“गुजरातमधील ‘स्वागत’ या उपक्रमातून गुजरातने, जनतेच्या तक्रारनिवारणासाठी तंत्रज्ञान कसे वापरले जाऊ शकते, याचे प्रत्यक्ष उदाहरण जगासमोर ठेवले”
“मी खुर्चीच्या नियमांच्या बंधनात अडकलेला मुख्यमंत्री असणार नाही, याबद्दल माझ्या मनात स्पष्टता होती. मी कायम लोकांमध्ये असेन आणि त्यांच्यातलाच एक म्हणून काम करेन”
“लोकांचे जीवनमान सुखकर करण्याचा आणि प्रशासन लोकांपर्यंत पोहोचवणे हाच स्वागतचा अर्थ”
“माझ्यासाठी, सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे, स्वागतच्या माध्यमातून मला गुजरातच्या लोकांची सेवा करता आली”
“आम्ही हे दाखवून दिले की सरकार केवळ जुने कायदे आणि नियमांचे पालन इतकेच मर्यादित नसते, तर अभिनवता आणि नवोन्मेष यातून सुप्रशासन राबवता येते”
“स्वागत हे सरकारसाठी अनेक समस्यांवर समाधान शोधण्याची प्रेरणा ठरले, अनेक राज्ये आज अशाप्रकारच्या व्यवस्थेद्वारे काम करत आहेत”
“गेल्या नऊ वर्षात, प्रगतीने देशाच्या जलद प्रगतीत, महत्वाची भूमिका पार पाडली आहे, ही कल्पना देखील स्वागतच्या कल्पनेवरच आधारलेली होती.”

माझ्याबरोबर  थेट संवाद साधूया . जुन्या काळातील मित्रांना मी भेटू शकलो, हे माझं भाग्य आहे. बघूया, आधी कोणाशी बोलायची संधी मिळते.

पंतप्रधान: आपलं नाव काय?

लाभार्थी: सोलंकी बागतसंग बचुजी

पंतप्रधान: तर, जेव्हा आम्ही 'स्वागत' सुरू केले, तेव्हा तुम्ही सर्वात प्रथम आले होते का?

लाभार्थी बचुजी: हो सर, सगळ्यात पहिला मी आलो होतो.

पंतप्रधान: पण तुम्ही इतके जागरूक कसे झालात, 'स्वागत'मध्ये गेल्यावर फक्त सरकारी अधिकाऱ्यालाच काही सांगायचे आहे, हे कसे कळले?  

लाभार्थी बचुजी: होय सर, ते असं आहे की, मला दहेगाम तहसील मधून 20-11-2000 रोजी शासकीय गृहनिर्माण योजनेसाठी आठवड्याचा कार्यादेश मिळाला होता, पण मी प्लिंथपर्यंत घर बांधलं, आणि त्यानंतर 9  इंच रुंदीची भिंत बांधायची की 14 इंच रुंदीची भिंत बांधायची हे मला माहीत नव्हतं. त्यानंतर भूकंप झाला, त्यामुळे मी घर बांधलं, तर ते 9 इंच रुंदीच्या भिंतीसह उभे राहू शकेल की नाही अशी भीती वाटत होती. मग मी स्वतः मेहनत घेऊन 9 ऐवजी 14 ची भिंत बनवली, मी दुसरा हप्ता मागितला तेव्हा गटविकास अधिका-यांनी मला सांगितलं, की तुम्ही 9 ऐवजी 14 ची भिंत केली आहे, त्यामुळे तुम्हाला दुसरा हप्ता मिळणार नाही. तुम्हाला पहिल्या हप्त्यापोटी 8,253 रुपये दिले होते, तो हप्ता तुम्ही ब्लॉक ऑफिसमध्ये व्याजासह परत करा. मी जिल्ह्यात आणि ब्लॉकमध्ये किती वेळा तक्रार केली, तरीही मला प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून मी गांधीनगर जिल्ह्यात चौकशी केली, तेव्हा एक भाऊ मला म्हणाला, तू रोज इथे का येतोस, तेव्हा मी म्हणालो की मी 9 ऐवजी 14 ची भिंत बांधली आहे, त्यामुळे मला  सरकारी निवासस्थानाचा हप्ता मिळत नाही, आणि कुटुंबा बरोबर राहतो. माझं  घर नाहीये, तर मी काय करू, मला खूप त्रास होत आहे म्हणून मी इकडे तिकडे धावत आहे. तर तो भाऊ मला म्हणाला की काका, एक काम करा, सचिवालयात माननीय नरेंद्रभाई मोदींचा   'स्वागत'  हा उपक्रम दर महिन्याला गुरुवारी असतो , तेव्हा तुम्ही तिथे जा.

म्हणूनच सर, मी थेट सचिवालय गाठलं, आणि माझी तक्रार घेऊन मी थेट तुमची प्रत्यक्ष  भेट घेतली. तुम्ही माझं म्हणणं खूप शांतपणे ऐकलं, आणि मला उत्तरही दिलं. आणि तुम्ही ज्या अधिकाऱ्याला निर्देश दिले होते, आणि मी 9 ऐवजी 14 ची भिंत बांधली होती, त्याचे बाकीचे हप्ते मला मिळू लागले. आणि आज मी माझ्या स्वतःच्या घरात माझं कुटुंब, सहा मुलांबरोबर आनंदाने राहतो आहे. यासाठी साहेब, आपले खूप खूप धन्यवाद!

पंतप्रधान: भरतभाई, तुमचा हा पहिला अनुभव ऐकून मला जुने दिवस आठवले आणि 20 वर्षांनी तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली, कुटुंबातली सर्व मुलं अभ्यास करतात की काय करतात?

भरतभाई: साहेब, 4 मुलींचं लग्न करून दिलं आहे आणि 2 मुलींचं लग्न अजून झालेलं  नाही, त्यांचं वय अजून 18 वर्षांपेक्षा कमी आहे.  

पंतप्रधान: पण तुमचं घर अजूनही तसंच आहे की 20 वर्षांत सर्वकाही जुनं झालं आहे?

भरतभाई: साहेब, पूर्वी छतावरून पाणी पडायचं, पाण्याची समस्याही होती, अजूनही छतावरून माती पडते, छत पक्कं केलेलं नाही.

पंतप्रधान: तुम्हाला सर्व जावई चांगले मिळाले आहेत ना?

भरतभाई: साहेब, सगळे चांगले आहेत.

पंतप्रधान: ठीक आहे, सुखी राहा. पण तुम्ही लोकांना ‘स्वागत’ कार्यक्रमाबद्दल सांगायचे की नाही, इतरांना पाठवायचे की नाही?

भरतभाई: हो साहेब, पाठवायचो, आणि सांगायचो की मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी मला समाधानकारक उत्तर दिलं, आणि माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि माझं काम समाधानकारक रित्या केलं, त्यामुळे तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही 'स्वागत' कार्यक्रमाला जाऊ शकता, आणि तुम्हाला जाता नाही आलं, तर मी सोबत येईन कार्यालय दाखवीन.

पंतप्रधान: ठीक आहे, भरतभाई आनंद झाला.

आता दुसरे कोण सद्ग्रस्थ  आहेत?

विनयकुमार: नमस्कार सर, मी चौधरी विनयकुमार बाळूभाई, मी तापी जिल्ह्यातील वाघमेरा गावचा आहे.

पंतप्रधान: विनयभाई, नमस्कार.

विनयभाई: नमस्कार साहेब.

पंतप्रधान: कसे आहात तुम्ही.

विनयभाई: ठीक साहेब, आपल्या अशीर्वादांनी बरा आहे.  

पंतप्रधान: तुम्हाला माहित आहे ना, आता आम्ही तुम्हा सर्वांना दिव्यांग असं म्हणतो. गावातही लोक तुम्हाला असं सन्मानाने म्हणत असतील.

विनयभाई: हो म्हणतात.

पंतप्रधान: मला स्पष्ट आठवते की, तुम्ही त्यावेळी तुमच्या हक्कांसाठी खूप संघर्ष केला होता, त्या वेळी तुमचा लढा काय होता ते सर्वांना सांगा आणि शेवटी तुम्ही तुमचे हक्क मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलात. तो विषय सर्वांना समजावून सांगा.

विनयभाई: साहेब, त्या वेळी  माझा प्रश्न स्वतःच्या पायावर उभं राहणं, हा होता. त्यावेळी मी अल्पसंख्याक वित्त आयोगात कर्जासाठी अर्ज केला होता, तो अर्ज मंजूर झाला मात्र मला धनादेश वेळेवर देण्यात आला नाही. मी खूप अस्वस्थ झालो, त्यानंतर मला माझा एक मित्र म्हणाला, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर गांधीनगरमध्ये चालणाऱ्या ‘स्वागत’ कार्यक्रमात मिळेल, त्या ठिकाणी तुला तुझे प्रश्न मांडावे लागतील. तर साहेब, तापी जिल्ह्यातील वाघमेरा गावातून मी बसने गांधीनगरला आलो आणि तुमच्या कार्यक्रमाचा लाभ घेतला. तुम्ही माझा प्रश्न ऐकला आणि तुम्ही मला पटकन रु.39,245 चा धनादेश मिळवून दिला. त्या धनादेशाच्या मदतीने मी 2008 मध्ये माझ्या घरात जनरल स्टोअर उघडलं, आजही ते दुकान चालू आहे, त्यातून मी माझं घर चालवतो. साहेब, दुकान सुरू केल्यापासून दोन वर्षांतच मी लग्नही केलं, आज मला दोन मुली आहेत, आणि मी त्यांना याच दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारावर शिकवत आहे. मोठी मुलगी आठवीत आहे आणि धाकटी मुलगी सहावीत आहे. माझं कुटुंब खूप चांगल्या रीतीने स्वावलंबी झालं आहे, आणि दोन वर्षापासून मी दुकान सांभाळून पत्नी बरोबर शेती पण करत आहे, आणि मला चांगलं उत्पन्न मिळत आहे.

पंतप्रधान : विनयभाई, दुकानात काय विकता?

विनयभाई : सर्व अन्नधान्य आणि किराणा सामान विकतो.

पंतप्रधान : आम्ही जे व्होकल फॉर लोकल म्हणत असतो , तर, सर्व जण तुमच्या दुकानात व्होकल फॉर लोकल म्हणजेच स्थानिक उत्पादने खरेदी करण्यासाठी येतात का?

विनयभाई  : हो साहेब येतात. धान्य, कडधान्य, तांदूळ, साखर सर्व घ्यायला येतात.

पंतप्रधान : आता आपण जी 'श्री अन्न'ची चळवळ चालवत आहोत, सर्वांनी बाजरी, ज्वारी खावी, तुमच्या दुकानात श्री अन्नची विक्री होते की  नाही ?  

विनयभाई : हो साहेब होते.

पंतप्रधान : तुम्ही इतरांना रोजगार देता की तुम्ही स्वतः तुमच्या पत्नीसोबत काम करता.

विनयभाई : मजूर ठेवावे लागतात.

पंतप्रधान : मजूर ठेवावे लागतात, बरे मग तुमच्यामुळे किती लोकांना रोजगार मिळाला.

विनयभाई : माझ्यामुळे 4-5 जणांना शेतात काम करण्यासाठी रोजगार मिळाला आहे.

पंतप्रधान : आता आम्ही सर्वांना डिजिटल पेमेंट करायला सांगतो. तुम्ही तिथे डिजिटल पेमेंट करता का ? मोबाईल फोनवरून पैशांची देवाणघेवाण, क्यूआर कोड मागणे, असे काही करता का ?

विनयभाई : हो  साहेब, बरेच लोक येतात, ते माझा क्युआर कोड विचारतात आणि माझ्या खात्यात पैसे टाकतात.

पंतप्रधान : चांगले आहे, म्हणजे हे सर्व तुमच्या गावापर्यंत पोहोचले आहे.

विनयभाई : हो पोहोचले आहे सर्व.

पंतप्रधान : विनयभाई, तुमची खासियत ही आहे की तुम्ही 'स्वागत ' कार्यक्रम यशस्वी केला आणि 'स्वागत' कार्यक्रमातून तुम्हाला जे काही फायदे मिळाले याबद्दल इतर लोकही तुम्हाला विचारात असतील. तुम्ही एवढी हिंमत दाखवली की तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलात, तुम्ही तक्रार घेऊन आल्याचे सर्व अधिकाऱ्यांना समजले तर ते सगळॆ  तुम्हाला त्रास देतील हे नंतर असेच घडले असावे.

विनयभाई : हो सर

पंतप्रधान : की नंतर मार्ग मोकळा झाला होता

विनयभाई : मोकळा झाला होता साहेब

पंतप्रधान : आता विनयभाई गावात दादागिरी करत असतील की माझा थेट मुख्यमंत्र्यांशी संबंध आहे. तुम्ही असे करत नाही ना ?

विनयभाई : नाही सर

पंतप्रधान : ठीक आहे विनयभाई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बरे केले की, तुम्ही मुलींना शिकवत आहात, खूप शिकवा. ठीक आहे.

पंतप्रधान : तुमचे नाव काय आहे?

राकेशभाई पारेख : राकेशभाई पारेख

पंतप्रधान : राकेशभाई पारेख, तुम्ही सुरत जिल्ह्यातून आला आहात का?

राकेशभाई पारेख : होय, मी सुरतहून आलो आहे.

पंतप्रधान : म्हणजे तुम्ही सुरतमध्ये राहता की सुरतच्या आसपास कुठेतरी?

राकेशभाई पारेख : मी सुरतमध्ये एका अपार्टमेंटमध्ये राहतो.

पंतप्रधान : होय, मला सांगा तुमचा प्रश्न काय आहे?

राकेशभाई पारेख : प्रश्न असा आहे की 2006 मध्ये ही इमारत पाडण्यात आली, ही 8 मजली इमारत होती, ज्यामध्ये 32 सदनिका आणि 8 दुकाने होती. ती इमारत जीर्ण झाली होती, त्यामुळे ही इमारत पाडण्यात आली होती, यासाठी आम्हाला परवानगी मिळत नव्हती. आम्ही महानगरपालिकेत जायचो, तिथे परवानगी मिळत नव्हती. आम्ही सगळे जमलो, त्यावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते. स्वागत कार्यक्रमाबद्दल आम्हाला समजले. मी तक्रार दिली, त्यावेळी मी गामित साहेबांना भेटलो होतो, त्यांनी मला सांगितले की, तुमची तक्रार प्राप्त झाली असून, त्यासाठी आम्ही तुम्हाला त्वरित बोलावू, तुम्हाला शक्य तितक्या लवकर बोलावू. तुमच्याकडे घर नाही याचे मला दु:ख आहे, असे सांगून दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बोलावले. आणि स्वागत कार्यक्रमात मला तुमच्याबरोबर संधी मिळाली. त्यावेळी तुम्ही मला  परवानगी दिली. मी भाड्याच्या घरात राहायचो. 10 वर्षे भाड्याच्या घरात राहिलो. आणि मंजुरी मिळाली, मग आम्ही संपूर्ण इमारत नव्याने बांधली. त्यात तुम्ही एक विशेष प्रकरण म्हणून मंजुरी दिली होती, आम्ही बैठक घेतली आणि बैठकीत सर्वांना सहभागी करून घेऊन संपूर्ण इमारत बांधण्यात आली. आणि आम्ही सर्व पुन्हा राहू लागलो. 32 कुटुंबे आणि 8 दुकानदार तुमच्याप्रती खूप खूप आभार व्यक्त करत आहेत.

पंतप्रधान : पारेखजी, तुम्ही तुमच्यासह 32 कुटुंबांचे भले केले. आणि आज 32 कुटुंबांना सुख शांतीने जगण्याची संधी मिळाली. ही 32 कुटुंब आता कशी राहात आहेत, सुखात आहेत ना सगळे?

राकेशभाई पारेख : सर्वजण सुखात आहेत आणि मी थोडा त्रासात आहे सर.

पंतप्रधान : सगळे एकोप्याने राहतात का?

राकेशभाई पारेख : हा सगळे एकोप्याने राहतात.

पंतप्रधान : आणि तुम्ही पुन्हा त्रासात आहात?

राकेशभाई पारेख : होय साहेब, तुम्ही म्हणाला होता की तुम्हाला कधी काही अडचण आली तर माझ्या बंगल्यात येऊन राहा. इमारत पूर्ण होईपर्यंत मी भाड्याच्या घरात राहत होतो, आता इमारत पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या कुटुंबासह शांततेत राहतो आहे, मला दोन मुले आहेत, मी त्यांच्यासोबत आणि माझ्या पत्नीसोबत शांततेने राहतो आहे.

पंतप्रधान :  मुले  काय शिकत आहेत?

राकेशभाई पारेख : एक मुलगा नोकरी करतो आणि दुसरा मुलगा कुकिंगचे काम करतो. हॉटेल मॅनेजमेंटचं काम म्हणतात ना, हल्ली त्याच्यावरच  घर चालते. सध्या माझी नस दबल्यामुळे त्रास होत आहे चालता येत नाही, मला दीड वर्षापासून याचा त्रास होत आहे.

पंतप्रधान: पण ते योग वगैरे करता की नाही?

राकेशभाई पारेख : हो साहेब, व्यायाम वगैरे चालू आहे.

पंतप्रधान : यामध्ये घाईघाईने शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. आता तर आपले आयुष्मान कार्ड देखील बनते, तुम्ही आयुष्मान कार्ड बनवले आहे का? आणि पाच लाखांपर्यंतचा खर्चही त्यातून निघतो. आणि गुजरात सरकारच्या सुद्धा मा कार्ड योजनेसारख्या सुंदर योजना आहेत, त्यांचा लाभ घ्या आणि त्रास एकदाचा दूर करा.

राकेशभाई पारेख : हो साहेब ठीक आहे.

पंतप्रधान : असे थकून जाण्याएवढे तुमचे वय नाही.

पंतप्रधान : ठीक आहे राकेशभाई तुम्ही स्वागतच्या माध्यमातून अनेकांना मदत केली आहे. एक जागरूक नागरिक कशी मदत करू शकतो याचे तुम्ही उदाहरण आहात. सरकारने तुम्हाला आणि तुमचे म्हणणे गांभीर्याने घेतल्याचेही मला समाधान आहे. गेल्या वर्षांमध्ये आपला प्रश्न सुटला आहे. आता तुमची मुलेही स्थैर्य प्राप्त करत आहेत. चला माझ्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा सांगा भाई. 

मित्रांनो,

या संभाषणानंतर मला या गोष्टीचे समाधान वाटले की आम्ही ज्या उद्देशाने ‘स्वागत’ उपक्रम सुरु केला होत तो उद्देश पूर्णपणे यशस्वी झाला आहे. या यंत्रणेच्या मदतीने लोक केवळ त्यांच्या समस्येवर उपाय मिळवत नाहीत तर राकेशजीं सारखे लोक स्वतःबरोबर शेकडो कुटुंबांच्या समस्येला वाचा फोडत आहेत.

मला असे वाटते की सामान्य माणसाला सरकारसमोर आपल्या मनातील गोष्टी मांडता येतील, त्याला सरकार हा आपला मित्र वाटेल अशा पद्धतीचे सरकारचे व्यवहार असले पाहिजेत आणि याच तत्वासह आम्ही गुजरातमध्ये आगेकूच केली. भूपेंद्र भाई देखील आज आपल्यासोबत उपस्थित आहेत याचा मला आनंद झाला आहे. मी पाहू शकतो आहे, काही जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमासाठी मंत्री देखील उपस्थित आहेत, अधिकारीवर्ग सुद्धा दिसतो आहे, आता त्यांच्यात अनेक नवे चेहरे दिसू लागले आहेत, त्यांच्यापैकी फार कमी जणांना मी ओळखतो.

गुजरातच्या करोडो नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित ‘स्वागत’ या उपक्रमाला 20 वर्षे पूर्ण होत आहेत. आणि मला आत्ताच काही लाभार्थ्यांकडून जुने अनुभव ऐकण्याची, जुन्या आठवणी पुन्हा जिवंत करण्याची संधी मिळाली आणि कितीतरी जुन्या गोष्टी डोळ्यांसमोर तरळून गेल्या. ‘स्वागत’ उपक्रमाच्या यशामध्ये कितीतरी लोकांची मेहनत, कित्येकांची निष्ठा यांचा समावेश आहे.
मी या प्रसंगी त्या सर्व लोकांना धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो.  

मित्रांनो,

जेव्हा एखाद्या यंत्रणेचा जन्म होतो, तिची उभारणी होते तेव्हा त्याच्या पाठीमागे एक दृष्टी आणि एक हेतू असतो. भविष्यात ही यंत्रणा कुठवर पोहोचेल, तिचे नशीब काय असेल त्याचा अंतिम परिणाम त्या हेतुमुळेच निश्चित होत असतो. वर्ष 2003 मध्ये मी जेव्हा ‘स्वागत’ ची सुरुवात केली होती तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारून फार काळ झालेला नव्हता. त्याआधी कितीतरी वर्षे माझे आयुष्य एक कार्यकर्ता म्हणून मी व्यतीत केले, सर्वसामान्य माणसांमध्येच या काळात मी राहिलो होतो. मुख्यमंत्री झाल्यावर लोक मला नेहमीच म्हणायचे, म्हणजे सहसा आपल्या देशात, पूर्वीच्या अनुभवांवरून लोक म्हणत असत की बघा एकदा सत्तेची खुर्ची मिळाली की सगळीच परिस्थिती बदलून जाते, त्या लोकांचे वागणे बदलते. अशा गोष्टी मला ऐकायला मिळत असत.

मी मात्र, मनोमन निश्चय केला होता की लोकांनी मला जसे घडविले आहे तसाच मी राहणार. जनतेमध्ये राहून मी जे शिकलो आहे, त्यांच्यात असताना जे अनुभव मी घेतले आहेत,ते लक्षात ठेवणार, कोणत्याही परिस्थितीत मी सत्तेचा गुलाम होणार नाही. मी सामान्य जनतेत राहणार, जनता जनार्दनासाठी काम करत राहणार. याच दृढ निश्चयासह ‘स्वागत’ अर्थात तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेच्या तक्रारींकडे लक्ष देण्यासाठी निर्मित राज्यव्यापी मंचाचा जन्म झाला. सामान्य माणसाचे लोकशाही संस्थांमध्ये स्वागत! विधान व्यवस्थेत स्वागत! समस्यांच्या सोडवणूक व्यवस्थेत स्वागत! ही या मंचाच्या उभारणीमागील भावना होती. आणि आज 20 वर्षांनी देखील ‘स्वागत’चा अर्थ आहे जीवन जगण्यातील सुलभता, प्रशासनापर्यंत सामान्य माणसाची पोहोच! अत्यंत प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांचा हा परिणाम झाला आहे की गुजरातमधील प्रशासनाच्या या मॉडेलला आता संपूर्ण जगभरात मान्यता मिळालेली आहे. सर्वात आधी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेने या यंत्रणेचा ई-पारदर्शकता आणि ई-उत्तरदायित्व यांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून गौरव केला.त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी देखील ‘स्वागत’ उपक्रमाची प्रशंसा केली. या उपक्रमाला संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिष्ठित सार्वजनिक सेवेसाठीचे पारितोषिक देखील देण्यात आले. वर्ष 2011 मध्ये जेव्हा देशात काँग्रेसचे सरकार होते तेव्हा ‘स्वागत’ यंत्रणेमुळे गुजरात सरकारने भारत सरकारचे सुवर्ण पारितोषिक देखील जिंकले होते. आणि ही प्रक्रिया सातत्याने सुरु राहिली आहे.  

बंधू भगिनींनो,

माझ्यासाठी स्वागतच्या सफलतेला मिळालेले सर्वात मोठे पारितोषिक हे आहे की याच्या माध्यमातून आम्ही गुजरातच्या जनतेची सेवा करू शकलो. स्वागतच्या रुपात आम्ही एक व्यावहारिक यंत्रणा तयार केली. ब्लॉक आणि तालुका पातळीवर जन-सुनावणीसाठी स्वागत ही पहिली व्यवस्था तयार झाली होती.त्यानंतर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली. आणि राज्य पातळीवर या यंत्रणेच्या संचालनाची जबाबदारी मी स्वतःकडे घेतली. याचा मला स्वतःला देखील खूप मोठा फायदा झाला. मी जेव्हा समोरासमोर जन-सुनावणी करत असे तेव्हा समाजाच्या अगदी तळागाळातील लोकांना सरकारचा फायदा होतो आहे की नाही किंवा सरकारी लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत की नाही, सरकारी धोरणांमुळे त्यांच्या अडचणी वाढत आहेत की काय, स्थानिक पातळीवरील एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या चुकीच्या वागण्यामुळे तेथील लोक त्रस्त आहेत की काय किंवा या सामान्य लोकांचे हक्क कोणी हिरावून घेत आहे की काय, किंवा त्यांच्या हक्काच्या गोष्टी त्यांना मिळू देत नाहीत की काय अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे, त्याविषयीची माहिती अगदी खालच्या स्तरावरून अत्यंत सुलभरीत्या मला मिळू लागली. तसेच स्वागत मंचाचे सामर्थ्य, त्याची प्रतिष्ठा इतकी वाढली की गुजरातचा सामान्य नागरिक देखील त्याचे काम करून घेण्यासाठी मोठ्यात मोठ्या अधिकाऱ्याकडे जात असे. आणि जर त्याचे म्हणणे अधिकाऱ्याने ऐकून घेतले नाही, त्याचे काम झाले नाही तर तो त्या अधिकाऱ्याला सांगत असे की ठीक आहे, तुम्हाला ऐकायचेच असेल तर ऐका, मी आता माझी समस्या स्वागत कडे घेऊन जाणार. स्वागत चे नाव ऐकून अधिकारी जागेवरून खडबडून उठत असत आणि त्या नागरिकाची आवभगत करून त्याची तक्रार नोंदवून घेत असत.

स्वागत यंत्रणेने इतका मान मिळवला होता. स्वागत मंचामुळे मला सामान्य जनतेच्या तक्रारींची, समस्यांची तसेच अडचणींची थेट माहिती मिळत होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला या समस्या सोडवून कर्तव्यपालन केल्याचे समाधान मिळत होते. आणि हे एवढ्यावरच थांबत नसे. स्वागत कार्यक्रम तर महिन्यातून केवळ एक दिवस होत असे,पण त्यावर काम मात्र महिनाभर करावे लागत असे कारण लोकांकडून शेकडो तक्रारी येत असत आणि मी त्याचे विश्लेषण करत असे. मी विचार करत असे की एखादा असा विभाग आहे का की ज्याविषयी वारंवार तक्रारी येत आहेत, असा एखादा अधिकारी आहे का की ज्याच्याविषयी लोक सतत तक्रारी करत आहेत, असे एखादे क्षेत्र आहे का की ज्याच्या तक्रारींचा पाउस पडत आहे. सरकारी धोरणांतील गोंधळामुळे असे होते आहे का, एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे तक्रारी वाढत आहेत का, अशा सगळ्या बाबींचे आम्ही विश्लेषण करत असू. आवश्यक असेल तेथे नियमांमध्ये बदल करत असू, धोरणे सुधारत असू,जेणेकरून सामान्य माणसाचे नुकसान होऊ नये. आणि जर एखाद्या व्यक्तीमुळे लोकांना त्रास होतो आहे असे दिसून आले तर त्या व्यक्तीची देखील नीट व्यवस्था लावली जात होती. या सगळ्यामुळे स्वागत मंचाने सामान्य जनतेमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला. लोकशाहीचा सर्वात मोठा तराजू आहे त्याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे की हा तराजू लोकशाहीचे यश नेमके मोजण्यासाठीचा महत्त्वाचा तराजू आहे. त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये सार्वजनिक तक्रार निवारण व्यवस्था कशी आहे, सामान्य जनतेच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी कोणती यंत्रणा आहे, त्या तक्रारींवर उपाययोजना करण्याची काय सोय आहे, या सर्व लोकशाहीची योग्यता तपासणाऱ्या चाचण्या आहेत.  

आणि आज जेव्हा मी पाहतो की स्वागत नावाच्या लहानशा बीजाचा आता एवढा मोठा वटवृक्ष झाला आहे, तेव्हा मला देखील अभिमान वाटतो, समाधान वाटते.

त्यावेळी ‘स्वागत’ उपक्रम सांभाळणारे  माझे जुने सहकारी,  मुख्यमंत्री कार्यालयातले ए के शर्मा. यांनी आज इकॉनॉमिक्स टाईम्समध्ये स्वागत या उपक्रमाबाबत एक उत्तम लेख लिहिला आहे, त्यावेळचे अनुभव लिहिले आहेत. आता तर ते माझ्या दुनियेत म्हणजे राजकारणात आले आहेत.  उत्तर प्रदेशमध्ये ते मंत्रीपदी आहेत. मात्र त्या वेळी ते सरकारी अधिकारी म्हणून स्वागत उपक्रम सांभाळत असत.

मित्रांनो,

आपल्या देशात दशकांपासून अशी धारणा होती की सरकार कोणतेही असो, केवळ आखून दिलेल्या चाकोरीतूनच त्यांना चालावे लागते. ही सरकारे आपला कार्यकाळ पूर्ण करत असत, जास्तीत जास्त रिबिनी कापून उद्घाटन करणे, दीप प्रज्वलन यासारखी कामे केली की काम संपले. मात्र स्वागतच्या माध्यमातून गुजरातने ही धारणा बदलण्याचे काम केले आहे. प्रशासन केवळ नियम आणि कायदे आणि चाकोरी इथपर्यंतच मर्यादित नसते. प्रशासन होते ते नवनवीन कल्पना, नवोन्मेष यामुळे. प्रशासन म्हणजे प्राणहीन व्यवस्था नव्हे तर प्रशासन म्हणजे जिवंत व्यवस्था, प्रशासन म्हणजे संवेदनशील व्यवस्था. प्रशासन म्हणजे लोकांचे जीवन, त्यांची स्वप्ने, त्यांचे संकल्प यांच्याशी जोडलेली एक विकसनशील व्यवस्था होय. 2003 मध्ये जेव्हा स्वागतची सुरवात झाली होती तेव्हा सरकारी कामकाजात तंत्रज्ञान आणि ई प्रशासनाला फारसे प्राधान्य मिळत नसे. प्रत्येक बाबीसाठी फाईल आणि कागद. एकीकडून दुसरीकडे जात-जात फाईली कुठे गायब होत कोणाला कळतही नसे. एकदा अर्ज दिला की तक्रारदाराचे आयुष्य तो कागद कुणाकडे आहे हे शोधण्यातच जात असे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सारख्या व्यवस्थेशी लोकांचा जास्त परिचय नव्हता. अशी परिस्थिती असताना गुजरातने भविष्याचा वेध घेणाऱ्या कल्पनांवर काम केले आणि आज स्वागत सारखी व्यवस्था अनेक प्रशासनिक उपायांची प्रेरणा ठरली आहे.

अनेक राज्ये अशा प्रकारच्या व्यवस्थेसाठी काम करत आहेत.मला आठवते आहे, अनेक राज्यांची प्रतिनिधी मंडळे येत असत, या उपक्रमाचा अभ्यास करत असत आणि आपल्याकडे त्याची सुरवात करत असत. आपण मला दिल्लीला पाठवले तेव्हा केंद्रातही आम्ही सरकारी कामकाजाच्या आढाव्यासाठी ‘प्रगती’ नावाची व्यवस्था निर्माण केली.

गेल्या नऊ  वर्षातल्या देशाच्या वेगवान विकासामध्ये ‘प्रगती’ची मोठी भूमिका आहे. ही संकल्पनाही स्वागत या कल्पनेवर आधारित आहे. पंतप्रधान या नात्याने मी प्रगतीच्या बैठकांमध्ये सुमारे 16 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा आढावा घेतला आहे.

या संकल्पनेने देशाच्या शेकडो प्रकल्पांना वेग देण्याचे काम केले आहे. प्रगतीचा असा प्रभाव निर्माण झाला आहे की, एखादा प्रकल्प प्रगती उपक्रमाच्या यादीत आला तर त्याच्याशी संबंधित सर्व अडथळे सर्व राज्ये वेगाने दूर करतात जेणेकरून  माझ्यासमोर जेव्हा तो मुद्दा येईल तेव्हा 2 दिवसापूर्वीच हे काम झाले आहे असे सांगता येईल.

मित्रांनो,

एका बीजातून एक वृक्ष तयार होतो, त्या वृक्षाच्या शेकडो पारंब्या तयार होतात. हजारो बीजांतून हजारो नवे वृक्ष उगवतात त्याचप्रमाणे मला विश्वास आहे की स्वागतचे हे विचाराचे बीज प्रशासनात हजारो नव कल्पनांना जन्म देईल. लोकाभिमुख प्रशासनाचे एक मॉडेल म्हणून हे जनतेची सेवा अशीच जारी ठेवेल असा मला विश्वास आहे. ही तारीख लक्षात ठेवून आपणा सर्वांशी संवाद साधण्याची मला संधी दिलीत,  मी तर काम करत-करत पुढे जात राहिलो,  आता स्वागतला 20 वर्षे झाली हे  आपल्याकडून निमंत्रण आले तेव्हा लक्षात आले.

मला आनंद  झाला की प्रशासनाच्या उपक्रमाचा अशा प्रकारे उत्सव साजरा केला जात आहे जेणेकरून त्यात नवे चैतन्य, नवी चेतना निर्माण व्हावी. ‘स्वागत’ हा उपक्रम अधिक उत्साह आणि जोमाने आणि अधिक विश्वासार्हतेने वाटचाल करेल याचा मला विश्वास आहे. गुजरातच्या माझ्या सर्व प्रिय बंधू-भगिनींना माझ्या खूप-खूप शुभेच्छा. काही दिवसातच 1  मे  रोजी गुजरातचा स्थापना दिवस येईल. गुजरात स्थापना दिनालाही विकासाची संधी म्हणून साकारतो, विकासाचा उत्सव साजरा करतो, त्याची तयारी मोठ्या धुमधडाक्यात सुरु असेल. आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा. खूप खूप अभिनंदन.  

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage