सर्वांना हरि ओम, जय उमिया माँ, जय लक्ष्मीनारायण !
हे आपले कच्छी पटेल बांधव केवळ कच्छचा नव्हे तर संपूर्ण भारताचा गौरव आहेत. कारण मी जेंव्हा भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जातो तिथे मला या समाजाचे लोक हमखास पाहायला मिळतात. म्हणूनच तर म्हटले जाते
'कच्छड़ो खेले खलक में जो महासागर में मच्छ,
जे ते हद्दो कच्छी वसे उत्ते रियाडी कच्छ'.
कार्यक्रमाला उपस्थित असलेले शारदापीठाचे जगद्गुरु पूज्य शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती जी, गुजरातचे मुख्यमंत्री श्रीमान भूपेन्द्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी पुरुषोत्तम भाई रुपाला, अखिल भारतीय कच्छ कड़वा पाटीदार समाजाचे अध्यक्ष श्री अबजी भाई विश्राम भाई कानाणी, इतर सर्व पदाधिकारी आणि देश विदेशातून आलेल्या माझ्या सर्व बंधू – भगिनींनो !
आपणा सर्वांना सनातनी शताब्दी महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आज माझ्यासाठी हा सुवर्ण योग आहे. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती जी यांनी शंकराचार्य पद धारण केल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची मला प्रथमच संधी मिळाली आहे. त्यांनी कायमच माझ्याप्रती आणि सर्वांप्रतीच स्नेहभाव ठेवला आहे. आणि आज मला त्यांना वंदन करण्याची संधी मिळाली आहे.
मित्रांनो,
समाजाच्या सेवेचा शंभर वर्षांचा पुण्य काळ, युवा शाखेचे पन्नासावे वर्ष आणि महिला शाखेचे पंचवीसावे वर्ष, आपण हा जो त्रिवेणी संगम साधला आहे तो खरोखरच एक सुखद योगायोग आहे. जेंव्हा एखाद्या समाजाचे युवक, त्या समाजाच्या माता भगिनी आपल्या समाजाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात, तेंव्हा तो समाज यशस्वी आणि समृद्ध होणार हे निश्चित ! श्री अखिल भारतीय कच्छ कड़वा पाटीदार समाजाच्या युवा आणि महिला शाखेची ही निष्ठा या महोत्सवाच्या रुपात चोहीकडे दिसून येत आहे, याचा मला आनंद वाटतो. आपण आपल्या परिवाराच्या सदस्याच्या रुपात मला सनातनी शताब्दी महोत्सवात सहभागी करून घेतले याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. सनातन हा केवळ एक शब्द नाही तर हे नित्य नूतन आहे, परिवर्तनशील आहे, व्यतीत झालेल्या काळातून धडा घेऊन स्वतःला आणखी उत्कृष्ट बनवण्याचा प्रयत्न यात अध्याहृत आहे आणि म्हणूनच सनातन अजर - अमर आहे.
मित्रांनो,
कोणत्याही राष्ट्राची यात्रा त्याच्या समाजाच्या यात्रेचेच दर्शन घडवणारी असते. पाटीदार समाजाचा शेकडो वर्षांचा इतिहास, श्री अखिल भारतीय कच्छ कड़वा समाजाची शंभर वर्षांची वाटचाल आणि भविष्याची दृष्टी, हे एक प्रकारे भारत आणि गुजरात यांना जाणून घेण्याचे, पाहण्याचे प्रभावी माध्यम आहे. शेकडो वर्षे परदेशी आक्रमणकर्त्यांनी या समाजावर काय काय अत्याचार केले नाहीत! तरीही या समाजाच्या पूर्वजांनी आपली ओळख मिटू दिली नाही, आपल्या श्रद्धेला तडा जाऊ दिला नाही. शतकांपूर्वी केलेल्या त्यागाचा आणि बलिदानाचा प्रभाव आज य समाजाच्या वर्तमान यशस्वी पिढीच्या रुपात आपल्याला दिसून येतो आहे. कच्छ कड़वा पाटीदार समाजाच्या लोकांनी आज देशविदेशात आपल्या यशाचे निशाण फडकावले आहे. ते जिथेही जातात तिथे आपल्या श्रम आणि सामर्थ्याच्या जोरावर प्रगती साधत आहेत. लाकडाचा व्यवसाय असो, प्लायवूड असो, हार्डवेअर, मार्बल, बांधकाम साहित्य असो, प्रत्येक क्षेत्रात या समाजाने बस्तान बसवले आहे. या सर्वांसोबतच या समाजाने पिढ्यानपिढ्या, दरवर्षी आपल्या परंपराचा मान वाढवला आहे, सन्मान केला आहे. या समाजाने आपला वर्तमानकाळ स्वतः घडवला आहे आणि आपल्या भविष्याची पायाभरणीही केली आहे.
मित्रांनो,
राजकीय जीवनात मी आपल्या समवेत बराच मोठा कालखंड व्यतीत केला आहे, तुम्हा सर्वांकडून मी बरेच काही शिकलो आहे. गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना तुमच्या सोबतीने अनेक विषयांवर काम करण्याची संधी देखील मिळाली आहे. कच्छमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपाचा कठीण काळ असो किंवा त्यानंतर मदत आणि बचावकार्य तसेच पुनर्निर्माणाचे विविध प्रयत्न असो, समाजाच्या या ताकदीमुळेच मला सतत आत्मविश्वास मिळत राहिला. विशेष करून जेंव्हा मी कच्छच्या दिवसांचा विचार करतो तेंव्हा अनेक जुन्या गोष्टींची आठवण येते. एक काळ होता जेंव्हा कच्छ देशातील सर्वात मागास जिल्ह्यांपैकी एक होता. पाण्याचे दुर्भिक्ष, भूकबळी, जनावरांचे मृत्यू, स्थलांतर, दारिद्रय हीच कच्छची ओळख होती. कोण्या अधिकाऱ्याची बदली जर कच्छमध्ये झाली तर त्याला 'पनिशमेंट पोस्टिंग' मानले जायचे, काळ्या पाण्याची शिक्षा मानले जायचे. पण गेल्या काही वर्षांत आपण सर्वांनी एकमेकांच्या सोबतीने कच्छचा कायापालट केला आहे. कच्छचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांनी ज्याप्रकारे एकत्रितरित्या काम केले आहे, आपण सर्वांनी एकत्र येत ज्याप्रमाणे कच्छला जगातल्या मोठे पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून दिला आहे, हे सर्वांच्या प्रयत्नांचे एक उत्तम उदाहरण आहे. देशातील सर्वात जलद विकास साधणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कच्छचा समावेश आहे, हे पाहून मला अभिमान वाटतो. कच्छची संपर्क सुविधा सुधारत आहे, येथे मोठमोठे उद्योग सुरू होत आहेत. ज्या कच्छमध्ये कधीकाळी शेतीचा विचार करणे देखील कठीण होते, त्याच कच्छमधून आज कृषी उत्पादनांची निर्यात केली जात आहे. ही उत्पादने जगभरात पाठवली जात आहेत. यामध्ये तुम्हा सर्वांची महत्वपूर्ण भूमिका आहे.
बंधू आणि भगिनींनो,
नारायण रामजी लिंबानी यांच्याकडून मी नेहमीच प्रेरणा घेतली आहे. श्री अखिल भारतीय कच्छ कड़वा पाटीदार समाजाला प्रगतीपथावर नेणाऱ्या अनेक लोकांबरोबर माझे वैयक्तिक जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. यामुळेच मला वेळोवळी समाजाच्या विविध उपक्रम आणि अभियानाची माहिती मिळत असते. कोरोनाच्या संकटकाळात देखील तुम्ही सर्वांनी प्रशंसनीय कार्य केले आहे. सनातनी शताब्दी समारंभासोबतच आपण पुढील पंचवीस वर्षातील संकल्प आणि त्यासंदर्भातील दृष्टी देखील सर्वांसमोर मांडली आहे याचा मला आनंद वाटतो आहे. देश जेंव्हा आपल्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करत असेल तेंव्हाच तुमचे हे पंचवीस वर्षांचे संकल्प देखील पुर्णत्व प्राप्त करतील. अर्थव्यवस्थेपासून तंत्रज्ञानापर्यंत, सामाजिक समरसतेपासून पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक शेतीपर्यंत आपण जे संकल्प केले आहेत ते देशाच्या अमृत संकल्पांशी संबंधित आहेत. श्री अखिल भारतीय कच्छ कड़वा समाजाचे प्रयत्न या दिशेने देशाच्या संकल्पांना बळ देतील, त्यांना सिध्दीस नेतील. याच भावनेसह तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद!