वरिष्ठ अधिकारीवर्ग आणि माझ्या सुहृदांनो!
नमस्कार!
लक्षद्वीप अनेक संधींनी परिपूर्ण आहे. मात्र नौवहन ही येथील जीवनरेखा असली तरी स्वातंत्र्यानंतर बराच काळ लक्षद्वीपच्या पायाभूत सुविधांकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. परंतु येथील बंदराची पायाभूत सुविधाही कमकुवतच राहिली. शिक्षण असो, आरोग्य असो, अगदी पेट्रोल-डिझेलसाठीही खूप त्रास सहन करावा लागत होता. आमचे सरकार आता या सर्व आव्हानांना तोंड देत आहे. लक्षद्वीपची पहिली बंदरावरील मालवाहतुकीची मोठ्या प्रमाणावरील साठवण सुविधा कावरत्ती आणि मिनिकॉय बेटावर बांधण्यात आली आहे. आता येथे अनेक क्षेत्रांत रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.
एंडे कुड़ुम्ब-आन्गंन्ड़े,
गेल्या दशकभरात अगत्ती मध्ये अनेक विकास प्रकल्प पूर्ण झाले आहेत. विशेषत: आमच्या मच्छीमार मित्रांसाठी आम्ही येथे आधुनिक सुविधा निर्माण केल्या आहेत. आता अगत्ती येथे विमानतळ तसेच बर्फाचा प्रकल्पही आहे. त्यामुळे सागरी खाद्य उत्पादन निर्यात आणि सागरी खाद्य उत्पादन प्रक्रियेशी संबंधित क्षेत्रासाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. आता इथून टूना मासळीही निर्यात होऊ लागली आहे. यामुळे लक्षद्वीपच्या मच्छिमारांचे उत्पन्न वाढण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
एंडे कुड़ुम्ब-आन्गंन्ड़े,
वीज आणि उर्जेच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी येथे एक मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आणि विमान इंधन डेपो देखील बांधण्यात आला आहे. यातूनही तुमची बरीच सोय झाली आहे. मला सांगण्यात आले आहे की अगत्ती बेटावरील सर्व घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठ्याची सुविधा आहे. गरिबांकडे घर असावे, त्यांच्याकडे शौचालय असावे, वीज, गॅस सारख्या सुविधांपासून ते वंचित राहू नयेत, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. अगत्ती सह संपूर्ण लक्षद्वीपच्या विकासासाठी भारत सरकार पूर्ण बांधिलकीने काम करत आहे. मी उद्या कावरत्ती येथे लक्षद्वीपच्या तुम्हा सर्व मित्रांना असे अनेक विकास प्रकल्प सुपूर्द करणार आहे. या प्रकल्पांमुळे लक्षद्वीपमध्ये इंटरनेट सुविधेत सुधारणा होईल. येथील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. मी आज रात्री लक्षद्वीपमध्ये तुमच्यासोबत मुक्काम करणार आहे. उद्या सकाळी तुमच्यासोबत पुन्हा भेट होईल, लक्षद्वीपच्या जनतेशी संवाद साधता येईल. माझ्या स्वागतासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे.