आदरणीय अध्यक्ष महोदय,
नव्या संसद भवनातील हे पहिले आणि ऐतिहासिक अधिवेशन आहे. मी सर्व खासदारांना आणि देशातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
आज नवीन सभागृहातील पहिल्या अधिवेशनात मला प्रथम बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. या नवीन संसद भवनात मी सर्व खासदारांचे मनापासून स्वागत करतो. हा प्रसंग अनेक अर्थांनी अभूतपूर्व आहे. स्वातंत्र्याच्या ‘अमृत काळ ’ ची ही पहाट आहे आणि या नव्या वास्तूत भारत नव्या संकल्पांसह आपले भविष्य घडवण्यासाठी पुढील वाटचाल करत आहे. विज्ञान जगतात चंद्रयान-3 च्या अतुलनीय यशाचा प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली जी 20 चे उत्तम आयोजन ही एक संधी आहे जी जागतिक स्तरावर इच्छित प्रभाव पाडेल. या अनुषंगाने , आजचा दिवस नवीन संसद भवनात आधुनिक भारत आणि आपल्या प्राचीन लोकशाहीची शुभ सुरुवात आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी हा योग जुळून आला हा सुखद योगायोग आहे. श्रीगणेश ही शुभ आणि यशाची देवता आहे. गणेश ही बुद्धी आणि ज्ञानाची देवता देखील आहे. या पवित्र दिवशी, हे होत असलेले उद्घाटन म्हणजे संकल्पापासून सिद्धीकडे दृढ निश्चयाने आणि नव्या आत्मविश्वासाने प्रवासाची सुरुवात आहे.
स्वातंत्र्याच्या ‘अमृत काळात ' आपण नवीन संकल्पना घेऊन पुढे जात आहोत, आणि विशेष म्हणजे आज गणेश चतुर्थी आहे , तेव्हा लोकमान्य टिळकांची आठवण येणे स्वाभाविक आहे. स्वातंत्र्य लढ्यादरम्यान, लोकमान्य टिळकांनी संपूर्ण राष्ट्रात स्वराज्याची भावना जागृत करण्याचे माध्यम म्हणून गणेशोत्सव सुरु केला. लोकमान्य ंटिळकांनी स्वतंत्र भारताची संकल्पना गणेशोत्सवात रुजवली आणि आज गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण त्यांच्या प्रेरणेने पुढे जात आहोत. या निमित्ताने मी सर्व नागरिकांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन करतो.
आदरणीय सभापती महोदय,
आज संवत्सरी पर्व देखील आहे, जी एक उल्लेखनीय परंपरा आहे. हा दिवस क्षमा करण्याचा दिवस देखील मानला जातो. आज ‘मिच्छामी दुक्कडम’ म्हणण्याचा दिवस आहे ,जेव्हा आपण आपल्या कृतीतून, शब्दांतून आणि हेतूंद्वारे जाणून बुजून किंवा नकळत कुणाला दुखावले असेल तर त्याची मनापासून क्षमा मागतो. मी देखील तुम्हा सर्वांना, सर्व खासदारांना आणि सर्व नागरिकांना मनापासून ‘मिच्छामी दुक्कडम’ म्हणतो. आज नव्याने सुरुवात करताना भूतकाळातील कटुता मागे टाकून पुढे जायला हवे. एकतेच्या भावनेने, आपले आचरण आणि आपली वाणी , आपले संकल्प राष्ट्रासाठी आणि प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी ठरले पाहिजेत. ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.
आदरणीय सभापती महोदय,
ही इमारत नवीन आहे, इथले सगळे काही नवीन आहे, सगळी व्यवस्था नवीन आहे आणि सगळे सहकारी नवीन पोशाखात आहेत. सर्व काही नवीन आहे, परंतु या सर्वांमध्ये, भूतकाळ आणि वर्तमान यांना जोडणाऱ्या एका महान वारशाचे प्रतीक देखील आहे. ते काही नवीन नाही; ते जुने आहे . ते स्वातंत्र्याच्या पहिल्या किरणांची साक्ष देते जे आजही आपल्यामध्ये आहेत. हे आपल्याला आपल्या समृद्ध इतिहासाशी जोडते. आणि आज आपण नवीन संसदेत प्रवेश करत आहोत , तेव्हा ते स्वातंत्र्याच्या पहिल्या किरणांची साक्ष देते, जे भावी पिढ्यांना प्रेरणा देईल. हे पवित्र सेंगोल आहे जे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी प्रथम हातात घेतले होते. या सेंगोलसह पंडित नेहरूंनी विधीवत पूजा करून स्वातंत्र्याचा उत्सव सुरू केला होता. म्हणून, हा अत्यंत महत्त्वपूर्ण भूतकाळ या सेंगोलशी जोडलेला आहे. हे तमिळनाडूच्या महान परंपरेचे प्रतीक आहे, तसेच राष्ट्राच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. आणि आज, जो सेंगोल पंडित नेहरूंच्या हाताची शोभा वाढवत होता , तो आपल्या सर्वांसाठी, खासदारांसाठी प्रेरणास्थान बनले आहे. यापेक्षा मोठा अभिमान काय असू शकतो?
आदरणीय अध्यक्ष महोदय,
नवीन संसद भवनाची भव्यताही आधुनिक भारताच्या वैभवाचे प्रतीक आहे. आपले मजूर, अभियंते आणि कामगारांनी यासाठी घाम गाळला आहे आणि कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी अथक परिश्रम घेतले. जेव्हा हे बांधकाम चालू होते, तेव्हा मला अनेकदा या कामगारांना भेटण्याची , विशेषत: त्यांच्या आरोग्याबाबत चौकशी करण्याची संधी मिळाली . अशा आव्हानात्मक काळातही त्यांनी हे भव्य स्वप्न पूर्ण केले. आज, मला वाटते की आपण सर्वांनी त्या कामगार, मजूर आणि अभियंत्यांप्रति मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी, कारण त्यांचे योगदान भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. ही भव्य वास्तू उभारण्यासाठी 30,000 हून अधिक कामगारांनी अथक परिश्रम घेतले आहेत आणि घाम गाळला आहे आणि पुढील अनेक पिढ्यांसाठी हे खूप मोठे योगदान असणार आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
त्या कामगारांप्रती आदर व्यक्त करताना , मला तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की एक नवीन परंपरा सुरू झाली आहे. या सभागृहात एक डिजिटल पुस्तक ठेवण्यात आले आहे. या डिजिटल पुस्तकात त्या सर्व कामगारांचा संपूर्ण परिचय आहे, जेणेकरुन भावी पिढ्यांना कळेल की कोणता कामगार भारताच्या कोणत्या भागातून आला आणि त्यांनी घाम गाळून या भव्य वास्तूत कसा हातभार लावला. ही एक नवीन सुरुवात आहे, एक शुभ सुरुवात आहे आणि आपल्या सर्वांसाठी एक अभिमानास्पद क्षण आहे. या प्रसंगी मी 140 कोटी नागरिकांच्या वतीने आणि लोकशाहीच्या महान परंपरेच्या वतीने या कामगारांना अभिवादन करतो.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
आपल्या देशात नेहमी म्हटले जाते: ‘यद भावं तद भवति’ म्हणजे आपले हेतू आपल्या कृतींना आकार देतात. म्हणजे जसा आपला हेतू आहे, तसे परिणामही आहेत. आपण नव्या इराद्याने नवीन संसदेत प्रवेश केला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपल्यामधील तेच हेतू नैसर्गिकरित्या आपल्याला आकार देत राहतील. इमारत बदलली आहे, आणि मला आपले विचार बदललेले पाहायला आवडेल आणि भावनाही बदललेल्या हव्यात .
संसद ही राष्ट्रसेवेची सर्वोच्च संस्था आहे. हे राजकीय पक्षांच्या हितासाठी नाही तर केवळ राष्ट्राच्या कल्याणासाठी याची निर्मिती केली आहे जशी आपल्या संविधान निर्मात्यांनी कल्पना केली होती. नवीन इमारतीत आपण सर्वांनी राज्यघटनेच्या भावनेचे भान राखत आपली वाणी , विचार आणि आचरण यावर भर दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय, तुम्ही खासदारांच्या वर्तनाबाबत काल आणि आज दोन्ही स्पष्टपणे आणि आडून बोललात . मी तुम्हाला आश्वासन देतो की या सभागृहाचे नेते म्हणून तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. देश आमच्याकडे पाहत असल्याने आम्ही शिस्तीचे पालन करू. आम्ही तुमच्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहोत.
आदरणीय सभापती महोदय,
निवडणुकांना अजून खूप अवकाश आहे आणि तोपर्यंतच्या काळात या संसद भवनात आपल्याला जो वेळ मिळणार आहे त्या काळातील आपली वर्तणूक हे ठरवणार आहे की कोण सत्ताधाऱ्यांच्या जागेवर बसायला योग्य आहे आणि कोण विरोधी जागी. आपली वर्तणूकच ठरवणार आहे की कोणाला सत्ताधारी बाजूला बसायला मिळते आणि कोणाला विरोधकांच्या जागी. येत्या काही महिन्यातच देशाला हा फरक बघता येईल. आणि मला ही खात्री आहे की देश या म्हणजे राजकीय पक्षांच्या वर्तणूकीची चिकित्सा करेल.
आदरणीय सभापती महोदय,
आपल्या शास्त्रांमध्ये म्हटले आहे , ‘संमिच, सब्रता, रुतबा बाचंम बदत म्हणजे आपण सर्वजण एकत्र येऊन आणि आपल्या सर्वांच्या उद्दिष्टपुरतेसाठी सार्थ आणि सुफळ चर्चा करू. इथे आपले विचार वेगवेगळे असतील, चर्चां विविधांगी असतील पण आपले उद्दिष्ट नेहमीच एक असेल म्हणूनच ही एकता टिकवून ठेवण्यासाठी आपण हरतऱ्हेने प्रयत्न करत राहिलं पाहिजे.
आदरणीय सभापती महोदय,
देशाच्या कल्याणाशी निगडित अशा प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी आपल्या संसदेने अगदी तळमळीने काम केले आहे. इथे कोणी कुठल्या गटाचे नाही तर प्रत्येक जण देशासाठी काम करत असतो. मला खात्री आहे की ही नवीन सुरुवात आणि हे वातावरण यासह आपण ही भावना शक्य तेवढी मजबूत करूया आणि येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारे ठरुया. आपण सर्वांनी संसदीय परंपरांना मान द्यायला हवा आणि सभापतींच्या अपेक्षांना पुरे पडायला हवे.
माननीय सभापती महोदय,
समाजात परिणामकारक बदल घडवून आणण्यासाठी लोकशाहीमध्ये राजकारण, धोरणे आणि सत्ता या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अंतराळक्षेत्र असो, क्रीडाक्षेत्र असो, स्टार्टअप्स असो किंवा स्वयं सहायता गट कोणत्याही क्षेत्रात भारतीय महिला किती सक्षम आहेत याला संपूर्ण जग साक्षी आहे. जी 20 अध्यक्षपद आणि स्त्री- केंद्रीत विकासावरची चर्चा याची जगभरातून दखल घेतली गेली आणि स्वागतही केले गेले. महिलांच्या विकासाबाबत नुसताच बोलघेवडेपणा पुरेसा नाही हे जग ओळखून आहे. आपल्याला मानवी विकासाच्या प्रवासात नवनवीन टप्पे गाठायचे असतील आणि राष्ट्राला विकासाच्या प्रवासात नवीन मुक्कामावर पोहोचायचे असेल तर आपण स्त्री केंद्रित विकास स्वीकारणे आवश्यक आहे. जी 20 मधील भारताच्या दृष्टिकोनाचा स्वीकार जगाने केला आहे.
स्त्री सक्षमीकरणाच्या आपल्या योजनांपैकी प्रत्येक योजना ही स्त्री नेतृत्वाकडे टाकलेले अर्थपूर्ण पाऊल ठरते. आर्थिक समावेश हे उद्दिष्ट मनात धरून आम्ही जनधन योजना सुरू केली. या योजनेच्या 50 करोड पेक्षा अधिक लाभार्थ्यांपैकी जास्तीत जास्त खातेधारक या महिला आहेत. ही बाब खरे तर एक लक्षणीय बदल आहे आणि नवीन विश्वास देखील. मुद्रा योजना सुरू झाली तेव्हा कोणत्याही हमी शिवाय बँक दहा लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देत होती याचा विश्वास देशाला वाटला होता आणि याच्याही बहुसंख्य लाभार्थी महिलाच आहेत. स्त्री नवोद्योजकांच्या उत्कर्षाच्या वातावरणाचा अनुभव संपूर्ण देशाने घेतला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत सुद्धा मालमत्तेच्या कागदपत्रांचे नोंदणीकरण जास्तीत जास्त महिलांच्या नावावर झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्याकडे मालमत्तेचा मालकी हक्क आला.
माननीय सभापती महोदय,
प्रत्येक राष्ट्राच्या विकासाकडे होत असलेल्या प्रवासात अनेक क्षण असे येतात जेव्हा आपण नवीन इतिहास घडवला असे अभिमानाने म्हणता येते.
आणि सभापती महोदय,
नवीन सदनाच्या पहिल्या सत्रात उद्घाटनपर भाषणात मी मोठ्या आत्मविश्वासाने आणि अभिमानाने सांगत आहे की आजचा हा क्षण, हा गणेश चतुर्थीचा संवत्सर म्हणजे इतिहास घडवणारा आहे. अनेक वर्षापासून स्त्रियांसाठीच्या आरक्षणावरून चर्चा , वादविवाद घडत आहेत. संसदेत महिला आरक्षणासाठी अनेक प्रयत्न केले गेले. या विषयाशी संबंधित पहिले विधेयक 1996 मध्ये मांडले गेले. अटलजींच्या कार्यकाळात महिला आरक्षण विधेयक अनेकदा मांडले गेले पण ते मंजूर होण्यासाठीचे संख्याबळ आम्ही जमवू शकलो नाही आणि परिणामी ते स्वप्न अपुरे राहिले. महिलांना हक्क मिळवून देणे , त्यांच्याकडे सत्ता सोपवणे हे उदात्त कार्य घडवून आणण्यासाठी कदाचित देवाने माझी निवड केली आहे.
पुन्हा एकदा ह्या दिशेने आमच्या सरकारने पाऊल टाकले आहे. अगदी कालच महिला आरक्षणासंबंधीचे विधेयक मंत्रिमंडळात मंजूर झाले आहे. म्हणूनच आज 19 सप्टेंबर हा दिवस इतिहासात अमर झाला आहे. आत्ताच्या काळात जेव्हा स्त्रिया भरधाव प्रगती करत आहेत, प्रत्येक क्षेत्रात नेतृत्वाची भूमिका बजावत आहेत अशावेळी आमच्या माता भगिनी, आमच्या सत्तेतील महिला सहकारी यांनी धोरण निर्मिती आणि धोरण राबवणे यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे. त्यांनी फक्त सहभागी होणे पुरेसे नाही तर महत्त्वाची भूमिका बजावायला हवी.
आज या ऐतिहासिक क्षणी नवीन संसद भवनाच्या इमारतीतील पहिली कृती अशी आहे की आपण देशात परिवर्तनाचे नवे युग सुरू करत आहोत आणि देशातील स्त्री शक्तीला नवीन दारे उघडून दिली आहेत. अशी नवीन द्वारे सर्व संसद सदस्यांनी उघडायला हवीत. या महत्त्वाच्या निर्णयाशी सुसंगती राखत आमचे सरकार आपल्या स्त्री केंद्री विकासाशी असलेल्या कटीबद्धतेच्या मार्गाने पुढे जात आज एक महत्त्वाचे घटनात्मक सुधारणा विधेयक मांडत आहे.
संसदेत तसेच राज्यांच्या विधिमंडळात स्त्रियांचा सहभाग अजून वाढवणे हे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे. नारी शक्ती वंदन अधिनियमातून आपली लोकशाही अधिक बळकट आणि अधिक शक्तिशालीसुद्धा होईल.
या नारीशक्ती वंदन विधेयकाबद्दल माझ्या माता , भगिनी आणि या देशाच्या लेकींचे मी मनापासून अभिनंदन करतो. हे विधेयक कायद्यात रूपांतरित होईल यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत अशी खात्री मी सर्व माता भगिनी आणि लेकींना देतो. या सदनातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना माझे कळकळीची विनंती आहे की आपण या शुभप्रसंगी नवीन सुरुवात करत आहोत, एक पवित्र पाऊल पुढे टाकत आहोत अशावेळी हे विधेयक कायद्यात परावर्तित होण्यासाठी हीच शक्ती कित्येक पटीने वाढवावी. म्हणूनच या विधेयकाचा मार्ग सुलभ करण्यासाठी दोन्ही सदनातील सर्व मान्यवर सदस्यांनी एकत्रितपणे दिलेल्या सहकार्याबद्दल मी त्याचे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. या नवीन सदनाच्या पहिल्या सत्रात मला माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे