पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोसजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी निसिथ प्रामाणिकजी, जॉन बारलाजी, विरोधी पक्षनेते सुवेन्दू अधिकारीजी, संसदेतील माझे सहकारी सुकांत मजुमदार जी, कुमारी देबाश्री चौधरीजी, खगेन मुर्मूजी, राजू बिस्ता जी. डाॅ. जयंत कुमार रॉयजी, आमदार, इतर मान्यवर, स्त्रिया आणि पुरुष !
नैसर्गिक सौंदर्य आणि चहासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर बंगालच्या या भूमीला भेट देताना मला खूप आनंद होत आहे. आज येथे हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. विकसित बंगालच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या विकासकामांसाठी मी बंगाल आणि उत्तर बंगालमधील जनतेचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
उत्तर बंगालचा हा प्रदेश आपल्या ईशान्येचे प्रवेशद्वार आहे आणि येथूनच शेजारील देशांसोबतचे व्यापारी मार्गही जातात. त्यामुळेच या 10 वर्षांमध्ये बंगालचा आणि विशेषतः उत्तर बंगालचा विकास हा आमच्या सरकारचा प्राधान्यक्रम राहिला आहे. उत्तर बंगालच्या जलद विकासासाठी या प्रदेशात 21व्या शतकातील रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील. याच विचारातून आज एकलाखी ते बालूरघाट, सिलीगुडी ते आलुआबाडी आणि राणीनगर-जलपाईगुडी-हल्दीबारी दरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर, कूचबिहार आणि जलपाईगुडी यांसारख्या जिल्ह्यांतील रेल्वेगाड्यांचा वेग आणखी वाढेल.
सिलीगुडी ते सामुकतला मार्गाच्या विद्युतीकरणामुळे आजूबाजूची जंगले आणि वन्यजीव प्रदूषणापासून वाचतील. आज बारसोई-राधिकापूर विभागाचे विद्युतीकरणही पूर्ण झाले आहे. पश्चिम बंगालबरोबरच याचा फायदा बिहारमधील लोकांनाही होणार आहे. राधिकापूर ते सिलीगुडी दरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू झाली आहे. बंगालच्या या मजबूत होत असलेल्या रेल्वे पायाभूत सुविधांमुळे येथील विकासाच्या नवीन शक्यतांना चालना मिळेल आणि सर्वसामान्यांचे जीवन सुखकर होईल.
मित्रांनो,
एक काळ असा होता की ईशान्येकडे जाताना गाड्यांचा वेग मंदावत असे. पण आमच्या सरकारचा प्रयत्न आहे की उत्तर बंगालमध्ये गाड्यांचा वेग तितका वाढवायचा आहे जितक्या वेगाने तो संपूर्ण देशात वाढवला जात आहे. आता उत्तर बंगालपासून बांगलादेशापर्यंतही रेल्वे संपर्क सुरू झाला आहे. मिताली एक्सप्रेस न्यू जलपाईगुडी ते ढाका छावणीपर्यंत धावत आहे. बांगलादेश सरकारच्या सहकार्याने आम्ही राधिकापूर स्थानकाशी कनेक्टिव्हिटी वाढवत आहोत. या नेटवर्कच्या बळकटीकरणामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला आणि या भागातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.
मित्रांनो,
स्वातंत्र्यानंतर, पूर्व भारताच्या विकासाकडे, इथल्या हिताकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले गेले. मात्र आमचे सरकार पूर्व भारताला देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन मानते. त्यामुळे या क्षेत्रात दूरसंचार क्षेत्रामध्ये अभूतपूर्व गुंतवणूक केली जात आहे. बंगालचे सरासरी रेल्वे बजेट जे 2014 पूर्वी सुमारे 4 हजार कोटी रुपये होते ते आता सुमारे 14 हजार कोटी रुपये झाले आहे.
आज उत्तर बंगालहून गुवाहाटी आणि हावडा येथे सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत आधुनिकीकरण होत असलेल्या ५०० हून अधिक स्थानकांमध्ये आमचे सिलीगुडी स्थानकदेखील समाविष्ट आहे. या 10 वर्षात आम्ही बंगाल आणि ईशान्येकडील रेल्वेचा विकास प्रवासी ते एक्सप्रेस वेगापर्यंत नेला आहे. आमच्या तिसऱ्या कार्यकाळात तो सुपरफास्ट वेगाने पुढे जाईल.
मित्रांनो,
आज उत्तर बंगालमध्ये 3 हजार कोटींहून अधिक खर्चाच्या दोन रस्ते प्रकल्पांचे लोकार्पणही करण्यात आले आहे. हा चौपदरी घोषपुकुर-धुपगुडी विभाग आणि इस्लामपूर बायपास सुरू झाल्याने अनेक जिल्ह्यांतील लोकांना फायदा होणार आहे. जलपाईगुडी, सिलीगुडी आणि मैनागुडी टाउनसारख्या शहरी भागात वाहतूक कोंडीच्या समस्येपासून दिलासा मिळणार आहे. यामुळे ईशान्येसह उत्तर बंगालमधील सिलीगुडी, जलपाईगुडी आणि अलीपुरद्वार जिल्ह्यांना चांगली रस्ते जोडणी मिळेल. यामुळे दुआर्स, दार्जिलिंग, गंगटोक आणि मिरिक अशा पर्यटन स्थळांवर जाणे सोपे होईल. म्हणजे या संपूर्ण परिसरात पर्यटन वाढेल, उद्योगधंदेही वाढतील आणि चहा उत्पादकांनाही फायदा होईल.
मित्रांनो,
पश्चिम बंगालच्या विकासासाठी केंद्र सरकार आपल्या बाजूने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. विकास प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद. सध्या इथे एक कार्यक्रम पूर्ण होत आहे, पण माझी चर्चा इथे पूर्ण होत नाहीये, माझी चर्चा पुढे होणार आहे आणि त्यामुळे इथून आपण मोकळ्या मैदानात जाऊया. आपण सर्वांना मनमुरादपणे पाहाल आणि मनमुरादपणे बोलाल.
खूप खूप धन्यवाद!