महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अजित पवार जी, बंधू दिलीप जी, अन्य मंत्रीगण, खासदार आणि आमदार, बंधू आणि भगिनींनो.
ऑगस्ट महिना हा सणासुदीचा आणि क्रांतिकारक घटनांच्या स्मृतीचा महिना आहे.
क्रांतीच्या या महिन्याच्या सुरुवातीलाच मला पुणे येथे येण्याचे सौभाग्य लाभले.
खरंच, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत पुण्याचे मोठे योगदान आहे. पुण्याने बाळ गंगाधर टिळक यांच्यासह अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक देशाला दिले आहेत. आजच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती सुद्धा आहे. आपल्या सर्वांसाठी हा दिवस खूपच खास आहे. अण्णा भाऊ साठे महान समाज सुधारक होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी ते भारलेले होते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि अभ्यासक त्यांच्या साहित्यावर संशोधन करतात. अण्णाभाऊ साठे यांचे कार्य, त्यांचे आदर्श आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहेत.
मित्रांनो,
पुणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे, देशभरातील तरुणांची स्वप्नपूर्ती करणारे जागृत शहर आहे. आज पुणे आणि पिंपरी-चिंचवडला मिळालेल्या प्रकल्पांमुळे ही भूमिका आणखी दृढ होणार आहे. सध्या येथे सुमारे 15 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटने झाली आहेत. हजारो कुटुंबांना पक्की घरे मिळाली आहेत, कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्यासाठी, कचऱ्यापासून कांचन बनवण्यासाठी आधुनिक प्रकल्प लाभला आहे. या प्रकल्पांसाठी मी सर्व पुणेकरांचे, येथील सर्व नागरिकांचे खूप खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आमचे सरकार शहरांमध्ये राहणार्या विशेषतः मध्यमवर्गीयांच्या, व्यावसायिकांच्या जीवनमानाच्या दर्जाबाबत अतिशय गंभीर आहे. जीवनाचा दर्जा सुधारला की त्या शहराचा विकासही आणखी वेगाने होतो. आमचे सरकार पुण्यासारख्या शहरातील जीवनमान सुधारण्यासाठी सातत्याने काम करत आहे. येथे येण्यापूर्वी पुणे मेट्रोच्या आणखी एका विभागाचे लोकार्पण करण्यात आले आहे. मला आठवते, जेव्हा पुणे मेट्रोचे काम सुरू झाले, तेव्हा मला त्याची पायाभरणी करण्याची संधी मिळाली आणि देवेंद्रजींनी अतिशय मजेशीर पद्धतीने त्याचे वर्णन देखील केले. या 5 वर्षांत येथे सुमारे 24 किलोमीटर मेट्रोचे जाळे सुरू झाले आहे.
मित्रांनो,
आपल्याला भारतातील शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे राहणीमान सुधारायचे असेल आणि त्याला नवी उंची द्यायची असेल, तर आपल्याला सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरण करावे लागेल. आणि म्हणूनच आज भारतातील शहरांमध्ये मेट्रोचे जाळे सतत विस्तारत आहे, नवीन उड्डाणपूल बांधले जात आहेत, वाहतूक नियंत्रक लाल दिव्यांची संख्या कमी करण्यावर भर दिला जात आहे. 2014 पर्यंत, भारतात मेट्रोचे जाळे 250 किमी पेक्षा सुद्धा कमी होते. यातही बहुतांशी दिल्ली-एनसीआरमध्ये होते. आता देशातील मेट्रोचे जाळ्याची लांबी 800 किलोमीटरहून अधिक झाली आहे. याशिवाय 1000 किमीच्या नवीन मेट्रो मार्गाचेही काम सुरू आहे. 2014 मध्ये केवळ 5 शहरांमध्ये मेट्रोचे जाळे होते. आज देशातील 20 शहरांमध्ये मेट्रो नेटवर्क कार्यरत आहे. महाराष्ट्रातच पुण्याव्यतिरिक्त मुंबई आणि नागपूरमध्येही मेट्रोचा विस्तार केला जात आहे. हे मेट्रो जाळे आधुनिक भारतातील शहरांची नवी जीवनरेखा बनत आहे. पुण्यासारख्या शहरात पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रोचा विस्तार करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच आमचे सरकार मेट्रोचे जाळे विस्तारण्यासाठी इतकी मेहनत घेत आहे.
बंधू आणि भगिनींनो,
राहणीमानाचा दर्जा सुधारण्यात महत्त्वाचा घटक म्हणजे शहरांमधील स्वच्छतेची व्यवस्था देखील आहे. एक काळ असा होता, जेव्हा विकसित देशांची शहरे पाहून म्हटले जायचे - व्वा, किती स्वच्छ शहर आहे. आता आम्ही भारतातील शहरांसाठी तशाच उपाययोजना करत आहोत. स्वच्छ भारत अभियान हे केवळ शौचालय बांधण्यापुरते मर्यादित नाही. या मोहिमेत कचरा व्यवस्थापनावरही अधिक भर दिला जात आहे. आपल्या शहरांमध्ये कचऱ्याचे प्रचंड ढीग ही एक मोठी समस्या बनली आहे. पुण्यात ज्या ठिकाणी मेट्रो डेपो बांधला आहे, तो पूर्वी कोथरूड कचरा डेपो म्हणून ओळखला जात होता, हेही तुम्हाला माहीत आहे. आता अशा कचऱ्याचे डोंगर हटवण्याचे काम मिशन मोडवर सुरू आहे. आणि आम्ही कचऱ्यातून कांचन - म्हणजेच वेस्ट टू वेल्थ या मंत्रावर काम करत आहोत. पिंपरी-चिंचवडचा कचऱ्यातून ऊर्जा प्रकल्प हा अतिशय चांगला प्रकल्प आहे. यामध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जात आहे. याठिकाणी निर्माण होणार्या विजेमुळे महामंडळालाही आपली विजेची गरज भागविता येणार आहे. म्हणजे प्रदूषणाची समस्याही राहणार नाही आणि महापालिकेची बचत होणार आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासामुळे भारताच्या औद्योगिक विकासाला सातत्याने चालना मिळाली आहे. महाराष्ट्रातील औद्योगिक विकास अधिक वाढवण्यासाठी येथे आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच आज आपले सरकार महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांवर जी गुंतवणूक करत आहे ती अभूतपूर्व आहे. आज येथे मोठे द्रुतगती मार्ग, नवीन रेल्वे मार्ग, नवीन विमानतळ बांधले जात आहेत. रेल्वेच्या विकासासाठी 2014 पूर्वीच्या तुलनेत येथे 12 पट अधिक खर्च केला जात आहे. महाराष्ट्रातील विविध शहरेही शेजारील राज्यांच्या आर्थिक केंद्रांशी जोडली जात आहेत. मुंबई-अहमदाबाद जलदगती रेल्वेचा गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना फायदा होणार आहे. दिल्ली-मुंबई आर्थिक कॉरिडॉर महाराष्ट्राला मध्य प्रदेश आणि उत्तर भारतातील इतर राज्यांशी जोडेल. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे महाराष्ट्र आणि उत्तर भारत यांच्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी देखील पूर्णपणे बदलेल. महाराष्ट्राला तेलंगणा, छत्तीसगड आणि इतर शेजारील राज्यांशी जोडण्यासाठी उभारण्यात आलेले ट्रान्समिशन लाइन नेटवर्क महाराष्ट्रातील उद्योगांनाही नवी चालना देणार आहे. मग ती तेल आणि वायू पाइपलाइन असो, औरंगाबाद औद्योगिक शहर असो, नवी मुंबई विमानतळ असो, शेंद्र-बिडकीन औद्योगिक पार्क असो, त्यात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देण्याची क्षमता आहे.
मित्रांनो,
आमचं सरकार राज्याच्या विकासातून देशाचा विकास हा मंत्र घेऊन मार्गक्रमण करत आहे. जेव्हा महाराष्ट्राचा विकास होईल तेव्हा भारताचा ही विकास होईल आणि जेव्हा भारताचा विकास होईल तेव्हा त्याचे तेवढेच लाभ महाराष्ट्रालाही मिळतील. आजकाल जगभरात लोक भारताच्या विकासाची चर्चा करीत आहेत. या विकासाचे लाभ महाराष्ट्रालाही होत आहेत, पुण्यालाही होत आहेत. आपण पाहत आहात की गेल्या नऊ वर्षात भारतात नवनिर्मिती आणि स्टार्ट अप्स च्या माध्यमातून जगभरात नवीन ओळख निर्माण झाली आहे. नऊ वर्षांपूर्वीपर्यंत भारतात केवळ काही शेकड्यात स्टार्ट अप होते, आज आपण एक लाखाहून अधिक स्टार्ट अपचा टप्पा ओलांडला आहे. आम्ही डिजिटल पायाभूत सुविधांचा विस्तार केला असल्याने या स्टार्ट अप, या परिसंस्थेमध्ये एवढी भरभराट झाली आहे. आणि भारतात डिजिटल पायाभूत सुविधांचा पाया रचण्यात पुण्याने फारच मोठी ऐतिहासिक भूमिका वठवली आहे. स्वस्त डेटा, स्वस्त फोन आणि गावागावात पोहोचलेल्या इंटरनेट सुविधेमुळे या क्षेत्राला बळकटी मिळाली आहे. आज भारत जगातल्या सर्वात वेगवान 5-जी सेवा पुरवणाऱ्या देशांपैकी एक आहे. आज देशात फिनटेक असो, बायोटेक असो, ॲग्री टेक असो, या प्रत्येक क्षेत्रात आपले युवक नेत्रदीपक कामगिरी करत आहेत. पुण्याला याचा खूप मोठा लाभ होत आहे.
मित्रांनो,
एका बाजूला आपण महाराष्ट्रात चारही बाजूंनी विकास होताना पाहत आहोत, त्याचवेळी दुसऱ्या बाजूला शेजारच्या कर्नाटक राज्यात जे होत आहे ते देखील आपल्याला समोर दिसत आहे. बंगळुरू एवढा मोठा आयटी हब आहे, जागतिक गुंतवणुकीचे केंद्र आहे. या वेळेला बंगळुरूचा, कर्नाटकाचा वेगाने विकास होणे आवश्यक होते. मात्र तिथे ज्या प्रकारच्या घोषणा करून सरकार स्थापन झाले त्याचे दुष्परिणाम अल्पावधीतच आज संपूर्ण देश पहात असून या समस्या अनुभवत आहे. जेव्हा एखादा पक्ष आपल्या हेतूपुरस्सर स्वार्थासाठी सरकारची तिजोरी रिकामी करतो तेव्हा याचे सर्वात जास्त नुकसान राज्यातल्या लोकांना भोगावे लागते. आपल्या युवा पिढीच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. यामुळे त्या पक्षाचे सरकार तर स्थापन होते मात्र लोकांच्या भवितव्याबाबत धोकादायक परिस्थिती उद्भवते. वस्तुतः कर्नाटकचे सरकार स्वत: हे मान्य करत आहे की त्यांच्याकडे बंगळुरूच्या विकासासाठी, कर्नाटकच्या विकासासाठी तिजोरी रिकामी आहे, पैसे नाहीत. बंधुंनो, देशासाठी हे फारच चिंताजनक आहे. हीच स्थिती आम्हाला राजस्थानातही दिसत आहे. तिथेही कर्जाचे ओझे वाढत आहे, विकासाची कामे ठप्प झाली आहेत.
मित्रांनो,
देशाला पुढे नेण्यासाठी विकसित बनवण्यासाठी धोरण, हेतू आणि निष्ठा तितकीच गरजेची आहे. सरकार, राज्यकारभार चालवणाऱ्यांची धोरणे, हेतू आणि निष्ठाच विकास होणार की नाही हे ठरवत असते. आता जसे की गरिबांना पक्के घर देण्याची योजना आहे. 2014 च्या आधी जे सरकार होतं त्यांनी शहरात गरिबांना घरे देण्यासाठी दहा वर्षात दोन योजना आणल्या. या दोन योजनांनुसार दहा वर्षात देशभरातल्या शहरी गरिबांसाठी केवळ आठ लाख घरे बनली. मात्र या घरांची अवस्था एवढी वाईट होती की बहुतांश गरिबांनी ही घरे घ्यायला नकार दिला. आता तुम्हीच कल्पना करा की कच्च्या घरात, झोपडीत राहणारी व्यक्तीसुद्धा हे घर घेण्यासाठी नकार देत असेल तर ते घर किती वाईट असेल. तुम्ही कल्पना करू शकता की देशात युपीए च्या काळात निर्माण झालेली दोन लाखांहून अधिक घरे अशी होती की जी घेण्यासाठी कोणीही तयार झाले नाही. आपल्या इथे महाराष्ट्रात सुद्धा त्यावेळी निर्माण झालेली पन्नास हजार हून अधिक घरे अशीच रिकामी पडली होती. जनतेच्या समस्यांची चिंताच नसून हा पैशांचा व्यय आहे.
बंधू आणि भगिनींनो,
2014 मध्ये तुम्ही सर्वांनी आम्हाला सेवेची संधी दिलीत. सरकार मध्ये आल्यावर आम्ही चांगल्या हेतूने कामाला सुरुवात करत धोरणांमध्येही बदल आणले. गेल्या 9 वर्षात आमच्या सरकारने गावात आणि शहरात गरिबांसाठी चार कोटीहून अधिक पक्की घरे बांधली. यातही शहरातल्या गरिबांसाठी 75 लाखांहून अधिक घरांची निर्मिती झाली. आम्ही या नवीन घरांच्या निर्मितीत पारदर्शकताही आणली आणि याचा दर्जाही सुधारला. आमच्या सरकारने आणखी एक मोठं काम केलं आहे. जी घरे सरकारने गरिबांना बनवून दिली आहेत त्यातील बहुतांश घरांची नोंदणी महिलांच्या नावावर केली जात आहे. या घरांच्या किंमती लक्षावधी रुपये आहेत. म्हणजेच गेल्या नऊ वर्षात देशात करोडो भगिनी अशा आहेत ज्या लक्षाधीश बनल्या आहेत. माझ्या लक्षाधीश दीदी बनल्या आहेत. त्यांच्या नावावर पहिल्यांदाच कोणत्यातरी संपत्तीची नोंद झाली आहे. आज सुद्धा ज्या बंधू आणि भगिनींना आपली घरे मिळाली आहेत त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो. माझ्याकडून त्यांना अनेक अनेक शुभेच्छा देत आहे. आणि या वेळेचा गणेशोत्सव तर त्यांच्यासाठी भव्य होणार आहे.
बंधू आणि भगिनींनो,
गरीब असो वा मध्यमवर्गीय कुटुंब, सर्व स्वप्न पूर्ण करणं याचीच खात्री मोदी देत आहेत. जेव्हा एक स्वप्न पूर्ण होतं तेव्हा त्या यशाच्या कुशीतून शेकडो नवीन संकल्प जन्म घेतात. हेच संकल्प त्या व्यक्तीच्या जीवनातली सर्वात मोठी ताकद बनतात. आम्हाला तुमच्या मुलांची, तुमच्या वर्तमानाची आणि तुमच्या भावी पिढ्यांची काळजी आहे.
मित्रांनो,
सत्ता येते आणि जाते. समाज आणि देश तेथेच राहतो. यासाठीच तुमच्या वर्तमानना सोबतच तुमचे भविष्य आणखी चांगले बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प हे याच भावनेचं प्रकटीकरण आहे. यासाठी आपल्याला सर्वांना मिळून एकत्र काम करावं लागेल, इथे महाराष्ट्रात एवढे वेगवेगळे पक्ष याच ध्येयाने एकत्र आले आहेत. उद्देश हाच आहे की सर्वांच्या सहभागाने महाराष्ट्रासाठी आणखी चांगलं काम होऊ शकेल. महाराष्ट्र वेगवान गतीने विकास करेल. महाराष्ट्राने आम्हा सर्वांवर नेहमीच प्रेम केलं आहे खूप आशीर्वाद दिले आहेत. हे आशीर्वाद असेच कायम राहतील याच मनोकामनेसह पुन्हा एकदा विकास प्रकल्पांच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देत आहे.
माझ्याबरोबर बोला..
भारत माता की जय
भारत माता की जय
भारत माता की जय
धन्यवाद !