“बुद्ध तत्वज्ञानातील सदसद्विवेकबुद्धी शाश्वत आहे”
“भगवान बुद्धांच्या शिकवणीतून प्रेरणा घेत,भारताने जागतिक कल्याणासाठी नवे उपक्रम हाती घेतले आहेत.”
“आम्ही भगवान बुद्धांचा संदेश आणि मूल्ये यांचा सातत्याने प्रचार-प्रसार करतो आहोत”
“भारतीय तत्वज्ञानानुसार, प्रत्येक मानवाचे दु:ख हे आपले स्वतःचेच दु:ख आहे, असे इथले लोक मानतात’
“आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेसारख्या व्यासपीठांमुळे समविचारी आणि समभावना असलेल्या देशांमध्ये बौद्ध धम्म आणि शांततेचा प्रसार करण्याची संधी मिळते.”
“आता प्रत्येक व्यक्तीचे आणि देशाचे प्राधान्य जगाच्या हिताचे तसेच, देशाच्या हिताचे असले पाहिजे, अशी आज काळाची गरज आहे.”
“समस्यांवर उपाय शोधण्याचा मार्ग म्हणजे बुद्धाचा मार्ग”
“आज जगाला भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्येवर गौतम बुद्धांनी उपाय सांगितले आहेत.”
“बुद्धांचा मार्ग म्हणजे,भविष्याचा मार्ग आणि शाश्वततेचा मार्ग”
“मिशन लाईफ वर देखील बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव असून,बुद्धांचेच विचार पुढे नेणारे आहे हे मिशन ”

नमो बुद्धाय !

कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य किरेन रिजिजूजी, किशन रेड्डीजी, अर्जुन राम मेघवालजी, मीनाक्षी लेखीजी, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाचे सरचिटणीस, देश-परदेशातून या ठिकाणी आलेले आणि आपल्यासोबत उपस्थित असलेले सर्व आदरणीय भिक्षू, इतर मान्यवर आणि सभ्य स्त्री-पुरूषहो,  

 

जागतिक बौद्ध परिषदेच्या या पहिल्याच कार्यक्रमात आपण सर्व जगाच्या कानाकोपऱ्यातून आले आहात. 'अतिथी देवो भव' अर्थात पाहुणे हे आपल्यासाठी देवासारखे असतात, अशी बुद्धाच्या या भूमीची परंपरा आहे. मात्र भगवान बुद्धांचे विचार आचरणात आणणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्यासमोर असतात, तेव्हा साक्षात बुद्धाचे अस्तित्व आपल्याला जाणवू लागते. कारण बुद्ध म्हणजे व्यक्तीच्या पलीकडे असणारा बोध आहे. बुद्ध हा स्वरूपाच्या पलीकडचा विचार आहे. बुद्ध म्हणजे चेतनेपलीकडचे चैतन्य आहे आणि बुद्धाचे हे चैतन्य शाश्वत आहे, निरंतर आहे. हा बोध अविस्मरणीय आहे. 

म्हणूनच आज विविध देशांमधले, वेगवेगळ्या भौगोलिक आणि सांस्कृतिक वातावरणातले लोक या ठिकाणी एकत्रितपणे उपस्थित आहेत. संपूर्ण मानवतेला एका समान सूत्रात जोडणारा हा भगवान बुद्धाचा विस्तार आहे. जगातील विविध देशांमधील बुद्धांच्या कोट्यवधी अनुयायांचे हे सामर्थ्य जेव्हा एकत्र येऊन संकल्प करते, तेव्हा त्यांची ऊर्जा कशी अमर्याद होते, याची कल्पना आपण करू शकतो. 

 

जेव्हा जगाच्या चांगल्या भवितव्यासाठी अनेक समविचारी लोक एकत्र येऊन काम करतील तेव्हा भवितव्याचे स्वरूप निश्चितच भव्य असेल. आणि म्हणूनच, ही पहिली जागतिक बौद्ध परिषद या दिशेने आपल्या सर्व देशांच्या एकत्रित प्रयत्नांसाठी एक प्रभावी मंच प्रदान करेल, असा विश्वास मला वाटतो. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाचे हृदयपूर्वक अभिनंदन करतो. 

मित्रहो, 

या परिषदेबाबत माझ्या मनात असणाऱ्या जिव्हाळ्याचे आणखी एक कारण आहे. माझा जन्म गुजरातमधील वडनगर या ठिकाणी झाला आणि या ठिकाणाचा बौद्ध धर्माशी अगदी जवळचा संबंध आहे. वडनगर येथे बौद्ध धर्माशी संबंधित अनेक पुरातत्वीय पुरावे सापडले आहेत. बौद्ध प्रवासी ह्युएन त्सांग यांनीही कोणे एके काळी वडनगरला भेट दिली होती. आणि ज्या वस्तू मी येथे प्रदर्शनात पाहिल्या, अनेक वस्तू या प्रदर्शनात अगदी तपशीलवार ठेवल्या आहेत. आणि योगायोग बघा, माझा जन्म वडनगरमध्ये झाला आणि मी काशीचा खासदार आहे आणि सारनाथसुद्धा तिथेच आहे. 

मित्रहो,  

भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होत असताना, भारत आपल्या स्वातंत्र्य प्राप्तीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना भारतात जागतिक बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या अमृत काळात भारताकडे आपल्या भवितव्यासाठी मोठे उद्दिष्ट सुद्धा आहे आणि वैश्विक कल्याणासाठी नवे संकल्प सुद्धा आहेत. भारताने जागतिक स्तरावर आज अनेक बाबतीत नव्याने पुढाकार घेतला आहे आणि यामागे भगवान बुद्ध ही आमची सर्वात मोठी प्रेरणा आहे. 

 

मित्रहो,  

परियत्ति, पटिपत्ति आणि परिवेश हा बुद्धाचा मार्ग आहे, हे आपणा सर्वांना माहीती आहेच. सिद्धांत, सराव आणि प्राप्ती असा या शब्दांचा अनुक्रमे अर्थ आहे. गेल्या 9 वर्षांत भारत या तिन्ही आघाड्यांवर वेगाने आगेकूच करतो आहे. भगवान बुद्धांच्या मूल्यांचा आम्ही सातत्याने प्रसार केला आहे. बुद्धाची शिकवण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी आम्ही समर्पित भावनेने काम केले आहे. 

भारतात आणि नेपाळमध्ये बुद्ध सर्किटचा विकास झाला पाहिजे, सारनाथ आणि कुशीनगरसारख्या तीर्थक्षेत्रांचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ झाला पाहिजे, तसेच भारत आणि आयबीसीच्या सहकार्याने लुंबिनी येथे ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेज’ उभारले गेले पाहिजे आणि भारताच्या या प्रत्येक कामामागे पटिपत्तिची प्रेरणा आहे. भारत प्रत्येक मानवाचे दु:ख हे आपले दु:ख मानतो, हा भगवान बुद्धांच्या शिकवणीचा वारसा आहे. जगातील विविध देशांमधल्या शांततेसाठीच्या मोहिमा असोत किंवा तुर्कस्तानमधील भूकंपासारखी आपत्ती असो, प्रत्येक संकटाच्या वेळी भारत मानवतेच्या बाजूने आपल्या संपूर्ण सामर्थ्यासह उभा राहतो, ममत्वाच्या भावनेने उभा राहतो. आज भारताच्या 140 कोटी जनतेची ही भावना अवघे जग पाहते आहे, समजून घेते आहे आणि स्वीकारतेही आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाचा हा मंच या भावनेला खतपाणी घालतो आहे, असे मी मानतो. हा मंच आपल्यासारख्या सर्व समविचारी आणि समहृदयी देशांना एक कुटुंब म्हणून बौद्ध धर्माचा आणि शांततेचा प्रसार करण्याच्या नव्या संधी प्रदान करेल. वर्तमान आव्हाने आपण कशा प्रकारे हाताळतो याबाबची चर्चा केवळ प्रासंगिक नाही तर अवघ्या जगासाठी आशेचा किरण दाखवरणारी आहे. 

 

समस्यांपासून निराकरणापर्यंतचा प्रवास हा बुद्धाचा प्रवास आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही वैयक्तिक त्रासामुळे बुद्धाने राजवाड्याचा त्याग केला नव्हता. बुद्धाने राजवाड्याचा, राजेशाही थाटमाटाचा त्याग केला होता कारण त्याच्यासाठी सुखसोयी उपलब्ध असल्या तरी इतरांच्या जीवनात दुःख होते. जर आपल्याला अवघ्या जगाला सुखी करायचे असेल, तर संकुचित विचार सोडून स्वत:च्या पलीकडे पाहण्याचा, सर्वांच्या कल्याणाचा बुद्धाचा मंत्र स्वीकारावा लागेल. दारिद्र्याने ग्रासलेल्या आपल्या आजूबाजूच्या लोकांचा विचार करावा लागेल. स्रोतांअभावी पिछाडीवर राहिलेल्या देशांचा विचार करावा लागेल. आणखी चांगले आणि स्थिर जग निर्माण करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे आणि तेच गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक राष्ट्राने, 'ग्लोबल वर्ल्ड इंटरेस्ट' अर्थात देशाच्या हिताबरोबरच जगाच्या हिताला प्राधान्य द्यावे, ही काळाची गरज आहे. 

मित्रहो, 

आजचा काळ हा या शतकातील सर्वात जास्त कसोटीचा काळ आहे, हे सर्वमान्य आहे. आज एकीकडे अनेक महिने दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे, तर दुसरीकडे जग आर्थिक अस्थिरतेचा सामना करते आहे. 

दहशतवाद आणि धार्मिक कट्टरता यासारखे धोके मानवतेच्या आत्म्यावर आघात करत आहेत. संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वावर हवामान बदलासारखे मोठे आव्हान आहे. हिमनद्या वितळत आहेत, सजीव सृष्टी नष्ट होत आहे, प्रजाती नामशेष होत आहेत. मात्र या सर्वांमध्ये तुमच्या आमच्या सारखे कोट्यवधी लोक आहेत ज्यांना बुद्धामध्ये आस्था आहे, प्राणिमात्रांच्या कल्याणात विश्वास आहे. ही आशा, हा विश्वास या पृथ्वीची सर्वात मोठी शक्ती आहे. जेव्हा या आशा एकत्रित होतील, तेव्हा बुद्धाचा धम्म जगाची श्रद्धा बनेल, बुद्धाची अनुभूती ही मानवतेची श्रद्धा बनेल.

 

मित्रांनो,

आधुनिक जगात अशी कोणतीच समस्या नाही, ज्यावर बुद्धांनी शेकडो वर्षांपूर्वी केलेल्या उपदेशात उपाय सांगितलेला नाही. आज जग ज्या युद्ध आणि अशांततेच्या चक्रात सापडले आहे, त्यावर बुद्धांनी कित्येक शतकांपूर्वी उपाय सुचवले आहेत. बुद्धांनी म्हटलं होतं - जयन् वेरन् पसवति, दुक्खन् सेति पराजितो, उपसंतो सुखन् सेति, हित्व जय पराजयः म्हणजेच विजय शत्रुत्वाला जन्म देतो तर पराभूत व्यक्ती देखील व्यथित होतो. म्हणूनच जय - पराजय, लढाई- भांडणं यांचा त्याग करून आपण देखील सुखी होऊ शकतो. भगवान बुद्धांनी युद्ध टाळण्यासाठीच मार्ग देखील कथन केला आहे. भगवान बुद्धांनी म्हटलं आहे - नहि वेरेन् वेरानी, सम्मन तीध उदाचन्, अवेरेन च सम्मन्ति, एस धम्मो सन्नतनो। म्हणजेच शत्रुत्वामुळे - खूप कमी शब्दात गहन अर्थ सांगितला आहे - शत्रुत्वामुळे  शत्रुत्व शांत होत नाही. तर मैत्रीपूर्ण भावनेने शत्रुत्व लयाला जाते. भगवान बुद्धांचे एक वचन असे आहे - सुखा संघस्स सामग्गी, समग्गानं तपो सुखो। म्हणजे संघातील एकात्मतेतच आनंद आहे. सर्व लोकांसह मिळूनमिसळून राहण्यात खरे सुख  आहे.

 मित्रांनो ,

आम्ही पाहतो आहोत, आज आपले विचार, आपली एखाद्या गोष्टीवर असलेली निष्ठा दुसऱ्यावर लादण्याची वृत्ती मोठे संकट ठरू पाहत आहे. मात्र, भगवान बुद्धांनी काय सांगितले होते, भगवान बुद्धांनी  सांगितले होते की - अत्तान मेव पठमन्, पति रूपे निवेसये - म्हणजे प्रथम आपण स्वतः योग्य आचरण करायला हवे, त्यानंतर दुसऱ्याला उपदेश करावा. आधुनिक युगात आपण पहातो की गांधीजी असोत की जगातील अनेक नेते, त्यांना याच तत्वातून प्रेरणा मिळाली आहे. मात्र आपल्याला हे लक्षात ठेवायला हवे की बुद्ध केवळ तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत सांगितले होते की अप्प दीपो भवः म्हणजे हे जे पुढील वाक्य आहे ते तर सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. अप्प दीपो भवः म्हणजे स्वतः स्वतःचा प्रकाश व्हा. आजच्या अनेक प्रश्नांची उत्तरे भगवान बुद्धांच्या या उपदेशात सामावलेली आहेत. म्हणूनच काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रांमध्ये मी मोठ्या अभिमानाने सांगितले होते की भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिले आहेत. जिथे बुद्धाची करुणा आहे, तिथे समन्वय आहे, संघर्ष नाही, शांतता आहे, अशांतता नाही.

 

मित्रांनो ,

बुद्धांचा मार्ग हा भविष्याचा मार्ग आहे, शाश्वत मार्ग आहे. जगाने बुद्धाच्या शिकवणुकीचे  पालन केले असते तर हवामान बदलाच्या  समस्येला  तोंड  द्यावे लागले नसते. गेल्या शतकात काही  देशांनी  इतरांचा आणि भावी  पिढ्यांचा विचार करणे थांबवले, त्‍यामुळे ही समस्या उद्भवली. दशकानुदशके ते या गैरसमजाखाली राहिले की निसर्गाशी केलेल्या या छेडछाडीचा परिणाम त्यांच्यावर होणार नाही. ते देश याचा दोष इतरांवर टाकत राहिले. मात्र भगवान बुद्धांनी धम्मपद मध्ये हे स्पष्ट केले आहे की ज्याप्रमाणे थेंबाथेंबाने घागर भरते, त्याप्रमाणे वारंवार होणाऱ्या चुका विनाशाला कारणीभूत होतात. अशाचप्रकारे थोडा थोडा संचय करणारी विवेकी व्यक्ती पुण्यवान बनते. मानवतेला अशा प्रकारे सावध करून भगवान बुद्धांनी हे देखील सांगितले की  जर आपण चुका सुधारून, निरंतर चांगले कार्य केले तर समस्यांवर नक्कीच उपाय मिळतो. माव-मईंएथ पुण्‍यीअस्, न मन् तन् आग-मिस्सति, उद-बिन्दु-निपातेन, उद-कुम्भोपि पूरति, धीरो पूरति पुण्‍यीअस्, थोकं थोकम्पि आचिनन्।  म्हणजे, कोणत्याही कर्माचे फळ मला मिळणार नाही, असा विचार करून सत्कर्माकडे दुर्लक्ष करू नका. पाण्याचा प्रत्येक थेंब अन थेंब घागर भरतो . त्याचप्रमाणे, एक धीर धरणारा माणूस, हळूहळू संचयित होतो, तो सद्गुणांनी भरलेला असतो.

मित्रांनो,

प्रत्येक व्यक्तीच्या  प्रत्येक कार्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने  या वसुंधरेवर परिणाम होत आहे. आपली जीवनशैली कोणतीही असो, आपण जे काही सेवन करतो, ज्या मार्गांनी प्रवास करतो, प्रत्येक गोष्टीचा प्रभाव पडतो, फरक पडतोच पडतो. प्रत्येकजण हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करू शकतो. जर लोक जागरूक झाले आणि त्यांनी आपली जीवनशैली बदलली तर या मोठ्या समस्येला सुद्धा तोंड देता येईल आणि हा बुद्धाचा मार्ग आहे. बुद्धाच्या प्रेरणेने  प्रभावित झालेल्या भारताने  'मिशन लाइफ’ उपक्रमाचा आरंभ केला आहे. मिशन लाइफ म्हणजे पर्यावरणासाठी जीवनशैली.  हे मिशन देखील बुद्धाच्या प्रेरणांनी प्रभावित आहे, बुद्धांच्या विचारांना पुढे नेत आहे.

मित्रांनो ,

जगाने आज भौतिकवाद आणि स्वार्थी विचारांच्या  व्याख्यांमधून बाहेर पडून ' भवतु सब्ब मंगलम' या तत्वाला आत्मसात करण्याची नितांत गरज आहे. बुद्धाला केवळ प्रतीक बनवायचे नाही तर त्याचे प्रतिबिंब  आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. म्हणूच बुद्धांच्या या वचनाला आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचे आहे. “मा निवत्त, अभि-क्कम”! म्हणजे  Do not turn back. Go forward! आपल्याला पुढे जायचे आहे, आणि पुढे जात राहायचे आहे. मला खात्री आहे की आपण सर्वजण मिळून आपला संकल्प सिद्धीस  नेऊ. यासह, आमच्या निमंत्रणावरून येथे आल्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि या दोन दिवसांच्या चर्चेतून मानवतेला नवा प्रकाश, नवी प्रेरणा, नवे धैर्य, नवी शक्ती मिळेल, या भावनेने मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.

नमो बुद्धाय !

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Double engine govt becoming symbol of good governance, says PM Modi

Media Coverage

Double engine govt becoming symbol of good governance, says PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 डिसेंबर 2024
December 17, 2024

Unstoppable Progress: India Continues to Grow Across Diverse Sectors with the Modi Government