महाराष्ट्रातील माझ्या बंधू-भगिनींना
जय श्रीकृष्ण...
उद्या श्रीकृष्ण जयंती आहे, मी तुम्हाला आजच शुभेच्छा देतो.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी आणि देशाचे कृषीमंत्री, ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान जी, इथले स्थानिक भूमीपुत्र आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रतापराव जाधव, केंद्र सरकार मधील आमचे मंत्री चंद्रशेखर जी, इथल्या स्थानिक भूमिपुत्र भगिनी रक्षा खडसे जी, उपमुख्यमंत्री अजित पवार जी, देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र सरकार मधले मंत्री, खासदार आणि आमदार तसेच एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या आमच्या माता भगिनी. लांब लांब पर्यंत जिथपर्यंत माझी दृष्टी पोहोचत आहे असं वाटतंय की मातांचा महासागर इथे निर्माण झाला आहे. हे दृश्य माझ्या मनाला अतीव समाधान देत आहे
माझा संवाद सुरू करण्याआधी मी नेपाळ बस दुर्घटनेबाबत माझ्या मनातील शोक व्यक्त करू इच्छितो. या अपघातात आपण महाराष्ट्रातल्या जळगावच्या अनेक सहकाऱ्यांना गमावलं आहे. मी सर्व पिडीत कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त करित आहे. हा अपघात झाल्याबरोबर भारत सरकारने लगेचच नेपाळ सरकारशी संपर्क साधला. आम्ही आमच्या मंत्री रक्षाताई खडसे यांना त्वरित नेपाळला जाण्याचे निर्देश दिले. आपले जे नातलग आपल्याला सोडून गेले त्यांचे पार्थिव देह आम्ही विशेष हवाई दलाच्या विशेष विमानाने परत आणले आहेत. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीत लवकरच सुधारणा व्हावी अशी मनोकामना मी व्यक्त करतो. या घटनेमुळे बाधित सर्वांना मी हा विश्वास देत आहे की त्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून संपूर्णतः मदत दिली जाईल.
सहकाऱ्यांनो,
आज लखपती दीदींचा हा महासोहळा होत आहे. माझ्या सर्व लाडक्या बहिणी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज इथून देशभरातल्या लक्षावधी सखी मंडळांसाठी 6 हज़ार कोटी रुपयांहून अधिक निधी वितरीत केला गेला आहे. लाखो बचत गटांशी जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील आमच्या भगिनींना सुद्धा कोट्यवधी रुपयांची मदत मिळाली आहे. या निधीमुळे लाखो बहिणींना लखपती दीदी बनण्यासाठी सहाय्य मिळाले आहे. माझ्या सर्व माता बहिणींना अनेकाअनेक शुभेच्छा
सहकाऱ्यांनो,
आपल्या सर्वांमध्ये मला महाराष्ट्राच्या गौरवशाली संस्कृती आणि संस्कारांचेही दर्शन घडते. आणि महाराष्ट्राचे हे संस्कार केवळ भारतातच नाही तर जगभर पसरले आहेत. मी कालच परदेश दौऱ्यावरून परतलो आहे. मी युरोपातल्या पोलंड या देशात गेलो होतो. तिथे सुद्धा मला महाराष्ट्राचे दर्शन घडले. महाराष्ट्राची संस्कृती, इथल्या संस्कारांचे दर्शन झाले. पोलंडची जनता महाराष्ट्रातल्या जनतेचा खूप सन्मान करते. इथे बसून तुम्ही त्याची कल्पना करू शकत नाही. तिथल्या राजधानीत एक कोल्हापूर स्मारक आहे. पोलंडच्या जनतेने हे स्मारक कोल्हापुरातल्या जनतेच्या सेवा आणि सत्काराच्या भावनेचा सन्मान करण्यासाठी बनवले आहे.
आपल्यातल्या काही जणांना माहिती असेल की दुसऱ्या महायुद्धा दरम्यान पोलंडच्या हजारो मातांना आणि मुलांना कोल्हापूरच्या राजघराण्याने आश्रय दिला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संस्कारांनुसार राजघराण्याने आणि सामान्य लोकांनी आश्रितांची सेवा केली. जेव्हा तिथे महाराष्ट्रातल्या लोकांचा सेवाभाव, मानवते बाबतचे प्रेम याचे कौतुक ऐकले तेव्हा माझे मस्तक अभिमानाने उंच होत गेले. आपल्याला अशाच प्रकारे महाराष्ट्राचा विकास करून महाराष्ट्राचे नाव सर्व जगात आणखी उंच करत रहायचे आहे
सहकाऱ्यांनो,
महाराष्ट्राच्या संस्कारांना इथल्या शूरवीर मातांनी जन्म दिला आहे. इथल्या मातृशक्तीने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे. आमचे जळगाव हे तर वारकरी परंपरेचे तीर्थ आहे महान संत मुक्ताईची ही भूमी आहे. त्यांची साधना, त्यांचे तप आजच्या पिढीसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे. बहिणाबाईंच्या कविता आज देखील समाजाला परंपरांमधून बाहेर पडण्याचा विचार करण्यासाठी उद्युक्त करते. महाराष्ट्राचा कोणताही कोपरा असो, इतिहासातला कोणताही कालखंड असो, मातृ शक्तीचे योगदान सर्वोत्तम राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याला कोणी दिशा दिली ? हे कार्य माता जिजाऊ यांनी केले.
जेव्हा समाजातल्या मुलींच्या शिक्षणाला, मुलींच्या कामकाजाला महत्व दिले जात नव्हते तेव्हा सावित्रीबाई फुले पुढे आल्या. म्हणजेच भारताच्या मातृशक्तीने कायमच समाज आणि देशाचे भविष्य घडवण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. आणि आज जेव्हा आपला देश विकसित बनण्यासाठी परिश्रम करत आहे तेव्हा पुन्हा एकदा आपल्यातली मातृशक्ती पुढे येत आहे. महाराष्ट्रातल्या तुम्ही सर्व बहिणी किती चांगले काम करत आहात हे माझ्या स्वतः समोरचे उदाहरण मी पाहत आहे. तुमच्या सगळ्यांमध्ये मी राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांची छाप पाहतो.
सहकाऱ्यांनो,
जेव्हा मी लोकसभा निवडणुकीदरम्यान तुमच्यासमोर आलो होतो तेव्हा मी म्हटलं होतं की आपल्याला तीन कोटी बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे. म्हणजेच तीन कोटी अशा बहिणी ज्या स्वयं सहाय्यता गटात काम करतात, ज्यांचं स्वतःचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयाहून अधिक असेल. गेल्या दहा वर्षात एक कोटी लखपती दीदी बनल्या आहेत आणि गेल्या दोन महिन्यात केवळ दोन महिन्यातच आणखी 11 लाख लखपती दीदी नव्याने त्यांच्यात सामील झाल्या आहेत. यात सुद्धा एक लाख नवीन लखपती दीदी याच आपल्या महाराष्ट्रात तयार झाल्या आहेत. यासाठी इथल्या महायुती सरकारने खूप परिश्रम घेतले आहेत एकनाथ जी, देवेंद्र जी आणि अजितदादांचा संपूर्ण पक्ष मातांना, भगिनींना सशक्त करण्यासाठी कार्यरत आहे. महाराष्ट्रातल्या मातांसाठी, बहिणींसाठी, युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी एकाहून एक चांगल्या योजना, नवीन नवीन योजना अंमलात आणल्या आहेत.
सहकाऱ्यांनो,
लखपती दीदी बनवण्याची ही मोहीम केवळ बहिणींचे, लेकींचे उत्पन्न वाढवण्याची मोहीम एवढेच नाही. तर हे पूर्ण कुटुंबीयांसाठी, येणाऱ्या पिढ्यांना सशक्त सबल करण्यासाठीची एक महामोहीम आहे. याने गावांचे संपूर्ण अर्थकारण बदलले जात आहे. इथे या मैदानात उपस्थित प्रत्येक बहिण लेक चांगल्या प्रकारे जाणत आहे की जेव्हा त्या कमाई करू लागतात तेव्हा कसे त्यांना अधिकार प्राप्त होतात. घरात कुटुंबामध्ये त्यांचा सन्मान वाढतो. जेव्हा एखाद्या बहिणीचे उत्पन्न वाढते तेव्हा त्या कुटुंबीयांकडे खर्च करण्यासाठी आणखी पैसे येतात. याचाच अर्थ एका बहिणीचेही लखपती दीदी बनणे म्हणजे संपूर्ण कुटुंबाचे नशीब बदलत आहे.
इथे येण्याआधी देशातल्या निरनिराळ्या भागातून आलेल्या अशा बहिणींचे अनुभव ऐकत होतो. सर्व लखपती दीदींमध्ये जबरदस्त आत्मविश्वास होता. मी त्यांचा उल्लेख जरी लखपती दीदी असा करत असलो तरी त्यांच्यात काही जणींचे उत्पन्न दोन लाख होते, काही जणी तीन लाख कमावणाऱ्या होत्या तर काहीजणी आठ लाख उत्पन्न असणाऱ्याही होत्या, आणि त्यांनी ही कमाल केवळ गेल्या काही महिन्यातच करून दाखवली आहे.
सहकाऱ्यांनो,
आज आपण सर्वत्र ऐकतो की भारत ही जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनत आहे. यात आपल्या बहिणींची लेकींची खूप मोठी भूमिका आहे. मात्र काही वर्षांपूर्वीपर्यंत ही परिस्थिती नव्हती. बहिणी या प्रत्येक कुटुंबीयांच्या आनंदाची सुखाची हमी असतात. मात्र महिलांना मदत मिळेल याची हमी घेणारा कोणीच नव्हता. देशातल्या कोट्यावधी बहिणींच्या नावावर कोणतीच मालमत्ता नसायची. जर त्यांना बँकेतून कर्ज घ्यायचे असेल तर त्यांना ते मिळायचे नाही. अशातच कोणतेही लहान मोठे काम करायचे असेल तेव्हा इच्छा असूनही त्या करू शकायच्या नाहीत. आणि त्यासाठीच या तुमच्या भावाने, तुमच्या लेकाने एक संकल्प केला. मी ठरवलं की काहीही होऊ दे, माझ्या देशातल्या माता बहिणी लेकींच्या समस्या मी कमी करेनच. यासाठी मोदी सरकारने एका मागोमाग एक महिलांच्या हिताचे निर्णय घेतले. मी आज आव्हान देतो की याआधीच्या सरकारांची सात दशके एका बाजूला ठेवा. एका तराजूत एका बाजूला सात दशके आणि तराजूच्या दुसऱ्या बाजूला मोदी सरकारची दहा वर्ष ठेवली जावीत. जेवढे काम मोदी सरकारने देशाच्या बहिणी लेकींसाठी केले आहे तेवढे स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने केले नाही.
सहकाऱ्यांनो,
हे आमचे सरकार आहे. ज्यांनी ठरवले की गरिबांसाठी जी घरे सरकार बनवत आहे त्याची नोंदणी महिलांच्या नावावर होईल. आजपर्यंत चार कोटी घरे बनली आहेत, यातील अधिकांश महिलांच्या नावावर आहेत. अजून तीन कोटी घरे बनवणार आहोत. यातीलही बहुतांश घरे आमच्या माता बहिणीच्या नावावरच होतील, महिलांच्या नावावर असतील. दुसरे काम आम्ही बँकांशी संलग्न असलेल्या व्यवस्थेत केले. आधी जनधन खाती उघडली तेव्हा सर्वात जास्त खाती बहिणींसाठी उघडली. त्यानंतर मुद्रा योजना सुरू केली. आम्ही बँकांना सांगितले की आपण विना हमी कर्ज द्या आणि जर हमी हवी असेल तर मोदी उपस्थित आहेत.
या योजनेच्या सुमारे 70 टक्के लाभार्थी माता आणि भगिनी आहेत. देशात असे काही लोक होते जे म्हणायचे की महिलांना अशाप्रकारे कर्ज देऊ नका, बुडून जाईल, यामध्ये धोका आहे. पण माझे विचार वेगळे होते, मला तुमच्यावर, आपल्या मातृशक्तीवर, त्यांच्या इमानदारीवर आणि कर्तृत्वावर पूर्ण विश्वास आहे. माता भगिनींनी मेहनत केली आहे आणि प्रामाणिकपणे कर्ज फेडले आहे.
आता तर मुद्रा योजनेतील कर्जाची सीमा देखील आम्ही 20 लाख केली आहे. आम्ही पदपथावर काम करणाऱ्यांसाठी, फेरीवाल्यांसाठी स्वनिधी योजना चालवली आहे. या योजनेतही विना गॅरंटी कर्ज दिले जात आहे. याचाही आमच्या भगिनींना , आमच्या मुलींना खूप मोठा लाभ होत आहे. आपला विश्वकर्मा परिवार, जो हस्तकलेचे काम करतो, यामध्येही मोठ्या संख्येने आपल्या भगिनी जोडल्या गेल्या आहेत. त्यांची हमी देखील सरकारने घेतली आहे.
मित्रांनो,
पूर्वी जेव्हा मी सखी मंडळांबाबत बोलत होतो, महिला बचत गटांबाबत बोलत होतो, तेव्हा असे खूप थोडे लोक होते, जे याचे महत्त्व काय आहे हे ते लक्षात घेऊ शकत होते. मात्र आज पहा, ही भारताच्या अर्थव्यवस्थेची एक खूप मोठी शक्ती बनत आहे. गावागावात, दुर्गम आदिवासी क्षेत्रांमध्ये बचत गट जे परिवर्तन घडवत आहेत ते सर्वांच्या नजरेसमोर आहे. दहा वर्षात, हा आकडा देखील खूप मोठा आहे, दहा वर्षात 10 कोटी भगिनी या अभियानाशी जोडल्या गेल्या आहेत आणि आम्ही त्यांना बँकांशी जोडले आहे. आम्ही त्यांना बँकांकडून सहज आणि कमी व्याजदराचे कर्ज मिळवून दिले आहे.
मी तुम्हाला एक आकडा सांगतो. तुम्ही हा आकडा ऐकून आश्चर्यचकित होऊन जाल. आणि, पूर्वी माझ्या देशात असेही चालत होते का, हे समजल्याने कदाचित तुमच्या मनात राग देखील उत्पन्न होईल. सन 2014 पर्यंत 25 हजार कोटी रुपयांहून देखील कमी कर्ज महिला बचत गटांना मिळाले होते. लक्षात असू द्या, हे मी त्या महिला बचत गटांच्या बद्दल बोलत आहे, केवळ 25 हजार कोटी, जेव्हा की मागच्या 10 वर्षात जवळपास 9 लाख कोटी रुपये मदत देण्यात आली आहे. कुठे 25 हजार कोटी रुपये आणि कुठे 9 लाख कोटी रुपये. इतकेच नाही तर सरकार जी थेट मदत करते त्यातही सुमारे 30 पट वाढ करण्यात आली आहे. याच्या परिणाम स्वरूप आज गावातील आपल्या भगिनी स्वतःची मिळकत वाढवत आहेत आणि देशाला मजबूत देखील बनवत आहेत. आणि मी हे पुन्हा एकदा सांगतो आहे की ही तर केवळ एक झलक आहे. आता आम्ही भगिनी मुलींच्या भूमिकेचा आणखी जास्त विस्तार करत आहोत. आज सव्वा लाखाहून अधिक बँक सखी गावागावात बँकिंग सेवा प्रदान करत आहेत. आणि आत्ताच काही भगिनी मला सांगत होत्या की त्या एक एक कोटी रुपयांचा कारभार सांभाळत आहेत.
आता आम्ही भगिनींना ड्रोन पायलट बनवत आहोत. आम्ही भगिनींच्या बचत गटांना लाखो रुपयांचे ड्रोन देत आहोत ज्यामुळे ड्रोनचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी त्या शेतकऱ्यांची मदत करू शकतील. आम्ही 2 लाख पशु सखींना देखील प्रशिक्षित करत आहोत, यामुळे त्या पशुपालकांना मदत करू शकतील. केवळ इतकेच नाही तर आधुनिक शेतीसाठी, नैसर्गिक शेतीसाठी देखील आम्ही नारीशक्तीला नेतृत्व प्रदान करत आहोत. यासाठी आम्ही कृषी सखी कार्यक्रम सुरू केला आहे. आगामी काळात देशातील गावागावात अशा अनेक लाखो कृषी सखी बनवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. या सर्व अभियानातून मुलींना रोजगारही मिळेल, त्यांचा आत्मविश्वास देखील वाढेल आणि मुलींच्या सामर्थ्याबाबत समाजात देखील एका नव्या विचार प्रणालीची जन्म होईल.
मित्रांनो,
नुकताच गेल्या महिन्यात देशाचा एक अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये माता, भगिनी आणि मुलींशी संबंधित योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुलींनी जास्तीत जास्त संख्येने नोकरी करावी या साठी कार्यालयात, कारखान्यात त्यांच्यासाठी विशेष सुविधांची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यांना राहण्यासाठी वर्किंग वुमन हॉस्टेलची सुविधा असावी, मुलांसाठी पाळणाघराची सुविधा असावी यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. आमचे सरकार मुलींसाठी ते प्रत्येक क्षेत्र खुले करत आहे ज्यात कधीकाळी त्यांच्यावर अनेक निर्बंध होते. आज सशस्त्र सेनेच्या तिनही दलात महिला अधिकारी तैनात केल्या जात आहेत, फायटर पायलट देखील तैनात केल्या जात आहेत. सैनिकी महाविद्यालयांमध्ये, सैन्य अकादमी मध्ये मुलींना प्रवेश मिळत आहे. आपली जी पोलीस दले, अर्ध सैनिक दले आहेत त्यामध्ये देखील मुलींच्या संख्येत खूप मोठी वृद्धी झाली आहे. गावांमध्ये कृषी आणि दूध उत्पादन क्षेत्रापासून स्टार्ट अप्स क्रांतीपर्यंत, आज मोठ्या संख्येने मुली व्यवसाय व्यवस्थापन करत आहेत. राजकारणात देखील मुलींचा सहभाग वाढावा यासाठी आम्ही नारीशक्ती वंदन कायदा बनवला आहे.
मित्रांनो,
माता, भगिनी आणि मुलींचे सामर्थ्य वाढवण्यासोबतच त्यांची सुरक्षा वाढवणे ही देखील देशाची प्राथमिकता आहे. हा मुद्दा मी लाल किल्ल्यावरून बोलताना देखील अनेक वेळा मांडला आहे. आज देशातील कोणतेही राज्य असो, आपल्या भगिनी आणि मुलींची वेदना, त्यांचा राग मला समजतो आहे. मी पुन्हा एकदा देशातील प्रत्येक राजकीय पक्षाला सांगू इच्छितो, प्रत्येक राज्य सरकारला सांगू इच्छितो की महिलांविरोधात घडणारे गुन्हे हे अक्षम्य अपराध आहेत. दोषी कोणीही असो त्याची सुटका होता कामा नये. दोषी व्यक्तीला कोणत्याही स्वरूपातील मदत करणाऱ्यांची देखील गय केली गेली नाही पाहिजे. रुग्णालय असो शाळा असो कार्यालय असो किंवा मग पोलीस व्यवस्था, ज्या कोणत्या स्तरावर दुर्लक्ष झाले आहे त्या सर्वांचा हिशेब होणे गरजेचे आहे. हे पाप अक्षम्य आहे, हा निरोप अगदी स्पष्ट स्वरूपात वरून खाली पर्यंत पोहोचला पाहिजे. अरे! सरकारे येत राहतील आणि जात राहतील मात्र जीवनाची रक्षा आणि नारीच्या सन्मानाची सुरक्षा ही एका समाजाच्या रूपात देखील आणि सरकारच्या रूपात देखील आपल्या सर्वांची खूप मोठी जबाबदारी आहे.
मित्रांनो,
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना अत्यंत कठोर शिक्षा मिळावी म्हणून आमचे सरकार कायद्यांना कठोर बनवण्यासाठी देखील निरंतर प्रयत्न करत आहे. आज देशातील भगिनी आणि मुली मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत म्हणून मी हे विशेष रूपाने आपल्याला सांगू इच्छितो. पूर्वी अशी तक्रार केली जात होती की, एफ आय आर वेळेवर नोंदवला जात नाही. सुनावणी केली जात नाही. खटला बराच काळ प्रलंबित राहतो. अशा अनेक अडचणी आम्ही भारतीय न्याय संहिते द्वारे दूर केल्या आहेत. यातील पूर्ण एक प्रकरण महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचारांशी संबंधित आहे. जर पीडित महिलेची पोलीस ठाण्यात जाण्याची इच्छा नसेल तर ती घरात बसून ई-एफ आय आर नोंदवू शकते. ई- एफ आय आर मध्ये पोलीस ठाण्याच्या स्तरावर कोणतीही दिरंगाई किंवा खाडाखोड करता येणार नाही हे देखील आम्ही सुनिश्चित केले आहे. यामुळे जलद गतीने तपास करण्यासाठी आणि दोषी व्यक्तींना कठोर शिक्षा देण्यासाठी मदत मिळेल.
मित्रांनो,
अल्पवयीन मुलांबरोबर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे. मुलींना लग्नाचे अमिष दाखवून फसवल्याची अनेक प्रकरणे समोर येतात. या संदर्भात पूर्वी कोणताही स्पष्ट कायदा नव्हता. मात्र आता भारतीय न्याय संहितेमध्ये लग्नाचे खोटे वचन आणि फसवणूक या प्रकारांनाही स्पष्ट शब्दात परिभाषित करण्यात आले आहे. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार हर प्रकारे राज्य सरकारांना मदत करण्यास सज्ज आहे याची मी तुम्हाला हमी देतो. आपल्याला भारतातील समाजातून ही पापाची विचारधारा मिटवून टाकायची आहे.
म्हणूनच मित्रांनो,
आज भारत विकसित होण्याच्या मार्गावर अग्रेसर होत आहे आणि यामध्ये महाराष्ट्राची खूप मोठी भूमिका आहे. महाराष्ट्र, विकसित भारताचा एक चमकता तारा आहे. महाराष्ट्र, जगभरातील गुंतवणूकदारांचे एक आकर्षण केंद्र बनत आहे. महाराष्ट्राचे भविष्य जास्तीत जास्त गुंतवणुकीमध्ये आहे, नोकरीच्या नव्या संधीमध्ये आहे.
आणि महायुतीचे सरकार म्हणजे गुंतवणूक आणि नोकरीची हमी आहे. महाराष्ट्राला आगामी अनेक वर्षांपर्यंत महायुतीच्या स्थिर सरकारची गरज आहे. महाराष्ट्राला महायुतीच्या अशा सरकारची गरज आहे जे इथे उद्योगांना प्रोत्साहित करू शकेल. महाराष्ट्रात अशा सरकारची गरज आहे जे तरुणांच्या शिक्षण, कौशल्य आणि नोकरीवर भर देऊ शकेल. महाराष्ट्राची स्थिरता आणि समृद्धी यासाठी येथील माता भगिनी पुढाकार घेऊन मला साथ देतील याचा मला पूर्ण विश्वास आहे.
मला माझ्या भगिनींवर पूर्ण विश्वास आहे. पुन्हा एकदा, महाराष्ट्रातील युती सरकारच्या कामांना भारत सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देत मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.
माझ्या बरोबर म्हणा-
भारत माता की-जय.
दोन्ही हात वर करून मुठी बांधून पूर्ण ताकदीने म्हणा -
भारत माता की- जय.
भारत माता की- जय.
भारत माता की- जय.
भारत माता की- जय.
भारत माता की- जय.
खूप खूप आभार.