आदरणीय सभापती जी,
दर दोन वर्षांनी असा प्रसंग या सभागृहात येतो, परंतु हे सभागृह निरंतरतेचे प्रतीक आहे. पाच वर्षांनंतर लोकसभा नवीन रंग रुपाने सजते. या सभागृहाला दर 2 वर्षांनी एक नवी प्राणशक्ती प्राप्त होते, नवी ऊर्जा मिळते, नवी उमेद आणि उत्साहाचे वातावरण तयार होते आणि म्हणून दर 2 वर्षांनी होणारा निरोप समारंभ हा एक प्रकारे निरोप नसतो. ते अशा स्मृती येथे सोडून जातात, ज्या येणाऱ्या नवीन फळीसाठी एक मौल्यवान वारसा आहेत. येथे त्यांच्या कार्यकाळात ते जो वारसा अधिक मौल्यवान बनवू इच्छितात.
जे आदरणीय संसद सदस्य, आपले काही लोक जात आहेत, होऊ शकते की काहीजण येण्यासाठीच जाणार असतील आणि काही जाण्यासाठी जाणार असतील. मी विशेषतः माननीय डॉ. मनमोहन सिंग यांची आठवण करू इच्छितो. त्यांनी या सभागृहात सहावेळा नेत्याच्या रुपात आणि विरोधी पक्षनेत्याच्याही रुपात आपल्या मौल्यवान विचारांनी खूप मोठे योगदान दिले आहे.वैचारिक मतभेद कधी चर्चेत खडाजंगी, ते तर खूप अल्पकालीन असते. परंतु इतक्या दीर्घ काळापर्यंत त्यांनी ज्याप्रकारे या सभागृहाला मार्गदर्शन केले आहे, देशाला मार्गदर्शन केले आहे, त्याची चर्चा, जेव्हा जेव्हा आपल्या लोकशाहीची चर्चा होईल, तेव्हा ज्या माननीय सदस्यांची चर्चा होईल, त्यात माननीय डॉ. मनमोहन सिंह यांच्या योगदानाची चर्चा अवश्य होईल.
आणि मी सर्व खासदारांना, मग भले ते या सभागृहातील असोत वा त्या सभागृहातील, जे आज आहेत, कदाचित ते भविष्यात येणार असतील, माझे त्यांना आग्रहाचे सांगणे आहे, हे जे माननीय संसद सदस्य असतात, कोणत्याही पक्षाचे का असेना, परंतु ज्याप्रकारे त्यांनी आपले जीवन समर्पित केलेले असते, ज्या प्रकारच्या प्रतिभेचे दर्शन त्यांनी आपल्या कार्यकालात घडवलेले असते, त्याचा उपयोग एका मार्गदर्शक दीपस्तंभासारखा करण्याचे शिकण्याचा प्रयत्न आपण केला पाहीजे.
मला आठवतं, त्या सदनात शेवटच्या काही दिवसात मतदानाचा प्रसंग होता, विषय तर सुटला माझा, पण ठाऊक होतं की विजय ट्रेजरी बँकेचा होणार आहे, अंतरही खूप होतं. परंतु, डॉ. मनमोहन सिंह जी व्हीलचेयरमधून आले, मत दिलं, एक संसद सदस्य आपल्या दायित्वाबाबत किती सजग आहे, याचे ते उदाहरण होते, ते प्रेरक उदाहरण होते. इतकेच नाही, मी पाहत होतो कधी समितीची निवडणूक झाली, समिती सदस्यांची, ते व्हीलचेयरवर मत देण्यासाठी आले. प्रश्न हा नाही की ते कोणाला ताकद देण्यासाठी आले होते, मी मानतो की ते लोकशाहीला ताकद देण्यासाठी आले होते. आणि म्हणूनच मी आज विशेष रूपाने त्यांच्या दीर्घायुष्याकरता आपल्या सर्वांकडून प्रार्थना करतो, त्यांनी निरंतर आम्हाला मार्गदर्शन करत राहावे, आम्हाला प्रेरणा देत रहावी.
आदरणीय सभापति जी.
आमचे जे सहकारी नव्या जबाबदारीच्या दिशेने पुढे जात आहेत, या मर्यादित विस्तारातून एका मोठ्या अवकाशाच्या दिशेने जात आहेत, राज्यसभेतून बाहेर जनसभेत जात आहेत. तर मी मानतो की त्यांच्या समवेत इथला अनुभव, इतक्या मोठ्या मंचावर जात आहेत तेव्हा, देशासाठी ती एक खूप मोठी गुंतवणूक, ठेवा बनून पुढे येईल. एखाद्या विद्यापीठातही 3-4 वर्षांनतर एक नवीन व्यक्तित्व उदयाला येतं, येथे तर 6 वर्षांच्या वैविध्याने परिपूर्ण, अनुभवाने समृद्ध असे विद्यापीठ आहे, जिथे 6 वर्ष राहिल्यानंतर कोणतीही व्यक्ती अशी तावूनसुलाखून निघते, तेजस्वी बनते , की ती जिथेही राहते , जी भूमिका वठवते , ती अवश्य आपल्या कार्यास अधिक शक्तीशाली बनवेल, राष्ट्रकार्याच्या कामांना गती देण्याचे सामर्थ्य देईल.
हे जे माननीय खासदार निरोप घेत आहेत, एकप्रकारे ते असे गट आहेत, ज्यांना दोन्ही सभागृहात म्हणजे जुन्या आणि नव्या संसद भवनात राहण्याची संधी मिळाली. हे सहकारी जात आहेत, तर ते स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या अमृतकाळाचे, त्याच्या नेतृत्वाचे साक्षीदार होऊन जात आहेत. आणि हे सहकारी जात आहेत, ते आपल्या संविधानाच्या 75 वर्षांच्या, त्याच्या गौरवाची शोभा वाढवत, आज सर्व येथून जात आहेत ते अनेक आठवणी घेऊन जात आहेत.
आपण तो दिवस विसरू शकत नाही की कोविडच्या कठीण कालावधीत आपण सर्वांनी परिस्थिती जाणली. परिस्थितीला अनुकूल आपण स्वतःला घडवले. इथे बसायला सांगितले तर इथे बसलो, तिथे बसायला सांगितले तर तिथे बसलो. त्या खोलीत बसायला सांगितले तर कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही खासदाराने या विषयांवरून देशाचे काम थांबू दिले नाही. मात्र कोरोनाचा तो कालावधी जीवन आणि मृत्यूचा खेळ होता. घरातून बाहेर पडलो तर माहीत नव्हते की काय होईल. असे असताना सुद्धा सन्माननीय खासदारांनी सभागृहात हजेरी लावत देशाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. देशाला पुढे घेऊन गेले, आणि त्यामुळे मी असे मानतो की त्या कालावधीने आपल्याला खूप काही शिकवले आहे. चहुबाजूनी संकटे असताना सुद्धा भारताच्या संसदेत बसलेल्या व्यक्ती एवढी मोठी जबाबदारी निभावण्यासाठी कितीही मोठी जोखीम घेऊ शकतात आणि कितीही कठीण परिस्थितीत कामही करू शकतात याचा अनुभव सुद्धा आपण घेतला.
सभागृहात कडू गोड अनुभवही आले. काही दुःखद घटनांनाही सामोरे जावे लागले. कोविडमुळे आपले काही सहकारी आपल्याला सोडून गेले, ते आज आपल्यात नाहीत. याच कालावधीत सभागृहात त्यांचीही प्रतिभा आपल्याला पाहायला मिळाली. त्या एका दुःखद घटनेचा स्विकार करून आपण पुढे चालत राहिलो. काही निराळ्या घटना देखील अनुभवल्या. काही वेळा आपण फॅशन परेडचेही दृश्य पाहिले. काळ्या कपड्यांमध्ये सभागृहात फॅशन शो सुद्धा पाहता आला. तर अशा या वैविध्यपूर्ण अनुभवांमध्ये आपला हा कालावधी निघून गेला. आणि आता तर खरगेजी आले आहेत तर माझे कर्तव्य मला पार पाडावेच लागत आहे.
कधी कधी काही कामे इतकी चांगली होतात की ज्याचा उपयोग दीर्घ कालावधीपर्यंत होत राहतो. आपल्याकडे एखाद्या बालकाने काही चांगली गोष्ट केली, एखादे बालक चांगलेचुंगले कपडे घालून जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी तयार होते तेव्हा कुटुंबातील एखादी व्यक्ती येऊन सांगते की अरे त्याला कोणाची नजर न लागो, चला काळी तीट लावूया, तर अशा प्रकारे काळी तीट लावली जाते.
आज गेल्या दहा वर्षात देश समृद्धीच्या नवनव्या शिखरांवर पोहोचत आहे. एक भव्य दिव्य वातावरण निर्माण होत आहे. ज्याला कोणाची नजर लागू नये यासाठी काळी तीट लावण्याचाही एक प्रयत्न झाला आहे. यासाठी मी खरगेजींचे खूप आभार व्यक्त करतो की ज्यामुळे आपल्या प्रगतीपथाला कोणाची नजर लागू नये. कोणाची नजर लागता कामा नये यासाठी आपण आज जी काळी तीट लावली आहे. मी तर विचार करत होतो सगळेच काळे कपडे घालून येतील पण बहुतेक काळा रंग प्रमाणाबाहेर ताणला जाऊन कृष्णपत्रिकेपर्यंत पोहोचला. मात्र, तरीसुद्धा मी त्याचे स्वागतच करेन कारण जेव्हाही काही चांगली गोष्ट घडते तेव्हा त्याला नजर लागू नये यासाठी काळी तीट आवश्यक ठरते आणि यासारखे पवित्र काम जेव्हा आपल्यासारखी वयाने अनुभवी व्यक्ती असे काम करते तेव्हा ते आणखीच चांगले असते यासाठीही मी आपले आभार व्यक्त करतो.
आदरणीय सभापती महोदय,
हा विषय काही जास्त चर्चा करण्यासारखा नाही, मात्र आपल्याकडे शास्त्रात एक फारच उत्तम बाब विषद केली आहे. कदाचित आपले सर्व साथीदार निघून चालले असताना त्यांची कमतरता सुद्धा आपल्याला जाणवेल कारण त्यांच्या विचारांचा लाभ जर येणारे पुन्हा आले तर आणखी धारदार विचार घेऊन येतील, ज्यांना हल्ला करायचा आहे ते देखील मजेशीर हल्ले करतील आणि ज्यांना सुरक्षा कवच बनवायचे आहे तेही चांगल्या पद्धतीने बनवतील म्हणजे आपले काम सुरूच राहील.
आपल्याकडे शास्त्रात सांगितलं आहे की-
"गुणा गुणज्ञेषु गुणा भवन्ति, ते निर्गुणं प्राप्य भवन्ति दोषाः।
आस्वाद्यतोयाः प्रवहन्ति नद्यः, समुद्रमासाद्य भवन्त्यपेया।।"
याचा अर्थ असा आहे की गुणी लोकांमध्ये राहून सद्गुणांची निर्मिती होते. ज्यांना गुणी लोकांमध्ये राहण्याची संधी मिळते त्यांच्या बरोबर राहून आपल्या गुणांमध्येही वाढ होते. निर्गुण प्राप्त होत ते दोषयुक्त होतात. जर गुणवंत लोकांबरोबर बसलो तर गुणांमध्ये वाढ होते मात्र गुणच नाही तर दोष वाढतात आणि पुढे म्हटले आहे की नद्यांचे पाणी तोपर्यंतच पिण्यायोग्य असते जोपर्यंत ते वाहत राहते.
सभागृहातही दर दोन वर्षांनी नवीन प्रवाह येतो आणि जोपर्यंत नदी कितीही मधुर असू दे, पाणी कितीही स्वादिष्ट असू दे, मात्र जेव्हाही ती समुद्राला मिळते तेव्हा तिचा काहीही उपयोग रहात नाही, त्यात दोष निर्माण होतात, ते दोषयुक्त होते, आणि यासाठी समुद्रात पोहोचल्यावर पाणी पिण्यायोग्य राहत नाही. मी असे मानतो की हा संदेश प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेरणादायी असेल.
याच भावनेसह जे साथीदार सामाजिक जीवनात एका मोठ्या व्यासपीठावर जात आहेत ते या जिवंत विद्यापीठातून अनुभव प्राप्त करून जात आहेत. त्यांचे मार्गदर्शन, त्यांचे कर्तृत्व राष्ट्राच्या उपयोगी ठरेल, नवीन पिढीला प्रेरणा देत राहील. मी सर्व सहकाऱ्याना मनापासून अनेक अनेक शुभेच्छा देत आहे.
खूप खूप आभार.