नमस्कार!
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव, राजीव चंद्रशेखर, आसाम आणि गुजरातचे मुख्यमंत्री, टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन, सीजी पॉवरचे अध्यक्ष वेल्लायन सुब्बय्या, केंद्र, राज्य आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित मान्यवर, महिला आणि पुरुषांनो,
आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आज आपण इतिहास घडवला आहे, आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक खूप मोठे, ठोस पाउलही उचलले आहे. आज सेमी कंडक्टर उत्पादनाशी संबंधित जवळजवळ सव्वा लाख कोटी रुपयांच्या तीन मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी झाली. गुजरातमधील धोलेरा आणि साणंद येथील सेमी-कंडक्टर सुविधा असो, की आसाममधील मोरीगाव येथील सेमी-कंडक्टर सुविधा, यामुळे भारताला सेमी-कंडक्टर उत्पादनाचे मोठे जागतिक केंद्र बनविण्यामध्ये मदत होईल. या महत्वाच्या उपक्रमासाठी, एका महत्वाच्या सुरुवातीसाठी, एक मजबूत पाउल उचलल्याबद्दल, हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल, मी सर्व देशवासीयांचे अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमात तैवानचे आमचे एक मित्र देखील दूरस्थ पद्धतीने सहभागी झाले आहेत. भारताच्या या प्रयत्नांमुळे मलाही उत्साह वाटत आहे.
मित्रहो,
या अभूतपूर्व प्रसंगी देशातील 60 हजारांहून अधिक महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थाही आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत. हा एक विक्रमच आहे. मी मंत्रालयाला विशेष विनंती केली होती की, आजचा कार्यक्रम हा देशातील तरुणांच्या स्वप्नांचा कार्यक्रम आहे. म्हणूनच जास्तीतजास्त युवकांना आजच्या या कार्यक्रमात सहभागी करायला हवे. आजचा कार्यक्रम हा भले सेमी कंडक्टर प्रकल्पांची सुरुवात असेल, पण भविष्यातील भारताचे खरे भागधारक असतील तर ते माझ्यासमोर बसलेले माझे तरुण, माझे विद्यार्थी, तेच माझ्या भारताचे सामर्थ्य आहे. म्हणूनच माझी इच्छा होती की, भारताचे हे विद्यार्थी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार जरूर असायला हवेत. आज ते बघत आहेत की भारत प्रगतीसाठी, आत्म निर्भारातेसाठी आणि जागतिक पुरवठा साखळीतील मजबूत उपस्थितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांमुळे त्यांचाही आत्मविश्वास वाढेल. आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण तरुण कोठेही असो, तो आपल्या देशाचे भाग्य बदलतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे मी स्वागत आणि अभिनंदन करतो.
मित्रांनो,
21 वे शतक हे तंत्रज्ञानावर आधारित शतक आहे आणि इलेक्ट्रॉनिक चिप्सशिवाय त्याची कल्पनाही करता येत नाही. मेड इन इंडिया चिप...डिझाइन इन इंडिया चिप, भारताला आत्मनिर्भरतेकडे, आधुनिकतेकडे घेऊन जाणारी प्रचंड क्षमता निर्माण करेल. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या काळात भारत अनेक कारणांमुळे मागे राहिला. पण आता भारत ‘इंडस्ट्री 4.0’ या चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करण्याच्या उद्देशाने आत्मविश्वासाने पुढे जात आहे. आपण एक क्षणही गमावता कामा नाही. आणि आजचा हा कार्यक्रम या दिशेने आपण किती वेगाने काम करत आहोत याचेही एक उदाहरण आहे.
आम्ही 2 वर्षांपूर्वी सेमी-कंडक्टर मिशन सुरू करून पुढाकार घेण्याची घोषणा केली. काही महिन्यांतच आम्ही पहिल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. आणि आज अवघ्या काही महिन्यांत आम्ही 3 प्रकल्पांची पायाभरणी करत आहोत. भारत वचन देतो, भारत कामगिरीचे प्रदर्शन करतो, लोकशाही काम करते !!!
मित्रांनो,
आज जगातील मोजके काही देश सेमी कंडक्टरचे उत्पादन करत आहेत. आणि कोरोनाने आम्हाला धडा शिकवला, की जगाला विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळीच्या मदतीची नितांत गरज आहे. भारत यामध्ये मोठी भूमिका बजावण्यासाठी उत्सुक आहे.
भारत यापूर्वीच अंतराळ, आण्विक आणि डिजिटल क्षेत्रातील शक्ती आहे. आगामी काळात आपण सेमी कंडक्टर क्षेत्राशी संबंधित उत्पादनांचे व्यावसायिक उत्पादन करणार आहोत. तो दिवस दूर नाही जेव्हा भारत या क्षेत्रातही जागतिक महासत्ता बनेल. भारत आज जे निर्णय घेत आहे आणि जी धोरणे आखत आहे ,त्याचाही आपल्याला धोरणात्मक दृष्ट्या लाभ मिळणार आहे. आम्ही व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन दिले आहे, आम्ही कायदे सोपे केले आहेत. मागील काही वर्षांमध्ये, आमच्या सरकारने 40 हजारांहून अधिक अनुपालन काढून टाकले आहेत. भारतात गुंतवणूक करणार्यांसाठी एफडीआयचे नियमही सोपे झाले आहेत. संरक्षण, विमा आणि दूरसंचार यासारख्या क्षेत्रांसाठी एफडीआयच्या धोरणाचे उदारीकरण करण्यात आले आहे. अलिकडच्या वर्षांत, आम्ही इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर उत्पादनातही आपले स्थान मजबूत केले आहे.
मोठ्या प्रमाणावरील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आयटी हार्डवेअरसाठीची पीएलआय योजना असो, इलेक्ट्रॉनिक घटकांसाठीच्या योजना असोत किंवा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्लस्टर्स असोत, भारताने या सर्व क्षेत्रांना प्रोत्साहन देऊन इलेक्ट्रॉनिक्स परिसंस्थेसाठी प्रगतीच्या नवीन संधी खुल्या केल्या आहेत. आज भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश आहे. काही काळापूर्वीच आम्ही राष्ट्रीय क्वांटम मिशन देखील सुरू केले आहे. नवोन्मेषाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानाचीही स्थापना करण्यात आली आहे. इंडिया एआय (कृत्रिम बुद्धीमत्ता) मिशनचाही वेगाने विस्तार होणार आहे. याचा अर्थ, आपण केवळ तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या नव्हे, तर तंत्रज्ञानामधील प्रगतीच्या मार्गावरही पुढे वाटचाल करत आहोत.
मित्रहो,
सेमी-कंडक्टर उद्योगाचा सर्वात जास्त फायदा कोणाला होणार असेल तर, तो आपल्या भारतातील युवा वर्गाला. सेमी-कंडक्टर उद्योगाबरोबर दळणवळणापासून ते वाहतुकीपर्यंतची अनेक क्षेत्रे जोडली गेली आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेतही हा उद्योग अनेक अब्ज डॉलर्सचा महसूल आणि रोजगार निर्माण करतो. म्हणजेच, चिप उत्पादन हा केवळ एक उद्योग नसून, तो विकासाची दारे खुली करतो, जो अमर्याद शक्यतांनी परिपूर्ण आहे.
हे क्षेत्र केवळ भारतात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणार नाही, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही मोठी प्रगती घडवून आणेल. आज जगभरातील सेमी-कंडक्टर चिप्समागील डिझाईन आणि त्या डिझाईनमागील मेंदू हे बहुतांशी भारतातील युवा वर्गाचा आहे. त्यामुळे आज जेव्हा भारत सेमी-कंडक्टर उत्पादनाच्या क्षेत्रात पुढे जात आहे, तेव्हा आपण एक प्रकारे या प्रतिभेच्या परिसंस्थेचे एक आवर्तन पूर्ण करत आहोत.
आज या कार्यक्रमात जे तरुण आमच्याशी जोडले गेले आहेत, त्यांना हे माहित आहे की त्यांच्यासाठी देशात किती नवीन शक्यता आणि नवीन संधी निर्माण होत आहेत. अंतराळ क्षेत्र असो की मॅपिंग क्षेत्र, भारताने ही क्षेत्रे आपल्या तरुणांसाठी पूर्णपणे खुली केली आहेत.
आमच्या सरकारने स्टार्ट अप परिसंस्थेला जे उत्तेजन दिले आहे, जे प्रोत्साहन दिले आहे, ते अभूतपूर्व आहे. आणि ही याचीच किमया आहे की इतक्या कमी वर्षांच्या कालावधीत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट अप परिसंस्था बनला आहे. आजच्या या आयोजनानंतर सेमी कंडक्टर क्षेत्रात देखील आपल्या स्टार्टअप्स साठी नवीन संधी निर्माण होतील. ही नवी सुरुवात आपल्या युवा पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित नोकऱ्यांशी जोडले जाण्याच्या नव्या संधी उपलब्ध करून देईल.
मित्रांनो,
तुमच्या लक्षात असेल, लाल किल्ल्यावरून बोलताना मी म्हणालो होतो, ‘हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे’. जेव्हा आपण ही भावना मनात बाळगून धोरण निर्मिती करतो, निर्णय घेतो तेव्हा त्याचे योग्य परिणाम देखील प्राप्त होतात. भारताने आता जुने विचार आणि जुन्या दृष्टिकोनाचा त्याग केला असून भारत पुढे मार्गक्रमण करत आहे. भारत आता जलद गतीने निर्णय घेत आहे, धोरणे निश्चित करत आहे. सेमी कण्डक्टर उत्पादनात मागे राहून यापूर्वीच आपण अनेक दशके वाया घालवली आहेत, पण आता एक क्षण देखील वाया घालवायचा नाही, आणि यापुढे असे घडणार नाही. भारताने सर्वप्रथम 60 च्या दशकात सेमी कंडक्टर उत्पादनाचे स्वप्न पाहिले होते, सेमीकंडक्टर उत्पादन करण्याबाबत विचार केला होता. मात्र हे स्वप्न पाहूनही, या बाबतीत विचार केल्यानंतर देखील तेव्हाच्या सरकारांना या संधीचा फायदा करून घेता आला नाही. याची सर्वात मोठी कारणे होती - इच्छाशक्तीची कमतरता, आपल्या संकल्पांना सिद्धीस नेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांची कमतरता आणि देशासाठी दूरगामी निर्णय घेण्याच्या क्षमतेची उणीव. याच कारणाने, अनेक वर्षांपर्यंत भारताचे सेमीकंडक्टर उत्पादन करण्याचे स्वप्न केवळ स्वप्नच बनून राहिले. त्या दशकांमध्ये जे लोक सरकारमध्ये होते ते देखील असा विचार करायचे की, अरे काय गडबड आहे! जेव्हा वेळ येईल तेव्हा उत्पादन सुरू होईलच. सेमी कंडक्टर उत्पादन ही भविष्याची गरज आहे, मग त्यावर आत्ता पर्याय शोधणे फार आवश्यक नाही, असे त्या वेळेच्या सरकारांना वाटत राहिले. ते लोक देशाची प्राधान्य क्षेत्रे देखील संतुलित करू शकले नाहीत. देशाचे समर्थ्य देखील समजून घेऊ शकले नाहीत. त्या लोकांना वाटले की, भारत तर एक गरीब देश आहे, मग भारत सेमी कंडक्टर उत्पादनासारखी उच्च तंत्रज्ञानावर आधारित गोष्ट कशी व्यवस्थापित करू शकेल? ते लोक भारताच्या गरीबीच्या आडून आधुनिक गरजेच्या अशा प्रकारच्या प्रत्येक गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करत होते. ते हजारो कोटी रुपयांचे घोटाळे करत होते, मात्र सेमी कंडक्टर उत्पादनावर हजारो करोडो रुपये गुंतवणूक करू शकले नाहीत. अशा विचारांच्या सोबतीने कोणत्याही दिशा देशाचा विकास होणे शक्य नाही. म्हणूनच आमचे सरकार भविष्याचा विचार आणि भविष्यवादी दृष्टिकोन यांच्या सोबतीने काम करत आहे.
आज आम्ही सेमी कंडक्टर उत्पादनात अशा उद्दिष्टांच्या सोबतीने पुढे वाटचाल करत आहोत जे विकसित देशांच्या सोबत स्पर्धेत उतरू शकतील. असे करत असताना आम्ही देशाच्या सर्व प्राधान्यांकडे देखील लक्ष दिले आहे. एकीकडे आम्ही गरिबांसाठी पक्की घरे बांधत आहोत, तर दुसरीकडे भारत संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करत आहे. एकीकडे आम्ही जगातील सर्वात मोठे स्वच्छता अभियान चालवत आहोत तर दुसरीकडे भारत सेमी कंडक्टर उत्पादनात देखील प्रगती करत आहे. आम्ही एकीकडे देशात जलद गतीने गरिबी कमी करण्यासाठी काम करत आहोत तर दुसरीकडे भारत देशात आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करत आहे, देशाला आत्मनिर्भर बनवत आहोत. केवळ 2024 मध्येच, आतापर्यंत मी 12 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या योजनांचा योजनांची पायाभरणी आणि लोकार्पण केले आहे. कालच आम्ही पोखरण मध्ये एकविसाव्या शतकातील भारताच्या आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्राची झलक पाहिली. दोन दिवसांपूर्वीच भारताने अग्नी-5 च्या रूपाने, भारताला जगाच्या विशेष गटात सामील होताना पाहिले. दोन दिवसांपूर्वीच देशाच्या कृषी क्षेत्रात ड्रोन क्रांतीची सुरुवात झाली आहे. नमो ड्रोन दीदी योजनेच्या अंतर्गत महिलांकडे हजारो ड्रोन सुपूर्द करण्यात आले. भारत गगनयान मोहिमेची देखील आणखी जोरदार तयारी करत आहे. नुकतेच भारताला आपले पहिले स्वदेशात निर्मित फास्ट ब्रिडर न्यूक्लिअर रिॲक्टर प्राप्त झाले आहे. हे सारे प्रयत्न, हे सारे प्रकल्प भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या उद्दिष्टाच्या आणखी निकट घेऊन जात आहेत जलद गतीने घेऊन जात आहेत. आणि निश्चित रित्या आजचे हे तीन प्रकल्प देखील यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.
आणि मित्रांनो,
आज प्रत्येक दिशेला कृत्रिम बुद्धिमत्ते बाबत देखील तितकीच चर्चा होत आहे, हे तुम्ही जाणता. भारताच्या प्रतिभेचा आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दुनियेत देखील खूप मोठा दबदबा आहे. तुम्ही पाहिले असेलच, मागच्या एक दोन आठवड्यात माझी जितकी भाषणे झाली. काही तरुण नवयुवक माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की, साहेब आम्ही तुमची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक भाषेत, प्रत्येक गावांमध्ये पोहचवू इच्छितो. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांचा वापर केला आणि त्यामुळेच आज माझे प्रत्येक भाषण तुम्ही सर्वजण आपापल्या भाषेत काही काळानंतर लगेच ऐकू शकाल, अशी सोय उपलब्ध झाली आहे. म्हणजेच, कुणाला तमिळ भाषेत ऐकायचे असेल, कोणाला पंजाबी भाषेत ऐकायचे असेल, कोणाला बंगाली भाषेत ऐकायचे असेल, कोणाला आसामी भाषेत ऐकायचे असेल, ओडिया भाषेत देखील ऐकू शकता. ही कृत्रिम बुद्धिमत्तेची जादूगिरी आहे आणि ही किमया माझ्या देशाती नवयुवक घडवून आणत आहेत. आणि, मी अशा युवकांच्या चमूचा आभारी आहे, ज्यांनी माझ्यासाठी इतके चांगले कृत्रिम बुद्धिमत्ता व्युत्पन्न, माझ्या भाषणांना हिंदुस्थानातील सर्व भाषांमध्ये अर्थासह पोहोचवण्याचा जो प्रयत्न केला आहे, माझ्यासाठी तो खूप आनंदाचा, उल्हासाचा विषय आहे. आणि पाहता पाहता, अगदी सहज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून माझे बोलणे इतर सर्व भाषांमध्ये उपलब्ध होईल. सांगण्याचे तात्पर्य हे की, भारतातील युवकांचे जे सामर्थ्य आहे त्याला संधी मिळाली पाहिजे. आणि सेमी कंडक्टरचा हा आमचा प्रकल्प देशातील युवकांसाठी अनेक मोठ्या संधी निर्माण करणार आहे.
मित्रांनो,
मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देत आहे. आणि मी हिमन्त जीं च्या या वक्तव्याशी सहमत आहे की, ईशान्यकडील राज्यात कधीही विचार केला नव्हता इतके मोठे उपक्रम सुरू केले जात आहेत. असे प्रकल्प सुरू करण्याचा निश्चय आम्ही केला आहे. आणि मी असे मानतो की, आग्नेय आशिया सोबत आपले संबंध वाढत आहेत, आग्नेय आशिया सोबतचे संबंध वाढवण्यात माझा ईशान्येकडील प्रदेश सर्वात जास्त ताकदवान क्षेत्र बनणार आहे. मी हे स्पष्टपणे पाहू शकत आहे, आणि याची सुरुवात झालेली देखील मला दिसत आहे. तर मी आसामच्या जनतेला ईशान्येकडील राज्यातील लोकांना आज सर्वात जास्त शुभेच्छा देत आहे, शुभकामना व्यक्त करत आहे.
मित्रांनो,
तुम्ही सर्वजण असेच भारताच्या प्रगतीला नवी शक्ती देण्यासाठी योगदान देत रहा, पुढे चालत रहा. मोदीची गॅरंटी तुमच्यासाठीच आहे, तुमच्या भविष्यासाठी आहे, तुम्हाला साथ देण्यासाठी आहे.
खूप खूप आभार!