“भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्प आणि निश्चयासह आपण नव्या संसद भवनात चाललो आहोत”
“संसदेतील मध्यवर्ती सभागृह आपल्याला कर्तव्य पालनाची प्रेरणा देते”
“भारत नव्या ऊर्जेने भारलेला आहे, आपली वेगाने वाढ होत आहे”
“नव्या आकांक्षांसह नव्या कायद्यांची निर्मिती आणि कालबाह्य कायदे रद्द करणे ही संसदेच्या सदस्यांची सर्वोच्च जबाबदारी आहे”
“अमृत काळात आपल्याला आत्मनिर्भर भारत साकारायचा आहे”
“प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षा लक्षात घेऊन त्यानुसार आपल्याला सुधारणा घडवून आणायच्या आहेत”
“भारताने आता विशाल मंचावर कार्यरत व्हायचे आहे. लहान बाबींमध्ये गुंतून राहण्याचा काळ गेला”
“जी20 दरम्यान भारत ग्लोबल साऊथचा आवाज - जगन्मित्र बनला आहे”
“आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाची सिद्धी आपल्याला करायची आहे”
“संविधान सदन आपल्याला मार्गदर्शन करत राहील आणि संसदेचा भाग राहिलेल्या महान व्यक्तिमत्वांच्या स्मृती आपल्या मनात जागृत ठेवणार आहे”

आदरणीय उपराष्ट्रपती महोदय!

आदरणीय सभापती महोदय! 

व्यासपीठावर उपस्थित आदरणीय ज्येष्ठ मान्यवर आणि देशातील 1.4 अब्ज नागरिकांचे प्रतिनिधीत्व करणारे सर्व सन्माननीय संसद सदस्य गण.

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी तुम्हाला आणि संपूर्ण देशाला हार्दिक शुभेच्छा देतो. आज, नवीन संसद भवनात आपण एकत्रितपणे उज्वल भविष्याच्या दिशेने एक नवीन प्रवास सुरू करत आहोत. आज, नवीन इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी आम्ही विकसित भारताप्रती आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करत आहोत आणि पूर्ण समर्पण तसेच दृढनिश्चयाने हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वतःला समर्पित करत आहोत. माननीय सदस्यांनो, ही इमारत आणि विशेषतः हे केंद्रीय सभागृह आपल्या भावनांनी ओतप्रोत आहे. हे सभागृह गहन भावना जागृत करते आणि सोबतच आम्हाला आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित देखील करते. स्वातंत्र्यापूर्वी, ही वास्तू एक प्रकारचे वाचनालय म्हणून वापरली जात होते. परंतु स्वातंत्र्यानंतर, ती संविधान सभांच्या सभांचे ठिकाण बनली. इथेच आयोजित बैठकांमध्ये आपल्या राज्यघटनेवर बारकाईने विचार केला गेला आणि आजच्या संविधानाने आकार घेतला. याच वास्तूत ब्रिटिश सरकारने भारताकडे सत्ता हस्तांतरित केली. या हस्तांतरणाचा केंद्रीय सभागृह साक्षीदार आहे. याच केंद्रीय सभागृहात भारतीय तिरंग्याला स्विकृती देण्यात आली आणि आपले राष्ट्रगीत स्वीकारण्यात आले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दोन्ही सभागृहे या केंद्रीय सभागृहात अनेक ऐतिहासिक प्रसंगी चर्चा करण्यासाठी, सहमती दर्शवण्यासाठी आणि भारताच्या भविष्याला आकार देणारे निर्णय घेण्यासाठी एकत्र आली आहेत.

 

या केंद्रीय सभागृहात 1952 पासून आजवर जगभरातील जवळपास 41 राष्ट्रप्रमुखांनी आपल्या माननीय संसद सदस्यांना संबोधित केले आहे. आपल्या राष्ट्रपतींनी 86 वेळा या सभागृहाला संबोधित केले आहे. गेल्या सात दशकांत ज्यांनी या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत त्यांनी अनेक कायदे, अनेक दुरुस्त्या आणि अनेक सुधारणा केल्या आहेत. आतापर्यंत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी एकत्रितपणे सुमारे 4,000 कायदे मंजूर केले आहेत. आणि जेव्हा ते आवश्यक वाटले तेव्हा हुंडाविरोधी कायदा असो, बँकिंग सेवा आयोग विधेयक असो किंवा दहशतवादाशी लढा देणारा कायदा असो अशा कायद्यांना संयुक्त अधिवेशनाद्वारे कायदे संमत करण्याची रणनीती आखण्यात आली. याच सभागृहातील संयुक्त अधिवेशनात हे सर्व कायदे पारित करण्यात आले. याच संसदेत, जेव्हा आपल्या मुस्लिम बहिणी आणि मुलींवर अन्याय होत होता आणि शाहबानो प्रकरणामुळे परिस्थिती गंभीर वळणावर पोहोचली होती, तेव्हा या सभागृहाने त्या चुका सुधारल्या आणि तिहेरी तलाकविरोधात कायदा संमत केला. गेल्या काही वर्षांत संसदेने तृतीय पंथी व्यक्तींना न्याय देण्यासाठी कायदेही केले आहेत. आदर आणि सन्मानाच्या भावनेनेसह तृतीय पंथींना सन्मानाने रोजगार, शिक्षण, आरोग्यसेवा आणि इतर सुविधा मिळतील हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही काम केले आहे. आपल्या दिव्यांग नागरिकांच्या गरजा आणि आकांक्षा लक्षात घेऊन त्यांच्या उज्वल भविष्याचा मार्ग मोकळा करणारे कायदेही आम्ही पारित केले आहेत. कलम 370 हटवल्याबद्दल, कदाचित असे एक दशक राहिले नसेल ज्यात या सभागृहात आणि बाहेर या कलमासंदर्भात चर्चा, चिंता, मागणी आणि संताप व्यक्त केला गेला नसेल. परंतु आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही याच सभागृहात कलम 370 मधून स्वातंत्र्य मिळवले, जे फुटीरतावाद आणि दहशतवादाच्या विरोधात एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आणि या महत्त्वाच्या प्रयत्नात संसदेच्या माननीय सदस्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेली आणि याच सभागृहात जम्मू-काश्मीरसाठी तयार केलेली राज्यघटना हा एक अमूल्य दस्तऐवज आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जेव्हा या राज्यघटनेची अंमलबजावणी झाली तेव्हा या मातीला सलाम करावासा वाटला.

आज, जम्मू आणि काश्मीर शांतता तसेच विकासाच्या मार्गासाठी कटिबद्ध आहे आणि जम्मू आणि काश्मीरमधील लोक नवीन उत्साह, नवी उमेद आणि नव्या निर्धाराने भारलेले आहेत आणि ते पुढे जाण्याची एकही संधी सोडू इच्छित नाहीत. यावरून संसद भवनातील संसद सदस्यांनी किती महत्त्वाचे काम पार पाडले आहे, यांची प्रचिती येते. माननीय सदस्यांनो, मी लाल किल्ल्यावरून म्हटल्याप्रमाणे, हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे. एकामागून एक घडणाऱ्या घटना पाहिल्या तर भारत आज नव्या चेतनेने जागा झाला आहे. याची प्रत्येक घटना साक्ष देते. भारत नवीन उर्जेने भरलेला आहे आणि ही जाणीव, ही नवीन ऊर्जा या देशातील करोडो लोकांच्या स्वप्नांचे संकल्पांमध्ये रूपांतर करू शकते तसेच कठोर परिश्रमाने त्या संकल्पांची पूर्ती करु शकते. हे घडताना आपण पाहू शकतो. आणि मला विश्वास आहे की देश ज्या दिशेने जात आहे त्या दिशेने अपेक्षित परिणाम नक्कीच मिळतील. आपण जितक्या वेगाने पुढे जाऊ तितक्या लवकर आपण परिणाम साध्य करू.

 

आज भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. पण आघाडीच्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये पोहोचण्याच्या निर्धाराने देश प्रगती करत आहे. मी ज्या पदावर आहे त्या स्थानावरून मला मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि जागतिक स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तींशी झालेल्या माझ्या संभाषणांच्या आधारे, मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की आपल्यापैकी काही जण निराश होऊ शकतात. मात्र, भारत अव्वल तीन अर्थव्यवस्थांमध्ये सामिल होईल, अशी जगाला खात्री आहे. भारताचे बँकिंग क्षेत्र आपल्या ताकदीमुळे पुन्हा एकदा जगात सकारात्मक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. भारताचे आदर्श प्रशासकीय प्रारुप, यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) आणि डिजिटल स्टेक जगभरात प्रशंसनीय ठरले आहेत. मी हे नवी दिल्लीतील जी-20 शिखर परिषदेत पाहिले आणि बालीमध्येही पाहिले. तंत्रज्ञानाच्या जगात भारताची तरुणाई ज्या प्रकारे प्रगती करत आहे तो केवळ कुतूहलाचाच नाही तर संपूर्ण जगासाठी आकर्षणाचा  विषय आहे. अशा युगात आपण आहोत. मी म्हणेन की आपण भाग्यवान लोक आहोत. या भाग्यशाली काळात आपल्याला काही जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली आहे आणि आपले सर्वात मोठे भाग्य म्हणजे आज भारतातील लोकांच्या आकांक्षा अशा उंचीवर आहेत ज्या कदाचित गेल्या हजार वर्षांत पोहोचल्या नव्हत्या. गुलामगिरीच्या साखळदंडांनी त्या आकांक्षा दडपल्या होत्या, त्या भावना चिरडल्या होत्या, पण स्वतंत्र भारतात सामान्य माणूस आपल्या स्वप्नांची जोपासना करत होता, आव्हानांशी झगडत होता आणि आता तो इथपर्यंत पोहोचला होता, त्याला इथेच थांबायचे नाही. त्याला महत्त्वाकांक्षी समाजासोबत नवीन ध्येये निश्चित करायची आहेत. जेव्हा महत्त्वाकांक्षी समाज स्वप्ने जोपासतो, संकल्प करतो, तेव्हा संसद सदस्य या नात्याने नवीन कायदे तयार करून आणि कालबाह्य कायद्यांपासून मुक्ती मिळवून उज्ज्वल भविष्याचा मार्ग मोकळा करणे हे आपल्या सर्वांचे विशेष कर्तव्य आहे. आपण संसदेत तयार केलेला प्रत्येक कायदा, संसदेत केलेली प्रत्येक चर्चा, संसदेतून पाठवलेला प्रत्येक संकेत हा भारतीय आकांक्षा वाढवणारा असला पाहिजे. हीच आमची भावना, आमचे कर्तव्य आणि प्रत्येक नागरिकाची आमच्याकडून अपेक्षा आहे. आम्ही ज्या काही सुधारणा करतो त्यामध्ये भारतीय आकांक्षांना सर्वोच्च प्राधान्य असायला हवे. पण मी काळजीपूर्वक विचार करून सांगू इच्छितो की कोणीही लहान कॅनव्हासवर मोठे चित्र रंगवू शकत नाही? लहान कॅनव्हासवर जसे मोठे चित्र रंगवता येत नाही, त्याचप्रमाणे आपण आपल्या विचारांचा कॅनव्हास वाढवू शकलो नाही तर गौरवशाली भारताचं चित्र रंगवू शकणार नाही. आम्हाला 75 वर्षांचा अनुभव आहे. आपल्या पूर्वजांनी जो मार्ग चोखाळला त्यावरून आपण धडा घेतला आहे. आपल्याकडे समृद्ध वारसा आहे. माझ्या मित्रांनो या वारशाच्या साथीने जर आपली स्वप्ने आपल्या दृढनिश्चयाशी जुळली, आपल्या विचारांची व्याप्ती विस्तारली, आपण आपला कॅनव्हास मोठा केला, तर आपणही भारताची भव्य प्रतिमा चित्रित करू शकू, भारताची रूपरेषा बदलू शकू, त्यात विकासाचे रंग भरू शकू आणि भारत मातेच्या कृपेने भावी पिढ्यांना आपण सक्षम बनवू शकू.

या  पुढील अमृतकाळा च्या  25 वर्षांत भारताने एका मोठ्या पटलावर (व्यापक) काम केले पाहिजे.  किरकोळ समस्यांना मागे सारुन पुढे जाण्याची वेळ आली आहे.  भारताला स्वावलंबी बनवणे हे आपले प्राथमिक ध्येय असले पाहिजे.  हा प्रवास आपल्या स्वतःपासून सुरू होतो; तो प्रत्येक व्यक्तीपासून सुरू होतो.  आजच्या जगात, एक काळ असा होता जेव्हा लोक मला म्हणायचे की मोदी जेव्हा आत्मनिर्भरतेबद्दल बोलतात, तेव्हा बहुपक्षीयतेला (इतर देशांशीही आपले व्यवहार-व्यापार निगडीत असणे)आव्हान निर्माण होऊ शकते.  ते म्हणायचे जागतिक अर्थशास्त्राच्या दृष्टीने हे योग्य नाही.  मात्र, पाच वर्षांत जगाने भारताच्या स्वावलंबी आचरणाची दखल घेतली, जगासाठी हा कुतुहलाचा विषय झाला हेही आपण पाहिले आहे.  संरक्षण क्षेत्र, ऊर्जा क्षेत्र आणि खाद्यतेलामध्ये आपण स्वावलंबी व्हावे असे भारतातील कोणाला आवडणार नाही?  आपण म्हणतो की आपला देश कृषिप्रधान आहे. मग  देश खाद्यतेलाची आयात सुरू ठेवणार का?  आत्मनिर्भर भारताची मागणी फार पूर्वीपासून आहे.  ही आपली सामुहीक जबाबदारी आहे, पक्षीय राजकारणा पलिकडे, इतर कोणत्याही गोष्टींच्या वर आहे, ती अंत:करणापासून आहे आणि ती राष्ट्रासाठी आहे.

आता आपल्याला उत्पादन क्षेत्रात जगात सर्वोत्तम बनण्याच्या दिशेने पावले टाकण्याची गरज आहे.  'शून्य दोष, शून्य दुष्परिणाम' हे आपले ध्येय असले पाहिजे, असे मी लाल किल्ल्यावरून एकदा सांगितले होते.  आपल्या उत्पादनांमध्ये कोणतेही दोष नसावेत आणि आपल्या उत्पादन प्रक्रियेचा पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये.  जागतिक उत्पादन क्षेत्रातील या शून्य दोष, शून्य दुष्परिणामाचा दृष्टिकोन अंगी बाळगण्याची आपल्याला आस असली पाहिजे.  आपले उत्पादन रचनाकार, इथे उत्पादीत होणारी उत्पादने, आपले सॉफ्टवेअर, आपली कृषी उत्पादने आणि आपली हस्तकला—प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जा गाठण्याचा, त्यापेक्षाही आपला दर्जा उत्कृष्ट राखण्याचा आपल्याला ध्यास असायला हवा.  तरच आपण जगात आपला झेंडा अभिमानाने उंचच उंच फडकवू शकतो.  माझ्या गावात, माझ्या राज्यात सर्वोत्तम असणे पुरेसे नाही.  आपले सर्वोत्तम आपल्या देशापुरतेच मर्यादीत राहता कामा नये.  आपले उत्पादन जगातील सर्वोत्तम असावे  हीच भावना आपण जोपासण्याची गरज आहे.  आपली विद्यापीठे जगातील अव्वल दर्जाच्या विद्यापीठांमध्ये असायला हवीत.  आता या क्षेत्रात मागे राहण्याची गरज नाही.  आपल्याला एक,  मोकळीक देणारे, खुलेपणाला प्रोत्साहन देणारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्राप्त झाले आहे  आणि त्याला सर्वानुमते मान्यताही मिळाली आहे. या नव्या शिक्षण धोरणाच्या बळावर आपण आता पुढे जायला हवे आणि जगातील सर्वोच्च विद्यापीठांचा एक भाग बनायला हवे.  नुकत्याच झालेल्या जी-20 शिखर परिषदेदरम्यान मी जागतिक नेत्यांना नालंदाचे चित्र दाखवले.  1500 वर्षांपूर्वी जगातील सर्वोत्तम विद्यापीठ माझ्या देशात होते असे मी त्यांना सांगितले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले.  त्या इतिहासापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे, मात्र ही प्रेरणा आता प्रत्यक्ष कृतीतही उतरली पाहिजे.  हा आपला निर्धार आहे.

 

आज आपल्या देशातील युवक-युवती क्रीडा जगतात आपले नाव कमावत आहेत.  देशातील स्तर-2 आणि स्तर-3 शहरांतील, खेड्यापाड्यांमधील  गरीब कुटुंबातली तरुण मुले-मुली क्रीडा जगतात चमकत आहेत. मात्र आता आपल्या देशाची ही इच्छा आहे आणि असा संकल्प आपण करायला हवा की प्रत्येक क्रीडा स्पर्धांमध्ये, प्रत्येक क्रीडा प्रकारात  आपला तिरंगा उंचच उंच  फडकवायचा आहे.  आपण आता आपले संपूर्ण लक्षं क्रीडा गुणवत्तेवर केंद्रीत केले पाहिजे, जेणेकरुन आपण केवळ जगाच्या क्रीडाविषयक अपेक्षाच नव्हे तर चांगल्या दर्जाचे जीवन लाभावे ही  सर्वसामान्य भारतीयांना असलेली आकांक्षा देखील पूर्ण करू शकू.  मी म्हटल्याप्रमाणे,  आपल्या समाजाची महत्त्वाकांक्षा जागृत होत असतानाच  काम करायला मिळणे हे आपले भाग्य आहे.  भारत हा तरुणांचा देश असणे हे देखील आपले भाग्य आहे.  जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आपल्याकडे आहे, परंतु आपल्यासाठी आणखी एक नशीबाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्याही आहे.  देशाला ही युवाशक्ती लाभणे, देशात ही युवा क्षमता असणे,  आपल्यात दृढ आत्मविश्वास निर्माण करते.  त्यांचा निर्धार- जिद्द, धैर्यावर आपला विश्वास आहे आणि म्हणूनच देशातील तरुणांनी जगात आघाडीवर राहावे अशी आपली इच्छा आहे.  हे वास्तवात उतरले पाहिजे.  आज जगाला कुशल मनुष्यबळाची नितांत गरज आहे आणि भारत स्वतः हे मनुष्यबळ तयार करून ही गरज भागवू शकतो आणि जगात आपला ठसा उमटवू शकतो.  त्यामुळे जगाला कोणत्या प्रकारच्या मनुष्यबळाची गरज आहे, त्यांना कोणत्या प्रकारच्या मानवी क्षमतांची आवश्यकता आहे, या अनुषंगाने  स्किल मॅपिंग म्हणजे कौशल्य आरेखनाच्या नियोजनाचे  काम सुरू असून, आपण देशातील कौशल्य विकासावर भर देत आहोत.  आपण कौशल्य विकासावर जितका जास्त भर देऊ तितका आपला युवावर्ग जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करुन दाखवेल.  भारतीय माणूस जिथे जातो तिथे आपल्या चांगुलपणाची छाप, कर्तृत्वाचा वारसा सोडून जातो.  ही क्षमता आपल्यात जन्मजात आहे आणि आपल्या आधी जगात सर्वत्र गेलेल्या भारतीयांनी ही प्रतिमा निर्माण केली आहे.  तुमच्या लक्षात आले असेल की अलीकडेच आम्ही जवळपास 150 नर्सिंग कॉलेज (शुश्रुषा प्रशिक्षण महाविद्यालये) एकाच वेळी उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

 

जगात आज नर्सिंगची मोठी गरज आहे.  आपल्या भगिनी, कन्या आणि पुत्र या क्षेत्रात अव्वल स्थानी पोहोचू शकतात, ते सहजपणे जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवू शकतात आणि संपूर्ण जगाला याची गरज आहे.  ही गरज पूर्ण करणे हे मानवतेच्या नात्याने आपले कर्तव्य आहे आणि आपण यात नक्कीच कमी पडणार नाही.  आज आपण देशाला असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या मोठ्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत आणि जागतिक गरजांमध्येही आपण योगदान देऊ शकतो.  मुद्दा असा आहे की, आपण प्रत्येक लहान सहान  बाबींवर भर देऊन, त्यावर आपले प्रयत्न केंद्रीत करून पुढे जाणे आवश्यक आहे.  आपण भविष्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.  आपण  निर्णय घ्यायला उशीर करता कामा नये.  आपण राजकीय फायद्या-तोट्याच्या गणितांमध्ये, समीकरणांमध्ये अडकून पडता कामा नये. राष्ट्राच्या महत्वाकांक्षांसाठी नवे निर्णय घेण्याचे धैर्य आपल्यात असले पाहिजे.  आज, यशस्वी ठरलेली सौर ऊर्जा चळवळ आपल्या भावी पिढ्यांसाठी ऊर्जा स्वयंपूर्णतेची हमी देत ​​आहे.  'मिशन हायड्रोजन' बदलत्या तंत्रज्ञानासह पर्यावरणाच्या चिंतेचे निराकरण करते आणि उपाययोजनाही सुचवते.  जसे आपले जीवन चालविण्यासाठी हृदय आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आज आपले तंत्रज्ञान, चिप्स शिवाय चालू शकत नाही आणि त्यासाठी सेमीकंडक्टर अत्यंत आवश्यक आहे.  त्या दिशेने आपण पुढे जायला हवे आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनात आपली प्रगती रोखू पाहणारे कोणतेही अडथळे दूर होतील हे पाहण्यासाठी आम्ही व्यापकपणे काम करत आहोत. आपल्या भावी पिढ्यांसमोरील चिंता दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवर उपलब्ध करून देणारे 'जल जीवन मिशन' सुरू आहे.  आपल्या मुलांना आणि त्यांच्या मुलांना पाण्याअभावी कधीही त्रास सहन करावा लागू नये अशी आमची इच्छा आहे.  स्पर्धात्मक ताकदीसह जागतिक बाजारपेठेत आपल्या उपस्थितीची दखल ठळकपणे घेतली जाण्यासाठी, आपली लॉजिस्टिक (मालवाहतूक) व्यवस्था आणखी किफायतशीर आणि कार्यक्षम व्हावी म्हणून  त्या अनुषंगाने अनेक धोरणे आपण तयार करत आहोत. ज्ञानाधिष्ठित नवोन्मेषावर आधारीत भारत निर्माण करणे ही आज काळाची मागणी, गरज आहे.  आणि जगात आघाडीवर राहण्याचा हाच मार्ग आहे.  त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबरोबरच तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी आम्ही संशोधन आणि नवोन्मेषासाठी कायदाही केला आहे.  चंद्रयान-3 च्या यशानंतर युवावर्गाच्या मनात विज्ञानाविषयी आकर्षण वाढत आहे.  ही संधी आपण गमावता कामा नये.  आपण आपल्या तरुण पिढीला संशोधन आणि नवनिर्मिती-नवोन्मेषाची प्रत्येक संधी उपलब्ध करून दिली पाहिजे.  ही परिसंस्था निर्माण करण्यासाठी आम्ही उज्ज्वल भविष्याचा पाया रचला आहे.

आदरणीय बंधूंनो,

सामाजिक न्याय, ही आमची पहिली अट आहे. सामाजिक न्यायाशिवाय, संतुलनाअभावी, समभाव नसताना, समत्व नसताना आपल्याला  इच्छित परिणाम घरामध्ये मिळू शकत नाहीत. परंतु सामाजिक न्यायाची चर्चा खूपच मर्यादित बनली आहे. आपल्याला त्याला व्यापक रूप दिले पाहिजे. आम्ही एखाद्या गरीबाला काही सुविधा दिल्या, एखाद्या समाजामध्ये दबून गेलेल्या,  पिचलेल्या व्यक्तीला काही सुविधा दिल्या तर, ती एक सामाजिक न्यायाची प्रक्रिया आहे. मात्र त्याच्या घरापर्यंत पक्का रस्ता बनवण्यात आला तर त्यामुळेही सामाजिक न्यायाला अधिक बळकटी आणणारी ती गोष्ट ठरते. त्याच्या घराजवळच्या मुलांसाठी जर शाळा सुरू केली तर ती सुद्धा गोष्ट सामाजिक न्यायाला बळकटी देते. त्याला जर कोणताही खर्च न करता, आरोग्यविषयक सुविधा गरजेच्या वेळी मिळू शकत असतील, तर त्यावेळी सामाजिक न्यायाला बळकटी मिळते. आणि म्हणूनच ज्या प्रकारे समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक न्यायाची आवश्यकता आहे, त्याच प्रकारे राष्ट्र व्यवस्थेमध्ये सामाजिक न्यायाची आवश्यकता आहे. आता देशाचा कोणताही भाग- हिस्सा मागे राहिला, अविकसित राहिला तर ती गोष्टही सामाजिक न्यायाच्या विरोधात असणार आहे. दुर्दैवाने देशाचा पूर्व भाग, भारताचा पूर्व भाग, ज्या भागामध्ये नैसर्गिक समृद्धी भरभरून आहे, तरीही तिथल्या युवकांना रोजगारासाठी दुस-या राज्यांमध्ये जावे लागत आहे, ही स्थिती आपण बदलली पाहिजे. आपल्या  देशामध्ये त्या पूर्व भागातील क्षेत्राला समृद्ध बनवून सामाजिक न्यायाच्या दृष्टीने बळकटी आपण आणली पाहिजे. असंतुलित विकास, म्हणजे, शरीर कितीही स्वस्थ, आरोग्यपूर्ण असले तरीही, जर एखाद्याच बोटाला लकवा झाला आणि  ते लुळे पडले तर ते शरीर काही सुदृढ, आरोग्यपूर्ण आहे, असे मानता येणार नाही. भारत कितीही समृद्ध असो, मात्र त्यांचे एखादे अंग दुर्बल पडले तर तो भारत समृद्धीच्या दृष्टीने पीछाडीवर आहे, असे मानले जाईल आणि म्हणूनच आपल्याला सर्वांगीण विकासाचा  मार्ग स्वीकारून सामाजिक न्यायाला तितकीच उंची प्राप्त करण्याच्या दिशेने पुढे गेले पाहिजे. मग तो पूर्व भारत असो किंवा ईशान्य भारत असो, आपल्याला त्या सर्व गोष्टी प्राप्त कराव्या लागतील.  त्यासाठी आपण स्वीकारलेली रणनीती कितीतरी  यशस्वी झाली आहे.  100 आाकांक्षित जिल्ह्यांमध्ये विशेष लक्ष देवून आम्ही काम केले आहे. नवयुवा अधिकारी मंडळींवर या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली. रणनीती बनवली गेली. आज संपूर्ण जगामध्ये या मॉडलची चर्चा होत आहे. आणि आज देशाच्या कानाकोप-यातले जे 100 जिल्हे विकास कामांमध्ये पीछाडीवर आहेत, असे मानले जात होते, जे जिल्हे म्हणजे, विनाकारण ओझे बनले आहेत, असे मानले जात होते, त्यांच्या बाबतीत आज अशी स्थिती बनली आहे की, ते 100 जिल्हे आता आपआपल्या राज्यांमध्ये आघाडीवर आहेत. राज्याच्या सरासरी विकास निर्देशांकापेक्षाही या जिल्ह्यांचा विकास दर जास्त आहे. या जिल्ह्यांनी राज्यांची सरासरी ओलांडली आहे. आणि हे यश पाहून सामाजिक न्यायाची भावना बळकट करून 100 जिल्ह्यांमध्ये याही पुढे जावून जमिनी स्तरावर जाण्यासाठी 500 ब्लॉकपर्यंत आकांक्षित जिल्हे ब्लॉकच्या माध्यमातून चिह्नीत करून त्यांना बळकटी आणण्याचे काम केले जात आहे. आणि मला विश्वास आहे की,  हे आकांक्षित ब्लॉक्स म्हणजे, विकासाचे एक नवीन मॉडल बनवतील.  एकप्रकारे देशाच्या विकासाचे एक नवीन ऊर्जा केंद्र बनण्याची शक्यता, क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आणि त्या दिशेनेही आपण पुढे जात आहोत.

 

माननीय संसद सदस्यांनो,

आज संपूर्ण विश्वाचे लक्ष भारताकडे लागले आहे. शीत युद्धाच्या काळात आपली ओळख अलिप्ततावादी देश अशी राहिली आहे. ज्या काळातून आपण जात होतो,  त्या काळामध्ये तशी ओळख तयार करण्याची आवश्यकताही  होती. त्यामुळे  लाभ होणार होते, आणि म्हणूनच त्या काळामध्ये अलिप्ततावादी देश म्हणून राहण्याची  आवश्यकता नक्कीच असणार. परंतु आता भारताचे वेगळेच स्थान बनले आहे.   आज आम्ही असे धोरण घेवून वाटचाल करीत आहोत. ज्या धोरणाने  आपल्याला   एक वेगळी ओळख मिळणार आहे. आता आम्ही  ‘विश्वमित्र’ म्हणजे संपूर्ण विश्वाचे मित्र या  रूपामध्ये पुढे जात आहोत. आम्ही सगळ्या जगाबरोबर मैत्री करीत आहोत. आणि जगही  आमच्यामध्ये मित्र शोधत आहे. विश्वामध्ये भारताने आणखी अंतर ठेवायचे  नाही,  तर शक्य तितक्या जवळ जाण्याच्या मार्गाने जावून, सर्वांच्या जवळ जाण्याचा पथ स्वीकारून, आम्ही आपली ‘विश्वमित्र‘ भावना  जपली.  आणि यामार्गाने आज यशस्वीतेने आम्ही पुढे जात आहोत. आणि मला असे वाटते की, याचा लाभ आज भारताला  होत आहे. भारत आज  संपूर्ण जगासाठी एक स्थिर पुरवठा शृंखलेच्या रूपाने उदयीत होत आहे. आणि आज विश्वाची ही गरज आहे. आणि अशा प्रकारे आवश्यकतांची पूर्तता करण्याचे काम भारताने जी-20 मध्ये केले.  भारत ‘ग्लोबल साउथ’ चा आवाज बनून पुढे आला आहे. हे बीज, जी-20 शिखर परिषदेमध्ये ज्या पद्धतीने रूजवण्यात आले आहे की, त्याचा एक प्रचंड वटवृक्ष झाला आहे,  हे माझे देशवासीय आगामी काळात पाहतील.  आता विश्वासाचा असा काही वटवृक्ष बनणार आहे की, त्याच्या छायेमध्ये येणा-या पिढ्यांना अनेक युगांपर्यंत मोठ्या अभिमानाने आपली मान ताठ करून उभे राहता येईल, असा मला विश्वास आहे.

या जी-20 मध्ये एक खूप मोठे काम आम्ही केले आहे. जैवइंधन आघाडी  बनवण्याचे मोठे काम आम्ही केले. आम्ही विश्वाचे नेतृत्व करीत आहोत, सर्वांना दिशा देत आहोत. आणि विश्वाच्या या  जैवइंधन आघाडीमध्ये दुनियेतील सर्व मित्र देश  पाहता पाहता सहभागी होत आहेत, या आघाडीचे सदस्यत्व घेत आहेत. आणखी एक खूप मोठे आंदोलन उभे राहण्याच्या तयारीत आहे. आणि त्याचे नेतृत्व  हा आपला भारत करीत आहे. लहान-लहान महाव्दीपांबरोबरही आर्थिक कॉरिडॉर बनविण्याच्या दिशेने आम्ही अतिशय मजबुतीने पावले टाकली आहेत.

आदरणीय बंधूंनो, आदरणीय उपराष्ट्रपती जी, आदरणीय सभापती महोदय,

आज आम्ही या वास्तूचा निरोप घेवून नवीन संसद भवनामध्ये जात आहोत. संसदेच्या नवीन सभागृहामध्ये आता आसनस्थ होणार आहोत. आणि ही गोष्ट शुभ यासाठी आहे की,  हे काम आपण  गणेश चतुर्थीच्या दिवशी करीत आहोत. मात्र मी, आपल्या दोन्ही महोदयांना एक प्रार्थना करतो, आपल्या समोर एक विचार मांडू इच्छितो. मी आशा करतो की, आपण दोघेही मिळून त्यावर जरूर विचार करावा. आणि जर आवश्यकता वाटली तर त्यावर चर्चा, मंथन करून काही निर्णय अवश्य घ्यावा. आणि माझी प्रार्थना आहे, माझा  असा प्रस्ताव आहे की, आता आपण ज्यावेळी नवीन सदनामध्ये जाणार असलो तरी, या सदनाची  प्रतिष्ठा कधीही कमी होवू दिली जावू नये . ही  जुनी  संसद आहे,  असे म्हणून   ती गोष्ट सोडून देण्यासारखी आहे, असे  होवू नये. आणि म्हणूनच माझी आपल्या प्रार्थना आहे की, भविष्यामध्ये जर आपण सहमती दिली, आपल्या दोन्ही महोदयांना योग्य वाटले तर, या वास्तूला  ‘संविधान सदन’  म्हणून ओळखले जावे. यामुळे ही वास्तू सदोदित आपल्या जीवनामध्ये प्रेरणास्रोत बनून  राहील आणि ज्यावेळी या वास्तूला ‘संविधान सदन’ म्हणून संबोधले जाईल,  त्यावेळी त्या महापुरूषांचे स्मरण होईल, त्यांच्या आठवणींबरोबर आपण जोडले जावू. हे महापुरूष कधीकाळी या वास्तूमध्ये बैठका घेत होते, अनेक गणमान्य महापुरूष इथे बसायचे आणि म्हणूनच भावी पिढीला ही भेट देण्याची संधी आपण सोडून चालणार नाही.

पुन्हा एकदा मी,  या पवित्र भूमीला वंदन करतो. या स्थानी जी तपस्या झाली आहे, लोककल्याणासाठी संकल्प झाले, त्यांच्या पूर्ततेसाठी सात दशकांपेक्षाही अधिक काळापासून जो पुरूषार्थ घडला आहे, त्या सर्वांना वंदन करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. आणि नवीन सदनासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो.

खूप- खूप धन्यवाद!!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
When PM Modi Fulfilled A Special Request From 101-Year-Old IFS Officer’s Kin In Kuwait

Media Coverage

When PM Modi Fulfilled A Special Request From 101-Year-Old IFS Officer’s Kin In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Under Rozgar Mela, PM to distribute more than 71,000 appointment letters to newly appointed recruits
December 22, 2024

Prime Minister Shri Narendra Modi will distribute more than 71,000 appointment letters to newly appointed recruits on 23rd December at around 10:30 AM through video conferencing. He will also address the gathering on the occasion.

Rozgar Mela is a step towards fulfilment of the commitment of the Prime Minister to accord highest priority to employment generation. It will provide meaningful opportunities to the youth for their participation in nation building and self empowerment.

Rozgar Mela will be held at 45 locations across the country. The recruitments are taking place for various Ministries and Departments of the Central Government. The new recruits, selected from across the country will be joining various Ministries/Departments including Ministry of Home Affairs, Department of Posts, Department of Higher Education, Ministry of Health and Family Welfare, Department of Financial Services, among others.