हरे कृष्ण ! आजच्या या पुण्य प्रसंगी आपल्यासोबत उपस्थित असलेले देशाचे संस्कृती मंत्री श्री जी किशन रेड्डी, इस्कॉन ब्यूरोचे अध्यक्ष श्री गोपाल कृष्ण गोस्वामी जी आणि जगभरातल्या विविध देशांतून या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व सहकारी आणि कृष्णभक्त!
परवा श्रीकृष्ण जन्माष्टमी होती आणि आज आपण श्रील प्रभूपाद जी यांची 125 वी जयंती साजरी करत आहोत. हा एक असा सुखद योगायोग आहे जसे की साधनेचे सुख आणि समाधान दोन्ही एकत्रच मिळावा.याच भावनेचा अनुभव आज संपूर्ण जगात श्रील प्रभूपाद स्वामी यांचे कोट्यवधी अनुयायी आणि कोट्यवधी कृष्णभक्त घेत आहेत. मी समोरच्या स्क्रीनवर वेगवेगळ्या देशातून सहभागी झालेल्या आपल्या सर्व साधकांना बघतो आहे. असे वाटते आहे की जणू काही लाखों मने एका भावनेने बांधली गेली आहेत, लाखो शरीरे एका समान चेतनेने जोडली गेली आहेत. ही ती श्रीकृष्णाची चेतना आहे, जिचा प्रकाश प्रभूपाद स्वामीजींनी संपूर्ण जगात पोहोचवला आहे.
मित्रांनो,
आपल्या सर्वांना माहिती आहेच,की प्रभूपाद स्वामी एक अलौकिक कृष्णभक्त तर होतेच; शिवाय ते एक महान देशभक्तही होते.त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. त्यांनी असहकार आंदोलनाला पाठिंबा देत स्कॉटिश कॉलेजची पदविका घेण्यास नकार दिला होता. आज जेव्हा देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे, अशा वेळी अशा महान देशभक्ताची 125 वी जयंती येणं हा एक सुखद योगायोग आहे. श्रील प्रभूपाद स्वामी नेहमी म्हणत असत की ते जगभरातल्या विविध देशात यासाठी भ्रमण करतात कारण त्यांना भारताची अमूल्य संपत्ती जगाला द्यायची आहे. ही संपत्ती म्हणजे भारताचे ज्ञान-विज्ञान, आपली जीवनसंस्कृती आणि परंपरा आहे. या परंपरेमागची भावना आहे- अथ-भूत दयाम् प्रति! म्हणून अखिल जीवनमात्रांसाठी, सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी! आमच्या सर्व यज्ञयागांचा, अनुष्ठानांचा अंतिम मंत्र हाच असतो- इदम् न मम् !म्हणजे हे माझे नाही. हे अखिल ब्रह्मांडासाठी आहे, संपूर्ण सृष्टीच्या हितासाठी आहे आणि म्हणूनच स्वामी जी यांचे पूज्य गुरुजी श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती जी यांना त्यांच्यात जी क्षमता जाणवली, त्यामुळेच त्यांनी आपल्या शिष्याला आज्ञा दिली की त्यांनी भारताचे विचार आणि तत्त्वज्ञान जगभरात पोचवावे. गुरुची ही आज्ञा हेच प्रभूपाद स्वामी यांच्या आयुष्याचे ध्येय बनले आणि त्यांच्या या तपस्येचाच परिणाम आज जगाच्या कानाकोपऱ्यात दिसतो आहे.
अमृत महोत्सवात भारतानेही 'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास' या मंत्रासह असेच संकल्प आपल्या पुढच्या प्रवासाचा आधार बनवले आहेत.आमच्या या संकल्पांच्या केंद्रस्थानी, आमच्या या उद्दिष्टांच्या मुळाशी देखील जगाच्या कल्याणाचीच भावना आहे. आणि आपण सगळेच याचे साक्षीदार आहात की या संकल्पांच्या पूर्ततेसाठी सर्वांचे प्रयत्न किती आवश्यक आहे. जर प्रभूपाद जी एकटेच जगाला इतके काही देऊ शकतात, तर मग, आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या आशीर्वादाच्या कृपेने जर एकत्रित प्रयत्न केले, तर त्याचे परिणाम काय होऊ शकतील याची आपण कल्पना करु शकता. आपण नक्कीच मानवी चेतनेच्या त्या शिखरापर्यंत पोचू शकू, जिथून आपल्याला जगात आणखी मोठी भूमिका पार पडणे शक्य होईल. प्रेमाचा संदेश सर्व लोकांपर्यंत पोचवणे शक्य होईल.
मित्रांनो,
मानवतेच्या कल्याणासाठी भारत जगाला बरेच काही देऊ शकतो. आणि त्याचे सर्वात मोठे एक उदाहरण आहे आज जगभरात पसरलेले आपले योगविद्येचे ज्ञान. आपली योगाची परंपरा ! भारताची जी शाश्वत जीवनशैली आहे, आयुर्वेदासारखे जे शास्त्र आहे, या सगळ्या ज्ञानाचा लाभ संपूर्ण जगापर्यंत पोचवावा हा आमचा संकल्प आहे.
आत्मनिर्भरतेच्या ज्या मंत्राविषयी श्रील प्रभूपाद स्वामी जी कायम चर्चा करत असत, त्याला भारताने आपले ध्येय बनवले आहे आणि त्या दिशेने भारत पुढे वाटचालही करतो आहे. मी जेव्हा जेव्हा आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाच्या उद्दिष्टांविषयी चर्चा करतो, त्यावेळी मी माझ्या अधिकाऱ्यांना, उद्योजकांना इस्कॉन च्या ‘हरे-कृष्ण’ चळवळीच्या यशस्वितेचे उदाहरण देतो. आपण जेव्हाही कोणत्या दुसऱ्या दशात जातो, आणि तिथे लोक जेव्हा ‘हरे कृष्ण’ म्हणत आपल्याला भेटतात, तेव्हा किती आपलेपणा वाटतो, किती अभिमान वाटतो. कल्पना करा, की हाच आपलेपणा आपल्याला ‘मेक इन इंडिया’ उत्पादनांमध्ये मिळाला, तर आपल्याला कसे वाटेल? इस्कॉन कडून ही शिकवण घेत आपल्याला आपली उद्दिष्टे साध्य करायची आहेत.
मित्रांनो,भगवान कृष्णांनी अर्जुनाला म्हटले होते- न हि ज्ञानेन सदृशम् पवित्र-मिह विद्यते
म्हणजेच- ज्ञानाइतके पवित्र काहीही नाही! ज्ञानाला हे सर्वोच्च स्थान दिल्यानंतर श्रीकृष्णांनी आणखी एक गोष्ट सांगितली होती.
ती म्हणजे- मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिम निवेशय
म्हणजेच, ज्ञान-विज्ञान मिळवल्यानंतर आपल्या मनाला, बुद्धीला कृष्णार्पण करा, त्याच्या भक्तिसाठी समर्पित करा. हा विश्वास, ही शक्ति देखील एक योग आहे, ज्याला गीतेच्या बाराव्या अध्यायात भक्तियोग म्हटले आहे. आणि या भक्तियोगाचे सामर्थ्य खूप मोठे आहे. भारताचा इतिहास देखील याची साक्ष देतो. जेव्हा भारत पारतंत्र्याच्या गर्तेत अडकला होता, अन्याय-अत्याचार आणि शोषणाचा बळी ठरलेल्या भारताला ज्यावेळी आपले ज्ञान आणि शक्तीची जाणीव नव्हती, त्यावेळी, या भक्तीनेच भारताची चेतना जिवंत ठेवली होती, भारताची ओळख अक्षुण्ण ठेवली होती.
आज विद्वान याचा अभ्यास करतात की जर भक्तिकाळातली सामाजिक क्रांती झाली नसती तर आज भारत कुठे असता, कशा स्थितीत असता. मात्र त्या कठीण काळात चैतन्य महाप्रभू यांच्यासारख्या संतांनी आपल्या समाजाला भक्तीच्या भावनेने बांधून ठेवले, त्यांनी 'विश्वासातून आत्मविश्वासाचा' मंत्र दिला. श्रद्धेतील भेदभाव , सामाजिक असलोखा , अधिकार-अनाधिकार, हे सगळे भक्तीने संपुष्टात आणले आणि ईश्वराशी जीवाची थेट गाठ घालून दिली.
मित्रांनो ,
भारताच्या इतिहासाचा अभ्यास केला तर तुम्हाला देखील आढळून येईल की भक्तीचा हा धागा पकडून ठेवण्यासाठी विविध कालखंडात ऋषि महर्षि आणि ज्ञानी समाजात येत राहिले, विविध अवतार होत गेले. एके काळी स्वामी विवेकानंदांसारखे विद्वान आले ज्यांनी वेद -वेदान्त पाश्चिमात्य देशांपर्यंत पोहचवले तर जेव्हा जगाला भक्तियोग देण्याची जबाबदारी आली, तेव्हा श्रील प्रभुपाद आणि इस्कॉन यांनी या महान कार्याचा विडा उचलला. त्यांनी भक्ती वेदांताला जगाच्या चैतन्याशी जोडण्याचे काम केले. हे काही साधारण काम नव्हते. त्यांनी वयाच्या साधारण 70 व्या वर्षी , जेव्हा आपल्या जीवनाच्या कक्षा आणि सक्रियता कमी करायला लागतात , तेव्हा इस्कॉन सारखे जागतिक मिशन सुरु केले.
मित्रांनो ,
ही आपल्या समाजासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी एक मोठी प्रेरणा आहे. अनेकदा आपण पाहतो, लोकं म्हणायला लागतात की वय झाले नसते तर खूप काही केले असते. किंवा मग आता या सर्व गोष्टी करण्याची ही योग्य वेळ नाही. मात्र प्रभुपाद स्वामी लहानपणापासून आयुष्यभर आपल्या संकल्पांसाठी सक्रिय राहिले. प्रभुपाद समुद्री जहाजामधून जेव्हा अमेरिकेला गेले तेव्हा त्यांचा खिसा जवळपास रिकामाच होता, त्यांच्याकडे केवळ गीता आणि श्रीमद् भागवत हीच संपत्ती होती. वाटेत प्रवासात त्यांना दोनदा हृदयविकाराचा झटका आला. जेव्हा ते न्यूयॉर्कला पोहचले, तेव्हा त्यांच्याकडे खाण्याची व्यवस्था नव्हती , राहण्यासाठी तर जागाच नव्हती. मात्र त्यानंतरच्या 11 वर्षांत जगाने जे काही पाहिले, ते श्रद्धेय अटलजींच्या शब्दात सांगायचे तर - ते कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हते.
आज जगातील विविध देशांमध्ये शेकडो इस्कॉन मंदिरे आहेत, कितीतरी गुरुकुल संस्था आहेत ज्यांनी भारतीय संस्कृती जिवंत ठेवली आहे. इस्कॉनने जगाला सांगितले आहे की भारतासाठी आस्था म्हणजे - उमंग, उत्साह, उल्हास आणि मानवतेवरचा विश्वास आहे. आज अनेकदा जगातील विविध देशांमध्ये लोक भारतीय वेशभूषेत कीर्तन करताना दिसतात. कपडे साधेच असतात, हातात ढोलकी -मंजीरा सारखी वाद्ये असतात, हरे कृष्ण असे संगीतमय कीर्तन होते आणि सगळे एका आत्मिक शांततेत समरसून गेलेले असतात. लोक पाहतात तेव्हा त्यांना असेच वाटते की एखादा उत्सव किंवा आयोजन आहे. मात्र आपल्याकडे तर हे कीर्तन, हे आयोजन जीवनाचा सहज भाग आहे. आस्थेचे हे उल्हासमय रूप निरंतर जगभरातील लोकांना आकर्षित करत आले आहे , हा आनंद आज तणावाखाली दबलेल्या जगाला नवी आशा देत आहे.
मित्रांनो ,
भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात-
अद्वेष्टा सर्व-भूतानांमैत्रः करुण एव च।
निर्ममोनिर-हंकारः सम दु:ख सुखः क्षमी॥
अर्थात, जो जीव मात्रावर प्रेम करतो, त्यांच्याबद्दल करुणा आणि प्रेम असते, कुणाचाही द्वेष करत नाही, तोच ईश्वराला प्रिय असतो. हाच मंत्र हजारो वर्षांपासून भारताच्या चिंतनाचा आधार राहिला आहे. आणि या चिंतनाला सामाजिक आधार देण्याचे काम आपल्या मंदिरांनी केले आहे. इस्कॉन मंदिर आज याच सेवा परंपरेचे आधुनिक केंद्र बनून उदयाला आले आहे. मला आठवतंय जेव्हा कच्छमध्ये भूकंप आला होता, तेव्हा कशा प्रकारे इस्कॉनने लोकांच्या सेवेसाठी पुढाकार घेऊन काम केले होते. देशात जेव्हा कधी आपत्ती आली , मग तो उत्तराखंडमधील प्रलय असो किंवा ओदिशा आणि बंगालमध्ये चक्रीवादळामुळे झालेली हानी असो, इस्कॉनने समाजाचा आधार बनण्याचे काम केले. कोरोना महामारी काळातही तुम्ही कोट्यवधी रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि प्रवाशांसाठी नियमित भोजन आणि अन्य गरजा पूर्ण करण्याची व्यवस्था करत आला आहात. महामारी शिवाय देखील लाखो गरीबाना भोजन आणि सेवा पुरवण्याचे हे अविरत अभियान तुमच्या माध्यमातून सुरु आहे. ज्याप्रमाणे इस्कॉनने कोविड रुग्णांसाठी रुग्णालये बांधली, आणि आता लसीकरण अभियानात देखील सहभागी आहे, त्याचीही माहिती मला नेहमी मिळत असते. मी इस्कॉनला, त्याच्याशी संबंधित सर्व भक्तांना तुमच्या या सेवायज्ञासाठी खूप-खूप शुभेच्छा देतो.
मित्रांनो ,
आज तुम्ही सत्य, सेवा आणि साधना या मंत्रासह न केवळ कृष्ण सेवा करत आहात, तर संपूर्ण जगात भारतीय आदर्श आणि संस्कारांचे सदिच्छादूत म्हणूनही भूमिका पार पाडत आहात. भारताचा शाश्वत संस्कार आहे : सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामयः . हाच विचार इस्कॉनच्या माध्यमातून आज तुम्हा सर्वांचा, लाखो कोट्यवधी लोकांचा संकल्प बनला आहे. ईश्वराप्रति प्रेम आणि प्राणीजीवात ईश्वराचे दर्शन, हाच या संकल्पाच्या सिद्धिचा मार्ग आहे. हाच मार्ग आपल्याला विभूतियोग अध्यायात भगवान सांगतात . मला विश्वास वाटतो की 'वासुदेवः सर्वम्' चा हा मंत्र आपण जीवनात देखील अवलंबू आणि मानवालाही या एकतेची जाणीव करून देऊ. याच भावनेसह, तुम्हा सर्वाना खूप-खूप धन्यवाद !
हरे कृष्ण !