मित्रांनो,
या नव्या संसद भवनात जे पहिले अधिवेशन झाले होते, त्याच्या शेवटच्या दिवसात या संसदेने एक मोठा गौरवशाली निर्णय घेतला होता, आणि तो निर्णय होता - नारी शक्ती वंदन कायदा. आणि त्यानंतर 26 जानेवारीला देखील आपण पाहिले, कशाप्रकारे देशाने कर्तव्यपथावर नारी शक्ती सामर्थ्याचा, नारी शक्तीच्या शौर्याचा, नारी शक्तीच्या संकल्पाच्या शक्तीचा अनुभव घेतला. आणि आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे तेव्हा राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांचे मार्गदर्शन आणि उद्या निर्मला सीतारामन जी यांच्याद्वारे हंगामी अर्थसंकल्प सादर केला जाणे, हा एक प्रकारे नारीशक्तीच्या साक्षात्काराचाच पर्व आहे.
मित्रांनो,
गेल्या दहा वर्षात ज्यांना जो मार्ग सुचला त्या प्रकारे संसदेत सर्वांनी आपापले कार्य केले आहे अशी मी आशा करतो. मात्र, मी हे जरूर सांगू इच्छितो की ज्यांचा आपल्या सवयीनुसार बेशिस्त वर्तन करण्याचा स्वभाव बनला आहे, जे आपल्या सवयीप्रमाणे लोकतांत्रिक मूल्यांचे चिरहरण करत आहेत, अशा सर्व माननीय संसद सदस्यांना आज जेव्हा शेवटच्या सत्रात आपण भेटत आहोत, तेव्हा ते सर्व जण जरूर आत्मपरीक्षण करतील की गेल्या दहा वर्षात त्यांनी जे काही केले, त्यांनी त्यांच्या मतदार संघात देखील 100 लोकांना विचारावे, कोणाला काहीही लक्षात नसेल, कोणाला नाव देखील माहिती नसेल, ज्यांनी इतका गदारोळ आणि गोंधळ माजवला होता. मात्र विरोधाचा स्वर कितीही तीव्रता असो, टीका अधिकाधिक कडवी का असेना, पण ज्याने सदनात उत्तमोत्तम विचार मांडून सदनाला लाभान्वीत केले असेल, त्यांची आठवण एक मोठा वर्ग आजही करत असेल.
आगामी काळात देखील जेव्हा सदनात होणाऱ्या चर्चा कोणी पाहील तेव्हा त्यांचा एकेक शब्द ऐतिहासिक घटना बनून समोर येईल. आणि म्हणूनच ज्यांनी भलेही विरोधाचा सामना केला असेल, मात्र बुद्धीच्या प्रतिभेचे दर्शन घडवले असेल, देशातील सामान्य माणसाच्या हिताबाबत काळजी व्यक्त केली असेल, आमच्या विरोधात अत्यंत कडवी प्रतिक्रिया दिली असेल, तरीही मी असे मानतो की देशातील खूप मोठा वर्ग, लोकशाही प्रेमी, सर्व लोक या वर्तनाची प्रशंसा करत असतील. मात्र ज्यांनी फक्त आणि फक्त नकारात्मकता, गदारोळ, खोडसाळपणाचे वर्तन हे सर्व जर केले असेल, त्यांची आठवण क्वचितच कोणीतरी काढेल. मात्र, आता ही अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाची संधी आहे, ती पश्चाताप व्यक्त करण्याची देखील संधी आहे, काही सकारात्मक पाऊलखुणा सोडण्याची देखील संधी आहे, तेव्हा मी अशा सर्व माननीय संसद सदस्यांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी ही संधी सोडू नये, उत्तमोत्तम कामगिरी करा, देशहितासाठी सदनाला आपल्या अति उत्तम विचारांचा लाभ करून द्या तसेच देशाला देखील उत्साह आणि उल्हासाने भारून टाका. जेव्हा निवडणूकांचा काळ जवळ आलेला असतो तेव्हा सर्वसाधारणपणे पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जात नाही, हे तुम्ही जाणता, याचा मला विश्वास आहे. आम्ही देखील याच परंपरेचे पालन करत नवे सरकार स्थापित झाल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्प आपल्यासमोर सादर करू. यावेळी एक दिशानिर्देशक बाब समोर ठेवून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी आपल्या सर्वांसमोर उद्या आपला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
मित्रांनो,
देश नित्य प्रगतीची नवीन नवीन शिखरे पादाक्रांत करत पुढे वाटचाल करत आहे, सर्व स्पर्शी विकास होत आहे, सर्वांगीण विकास होत आहे, सर्वसमावेशक विकास होत आहे, विकासाचा हा प्रवास जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने निरंतर सुरू राहील याचा मला विश्वास आहे. याच विश्वासासह तुम्हा सर्वांना माझा राम राम.