प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचा केला प्रारंभ
एम्स देवघर येथील 10,000 व्या जनऔषधी केंद्राचे लोकार्पण
देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याच्या कार्यक्रमाची केली सुरुवात
सरकारी योजनांची पुरेपूर अंमलबजावणी साध्य करण्यासाठी आणि देशभरातील नागरिकांपर्यंत लाभ पोहोचतील हे सुनिश्चित करण्याचा विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश ”
''मोदी की गॅरंटी वाहन'' आतापर्यंत सुमारे 30 लाख नागरिक संलग्न असलेल्या 12,000 हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये पोहोचले''
“विकसित भारत संकल्प यात्रेचे सरकारच्या पुढाकारातून जनचळवळीत रूपांतर झाले आहे”
“आतापर्यंत ज्यांना वंचित ठेवण्यात आले त्यांच्यापर्यंत सरकारी योजना आणि सेवा पोहोचवणे हे विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट ”
"जिथे इतरांकडून अपेक्षा संपतात तिथे मोदींची हमी सुरू होते"
"भारताची नारी शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि भारतातील गरीब कुटुंब हे विकसित भारताचे चार अमृत स्तंभ आहेत "

या कार्यक्रमाशी जोडल्या गेलेल्या विविध राज्यांचे राज्यपाल, या राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्र आणि राज्य सरकारांतील मंत्री, संसद सदस्य तसेच आमदार आणि गावागावांतून या कार्यक्रमात सहभागी झालेले माझे प्रिय बंधू-भगिनींनो, मातांनो, माझ्या शेतकरी बंधू-भगिनींनो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या तरुण सहकाऱ्यांनो,

आज घडीला मी पाहतो आहे की देशाच्या गावागावांतून इतक्या मोठ्या प्रमाणात देशवासीय या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत आणि माझ्यासाठी तर संपूर्ण हिंदुस्तान हे माझे कुटुंब आहे आणि तुम्ही सर्वजण माझे कुटुंबीय आहात. तुम्हां सर्व कुटुंबियांची भेट घेण्याची संधी मला मिळाली आहे. दुरुन का होईना, तुमच्याशी संवाद साधून मला शक्ती मिळते.तुम्ही वेळात वेळ काढून आलात. मी तुम्हां सर्वांचे अभिनंदन करतो.

आज विकसित भारत संकल्प यात्रेचे 15 दिवस पूर्ण होत आहेत. सुरुवातीला कार्यक्रमाची तयारी करताना ..... काय करावे, कसे करावे...याबाबत थोडी अनिश्चितता होती मात्र गेल्या तीन चार दिवसांपासून ज्या बातम्या मला मिळत आहेत त्यानुसार, आणि पडद्यावर मला जी दृश्ये दिसत आहेत त्यांतून असे दिसत आहे की हजारो लोक एकामागोमाग एक असे या यात्रेमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. म्हणजेच या 15 दिवसांमध्येच या यात्रेत सहभागी असलेल्या ‘विकास रथा’ला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आणि मला अनेक लोकांनी असे सांगितले आहे की जसजसा हा रथ पुढे सरकतो आहे तसतसे लोकांनी याचे नाव देखील बदलून टाकले आहे. सरकारने जेव्हा हा उपक्रम सुरु केला तेव्हा सांगितले होते की हा विकास रथ आहे; पण आता लोक म्हणत आहेत की हा रथ वगैरे नाही आहे, ही तर मोदींची गॅरंटी असलेली गाडी आहे. मला हे ऐकून फारच छान वाटले, तुमचा माझ्यावर इतका विश्वास आहे की तुम्ही या गाडीला ‘मोदींची गॅरंटी असलेली गाडी’ म्हटले आहे. तर मीही तुम्हाला सांगतो की ज्याला तुम्ही मोदींची गॅरंटी असलेली गाडी’ म्हणता आहात त्या गाडीच्या माध्यमातून मोदी तुमची कामे करण्याप्रती वचनबद्ध आहे.

काही वेळापूर्वी मला अनेक लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. माझ्या देशातील माता-भगिनी, तरुण वर्ग किती उत्साहाने आणि चैतन्याने भरलेला आहे, त्यांच्यात किती आत्मविश्वास आहे हे पाहून मी आनंदित झालो. आणि आतापर्यंत देशातील 12 हजारपेक्षा अधिक पंचायतींपर्यंत ही मोदींची गॅरंटी असलेली गाडी पोहोचली आहे. सुमारे 30 लाख लोकांनी या गाडीच्या माध्यमातून विविध लाभ घेतले आहेत, ते या गाडीशी जोडले गेले आहेत, चर्चा केली आहे, आपले प्रश्न मांडले आहेत, ज्या गोष्टींची त्यांना गरज आहे त्या संदर्भातील अर्ज त्यांनी सादर केले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या संख्येने माता-भगिनी मोदींची गॅरंटी असलेल्या गाडीपर्यंत पोहोचत आहेत. आताच बलबीरजी यांनी सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी शेतीची कामे सुरु आहेत. असे असूनही ती शेतीची कामे बाजूला सारून लोकांचे प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होणे याचा अर्थ असा होतो की, विकासाप्रती लोकांचा किती विश्वास आहे, विकासाचे काय महत्त्व आहे हे आज देशाच्या गावागावांतील लोकांना समजू लागले आहे.

 

आणि प्रत्येक ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होण्यासाठीच लोक येतात असे नव्हे तर लोक उत्साहाने या यात्रेचे स्वागत करत आहेत, त्यासाठी उत्तम तयारी करत आहेत, हरेक गावात याची माहिती पोहोचवण्याची व्यवस्था करत आहेत आणि भरभरून प्रतिसाद देखील देत आहेत. देशवासीय या उपक्रमाला लोक चळवळीचे रूप देऊन हे अभियान पुढे नेत आहेत. ज्या प्रकारे लोक विकसित भारत रथांचे स्वागत करत आहेत, या रथांसह मार्गक्रमण करत आहेत ते प्रशंसनीय आहे. आपल्या सरकारचे काम करणारे जे माझे कर्मयोगी सहकारी आहेत, कर्मचारी बंधू भगिनी आहेत त्यांचे देखील लोक देवाप्रमाणे स्वागत करत आहेत. ज्या प्रकारे युवक आणि समाजाच्या इतर वर्गांतील लोक विकसित भारत यात्रेमध्ये सहभागी होत आहेत, त्यासंबंधीचे व्हिडिओ मी पाहिले आहेत आणि ते अत्यंत प्रभावित करणारे आहेत, प्रेरणादायी आहेत. आणि मला हेही दिसते आहे की सगळे लोक आपापल्या गावाची कहाणी समाज माध्यमांवर अपलोड करत आहेत. आणि माझी अशी इच्छा आहे की या सगळ्या कहाण्या तुम्ही नमो अॅपवर नक्की अपलोड करत राहावे, कारण मी नमो अॅपवर या साऱ्या घडामोडी दररोज बघत असतो. जेव्हा मी प्रवास करत असतो तेव्हा सतत या गोष्टी पहात असतो, कोणत्या गावात, कोणत्या राज्यात कधी काय झाले, कसे झाले याची माहिती घेत असतो. आणि तरुण वर्ग तर एक प्रकारे भारताचा राजदूत झाला आहे. त्यांचा उत्साह जबरदस्त आहे.

युवक सातत्याने यावर व्हिडिओ अपलोड करत आहेत, आपापल्या कामाचा प्रसार करत आहेत. मला हेही दिसले की काही गावांमध्ये मोदींची गॅरंटी असलेली गाडी येणार म्हणून दोन दिवस मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. याचे कारण काय तर गावात ‘मोदींची गॅरंटी असलेली गाडी येणार आहे’ हा जो उत्साह आहे, जी वचनबद्धता आहे ती खूप प्रेरक ठरते आहे.

तसेच, मला हे देखील दिसून आले की लोकांनी गाणी गाऊन, वाद्ये वाजवून, नवनवे कपडे घालून या रथांचे स्वागत केले जसे काही त्यांच्या घरी दिवाळीचा सण आहे अशा पद्धतीने गावात लोक काम करत आहेत. आज जो कोणी या विकसित भारत संकल्प यात्रेकडे पाहतो आहे तो म्हणतो आहे की भारत आता थांबणार नाही, भारत आता सतत पुढेच जात राहणार. भारत आता लक्ष्य साध्य करुनच वाटचाल करणार आहे. भारत आता थांबणारही नाही आणि कधी थकणार देखील नाही. आता तर 140 कोटी देशवासीयांनी विकसित भारत घडवण्याचा निश्चय केला आहे. आणि जेव्हा देशवासीयांनीच असा निर्धार केला आहे तेव्हा हा देश विकसित होऊनच दाखवणार हे नक्की. मी आत्ता पाहिले की दिवाळीच्या काळात देशवासीयांनी व्होकल फॉर लोकल म्हणजेच स्थानिक वस्तूंच्या खरेदीचा उपक्रम राबवला. यामध्ये लाखो कोटी रुपयांची उलाढाल झाली. हे फार मोठे कार्य झाले आहे.

माझ्या कुटुंबियांनो,

देशाच्या कानाकोपऱ्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या बाबतीत दिसून येणारा उत्साह अनाठायी नाही. गेल्या दहा वर्षांत त्यांनी मोदींना पाहिले आहे, मोदींचे काम पाहिले आहे आणि भारत सरकारवर त्यांचा बसलेला अपार विश्वास हे या उत्साहाचे कारण आहे. भारताच्या प्रयत्नांवर त्यांचा विश्वास आहे. आपल्या देशातील लोकांनी असाही एक काळ पाहिला आहे जेव्हा देशात सत्तेवर असणारी पूर्वीची सरकारे स्वतःला जनतेचे मायबाप मानत असत. आणि याच कारणामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील अनेक दशकांपर्यंत देशातील लोकसंख्येतील एक मोठा वर्ग मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला. त्या काळी एखादा मध्यस्थ भेटल्याशिवाय सरकारी कार्यालयांमध्ये पोहोचणे कठीण होऊन बसले होते. जोपर्यंत तुम्ही मध्यस्थाचा खिसा गरम करत नाही तोपर्यंत एकही सरकारी कागदपत्र हाती पडणे शक्य होत नसे अशी परिस्थिती होती. त्यावेळी देशात जनतेला ना घर मिळू शकत होते, ना शौचालय, ना विजेची जोडणी आणि ना गॅसची सोय होत होती. त्यावेळी ना लोकांचा विमा उतरवला जायचा, ना त्यांना निवृत्तीवेतन मिळू शकायचे, ना त्यांची बँकेत खाती उघडली जायची, अशी स्थिती होती या देशाची. आज तुम्हाला हे समजल्यावर खूप वाईट वाटेल, पण भारताची निम्म्याहून अधिक लोकसंख्या तत्कालीन सरकारमुळे निराश झाली होती. बँकेत खाते उघडणे देखील कठीण होऊन बसले म्हणजे कल्पना करा. लोकांची आशा-आकांक्षा संपली होती. जे लोक हिमतीने, काही वशिला लावून स्थानिक सरकारी कार्यालयांमध्ये शिरकाव करून घेऊ शकायचे, थोडी लालूच सुद्धा देऊन बघायचे, तेव्हा कुठे ही लाच घेतल्यावर त्यांचे थोडेफार काम होऊ शकायचे. त्यांना लहानसहान कामांसाठी मोठी लाच द्यावी लागत असे.

आणि त्यावेळची सरकारे देखील प्रत्येक कामात राजकारण करत असत. निवडणुका आल्या की यांना मतांची बँक दिसत असे आणि या मतांच्या बँकेसाठीच सर्व हालचाली होत असत. गावांना भेट द्यायची असली तर अशाच गावात जातील की जेथून यांना मते मिळणार आहेत. एखाद्या मोहल्ल्यात जायचे असेल तर अशाच मोहल्ल्याला भेट देतील जिथे राहणारे यांना मते देणार आहेत, इतर मोहल्ल्यांकडे ते फिरकायचे देखील नाहीत. हा असा भेदभाव, असा अन्याय हा त्यांचा स्वभावाच झाला होता.

ज्या भागात त्यांना मते मिळत असल्याचे दिसत असे त्याकडे थोडेफार लक्ष दिले जात असे.म्हणूनच देशवासीयांचा अशा मायबाप सरकारच्या घोषणांवर फारसा विश्वास नसे. या निराशाजनक परिस्थितीत आम्ही बदल घडवला.आज देशात जे सरकार आहे,ते जनतेला जनार्दन मानणारे सरकार आहे, ईश्वराचे रूप मानणारे सरकार आहे, आम्ही सत्ताधारी या भावनेने नव्हे तर सेवा भावनेने काम करणारे लोक आहोत. याच सेवा भावनेने आपल्यासह गावा-गावात जाण्याचा निश्चय मी केला आहे. आज देश पूर्वीचे कुशासन मागे सोडून सुशासन आणि सुशासन म्हणजे शंभर टक्के लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचला पाहिजे. कोणीही मागे राहता कामा नये, ज्याचा यावर हक्क आहे त्याला तो लाभ मिळाला पाहिजे.

सरकारने नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांचा हक्क त्यांना द्यावा हाच तर नैसर्गिक न्याय आहे आणि खरा सामाजिक न्यायही हाच आहे. कोट्यवधी देशवासीयांच्या मनात पूर्वी जी उपेक्षेची भावना होती, आपण दुर्लक्षित असल्याची भावना होती,कोण विचारणार,कोण ऐकणार,कोण भेटणार ही जी भावना होती ती आता आमच्या सरकारच्या दृष्टीकोनामुळे नष्ट झाली आहे. इतकेच नव्हे तर आता या देशावर आपलाही हक्क आहे, माझाही यासाठी हक्क आहे अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. माझ्या हक्काचे कोणी हिरावून घेता कामा नये, माझे हक्क अबाधित राहिले पाहिजेत.माझे हक्काचे मला मिळाले पाहिजे आणि मी आहे तिथून मला पुढे जायचे आहे. आताच मी पूर्णा समवेत संवाद साधला तेव्हा त्यांला आपल्या मुलाला अभियंता करायचे आहे. ही आकांक्षाच आपल्या देशाला विकसित देश करणार आहे. मात्र आकांक्षा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा दहा वर्षात यशाच्या गोष्टी कानावर पडतात.

मोदी गॅरंटी वाली ही जी गाडी आपल्याकडे आली आहे ना, ती आपल्याला हेही सांगते की पहा आम्ही कुठपर्यंत केले आहे. इतका विशाल देश आहे,गावातले दोन-चार लोक राहिले असतील आणि कोण राहिले म्हणून मोदी शोधायला आले आहेत.कारण येत्या पाच वर्षात मी हे कामही पूर्ण करू इच्छितो.आज देशात आपण कुठेही गेलात तर एक गोष्ट आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल आणि मला वाटते हा देशवासियांचा हृदयापासूनचा आवाज आहे ते मनापासून सांगत आहेत, अनुभवाच्या आधारावर सांगत आहेत की जिथून इतरांकडून अपेक्षा पुर्तीची आशा संपुष्टात येते तिथूनच मोदी गॅरंटी सुरु होते म्हणूनच मोदी गॅरंटीवाल्या गाडीचा बोलबाला झाला आहे.

मित्रांनो,

विकसित भारताचा संकल्प केवळ मोदींचा किंवा केवळ सरकारचा नाही तर सर्वाना बरोबर घेऊन सर्वांची स्वप्ने साकार करण्याचा हा संकल्प आहे. तो आपणा सर्वांचा संकल्पही पूर्ण करू इच्छितो.आपल्या इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने वातावरण निर्माण करू इच्छितो.विकसित भारत संकल्प यात्रा, सरकारच्या योजना आणि सुविधा अशा लोकांपर्यंत घेऊन जात आहे जे आतापर्यंत यापासून वंचित राहिले, त्यांना याबाबत माहितीही नाही. माहिती घ्यायची तर कशी याचा मार्गही त्यांना माहित नाही. नमो अ‍ॅपवर ठिकठिकाणाहून लोक जे फोटो पाठवतात ते मी पाहतो.काही ठिकाणी ड्रोन प्रात्यक्षिके सुरु आहेत, काही ठिकाणी आरोग्य तपासणी सुरु आहे.आदिवासी भागात सिकलसेल अ‍ॅनिमियाची तपासणी होत आहे.ज्या-ज्या पंचायतींमध्ये ही यात्रा पोहोचली आहे त्यांनी तर दिवाळीच साजरी केली आहे. यापैकी अशा अनेक पंचायती आहेत जिथे 100 टक्के पात्र लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचले आहेत, कोणताही भेदभाव नाही, सर्वाना लाभ प्राप्त झाला आहे. जिथे असे पात्र लाभार्थी या लाभापासून मागे राहिले आहेत त्यांनाही आता माहिती दिली जात आहे त्यांना नंतर योजनेचा लाभही मिळेल.

 

उज्वला आणि आयुष्मान कार्ड सारख्या योजनांशी तर त्यांना तात्काळ जोडले जात आहे. पहिल्या टप्प्यात 40 हजारपेक्षा जास्त भगिनी-कन्यांना उज्वला गॅस जोडण्या देण्यात आल्या. यात्रेदरम्यान My Bharat Volunteers साठीही मोठ्या प्रमाणात नोंदणी होत आहे. आपल्याला माहित असेलच काही दिवसांपूर्वी आम्ही युवकांसाठी एक देशव्यापी मंच उभा केला आहे, सरकारने उभा केला आहे. त्याचे नाव आहे My Bharat

प्रत्येक पंचायत क्षेत्रातल्या जास्तीत जास्त युवकांनी My Bharat अभियानात नक्की सहभागी व्हावे अशी माझी विनंती आहे. त्यामध्ये आपली नावे द्या आणि मधून-मधून मी आपल्याशी संवाद साधत राहीन.आपले सामर्थ्य विकसित भारताचे सामर्थ्य बनेल, आपण एकत्रित काम करूया.

माझ्या कुटुंबियांनो,

15 नोव्हेंबरला ही यात्रा सुरु झाली आणि आपल्याला स्मरत असेलच की भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी ती सुरु झाली.आदिवासी गौरव दिवस होता, त्या दिवशी, झारखंडच्या दुर्गम जंगलात एका छोट्याश्या ठिकाणी मी याचा प्रारंभ केला होता, मोठ्या ठिकाणी किंवा विज्ञान मंडपममध्ये, यशोभूमी मध्ये मोठ्या थाटामाटात याचे उद्घाटन मी करू शकलो असतो मात्र मी असे केले नाही.निवडणुकीचे रण सोडून खुंटी इथे गेलो, झारखंड मध्ये गेलो, आदिवासींमध्ये गेलो आणि हे काम पुढे नेले.

ज्या दिवशी यात्रा सुरु झाली तेव्हा मी सांगितले होते की विकसित भारताचा संकल्प 4 अमृत स्तंभांवर भक्कमपणे उभा आहे. हे अमृत स्तंभ कोणते आहेत यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे. एक अमृत स्तंभ आहे आपली नारी शक्ती, दुसरा स्तंभ आहे आपली युवा शक्ती, तिसरा अमृत स्तंभ आहे आपल्या शेतकरी बंधू-भगिनी, चौथी अमृत शक्ती आहे आपली गरीब कुटुंबे. माझ्यासाठी देशात सर्वात चार मोठ्या जाती आहेत.माझ्यासाठी सर्वात मोठी जात आहे- गरीब. माझ्यासाठी सर्वात मोठी जात आहे-युवा. माझ्यासाठी सर्वात मोठी जात आहे-महिला, माझ्यासाठी सर्वात मोठी जात आहे-शेतकरी.या चार जातींच्या उत्कर्षच भारताला विकसित करेल.या चारचा उत्कर्ष म्हणजे सर्वांची प्रगती.

या देशातला गरीब, मग जन्माने तो कोणीही असो,मला त्याचे जीवनमान सुधारायचे आहे,त्याला गरिबीतून बाहेर काढायचे आहे.या देशाचा कोणताही युवक, त्याची जात कोणतीही असो, मला त्याच्यासाठी रोजगाराच्या, स्वयं रोजगाराच्या संधी पुरवायच्या आहेत.या देशाची कोणतीही महिला, तिची जात कोणतीही असो, मला तिच्या जीवनातल्या अडचणी कमी करायच्या आहेत,तिचे सबलीकरण करायचे आहे. तिची दबलेली जी स्वप्ने आहेत त्या स्वप्नांना पंख द्यायचे आहेत,संकल्प करून ते साकार होईपर्यंत सहाय्य करून तिची स्वप्ने पूर्ण करायची आहेत. या देशातला कोणताही शेतकरी असो,तो कोणत्याही जातीतला असो,मला त्याच्या उत्पन्नात वाढ करायची आहे,त्याचे सामर्थ्य आणखी वाढवायचे आहे. त्याची शेती मला आधुनिक करायची आहे. त्या कृषी उत्पादनांची मूल्य वृद्धी साध्य करायची आहे. गरीब असोत,युवक असोत,महिला असोत आणि शेतकरी असोत या जातींना मी अडचणीतून बाहेर काढत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मी तितक्याच ताकदीने काम करावे,या चारही जातींच्या सर्व समस्या दूर कराव्यात यासाठी आपण केवळ आशीर्वाद द्या. या चारही जाती सबल होतील तेव्हा साहजिकच देशाची प्रत्येक जात सबल होईल.जेव्हा हे सशक्त होतील तेव्हा संपूर्ण देश सबल होईल.

मित्रांनो,

याच विचाराने अनुसरून आज विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान म्हणजेच मोदींची हमी असलेले हे वाहन आले असताना देशात दोन मोठे कार्यक्रम आयोजित केले आहेत. पहिले कार्य म्हणजे स्त्रीशक्ती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीचे आधुनिकीकरण आणि शेती शास्त्रशुद्ध करणे आणि दुसरे कार्य म्हणजे या देशातील प्रत्येक नागरिक मग तो गरीब असो, कनिष्ठमध्यमवर्गीय असो, मध्यमवर्गीय असो वा श्रीमंत असो त्याला सक्षम करण्याचे कार्य आहे. प्रत्येक गरीबाला स्वस्त दरात औषधे मिळावीत, त्याला आजारपण घेऊन आयुष्य जगावे लागू नये, हे एक मोठे सेवेचे कार्य आहे, पुण्याचे कार्य आहे आणि त्यासंबंधीचे अभियानही आहे.

देशातील ग्रामीण भगिनींना 'ड्रोन दीदी' बनवण्याची घोषणा मी लाल किल्ल्यावरून केली होती.आणि मी पाहिले की, इतक्या कमी वेळात आपल्या भगिनी, गावातील भगिनी , कुणी दहावी उत्तीर्ण, कुणी अकरावी उत्तीर्ण, कुणी बारावी उत्तीर्ण आणि हजारो बहिणी ड्रोन चालवायला शिकल्या.त्याचा शेतीत वापर कसा करायचा, औषधे कशी फवारायची, खते कशी फवारायची हे शिकून घेतले. तर या ड्रोन दीदी आहेत ना ,त्यांना वंदन करावेसे वाटते ,की, त्या इतक्या लवकर शिकत आहेत. आणि माझ्यासाठी हा ड्रोन दीदींना वंदन करण्याचा कार्यक्रम आहे आणि म्हणूनच मी या कार्यक्रमाला नमो ड्रोन दीदी, नमो ड्रोन दीदी असे नाव दिले आहे. हे आपले नमो ड्रोन दीदी आहे ज्याची सुरुवात आजपासून होत आहे. प्रत्येक गाव ड्रोन दीदींना नमस्कार करत राहील, प्रत्येक गाव ड्रोन दीदीला वंदन करत राहील, मला असे वातावरण मला निर्माण करायचे आहे. त्यामुळे या योजनेचे नावही मला काही लोकांनी सुचवले आहे – नमो ड्रोन दीदी. गावाने नमो ड्रोन दीदी म्हटले तर आपल्या प्रत्येक दीदीचा मानसन्मान वाढेल.

येणाऱ्या काळात 15 हजार बचत गट या नमो ड्रोन दीदी कार्यक्रमाशी जोडले जातील, तिथे ड्रोन दिले जातील, आणि गावात, गावात आपली दीदी सर्वांच्या आदराचा विषय बनेल आणि नमो ड्रोन दीदी कार्यक्रम आपल्याला पुढे घेऊन जाईल. आपल्या भगिनींना ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षण दिले जाईल. बचत गटांच्या माध्यमातून भगिनींना स्वावलंबी बनवण्याच्या सुरू असलेल्या मोहिमेलाही ड्रोन योजनेमुळे बळ मिळणार आहे.यामुळे कन्या- भगिनींना कमाईचे अतिरिक्त साधन उपलब्ध होईल.आणि माझे स्वप्न आहे की दोन कोटी दीदींना मला लखपती बनवायचे आहे . खेड्यापाड्यात राहणाऱ्या आणि महिला स्वयंसहाय्यता गटात काम करणाऱ्या दोन कोटी दीदींना लखपती बनवायचे आहे. बघा, मोदी लहान विचार करत नाहीत आणि ते जे विचार करतात तो पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन निघतात. .आणि यामुळे देशातील शेतकऱ्यांना ड्रोनसारखे आधुनिक तंत्रज्ञान अगदी कमी खर्चात मिळू शकेल, असा माझा ठाम विश्वास आहे. यामुळे त्यांना आरोग्याच्या दृष्टीनेही फायदा होणार आहे, वेळ, औषधे, खते यांचीही बचत होईल, जे वाया जात आहे ते वाया जाणार नाही.

मित्रांनो,

आज देशातील 10 हजारव्या जनऔषधी केंद्राचे देखील लोकार्पण करण्यात आले असून मला बाबांच्या भूमीतील 10 हजारव्या केंद्रातील लोकांशी बोलण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे.आता आजपासून हे काम पुढे वाढणार आहे. देशभरात पसरलेली ही जनऔषधी केंद्रे आज गरीब असोत वा मध्यमवर्गीय प्रत्येकाला स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देणारी मोठी केंद्रे बनली आहेत. आणि हे मी पाहिले आहे की, देशवासीय स्नेहाने, गावकऱ्यांना त्याचे नाव किंवा नाव गाव आठवत नाही. ते दुकानदारांना सांगतात की, हे मोदींच्या औषधाचे दुकान आहे ,मोदींच्या औषधांच्या दुकानात जाऊया. तुम्ही याला तुम्हाला कोणत्याही नावाने म्हणू शकता, पण माझी इच्छा आहे की, तुमचे पैसे वाचले पाहिजेत, म्हणजेच तुमचा आजारांपासून बचाव झाला पाहिजे आणि तुमच्या खिशातले पैसेही वाचले पाहिजेत, मला दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला आजारांपासून वाचवायचे आहे आणि तुमच्या खिशातून पैसे वाचवायचे आहेत , याचा अर्थ आहे मोदींचे औषधांचे दुकान.

 

या जनऔषधी केंद्रांवर सुमारे 2000 प्रकारची औषधे 80 ते 90 टक्के सवलतीत उपलब्ध आहेत. आता मला सांगा, एक रुपया किंमतीची वस्तू 10, 15, 20 पैशांना मिळाली तर किती फायदा होईल.आणि उरलेले पैसे तुमच्या मुलांसाठी उपयोगी पडतील . 15 ऑगस्ट रोजी मी देशभरात 25 हजार जनऔषधी केंद्रे ज्यांना लोक मोदींच्या औषधांची दुकाने म्हणतात ती सुरु करण्याचा निर्धार केला होता , ही संख्या 25 हजारांपर्यंत पोहोचवायची आहे. आता या दिशेने काम वेगाने सुरू झाले आहे. या दोन योजनांसाठी मी संपूर्ण देशाचे, विशेषत: माझ्या माता, भगिनी, शेतकरी, कुटुंबे, सर्वांचे खुप खूप अभिनंदन करतो.

मला तुम्हाला ही माहिती देतानाही आनंद होत आहे की, गरीब कल्याण अन्न योजना, तुम्हाला माहिती आहे, कोविडच्या काळात सुरू करण्यात आली होती, आणि गरिबांना त्यांच्या ताटातले अन्न , त्यांची चूल विझणार नाही याची काळजी राहू नये ,गरीबाच्या घरातील चूल विझू नये, गरीब मुलाने उपाशी झोपू नये यासाठी इतक्या मोठ्या कोविड महामारीतही आम्ही सेवाकार्य सुरू केले. आणि यामुळे मी पाहिले आहे की, कुटुंबाच्या खूप पैशांची बचत होत आहे . चांगल्या कामावर खर्च होत आहेत. हे लक्षात घेऊन आमच्या मंत्रिमंडळाने कालच निर्णय घेतला आहे की आता ही विनामूल्य रेशन योजना 5 वर्षांसाठी वाढवली जाईल. जेणेकरुन येत्या 5 वर्षात तुम्हाला अन्नधान्यासाठी खर्च करावा लागणार नाही आणि तुम्ही ज्या पैशांची बचत कराल ते जन धन खात्यात जमा करा.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी वापरा. नियोजन करा,पैसे वाया जाऊ नये.मोदी मोफत पाठवतात पण तुमची ताकद वाढावी म्हणून पाठवतात.80 कोटींहून अधिक देशवासियांना आता 5 वर्षे विनामूल्य अन्नधान्य मिळणार आहे. यामुळे गरीबांना त्यांनी वाचवलेल्या पैशाचा वापर त्यांच्या मुलांच्या चांगल्या देखभालीसाठी करता येईल. आणि ही मोदींची हमी देखील आहे, जी आम्ही पूर्ण केली आहे. म्हणूनच मी म्हणतो, मोदींची हमी म्हणजे पूर्ततेची हमी.

मित्रांनो,

या संपूर्ण मोहिमेत संपूर्ण सरकारी यंत्रणा आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. मला आठवते, काही वर्षांपूर्वी असाच एक अतिशय यशस्वी प्रयत्न ग्राम स्वराज अभियानाच्या रूपाने झाला होता. देशातील सुमारे 60 हजार गावांमध्ये आम्ही ते अभियान दोन टप्प्यात राबवले. सरकारने आपल्या सात योजना गावोगावी जाऊन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या होत्या. यामध्ये आकांक्षी जिल्ह्यातील हजारो गावांचाही समावेश करण्यात आला होता . आता सरकारने त्या यशाला विकसित भारत संकल्प यात्रेचा आधार बनवले आहे. या मोहिमेशी निगडित सर्व शासकीय प्रतिनिधी देशसेवा आणि समाजसेवेचे मोठे कार्य करत आहेत. पूर्ण प्रामाणिकपणे खंबीरपणे उभे आहेत , प्रत्येक गावात पोहोचत राहा.सर्वांच्या प्रयत्नाने विकसित भारत संकल्प यात्रा पूर्ण होईल. आणि माझा विश्वास आहे की , जेव्हा आपण विकसित भारताबद्दल बोलतो तेव्हा येत्या काही वर्षांत माझे गाव किती बदलेल हे तुम्हीच ठरवायचे आहे. इतकी प्रगती आपल्या गावातही व्हावी, हे निश्चित करावे लागेल. आपण सर्व मिळून हे करू, भारताचा विकास होत राहील, आपला देश जगात खूप वरच्या स्थानावर असेल . पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मिळाली, मधेच जर संधी मिळाली तर मी पुन्हा तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करेन.

मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Double engine govt becoming symbol of good governance, says PM Modi

Media Coverage

Double engine govt becoming symbol of good governance, says PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 डिसेंबर 2024
December 17, 2024

Unstoppable Progress: India Continues to Grow Across Diverse Sectors with the Modi Government