माझ्या प्रिय देशवासियांनो,
तुम्हा सर्वांना आदिवसी गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज संपूर्ण देश भगवान बिरसा मुंडा यांची जयंती श्रद्धा आणि आदराने साजरी करत आहे. देशाचे महान सुपुत्र, महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांना मी वंदन करतो. आजचा 15 नोव्हेंबर हा दिवस भारताच्या आदिवासी परंपरेच्या गौरवगानाचा दिवस आहे. 15 नोव्हेंबर हा दिवस आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषित करण्याची संधी मिळाली, हे माझ्या सरकारचं सौभाग्य आहे, असं मी समजतो.
मित्रहो,
भगवान बिरसा मुंडा हे केवळ आपल्या राजकीय स्वातंत्र्याचे महानायक नव्हते. ते आपल्या अध्यात्मिक, सांस्कृतिक उर्जेचे संवाहक देखील होते. आज स्वातंत्र्याच्या ‘पंच प्रणांची’ ऊर्जा घेऊन, देश भगवान बिरसा मुंडा यांच्यासह कोट्यवधी आदिवासी वीरांची स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. आदिवासी गौरव दिनाच्या माध्यमातून देशाच्या आदिवासी वारशाचा अभिमान बाळगणे आणि आदिवासी समाजाच्या विकासाचा संकल्प करणे, हा याच ऊर्जेचा एक भाग आहे.
मित्रहो,
भारताच्या आदिवासी समाजाने इंग्रजांना, परदेशी राज्यकर्त्यांना आपलं सामर्थ्य काय आहे, हे दाखवून दिलं होतं. संथाल समुदायाने तिलका मांझी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या ‘दामिन संग्रामाचा’ आपल्याला अभिमान आहे. बुधू भगत यांच्या नेतृत्वाखालच्या ‘लरका आंदोलनाचा’ आपल्याला अभिमान आहे. आम्हाला अभिमान आहे, ‘सिधू कान्हू क्रांती’चा. आपल्याला अभिमान आहे, ‘ताना भगत आंदोलनाचा’. आपल्याला अभिमान आहे, बेगडा भील आंदोलनाचा. नायकडा आंदोलनाचा आपल्याला अभिमान आहे, संत जोरिया परमेश्वर आणि रूप सिंह नायक यांचा आपल्याला अभिमान आहे.
आपल्याला अभिमान आहे लीमडी, दादोह मध्ये इंग्रजांचा धुव्वा उडवणाऱ्या आदिवासी वीरांचा, आम्हाला अभिमान आहे मानगडचा मान वाढवणाऱ्या गोविंद गुरु यांचा. आम्हाला अभिमान आहे अल्लुरी सीता राम राजू यांच्या नेतृत्वाखालच्या रम्पा आंदोलनाचा. अशा कितीतरी आंदोलनांनी भारताची ही भूमी पावन झाली, अशा कितीतरी आदिवासी शूर-वीरांच्या बलिदानाने भारत मातेचं रक्षण केलं. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी रांची इथलं बिरसा मुंडा संग्रहालय राष्ट्राला समर्पित करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. भारत आज, देशाच्या विविध भागांमध्ये आदिवासी स्वातंत्र्य योद्ध्यांना समर्पित अशीच अनेक संग्रहालायं उभारत आहे.
मित्रहो,
गेल्या आठ वर्षांमध्ये आपले आदिवासी बंधु- भगिनी, देशाच्या प्रत्येक योजनेचा, प्रत्येक प्रयत्नांचा आरंभ बिंदू ठरले आहेत. जनधन पासून गोबरधन पर्यंत, वनधन विकास केंद्रापासून ते वनधन बचत गटापर्यंत, स्वच्छ भारत अभियानापासून जल जीवन अभियानापर्यंत, पंतप्रधान आवास योजनेपासून उज्ज्वला गॅस जोडणीपर्यंत, मातृत्व वंदना योजनेपासून ते पोषण राष्ट्रीय अभियानापर्यंत, ग्रामीण रस्ते योजनेपासून ते मोबाईल संपर्क सक्षमतेपर्यंत, एकलव्य शाळा ते आदिवासी विद्यापीठापर्यंत, बांबूशी निगडीत अनेक दशकांपासून चालत आलेले जुने कायदे बदलण्यापासून ते जवळपास 90 वन उत्पादनांवरच्या एमएसपी पर्यंत, सिकल सेल अॅनिमिया प्रतिबंधापासून ते आदिवासी संशोधन संस्थेपर्यंत, कोरोनाच्या मोफत लस-मात्रांपासून ते जीवघेण्या आजारांपासून बचावासाठीच्या मिशन इंद्रधनुष पर्यंत, केंद्रसरकारच्या योजनांमुळे देशातल्या कोट्यवधी आदिवासी कुटुंबांचं जीवन सुलभ झालं आहे, त्यांना देशात होत असलेल्या विकासाचा लाभ मिळत आहे.
मित्रहो,
आदिवासी समाजात शौर्यही आहे, निसर्गाबरोबर सहजीवन आणि समावेशही आहे. या भव्य वारशापासून शिकवण घेत, भारताला आपल्या भविष्याला आकार द्यायचा आहे. मला विश्वास आहे की, आदिवासी गौरव दिन आपल्यासाठी या दिशेने जाण्याची एक संधी बनेल, एक माध्यम बनेल. याच निर्धाराने, मी पुन्हा एकदा भगवान बिरसा मुंडा आणि कोटी-कोटी आदिवासी वीर-विरांगनांच्या चरणी नमन करतो.
खूप खूप आभार !