भारत माता की जय !!!
भारत माता की जय !!!
डोंगरा पलीकडे आवाज पोहोचायला हवा!
भारत माता की जय !!!
भारत माता की जय !!!
लडाखचे नायब राज्यपाल बी डी मिश्रा, केंद्रीय मंत्री संजय सेठ, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, तिन्ही सेना दल प्रमुख, कारगिल युद्धाच्या वेळी लष्कर प्रमुख पदावर असलेले जनरल व्ही पी मलिक, माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, सेवेमधील आणि सेवानिवृत्त शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिक, कारगिल युद्धातील वीर योद्ध्यांच्या माता, वीर नारी आणि त्यांचे कुटुंबीय,
लष्करातील वीर जवान, आणि माझ्या प्रिय देशवासियांनो,
आज लडाखची ही महान भूमी कारगिल विजयाची 25 वर्षे पूर्ण झाल्याची साक्ष देत आहे. कारगिल विजय दिवस आपल्याला सांगतो, की देशासाठी केलेले बलिदान अमर होते. दिवस, महिने, वर्षे सरतात, दशके मागे पडतात, शतके संपतात, ऋतूही बदलतात, पण देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्यांची नावे अमीट राहतात. आपल्या सेना दलाच्या पराक्रमी महानायकांचा, हा देश सदैव ऋणी राहील. हा देश त्यांच्या प्रति कृतज्ञ आहे.
मित्रहो,
माझे हे भाग्य आहे की, कारगिल युद्धाच्या वेळी एक सामान्य देशवासी म्हणून मी माझ्या सैनिकांमध्ये होतो. आज पुन्हा कारगिलच्या भूमीवर आल्यावर स्वाभाविकपणे माझ्या मनात त्या स्मृती जाग्या झाल्या आहेत.
मला आठवते, आपल्या सैन्याने एवढ्या उंचावरच्या अशा कठीण युद्धभूमीवर लढून कसा निर्णायक विजय मिळवला. देशाला विजय मिळवून देणाऱ्या अशा सर्व शूरवीरांना मी आदरपूर्वक नमन करतो. कारगिलमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना मी अभिवादन करतो.
मित्रहो,
कारगिलमध्ये आपण केवळ युद्ध जिंकले नाही, तर ‘सत्य, संयम आणि सामर्थ्याचे’ असामान्य उदाहरण जगापुढे ठेवले. आपल्याला माहित आहे, त्या वेळी भारत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता. त्या बदल्यात पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला धोकेबाज चेहरा दाखवला. मात्र, सत्यापुढे असत्य आणि दहशतीची हार झाली.
मित्रहो,
भूतकाळात पाकिस्तानने जेवढे वेळा प्रयत्न केले, त्या प्रत्येक वेळी त्याला हार पत्करावी लागली. तरीही पाकिस्तानने आपल्या इतिहासातून कोणताही बोध घेतला नाही. तो दहशतवादाच्या मदतीने स्वतःला काळाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण, आज मी अशा जागेवरून बोलत आहे, जिथून दहशतीला आश्रय देणाऱ्यांना माझा आवाज थेट ऐकू येत आहे. दहशतवादाच्या या आश्रयदात्यांना मी सांगू इच्छितो की त्यांचे दुष्ट मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत. आमचे वीर जवान दहशतवादाला पूर्ण ताकदीने चिरडून काढतील आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
मित्रहो,
लडाख असो वा जम्मू-काश्मीर, भारत विकासापुढील प्रत्येक आव्हानाला नक्कीच पराभूत करेल. काही दिवसांनी, म्हणजेच 5 ऑगस्टला कलम 370 रद्द झाल्याला 5 वर्षे पूर्ण होत आहेत. आज जम्मू-काश्मीर नव्या भविष्याविषयी बोलत आहे, मोठ्या स्वप्नांबद्दल बोलत आहे. G-20 सारख्या जागतिक शिखर परिषदेच्या महत्त्वाच्या बैठकी आयोजित करण्यासाठी जम्मू आणि काश्मीर ओळखले जात आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच जम्मू-काश्मीर-लेह-लडाखमधील पर्यटन क्षेत्राचाही वेगाने विकास होत आहे. काश्मीरमध्ये अनेक दशकांनंतर सिनेमागृहे उघडली आहेत. साडेतीन दशकांनंतर प्रथमच श्रीनगरमध्ये ताजिया निघाला आहे. पृथ्वीवरील आपला स्वर्ग शांतता आणि सौहार्दाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
मित्रहो,
आज लडाखनेही विकासाचा एक नवा प्रवास सुरु केला आहे, 'शिंकुन-ला’ बोगद्याचे बांधकाम सुरू झाले आहे. शिंकुन-ला बोगद्यामुळे लडाख वर्षभर कोणत्याही ऋतूमध्ये देशाशी जोडले जाईल. हा बोगदा लडाखच्या विकासासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी शक्यतांचा नवा मार्ग खुला करेल. प्रतिकूल हवामानामुळे लडाखच्या नागरिकांना किती अडचणींचा सामना करावा लागतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. शिंकून-ला बोगदा बनल्यावर या अडचणीही दूर होतील. या बोगद्याचे बांधकाम सुरु झाल्याबद्दल मी लडाखच्या माझ्या बंधू भगिनींचे विशेष अभिनंदन करतो.
मित्रहो,
लडाखच्या लोकांचे कल्याण हे आमचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. मला आठवते, कोरोनाच्या काळात कारगिल भागातील आपले बरेच लोक इराणमध्ये अडकले होते. त्यांना परत आणण्यासाठी मी वैयक्तिक पातळीवर खूप प्रयत्न केले. इराणमधून आल्यावर त्यांना जैसलमेरमध्ये ठेवण्यात आले आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे समाधानकारक अहवाल मिळाल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले. आम्ही अनेकांचे जीव वाचवू शकलो याचे आम्हाला समाधान आहे. इथल्या लोकांना अधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांचे जीवन सुकर व्हावे, यासाठी भारत सरकार अविरत प्रयत्न करत आहे.
गेल्या 5 वर्षांत आम्ही लडाखसाठीची अर्थसंकल्पीय तरतूद 1100 कोटींवरून 6 हजार कोटी रुपयांवर नेली. म्हणजे जवळजवळ ६ पट वाढ! आज हा पैसा लडाखच्या जनतेच्या विकासासाठी आणि इथल्या सुविधा वाढवण्यासाठी उपयोगी पडत आहे. आपण पाहू शकता, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, वीज पुरवठा, रोजगार- लडाखचे स्वरूप, आणि परिप्रेक्ष सर्व बाजूंनी बदलत आहे. या ठिकाणी प्रथमच सर्वसमावेशक नियोजन करून काम केले जात आहे. जल जीवन मिशनमुळे आता लडाखमधील 90 टक्क्यांहून अधिक घरांमध्ये पाईप द्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. लडाखमधील तरुणांना दर्जेदार उच्च शिक्षण देण्यासाठी येथे इंडस सेंट्रल युनिव्हर्सिटी (सिंधू केंद्रीय विद्यापीठ) उभारण्यात येत आहे. संपूर्ण लडाख क्षेत्राला 4G नेटवर्कने जोडण्याचे कामही सुरू आहे. 13 किलोमीटर लांबीच्या झोजिला बोगद्याचे कामही सुरू आहे. त्याच्या बांधकामामुळे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकवर देखील सर्व प्रकारच्या हवामानात कनेक्टिव्हिटी राहील.
मित्रहो,
आम्ही देशाच्या सीमावर्ती भागात विकासाची असामान्य उद्दिष्टे निश्चित केली आहेत आणि आव्हानात्मक कामे हाती घेतली आहेत. बॉर्डर रोड् ऑर्गनायझेशन- BRO (सीमा रस्ते संघटना) ने अशी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अभूतपूर्व वेगाने काम केले आहे. BRO ने गेल्या तीन वर्षांत 330 हून अधिक पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले आहेत. यामध्ये लडाखमधील विकास कामे आणि ईशान्येतील सेला बोगद्यासारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. खडतर प्रदेशातील विकासाचा हा वेग नव्या भारताची क्षमता आणि दिशा दोन्ही दर्शवतो.
मित्रहो,
आजची जागतिक परिस्थिती पूर्वीपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे आपल्या सेना दलांनी शस्त्रास्त्रे आणि उपकरणांबरोबरच आपली कार्यशैली आणि व्यवस्थेतही आधुनिकता अंगीकारायला हवी.
म्हणूनच दशकांपासून देशाला संरक्षण क्षेत्रात मोठ्या सुधारणांची आवश्यकता भासत होती. सैन्यदलही अनेक वर्षापासून याची मागणी करत होते. मात्र दुर्दैवाने पूर्वी याला महत्व दिले गेले नाही. गेल्या 10 वर्षात आम्ही संरक्षण क्षेत्रातल्या सुधारणांना सर्वाधिक प्राधान्य दिले. या सुधारणांमुळे आज आपले लष्कर अधिक भक्कम झाले आहे,आत्मनिर्भर होत आहे. आज संरक्षण खरेदीमधला मोठा भाग भारतीय संरक्षण उद्योगाला दिला जात आहे. संरक्षण क्षेत्रात संशोधन आणि विकास बजेटचा 25 टक्के भाग खाजगी क्षेत्रासाठी राखीव ठेवला आहे. या पावलांमुळे भारताचे संरक्षण उत्पादन आता सव्वा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.
शस्त्रास्त्रे मागवणारा देश म्हणून पूर्वी भारताची गणना केली जात असे.आता निर्यातदार म्हणून भारत आपली ओळख निर्माण करत आहे. आपल्या सैन्य दलांनी 5000 पेक्षा जास्त शस्त्रास्त्रे आणि संरक्षण उपकरणांची यादी तयार करून या 5000 वस्तू दुसऱ्या देशातून मागवणार नाही असा निर्धार केला आहे याचा मला आनंद आहे. यासाठी मी सैन्यदल नेतृत्वाचे अभिनंदन करतो.
मित्रहो,
संरक्षण क्षेत्रातल्या सुधारणांसाठीही मी भारताच्या सशस्त्र दलांची प्रशंसा करू इच्छितो.आपल्या सैन्यदलांनी गेल्या काही वर्षांमध्ये धाडसी निर्णय घेतले आहेत.सैन्य दलांनी केलेल्या सुधारणांचे एक उदाहरण म्हणजे अग्निपथ योजनाही आहे. सैन्यदले अधिक युवा करण्यासंदर्भात संसदेपासून ते अनेक समित्यांपर्यंत अनेक दशके चर्चा होत राहिली. भारताच्या सैनिकांचे सरासरी वय जागतिक सरासरीपेक्षा जास्त असल्याने आपणा सर्वांची चिंता वाढत आहे. म्हणूनच अनेक वर्षे अनेक समित्यांमध्येही हा मुद्दा उपस्थित झाला आहे. मात्र देशाच्या सुरक्षेशी संबंधित या आव्हानाचे निराकरण करण्याची इच्छा शक्ती पूर्वी दर्शवली गेली नाही. सैन्य म्हणजे नेत्यांना सलाम करणे,परेड करणे अशीच कदाचित काही लोकांची मानसिकता होती. आमच्यासाठी सैन्य म्हणजे 140 कोटी देशवासीयांचा विश्वास,आमच्यासाठी सैन्य म्हणजे 140 कोटी देशवासियांसाठी शांततेची हमी, आमच्यासाठी सैन्य म्हणजे सीमा सुरक्षेची हमी.
अग्निपथ योजनेच्या माध्यमातून देशाने या महत्वाच्या मुद्याची दखल घेतली आहे. सैन्याला युवा बनवणे हे अग्निपथचे उद्दिष्ट आहे, सैन्याला युद्धासाठी सदैव सज्ज ठेवणे हे अग्निपथचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित या मुद्याला काहीजणांनी राजकारणाचा विषय केला आहे हे दुर्दैव आहे. सैन्याशी संबंधित या सुधारणेबाबतही काही लोक आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी असत्याचे राजकारण करत आहेत. हे तेच लोक आहेत ज्यांनी लष्कराशी संबंधित बाबींमध्ये हजारो कोटी रुपयांचे घोटाळे करून आपल्या सैन्यदलाना कमजोर केले. हे तेच लोक आहेत ज्यांची इच्छा होती की हवाईदलाला कधी आधुनिक लढाऊ जेट मिळू नयेत. हे तेच लोक आहेत ज्यांनी तेजस लढाऊ विमानांचाही गाशा गुंडाळण्याची तयारी केली होती.
मित्रांनो,
सत्य हे आहे की अग्निपथ योजनेमुळे देशाचे सामर्थ्य वाढेल आणि देशाचा सामर्थ्यवान युवा मातृभूमीच्या सेवेसाठी पुढे येईल. खाजगी क्षेत्र आणि अर्ध सैनिक बलामध्येही अग्निवीरांना प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे. मला आश्चर्य वाटते की काही लोकांच्या आकलनाला काय झाले आहे? त्यांच्या विचारशक्तीला काय झाले आहे. सरकार निवृत्तीवेतनाचा पैसा वाचवण्यासाठी ही योजना घेऊन आल्याचा संभ्रम ते निर्माण करत आहेत. अशा लोकांच्या विचाराचाही मला खेद वाटतो. अशा लोकांना विचारायला पाहिजे की मोदी यांच्या शासन काळात ज्यांची भर्ती होईल त्यांना आजच निवृत्तीवेतन द्यायचे आहे का, हे मला सांगा जरा. त्यांना निवृत्तीवेतन द्यायची वेळ 30 वर्षानंतर येईल आणि तेव्हा मोदी 105 वर्षांचे झाले असतील आणि तेव्हाही मोदी यांचे सरकार असेल का, मोदी 105 वर्षांचे होतील, 30 वर्षानंतर निवृत्तीवेतन द्यायची वेळ येईल, त्यासाठी मोदी अशी राजकीय व्यक्ती आहेत की जे आज टीका ओढवून घेतील. हे आपण काय करत आहात? मात्र मित्रांनो, माझ्यासाठी पक्ष नव्हे तर देश सर्वोच्च आहे.
मित्रांनो,
आज अभिमानाने मी सांगू इच्छितो की सैन्यदलांनी घेतलेल्या निर्णयाचा आम्ही सन्मान केला आहे. मी जसे आधी सांगितले आहे की आम्ही राजकारणासाठी नव्हे तर राष्ट्रनीतीसाठी काम करतो.आमच्यासाठी देशाची सुरक्षा सर्वोच्च आहे. आमच्यासाठी 140 कोटी जनतेसाठी शांतता, याला सर्वाधिक प्राधान्य आहे.
मित्रांनो,
जे लोक आज जनतेची दिशाभूल करत आहेत त्यांना सैनिकांची जराही पर्वा नव्हती याला इतिहासाची साक्ष आहे. हे तेच लोक आहेत ज्यांनी किरकोळ 500 कोटी रुपयांची रक्कम दाखवून वन रॅन्क वन पेन्शन बाबत खोटे सांगितले. तर हे आमचे सरकार आहे ज्यांनी वन रॅन्क वन पेन्शन लागू केले, माजी सैनिकांना सव्वा लाख कोटी रुपयांहून जास्त दिले. 500 कोटी कुठे आणि सव्वा लाख कोटी कुठे ! इतके खोटे,आणि देशाच्या जवानांसाठी धूळफेक करण्याचे पाप ! हे तेच लोक आहेत ज्यांनी स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही, सैन्यदलांकडून मागणी असूनही वीर सैनिकांच्या कुटुंबाकडून मागणी असूनही आपल्या शहीदांसाठी युद्ध स्मारक उभारले नाही, टाळत राहिले, समित्या स्थापन करत राहिले,नकाशे दाखवत राहिले.हे तेच लोक आहेत ज्यांनी सीमेवरच्या आपल्या जवानांना पुरेशी बुलेटप्रुफ जॅकेटही पुरवली नव्हती. मित्रांनो, हे तेच लोक आहेत जे कारगिल विजय दिवसाकडेही दुर्लक्ष करत राहिले. हा तर देशातल्या कोट्यवधी जनतेचा आशीर्वाद आहे की मला तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आणि म्हणून आज या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनेचे आम्ही पुन:स्मरण करू शकत आहोत. नाहीतर आज ते असते तर या युद्ध विजयाचे स्मरण केले नसते.
मित्रांनो,
कारगिल विजय हा एखाद्या सरकारचा विजय नव्हता, कारगिल विजय हा एखाद्या पक्षाचा विजय नव्हता. हा विजय देशाचा विजय होता, हा विजय देशाचा वारसा आहे. हे देशाच्या अभिमानाचे आणि स्वाभिमानाचे पर्व आहे.140 कोटी देशवासीयांच्या वतीने आपल्या वीर जवानांना मी भक्तिभावाने पुन्हा एकदा नमन करतो. कारगिल विजयाच्या 25 वर्षांनिमित्त सर्व देशवासियांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. माझ्यासमवेत जयजयकार करा- भारत माता की जय !!! भारत मातेचा हा जयजयकार माझ्या त्या वीर शहिदांसाठी आहे, माझ्या भारत मातेच्या वीर पुत्रांसाठी आहे.
भारत माता की जय!!!
भारत माता की जय!!!
भारत माता की जय!!!
खूप खूप धन्यवाद !