"आपण लक्ष केंद्रित केले तर अपेक्षांचे ओझे नाहीसे होऊ शकते"
"मन ताजेतवाने असताना कमी आवडीचा किंवा सर्वात कठीण विषय घ्यावा"
"फसवणूक करून तुम्हाला आयुष्यात कधीच यशस्वी होता येणार नाही"
"महत्त्वाच्या क्षेत्रांवर कठोर आणि चातुर्याने परिश्रम केले पाहिजे"
"बहुतांश लोक सरासरीचे आणि सामान्य असतात परंतु ज्यावेळी हे सामान्य लोक असामान्य कामे करतात त्यावेळी ते नवीन, विक्रमी उंची गाठतात"
“टीका ही समृद्ध लोकशाहीची शुद्ध आणि मूळ स्थिती आहे”
"आरोप आणि टीका यात खूप मोठा फरक आहे"
"देवाने आपल्याला इच्छा स्वातंत्र्य आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व दिले आहे, आपण नेहमी आपल्या गॅजेट्सचे गुलाम बनणार नाही, याबद्दल जागरूक असले पाहिजे"
"सरासरी स्क्रीन वेळ वाढणे ही एक चिंताजनक प्रवृत्ती बनत आहे"
"एक परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नाही आणि निकालाबद्दल जास्त विचार करणे हा दैनंदिन जीवनाचा भाग बनू नये"
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चाच्या (पीपीसी) सहाव्या भागात नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. संवादापूर्वी कार्यक्रमस्थळी भरविण्‍यात आलेले विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शनही त्यांनी पाहिले.
पंतप्रधानांनीच 'परीक्षा पे चर्चा' ची संकल्पना मांडली असून यात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक जीवन आणि परीक्षांशी संबंधित विविध विषयांवर पंतप्रधानींशी संवाद साधतात. पीपीसीच्या या वर्षीच्या भागात 155 देशांमधून सुमारे 38.80 लाखजणांनी नोंदणी केली.
"प्रादेशिक भाषा शिकण्याचा प्रयत्न करून, आपण केवळ अभिव्यक्तीसाठी भाषा शिकत न
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान परिक्षा पे चर्चेची ही पहिलीच वेळ असल्याचे पंतप्रधानांनी मेळाव्याला संबोधित करताना अधोरेखित केले.

नमस्कार!

एवढ्या थंडीत कदाचित पहिल्यांदाच ‘परीक्षा पे चर्चा’ होत आहे. साधारणपणे आपण फेब्रुवारी महिन्यात हा कार्यक्रम करतो. मात्र, आता मनात असा विचार आला, की आपल्या सर्वांना 26 जानेवारीचा लाभही मिळावा. जे बाहेरचे आहेत, त्यांनी या दोन्हीचा एकत्रित फायदा मिळवला ना? कर्तव्यपथावर गेले होते ना? कसं वाटलं? खूप छान वाटलं.. अच्छा, घरी जाऊन काय सांगणार? काही नाही सांगणार?  अच्छा मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. मात्र मी एवढं नक्कीच सांगेन की ‘परीक्षा पे चर्चा’ माझीही परीक्षाच आहे. आणि देशातील कोट्यवधी विद्यार्थी माझी ही परीक्षा घेत आहेत. पण मला ही परीक्षा देण्यात खूप आनंद मिळतो. कारण मला तुमच्याकडून जे प्रश्न येतात, लाखोंच्या संख्येनं हे प्रश्न येतात. मुले खूप स्वयंस्फूर्तीने प्रश्न विचारतात. आपल्या समस्या सांगतात, अनेक वैयक्तिक त्रास, अडचणी पण सांगतात. माझ्यासाठी तर ही अतिशय सौभाग्याची बाब आहे, की माझ्या देशातील युवकांच्या मनात काय विचार आहेत, त्यांना काय काय अडचणी येतात, देशाकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, सरकारकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांची स्वप्ने काय आहेत, संकल्प काय आहेत, हे सगळं जाणून घेणं माझ्यासाठी खरोखर खूप मोठा खजिना आहे. आणि मी तर माझी व्यवस्था सांभाळणाऱ्या सर्वांना सांगून ठेवलं आहे, की हे सगळे प्रश्न एकत्रित करुन ठेवा. कधी 10-15 वर्षांनी संधी मिळाली, तर त्याचे समाज मानसशास्त्रीय अध्ययन करूया. आणि पिढी बदलत जाते, परिस्थिती जसजशी बदलत जाते, तसे त्यांचे संकल्प, त्यांचे विचार कसे बदलत जातात, कसे सूक्ष्म पातळीवर हे बदल होत जातात, याचा एक खूप मोठा प्रबंध, कदाचित इतक्या सोप्या शब्दांत कोणाजवळच नसेल, जेवढ्या सोप्या शब्दांत, आपण सगळे मला हे प्रश्न पाठवून विचारत असता. चला फार वेळ गप्पा करायला नकोत. माझी इच्छा आहे, की लवकर सुरुवात करावी, कारण दरवेळी माझ्याकडे अशी तक्रार येते, की साहेब, हा कार्यक्रम फार लांबतो. आपले काय मत आहे? खरंच लांबतो का? लांबला पाहिजे का? अच्छा, मला आणखी काही करायचं नाही. अच्छा, ठीक आहे. मी तर तुमच्याचसाठी आहे. सांगा काय करायचं, कोण आधी विचारणार आहे?

निवेदक-

दुनिया को बदलने की तमन्ना हो अगर,

दुनिया को बदलने की तमन्ना हो अगर।

दुनिया को नहीं खुद को बदलना सीखें।

(जगाला बदलवण्याची इच्छा असेल, तर जगाला नाही स्वतःला बदलायला शिका) 

माननीय पंतप्रधान महोदय, आपले प्रेरक आणि ज्ञानवर्धक मार्गदर्शन, आम्हाला कायम सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भारून टाकणारे असते. आपले समृद्ध अनुभव आणि ज्ञानयुक्त मार्गदर्शनाची आम्ही सगळे अतिशय उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहोत. माननीय महोदय, आपले आशीर्वाद आणि अनुमतीने आम्ही या कार्यक्रमाचा शुभारंभ करु इच्छितो. धन्यवाद मान्यवर!

माननीय पंतप्रधान महोदय, आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि स्थापत्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले शहर, मदुराई इथून, अश्विनी एक प्रश्न विचारू इच्छिते. अश्विनी, कृपया आपला प्रश्न विचारा..

 

अश्विनी- माननीय पंतप्रधान सर, नमस्कार! माझे नाव अश्विनी आहे. मी तमिळनाडू, मदुराईच्या केंद्रीय विद्यालय, क्रमांक दोनची विद्यार्थिनी आहे. माझा तुम्हाला असा प्रश्न आहे सर, की जर माझा निकाल चांगला लागला नाही, तर माझ्या कुटुंबात जी निराशा येईल, त्याचा सामना मी कसा करु? जर मला माझ्या अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत तर काय? एक चांगली विद्यार्थिनी असणं पण काही सोपं नसतं. कारण आपल्या घरच्या मोठ्यांच्या अपेक्षा मग खूप वाढलेल्या असतात. मग जी व्यक्ती परीक्षा देत असते, तिच्यावर या अपेक्षांचा खूप ताण येतो, आणि ती कधीकधी निराशेच्या गर्तेतही सापडते. आजकाल तर मुलांमध्ये अशा निराश मन:स्थितीत आत्महत्या करण्याचे प्रयत्न करणं, कोणीही आपल्या भावना समजून घेत नाही, आपण कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही, अशी मनःस्थिती होणं, हे खूप कॉमन झालं आहे. त्यामुळे आपण मला कृपया याबद्दल मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर.

 

निवेदक: धन्यवाद अश्विनी. माननीय पंतप्रधान महोदय, नवदेश कुमार भारताची राजधानी, दिल्लीचा विद्यार्थी आहे. अनेक साम्राज्यांच्या खुणा असलेले हे शहर, भारताच्या मध्ययुगीन इतिहासाचे दाखले देणारे आहे, त्या काळातील सुंदर स्थापत्यशास्त्राची शैली आपल्याला या राजधानीत बघायला मिळते. अशा, दिल्लीचा नवदेश आज इथे या सभागृहात उपस्थित आहे, आणि त्यालाही साधारण याच मुद्द्यावर आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. नवदेश, कृपया आपला प्रश्न विचारा.

 

नवदेश- सुप्रभात माननीय पंतप्रधान महोदय, माझं नाव नवदेश जागूर, मी दिल्लीतल्या प्रीतम पुरा इथल्या केंद्रीय विद्यालयात शिकतो. सर, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे, की जेव्हा माझा निकाल अपेक्षेप्रमाणे लागत नाही, अशावेळी घरात जे वातावरण तयार झाले असते, त्याचा सामना मी कसा करु? कृपया याबद्दल मार्गदर्शन करावे. खूप खूप धन्यवाद!

निवेदक- धन्यवाद नवदेश!

माननीय पंतप्रधान महोदय, संपूर्ण जगाला, शांती आणि करुणेचा संदेश देणारे भगवान बुद्ध, गुरु गोविंदसिंह, तसेच वर्धमान महावीर यांची जन्मभूमी असलेली प्राचीन नगरी पाटण्याची प्रियंका कुमारी, देखील अशाच काही समस्यांचा सामना करत आहे, आणि तिलाही आपले मार्गदर्शन हवे आहे. प्रियंका कृपया आपला प्रश्न विचारा--

प्रियंकानमस्कार, माननीय पंतप्रधान महोदय, माझं नाव प्रियंका कुमारी आहे. मी रवीन बालिका प्लस टू विद्यालय, राजेंद्र नगर, पाटणाची 11 व्या इयत्तेतली विद्यार्थीनी आहे.  माझा आपल्याला असा प्रश्न आहे, की माझ्या कुटुंबात सगळ्यांनीच परीक्षेत खूप छान मार्क्स मिळवले आहेत. मलाही चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. मात्र, याचा माझ्यावर तणाव आहे. त्यामुळे कृपया आपण मला मार्गदर्शन करावे. धन्यवाद!

निवेदक: धन्यवाद प्रियंका! माननीय पंतप्रधान महोदय, अश्विनी, नवदेश आणि प्रियंका यांना असं वाटतं की हा महत्वाचा मुद्दा, अनेक विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम करणारा आहे. ही समस्या हाताळण्यासाठी आपण कृपया मार्गदर्शन करावे. 

पंतप्रधान – अश्विनी, तू क्रिकेट खेळतेस का?क्रिकेट मध्ये गुगली बॉल असतो. म्हणजे, तुमचा निशाणा एकीकडे असतो, तर दिशा दुसरीच दाखवली असते. मला वाटतं, तुलाही अशीच गुगली टाकून मला पहिल्याच बॉलवर आऊट करण्याचा इरादा आहे. कुटुंबातील लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा असणं अगदी सहज आहे, आणि त्यात काही चुकीचेही नाही. मात्र, कोणत्याही कुटुंबाच्या अपेक्षा त्यांच्या सामाजिक दर्जामुळे वाढत असतील, तर तो मात्र चिंतेचा विषय आहे. त्यांच्यावर सामाजिक दर्जाचा इतका जास्त दबाव असतो, की त्यांना वाटतं आपण जेव्हा सोसायटीत लोकांमध्ये जाऊ, तेव्हा, आपल्या मुलांविषयी काय सांगायचं? जर कुणाची मुलं अभ्यासात फार चांगली नसतील, तर त्याबद्दल लोकांसमोर चर्चा कशी करणार?  कधी कधी आई वडीलांना, आपल्या मुलांच्या क्षमता माहीत असतात, मात्र तरीही, सामाजिक दर्जामुळे ते आपल्या मित्रमंडळीत, नातेवाईक, क्लबमध्ये जातात, सोसायटीत जातात किंवा कधी तळ्यावर कपडे धुवायला जातात, तेव्हा त्यांच्यात गप्पा गोष्टी होतात. साहाजिकच मुलांचा विषय निघतो. आणि मग त्यांच्या मनात एक न्यूनगंड येतो, आणि मग तो टाळण्यासाठी तेच आपल्या मुलांविषयी खूप मोठमोठ्या गप्पा मारतात. आणि वारंवार असं होत राहिलं, तर ते त्याच सगळ्या गोष्टी आत्मसात करुन घेतात आणि घरी आल्यावर मुलांकडूनही त्याच अपेक्षा करतात. आणि समाजमनाची आज ही सहज प्रवृत्ती झाली आहे.

दुसरी गोष्ट जर तुम्ही काही चांगलं केलं तर तुमच्याकडून प्रत्येक जण नवीन अपेक्षा करेल. आम्ही तर राजकारणात आहोत, आम्ही कितीही निवडणुका जिंकलो तरीही असा दबाव निर्माण केला जातो, की आम्ही हरता कामा नये. 200 उमेदवार निवडून आले, तर म्हणतात 250 का नाही आले, 250 निवडून आणले तर म्हणतात, 300 का नाही आले, 300 आले तर म्हणतात 350 का नाही आले. चारही बाजूंनी दबाव निर्माण केला जातो. पण, आपण या दबावाला बळी पडलं पाहिजे का? क्षणभर विचार करा की तुम्हाला दिवसभर जे सांगितलं जातं, चारही बाजूंनी ऐकवलं जातं. त्यातच आपला वेळ वाया घालवणार की स्वतःच्या आत डोकावून पण बघणार. आपली क्षमता, आपले प्राधान्य, आपल्या गरजा, आपले संकल्प, प्रत्येक अपेक्षा यांच्याशी जोडून बघा. तुम्ही कधी क्रिकेट सामना बघायला गेला असाल, तेव्हा तुम्ही बघितलं असेल की काही फलंदाज खेळायला येतात. आता संपूर्ण स्टेडियम, हजारो लोक असतात स्टेडियममध्ये. ते ओरडायला सुरवात करतात. चौकार, चौकार, चौकार, षटकार, षटकार, षटकार. प्रेक्षकांनी म्हटलं म्हणून ते चौकार आणि षटकार मारतात का? कुठलाही खेळाडू असं करतो का? ओरडत राहा किती ओरडायचं ते. त्याचं लक्ष चेंडूवरच असतं. जो येत असतो. त्या गोलंदाजाच्या मनात काय सुरु आहे त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आणि जो चेंडू जसा असेल तसाच खेळतो. प्रेक्षक ओरडतात तसा खेळत नाही. तो एकाग्र राहतो. जर तुम्ही देखील आपल्या कामावर एकाग्र राहिलात, तर जो काही दबाव निर्माण होतो, अपेक्षा तयार होतात, कधी ना कधी तुम्ही त्यांच्यावर मात करू शकाल. तुम्ही त्या संकटातून बाहेर याल. आणि म्हणूनच माझं तुम्हाला सांगणं आहे, की तुम्ही या दबावांत राहू नका. मात्र, कधी कधी दबावांचं विश्लेषण करा. असं, तर नाही की तुम्ही स्वतःला कमी लेखत आहात. आपली क्षमता खूप जास्त आहे, पण तुम्ही स्वतःच इतके निराश मानसिकतेत आहात, काही नवीन करण्याचा विचार देखील मनात येत नाही. तर कधी कधी त्या अपेक्षा खूप मोठी शक्ती बनतात. खूप मोठी उर्जा बनते. आणि म्हणूनच आई वडलांनी कुठल्या अपेक्षा ठेवाव्यात हे मी आधीच सांगितलं. सामाजिक दबावामुळे आई वडलांनी मुलांवर दबाव टाकायला नको. मात्र, मुलांनी देखील स्वतःला क्षमतेपेक्षा कमी समजायला नको. आणि दोन गोष्टींवर भर दिला तर मला पूर्ण खात्री आहे, की तुम्ही अशा समस्या अगदी सहज सोडवाल. आपले निवेदक कुठे गेलेत?

निवेदक - माननीय पंतप्रधान महोदय! आपले खूप खूप धन्यवाद. आपल्या प्रेरणादायी शब्दांनी पालकांना आपल्या पाल्यांना समजून घेण्याचा मार्ग मिळाला आहे. महोदय, आम्ही दबावात राहणार नाही आणि आम्ही ठरवून परीक्षेत उत्साही राहू, आपले आभार.

निवेदक - माननीय पंतप्रधान महोदय, चंबा हे निसर्ग सौंदर्याने नटलेले भारताचे पॅरीस म्हणून प्रसिद्ध असलेले पर्वतावर वसलेले एक शहर आहे. हिमाचल प्रदेशच्या चंबा इथली आरुषी ठाकूर आभासी माध्यमातून आपल्याशी संवाद साधते आहे. आरुषी, कृपया आपला प्रश्न विचार.

आरुषी - माननीय पंतप्रधान महोदय, नमस्कार! माझं नाव आरुषी ठाकूर आहे आणी मी केंद्रीय विद्यालय बनिखेत, डलहौसी, जिल्हा चंबा इथे 11 व्या वर्गात शिकते. महोदय, माझा आपल्याला असा प्रश्न आहे की परीक्षेदरम्यान ज्या गोष्टीचा मला सर्वात जास्त त्रास होतो ती म्हणजे, अभ्यासाला सुरवात कुठून करायची? मला नेहमी वाटतं की मी सगळं विसरली आहे आणि मी याचाच विचार करत राहते. यामुळे खूप तणाव निर्माण होतो. कृपया मार्गदर्शन करा. धन्यवाद सर. 

निवेदक - धन्यवाद आरुषी. माननीय पंतप्रधान महोदय, भारताचे भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेले राज्य छत्तीसगडची राजधानी रायपुर. रायपूरची अदिती दिवाणची देखील हीच समस्या आहे. तिला या समस्येवर उपाय हवा आहे. आदिती तुझा प्रश्न विचार.

आदिती दिवाण - माननीय पंतप्रधान महोदय नमस्कार. माझं नाव आदिती दिवाण आहे आणि मी कृष्णा पब्लिक स्कूल रायपुर, छत्तीसगडइथे 12 व्या वर्गात शिकते. माझा आपल्याला प्रश्न आहे की मला या गोष्टीची सतत चिंता वाटत राहते, की मला खूप काही करायचं आहे. मात्र, कुठलंच काम मी पूर्ण करू शकत नाही. कारण मला खूप काही करायचं असतं. जर मी कुठलं काम वेळेत पूर्ण केलं तर मला आणखी चिंता वाटायला लागते. कारण मग बाकीच्या कामांना एकतर खूप वेळ लागतो किंवा मी ते पुढे ढकलते. मला हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे, की मी माझी सगळी कामं वेळेत कशी पूर्ण करू? धन्यवाद.

 

निवेदक - धन्यवाद अदिती, माननीय पंतप्रधान महोदय, आरुषी आणि अदिती यांना आपल्या परीक्षेची तयारी आणि वेळेचा सदुपयोग याविषयी आपले मार्गदर्शन हवे आहे. कृपया त्यांच्या समस्या सोडवा, माननीय पंतप्रधान.

 

पंतप्रधान - हे बघा, हे फक्त परीक्षेपुरतं नाही. तसंही आयुष्यात वेळेच्या व्यवस्थापनाविषयी आपण जागरूक असायला पाहिजे. परीक्षा असो अथवा नसो. तुम्ही बघितलं असेल अनेक कामं का साठून राहतात. कामं साठून राहतात, कारण तुम्ही ती वेळेत पूर्ण करत नाही म्हणून आणि मग साठलेली कामं करून थकवा पण येतो. काम करून मनाला आनंद मिळतो. कामं न केल्याने थकवा जाणवतो. समोर दिसत असतं, अरे इतकी सगळी कामं, इतकी सगळी कामं आणि त्यामुळेच थकायला होतं. कामं करायला सुरवात करा. दुसरी गोष्ट, तुम्ही कधी कागदावर पेन, पेन्सिल घेऊन डायरीत लिहा. एक आठवडा, आपल्या नोंदी तयार करा, की तुमचा वेळ कसा घालवता. अभ्यास जरी करत असाल, तर कुठल्या विषयाला किती वेळ देता, आणि त्यात देखील शॉर्टकट शोधता की मूळाशी जाऊन अभ्यास करता. बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास करता, थोडं आपलं एक विश्लेषण करा. मला खात्री आहे की तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आवडीच्या गोष्टी आहेत, त्यातच सगळ्यात जास्त वेळ तुम्ही घालवता आणि त्यातच बुडालेले असता. मग तीन विषय असे आहेत, जे कमी आवडतात, मात्र महत्वाचे आहेत. मग त्याचं तुम्हाला ओझं वाटायला लागेल. मी दोन दोन तास कष्ट केले, तरीपण हे झालं नाही आणि म्हणून तुम्ही फक्त दोन तास अभ्यास करावा असं नाही, मात्र अभ्यास करताना जेव्हा मेंदू ताजातवाना आहे, तेव्हा जो विषय सर्वात अप्रिय आहे, तो तुम्हाला सर्वात कठीण वाटतो. तुम्ही हे ठरवून घ्या, सुरवातीचे 30 मिनिट या विषयाला, मग एक आवडीचा विषय घ्या.

20 मिनिटे त्याला, मग थोडा कमी आवडता असेल त्याला 30 मिनिटे. तुम्ही अशा प्रकारे वेळेची विभागणी करा. त्यामुळे तुम्हाला काहिसा निवांतपणा देखील मिळेल आणि हळू हळू त्या विषयातील रुची वाढेल. जे सामान्यतः तुम्ही टाळत असता आणि आवडत्या विषयांमध्ये हरवलेले असता आणि वेळ देखील खूप जातो. तुम्ही पाहिले असेल. तुमच्यातील जे लोक पतंग उडवत असतील. मला तर लहानपणी खूपच आवड होती. पतंगीचा जो मांजा असतो, धागा असतो, तो कधी कधी एकात एक अडकत एकदम मोठा गुंता तयार होतो. आता बुद्धिमान माणूस काय करेल. असे- असे खेचू लागेल का, जोर लावेल का? असे नाही करणार. तो हळू हळू एक-एक धागा पकडण्याचा असा प्रयत्न करेल की गुंता सुटण्याचा मार्ग कुठे आहे आणि मग हळू हळू, हळूच सोडवला तर इतक मोठा गुंता देखील अगदी सहजतेने सुटेल आणि सर्व मांजा, संपूर्ण धागा जितकी गरज आहे, तितका त्याच्या हाती येईल. आपल्याला देखील त्याच्यावर जास्त सक्ती करायची नाही आहे. अगदी आरामात तोडगा काढायचा आहे आणि जर आरामात तोडगा काढला तर मला पक्की खात्री आहे तुम्ही ते अगदी योग्य प्रकारे कराल. दुसरी गोष्ट म्हणजे कधी घरात आपल्या आईच्या कामाचे निरीक्षण केले आहे का? तसे तर तुम्हाला खूप चांगलं वाटतं की शाळेतून घरी आलो तर आईने सगळं तयार करून ठेवलं होतं. सकाळी शाळेत जायचं होतं तर आईने सर्व काही तयार करून ठेवले होते. हे सर्व वाटते तर खूपच चांगले. पण, आईचे वेळेचे व्यवस्थापन इतके चांगले कसे असते याचे कधी तुम्ही निरीक्षण केले आहे का. तिला माहीत आहे की सकाळी हे आहे तर मला 6 वाजता हे करावे लागेल. 6.30 वाजता हे करावे लागेल. तो 9 वाजता जाणार आहे तर हे करावे लागेल. तो 10 वाजता घरी आला तर हे करावे लागेल. म्हणजेच इतके अचूक वेळेचे व्यवस्थापन आई करत असते आणि सर्वात जास्त काम आई करत असते. पण कोणत्याही कामाचे तिला ओझे वाटत नाही. थकली आहे, खूप काम आहे, खूप जास्त आहे असे ती करत नाही, कारण तिला माहीत आहे मला इतक्या इतक्या तासात अमुक अमुक तर करायचे आहे. आणि जेव्हा अतिरिक्त वेळ मिळतो तेव्हा देखील ती गप्प बसत नाही. काही ना काही आपली कलाकुसरीची कामे करत राहते. सुई-दोरा घेऊन बसेल, काही ना काही करत राहील. निवांत होण्यासाठी देखील तिने व्यवस्था केलेली आहे. जर आईच्या कामकाजाचे नीट निरीक्षण केले तर तुम्हाला देखील एक विद्यार्थी म्हणून आपल्या वेळेच्या व्यवस्थापनाचे महत्त्व काय असते आणि वेळेच्या व्यवस्थापनात 2 तास, 4 तास, 3 तास हे नको आहे तर मायक्रो मॅनेजमेंट हवे.

कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे, कोणत्या कामाला किती वेळ द्यायचा आहे आणि इतकी बंधनं देखील घालायची नाही आहेत की मी 6 दिवसांपर्यंत हे अजिबात करणार नाही कारण मला अभ्यास करायचा आहे. मग तुम्ही थकून जाल. तुम्ही योग्य प्रकारे वेळेचे विभाजन करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.

 

सूत्रसंचालक- एक प्रभावी विद्यार्थी बनण्यासाठी पद्धतशीर आणि नियोजनबद्ध कामं कशी करावीत याचं मार्गदर्शन केल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान सर, तुमचा आभारी आहे. माननीय पंतप्रधान सर, रुपेश कश्यप हा विद्यार्थी उल्लेखनीय आदिवासी कला, मंत्रमुग्ध करणारा चित्रकूट धबधबा आणि उत्तम प्रतीचे बांबू यांसाठी प्रसिद्ध असलेल्या छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्याचा रहिवासी आहे. रुपेश या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याला अतिशय महत्त्वाच्या विषयावर तुमचे मार्गदर्शन हवे आहे. रुपेश कृपया तुमचा प्रश्न विचारा.

 

रुपेश- सुप्रभात, माननीय पंतप्रधान सर, माझे नाव रुपेश कश्यप आहे. मी छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील द्राभा इथल्या स्वामी आत्मानंद गव्हर्नमेंट इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नववीत शिकत आहे. सर माझा प्रश्न हा आहे की परीक्षेमध्ये गैरप्रकार कसे टाळता येतील. धन्यवाद, सर.

 

सूत्रसंचालक- धन्यवाद रुपेश. माननीय पंतप्रधान सर, नितळ समुद्रकिनारे, जगप्रसिद्ध रथयात्रा यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक वारशाचे शहर असलेल्या जगन्नाथ पुरी या ओदिशाच्या आध्यात्मिक राजधानीमध्ये राहणाऱ्या तन्मय बिस्वालला याच मुद्यावर तुमचे मार्गदर्शन हवं आहे. तन्मय, कृपया तुमचा प्रश्न विचारा.

 

तन्मयमाननीय पंतप्रधान सर, नमस्कार. माझं नाव तन्मय बिस्वाल आहे. मी ओदिशामधील कोणार्क पुरी येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी आहे. सर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या गैरप्रकारांचे किंवा कॉपी करण्याच्या प्रकारांचे उच्चाटन कसे करता येईल. कृपया यावर मला मार्गदर्शन करा. धन्यवाद सर.

 

सूत्रसंचालक- माननीय पंतप्रधान महोदय, रुपेश आणि तन्मय यांना, परीक्षेत अनुचित प्रकारांचा अवलंब करण्यापासून कसे दूर राहता येईल, याबाबत तुमचे मार्गदर्शन हवे आहे. आदरणीय पंतप्रधान महोदय.

पंतप्रधानआपल्या परीक्षांमध्ये ज्या चुकीच्या गोष्टींचा अवलंब होतो, जे गैरप्रकार होतात, त्यावर काही तरी मार्ग काढला पाहिजे, असे आपल्या विद्यार्थ्यांना देखील वाटत असल्याचे पाहून मला आनंद झाला आहे. विशेषतः जे मेहनती विद्यार्थी असतात त्यांना तर याची खूपच जास्त चिंता असते की मी इतके कष्ट करत आहे आणि हे चोरी करून-करून, कॉपी करून, मदत घेऊन आपली गाडी दामटत राहतात. पूर्वी देखील लोक कदाचित चोरी करत होते, असतील, कॉपी करत होते, असतीलच. पण लपून छपून करत होते. पण आता तर अगदी अभिमानाने सांगतात की पर्यवेक्षकांना कसे बुद्धु बनवले. हा जो मूल्यांमध्ये बदल झाला आहे, तो अतिशय धोकादायक आहे आणि म्हणूनच आपल्याला सर्वांना हे सामाजिक सत्य लक्षात घेऊन यावर विचार करावा लागेल. दुसरा असा अनुभव आला आहे की शाळा किंवा काही असे शिक्षक जे ट्युशन क्लासेस चालवतात त्यांना देखील वाटते की माझ्या विद्यार्थ्याने चांगली कामगिरी केली पाहिजे, कारण मी त्याच्या आई-वडिलांकडून पैसे घेतले आहेत, कोचिंग करताना ते देखील त्याला कॉपी करण्यासाठी मार्गदर्शन करतात, मदत करतात. करतात ना, असे टीचर्स असतात ना, नसतात का, मग बोला ना. आणि यामुळे देखील, दुसरे मी पाहिले आहे काही विद्यार्थी अभ्यासासाठी वेळ देत नाहीत पण कॉपी करण्याचे नवनवीन प्रकार शोधण्यामध्ये खूपच क्रिएटिव्ह असतात. त्यामध्ये तासनतास खर्च करतात, ते कॉपी तयार करतात ती देखील इतक्या लहान लहान अक्षरांनी तयार करतात. कधी कधी तर मला असं वाटतं की कॉपी करण्याचे विविध प्रकार, कॉपी करण्याचे टेक्निक, यामध्ये ते जितका डोक्याचा वापर करतात आणि खूपच क्रिएटिव्ह असतात हे चोऱ्या करणारे. त्याऐवजी हाच वेळ ही क्रिएटिव्हिटी हे टॅलेंट शिकण्यासाठी खर्च केले असते तर कदाचित तो आणखी चांगले करू शकला असता. कोणी तरी त्याला मार्गदर्शन करायला हवे होते, कोणी तरी त्याला समजवायला हवे होते. दुसरी गोष्ट म्हणजे हे लक्षात घ्या की आता आयुष्य खूपच बदलले आहे, जग खूप बदलले आहे आणि म्हणूनच हे लक्षात घेतले पाहिजे एका परीक्षेतून बाहेर पडलो म्हणजे आयुष्याच्या परीक्षेतून बाहेर पडलो असे तर अजिबात शक्य नाही. आज तुम्हाला प्रत्येक पावला-पावलावर प्रत्येक ठिकाणी कोणती ना कोणती परीक्षा द्यावी लागते. किती ठिकाणी कॉपी करणार आहात आणि म्हणूनच जो कॉपी करणारा असतो तो एखाद दुसऱ्या परीक्षेमधून बाहेर पडू शकेल, पण आयुष्याचा टप्पा कधीच ओलांडू शकणार नाही. कॉपी करून आयुष्यात यश मिळवता येऊ शकत नाही. असे होऊ शकते की परीक्षेत इकडे तिकडे करून मार्क मिळाले असतील पण कुठे ना कुठे त्याबाबत प्रश्न उपस्थित होणारच आणि म्हणूनच आपल्याला असे वातावरण तयार केले पाहिजे की एखाद्या परीक्षेत तुम्ही कॉपी केली असेल, त्यातून तुम्ही सुखरुप बाहेरही पडला असाल, पण त्यापुढील आयुष्यात कदाचित तुम्ही अडकून पडाल. दुसरे जे विद्यार्थी कठोर परिश्रम करतात, त्यांना देखील मी सांगेन की आयुष्यात तुमचे कष्ट नक्कीच फळ देतील. असे होऊ शकते की कोणी तरी असेच क्षुल्लक 2-4 मार्क तुमच्यापेक्षा जास्त मिळवले असतील आणि तो तुमच्यापेक्षा वरच्या क्रमांकावर असेल, पण तो कधीही तुमच्या आयुष्यात अडसर निर्माण करू शकणार नाही. तुमच्या आत जे सामर्थ्य आहे, तुमच्या आत जे सामर्थ्य आहे, तेच सामर्थ्य तुम्हाला पुढे नेणार आहे. कृपा करून असे करू नका की त्याचा फायदा झाला तर मग चला मी सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून त्या मार्गाने चालेन. असे कधीही करू नका, कधीही करू नका मित्रहो. परीक्षा तर येतात , जातात, आपल्याला आयुष्य जगायचे आहे, मनापासून जगायचे, जिंकता-जिंकता आयुष्य जगायचे आहे आणि म्हणूनच आपल्याला शॉर्ट-कटच्या दिशेने जायचे नाही आहे. आणि तुम्हाला तर माहीत आहेच, रेल्वे स्थानकांवर तुम्ही पाहिले असेल, प्रत्येक रेल्वे स्थानकात जिथे रुळ असतात ना, तिथे पूल असतात. पण लोकांना पुलावरून जायला आवडत नाही, रुळांवरून उडी मारून ते जातात. काहीच कारण नसते, असेच आपले मजा येते म्हणून. तर तिथे लिहिलेले असते, short cut will cut you short म्हणूनच जर कोणी  short cut ने काही करत असेल तर तुम्ही त्याचा ताण स्वतःवर घेऊ नका. तुम्ही स्वतःला त्यापासून अलिप्त ठेवा. आपल्या स्वतःवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळतील. धन्यवाद.  

 

सूत्रसंचालक - धन्यवाद माननीय पंतप्रधान महोदय. तुमची वचने थेट आमच्या अंतःकरणात खोल रुजली आहेत. तुमचे आभार.

माननीय पंतप्रधान सर, भातशेतीची भूमी असलेले पलक्कड जिथे कापणी झालेल्या पिकांचा मंद सुगंध दरवळत असतो आणि केरळच्या पारंपरिक संगीताचा नाद ऐकू येतो तिथे राहणाऱ्या सुजय के याला तुमचे मार्गदर्शन हवे आहे. सुजय कृपा करून तुमचा प्रश्न विचारा.

 

सुजय- नमस्कार आदरणीय पंतप्रधान महोदय, माझे नाव तेजस सुजय आहे. मी केंन्द्रीय विद्यालय कन्जिकोड, करनाकुलम संभा मध्ये नववीत शिकत आहे. माझा प्रश्न आहे की  Hardwork आणि Smartwork  मध्ये कोणते वर्क गरजेचे आहे. की उत्तम परिणामांसाठी दोन्ही गरजेचे आहे. धन्यवाद श्रीमान.

 

सूत्रसंचालक- धन्यवाद सुजय, माननीय पंतप्रधान सर.

 

पंतप्रधान त्यांचा प्रश्न काय होता, ते काय विचारत होते?

 

सूत्रसंचालक- सर, Hard work विषयी. Hard Work आणि smart Work विषयी.

 

पंतप्रधान- Hard work आणि smart Work,

 

सूत्रसंचालक- धन्यवाद सर.

पंतप्रधान-  बरं तुम्ही बालपणात एक गोष्ट वाचली असेल. सर्वांनी नक्कीच वाचली असेल. आणि यावरून तुम्ही कयास करू शकता की  smart Work काय असते आणि  Hard work काय असते. आपल्या बालपणात आपण एक गोष्ट ऐकायचो की एका मडक्यात पाणी होते. मडक्यातले पाणी खोल गेले होते आणि एका कावळ्याला पाणी प्यायचे होते. पण त्याची चोच तिथपर्यंत पोहोचत नव्हती. मग त्या कावळ्याने लहान लहान दगडगोटे गोळा करून त्या मडक्यात ते टाकले. हळू हळू पाणी वर आले आणि मग त्या कावळ्याला सहजतेने ते पाणी पिता आले. ऐकली आहे ना ही गोष्ट? आता तुम्ही याला काय म्हणाल स्मार्ट वर्क की हार्ड वर्क म्हणाल? आणि बघा जेव्हा ही कथा लिहिली होती तेव्हा स्ट्रॉ नव्हता. नाहीतर कावळा बाजारात जाऊन स्ट्रॉ घेऊन आला असता. बघा काही लोक असतात जे फक्त hard work करत राहतात. काही लोक असतात ज्यांच्या आयुष्यात हार्ड वर्कची नावनिशाणी देखील नसते.  काही लोक असतात जे hardly smart work करतात आणि काही लोक असतात जे smartly hard work करतात म्हणूनच कावळा देखील आपल्याला हे शिकवत आहे की smartly hard work कसे करायचे आहे. आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक कामाचे, प्रत्येक कामाचे बारकावे लक्षात घेतले पाहिजेत. तुम्ही पाहिले असेल काही लोक असतात की एखाद्या गोष्टीची माहिती करून न घेताच स्वतःची बुद्धी वापरू लागतात. खूप कष्ट करूनही अपेक्षित परिणाम मिळतच नाहीत. माझी एक जुनी आठवण आहे, मी पूर्वी आदिवासी पट्ट्यात काम करायचो, त्यामुळे मला जंगलात खूपच आत असलेल्या भागात जायचे होते. तर कोणीतरी आम्हाला त्या काळात जी जुनी जीप असायची तिची व्यवस्था केली होती. आता आम्ही सकाळी 5.30 वाजता निघणार होतो. पण आमची जीप सुरूच होत नव्हती. आम्ही खूप प्रयत्न केले की धक्के मारून पाहिले, हे केले, सर्व प्रकारची मेहनत करून पाहिली. पण जीप काही सुरू झाली नाही. सात साडेसात वाजले तसे एका मेकॅनिकला बोलावण्यात आले. मेकॅनिकला जेमतेम दोन मिनिटं लागली असतील आणि त्याने दोन मिनिटात ती जीप दुरुस्त केली आणि मग तो म्हणाला साहेब 200 रुपये द्यावे लागतील. मी म्हटलं बाबा रे दोन मिनिटांचे 200 रुपये कसे. तर तो म्हणाला साहेब हे 200 रुपये दोन मिनिटांचे नाहीत. माझ्या 50 वर्षांच्या अनुभवाचे 200 रुपये आहेत. जेव्हा आम्ही हार्ड वर्क करत होतो तेव्हा जीप सुरू होत नव्हती. त्याने स्मार्टली दोन बोल्ट थोडेसे टाईट केले असतील. त्याला जेमतेम दोन मिनिटे लागली असतील. गाडी सुरू झाली.     

सांगायचे तात्पर्य हे आहे की प्रत्येक गोष्ट खूप जास्त कष्ट करून कराल तर असे होईल तुम्ही पाहिले असेल जे पैलवान असतात म्हणजे जे क्रीडा क्षेत्रातील लोक असतात त्यांना ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत त्या खेळामध्ये कोणत्या mussels ची गरज असते. जे प्रशिक्षक असतात त्यांना माहीत असते. म्हणजे जर समजा विकेट कीपर असला तर विकेट कीपरला वाकून तासनतास उभे राहायचे असते. आपण वर्गात काही चूक केली आणि शिक्षकांनी कान धरून खाली बसवले तर असे हात पाय आत टाकल्यावर किती वेदना होतात. होतात की नाही? हे तर Psychological देखील असते, physical देखील असते कारण पाय असे करून कान पकडून बसायचे असते. त्रास होतो ना? पण हा जो विकेट कीपर असतो ना त्यांच्या प्रशिक्षणाचा तो भाग असतो. त्यांना तासनतास असे उभे ठेवतात. जेणेकरून हळू हळू त्यांचे ते mussels मजबूत होत जातील आणि तो विकेट कीपर म्हणून चांगली कामगिरी करेल.

जर गोलंदाज असेल तर त्याला त्या पद्धतीची गरज नाही. त्याला दुसऱ्या शैलीची आवश्यकता असेल, तर त्याच्याकडून त्या शैलीची तयारी करून घेतात. आणि म्हणूनच आपणही जे आवश्यक आहे त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जे आपल्यासाठी उपयुक्त आहे. हवे ते सर्व प्राप्रत करण्याच्या प्रयत्नात खूप कष्ट करावे लागतील. हात पाय उंचावत राहा, धावत राहा, अमके करा, तमके करा, सर्वसाधारणपणे निरोगी राहण्यासाठी असे करणे ठीक आहे. पण मला एखादी विशिष्ट बाब साध्य करायची असेल तर त्या विशिष्ट बाबीसाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. आणि ही समज ज्याला असते, तो निकालही देतो. जर एखादा गोलंदाज असेल आणि त्याचे स्नायू तंदुरूस्त नसतील तर त्याला गोलंदाजी करता येईल का? किती षटके टाकता येतील त्याला? जे लोक भारोत्तोलन करतात त्यांना वेगळ्या प्रकारचे स्नायू मजबूत करावे लागतात. ते सुद्धा कष्ट करतात. पण ते हुशारीने मेहनत करतात. आणि हुशारीने मेहनत करतात, तेव्हाच मनाजोगे परिणाम मिळतात. अनेकानेक आभार.

 

सादरकर्ता - आदरणीय पंतप्रधान महोदय, आयुष्यात सातत्यपूर्ण आणि कठोर परिश्रम निवडण्याबाबत आपण मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल आपले आभार. माननीय पंतप्रधान महोदय, गुरू द्रोणाचार्य यांच्या नावे ओळखल्या जाणार्‍या सायबर सिटी हरियाणामधील गुरुग्राम या प्रसिद्ध औद्योगिक शहरातील विद्यार्थिनी जोविता पात्रा सभागृहात उपस्थित आहेत आणि तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितात. जोविता कृपया तुमचा प्रश्न विचारा.

जोविता पात्रानमस्कार, आदरणीय पंतप्रधान महाशय, माझे नाव जोविता पात्रा आहे आणि मी गुरुग्राम हरियाणा येथील जवाहर नवोदय विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थीनी आहे. परिक्षा पे चर्चा 2023 मध्ये सहभागी होणे ही माझ्यासाठी खूपच खास आणि सन्मानाची बाब आहे. माननीय पंतप्रधान महोदय, मी एक साधारण विद्यार्थीनी आहे, मी माझ्या अभ्यासावर कसे लक्ष केंद्रित करावे, असा माझा प्रश्न आहे. कृपया या विषयावर मला मार्गदर्शन करा. धन्यवाद महोदय.

 

सादरकर्ता - धन्यवाद जोविता. माननीय पंतप्रधानजी, जोविता पात्रा या एक साधारण विद्यार्थिनी आहेत, परीक्षेत अधिक चांगली कामगिरी कसे करावे याबद्दल तुमचे मार्गदर्शन हवे आहे. कृपया त्यांना मार्गदर्शन करावे. आदरणीय पंतप्रधान.

 

पंतप्रधान- सर्वात आधी मी तुमचे अभिनंदन करतो की तुम्ही साधारण आहात, याची जाणीव तुम्हाला आहे. नाहीतर असे अनेक लोक असतात, ज्यांचे आकलन सरासरीपेक्षाही कमी असते, पण ते स्वतःला फार महान समजतात. त्यामुळे सर्वप्रथम मी तुमचे आणि तुमच्या पालकांचेही अभिनंदन करतो. एकदा तुम्ही हे स्वीकारले की हो, माझी क्षमता अमूक एक आहे, माझी परिस्थिती अमूक आहे, आता मला माझ्या क्षमतेला अनुकूल बाबी शोधाव्या लागतील. मी काही महान वगैरे असायची आवश्यकता नाही. ज्या दिवशी आपल्याला आपली क्षमता कळते, आपण सर्वात जास्त सामर्थ्यवान होतो. ज्यांना स्वतःची क्षमता माहीत नसते, त्यांना सामर्थ्यवान होण्यात अनेक अडथळे येतात. म्हणूनच परिस्थितीची जाणीव असणे, हे देवाने तुम्हाला दिलेले सामर्थ्य आहे. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला शक्ती दिली आहे. तुमच्या कुटुंबाने तुम्हाला बळ दिले आहे. आणि प्रत्येक पालकाने आपल्या मुलांचे योग्य मूल्यमापन करावे, असे मला वाटते. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नका. पण योग्य मूल्यमापन करा.

कधी कधी तुम्हाला त्यांच्यासाठी खूप महागडी वस्तू आणायची असते. तेव्हा तुम्ही त्याला अगदी सहज सांगा की नाही बाबा, आता आपली एवढी ऐपत नाही, आम्ही ही गोष्ट आणू शकणार नाही. असे कर, दोन वर्षे थांब. असे करणे चुकीचे नाही. तुम्ही मुलांसोबत घरातील परिस्थितीबद्दल बोलू शकत असाल, तर त्यात वाईट काहीच नाही. आणि म्हणून आपण साधारण लोक आहोत आणि बहुतेक लोक साधारणच असतात. असाधारण असणारे लोक फार कमी असतात.

पण सामान्य आणखी साधारण गोष्टी करतात आणि जेव्हा हे सामान्य लोक असाधारण कामे करतात तेव्हा ते फार पुढे निघून जातात. सरासरीचे निकष मागे टाकून ते पुढे निघून जातात. आता त्यामुळेच आपण असा विचार केला पाहिजे आणि जगात पाहिले तर यश मिळवणारे जास्तीत जास्त लोक कोण आहेत? एकेकाळी साधारण असणारेच हे लोक आहेत. असाधारण कामे करून ते इथवर पोहोचले आहेत. फार मोठे परिणाम घडवून आणले आहेत. आता तुम्ही पाहिलेच असेल की आजकाल संपूर्ण जगाच्या आर्थिक परिस्थितीची चर्चा जगभरात होते आहे. कोणता देश किती पुढे गेला आहे, त्याची आर्थिक स्थिती कशी आहे. आणि कोरोना नंतरच्या काळात तर हा एक महत्वाचा निकष ठरला आहे आणि जगात अर्थशास्त्रज्ञांची कमतरता आहे, असे मुळीच नाही. अनेक मोठे नोबेल पारितोषिक विजेते आहेत. अमूक एक केल्याने अमूक प्रकारची आर्थिक परिस्थिती निर्माण होईल, अशा प्रकारचे मार्गदर्शन करू शकतील, असे अनेक जण आहेत. या बाबतीत कोणतीही कमतरता नाही. ज्ञानाच्या प्रवाहाचे वाटप करणारे आजकाल प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि काही असे विद्वानही उपलब्ध आहेत, ज्यांनी खूप काही केले आहे. पण आपण पाहिले आहे की आज जगात भारताची आर्थिकदृष्ट्या तुलना होते आहे, आशेचा किरण म्हणून भारताकडे पाहिले जाते आहे. तुम्ही दोन-तीन वर्षांपूर्वी पाहिले असेल, आपल्या सरकारबद्दल लिहिले जात असे की यांच्याकडे कोणीही अर्थतज्ज्ञ नाही. सगळेच साधारण लोक आहेत. पंतप्रधानांना सुद्धा अर्थशास्त्राचे ज्ञान नाही. असेच लिहिले जात असे. वाचता ना तुम्ही असे? पण आज ज्या देशाला जगभरात साधारण, सरासरी म्हटले जायचे, तोच देश आज जगात चमकतो आहे मित्रांनो! म्हणूनच मित्रहो, तुम्ही असामान्य नाही, या दडपणाखाली राहू नका. आणि दुसरे म्हणजे, तुम्ही साधारण असलात तरी तुमच्यात काही ना काही असाधारण असेलच आणि जे असाधारण आहेत त्यांच्यातही काहीतरी सामान्य असेलच. प्रत्येकाकडे देवाने दिलेली एक अद्वितीय क्षमता असतेच. तुम्ही फक्त ती ओळखली पाहिजे, त्या क्षमतेला खत पाणी घाला, तुम्ही खूप वेगाने पुढे जाल, असा विश्वास मला वाटतो. धन्यवाद.

 

सादरकर्ता  आदरणीय पंतप्रधान महोदय, अनेक विद्यार्थ्यांना आणि भारतीयांना, आपणही मौल्यवान आहोत, महत्वाचे आहोत, असे वाटावे यासाठी तुम्ही दिलेले प्रोत्साहन मोलाचे आहे, तुमचे मनापासून धन्यवाद. माननीय पंतप्रधान महाशय, मन्नत बाजवा या चंदीगड शहरातल्या आहेत. हे शहर आधुनिक स्थापत्यकलेसह शहरी नियोजनासाठी आणि प्रसिद्ध शिल्पकार नेकचंद यांनी उभारलेल्या निसर्गरम्य रॉक गार्डनसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असणाऱ्या मूलभूत मुद्द्यावर तीला तुमचे मार्गदर्शन हवे आहे. मन्नत कृपया तुमचा प्रश्न विचारा.

 

मन्नत बाजवा- नमस्कार आदरणीय पंतप्रधानजी, माझे नाव मन्नत बाजवा आहे. मी सेंट जोसेफ वरिष्ठ माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी आहे. मला तुम्हाला असे विचारायचे आहे की, जेव्हा मी तुमच्यासारख्या प्रतिष्ठित पदावर काम करत असल्याची कल्पना करते, ज्या पदावरून भारतासारख्या देशाचा कारभार चालवायचा, जिथे एवढी जास्त लोकसंख्या आहे आणि जिथे आपले स्वतंत्र मत मांडणारे खूप जण आहेत. तुमच्याबद्दल नकारात्मक विचार असणारे लोकही आहेत. अशा लोकांचा परिणाम तुमच्यावर होतो का? आणि होत असेल तर तुम्ही स्वयंसंदेहाच्या भावनेवर कशी मात करता? याबाबत मला तुमचे मार्गदर्शन हवे आहे. धन्यवाद महोदय.

 

सादरकर्ता - धन्यवाद मन्नत, माननीय पंतप्रधान महोदय, अष्टमी सेन या सिक्कीममध्ये राहतात. चहाच्या बागेसाठी प्रसिद्ध असलेला आणि नितांतसुंदर सौंदर्याने समृद्ध असा हिमालयातील हा शांत परिसर आहे. लक्ष देणे आवश्यक असलेल्या बाबींवर आपण मार्गदर्शन करावे, अशी विनंती अष्टमीने सुद्धा केली आहे. अष्टमी, कृपया तुमचा प्रश्न विचारा.

 

अष्टमीनमस्कार माननीय पंतप्रधानजी. माझे नाव अष्टमी सेन आहे. मी दक्षिण सिक्कीम  मधील रंगीत नगर येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमधील इयत्ता अकरावीची विद्यार्थीनी आहे. मला तुम्हाला विचारायचे आहे की जेव्हा विरोधी पक्ष आणि प्रसारमाध्यमे तुमच्यावर टीका करतात तेव्हा तुम्ही त्यांचा सामना कशा प्रकारे करता? मला माझ्या पालकांच्या तक्रारी आणि निराशेने बोलणे, या बाबींचा सामना करता येत नाही. कृपया मला मार्गदर्शन करा. धन्यवाद.

 

सादरकर्ता  धन्यवाद अष्टमी. आदरणीय पंतप्रधान महोदय, राष्ट्रपिता महात्मा गांधी, सरदार पटेल आणि स्वामी दयानंद सरस्वती यांसारख्या महापुरुषांची जन्मभूमी असलेल्या गुजरातमधून कुमकुम प्रताप भाई सोलंकी या आभासी माध्यमातून आपल्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत आणि त्यांचा प्रश्नही साधारण असाच आहे. कुमकुमलाही तुमचे मार्गदर्शन हवे आहे. कुमकुम कृपया तुमचा प्रश्न विचारा.

 

कुमकुम- आदरणीय पंतप्रधानजी, माझे नाव सोलंकी कुमकुम आहे. मी गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील श्री हडाला बाई हायस्कूलमधील इयत्ता बारावीची विद्यार्थीनी आहे. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही इतक्या मोठ्या लोकशाहीप्रधान देशाचे पंतप्रधान आहात आणि तुम्हाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. तुम्ही या आव्हानांना कसे सामोरे जाता? कृपया मला मार्गदर्शन करा. धन्यवाद

 

सादरकर्ता - धन्यवाद कुमकुम. आदरणीय पंतप्रधान महोदय, आकाश दारिरा हे भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये राहतात. हे शहर पारंपारिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या उपक्रमांसाठी उत्तम ठिकाण मानले जाते. आपल्या प्रश्नाच्या माध्यमातून त्यांना, गेला काही काळ त्यांच्या मनात असणाऱ्या अशाच काही विषयांवर तुमचा सल्ला हवा आहे. आकाश, कृपया तुमचा प्रश्न विचारा.

 

आकाश- नमस्कार मोदीजी. मी आकाश दारिरा, बंगळुरूमधील फिल्ड ग्लोबल स्कूलमध्ये इयत्ता बारावीचा विद्यार्थी आहे. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की माझी आजी कविता ए मखिजा, मला नेहमीच तुमच्याकडून शिकवण घेण्याचा सल्ला देतात. तुम्ही प्रत्येक आरोपाकडे, विरोधकांनी केलेल्या प्रत्येक टीकेकडे संधी म्हणून पाहता, हे शिकायला सांगते. मोदीजी तुम्ही हे कसे करता? कृपया आम्हा तरुणांनाही प्रेरणा द्या, म्हणजे आम्हीही जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यशस्वी होऊ शकू. धन्यवाद.

 

सादरकर्ता  धन्यवाद आकाश. माननीय पंतप्रधानजी, तुमचे आयुष्य कोट्यवधी तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. मन्नत, अष्टमी, कुमकुम आणि आकाश यांना, आयुष्यातील आव्हानांच्या काळात सकारात्मक कसे राहायचे आणि यश कसे मिळवायचे, याबद्दल तुमचे अनुभव जाणून घ्यायचे आहेत. कृपया मार्गदर्शन करावे, आदरणीय पंतप्रधान.

 

पंतप्रधान - तुम्ही परीक्षा देता आणि घरी आल्यावर तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत बसता. शिक्षकांशी जवळचे नाते असले तर त्यांच्यासोबत बसतो. आणि एखाद्या प्रश्नाचे उत्तर बरोबर नसेल तर तो प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचा होता, अशी तुमची पहिली प्रतिक्रिया असते.  असेच होते, नाही का? हे देखील अभ्यासक्रमाबाहेरचे आहे. पण तुम्हाला काय म्हणायचे आहे, याचा मी अंदाज लावू शकतो. तुम्ही मला या विषयाबाबत विचारले नसते तर कदाचित तुम्हाला तुमचा मुद्दा वेगळ्या पद्धतीने मांडायचा असू शकला असता. पण कदाचित तुमच्या घरची मंडळी ऐकत आहेत, हे तुम्हाला माहीती आहे, त्यामुळे असे उघडपणे बोलणे धोक्याचे आहे, म्हणून अगदी चतुरपणे तुम्ही मला घेरले आहे.

माझ्याबद्दल बोलायचे झाले तर माझे एक विशिष्ट मत आहे आणि माझ्यासाठी ही विश्वासाची बाब आहे. टीका हा समृद्ध लोकशाहीसाठी शुद्धीकरण यज्ञ आहे, असे मी तत्त्वत: मानतो. टीका ही समृद्ध लोकशाहीची पूर्वअट आहे. आणि म्हणूनच तुम्ही पाहिले असेल की तंत्रज्ञानामध्ये ओपन सोर्स टेक्नॉलॉजी असते, हे तुम्ही पाहिले असेल, ठाऊक आहे ना? हा ओपन सोर्स आहे, प्रत्येकजण आपापल्या विचारांची भर घालतो आणि ओपन सोर्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून परवानगी दिली जाते की बघा, आम्ही हे केले आहे, आम्ही येथे अडकलो आहोत, कदाचित काही उणीवा असतील. त्यामुळे लोक त्यात स्वतःच्या तंत्रज्ञानाची भर घालतात. आणि अनेक लोकांच्या प्रयत्नांनी ते पूर्णपणे समृद्ध असे सॉफ्टवेअर तयार होते. मुक्त स्त्रोत हे आजकाल एक अतिशय शक्तिशाली साधन मानले जाते. अशाच प्रकारे काही कंपन्या आपले उत्पादन बाजारात ठेवतात आणि त्यातल्या उणिवा दाखवेल त्याला बक्षीस देऊ, असे आव्हान देतात. अमूक एक प्रणाली तयार केली आहे, याचा अर्थ उणीवा दूर करण्याचा मार्ग कोणीतरी दाखवावा असे प्रत्येकाला वाटते, नाही का? लक्षात घ्या, काही वेळा काय होते की टीका करणाऱ्यावरच प्रकरण शेकते. उदाहरणार्थ, समजा तुमच्या शाळेत वेशभूषा स्पर्धा आहे आणि तुम्ही वेशभूषा करून मोठ्या उत्साहात गेलात आणि तुमचा एखादा जिवलग मित्र आहे, ज्याचे बोलणे तुम्हाला नेहमी आवडते. तो म्हणतो, की अरे हे काय घातले आहेस, अजिबात चांगले दिसत नाही. हे ऐकल्यानंतर तुमची एक विशिष्ट प्रतिक्रिया असेल. आणि दुसरा एक विद्यार्थी आहे, जो तुम्हाला फारसा आवडत नाही, त्याला पाहून तुम्हाला नकारात्मक वाटते, तुम्हाला त्याचे बोलणे अजिबात आवडत नाही. जर तो म्हणाला की बघा, काय घालून आला आहे, अशी वेशभूषा करतात का.. मग त्यावेळी तुमची प्रतिक्रिया वेगळी असेल. का? ज्याच्याबद्दल आपुलकी वाटते, त्याची टीका तुम्ही सकारात्मकतेने ऐकता, पण जा तुम्हाला पटत नाही, त्याने तेच सांगितले, तर तुम्हाला आवडत नाही. तुम्हाला राग येतो, तू कोण आहेस, माझी मर्जी.. असे होते ना.. नाही का? त्याचप्रमाणे सवय म्हणून टीका करत असतील, तर त्या टीकेला एका खोक्यात टाका. डोक्याला त्रास करून घेऊ नका, कारण त्यांचा हेतू काहीतरी वेगळाच असतो. आता घरात टीका होत असेल तर खरेच काही चूक होत असेल. घरात टीका होत नसेल तर ती दुर्दैवाची बाब आहे.

टीका करण्यासाठी माता-पित्यांनाही खूप अभ्यास करावा लागतो. तुमचं निरीक्षण करावं लागतं, तुमच्या शिक्षकांना भेटावं लागतं, तुमच्या मित्रमंडळींच्या सवयी कोणत्या आहेत, हे जाणून घ्यावं लागतं. तुमची दिनचर्या कशी आहे, हे समजून घ्यावं लागतं. एकप्रकारे तुम्हाला ‘फॉलो’च करावं लागतं. तुमचा मोबाईलवर किती वेळ जात आहे, तुमचा किती ‘स्क्रीन टाईम’ आहे, अशा सर्व गोष्टींकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवले जाते,  तेही काहीही न बोलता आई-वडील या सगळ्या गोष्टींचे निरीक्षण करीत असतात. आणि मग ज्यावेळी तुम्ही चांगल्या मनस्थितीमध्ये असता, त्यावेळी ते हे पाहतात, की आज हा चांगल्या मूडमध्ये आहे, एकटाच आहे, त्यावेळी अगदी प्रेमाने तुम्हाला ते सांगतात, ‘‘ अरे बाळा, तुझ्यामध्ये खूप क्षमता आहे. इतकं काही करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे, आणि हे पाहा ; तुझी सगळी शक्ती कुठंतरीच का बरं जात आहे, असे दाखवून दिले जाते, योग्य जागी मत नोंदवले जाते, अशावेळी केलेली टीका उपयुक्त होईल. कारण आजकाल आई-वडिलांकडेही वेळ नाही. ते अशा प्रकारे टीका टिप्पणी करत नाहीत, मात्र रोखण्याचं, टोकण्याचं काम करतात आणि तुम्हाला त्या टोकण्याचा खूप राग येतो, त्यांच्या बोलण्याचा संताप येतो. काहीही करा, अगदी जेवायला बसल्यानंतर, तुम्ही अमूक पदार्थ खाल्ला तरी काहीतरी बोलणार, नाही खाल्ला तरीही बोलणारच. असेच काही होते ना? आता पहा, तुमचे आई-वडील तुम्ही घरी गेलात की अगदी पकडून ठेवणार आहेत. एक लक्षात घ्या, आई-वडिलांनी टोकणे म्हणजे काही टीका नाही. आता मात्र मी सर्व आई-वडिलांना आग्रह करणार आह की, कृपा करून आपल्या मुलाच्या कल्याणासाठी अशा प्रकारे रोखण्याचे, टोकण्याचे काम वारंवार करू नये. अशा गोष्टीतून सर्व पालकांनी बाहेर पडावे. असे बोलून तुम्ही मुलांच्या आयुष्याचे,जीवनाचे मोल करू शकत नाही. आणि जर मुलांचा मूड चांगला असताना, तुम्ही त्याला काही बोललात तर सगळीच गडबड होते. सकाळी सकाळी मुलाचा मूड चांगला असताना जर तुम्ही त्याला म्हणालात, ‘‘अरे दूध अगदी थंडगार झालं बघं, तू दूध पीत नाही, तू तर असाच आहे, झालं का सुरू, तो अमूक बघ कसा वागतो, आपल्या आईनं सांगितलं की, लगेच दूध पिवून टाकतो.’’ आता तुम्ही इतकं बोलल्यानंतर त्याचा मेंदूच सरकतो. आणि संपूर्ण दिवस त्याचा वाईट जातो.

आणि म्हणून तुम्ही पहा, आम्ही मंडळी संसदेमध्ये काय करतो,  तुम्ही कधी संसदेमध्ये सुरू असलेली चर्चा पाहिली असेल. संसदेच्या टी.व्ही कार्यक्रमामध्ये तुम्ही पाहिले असेल, काही लोक खूप चांगली तयारी करून येतात. संसदेमध्ये भाषण देण्यासाठी ते आपली छान तयारी करून येतात. परंतु समोरच्या बाजूला जे विरोधी पक्षांचे लोक बसलेले असतात ना, ते स्वाभाविकपणे विरोधक आहेत. ते काही तुमची मानसिकता जाणून घेत  नाहीत. विरोधकांपैकी कुणीतरी काहीतरी गडबड होईल अशी,  बसल्या जागेवरूनच टिप्पणी करतात. कारण त्यांना माहिती असते की, आपण असे काही बोललो तर त्यावर हा बोलणारा व्यक्ती प्रतिक्रिया देईलच. आणि विरोधकांच्या बाजूने एकदम टिप्पणी आल्यामुळे ती सदस्याला आता महत्वाची वाटते. या गोंधळामध्ये सरकारी पक्षाचा,  भाषणाची  उत्तम तयारी करून आलेला  खासदार  आपले भाषण,  महत्वाचे मुद़्दे बाजूला ठेवतो, जणू विसरून जातो. आणि त्या सदस्याच्या टिप्पणीवर उत्तर देत बसतो. यामुळे आपला वेळ, तयारी सगळं काही वाया घालवतो. आणि जर का सत्ताधारी खासदाराने विरोधकांकडून आलेल्या टिप्पणीला हसून, गंमत मानून उत्तर दिले, किंवा नंतर बोलू असं सांगून तो विषय हसत तिथंच संपवला तर दुस-या सेंकदाला त्याला आपले अभ्यासपूर्ण भाषण सुरू करणे शक्य होते. यामुळे त्याला ‘फोकस अॅक्टिव्हिटी’चे परिणाम मिळतात. आणि म्हणूनच आपल्याला आपला ‘फोकस’ कधीच सोडायचा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, टीका करण्यासाठीही खूप परिश्रम पडत असतात. खूप अभ्यास करावा लागतो. त्याचे विश्लेषण करावे लागते. तुलना करावी लागते. भूतकाळ पहावा लागतो. वर्तमानात काय सुरू आहे, हे पहावे लागते. भविष्य पहावे लागते. यासाठी खूप परिश्रम करावे लागतात. मग कुठे टीका करणे शक्य होत असते. आणि म्हणूनच आजकाल शॉर्टकटचा काळ यामध्येही आला आहे. बहुतांश लोक आता आरोप करतात,  टीका करीत नाहीत. आरोप आणि टीका यांच्यामध्ये खूप मोठे अंतर आहे. एक मोठी दरीच आहे. आपण आरोपांना टीका समजू नये. टीका, निंदा  तर एकप्रकारे आपल्याला समृद्ध करणारा पोषक घटक आहे. कुणीही लावलेल्या  आरोपांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. त्यामध्ये आपला वेळ वाया घालवण्याची गरज नाही. मात्र टीका,निंदा कधीच कमी, हलकी मानली जावू नये. टीका नेहमीच मौल्यवान समजली पाहिजे. कुणीही केलेली टीका आपले आयुष्य निर्माण करण्यासाठी खूप उपयोगी ठरत असते. आणि जर आपण प्रामाणिक असू , आपण प्रामाणिकपणे सत्यनिष्ठेने काम केले आहे. समाजासाठी काम केले आहे. एक निश्चित ध्येयासाठी काम केले आहे, तर आरोपांची अजिबात पर्वा करू नका मित्रांनो!  केले गेलेले आरोपच तुमची एक खूप मोठी शक्ती बनेल, असे मला वाटते. खूप -खूप धन्यवाद!

निवेदक - माननीय पंतप्रधान जी, आपण सकारात्मक ऊर्जेने कोट्यवधी देशवासियांना नवीन मार्ग दाखविलात. आपल्याला धन्यवाद! माननीय पंतप्रधान जी, ‘तलावांचे शहर भोपाळमधून  दीपेश अहिरवार  आभासी माध्यमातून आपल्याबरोबर जोडले गेले आहेत आणि ते मान्यवर पंतप्रधानांना प्रश्न विचारू इच्छित आहेत. दीपेश जी, कृपया आपला प्रश्न विचारावा.

 

दीपेश - माननीय पंतप्रधान जी, नमस्कार ! माझं नाव दीपेश अहिरवार आहे. मी शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय, भोपाळचा दहावीचा विद्यार्थी आहे. आजकाल मुलांमध्ये काल्पनिक खेळ आणि इंस्टाग्रामची सवय ही अगदी सामान्य गोष्ट बनली आहे. अशा काळात आम्ही अभ्यासावर लक्ष कसे केंद्रीत करावे? माननीय सर, माझा आपल्याला असा प्रश्न आहे की, आम्ही आमचे मन भटकू न देता, अभ्यासावर लक्ष कसे केंद्रीत करावे? या विषयावर  आपल्याकडून मार्गदर्शन मिळावे, अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद!

निवेदक -  धन्यवाद दीपेश. माननीय पंतप्रधान जी, अदिताब गुप्ताचा प्रश्न इंडिया टी.व्हीच्यावतीने निवडण्यात आला आहे. अदिताब आपल्याशी आभासी माध्यमातून जोडले जात आहेत. अदिताब,  आपला प्रश्न विचारावा.

 

अदिताब गुप्ता - माझे नाव अदिताब गुप्ता आहे. मी इयत्ता दहावीमध्ये शिकतोय. जसजसे तंत्रज्ञान वाढत आहे, तसतसे आमच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन अधिकाधिक वाढत जात आहे. आमचे लक्ष अभ्यासावरचे कमी होत चालले आहे. आणि समाजमाध्यमांवर आमचे लक्ष जास्त असते. त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की, आम्ही अभ्यासावर कसे फोकस करावे आणि समाज माध्यमांवरचे लक्ष, तिकडे जाणारा वेळ कसा कमी करावा. कारण तुमच्या काळामध्ये तर इतक्या प्रकारची डिस्ट्रॅक्शन करणारी साधने नव्हती. आता आमच्यावेळी अशी अनेक साधने आहेत.

 

निवेदक - धन्यवाद अदिताब गुप्ता, माननीय पंतप्रधान जी, यानंतरचा प्रश्न कामाक्षी राय यांचा अनेक विद्याथ्र्यांच्यावतीने विचारला जाणारा  आहे. रिपब्लिक टी.व्ही.च्यावतीने हा कामाक्षी यांचा प्रश्न निवडला आहे. कामाक्षी, कृपया आपला प्रश्न विचारावा.

 

कामाक्षी राय - माननीय पंतप्रधान आणि सर्वांना माझा नमस्कार ! मी कामाक्षी राय. मी दहावीची विद्यार्थिनी असून दिल्लीमध्ये असते.  माझा आपल्याला प्रश्न  असा आहे की, परीक्षेच्या काळामध्ये आमचे मन इतरत्र कुठेही भटकू नये, सहजच इकडे-तिकडे जावू नये, यासाठी आम्ही कोणकोणत्या वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब आम्हाला करता येईल? धन्यवाद!

 

निवेदक - धन्यवाद कामाक्षी. माननीय पंतप्रधान जी, या प्रश्नाची निवड झी टी.व्ही.च्यावतीने करण्यात आली आहे. मनन मिततल आपल्याशी आभासी पद्धतीने जोडले गेले आहे. मनन कृपया आपला प्रश्न विचारावा.

 

मनन मित्तल - नमस्ते पंतप्रधान  जी! मी मनन मित्तल, डीपीएस बंगलुरू साउथमधून बोलतोय. माझा आपल्याला एक प्रश्न आहे. ऑनलाईन अभ्यास करताना खूप प्रकारे डिस्ट्रॅक्शन होते. जसे की, ऑनलाईन गेमिंग वगैरे, वगैरे. यातून आम्ही स्वतःला कसे वाचवावे, स्वतःला कसे यापासून दूर ठेवावे?

 

पंतप्रधान - जे गॅजेटमध्येच हरवून जातात, ते काय विद्यार्थी आहेत का?

 

निवेदक - धन्यवाद मनन! माननीय पंतप्रधान जी, दीपेश, अदिताब, कामाक्षी आणि मनन यांची परीक्षेमध्ये निर्माण करणा-या बाधा आणि त्यामधून कसे बाहेर पडायचे, याविषयी आपल्याकडून मार्गदर्शन मिळावे अशी इच्छा आहे. माननीय पंतप्रधानांनी, कृपया मार्गदर्शन करावे.

 

पंतप्रधान - सर्वात पहिल्यांदा तर निर्णय याचा करायचा आहे की, तुम्ही स्मार्ट आहात की, गॅजेट स्मार्ट आहे? काही काही वेळेस तर असे वाटते की, तुम्ही तुमच्याहीपेक्षा ही गॅजेट स्मार्ट आहेत, असे मानत आहात. आणि चूक तिथूनच होतेय. तुम्ही विश्वास ठेवा की, परमात्म्याने तुम्हाला खूप प्रचंड शक्ती दिली आहे. तुम्ही स्मार्ट आहात, गॅजेट तुमच्यापेक्षा स्मार्ट असू शकत नाही. तुमच्याकडे जितका जास्त स्मार्टनेस आहे, तितका योग्य वापर तुम्ही गॅजेटचा करू शकणार आहात. हे एक यंत्र आहे. हे यंत्र आपल्या गतीमध्ये नवीन वेग आणते. असा जर आपण विचार करणार असाल तर मला असे वाटते की कदाचित अगदी कदाचितच तुम्ही त्यापासून मुक्त होवू शकाल. दुसरा मुद्दा म्हणजे, देशासाठी खूप मोठा चिंतेचा विषय बनतोय. मला कोणीतरी सांगत होते की, भारतामध्ये सरासरी 6 तास लोक स्क्रीनवर घालवतात. सहा तास! आता याचा व्यवसायच जी मंडळी करीत आहेत, त्यांच्यासाठी तर ही आंनदाची गोष्ट होवू शकते. ज्यावेही मोबाइल फोनवर टॉकटाइम होत असे, त्यावेळी त्या टॉकटाइममध्ये असे सांगतात की, सरासरी 20 मिनिटे जात होती. मात्र ज्यावेळेपासून स्क्रीन आणि त्यामध्ये रील, असे काही आहे ना? एकदा का ते सुरू केले की, त्यामधून बाहेर पडले जाते का? असे काय होते? तुम्ही कोणी यावर बोलले नाही का, तुम्ही मंडळी रील पहात नाही का? नाही पहात ना? मग इतके लाजयला काय झाले? सांगा ना, तुम्ही रीलमधून बाहेर पडता का? असे आहे पहा, आपलं वय निर्मितीक्षम आहे आणि आपल्या निर्मितीक्षमते सामथ्र्य जर सरासरी हिदुस्तानमध्ये 6 तास स्क्रीनवर जात असेल तर हा खूपच चिंतेचा विषय आहे. एक प्रकारे गॅजेट आपल्याला  गुलाम बनवत आहेत. आपण त्यांचे गुलाम बनून जगत आहोत. परमात्माने आपल्याला एक स्वतंत्र अस्तित्व दिले आहे, स्वतंत्र व्यक्तित्व दिले आहे. आणि म्हणूनच आपल्याला याविषयी सचेत होणे आवश्यक आहे की, मी याचा गुलाम तर बनत नाही ना, याविषयी जागरूक राहिले पाहिजे. तुम्ही पाहिले असेल की, कधी पाहिले असेल, माझ्या हातामध्ये कधीही कोणताही मोबाइल फोन फार क्वचित अगदी कधीतरीच पाहिला असेल. खूपच क्वचित दिसला असेल. मी स्वतःला यापासून दूर, सांभाळून का बरं ठेवलं आहे? वास्तविक मी अतिशय अॅक्टिव आहे. परंतु त्यासाठी मी एक विशिष्ट वेळ निश्चित केली आहे. त्यावेेळेपेक्षा जास्त काळ मी मोबाईल हातात घेत नाही. आणि मी पाहतो, बैठक अगदी उत्तम सुरू असते, खूप महत्वपूर्ण चर्चा सुरू असते, आणि अशावेळी थोडेसे व्हायब्रेशन आले की, फोन लगेच काढून पाहणारे लोक आहेत. मला असे वाटते की, आपण स्वतःहून अगदी प्रयत्न करून आपण या गॅजेटचे गुलाम बनणार नाही, असे वर्तन केले पाहिजे. मी एक स्वतंत्र व्यक्तित्व आहे, माझे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्यामध्ये माझ्या कामाची जी गोष्ट आहे,त्या मर्यादेतच मी राहणार आहे. मी तंत्रज्ञानाचा उपयोग करणार आहे, तंत्रज्ञानापासून दूर पळून जाणार नाही, परंतु त्याची उपयोगिता आणि आवश्यकता यांचा विचार करून आपल्या गरजेपुरताच मी वापर करणार आहे. आता असे मानूया की, आपण डोसा बनविण्याची उत्तम पाककृती आॅनलाइन वाचली आहे. एक तास खर्च करून डोसा बनविण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, हे वाचले, अगदी सर्व कृती पाहिलीही. त्यामुळे काही पोट भरणार आहे का? भरणार आहे का? डोसा खायला मिळणार आहे का? नाही भरणार ना? त्यासाठी डोसा बनवून तो खावा लागेल. आणि म्हणजेच गॅजेट जे काही आपल्यासमोर मांडतो, ठेवतो, त्याने तुम्हाला पूर्णता येणार नाही, देणार नाही. तुमच्यामध्ये असलेले सामथ्र्य कृती प्रत्यक्षात तुम्ही करण्यामध्ये आहे. ते पाहण्यात नाही. आता तुम्ही पाहिले असेल की, पूर्वीच्या काळी मुले अगदी आरामात पाढे मुखोद्गत म्हणत असत. पाढे म्हणतात ना? आणि अगदी उत्तम प्रकारे, आरामात पाढे म्हणत होते. आणि मी तर पाहिले आहे की, भारतातून जी मुले परदेशात जात होती, त्यांच्याविषयी परदेशातील लोकांना खूप आश्चर्य वाटत होते की, ही मुले, इतके अवघड पाढे कसे काय म्हणू शकतात? आपल्याकडे त्यावेळी त्याचे विशेष महत्व वाटले नाही. आणि आता पहा, हळूहळू काय झाले आहे? पाढे म्हणणारी मुले, आता शोधावी लागतात. असं का बरं झालं? कारण आपण पाढे म्हणण्याची क्षमता आता हरवून बसत आहोत. आपल्याला स्वतःमधील क्षमता हरवून बसायच्या नाहीत, तर आपल्या क्षमता अधिकाधिक वाढवायच्या आहेत. यासाठी आपल्याला अगदी जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे आहेत. नाहीतर काय होईल, हळू हळू एक एक करून आपण अशा अनेक गोष्टी संपुष्टात आणू. नाहीतरी आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम प्रज्ञेचा वापर  अनेक आघाड्यांवर केला जात आहे. त्यामुळे तुम्हाल काही करण्याची गरजही नाही. त्या विशिष्ट मंचावर जावून चॅट सुरू केले की, अवघ्या दुनियेतल्या गोष्टी त्यावरून समजतील. आता तर गुगलपेक्षाही एक पाउूल पुढची गोष्ट आली आहे. जर तुम्ही यामध्ये अडकून बसाल तर तुमच्यामधील निर्मिती क्षमता संपुष्टात येईल. आणि म्हणूनच माझा आग्रह असणार आहे की, तुम्ही आपल्याकडे जे प्राचीन आरोग्य शास्त्र आहे, त्यानुसार भारतामध्ये आरोग्यासाठी उपवास करण्याची परंपरा आहे,  तसा उपवास तुम्ही करावा. म्हणजे काय करायचे तर? मित्रांनो, असा उपवास तुम्ही जरूर करा. आपल्या देशातल्या काही धर्मांमध्ये उपवास करण्यास सांगितले आहे. आता काळ बदलला आहे. म्हणून माझे आपल्याला सांगणे आहे की, आठवडाभरातले काही दिवस अथवा दिवसातले काही तास या तंत्रज्ञानाचा उपवास करावा.  करू शकता ना तुम्ही? अमुक इतके  तास तंत्रज्ञानाच्या वाटेला आपण  जाणारच नाही, हे ठरवावे.

तुम्ही पाहिले असेल, अनेक कुटुंबे अशी आहेत, घरामध्ये दहावी, बारावी, दहावी- बारावीचा खूप तणाव सुरूवातीला असतो.  सगळे कार्यक्रम ठरल्यानंतर कुटुंबातले मोठे सदस्य सांगतात, ‘‘नाही-नाही, बाबा, पुढच्यावर्षी काही कार्यक्रम करणे जमणार नाही. दहावीमध्ये आहे, पुढच्यावर्षी काही करायचे नाही, 12 वी आहे. असेच घरामध्ये बोलले जात असते. आणि टी.व्ही.वरही अगदी पांघरूण घालून ठेवले जाते. कारण नो टी.व्हीऋ कारण दहावीची परीक्षा आहे. 12 वी ची परीक्षा आहे. जर आपण इतक जागरूक होवून टी.व्ही.ला पडदा घालू शकतो, तर मग आपण मनापासून एक गोष्ट निश्चित करू शकतो. ती गोष्ट म्हणजे आठवड्यातील एक दिवस माझा डिजिटल उपवास असेल. कोणतेही डिजिटल डिव्हाइस वापरायचे नाही. मी कशालाही हात लावणार नाही. यामुळे जो लाभ होणार आहे, त्याचे निरीक्षण जरूर करावे. हळू हळू आपण या कालावधीमध्ये वाढ करावा, असे मन तयार होईल. त्याचप्रमाणे आपण पाहिले आहे की, परिवार आता लहान होत आहेत. म्हणजे कुटुंबाचा आकार छोटा होत आहे आणि परिवार या डिजिटल विश्वात अडकत चालले आहेत.

एकाच घरात आई,मुलगा,बहिण, भाऊ,वडील सगळे जण रहात आहेत आणि एकाच खोलीत असून व्हाटस अ‍ॅप करत आहेत, आपलीच गोष्ट सांगतोय ना मी ? आई, वडिलांना  व्हाटस अ‍ॅप करेल.आपण पाहिले असेल, घरात सगळेजण बसले आहेत मात्र प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये गर्क आहे.एक इकडे बघत आहे तर दुसरा दुसरीकडे बघत आहे. असेच होत आहे ना ? मला सांगा अशाने  कुटुंब कसे चालेल ? पूर्वी बसमध्ये, रेल्वेमध्ये प्रवास करताना लोक गप्पा मारत असत आता कनेक्टीव्हिटी मिळाली तर आता पहिले काम हेच. जसे अख्या जगाचे काम यांच्याकडे आहे, त्यांच्या वाचून जगाचे काम थांबणार आहे,हा जो रोग लागला आहे ना तो आपण ओळखला पाहिजे. हा आजार आपण ओळखला तर या आजारापासून आपण मुक्त होऊ शकू म्हणूनच माझी विनंती आहे की आपण एक असा भाग निश्चित करू शकता का,आपल्या कुटुंबात आजच निश्चित करा.एक भाग निश्चित करा, हा भाग म्हणजे नो टेक्नोलॉजी झोन, म्हणजे इथे तंत्रज्ञानाला प्रवेश नाही.इथे यायचे असेल तर मोबाईल एका कोपऱ्यात  ठेवून या,इथे आरामात बसून गप्पा होतील. घराच्या एका कोपऱ्यात नो टेक्नोलॉजी झोन करा,देवघर असते ना, देवाचा देव्हारा एका बाजूला स्वतंत्र असतो ना, तसाच हा कोपरा तयार करा. या कोपऱ्यात यायचे असेल तर मोबाईल बाहेर ठेवून या.इथे फक्त बसा. आता पहा, हळूहळू आपल्याला  जीवनाचा आनंद  मिळू लागेल.आनंद मिळू लागला की आपण या गुलामीतून बाहेर येऊ शकाल. खूप-खूप धन्यवाद.

सादरकर्ता  धन्यवाद,माननीय पंतप्रधान महोदय, आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी इतक्या सहज-सुलभ पद्धतीने डिजिटल बाबींपासून ठराविक काळासाठी लांब  राहण्याचा हा आनंददायी मंत्र दिल्याबद्दल धन्यवाद सर.

 

सादरकर्ता  माननीय पंतप्रधान जी, हिमालयाच्या डोंगररांगामध्ये नैसर्गिक सौंदर्याने नटलेला केंद्रशासित प्रदेश जम्मू इथून निदा  आपल्याशी आभासी माध्यमातून संपर्क साधत आहे, आपल्याला प्रश्न विचारू इच्छिते.निदा, आपला प्रश्न विचारा.

 

निदामाननीय पंतप्रधान सर, नमस्कार ! मी,जम्मूतल्या संजवानमधल्या गव्हर्मेंट मॉडेल हायर सेकंडरी स्कूलमधली दहावीची विद्यार्थिनी,निदा.सर, मला विचारायचे आहे की आपण जेव्हा कठोर मेहनत घेऊनही जेव्हा अपेक्षित यश मिळत नाही तेव्हा येणाऱ्या ताणाला सकारात्मक दिशा कशी द्यावी ? माननीय सर, आपल्याला  कधी अशी  परिस्थिती झेलावी लागली का ? धन्यवाद.

 

सादरकर्ता  धन्यवाद, निदा. माननीय पंतप्रधान जी, भगवान कृष्ण यांनी उपदेश केला ती भूमी, क्रीडा जगतातल्या प्रसिद्ध नीरज चोप्रासारख्या प्रसिद्ध खेळाडूंची भूमी हरियाणामधल्या पलवल इथून प्रशांत आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात.प्रशांत, कृपया आपला प्रश्न विचारा.

 

प्रशांत  माननीय पंतप्रधान जी, नमस्कार ! माझे नाव प्रशांत आहे. शहीद नायक राजेंद्र सिंह राजकीय मॉडेल संस्कृती वरिष्ठ माध्यमिक विद्यालय, हथीन, जिल्हा पलवल, हरियाणा इथल्या बारावीच्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. मला, आपल्याला  प्रश्न विचारायचा आहे की ताणाचा, परीक्षेच्या निकालावर कसा परिणाम होतो ? या बाबतीत आपण मार्गदर्शन करावे.  धन्यवाद सर.

 

सादरकर्ता  धन्यवाद प्रशांत.माननीय पंतप्रधान जी, निदा आणि प्रशांत यांच्यासारखे देशभरातले कोट्यवधी विद्यार्थी, परीक्षेच्या निकालावर तणावाचा  परिणाम या विषयावर आपले मार्गदर्शन मिळावे अशी मनीषा बाळगतात.माननीय पंतप्रधान  जी.   

 

पंतप्रधान- हे पहा, परीक्षेचा जो निकाल येतो, त्यानंतर जो ताण येतो, त्याचे मूळ कारण हे आहे की, परीक्षा दिल्यानंतर आपण घरी आल्यानंतर घरच्यांना सांगतो, की पेपर एकदम मस्त होता. मला  90 तर नक्की मिळतील.हे ऐकल्यावर घरच्या लोकांना पण असे वाटते आणि आपल्याला पण वाटते की जो ओरडा बसणार आहे तो महिन्यानंतर खाऊ. आत्ता तर असेच सांगू. त्याचा परिणाम असा होतो की सुटीचा जो काळ असतो तेव्हा घरच्या लोकांना वाटते की तुम्ही खरेच बोलत आहात, तुम्ही निकाल एकदम छान आणणार आहात. असे मानून ते आपल्या मित्र परिवाराला सांगायला सुरवात करतात, की या वेळेला खूपच छान तयारी केली होती. खूप मेहनत घेतली होती.कधी खेळायला जात नसे,आपली भर घालत सांगत राहतात.परीक्षेचा निकाल येईपर्यंत त्यांनी असे वातावरण निर्माण केलेले असते की आपला पाल्य पहिला किंवा दुसरा येणार. जेव्हा निकाल येतो तेव्हा 40-45 गुण. मग आरडाओरडा सुरु होतो. म्हणूनच पहिली गोष्ट म्हणजे आपण सत्य सांगण्याची सवय सोडता कामा नये. खोट्या आधारावर आपण किती दिवस कंठणार आहोत.हे स्वीकारायला हवे की आज परीक्षेचा पेपर चांगला गेला नाही. मी प्रयत्न तर केले होते मात्र पेपर सोपा नाही गेला. आपण आधीपासूनच हे सांगितले आणि समजा आपल्याला  त्यापेक्षा 5 गुण जास्त मिळाले तर आपण पाहिले असेल घरात तणाव निर्माण होणार नाही.ते तर म्हणतील की अरे तू तर सांगितले होतेस की पेपर कठीण गेला म्हणून, तुला तर चांगले  गुण मिळाले आहेत. जो मानदंड निश्चित झाला आहे ना, त्यापेक्षा कामगिरी सरस दिसते.तणावाचे दुसरे कारण आहे ते म्हणजे आपल्या मनात आपले मित्र असतात. त्याने असे केले तर मी पण तसेच करणार.त्याने तसे केले तर मी पण तसेच करणार. वर्गात अतिशय हुशार विद्यार्थी असतो.  आपणही हुशार असतो, थोडासाच फरक असतो. अहोरात्र आपण त्या स्पर्धेच्या  इर्षेत राहतो. तणावाचे हे ही एक कारण आहे. आपण आपल्यासाठी जगावे, आपल्या लोकांकडून शिकत जगावे, शिकवण तर सर्वांकडून घ्यावी मात्र आपल्यामधल्या सामर्थ्यावर भर द्यायला हवा. असे केल्याने तणावातून मोकळे होण्याच्या शक्यता वाढतात.दुसरे म्हणजे जीवनाप्रती आपला दृष्टीकोन काय आहे, ही परीक्षा गेली म्हणजे जीवनातले सर्व काही संपले असा आपला दृष्टीकोन  राहिला तर तणाव नक्कीच सुरु होतो.जीवन कुठल्याही एकाच ठिकाणी थांबत नसते. एक स्टेशन गेले तर दुसरी गाडी येईल,दुसऱ्या स्टेशनवर नेईल. आपण चिंता करू नका.परीक्षा म्हणजे जीवनाचा अखेरचा मुक्काम असे नसते. आपली कसोटी लागली पाहिजे, आपण स्वतःला घडवले पाहिजे हा आपला प्रयत्न जरूर असायला हवा. मात्र या तणावापासून मोकळे राहण्याचा मनात निर्धार करायला  हवा. जे काही येईल, मी जीवनात तग धरून राहण्याचे जाणतो. मी यावरही मात करेन.आपण हा निश्चय केला की मग मन निश्चिंत होते. म्हणूनच निकालाचा तणाव बाळगण्याची आवश्यकता नाही असे मला सांगायचे आहे. धन्यवाद !

 

सादरकर्ता  माननीय पंतप्रधान जी, आपले बोल ऐकून आमच्यात  नवी उर्जा संचारली आहे. माननीय पंतप्रधान सर, आर अक्षरा सिरी, तेलंगणामधल्या रंगा रेड्डी जिल्ह्यात राहते.तिला एका महत्वाच्या विषयावर आपले मार्गदर्शन हवे आहे. अक्षरा आपला प्रश्न विचारा.

 

अक्षरा- माननीय पंतप्रधान जी, सादर नमस्कार ! माझे नाव आहे आर अक्षरा सिरी.मी जवाहर नवोदय विद्यालय रंगारेड्डी हैदराबादच्या नववीतली विद्यार्थिनी आहे. मान्यवर, माझा प्रश्न आहे की अधिक भाषा   शिकण्यासाठी आपल्याला काय करायला हवे, आपण मार्गदर्शन करावे. धन्यवाद सर.

 

सादरकर्ता -  धन्यवाद अक्षरा.माननीय पंतप्रधान, अशाच अर्थाचा प्रश्न भारताच्या हृदयस्थानी असलेल्या भोपाळमधल्या रितिका घोडकेने विचारला आहे. ती आपल्यासमवेत सभागृहातही आहे. रितिका कृपया आपला प्रश्न विचारा.

 

रितिका घोडके - आदरणीय पंतप्रधान जी, नमस्कार ! माझे नाव रितिका घोडके आहे.मी मध्य प्रदेशातल्या भोपाळ मधल्या शासकीय सुभाष उत्कृष्ट माध्यमिक विद्यालय स्कूल फॉर एक्सिलन्स शाळेची बारावीची विद्यार्थिनी आहे. सर, माझा प्रश्न आहे की आपण जास्तीत जास्त भाषा कशा शिकू शकतो आणि हे का आवश्यक  आहे ? धन्यवाद.

 

सादरकर्ता  धन्यवाद रितिका.माननीय पंतप्रधान जी, कृपया अक्षरा आणि रितिका यांना बहुभाषीक कौशल्य प्राप्त करण्यासाठी   मार्गदर्शन करावे, कारण ही काळाची गरज आहे. माननीय पंतप्रधान जी. 

 

पंतप्रधान  खूपच चांगला प्रश्न विचारला आपण. सुरवातीपासूनच  मी सांगत आलो की बाकी सर्व सोडून फोकस करा. मात्र हा एक प्रश्न असा आहे ज्यासाठी मी आपल्याला सांगेन आपण जरा बहिर्मुख व्हा.थोडे बहिर्मुख होणे अतिशय आवश्यक असते. हे मी म्हणूनच सांगतो, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे.   आपल्याकडे शेकडो भाषा आहेत,हजारो बोली आहेत हे आपण अभिमानाने सांगू शकतो.ही आपली संपन्नता आहे, आपली समृद्धी आहे. आपल्या या समृद्धीचा आपल्याला  अभिमान हवा.  आपण कधी-कधी पहिले असेल एखादी परदेशी व्यक्ती आपल्याला भेटली आणि भारताविषयी त्याला थोडी माहिती असली तर  ती व्यक्ती आपल्याला नमस्ते म्हणेल. उच्चारात थोडा फरक असेल मात्र नमस्ते म्हणेल.  त्या व्यक्तीने नमस्ते म्हटल्यावर आपले कान टवकारले जातात पहिल्याच भेटीत आपुलकी निर्माण होते.अच्छा, ही परदेशी व्यक्ती नमस्ते म्हणते, म्हणजेच संवादात केवढे सामर्थ्य आहे, याचे हे उदाहरण आहे. इतक्या विशाल देशात आपण राहतो.एक आवड म्हणून आपण कधी विचार केला असेल की मी तबला शिकावा, कधी मनात विचार येतो मी बासरी शिकावी, सतार शिकावी, पियानो शिकावा, असे वाटते की नाही ? आपल्याकडे एक आणखी कला विकसित होते ना ? असे जर होत असेल तर आपल्या शेजारी आणि आजूबाजूच्या राज्यांमधली एखादी भाषा शिकायला काय हरकत आहे ? प्रयत्न करायला हवा. आपण भाषा शिकतो म्हणजे नित्याच्या संवादातली दोन-चार वाक्ये शिकतो असे नव्हे. तिथल्या अनुभवाचे  जे सार असते. एका-एका भाषेची अभिव्यक्ती  सुरु होते तेव्हा त्यामागे हजारो वर्षांची अविरत, अखंड, अविचल असा ओघ असतो, अनुभवाचा प्रवाह असतो,  चढ-उतार असतात. संकटांना तोंड देत एक प्रवाह निर्माण झालेला असतो, तेव्हा एक भाषा अभिव्यक्तीचे स्वरूप घेते. आपण जेव्हा एक भाषा जाणू लागतो तेव्हा त्या हजार वर्षांच्या प्राचीन जगात प्रवेश करण्याची कवाडे आपल्यासाठी खुली होतात. म्हणूनच आपण भाषा शिकायला हवी.मला नेहमीच खंत वाटते,खूप वाईट वाटते,आपल्या देशात एखादे दगडी स्मारक असेल आणि कोणी आपल्याला माहिती दिली की हे 2000 वर्षांपूर्वीचे आहे तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो की नाही ?  इतकी सुंदर गोष्ट 2000 वर्षांपूर्वी होती.कोणालाही नक्कीच अभिमान वाटेल.हा विचार येत नाही की  हे कोणत्या भागात येते. 2000 वर्षांपूर्वी अशी व्यवस्था होती, इतकी सुंदर निर्मिती,आपले पूर्वज किती ज्ञानी असतील. आपण मला सांगा,जगातली सर्वात प्राचीन भाषा, केवळ हिंदुस्तानची नव्हे तर जगातली सर्वात प्राचीन भाषा ज्या देशात आहे त्या देशाला अभिमान वाटायला हवा की नाही ?  मान अभिमानाने ताठ करून जगाला सांगायला हवे ना की जगातली सर्वात प्राचीन भाषा आमच्याकडे आहे. सांगायला हवे की नको ? आपल्याला माहित असेल आपली तमिळ भाषा ही जगातली सर्वात प्राचीन भाषा आहे, अवघ्या जगात इतका अनमोल ठेवा कोणाकडे आहे?  इतकी मोठी अभिमानास्पद बाब देशाकडे आहे आणि आपण अभिमानाने जगाला सांगत नाही. मागच्या वेळी युनोमध्ये माझे भाषण होते तेव्हा मी जाणीवपूर्वक तमिळ मध्ये काही उल्लेख केले कारण मला जगाला सांगायचे होते की  तमिळ भाषा, जगातली सर्वश्रेष्ठ भाषा, जगातली सर्वात प्राचीन भाषा ही माझ्या देशातील आहे. आपण अभिमान बाळगायला हवा. उत्तर भारतातली व्यक्ती सहजपणे डोसा खाते की नाही ? खाते की नाही ?  सांबार पण खाते की नाही ? तेव्हा त्याला उत्तर दक्षिण काही जाणवत नाही. दक्षिणेकडे  गेल्यावर आपल्याला पराठा भाजी पण  मिळते, भाजी पुरीही मिळते. लोकं मोठ्या चवीने खातात, कोणताही तणाव नसतो,कोणताही अडथळा येत नाही. 

जितक्या सहजतेने जीवनात या बाबी येतात तितक्याच सहजतेने मी तर म्हणतो, प्रत्येकाने हा प्रयत्न करायला हवा की आपल्या मातृभाषे व्यतिरिक्त कोणत्या ना कोणत्या भारतीय भाषेत काही वाक्ये तर यायला हवीत, आपण  पाहाल आपल्याला आनंद मिळेल. अशा व्यक्तीला आपण भेटलात आणि त्याच्या भाषेत 2 वाक्ये जरी बोललात तरी एकदम आपुलकी  निर्माण होईल. म्हणूनच भाषेकडे ओझे म्हणून पाहता कामा नये आणि मला आठवतं, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मी सामाजिक कार्यात गर्क होतो, तेव्हा मी एका लहान मुलीला पाहिलं. माझ्या लक्षात आलं की बालकांमधे भाषा आत्मसात करण्याची कमालीची ताकद असते. ते खूप वेगाने भाषा आत्मसात करतात. आमच्या इथे अहमदाबादेत कॅलिको गिरणीतील एक कामगार कुटुंब होतं. मी कधीकधी त्यांच्या इथे भोजनासाठी जात असे. तर तिथे एक लहान मुलगी होती. ती अनेक भाषा बोलत असे. ती कामगार वसाहत असल्याने बहुभाषिक वस्ती होती. तिची आई केरळची होती. वडील बंगाली होते. परिसर बहुभाषिक असल्याने शेजारील कुटुंब मराठी होते तर शाळा गुजराती होती. मी आश्चर्यचकित झालो होतो. ती 7-8 वर्षांची मुलगी  बंगाली, मराठी, मलयाळम, हिंदी इतक्या लिलया वेगाने बोलत असे. घरात 5 लोक बसलेले आहेत, त्यांच्याशी बोलायचं असेल तर एकाशी बंगालीत बोलेल, यांच्याशी बोलायचं तर मलयाळम मधे, त्यांच्याशी बोलायचं तर गुजरातीत बोलेल. 8-10 वर्षांची मुलगी होती. म्हणजे तिची प्रतिभा फुलत होती. आणि म्हणून माझा तुम्हाला असा आग्रह राहिल की, आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असायला हवा. मी यंदा लाल किल्ल्यावरुनही सांगितलं होतं, पंच प्रतिज्ञांबद्दल. आपल्या वारशाचा आपल्याला गर्व असायला हवा. आणि आपल्याला गर्व असायला हवा की आपल्या पूर्वजांनी आपल्याला अशी भाषा दिली. प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान असायला हवा. प्रत्येक भाषेचा अभिमान असायला हवा. खूप खूप धन्यवाद!

 

प्रस्तुतकर्ता- माननीय पंतप्रधान बहुभाषिकतेवर आपण केलेल्या मार्गदर्शनाकरता धन्यवाद.

 

प्रस्तुतकर्ता- माननीय पंतप्रधान महोदय, कटकच्या ऐतिहासिक प्रसिद्ध शहरातील सुनैना त्रिपाठी, ज्या एक शिक्षिका आहेत, एका महत्त्वाच्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्याची विनंती करत आहेत.  महोदया, कृपया तुमचा प्रश्न विचारा.

 

सुनैना त्रिपाठीमाननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी.  मी सुनैना त्रिपाठी ओरिसा, कटक इथल्या कृष्णमूर्ती वर्ल्ड स्कूलची शिक्षिका आहे.

माझा प्रश्न असा आहे की वर्गात अभ्यासात रस निर्माण व्हावा या दिशेनं विद्यार्थ्यांना आकर्षित कसं करावं आणि जीवनाचे अर्थपूर्ण मूल्य कसे शिकवायचे, तसंच वर्गात शिस्तीबरोबरच अभ्यास कसा मनोरंजक बनवायचा, धन्यवाद!

 

प्रस्तुतकर्ता- माननीय पंतप्रधान महोदय, सुनैना त्रिपाठी यांना आपल्याकडून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात रस घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी मार्गदर्शन हवं आहे. माननीय पंतप्रधान महोदय.

 

पंतप्रधान : म्हणजे हा प्रश्न शिक्षकाचा होता? बरोबर ना?  बघा, आजकाल एक अनुभव येतो की शिक्षक स्वतःमध्येच हरवलेले असतात.  आत्ता मी अर्धं वाक्य बोललो आणि तुम्ही ते पकडलं. त्यांना एक ठराविक अभ्यासक्रम 20 मिनिटे ते 30 मिनिटे बोलायचा असतो, ते घडाघड बोलतात. आणि मग यातील कोणीतरी इकडे तिकडे हलेल, हे तुम्ही पाहिलं असेल. मी तर माझा स्वतःचा बालपणीचा अनुभव सांगतोय, आजकालचे शिक्षक चांगले आहेत, माझ्या काळात असे नसायचे, त्यामुळे मला शिक्षकांवर टीका करण्याचा अधिकार नाही, पण मी कधी-कधी पाहिले आहे की शिक्षक तयारी करून आले आहेत आणि विसरले तर मुलांनी ते हेरावे, असे त्यांना नको असते, त्यांना ते मुलांपासून लपवायचे असते. तर मग ते काय करतात, एक डोळा इकडे, अरे उभा राहा, असं का बसला आहेस, असं का करतोयस, तसं काय करतोयस, म्हणजे पाच ते सात मिनिटं त्यातच घालवतील. इतक्यात विषय आठवलाच तर गाडी पुन्हा रुळावर येईल, नाहीतर, समजा कोणी हसला तर त्यालाच पकडतील, म्हणतील का हसतोस तू? अच्छा आज देखील असंच होत आहे. नाही-नाही असं होत नसेल, आता तर शिक्षक खूपच चांगले आहेत. आपण पाहिलं असेल, आता शिक्षकही मोबाईलवर आपला अभ्यासक्रम घेऊन येतात. मोबाईल पाहून शिकवतात, असंच करतात ना. आणि कधी कधी बोट इकडे तिकडे दबलं गेलं तर ते हातातून निसटून जातं. मग ते स्वतःच शोधत बसतात. तर त्यांनी तंत्रज्ञान पूर्णपणे शिकून घेतलं नाही. गरजेच्या दोन-चार गोष्टी शिकून घेतल्या. आणि इकडे तिकडे बोट दबलं तर पुन्हा ते डिलीट होऊन जातं, किंवा हरवून जातं, म्हणजेच ते हाती लागत नाही, ते खूपच हैराण होतात. थंडीतही घाम फुटतो, त्यांना वाटतं.. ही मुलं म्हणजे ना! ज्यांच्यात स्वतःच्या अशा काही कमतरता असतात, त्यांचा एक स्वभाव असतो. ते दुसऱ्यावर अधिकचा दरारा निर्माण करू पाहतात, कारण आपल्या कमतरता बाहेर येऊ नयेत. मला वाटतं आपले शिक्षक मित्र विद्यार्थ्यांसोबत जितकं अधिक आपलेपणाने वागतील तितकं चांगलं. विद्यार्थ्यांना तुमच्या ज्ञानाची परीक्षा घ्यायची नसते हो. हा तुमचा भ्रम आहे. शिक्षकांना वाटतं विद्यार्थी एखादा प्रश्न विचारात असेल तर तो, आपली परीक्षा घेतोय. तसं नसतं. विद्यार्थी प्रश्न विचारत असेल तर ध्यानात घ्या, की त्याच्या आत जिज्ञासा आहे. तुम्ही त्याच्या जिज्ञासेला नेहमी प्रोत्साहन द्या. त्याची जिज्ञासा हीच त्याच्या जीवनाचा खूप मोठा ठेवा आहे. कोणत्याही जिज्ञासूला गप्प बसूवू नका. त्याला अडवू नका. त्याचं ऐका. आरामात ऐका. जर उत्तर येत नसेल तर तुम्ही त्याला सांगा की, बाळा तू  खूपच चांगला प्रश्न विचारला आहेस आणि मी तुला घाईघाईत उत्तर दिलं तर तो अन्याय ठरेल. असं कर, आपण उद्या पुन्हा भेटूया. तू माझ्या कक्षात ये, आपण यावर बोलूयात. आणि या काळात मी देखील समजण्याचा प्रयत्न करीन की हा विचार तुझ्या मनात कुठून आला. आणि प्रयत्न करेन, यादरम्यान घरी जाऊन अभ्यास करेन. जरा google वर जाईन. इकडे तिकडे जाऊन विचारपूस करेन. आणि पुन्हा मी तयार होऊन येईन. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला विचारेन, अच्छा बेटा, तुला हा विचार आला कुठून.

इतका उत्तम विचार या लहान वयात तुझ्या मनात कसा काय आला. त्याला प्रेमाने समजावत पुन्हा सांगा की, बघ वास्तवात हे असं नाहीये, तो त्याचा त्वरित स्वीकार करेल. आणि आजही विद्यार्थी आपल्या शिक्षकांनी सांगितलेली कुठलीही गोष्ट अतिशय मूल्यवान समजतात. जर एखादी चुकीची गोष्ट त्याला सांगितली तर ती त्याच्या आयुष्यात कायमची कोरली जाते. म्हणून काहीही सांगण्यापूर्वी थोडा वेळ घेणं काही चुकीचं नाही. आपण नंतर सांगितलं तरीही चालतं. दुसरा प्रश्न आहे शिस्तीचा. शिक्षकांना कधी कधी वर्गात असं वाटतं की, आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी जो सर्वात दुर्बल असा विद्यार्थी असतो, त्यालाच विचारायचं, तुला हे समजलं की नाही? मग तो अबबबब असं करत राहतो. तू तू मी मी असं होत राहतं. आणि मग पुन्हा त्याच्यावरती चिडायचं. मी इतकी मेहनत करत असतो, इतकं शिकवत असतो आणि तुला काहीच समजत नाही? मी शिक्षक असतो तर मी काय केलं असतं. जे सगळ्यात चांगले हुशार विद्यार्थी आहेत, त्यांना विचारलं असतं, बरं! सांगा तुम्हाला हे कसं समजलं. त्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने समजावलं असतं. अशात, ज्यांना समजलेलं नाही त्या विद्यार्थ्यांना देखील चांगल्या पद्धतीने समजेल. आणि जे चांगले विद्यार्थी आहेत, ज्यांना मी प्रतिष्ठा देत आहे, त्यांच्यात अधिक चांगलं बनण्यासाठी स्पर्धा निर्माण होईल. अगदी स्वाभाविक स्पर्धा. दुसरं म्हणजे, जे या प्रकारे शिस्तीत नाहीत, लक्ष केंद्रित करत नाहीत, वर्गातही दुसरंच काहीतरी करत असतात. शिक्षकांनी जर त्याला स्वतंत्रपणे बोलावून घेतलं. वेगळं बोलावून त्याच्याशी चर्चा केली, त्याला प्रेमाने समजावून सांगितलं की, बघ काल किती उत्तम विषय होता, आणि तू खेळत होतास, आजही तू माझ्यासमोर खेळ, चल तुला मजा येईल. मलाही पाहू दे तू काय खेळत होतास, अच्छा सांग मला! हे खेळण्याचं काम नंतर केलं असतं, आणि तू लक्ष दिलं असतंस, तर फायदा झाला असता की नाही तुझा? त्याच्याशी संवाद साधला तर, त्याला एक आपलेपणा वाटतो. तो मग कधी बेशिस्त वागणार नाही. मात्र, त्याच्या अहंकाराला दुखावलंत तर मग त्याचं डोकं फिरेल. काही लोक चतुराई देखील करतात. चतुराई कधी कधी कामाला देखील येते. जो सगळ्यात खोडकर मुलगा असतो त्यालाच ते मॉनिटर बनवतात. बनवतात ना? तो मॉनिटर होतो. मग त्यालाही वाटतं यार, मला चांगलं वागायला हवं. मग तो स्वतःला जरा ठीकठाक करतो आणि इतरांना नीट ठेवण्यासाठी स्वतःला तो तसं जुळवून घेतो. स्वतःतल्या वाईट गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. शिक्षकांचा लाडका होण्याचा प्रयत्न करतो. अंतिमतः परिणाम असा होतो की त्याचं आयुष्यच बदलून जातं, आणि त्याच्या माध्यमातून, वर्गातील वातावरण देखील सुधारतं. तर अशा अनेक पद्धती असू शकतात. मात्र मला असं वाटतं की हाती छडी घेऊन, शिस्त लावण्याचा मार्ग आपण स्वीकारता कामा नये. आपण आपलेपणाचाच मार्ग निवडायला हवा, हा मार्ग निवडला तरच लाभ होईल, खूप खूप धन्यवाद.

 

प्रस्तुतकर्ता- माननीय पंतप्रधानजी, इतक्या साधेपणाने आणि विनम्रतेने जीवनमूल्यांबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.  माननीय पंतप्रधान, मी परिक्षा पे चर्चा 2023 च्या शेवटच्या प्रश्नासाठी आमंत्रित करत आहे, दिल्लीच्या सुमन मिश्रा, ज्या पालक आहेत, सभागृहात उपस्थित आहेत आणि त्यांना आपल्याकडून त्यांना  मार्गदर्शन हवे आहे. महोदया, कृपया तुमचा प्रश्न विचारा.

 

सुमन मिश्रा-  सुप्रभात माननीय पंतप्रधान, मी सुमन मिश्रा. महोदय, विद्यार्थ्याने समाजात कसे वागले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करावे. धन्यवाद महोदय.

 

प्रस्तुतकर्ता- धन्यवाद महोदया. माननीय पंतप्रधान महोदय.

 

पंतप्रधान- विद्यार्थ्यांनी समाजात कसं वागावं, हेच विचारायचं ना तुम्हाला? मला वाटतं हे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. आपण कोणत्या समाजाबद्दल बोलत आहोत,  आपलं एक वर्तुळ आहे, ज्यात आपण वावरतो, कधी चांगल्या वाईट चर्चेमध्ये आपला वेळ व्यतीत करतो, फोनवर तासंतास घालवतो, जर तुम्ही त्या मर्यादित आभासी जगाबद्दल बोलत असाल…तर तुम्ही मुलांना जसं सांगाल तसं…. बेटा इथे चपला घालून ये, इथे चपला काढ, इथे या पद्धतीने वाग, तिथे तसं कर, असं आपण सांगू शकता. मात्र वास्तविकता ही आहे की, त्याला घराच्या एका मर्यादेत कोंडायचं नाहीये. समाजात त्याचा जितका जास्त व्यापक विस्तार होईल, तितका होऊ द्यायचा आहे. मागे मी एकदा म्हटलं होतं, कदाचित परीक्षा पे चर्चा मध्येच म्हटलं होतं की आणखी कुठे म्हटलं होतं ते मला आठवत नाही. मी म्हटलं होतं,

दहावी बारावीच्या परीक्षेनंतर कधी आपल्या मुलांना सांगा, की हे घे पैसे आणि आपल्या राज्यात या या ठिकाणी पाच दिवस फिरून या. तिथली छायाचित्रं काढा, तिथलं वर्णन लिहून आणा. त्यांना हिमतीनं सोडा बाहेर. तुम्ही बघाल की ही मुलं खूप काही शिकून परत येतील. जीवनाबद्दल जाणून त्यांच्यात विश्वास वाढेल. मग ते चिडचिड करणार नाहीत. बारावीचा विद्यार्थी असेल तर त्याला राज्य बाहेर जाऊन यायला सांगा. हे बघ, इतके पैसे आहेत, रेल्वेने जायचे आहे, आणि, आरक्षणाशिवाय जायचे आहे. सामान इतकं असेल, तुला हे खाणं सोबत दिलं आहे, जा इतकी ठिकाणं बघून ये आणि आल्यावर सर्वांना समजावून सांग. तुम्ही खरंच आपल्या मुलांची परीक्षा घेत राहीलं पाहिजे. त्यांना समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये जाण्यासाठी प्रेरित करायला हवं. कधी त्याला असं विचारायला हवं की, तुझ्या शाळेमध्ये यंदा या मुलाने कबड्डीमध्ये खूप चांगली कामगिरी केली, तू त्याला भेटलास का? जा त्याच्या घरी जाऊन त्याला भेटून ये. त्या मुलाने विज्ञान मेळाव्यात खूप चांगलं काम केलं होतं. तू जाऊन त्याला भेटलास का? अरे जा जरा भेटून ये त्याला. त्यांना त्यांचा विस्तार करण्यासाठी संधी दिली पाहिजे. कृपया त्यांना, असं करायला हवं, तसं करायला हवं, असं करू नका, तसं करू नका, अशा बंधनांमध्ये बांधू नका. आता मला सांगा, कोणी असं फर्मान काढलं की आता, पतगांना पतंगच म्हणतात ना? पतंगांना गणवेश चढवला तर काय होईल? काय होईल? काही अर्थ आहे का? आपल्याला आपल्या मुलांचा विस्तार होऊ द्यायचा आहे. त्यांना वेगवेगळ्या वर्तुळात घेऊन जायचं आहे, त्यांची वेगवेगळ्या घटकांबरोबर भेट घडवून आणायची आहे. आमच्या इथे सुट्टीत असायचं की, मामाकडे जायचं आहे, त्या त्या ठिकाणी जायचं आहे, हे का होतं? याचा आपला एक आनंद असतो. त्याचे संस्कार असतात. जीवनाची एक रचना घडते. आपण आपल्याच वर्तुळात मुलांना बंद करता कामा नये. आपण त्यांची कक्षा अधिकाधिक रुंदावली पाहिजे. होय आपलं लक्ष असायला हवं की त्यांच्या सवयी वाईट तर होत नाहीयेत ना, खोलीतच स्वतःत हरवून गेलेला नाही ना, उदास तर राहात नाही ना? आधी जेवणावेळी किती हसतखेळत असायचा.

आजकाल आपण हसणं, मस्करी करणं सोडून दिलंय, काय हरकत आहे असं वागण्यात ?  आई-वडिलांच्या ताबडतोब हे लक्षात आलं पाहिजे.  हे तेंव्हा घडते जेव्हा देवाने त्यांना एका विश्वस्तच्या रूपात एक अमानत मुलांच्या रुपात दिलेली असते.  या अमानतीचे  संरक्षण आणि संवर्धन करणे ही त्याची जबाबदारी आहे.  हा भाव असेल तर याचे चांगले परिणाम होतील.  या भावना जर अशा असतील की हा माझा मुलगा आहे, मी सांगेन तसे तो करेल, मी असा होतो, म्हणून तुला असे व्हायला हवे, माझ्या आयुष्यात असेच होते, तुझ्या आयुष्यातही असेच होईल, मग गोष्टी बिघडतात. म्हणूनच मोकळेपणाने समाजाच्या विस्ताराकडे नेण्याचा प्रयत्न आपण करणे आवश्यक आहे.

आपल्या पाल्याला जीवनात वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.  समजा, ते साप आणि मुंगसाचा खेळ करुन दाखवणारे लोक कधीतरी तुमच्या ठिकाणी येतात.  मुलांना सांगा, जाऊन त्याच्याशी बोलायला. तो कुठे राहतो,तो कुठून आला, या व्यवसायात कसा आला? तो काय शिकला?   मला पण समजावून सांग, हे सर्व त्याला विचारू देत. त्याच्या संवेदना जाग्या होतील, तो असं का करतोय?  जाणून घेणे, शिकणे सोपे होईल.  तुमच्या मुलांचा अधिक विकास व्हावा, त्यांना बंधनात अडकून ठेवता कामा नये यासाठी तुम्ही प्रयत्न करा.  तुम्ही त्यांना मोकळं आकाश द्या.  त्याला संधी द्या, मग तो स्वतः समाजात एक शक्ती म्हणून उदयास येईल.  खूप खूप धन्यवाद.

 

सादरकर्ते- माननीय पंतप्रधान महोदय, परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांशी संबंधित असलेल्या आपल्या प्रेरणादायी विचारांनी परीक्षा ही चिंतेची बाब नाही तर आनंदोत्सव आहे असे लक्षात आले.  आपण एका नेत्रदीपक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाच्या शेवटाकडे पोहोचलो आहोत. आठवणींचा हा मधुर संग्रह आमच्याकडे सदैव राहिल. या सभागारात आपल्या उपस्थितीने आणि उज्ज्वल भावनेने आम्हाला प्रेरित केल्याबद्दल आम्ही माननीय पंतप्रधानांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो.

पंतप्रधानांनी परीक्षेवर केलेल्या चर्चेने आमच्यासारख्या कोट्यवधी मुलांची अस्वस्थता, भीती आणि हार मानण्याच्या प्रवृत्तीला तुम्ही उत्साह, उमेद आणि यशाची तळमळ यात परिवर्तीत केले आहे.  धन्यवाद माननीय पंतप्रधान, खूप खूप धन्यवाद.

 

पंतप्रधान- तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. माझी इच्छा आहे की, विद्यार्थी,  पालक, शिक्षक यांनी परीक्षांचे जे ओझे वाढत आहे, एक वातावरणनिर्मिती होत आहे, ते आम्ही बदलू शकतो, बदलले पाहिजे. आयुष्याचा तो एक सहज भाग झाला पाहिजे. आयुष्याचा एक सुलभ क्रम तयार केला पाहिजे. असे जर केले तर परीक्षा आपोआप एक उत्सव होईल. प्रत्येक परीक्षार्थीच्या आयुष्यात उत्साह येईल आणि उत्साह उत्कर्षाची खात्री असतो. या उत्कर्षाची खात्री उत्साहात आहे. हाच उत्साह घेऊन तुम्ही मार्गक्रमण करा, याच माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. खूप-खूप धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi