पंतप्रधान - दीपिका जी नमस्कार
दीपिका - नमस्कार सर
पंतप्रधान - दीपिका जी. मन की बात च्या मागच्या कार्यक्रमात मी तुमच्याबरोबरच तुमच्या इतर सहकाऱ्यांबाबत सुद्धा चर्चा केली होती. पॅरिस येथे सुवर्णपदक जिंकून तुम्ही नुकताच जो पराक्रम गाजवला आहे, त्यानंतर अवघ्या देशभरात तुमचीच चर्चा होते आहे. आता तुम्ही जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाल्या आहात. मला समजले की लहानपणी नेम धरून झाडावरचे आंबे तोडताना नेमबाजीचा सराव करणे तुम्हाला आवडत असे. आंब्यापासून सुरू झालेला तुमचा हा प्रवास नक्कीच विशेष आहे. तुमच्या या प्रवासाबद्दल देशाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तुम्ही ते सांगू शकलात तर आम्हाला आनंद वाटेल.
दीपिका - सर अगदी सुरुवातीपासून माझा हा प्रवास खूपच चांगला झाला आहे. मला आंबा खूप आवडतो, त्यामुळे त्याची गोष्ट प्रसिद्ध झाली. माझा प्रवास खरोखरच खूप चांगला झाला. सुरवातीच्या काळात काही अडचणींचा सामना करावा लागला, कारण फार चांगल्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. मात्र नेमबाजीला सुरुवात केल्यानंतर चांगल्या सुविधा मिळत गेल्या आणि मला खूप चांगले प्रशिक्षक सुद्धा लाभले.
पंतप्रधान - दीपिकाजी, जेव्हा तुम्ही यशाच्या उंच शिखरावर पोहोचता, तेव्हा लोक तुमच्याकडून जास्त अपेक्षा करू लागतात. आता तुमच्यासमोर ऑलिम्पिक सारखी मोठी क्रीडास्पर्धा आहे. अशावेळी अपेक्षा आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करणे या दोन्ही बाबींमध्ये तुम्ही समतोल कशाप्रकारे राखता?
दीपिका - सर, अपेक्षा नेहमीच असतात पण सगळ्यात जास्त अपेक्षा स्वतःकडून असतात. सध्या सरावावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणे आणि उत्तम कामगिरी करणे, यावर मी भर देते आहे.
पंतप्रधान - छानच. तुमचे मनापासून अभिनंदन. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तुम्ही माघार घेतली नाही. आव्हानांनाच आपले सामर्थ्य मानले आणि मी पाहू शकतो, मला स्क्रीन वर आपले कुटुंबीय सुद्धा दिसत आहेत. त्या सर्वांना माझा नमस्कार. आपण ऑलिंपिकमध्ये सुद्धा अशाच प्रकारे देशाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी कराल, असा विश्वास अवघ्या देशाला वाटतो. आपणाला माझ्या अनेक शुभेच्छा.
दीपिका - धन्यवाद सर.
पंतप्रधान - या, आता आपण प्रवीण कुमार जाधव यांच्याशी गप्पा मारू या. प्रवीण जी नमस्कार.
प्रवीण - नमस्कार सर.
पंतप्रधान - प्रवीणजी, मला सांगण्यात आले आहे की सुरुवातीच्या काळात ॲथलिट होण्याच्या दृष्टीने तुम्हाला प्रशिक्षण देण्यात आले होते.
प्रवीण - हो सर.
पंतप्रधान - आणि आज तुम्ही ऑलिंपिक मध्ये तिरंदाजी या क्रीडा प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जात आहात. हा बदल कसा घडला?
प्रवीण - सर सुरुवातीच्या काळात मी ॲथलेटिक्सचे प्रशिक्षण घेत होतो, त्यामुळे सरकारी अकादमीमध्ये ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारासाठी माझी निवड झाली. त्यावेळी माझी शरीरयष्टी फारशी भक्कम नव्हती, ते पाहून माझ्या प्रशिक्षकांनी सांगितले की तुम्ही इतर क्रीडा प्रकारांमध्ये चांगली कामगिरी करू शकता. त्यानंतर मला तिरंदाजी या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात आले आणि मी अमरावतीमध्ये तिरंदाजी हा क्रीडाप्रकार शिकू लागलो.
पंतप्रधान - बरं आणि क्रीडा प्रकारात बदल झाल्यानंतर सुद्धा तुमच्या खेळामध्ये आत्मविश्वास आणि अचूकता दिसून येते. ते तुम्ही कसे साध्य केले?
प्रवीण - सर, माझ्या घरातील परिस्थिती फारशी चांगली नव्हती, म्हणजे घरातली आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही.
पंतप्रधान - मला समोर तुमचे आई-वडील दिसत आहेत. त्यांनासुद्धा माझा नमस्कार. हा, प्रवीण भाई, पुढे सांगा.
प्रवीण - मला कल्पना होती की घरी गेल्यानंतर सुद्धा मला मोलमजुरी करावी लागणार आहे. त्यापेक्षा इथे मेहनत केली तर भविष्यात काही चांगले करता येईल. त्यामुळे मी इथेच प्रशिक्षण घेत राहिलो.
पंतप्रधान - तुमच्या बालपणीच्या काळातील कठीण संघर्षाबाबत मला कल्पना आहे आणि तुमच्या आईवडिलांनी सुद्धा ज्या पद्धतीने मोलमजूरी करून आज देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सक्षम असा सुपुत्र घडवला आहे, हा प्रवास अतिशय प्रेरक आहे आणि अशा कठीण काळात सुद्धा तुम्ही सांगितले की तुम्ही आपले ध्येय सतत नजरेसमोर ठेवले. तुमच्या आयुष्यातल्या प्रारंभाच्या काळातील अनुभवांनी अजिंक्यपदापर्यंत नेण्यासाठी तुमची कशाप्रकारे मदत केली ते सांगाल का...
प्रवीण - सर, जेव्हा माझ्यासमोर एखादे आव्हान येत असे, जेव्हा एखादी गोष्ट मला कठीण वाटत असे, तेव्हा मी विचार केला की आतापर्यंत मी खूप कष्ट घेतले आहेत. इथवर पोहोचून जर माघार घेतली तर याआधीचे प्रयत्न सगळे वाया जातील. आपण अधिक प्रयत्न केले पाहिजेत आणि अडचणींवर मात करून यश मिळवले पाहिजे.
पंतप्रधान - प्रवीण जी, तुम्ही स्वतः अजिंक्य आहातच पण मला विचाराल तर तुमचे आईवडील सुद्धा अजिंक्यपदी विराजमान झाले आहेत. आता मला तुमच्या आई वडिलांसोबत सुद्धा गप्पा माराव्याशा वाटतात. नमस्कार.
पालक - नमस्कार
पंतप्रधान - तुम्ही मोलमजुरी करून तुमच्या मुलाला इथवर पोहोचवले आहे आणि आज तुमचा मुलगा ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी खेळणार आहे. मेहनत आणि इमानदारी यांचे खरे मोल तुम्ही दाखवून दिले आहे. आता तुम्ही काय सांगू इच्छिता?
पालक - ....
पंतप्रधान - काही करून दाखवायची मनापासून इच्छा असली तर कोणत्याही अडचणी आपल्याला थांबवू शकत नाहीत, हे तुमही सिद्ध केले आहे. अगदी तळागाळातल्या मुलांमधून सुद्धा योग्य खेळाडूंची निवड करता आली तर आपल्या देशातील प्रतिभावान मुले भविष्यात उत्तम कामगिरी करू शकतात, हे तुमच्या यशाने सिद्ध झाले आहे. प्रवीण जी, तुम्हाला पुन्हा एकदा माझ्या अनेक शुभेच्छा. पुन्हा एकदा तुमच्या आई वडिलांना सुद्धा माझा नमस्कार आणि जपान मध्ये उत्तम कामगिरी करा.
प्रवीण - धन्यवाद सर.
पंतप्रधान - चला, आता आपण नीरज चोपडा यांच्यासोबत गप्पा मारू या.
नीरज - नमस्कार सर
पंतप्रधान - नीरज जी, तुम्ही भारतीय सैन्यात आहात. सैन्यातले तुमचे अनुभव, तुमचे प्रशिक्षण याबाबत आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, ज्यामुळे तुम्ही या क्रीडा प्रकारात इतके यश मिळवू शकलात.
नीरज - सर, अगदी सुरुवातीपासून भारतीय सैन्याबद्दल माझ्या मनात आकर्षण होते. पाच-सहा वर्षे खेळल्यानंतर भारतीय सैन्याने मला रुजू होण्यास सांगितले, तेव्हा मला मनापासून आनंद झाला. त्यानंतर मी भारतीय सैन्यात रुजू झालो आणि तेव्हापासून आपल्या खेळावर पूर्णपणे लक्ष देत आहे. भारतीय सैन्याने मला हव्या असलेल्या सर्व सुविधा दिल्या आहेत, भारत सरकार सुद्धा मला शक्य त्या सर्व सुविधा प्रदान करत आहे आणि मी मनापासून मेहनत करतो आहे.
पंतप्रधान - नीरजजी, मी आपल्याबरोबर आपले संपूर्ण कुटुंबही पाहतो आहे. आपल्या कुटुंबियांना सुद्धा माझा नमस्कार.
पंतप्रधान - नीरजजी, मला सांगण्यात आले आहे की तुम्हाला दुखापत झाली होती. मात्र तरीसुद्धा या वर्षी तुम्ही राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे. दुखापत झाली असताना सुद्धा तुम्ही तुमचे मनोबन उंचावलेले राखत सराव करत राहिलात. हे कसे करू शकलात?
नीरज - बरोबर आहे सर. पण दुखापत हा खेळाचा एक भाग असतो. 2019 साली सुद्धा मी खूप मेहनत केली होती, त्या वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होती...
पंतप्रधान - अच्छा. खेळातल्या दुखापतीतसुद्धा तुम्हाला खिलाडूवृत्ती दिसते का..
नीरज - हो सर, कारण आमचा प्रवास असाच चालतो. आमची कारकीर्द काही वर्षांचीच असते आणि त्या काळात आम्हाला स्वतःला प्रेरित करत राहावे लागते. दुखापतीमुळे माझे एक वर्ष वाया गेले होते. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी मी कसून तयारी केली होती. मात्र दुखापत झाल्यामुळे पुढच्या गोष्टी कठीण होऊन बसल्या. मग त्यानंतर मी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेवर माझे लक्ष केंद्रित केले आणि आणि पुन्हा एकदा खेळात परतलो. पहिल्या स्पर्धेत मी चांगला खेळ केला आणि ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलो. त्यानंतर कोरोनामुळे ऑलिंपिक सुद्धा पुढे ढकलण्यात आले. मी मात्र माझी तयारी सुरूच ठेवली. नंतर पुन्हा एकदा मी स्पर्धेत सहभागी झालो, उत्तम कामगिरी करत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आणि आताही मी कसून मेहनत करतो आहे. ऑलिंपिक स्पर्धेत शक्य तितका चांगला खेळ करण्याचा माझा प्रयत्न राहील.
पंतप्रधान - नीरज जी, तुमच्या सोबत गप्पा मारून खूप बरे वाटले. मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. तुम्ही अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या परिने 100% चांगला खेळ करा, कोणत्याही दबावाशिवाय पुरेपूर प्रयत्न करा. माझ्या तुम्हाला अनेक शुभेच्छा आणि तुमच्या आई-वडिलांना सुद्धा माझा नमस्कार.
पंतप्रधान - आता आपण दुती चंदजी यांच्याशी गप्पा मारू या.
पंतप्रधान - दुतीजी, नमस्कार.
दुती चंद - आदरणीय पंतप्रधान जी, नमस्कार.
पंतप्रधान - दुतीजी, तुमच्या नावाचा अर्थ आहे चमक. दुती म्हणजे आभा. तुमच्या खेळातून तुमच्या कर्तृत्वाची आभा दिसून येते आहे. तुम्ही आता ऑलिम्पिकमध्ये सुद्धा तुमच्या खेळाची चमक दाखवण्यासाठी सज्ज आहात. इतक्या मोठ्या क्रीडास्पर्धेकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता?
दुती चंद - सर, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी ओदीशा मधल्या एका विणकर कुटुंबातली मुलगी आहे. माझ्या कुटुंबात तीन बहिणी, एक भाऊ, आई बाबा असे आम्ही सगळे आहोत. जेव्हा आमच्या घरात मुलीचा जन्म होत असे, तेव्हा गावातले सगळे लोक माझ्या आईला सतत नावे ठेवत, की तू मुलींनाच जन्म का देते आहेस... आमचे कुटुंब खूपच गरीब होते. खाण्या-पिण्याचीही आबाळ होती आणि वडिलांची कमाई सुद्धा तुटपुंजी होती.
पंतप्रधान - तुमचे आई-वडील माझ्यासमोर आहेत.
दुती चंद - हो. तेव्हा माझ्या मनात सतत विचार येत कि मी चांगला खेळ केला, तर देशाचे नाव उंचावू शकेन. मला सरकारी नोकरीही मिळू शकेल आणि त्या नोकरीतून मला जो पगार मिळेल, त्यातून मी माझ्या कुटुंबाची दुरवस्था दूर करू शकेन. आज या प्रशिक्षणानंतर मला माझ्या कुटुंबासाठी बरेच काही करता आले आहे. मी तुमचे मनापासून आभार मानू इच्छिते, तुम्ही नेहमीच मला आधार दिला. माझ्या आयुष्यात सतत घडामोडी होत राहतात. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून आणखी एक सांगू इच्छिते की मी अनेक आव्हानांचा सामना करून, अनेक अडचणींवर मात करून आज येथवर आले आहे. माझ्या मनात हीच भावना आहे की जे माझ्यासोबत ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत, आता मी दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणार आहे. मला सांगावेसे वाटते कि मी ठामपणे, पूर्ण आत्मविश्वासासह या स्पर्धेत सहभागी होणार आहे, घाबरणार नाही. भारतातील कोणतीही स्त्री दुर्बल नाही आणि महिला आगेकूच करून देशाचे नाव उज्वल करत राहतील. याच धैर्यासह मी ऑलिंपिक मध्ये खेळेन आणि देशासाठी पदक जिंकण्याचा प्रयत्न करेन.
पंतप्रधान - दुतीजी, कित्येक वर्षे आपण केलेल्या मेहनतीचा निर्णय अवघ्या काही सेकंदात घेतला जातो. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच विजय आणि पराजय यांच्यातली सीमा स्पष्ट होते. हे आव्हान किती कठीण वाटते?
दुती चंद - मुळात 100 मीटर स्पर्धा 10-11 सेकंदात संपून जातात. मात्र त्यासाठी तयारी करण्यासाठी कित्येक वर्षे खर्ची घालावी लागतात. खूप मेहनत करावी लागते. 100 मीटर अंतराची एक स्पर्धा पार पाडण्यासाठी आम्हाला अथक प्रयत्न करावे लागतात. जिम, स्विमिंग पूल मध्ये खूप व्यायाम करावा लागतो आणि आव्हानांसाठी सतत तयार राहावे लागते. धावताना कुठे पडलो तर अपात्र घोषित करून स्पर्धेबाहेर काढले जाण्याची भीती असते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे भान ठेवून आम्हाला धावावे लागते. मनात कुठेतरी चलबिचल असते, भीती असते, पण मी मेहनत करत राहते. ज्या प्रकारे मी वैयक्तिक आयुष्यात धैर्याने पुढे चालत आले आहे, त्याच हिमतीने 100 मीटरची ही स्पर्धा सुद्धा पार करण्याचा प्रयत्न करते चांगल्या वेळेची नोंद करते आणि देशासाठी पदक सुद्धा घेऊन येते.
पंतप्रधान - दुती जी, तुम्ही देशासाठी अनेक विक्रमांची नोंद केली आहे. यावर्षी ऑलिंपिकच्या मंचावर तुम्ही स्वतःचे स्थान निर्माण कराल, अशी आशा देशाला वाटते. तुम्ही निर्भीडपणे क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हा. अवघा भारत आपल्या ऑलिंपिक खेळाडूंच्या सोबत आहे. तुम्हाला माझ्या अनेक शुभेच्छा आणि तुमच्या आई-वडिलांना विशेष प्रणाम.
पंतप्रधान - आता आपण आशिष कुमारजी यांच्यासोबत गप्पा मारू या.
पंतप्रधान - आशिषजी, तुमचे वडील राष्ट्रीय पातळीवर कबड्डी खेळत होते आणि तुमच्या कुटुंबात अनेक खेळाडू आहेत. मग असे असताना तुम्ही मुष्टियुद्ध या क्रीडा प्रकाराची निवड का केली?
आशिष - सर, मुष्टियुद्धाबद्दल सांगायचे तर लहानपणापासून माझ्या घरात खेळाचे वातावरण होते. माझे वडील त्यांच्या काळातील उत्तम खेळाडू होते, त्यामुळे त्यांच्या मुलाने सुद्धा मुष्टियुद्ध खेळावे अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी मला कोणी कबड्डी खेळण्याचा आग्रह केला नाही. मात्र माझ्या कुटुंबात माझे भाऊ कुस्ती खेळत, मुष्टियुद्ध खेळत आणि त्यांचा खेळ खूप चांगला होता. माझी शरीरयष्टी बारीक होती आणि फार पीळदार नव्हती. त्यामुळे मला वाटले की मला कुस्ती खेळता येणार नाही पण मी मुष्टियुद्ध शिकले पाहिजे. अशाप्रकारे हळूहळू मी मुष्टियुद्धाकडे वळलो.
पंतप्रधान - आशिषजी, तुम्ही कोवीड सोबत सुद्धा दोन हात केले आहेत. एक खेळाडू म्हणून तुमच्यासाठी हे किती कठीण होते? आपल्या खेळावर, आपल्या तंदुरुस्तीवर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी तुम्ही काय केले? आणि मला कल्पना आहे की या कसोटीच्या क्षणी तुम्ही तुमच्या वडिलांनाही गमावले आहे. अशा वेळीसुद्धा तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहात. तुमची ही मनस्थिती मी जाणून घेऊ इच्छितो.
आशिष - हो सर. स्पर्धेच्या 25 दिवसांपूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला होता, मनाने मी खचून गेलो होतो. त्या काळात मला खूप त्रास झाला. माझ्या कुटुंबाच्या आधाराची मला सगळ्यात जास्त गरज होती आणि संपूर्ण कुटुंबाने मला भक्कम आधार दिला. माझे भाऊ, माझी बहिण, माझ्या कुटुंबातल्या सर्वांनी मला खूप आधार दिला. माझ्या मित्रांनी सुद्धा मला पुन्हा-पुन्हा प्रेरित केले, माझ्या वडिलांचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे, याची जाणीव त्यांनी मला करून दिली. ज्या स्वप्नाच्या सुरुवातीच्या काळात, मुष्टीयुद्ध प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी माझ्यासाठी जे स्वप्न पाहिले होते, सर, आपल्या हातातील सगळे काम बाजूला ठेवून मला पुन्हा एकदा शिबिरात जाण्यासाठी त्यांनी प्रेरित केले होते. माझ्या सर्व कुटुंबीयांनी, आप्तांनी मला जाणीव करून दिली की वडिलांचे स्वप्न मी पूर्ण केले पाहिजे. त्यानंतर स्पेन मध्ये असताना मी कोवीडग्रस्त झालो. त्यावेळी कोवीडची काही लक्षणे दिसून आली. माझ्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आणि आमच्या चमूचे डॉक्टर करण आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या मी सतत संपर्कात होतो. माझ्यासाठी विशेष जागा उपलब्ध करून देण्यात आली, सरावासाठी, तंदुरुस्तीसाठी मला सुविधा प्रदान करण्यात आल्या. मात्र तरीसुद्धा कोवीडमधून बाहेर पडायला मला बराच वेळ लागला. त्यानंतर मी भारतात परतलो आणि पुन्हा एकदा शिबिरात पोहोचलो, तेव्हा माझे प्रशिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी माझी खूपच मदत केली. धर्मेंद्र सिंह यादव माझे प्रशिक्षक आहेत, त्यांनी माझी खूप मदत केली. आजारातून बाहेर पडण्यात आणि खेळात मला पुन्हा एकदा सूर गवसावा, यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले.
पंतप्रधान - आशिष जी, तुमच्या कुटुंबियांना सुद्धा मी नमस्कार करतो. आशिष जी, तुम्हाला आठवत असेल, सचिन तेंडुलकर एक खूप महत्त्वाची खेळी खेळत होते आणि त्याच वेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. मात्र त्यांनी त्यावेळी खेळाला प्राधान्य दिले आणि खेळाच्या माध्यमातून आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली. तुम्ही सुद्धा तोच धडा गिरवला आहे. आज तुम्ही तुमच्या वडिलांना गमावले आणि तरीसुद्धा देशासाठी, खेळासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहात. तुम्ही खरोखरच एक प्रेरक उदाहरण आहात, खेळाडू म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी विजेते ठरला आहात, त्याच बरोबर एक व्यक्ती म्हणून सुद्धा शारीरिक आणि भावनिक आव्हानांवरही मात केली आहे. संपूर्ण देश तुमच्याकडे अपेक्षेने पाहतो आहे. आम्हाला विश्वास वाटतो की ऑलिम्पिकच्या मंचावर तुम्ही उत्तम खेळ कराल. माझ्यातर्फे तुम्हाला अनेक शुभेच्छा आणि तुमच्या कुटुंबियांना सुद्धा माझा प्रणाम.
पंतप्रधान - या, आता आपण आपल्या सर्वांना सुपरिचित असणाऱ्या मेरी कोम यांच्या सोबत गप्पा मारू या.
पंतप्रधान - मेरी कोम जी, नमस्कार.
मेरी कोम - नमस्कार सर.
पंतप्रधान - तुम्ही अशा खेळाडू आहात ज्यांच्या पासून अवघ्या देशाला प्रेरणा मिळते. या ऑलिम्पिक चमूमध्ये अनेक खेळाडू असतील त्यांच्यासाठी तुम्ही आदर्शवत आहात. ते सुद्धा तुम्हाला फोन करत असतील, तेव्हा ते काय बरे विचारत असतील?
मेरी कोम - सर, माझ्या घरातील सर्व जण माझ्यासाठी प्रार्थना करतात. माझी मुले माझी आठवण काढतात आणि मी त्यांना समजावते की आईला देशासाठी आघाडीवर जावे लागेल आणि तुम्ही तुमचे बाबा सांगतील त्याप्रमाणे वागायचे आहे, घरात एकमेकांसोबत प्रेमाने राहायचे आहे, बाहेर पडायचे नाही. कोवीडमुळे त्यांनी बाहेर पडणे योग्य नाही. सर, माझ्या घरातली मंडळी सुद्धा घरात बसून कंटाळली आहेत. ऑनलाईन शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यांना फार मोकळेपणाने वागता येत नाही. मुलांना खेळायला मनापासून आवडते, मित्रमंडळींसोबत खेळायला त्यांना आवडते, मात्र कोवीडमुळे मुलांना मित्रमंडळींपासून दूर राहावे लागते. मी त्यांना सांगितले कि या वेळी आपल्याला कोवीडशी दोन हात करायचे आहेत. शहाण्यासारखे वागायचे आहे आणि सुरक्षित राहायचे आहे. मी सुद्धा देशासाठी आघाडीवर जाते आहे, पण तुम्ही सुरक्षित राहावे अशी माझी इच्छा आहे. मीसुद्धा सुरक्षित आहे आणि देशासाठी चांगली कामगिरी करण्याचे प्रयत्न करत आहे, अशाच गप्पा होत राहतात सर.
पंतप्रधान - मुलेसुद्धा ऐकत आहेत. मला समोर दिसत आहेत सगळे. मला एक सांगा, तुम्ही प्रत्येक पंच मध्ये निष्णात आहात, पण तुमचा सर्वात आवडता पंच कोणता आहे? जॉब, हुक, अपर कट की इतर काही.. आणि तो तुमचा आवडता का आहे ते सुद्धा सांगा.
मेरी कोम - सर माझा आवडता पंच म्हणजे हा साउथ पोल आहे, तो माझा सगळ्यात आवडता आहे. तो कोणालाही चुकवता येत नाही आणि अगदी योग्य प्रकारे हल्ला करतो.
पंतप्रधान - तुमचा आवडता खेळाडू कोणता आहे हे जाणून घ्यायला मला आवडेल.
मेरी कोम - सर, मुष्टियुद्धातले माझे आदर्श, माझी प्रेरणा आहेत, मोहम्मद अली.
पंतप्रधान - मेरी कोमजी, तुम्ही मुष्टीयुद्धातील जवळजवळ सर्वच आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. कधीतरी तुम्ही म्हणाला होता की ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणे हे तुमचे स्वप्न आहे. हे केवळ तुमचेच नाही तर अवघ्या देशाचे स्वप्न आहे. यावेळी तुम्ही तुमचे आणि देशाचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण कराल, अशी खात्री देशालाही वाटते. मेरीजी, तुम्हाला अनेक शुभेच्छा आणि तुमच्या सर्व कुटुंबियांना माझा नमस्कार.
मेरी कोम - आपले मनापासून आभार सर.
पंतप्रधान - या मंडळी. आता आपण पी. व्ही. सिंधू यांच्याबरोबर गप्पा मारू या.
पंतप्रधान - सिंधूजी, मला सांगण्यात आले की टोकीयो ऑलिंपिक पूर्वी तुम्हाला ऑलिंपिक स्पर्धेसाठीच्या आकाराच्या कोर्टवर सराव करायचा होता. आता गौचीबाऊली येथे तुमचा सराव कसा सुरु आहे?
सिंधू - गौचीबाऊली येथे माझा सराव खूप चांगला होतो आहे सर. मी ही निवड केली कारण ऑलिम्पिकचे कोर्ट फार मोठे आहे आणि इतर बाबीही खूप वेगळ्या आहेत, हे जाणवत राहते. त्यामुळे मला असे वाटले की जर चांगले स्टेडियम उपलब्ध असले, जर संधी मिळाली तर आपण तशा स्टेडियमवर खेळले पाहिजे. फेब्रुवारी पासून मी सराव करते आहे. अर्थात मी सरकारकडून परवानगी घेतली होतीच. सध्या सुरू असलेल्या साथरोगामुळे त्यांनाही सर्व नियमांचे पालन करून परवानगी देण्यास सांगण्यात आले होते. त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे, कारण मी परवानगी मागितली आणि त्यांनी मला लगेच परवानगी दिली. सर त्यामुळे मला असे वाटले कि आतापासून सुरुवात केली तर मोठ्या स्टेडियम मध्ये खेळणे टोकियोमध्ये गेल्यानंतर फार कठीण वाटणार नाही आणि मला अशा स्टेडियमवर खेळायचा लगेच सराव मिळू शकेल सर..
पंतप्रधान - तुमचे कुटुंबीय माझ्यासमोर आहेत, माझा त्यांना नमस्कार. मला आठवते की गोपीचंदजी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांनी रिओ ऑलिम्पिक पूर्वी तुमचा फोन काढून घेतला होता. तुम्हाला आईस्क्रीम खायची परवानगी सुद्धा नव्हती. अजूनसुद्धा तुम्हाला आईस्क्रीम खायची परवानगी नाही का? की आता त्यातून काही सवलत मिळू शकली आहे?
सिंधू - सर, थोडं नियंत्रण ठेवावंच लागतं कारण ॲथलिटने खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे खूपच महत्त्वाचे आहे आणि आता ऑलिम्पिकसाठी तयारी करते आहे, त्यामुळे खाण्यापिण्यावर निर्बंध येतातच. आईस्क्रीम फार खाऊ शकत नाही पण कधीकधी खाते.
पंतप्रधान - सिंधू जी, तुमचे आई-वडील दोघेही खेळाडू आहेत, त्यामुळे आज त्यांच्याशी सुद्धा गप्पा माराव्यात असे मला वाटते. तुम्हाला नमस्कार. मला एक सांगा की एखाद्या मुलाला खेळाकडे वळावेसे वाटले तर पालकांना ते सहज स्वीकारता येतं नाही. अनेक लोकांच्या मनात वेगवेगळ्या शंकाकुशंका असतात. अशा पालकांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
पालक - सर, पालकांनी एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे जर आपली मुले तंदुरुस्त असतील तर पुढे सगळे चांगले होते. कारण जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्ही निरोगी राहता, तंदुरुस्त राहता. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले असले तर जे कराल त्यात नीट लक्ष घालता येईल. प्रत्येक क्षेत्रात पुढे जाता येईल आणि हवे ते साध्य करता येईल.
पंतप्रधान - तुम्ही एका यशस्वी खेळाडूचे आई-वडील आहात. आपल्या मुलांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून घडविण्यासाठी पालक म्हणून काय केले पाहिजे?
पालक - सर पालकत्वाचा विचार केला तर पालकांना संपूर्ण समर्पण करावे लागते कारण त्यांना मुलांना प्रोत्साहन द्यायचे असते. सरकार प्रत्येक खेळाडूसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. त्यामुळे आम्हाला आमच्या मुलांना एवढेच सांगावे लागते की आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी मेहनत केली पाहिजे, चांगला खेळ केला पाहिजे. आपण सतत त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे आणि हे सर्व शिकवताना सर्वप्रथम त्यांना इतरांचा आदर करायला शिकवले पाहिजे. आदर करा आणि इतरांचे आशीर्वाद घ्या, हे शिकवले पाहिजे.
पंतप्रधान - सिंधूजी, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला अजिंक्यपदी पोहोचविण्याच्या प्रवासात खूप त्याग केला आहे. त्यांनी त्यांचे काम पूर्ण केले आहे, आता तुमची पाळी आहे. मनापासून मेहनत करा. यावेळी सुद्धा तुम्हाला यश मिळेल, असा विश्वास मला वाटतो आणि यश प्राप्त केल्यानंतर आपली भेट होतेच. तेव्हा आपणा सर्वांसोबत मी आईस्क्रीम खाणार आहे.
पंतप्रधान - या तर मंडळी, आता आपण एला सोबत गप्पा मारू या. एला, नमस्कार.
एलावेनिल - नमस्कार सर.
पंतप्रधान - (गुजराथी भाषेत संबोधून) एलावेनिल, मला असे सांगण्यात आले आहे की तुम्हाला मुळात ॲथलेटिक्स मध्ये जायचे होते. मग असे काय घडले की तुम्हाला शूटिंग हा क्रीडाप्रकार आवडू लागला?
एलावेनिल - सर, खरेतर मी वेगवेगळे खेळ खेळून पाहिले आहेत. शूटिंग पुर्वीपासून अगदी लहानपणापासूनच मला खेळायला अतिशय आवडते. ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, जुडो हे सगळे खेळ खेळून झाले पण जेव्हा मी शूटिंग शिकू लागले तेव्हा माझा उत्साह खूपच वाढू लागला. कारण या क्रीडा प्रकारात आपल्याला स्वतःला खूपच स्थिर ठेवावे लागते, खूप शांत असावे लागते. सर, अशाप्रकारे शांत राहणे माझ्या स्वभावात नव्हते. पण मला असे वाटले की हा क्रीडा प्रकार मला बरेच काही शिकवू शकेल, त्यामुळे मी त्याकडे आकर्षित झाले आणि कालांतराने हा खेळ मला मनापासून आवडू लागला.
पंतप्रधान - आताच मी दूरदर्शनवर एक कार्यक्रम पाहत होतो. त्यात मी तुमच्या आई वडिलांचे बोलणे ऐकले. संस्कारधाम मध्ये तुम्ही प्रशिक्षणाला सुरुवात केली, त्याचे वर्णन तुमचे आई-वडील करत होते आणि आणि मुख्य म्हणजे तिथे जाऊनच ते तुमच्या आठवणी जागवत होते. शाळेपासून ऑलिंपिकपर्यंत तुमचा हा प्रवास अनेक युवांना जाणून घ्यायचा आहे. मी मणीनगर मध्ये आमदार होतो आणि तुम्ही मणीनगर मध्येच राहता. जेव्हा मी खोखरा येथे माझ्या मतदार संघात सर्वात पहिली क्रीडा अकादमी सुरू केली होती, तेव्हा तुम्ही सगळे तिथे खेळायला येत असा. तेव्हा तुम्ही लहान होता आणि आज तुम्हाला पाहून मला अभिमान वाटतो. तुम्ही तुमच्या बद्दल काय सांगाल..
एलावेनिल - सर, शूटिंग या क्रीडा प्रकाराचा, माझा व्यावसायिक प्रवास संस्कारधामपासूनच सुरु झाला आहे. जेव्हा मी इयत्ता दहावी मध्ये होते, तेव्हाच आई बाबांनी सांगितले होते की जर तुला खेळांमध्ये आवड आहे तर तू त्यात काय करू शकतेस, ते आपण पाहूया. स्पोर्टस अथॉरिटी ऑफ गुजरात आणि गन फॉर ग्लोरी शूटिंग अकादमी यांच्यात एक सामंजस्य करार झाला होता, तेव्हा संस्कारधामने जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षण सुरू केले होते. त्यामुळे अभ्यास सुद्धा तिथेच घेतला जात असे. संपूर्ण दिवसभर तिथेच आम्हाला प्रशिक्षण दिले जात असे. सर, तो प्रवास फार छान होता कारण माझी सुरुवात तिथे झाली होती आणि आता माझ्या पहिल्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी मी रवाना होते आहे, यावेळी मनात अभिमानाची भावना आहे. इतक्या लोकांच्या मदतीमुळे, इतक्या लोकांच्या आधारामुळे, चांगल्या मार्गदर्शनामुळे मी इथवर पोहोचले आहे. खूप छान वाटते आहे.
पंतप्रधान - एलावेनिल, आता तुम्ही पदवी सुद्धा घेत आहात. शुटींग करियर आणि शैक्षणिक अभ्यासक्रम यांच्यात समतोल कसा साधता?
एलावेनिल - सर, याबद्दल मी गुजरात विद्यापीठाचे आणि आमच्या भवन राज महाविद्यालयाचे मनापासून आभार मानते. त्यांनी मला एकदाही असे सांगितले नाही की तुम्हाला महाविद्यालयात यावेच लागेल आणि अमुक एक करावेच लागेल. त्यांनी मला इतकी सवलत दिली की माझ्यासाठी परीक्षा घेण्याचीही विशेष सोय केली जात असे. माझ्यासाठी वेगळ्या चर्चासत्रांची सोय केली जात असे. त्या सर्वांनी खूप मदत केली आहे सर. माझ्या या प्रवासात त्यांची खूपच मदत झाली आहे आणि माझ्या शाळेने सुद्धा खूप सहाय्य केले आहे.
पंतप्रधान - एलावेनील, तुमची पिढी महत्त्वाकांक्षी आहे आणि परिपक्व सुद्धा आहे. इतक्या लहान वयात आम्ही जागतिक स्तरावर यश मिळवले आहे. जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या स्पर्धेत तुम्हाला उज्वल यश मिळेल, असा विश्वास देशाला वाटतो. तुम्हाला माझ्या अनेक शुभेच्छा आणि तुमच्या आई वडिलांना सुद्धा माझा नमस्कार.
वणक्कम.
पंतप्रधान - या मंडळी, आता आपण सौरभ चौधरी यांच्या सोबत गप्पा मारू. सौरभ जी नमस्कार.
पंतप्रधान - इतक्या लहान वयात तुम्ही ऑलिंपिकसाठी पात्र ठरला आहात. तुमच्या या प्रवासाची सुरुवात कधी आणि कशी झाली?
सौरभ - सर 2015 मध्ये मी शूटिंग या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. आमच्या गावाच्या जवळच एक शूटिंग अकादमी आहे, तिथे मी सुरुवात केली. माझ्या कुटुंबाने सुद्धा मला सतत प्रोत्साहन दिले. त्यांनी स्वतः सांगितले की जर तुला इतकी आवड असेल, तर तू नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत. मी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि प्रयत्न करत राहिलो. मला तो क्रीडाप्रकार आवडू लागला आणि हळूहळू मी त्यात प्रगतीही करू लागलो. मी शिकत गेलो आणि त्याचे चांगले निकाल दिसू लागले. चांगले दिसत निकाल दिसू लागल्यानंतर भारत सरकारने सुद्धा आम्हाला मदत केली, त्यामुळे आम्ही आज येथे पोहोचलो आहोत सर.
पंतप्रधान - बघा, तुमच्या कुटुंबीयांना सुद्धा तुमचा अभिमान वाटतो. ते सगळे तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहेत. सौरभ आता आणखी काय करून दाखवतो, ते पाहू, अशा अपेक्षांची मोठी मोठी स्वप्ने त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसत आहेत. सौरभ, शूटिंग या क्रीडा प्रकारात मेहनती बरोबरच मनाची एकाग्रता खूपच गरजेची असते. त्यासाठी तुम्ही योगाभ्यास करता का, की इतर काही करता? मला आणि देशातील युवांना हे जाणून घ्यायला आवडेल.
सौरभ - सर, मी ध्यानधारणा करतो, योगाभ्यास सुद्धा करतो. सर, शांत राहण्यासाठी काय केले पाहिजे, हे तर आम्ही तुमच्या कडून शिकले पाहिजे. तुम्ही एवढ्या मोठ्या भारताची जबाबदारी सांभाळत आहात, तर त्यासाठी तुम्ही काय करता?
पंतप्रधान - सौरभ, मला आणखी एक सांगा. तुमची मित्र-मंडळी तुमच्या जवळ येतात आणि त्यांना तुमच्या सोबत सेल्फी घ्यायचा असतो. तेव्हा तुम्हाला काय वाटते? यापूर्वी ते असे नक्कीच करत नसतील..
सौरभ - नाही. मी जेव्हा घरी जातो तेव्हा माझ्या गावात, शेजारपाजारचे माझे जे मित्र आहेत, ते घरी येतात. सेल्फी सुद्धा घेतात. माझ्या पिस्टल सोबत सुद्धा सेल्फी घेतात. मला खूप छान वाटते.
पंतप्रधान - सौरभ, तुमच्याशी बोलल्यानंतर एक गोष्ट जाणवते. ती म्हणजे तुम्ही तुमच्या या खेळाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. तुमच्यासारख्या युवकाच्या दृष्टीने ही फारच चांगली गोष्ट आहे. शूटिंग या क्रीडा प्रकारात सुद्धा अशाच प्रकारे लक्ष केंद्रित करण्याची आणि स्थैर्याची आवश्यकता आहे. अजून तुम्हाला फार लांबचा पल्ला गाठायचा आहे, देशासाठी नवनवे विक्रम करायचे आहेत. ऑलिंपिक मध्ये तुम्ही चांगली कामगिरी कराल आणि भविष्यातही खूप प्रगती कराल, असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना माझा नमस्कार.
पंतप्रधान - या मंडळी. आता आपण शरत कमलजी यांच्यासोबत गप्पा मारुया. शरतजी नमस्कार.
शरत - नमस्कार सर.
पंतप्रधान - शरतजी, तुम्ही आतापर्यंत तीन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहात. तुम्ही ख्यातनाम खेळाडू आहात. ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदाच देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा खेळाडूंना तुम्ही काय सांगाल.
शरत - यावर्षी जी ऑलिंपिक स्पर्धा होते आहे, ही एका वेगळ्याच परिस्थितीत होते आहे, कारण कोवीड काळात ही स्पर्धा होते आहे. यापूर्वीच्या ज्या तीन ऑलिंपिक स्पर्धा झाल्या, त्यावेळी असे वातावरण नव्हते. या ऑलिम्पिक स्पर्धेत आमचे लक्ष आमच्या खेळापेक्षा आमच्या सुरक्षेसाठी प्रोटोकॉल्सचे पालन करण्याकडे जास्त आहे. यावेळी आम्हाला खेळाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. मी इतकेच सांगेन की जे पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी जात आहेत, तिथे जाण्यापूर्वी, अर्थात आपला खेळ खूपच महत्त्वाचा आहे, पण त्याच वेळी जर आपण प्रोटोकॉल आणि इतर नियमांचे पालन योग्य प्रकारे केले नाही तर आपण स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. आपल्याला नियमांचे पालन करावेच लागेल आणि क्रीडा स्पर्धा सुरू झाल्यानंतर आपले संपूर्ण लक्ष केवळ आपल्या खेळाकडे असले पाहिजे. तिथे पोहोचेपर्यंत आपण खेळ आणि नियमांचे पालन करण्याकडे सारखेच लक्ष दिले पाहिजे. मात्र एकदा खेळाच्या मैदानात उतरल्यानंतर आपले संपूर्ण लक्ष केवळ आपल्या खेळाकडे असले पाहिजे.
पंतप्रधान - शरत जी, जेव्हा तुम्ही खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा आणि आता, टेबल टेनिसच्या संदर्भात काही बदल झाल्याचे तुम्हाला जाणवते का? क्रीडा प्रकारांबाबत शासकीय विभागांच्या दृष्टिकोनात, कामकाजात तुम्हाला काही बदल जाणवले का?
शरत - बरेच बदल घडून आले आहेत सर. 2006 साली मी पहिल्यांदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते आणि त्यानंतर 2018 साली आम्ही सर्वांनी मिळून सुवर्णपदकाची कमाई केली होती. 2006 आणि 2018 या दोन्ही क्रीडा स्पर्धांच्या वेळच्या वातावरणात खूपच फरक होता. मुख्य म्हणजे क्रीडा प्रकार हे एक व्यावसायिक क्षेत्र झाले नव्हते. 2006 साली जेव्हा मी जिंकलो होतो, तेव्हा क्रीडा प्रकारांकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जात नसे. तेव्हा शिक्षणाला जास्त महत्त्व दिले जात असे, क्रीडाप्रकार ही शिक्षणासोबत करता येणारी गोष्ट होती. पण आता असे नाही. आता क्रीडा प्रकारांना चांगलेच महत्त्व मिळते आहे. सरकार खेळांना महत्त्व देत आहे. खाजगी संस्था सुद्धा खेळांना चांगलेच महत्त्व देत आहे आणि त्याच वेळी क्रीडा प्रकारात व्यावसायिक दृष्ट्या खूप जास्त संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक बालकांना आणि अनेक पालकांना सुद्धा खेळाबद्दल विश्वास वाटू लागला आहे. विश्वासापेक्षा जास्त आत्मविश्वास म्हणता येईल. जर मूल एखादा खेळ खेळत असेल तर ते आपल्या आयुष्यात नक्कीच काही चांगले करू शकेल, हा विश्वास पालकांना वाटू लागला आहे. मला वाटते की विचारसरणीतला हा बदल खूपच चांगला आहे.
पंतप्रधान - शरत जी तुमच्याकडे केवळ टेबल टेनिसमधलाच नाही तर मोठ्या क्रीडा स्पर्धांचाही खूप जास्त अनुभव आहे. मला असे वाटते की हा अनुभव तुमच्यासाठी उपयुक्त ठरेलच, पण त्याचबरोबर टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या आपल्या देशाच्या संपूर्ण चमूलाही तुमचा अनुभव मार्गदर्शक ठरेल. या चमुतली एक जबाबदार, मोठी व्यक्ती म्हणून तुम्ही या चमूच्या सोबत आहात. स्वतःच्या खेळाबरोबरच संपूर्ण चमू सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही उत्तम प्रकारे पार पडाल, असा विश्वास मला वाटतो. तुम्हाला आणि तुमच्या चमूला माझ्या अनेक शुभेच्छा.
पंतप्रधान - आता पण मनिका बत्राजी यांच्या सोबत गप्पा मारू या. मनीकाजी नमस्ते.
मनिका - नमस्कार सर.
पंतप्रधान - मनिका मला सांगण्यात आले आहे की तुम्ही टेबल टेनिस खेळता, त्याचबरोबर गरीब मुलांना सुद्धा हा खेळ शिकवता, त्यांचीही मदत करता. तुम्ही स्वतः युवा आहात, तुमच्या मनात हा विचार कसा आला?
मनिका - सर, जेव्हा मी पहिल्यांदा येथे पुण्यात आले होते, तेव्हा मी पाहिले की ही दुर्लक्षित आणि अनाथ मुले खूप चांगले खेळत होती. येथील केंद्रात त्यांचे प्रशिक्षण मी पाहिले. माझ्यासाठी हे सगळे नवीन होते. मला असे वाटले की या मुलांना ज्या गोष्टी मिळू शकल्या नाहीत, या मुलांना यापूर्वी जे करून पाहता आले नाही, ते त्यांना करता यावे, यासाठी मी त्यांना मदत केली पाहिजे. ही मुले माझ्या निमित्ताने चांगले खेळाडू म्हणून घडावीत, असे मला वाटले. मला वाटते की ज्या प्रकारे ही मुले खेळतात, त्यांना पाहून मला प्रेरणा मिळते की एवढ्या लहान वयात कोणाचीही सोबत नसताना ही मुले इतकी छान खेळत आहेत. या सर्वांना बघून खूपच प्रेरणा मिळत राहते सर.
पंतप्रधान - मनिका, मी पाहिले आहे की तुम्ही सामना खेळायला उतरता तेव्हा अनेकदा तुमच्या हातावर तिरंगा रेखाटलेला असतो. त्यामागे तुमचा काय विचार असतो, तुमच्या प्रेरणेबद्दल आम्हाला सांगाल का?
मनिका - मी मुलगी आहे, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी मनापासून आवडतात. भारताचा राष्ट्रध्वज जवळ बाळगणे मला आवडते. खेळताना, विशेषतः जेव्हा मी सर्विस करते, तेव्हा माझा डावा हात मला दिसतो आणि तिथे तिरंगा असतो, तो मला सतत प्रेरणा देत राहतो. त्याचमुळे मी जेव्हा भारतातर्फे एखाद्या क्रीडा स्पर्धेत उतरते, देशासाठी खेळायला जाते तेव्हा माझ्या भारताचे प्रतीक असणारी, माझ्या हृदयाच्या जवळ असणारी एखादी वस्तू मी माझ्या अगदी जवळ बाळगते.
पंतप्रधान - मनिका, मला सांगण्यात आले आहे की तुम्हाला नृत्य करायलाही आवडते. नृत्य करण्याचा तुमचा छंद तुमचा ताण घालवण्यासाठी मदत करतो का?
मनिका - हो सर. प्रत्येकाला एखादा छंद असतोच. कोणाला संगीत आवडते, कोणाला नृत्य करायला आवडते. नृत्य करणे हा माझ्यासाठी तणावातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. मी जेव्हा एखाद्या स्पर्धेत खेळण्यासाठी जाते किंवा जेव्हा मला मोकळा वेळ मिळतो तेव्हा मी माझ्या रूम मध्ये येऊन नृत्याचा आनंद घेते. एखाद्या सामन्याला जाण्यापूर्वी सुद्धा मी नृत्य करते कारण त्यामुळे मला छान वाटते आणि माझा आत्मविश्वास सुद्धा वाढतो.
पंतप्रधान - मी तुम्हाला असे प्रश्न विचारतोय, तुमचे कुटुंबीय आणि तुमची मित्रमंडळी सगळेच हसत आहेत.
पंतप्रधान - मनिका, तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी बजावणाऱ्या खेळाडू आहात. तुम्ही लहान मुलांना सुद्धा आपल्या खेळात सामावून घेत आहात. तुमचे यश केवळ त्या लहान बालकांसाठीच नाही तर देशातील टेबल टेनिस खेळणाऱ्या सर्वच युवा खेळाडूंसाठी सुद्धा प्रेरक ठरणार आहे. तुम्हाला माझ्या अनेक शुभेच्छा. तुमचे सर्व सहकारी, जे आज उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत, तुमचे कुटुंबीय हे सगळे पाहत आहे. तुम्हाला माझ्या अनेकानेक शुभेच्छा. मनापासून धन्यवाद.
पंतप्रधान - चला मंडळी, आता आपण विनेश फोगट यांच्याशी गप्पा मारू या विनेशजी नमस्कार.
विनेश - नमस्कार सर.
पंतप्रधान - विनेश जी, तुम्ही फोगट कुटुंबातील आहात. तुमच्या संपूर्ण कुटुंबाने खेळाच्या माध्यमातून देशासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे थोडा जास्त दबाव, थोडी जास्त जबाबदारी वाढते का?
विनेश - सर, जबाबदारी तर वाटते कारण कुटुंबाने जी कामगिरी केली आहे ती कायम राखायची आहे आणि ऑलिम्पिकचे जे स्वप्न पाहिले होते, ते पदक मिळवूनच पूर्ण होऊ शकणार आहे. त्यामुळे अपेक्षा खूपच आहेत सर. संपूर्ण देशाच्या अपेक्षा आहेत, कुटुंबाच्या सुद्धा अपेक्षा आहेत आणि मला असे वाटते की अपेक्षा असल्याच पाहिजेत, कारण जेव्हा अपेक्षा पूर्ण होताना दिसू लागतात, तेव्हा आपण थोडे आणखी प्रयत्न करतो एका विशिष्ट पातळीला पोहोचल्यानंतर. त्यामुळे खूप चांगले वाटते सर. फार दबाव नाही, ताण नाही. चांगला खेळ करायचा आहे आणि देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करायची आहे.
पंतप्रधान - मागच्यावेळी रिओ ऑलिम्पिक मध्ये तुम्हाला दुखापत झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. गेल्या वर्षी तुम्ही आजारी होता. या सगळ्या आव्हानांचा यशस्वीपणे मुकाबला करून तुम्ही उत्तम कामगिरी केली आहे. इतक्या ताणातून बाहेर पडून यश मिळवणे ही खुप मोठी गोष्ट आहे. तुम्ही हे कसे करु शकलात?
विनेश - सर, खूप कठीण होऊन जाते. पण ॲथलिट असल्यामुळे आम्ही उत्तम कामगिरी बजावणे गरजेचे आहे. आम्हाला चांगली कामगिरी करायची, तर मनाने ठाम राहावेच लागते. एक ॲथलिट म्हणून मी विचार करते की आपल्याला आणखी चांगला खेळ करण्यासाठी मानसिक ठामपणातूनच बळ मिळते, त्यात कुटुंबाची भूमिका फार महत्त्वाची असते. कुटुंबाचे सहकार्य असले आणि त्याच बरोबर आमचा जो संघ असतो तिथून पाठिंबा मिळत असला तर सगळे तुमची साथ देत राहतात, त्यामुळे त्या सगळ्यांना निराश करायचे नाही, ही भावना मनात राहते. ज्या लोकांनी आपल्यासाठी इतके काही केले, त्यांच्या अपेक्षा लक्षात घेता आपण मध्येच थांबणे किंवा माघार घेणे योग्य नाही. कारण आपण चांगली कामगिरी बजावताना मध्ये कुठेही अडकू नये, यासाठी ते आपल्याला नेहमीच प्रोत्साहन देत राहतात. त्यावेळी अनेक गोष्टींची आठवण येत राहते. त्या सगळ्यांसाठी आम्ही प्रयत्न करत राहतो. मग दुखापत झाली असली किंवा इतर कोणतीही अडचण आली तरीही प्रयत्न करत राहतो.
पंतप्रधान - टोकियोमध्ये सुद्धा तुम्ही उत्तम कामगिरी कराल असा पूर्ण विश्वास मला वाटतो. तुमच्यावर सुद्धा एक चित्रपट येणार आहे हे खरे आहे का?
विनेश - सर तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आहेत आणि आमची इच्छा आहे की आम्ही जेवढे ॲथलिट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जातो आहोत, ते सगळे देशासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पदके येणार आहेत आणि संपूर्ण देशाच्या आमच्याकडून ज्या अपेक्षा आहे, त्याबाबतीत निराशा होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
पंतप्रधान - तुमचे आई वडील सुद्धा या सगळ्या प्रवासात सोबत आहेत. तुमचे आई-वडील सुद्धा एक प्रकारे गुरुच आहेत. मी तुमच्या वडिलांशी गप्पा मारू इच्छितो. विनेशजींचे आई वडील सुद्धा आपल्या सोबत आहेत. नमस्कार. मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारू इच्छितो. जेव्हा एखादी व्यक्ती निरोगी आणि तंदुरुस्त दिसते तेव्हा आपल्या देशात प्रश्न विचारतात की कौन सी चक्की का आटा खाते हो? मला तुम्हाला विचारायचे आहे की फोगट कुटुंबातल्या मुली कौन सी चक्की का आटा खातात ? मला एक सांगा, विनेशला कोणता मंत्र देऊन टोकियोमध्ये पाठवत आहात ?
विनेशचे वडील - कसं आहे सर, चक्की का आटा अपने गांव का है. घरातच गाई म्हशी सुद्धा आहेत, त्याच गाई-म्हशींचे दूध, दही, तूप, लोणी. विनेशला 2016 साली दुखापत झाली होती, तेव्हा तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल मी अवघ्या देशाचे आभार मानतो. आज ज्यांच्या माझ्या मुलीकडून अपेक्षा आहेत. मी माझ्या मुलीला एकच सांगितले आहे. जर ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून आलीस तर मी विमानतळावर तुला न्यायला येईन, नाही तर येणार नाही. आज सुद्धा मी प्रयत्न करतो आहे. गेल्यावेळी माझ्या मुलीला यश मिळवता आले नव्हते, मात्र यावेळी ऑलिंपिक स्पर्धेत मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो. तुम्ही हीच्या आधीच्या स्पर्धा पाहा. या वेळी मला माझ्या मुलीबद्दल पुरेपूर खात्री वाटते. या वेळी ती निश्चितच सुवर्णपदक घेऊन येणार आणि माझे स्वप्न पूर्ण करणार आहे.
पंतप्रधान - तुम्हां पालकांशी बोलल्यानंतर मला खरोखरच विश्वास वाटू लागला आहे की विनेश तुम्ही नक्कीच यश मिळवाल. तुम्ही लढा देता, पडता, दोन हात करता पण हार मानत नाहीत. तुम्ही तुमच्या कुटुंबाकडून जे काही शिकला आहात ते या ऑलिम्पिक स्पर्धेत नक्कीच कामी येईल. तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा.
पंतप्रधान - चला तर मंडळी. आता आपण साजन प्रकाश जी यांच्या सोबत गप्पा मारू या. साजन जी नमस्कार.
पंतप्रधान - साजन जी, मला सांगण्यात आले आहे की तुमच्या मातोश्रींनीसुद्धा अथलेटिक्समध्ये देशासाठी उत्तम कामगिरी केली आहे. तुम्ही तुमच्या मातोश्रींकडून काय काय शिकले आहात?
साजन - सर, माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे. सुरुवातीच्या काळात ती एक क्रीडापटू होती. आजवर मी जे काही यश मिळवले आहे ते साध्य करताना समोर येणाऱ्या सर्व त्रासांचा आणि अडचणींचा समर्थपणे सामना करायला तिनेच मला शिकवले आहे.
पंतप्रधान - मला सांगण्यात आले की तुम्हाला दुखापत सुद्धा झाली होती. तुम्ही त्यातून कशाप्रकारे बाहेर पडलात?
साजन - सर्वात आधी पूल मध्ये उतरणे थांबवल्यानंतरचे 18 महीने मला खूपच अडचणींचा सामना करावा लागला. दुखापत झाल्यानंतर मला बराच काळ पुल मध्ये उतरता आले नाही. तो काळ खूपच नैराश्याचा आणि तणावाचा होता. पण माझ्या आप्तांचा आणि प्रशिक्षकांचा मोठा आधार होता. गौरी काकू आणि केरळ पोलीस, स्विमिंग पिटीशन ऑफ इंडिया या सर्वांनी माझ्या अडचणीच्या काळात माझी मदत केली आणि त्या दुखण्यातून आणि त्रासातून बाहेर पडताना मी मनानेही अधिक कणखर झालो.
पंतप्रधान - साजन, ऑलिंपिक स्पर्धेला रवाना होण्यापूर्वीच भारतीय क्रीडा क्षेत्राच्या सोनेरी इतिहासात तुम्ही आपले स्थान निर्माण केले आहे. यापुढेही आणखी चांगली कामगिरी करून तुम्ही तुमची कारकीर्द अधिक यशस्वी कराल, असा विश्वास मला वाटतो.
पंतप्रधान - मनप्रीत, मला सांगण्यात आले आहे की कोरोनाच्या पहिल्याच लाटेत तुम्ही सर्व सहकारी बंगलोर येथे एकत्र राहिलात. सर्वांनी मिळून करू कोरोनाशी दोन हात केलेत. यामुळे संघभावना कशा प्रकारे वाढीला लागली?
मनप्रीत - सर, त्यावेळी सरकारकडून आम्हाला खूपच चांगले सहकार्य मिळाले, हे मला आवर्जून सांगावेसे वाटते. आम्ही सगळे इथे बंगलोरमध्ये होतो, त्यावेळी आमचा एकच प्रयत्न होता, तो म्हणजे आपल्या चमूला अधिक मजबूत करणे. आम्ही संघ घडविण्याच्या दृष्टीने काम केले. आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे मेहनत केली, आम्ही खेळाडूंनी एकमेकांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल जाणून घेतले. कुठल्या खेळाडूच्या कुटुंबाने कशाप्रकारे त्याग केला आणि आपल्या मुलांना इथवर पोहोचवले, याबाबत गप्पा मारल्या. एकमेकांच्या अनेक अनुभवांबद्दल जाणून घेतले, ज्यामुळे आमच्या चमूचे एकमेकांशी संबंध अधिक दृढ झाले आणि सर, आम्हाला विश्वास वाटत होता की आमच्या हातात एक वर्ष आहे, त्यामुळे आम्ही उत्तम कामगिरी करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी आम्ही इतर संघांचाही अभ्यास केला. त्यांचा खेळ कुठे चांगला आहे, कोणत्या त्रुटी आहेत, याचे निरीक्षण आम्ही केले. आम्ही कुठे हल्ला करू शकतो, याचे निरीक्षण केले. या सर्वाचा आम्हाला निश्चितच फायदा झाला.
पंतप्रधान - ऑलिंपिक हॉकी मध्ये आपल्या देशाची कामगिरी उत्तम राहिली आहे. अशावेळी सहाजिकच चांगली कामगिरी कायम राखण्याची जबाबदारी वाटत राहते. हे लक्षात घेता प्रत्यक्ष मैदानात खेळताना तुम्हा सर्वांवर अतिरिक्त ताण असतो का?
मनप्रित - नाही सर अजिबातच नाही. कारण हॉकी मध्ये आतापर्यंत आठ सुवर्णपदके जिंकली आहेत. सगळ्यात जास्त पदके जिंकली आहेत. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. आम्ही सुद्धा तोच खेळ खेळतो आहोत आणि जेव्हा आम्ही ऑलिम्पिकमध्ये जातो, तेव्हा उत्कृष्ट कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असतो. भारतासाठी पदक मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करतो.
पंतप्रधान - तुमचे कुटुंबीय सुद्धा मला दिसत आहेत. त्या सर्वांना माझा नमस्कार. त्यांचे आशीर्वाद कायम आपल्याला लाभत राहो. देशवासीयांच्या शुभेच्छा सुद्धा कायम आपल्या सोबत आहेत.
पंतप्रधान - मनप्रीत, तुमच्या सोबत गप्पा मारताना मला मेजर ध्यानचंद, के. डी. सिंह बाबू, मोहम्मद शाहिद अशा महान हॉकी खेळाडूंची आठवण येते आहे. मला आणि संपूर्ण देशाला खात्री वाटते की तुम्ही मंडळी तुमच्या कर्तृत्वाने हॉकीच्या सोनेरी इतिहासाला अधिक झळाळी द्याल.
पंतप्रधान - सानिया जी, तुम्ही अनेक ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. मोठमोठ्या खेळाडूंशी दोन हात केले आहेत. टेनिस चॅम्पियन होण्यासाठी कोणती वैशिष्ट्ये असली पाहिजेत, असे तुम्हाला वाटते? हल्ली मी पाहिले आहे की टीयर टू, टीयर थ्री शहरांमध्ये सुद्धा तुम्ही लोकांचे आदर्श आहात आणि तिथले लोक सुद्धा टेनिस शिकू इच्छितात.
सानिया - हो सर. मला असे वाटते की टेनिस हा एक जागतिक खेळ आहे. 25 वर्षांपूर्वी जेव्हा मी हा खेळ खेळू लागले होते तेव्हा फार लोक हा खेळ खेळत नव्हते. पण आज तुम्ही सांगत आहात, त्याप्रमाणे अनेक मुलांना टेनिस रॅकेट हातात घ्यायचे आहे, व्यवसायिक खेळाडू व्हायचे आहे. त्यांच्यातला अनेकांना खात्री वाटते की ते उत्तम टेनिसपटू होऊ शकतात. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहकार्य, निष्ठा आणि नशिबाची साथ. नशिबाची साथ असणे महत्त्वाचे आहेच पण मेहनत आणि प्रतिभा या गोष्टींना पर्याय नाही, मग ते टेनिस असो वा इतर कोणताही खेळ असो. आता अनेक सुविधा सहज उपलब्ध होत आहेत. 25 वर्षांपूर्वीच्या परिस्थितीच्या तुलनेत खूप नवीन स्टेडियम उपलब्ध झाली आहेत. हार्ड कोर्ट सुद्धा आहेत, त्यामुळे भारताला आगामी काळात चांगले टेनिस खेळाडू मिळतील, अशी अपेक्षा आहे.
पंतप्रधान - ऑलिंपिक मध्ये तुमच्या सहकारी अंकिता रैना सोबत तुमचा खेळ कसा होतो आहे? तुम्हा दोघींची तयारी कशी सुरू आहे?
सानिया - अंकिता एक युवा खेळाडू आहेत. त्यांचा खेळ चांगला आहे. अंकिता सोबत खेळायला मी उत्सुक आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आम्ही दोघी एकत्र खेळलो होतो, फेड कपच्या सामन्यांमध्ये आणि त्यावेळी आम्ही चांगला खेळ केला होता. आता आम्ही ऑलिंपिक मध्ये एकत्र खेळणार आहोत. ही माझी चौथी ऑलिंपिक स्पर्धा आहे, तिची पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा आहे. त्यामुळे माझ्या वयाला साथ देऊ शकणाऱ्या युवा पावलांची गरज आहे. मला वाटते, ही गरज ती निश्चितच पूर्ण करू शकेल.
पंतप्रधान - सानिया, तुम्ही यापूर्वी सुद्धा सरकारी विभागांमध्ये खेळाशी संबंधित कामकाज कसे चालते, ते अनुभवले आहे. मागच्या 5-6 वर्षांमध्ये तुम्हाला कोणते बदल दिसून आले आहेत?
सानिया - मी सांगितले त्याप्रमाणे 5-6 वर्षेच नाही तर आपल्याकडे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाल्या तेव्हापासून मला वाटते की आपल्या देशात क्रिकेटपटूंव्यतिरिक्त असे अनेक खेळाडू आहेत, जे देशासाठी उत्तम कामगिरी करत आहेत आणि देशाला सन्मान मिळवून देत आले आहेत आणि मला असे वाटते की हा प्रवास गेल्या 5-6 वर्षात सकारात्मक झाला आहे. आपल्या सरकारकडून आम्हाला नेहमीच सहाय्य मिळत आले आहे. जेव्हा जेव्हा मी व्यक्तिशः तुमची भेट घेतली, त्या प्रत्येक वेळी तुम्ही पुरेपूर सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे गेल्या पाच-सहा वर्षात बरेच चांगले बदल झाले आहेत. मागच्या ऑलिम्पिक पासून आताच्या ऑलिम्पिक पर्यंत परिस्थिती नक्कीच बदलली आहे.
पंतप्रधान - सानिया, तुम्ही चॅम्पियन आहात आणि फायटर सुद्धा. या ऑलिम्पिक स्पर्धेत तुम्ही आणखी चांगल्या आणि यशस्वी खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवाल, असा विश्वास मला वाटतो. तुम्हाला माझ्या अनेकानेक शुभेच्छा.