय एकाच कसोटीवर पारखला- आझाद हिंद. नेताजींचा जन्म एका समृद्ध कुटुंबात झाला होता, त्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. जर त्यांची इच्छा असती तर ते ब्रिटिश राजवटीत वरिष्ठ अधिकारी बनून आरामदायी जीवन जगू शकले असते, परंतु त्यांनी स्वातंत्र्यासाठी कष्ट सोसणे निवडले, आव्हाने निवडली, देशात आणि परदेशात कष्टदायक भ्रमंती केली, नेताजी कम्फर्ट झोनच्या बंधनात बांधले गेले नाहीत. त्याचप्रमाणे, आज आपल्या सर्वांना विकसित भारत घडवण्यासाठी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावे लागेल. आपल्याला जागतिक स्तरावर स्वतःला सर्वोत्तम बनवायचे आहे, आपल्याला उत्कृष्टतेची निवड करावीच लागेल, आपल्याला कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करायचे आहे.
मित्रांनो,
नेताजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली; त्यात देशातील प्रत्येक प्रदेशातील आणि प्रत्येक वर्गातील वीर आणि वीरांगना होत्या. सर्वांच्या भाषा वेगवेगळ्या होत्या, पण भावना एकच होती - देशाचे स्वातंत्र्य. हीच एकी आजच्या विकसित भारतासाठीदेखील एक मोठी शिकवण आहे. तेव्हा स्वराज्यासाठीआपल्याला एकजूट व्हायचे होते, आज आपल्याला विकसित भारतासाठी एकजूट राहायचे आहे. आज देशात आणि जगात सर्वत्र भारताच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण आहे. जग आज भारताकडे पाहत आहे की कसे हे 21 वे शतक हे आपण भारताचे शतक बनवतो आणि अशा महत्त्वपूर्ण काळात आपल्याला नेताजी सुभाष यांच्या प्रेरणेतून भारताच्या एकतेवर भर द्यायचा आहे. आपल्याला अशा लोकांपासूनही सावध राहायचे आहे, जे देशाला कमकुवत करू इच्छितात, जे देशाची एकता तोडू इच्छितात.
मित्रांनो,
नेताजी सुभाष यांना भारताच्या वारशाचा खूप अभिमान होता. ते अनेकदा भारताच्या समृद्ध लोकशाही इतिहासाबद्दल चर्चा करायचे आणि त्यातून प्रेरणा घेण्याचे समर्थक ते होते. आज भारत गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडत आहे. आपल्या वारशाचा अभिमान बाळगत विकास करत आहे. आझाद हिंद सरकारच्या 75 वर्षांच्या पूर्तीनिमित्त लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. तो ऐतिहासिक प्रसंग मी कधीही विसरू शकत नाही. नेताजींच्या वारशापासून प्रेरणा घेत आमच्या सरकारने 2019 मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्यावर नेताजी सुभाष यांना समर्पित एक संग्रहालय बांधले. त्याच वर्षी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार प्रदान करण्यास सुरुवात करण्यात आली. वर्ष 2021 मध्ये, सरकारने नेताजींची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला. इंडिया गेटजवळ नेताजींचा भव्य पुतळा उभारणे, अंदमानमधील एका बेटाला नेताजींचे नाव देणे, प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात आयएनएच्या जवानांना अभिवादन, सरकारच्या याच भावनेचे प्रतीक आहेत.
मित्रांनो,
गेल्या 10 वर्षात देशाने हेही पाहिले आहे की गतिमान विकासामुळे सर्वसामान्यांचे जीवनही सुलभ होते आणि सैन्य सामर्थ्यही वाढते. गेल्या दशकात 25 कोटी भारतीयांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले आहे; हे एक मोठे यश आहे. आज, गाव असो वा शहर, सर्वत्र आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत, त्यासोबतच भारतीय सैन्याची ताकदही अभूतपूर्व वाढली आहे. आज जागतिक व्यासपीठावर भारताची भूमिका विस्तारत आहे, भारताचा आवाज बुलंद होत आहे, तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल.आपल्याला नेताजी सुभाष यांच्यापासून प्रेरणा घेत विकसित भारतासाठी एकाच ध्येयाने आणि एकाच उद्दिष्टाने निरंतर कार्यरत राहावे लागेल आणि हीच नेताजींना खरी कार्यांजली असेल. पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद!