नमस्कार!
कार्यक्रमात उपस्थित आदरणीय संत महोदय, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, मंत्रीपरिषदेतील माझे सहकारी पुरुषोत्तम रुपाला जी, आर्य समाजाच्या विविध संघटनांशी संबंधित सर्व अधिकारी, इतर मान्यवर, भगिनी आणि बंधूंनो!
देश स्वामी दयानंद सरस्वतीजींची 200 वी जयंती साजरी करत आहे. स्वतः स्वामीजींची जन्मभूमी टंकारा येथे जाण्याची माझी इच्छा होती, पण ते जमले नाही. मी मनाने, अंतःकरणाने तुम्हा सर्वांमध्येच आहे. स्वामीजींच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आर्य समाज हा महोत्सव साजरा करत आहे याचा मला आनंद आहे. मला गेल्या वर्षी या महोत्सवाच्या उद्घाटनात सहभागी होण्याची संधी मिळाली होती. ज्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे अशा महापुरुषाशी निगडित हा महोत्सव इतका व्यापक होणे स्वाभाविक आहे. मला विश्वास आहे की हा कार्यक्रम आपल्या नवीन पिढीला महर्षी दयानंद यांच्या जीवनाची ओळख करून देण्यासाठी एक प्रभावी माध्यम बनेल.
मित्रांनो,
स्वामीजींची जन्मभूमी आलेल्या गुजरातमध्ये माझा जन्म होणे हे माझे भाग्य आहे. त्यांची कर्मभूमी हरियाणा होती. त्या हरियाणाचं जीवन जवळून जाणून घेण्याची आणि तिथे काम करण्याची संधी मलाही बराच काळ मिळाली. त्यामुळे साहजिकच माझ्या आयुष्यात त्यांचा एक वेगळा प्रभाव आहे, त्यांची स्वतःची एक भूमिका आहे. आज या निमित्ताने मी महर्षी दयानंदजींच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन करतो. देश-विदेशात राहणाऱ्या त्यांच्या करोडो अनुयायांनाही मी त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
इतिहासात काही दिवस, काही क्षण असे येतात, जे भविष्याची दिशा बदलतात. 200 वर्षांपूर्वी दयानंदजींचा जन्म हा असाच अभूतपूर्व क्षण होता. हा तो काळ होता जेव्हा गुलामगिरीत अडकलेली भारतीय जनता आपले भान हरपत होती; तेव्हा आपल्या रूढी आणि अंधश्रद्धांनी देश कसा जखडला आहे ते स्वामी दयानंदजींनी देशाला सांगितले. या रूढींनी आपली वैज्ञानिक विचारसरणी कमकुवत झाली होती. या सामाजिक कुरितींनी आपल्या एकतेवर हल्ला केला होता. समाजातील एक वर्ग भारतीय परंपरा आणि अध्यात्मापासून सतत दूर जात होता. अशा वेळी स्वामी दयानंदजींनी 'वेदांकडे परत जा' असे आवाहन केले. त्यांनी वेदांवर लेख लिहिले आणि तार्किक स्पष्टीकरणे दिली. त्यांनी रूढी-परंपरांवर परखडपणे टीका केली आणि भारतीय तत्त्वज्ञानाचे खरे स्वरूप काय आहे हे स्पष्ट केले. परिणामी समाजात आत्मविश्वास परत येऊ लागला. लोक वैदिक धर्म जाणून घेऊ लागले आणि त्याच्या मुळाशी जोडू लागले.
मित्रांनो,
इंग्रज सरकारने आमच्या सामाजिक कुप्रथांचा प्याद्यासारखा वापर करून आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काही लोकांनी सामाजिक बदलांचा संदर्भ देत ब्रिटिश राजवटीचे समर्थन केले होते. अशा काळात स्वामी दयानंदजींच्या आगमनाने त्या सर्व कटकारस्थानांना मोठा धक्का बसला. लाला लजपत राय, राम प्रसाद बिस्मिल, स्वामी श्रद्धानंद या क्रांतिकारकांची संपूर्ण मालिका आर्य समाजाच्या प्रभावाने उदयास आली. त्यामुळे दयानंदजी हे केवळ वैदिक ऋषी नव्हते तर ते राष्ट्रप्रेरणेचे ही ऋषी होते.
मित्रांनो,
अमृतकाळाच्या प्रारंभिक वर्षात स्वामी दयानंदजींच्या 200 व्या जयंतीचे महत्वपूर्ण पर्व आपण साजरे करत आहोत. स्वामी दयानंदजी हे एक भारताच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणारे संत होते. स्वामीजींचा भारताविषयी जो विश्वास होता, तो विश्वास आपल्याला अमृतकाळातील आपल्या आत्मविश्वासात बदलावा लागेल. स्वामी दयानंद हे आधुनिकतेचे पुरस्कर्ते आणि मार्गदर्शक होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्हा आम्हा सर्वांनाच या अमृत काळात भारताला आधुनिकतेकडे वळवायचे आहे, आपला देश विकसित भारत बनवायचा आहे. आज देशात आणि जगात आर्य समाजाच्या अडीच हजारांहून अधिक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. तुम्ही सर्व 400 पेक्षा जास्त गुरुकुलांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण-प्रशिक्षण देत आहात. एकविसाव्या शतकाच्या या दशकात आर्य समाजाने राष्ट्रनिर्मिती मोहिमेची जबाबदारी नव्या ऊर्जेने उचलावी असे मला वाटते. डी.ए.व्ही. संस्था म्हणजे महर्षी दयानंद सरस्वती जी यांची एक जिवंत स्मृती, एक प्रेरणा, चैतन्याची भूमी आहे. जर आपण त्यांना सातत्याने सक्षम केले तर महर्षी दयानंदजींना हे आपले विनम्र अभिवादन ठरेल.
भारतीय दृष्टिकोनाशी संबंधित शिक्षण व्यवस्था ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. आर्य समाजाच्या शाळा ही त्यांची प्रमुख केंद्रे आहेत. देश आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे त्याचा विस्तार करत आहे. या प्रयत्नांनी समाजाला जोडणे ही आपली जबाबदारी आहे. आज वोकल फॉर लोकल चा विषय असो, आत्मनिर्भर भारत अभियान असो, पर्यावरणासाठी देशाचे प्रयत्न असोत, जलसंधारण, स्वच्छ भारत अभियान सारखी विविध अभियाने असोत, आजच्या आधुनिक जीवनशैलीत निसर्गाला सुसंगत मिशन लाईफ असो, आपली भरडधान्ये-श्रीअन्न चा अवलंब करणे असो, योग, तंदुरुस्ती असो, खेळातील वाढता सहभाग, आर्य समाजाच्या शैक्षणिक संस्था आणि त्यात शिकणारे विद्यार्थी असोत, सर्व मिळून ही एक मोठी शक्ती आहे. हे सर्व एक मोठी भूमिका बजावू शकतात.
तुमच्या संस्थांमधील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या संख्येने वयाची 18 वर्षे ओलांडलेले तरुण आहेत. त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट आहेत की नाही आणि त्यांना मतदानाचे महत्त्व समजले आहे का याची खात्री करणे ही तुमच्या सर्व वरिष्ठांची जबाबदारी आहे. आर्य समाजाच्या स्थापनेचे 150 वे वर्षही या वर्षीपासून सुरू होत आहे. मला असे वाटते की आपण सर्वांनी आपल्या प्रयत्नांनी आणि आपल्या यशाने इतका मोठा प्रसंग खरोखरच संस्मरणीय बनवावा.
मित्रांनो,
नैसर्गिक शेती हा देखील एक असा विषय आहे जो सर्व विद्यार्थ्यांनी जाणून घेणे, समजून घेणे खूप महत्वाचे आहे. आमचे आचार्य देवव्रत या दिशेने खूप मेहनत घेत आहेत. महर्षी दयानंदजींच्या जन्मस्थानावरून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा संदेश मिळावा यापेक्षा अधिक चांगले काय असू शकते?
मित्रांनो,
महर्षी दयानंद यांनी त्यांच्या काळात महिलांचे हक्क आणि त्यांच्या सहभागाविषयी सांगितले होते. नवीन धोरणे आणि प्रामाणिक प्रयत्नांद्वारे देश आज आपल्या मुलींना पुढे नेत आहे. काही महिन्यांपूर्वीच देशाने नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर करून लोकसभा आणि विधानसभेत महिला आरक्षण सुनिश्चित केली आहे. या प्रयत्नांनी देशातील लोकांना जोडणे हीच आज महर्षींना खरी श्रद्धांजली ठरेल.
आणि मित्रांनो,
या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकारच्या नव्याने स्थापन झालेल्या युवा संघटनेचीही ताकद तुमच्याकडे आहे. देशातील या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक युवा संघटनेचे नाव - मेरा युवा भारत - मायभारत असे आहे. मी दयानंद सरस्वतीजींच्या सर्व अनुयायांना विनंती करतो की डीएव्ही शैक्षणिक नेटवर्कच्या सर्व विद्यार्थ्यांना माय भारतमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करावे. महर्षी दयानंद यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. मी पुन्हा एकदा महर्षी दयानंद जी आणि तुम्हा सर्व संतांना विनम्र अभिवादन करतो.
खूप खूप धन्यवाद !