वणक्कम! महान श्री रामलिंग स्वामी जी, ज्यांना वल्लालर म्हणून देखील ओळखले जाते, त्यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमाला संबोधित करणे हा एक सन्मान आहे. वल्लालर यांची जवळीक असलेल्या वडालुरमध्ये हा कार्यक्रम होत आहे हे आणखीनच विशेष. वल्लालर हे आपल्या देशातील सर्वात आदरणीय संतांपैकी एक आहेत. 19 व्या शतकात त्यांनी या पृथ्वीतलावर पाऊल ठेवले पण त्यांची आध्यात्मिक दृष्टी आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. त्यांचा प्रभाव संपूर्ण जगावर दिसून येतो. त्यांच्या विचारांवर आणि आदर्शांवर काम करणाऱ्या अनेक संस्था आजही कार्यरत आहेत.
मित्रांनो,
जेव्हा आपण वल्लालर यांचे स्मरण करतो तेव्हा आपल्याला त्यांची सेवा आणि करुणेची भावना आठवते. मानवांप्रती करुणाभाव दर्शवणाऱ्या जीव-कारुण्यम या तत्वावर आधारित जीवनपद्धतीवर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या योगदानांपैकी भूक दूर करण्यासाठी त्यांची दृढ वचनबद्धता हे एक होते. एखादा मनुष्य रिकाम्या पोटी झोपी जातो याखेरीज इतर कोणत्याही गोष्टींने ते व्यथित झाले नव्हते. भुकेलेल्यांबरोबर अन्न वाटून घेणे हे दयाळूपणाच्या सर्वश्रेष्ठ कृत्यांपैकी एक आहे, असा त्यांचा विश्वास होता. वाडिय पईरई कंडा पोदेल्लाम, वाडी नेन. ज्याचा अर्थ आहे “प्रत्येक वेळी जेव्हा मी पिके सुकताना पाहिली, तेव्हा मीही सुकलो”. हा एक आदर्श आहे ज्याला आपण सर्वजण बांधील आहोत. तुम्हाला आठवत असेल की या शतकातील सर्वात मोठी कोविड-19 महामारी आली तेव्हा 80 कोटी भारतीयांना मोफत अन्नधान्य मिळाले होते. त्या कठीण काळात हा मोठा दिलासा होता.
मित्रांनो,
वल्लालर यांचा ज्ञान आणि शिक्षणाच्या शक्तीवर विश्वास होता. एक मार्गदर्शक म्हणून त्यांची दारे सर्वांसाठी सदैव उघडी असायची. त्यांनी असंख्य लोकांना अमुल्य मार्गदर्शन केले. कुरळ अधिक लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्व ज्ञात आहेत. आधुनिक अभ्यासक्रमांना त्यांनी दिलेले महत्त्वही तितकेच महत्त्वपूर्ण आहे. तरुणांनी तामिळ, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवावे अशी त्यांची इच्छा होती. गेल्या 9 वर्षात भारतातील शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल झाला आहे. तब्बल 3 दशकांनंतर भारताला नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मिळाले आहे. हे नवे धोरण संपूर्ण शैक्षणिक परिदृश्य बदलत आहे. या धोरणात नवोन्मेष, संशोधन आणि विकासाकडे लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या 9 वर्षांत विक्रमी संख्येने विद्यापीठांची, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना झाली. आता तरुणांना त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये शिक्षण घेऊन डॉक्टर आणि इंजिनिअर बनता येईल. तसेच यामुळे तरुणांसाठी अनेक संधी खुल्या होतील.
मित्रांनो,
सामाजिक सुधारणांच्या बाबतीत वल्लालर त्यांच्या काळाच्या खूप पुढे होते. वल्लालार यांची ईश्वराची संकल्पना धर्म, जात आणि पंथाच्या अडथळ्यांच्या पलीकडे जाणारी होती. त्यांना विश्वाच्या प्रत्येक अणूमध्ये देवत्व दिसले. हा दैवी संबंध ओळखण्याचे आणि ते जपण्याचे आवाहन त्यांनी मानवजातीला केले. समतेवर आधारित समाजासाठी काम करणे हे त्यांच्या शिकवणीचे उद्दिष्ट होते. जेव्हा मी वल्लालर यांना श्रद्धांजली अर्पण करतो तेव्हा 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' यावरील माझा विश्वास आणखी दृढ होतो. त्यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम पारित करण्यासाठी आशीर्वाद दिला असेल. या अधिनियमानुसार विधानमंडळात महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात येत आहेत. वल्लालर यांची कामे वाचायला आणि समजून घ्यायला देखील सोपी आहेत. यामुळे ते जटिल आध्यात्मिक शहाणपण सोप्या शब्दांत व्यक्त करू शकले. महान संतांच्या शिकवणीच्या समान धाग्याने जोडलेल्या काळ आणि अवकाशातील आपल्या सांस्कृतिक ज्ञानातील विविधता एक भारत श्रेष्ठ भारत या आपल्या सामूहिक कल्पनेला बळ देते.
या पवित्र प्रसंगी आपण त्यांचे आदर्श पूर्ण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करूया. आपण सर्वजण त्यांचा प्रेम, दयाळूपणा आणि न्यायाचा संदेश सर्वदूर पसरवूया. त्यांना प्रिय असलेल्या क्षेत्रातही आपण मेहनत करत राहू या. आपल्या आजूबाजूला कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेऊया. प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळेल याची खात्री करूया. मी पुन्हा एकदा या महान संतांना त्यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.
धन्यवाद.