महर्षि वाल्मिकींची कर्मभूमी, सीता मातेची आश्रयभूमी आणि लवकुशांची ही भूमी, आमचा सर्वांना नमस्कार असो! राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकर जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी नित्यानंद राय जी, उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा जी, सम्राट चौधरी जी, राज्य सरकारमधील मंत्री, ज्येष्ठ नेते, विजय कुमार चौधरी जी, संतोष कुमार सुमन जी, खासदार संजय जयस्वाल जी. , राधा मोहन जी. , सुनील कुमार जी, रमा देवी जी, सतीश चंद्र दुबे जी, इतर सर्व ज्येष्ठ मान्यवर आणि बिहारच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!
हीच ती भूमी आहे जिने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला नवसंजीवनी दिली आणि नवी चेतना जागविली. या भूमीने मोहनदासजींना महात्मा गांधी बनवले. हा ठराव विकसित बिहारमधून विकसित भारत हा संकल्प करण्यासाठी बेतियापेक्षा, चंपारणपेक्षा आणखी कोणती चांगली जागा असू शकते का? आणि आज इथे तुम्ही सर्वजण एनडीए सहकाऱ्यांना आशीर्वाद देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने आला आहात. आज बिहारमधील विविध विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघांमधील हजारो लोक आपापल्या ठिकाणांहून विकसित भारत संकल्पाच्या या कार्यक्रमात सामील झाले आहेत. मी बिहारच्या सर्व जनतेचे अभिनंदन करतो. मी तुम्हा सर्वांची माफीही मागतो. कारण मला यायला थोडा उशीर झाला. मी बंगालमध्ये होतो आणि आजकाल बंगालचा उत्साहही काही वेगळाच आहे. तिथे 12 किलोमीटरचा रोड शो होता. त्यामुळे मोठ्या कष्टाने मी वेळ कमी करण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्यामुळे उशिरा पोहोचलो. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागतो.
मित्रांनो,
बिहार ही अशी भूमी आहे जिने शतकानुशतके देशाचे नेतृत्व केले आहे. बिहार ही ती भूमी आहे, जिने भारतमातेला एकाहून एक प्रतिभावान व्यक्तिमत्त्व दिली आहेत. आणि हे सत्य आहे की जेव्हा जेव्हा बिहार समृद्ध झाला आहे, तेव्हा तेव्हा भारत समृद्ध झाला आहे. त्यामुळे विकसित भारतासाठी बिहारही विकसित होणे तितकेच महत्त्वाचे आहे. बिहारमध्ये विकासाचे दुहेरी इंजिन बसवल्यानंतर विकसित बिहारशी संबंधित कामांना आणखी गती मिळाली आहे, याचा मला आनंद आहे. आजही बिहारला सुमारे 13 हजार कोटी रुपयांच्या योजनांची भेट मिळाली आहे. यामध्ये रेल्वे-रोड, इथेनॉल प्लांट, शहराचा गॅस पुरवठा, एलपीजी गॅस अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. विकसित बिहारसाठी आपल्याला हा वेग पकडावा लागेल आणि हा वेग कायम ठेवावा लागेल. या प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.
मित्रांनो
स्वातंत्र्यानंतरच्या दशकांमध्ये बिहारसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे - इथून तरुणांचे स्थलांतर. बिहारमध्ये जंगलराज आल्यावर हे स्थलांतर आणखी वाढले. जंगलराज आणणाऱ्या लोकांना फक्त आपल्या कुटुंबाची चिंता होती आणि त्यांनी बिहारच्या लाखो मुलांचे भविष्य पणाला लावले. बिहारमधील माझे तरुण मित्र उदरनिर्वाहासाठी इतर राज्यांमधील शहरांमध्ये जात राहिले आणि इथे एकाच कुटुंबाची भरभराट होत राहिली. कशा प्रकारे एका- एका नोकरीच्या बदल्यात जमीन ताब्यात घेतली गेली. अशा प्रकारे सर्वसामान्यांना लुटणाऱ्यांना कोणी माफ करू शकेल का? माफ करू शकेल का ? अशा लोकांना आपण माफ करू शकतो का? बिहारमध्ये जंगलराज आणणारे कुटुंब बिहारच्या तरुणांचे सर्वात मोठे गुन्हेगार आहे. जंगलराजला जबाबदार कुटुंबाने बिहारच्या लाखो तरुणांची संपत्ती हिसकावून घेतली. एनडीए सरकारनेच बिहारला जंगलराजपासून वाचवून एवढे पुढे आणले आहे.
मित्रांनो,
बिहारमधील तरुणांना इथे बिहारमध्येच नोकऱ्या मिळाव्यात यासाठी एनडीएचे डबल इंजिन सरकार प्रयत्न करत आहे. आज ज्या हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली, त्या प्रकल्पांच्या मुळाशी ही भावना आहे. शेवटी, या प्रकल्पांचे सर्वात जास्त लाभार्थी कोण आहेत? याचा सर्वात मोठा फायदा त्या तरुणांना होणार आहे ज्यांना सध्या रोजगार हवा आहे आणि ते शाळा-महाविद्यालयात शिकत आहेत. आज गंगाजीवरील 6 लेनच्या केबल-स्टेड पुलाची पायाभरणी करण्यात आली आहे. बिहारमध्ये 22 हजार कोटी रुपयांच्या डझनहून अधिक पुलांवर काम सुरू आहे, त्यापैकी 5 पूल गंगेवर बांधले जात आहेत. हे पूल, हे रुंद रस्तेच विकासाचा मार्ग मोकळा करतात आणि उद्योग आणतात. विजेवर धावणाऱ्या या गाड्या, वंदे भारतसारख्या आधुनिक गाड्या धावू लागल्या आहेत, हा वेग कोणासाठी आहे? हे त्या तरुणांसाठी देखील आहे ज्यांच्या पालकांनी अशा सुविधांचे स्वप्न पाहिले होते. या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत, हे रोजगाराचे मोठे माध्यम आहे. मजूर असो, वाहनचालक असो, सेवा देणारे असोत, अभियंते असोत, अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यातून रोजगार निर्माण होतो. याचा अर्थ सरकार जे हजारो कोटी रुपये गुंतवत आहे ते बिहारच्या सामान्य कुटुंबांपर्यंतच पोहोचेल. वाळू, दगड, विटा, सिमेंट, स्टील, असे अनेक उद्योग, कारखाने, छोटी दुकाने यांना यामुळे बळ मिळणार आहे.
मित्रांनो,
या सर्व नवीन गाड्या धावत आहेत, रेल्वेरूळ टाकले जात आहेत, हे सर्व आज भारतात बनवले जात आहे, ते मेड इन इंडिया आहे. याचा अर्थ यातही केवळ भारतातील लोकांनाच रोजगार मिळत आहे. बिहारमध्येही एनडीए सरकारने रेल्वे इंजिन बनवणारे आधुनिक कारखाने उभारले आहेत. आज जगभरात डिजिटल इंडियाची जोरदार चर्चा सुरू आहे. आणि अजून एक गोष्ट सांगू का? आज, अनेक विकसित देशांमध्येही अशी डिजिटल प्रणाली उपलब्ध नाही, जशी बेतिया आणि चंपारणमध्ये उपलब्ध आहे. जेव्हा परदेशी नेते मला भेटतात तेव्हा ते मला विचारतात, मोदीजी, तुम्ही हे सगळं इतक्या लवकर कसं केलं? तेव्हा मी त्यांना सांगतो की, हे मोदींनी केलेले नाही, हे भारतातील तरुणांनी केले आहे. मोदींनी तर भारतातील प्रत्येक तरुणाला त्याच्या प्रत्येक पावलावर साथ देण्याची गॅरंटी दिली आहे. आणि आज मी बिहारच्या तरुणांना विकसित बिहारची तीच गॅरंटी देत आहे. आणि आपल्याला वचन माहीत आहे, मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी.
मित्रांनो,
एकीकडे नव्या भारताची निर्मिती होत आहे, तर दुसरीकडे राजद, काँग्रेस आणि त्यांची इंडी आघाडी आजही २०व्या शतकात जगत आहेत. प्रत्येक घराला सूर्य घर बनवायचे आहे, असे एनडीए सरकार म्हणत आहे. प्रत्येक घराच्या छतावर सोलर प्लांट असावा अशी आमची इच्छा आहे. त्यातून त्याला घरही मिळेल आणि मोफत वीजही मिळेल. पण इंडी आघाडी अजूनही कंदिलाच्या ज्योतीच्या भरवशाने जगत आहे. बिहारमध्ये जोपर्यंत कंदिलाचे राज्य होते, तोपर्यंत एकाच कुटुंबाची गरिबी दूर होऊन एकच कुटुंब संपन्न झाले.
मित्रांनो
आज जेव्हा मोदी हे सत्य सांगत आहेत तेव्हा ते मोदींना शिव्याशाप देत आहेत. भ्रष्ट लोकांनी भरलेल्या इंडी आघाडीचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे मोदींना कुटुंब नाही. या लोकांचे म्हणणे आहे की, इंडी आघाडीतील घराणेशाहीच्या वाहक नेत्यांना लुटण्याचा परवाना मिळायला हवा. काय लुटण्याचा परवाना मिळायला हवा का? मिळायला हवा का? आज भारतरत्न कर्पूरी ठाकूर हयात असते तर त्यांना ही हेच प्रश्न विचारले असते जे ते आज मोदींना विचारत आहेत. घराणेशाही आणि भ्रष्टाचाराच्या या कट्टर समर्थकांनी आज पूज्य बापू, जेपी, लोहिया, बाबा साहेब आंबेडकर यांना पिंजऱ्यात उभे केले असते. त्यांनीही स्वत:च्या कुटुंबाची उन्नती केली नाही, तर देशातील प्रत्येक कुटुंबासाठी आपले आयुष्य खर्ची घातले.
मित्रांनो
आज तुमच्या समोर ती व्यक्ती उभी आहे जिने अगदी लहान वयात घर सोडले. बिहारमधील कोणतीही व्यक्ती, मग तो कोणत्याही राज्यात राहू दे, छठपूजा आणि दिवाळीला नक्कीच घरी परततो. पण हा मोदी ज्याने बालपणीच घर सोडले. माझे घर कोणते आहे जिथे मी परत जावे...? माझ्यासाठी संपूर्ण भारतच माझे घर आहे, प्रत्येक भारतीय माझे कुटुंब आहे. म्हणूनच आज प्रत्येक भारतीय म्हणतोय, प्रत्येक गरीब, प्रत्येक तरुण म्हणतोय- 'मी मोदींचा परिवार आहे! 'मी मोदींचा परिवार आहे! हम बानी मोदी के परिवार!
मित्रांनो
मला गरिबांची प्रत्येक चिंता संपवायची आहे. म्हणूनच मोदी आपल्या गरीबातील गरीब कुटुंबांना मोफत रेशन देत आहेत, मोफत उपचार सुविधा देत आहेत. महिलांच्या जीवनातील अडचणी कमी व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. त्यामुळेच मोदी महिलांच्या नावावर कायमस्वरूपी घरे देत आहेत, शौचालये देत आहेत, वीज पोहचवत आहेत, गॅस जोडणी दिली जात आहे, नळाच्या पाण्याची सुविधा मिळत आहे, अशी कामे करत आहेत. माझी इच्छा आहे की माझ्या देशातील तरुणांचे भविष्य चांगले घडायला हवे. त्यासाठी मोदी विक्रमी संख्येने वैद्यकीय महाविद्यालये बांधत आहेत, एम्स बांधत आहेत, आयआयटी बांधत आहेत, आयआयएम बांधत आहेत, अशा आधुनिक शैक्षणिक संस्था उभारत आहेत. माझ्या देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि ते अधिक सक्षम व्हावेत, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मोदी आपल्या अन्नदाता कुटुंबाला ऊर्जादाता आणि खतदाता बनवत आहेत. आज बिहारसह देशभरात इथेनॉल प्रकल्प उभारले जात आहेत. ऊस उत्पादक शेतकरी आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनावर देशात वाहने धावतील आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढावे, असा प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वीच एनडीए सरकारने उसाचा खरेदी दर 340 रुपये प्रति क्विंटल केला आहे. काही दिवसांपूर्वीच एनडीए सरकारने जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना सुरू केली आहे. याअंतर्गत देशात आणि बिहारमध्ये हजारो गोदामे बांधली जाणार आहेत. बिहारमधील माझ्या लहान शेतकरी कुटुंबांचे जीवन सुसह्य करण्यासाठी, त्यांना पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत हजारो कोटी रुपये देण्यात आले आहेत. येथे बेतियाच्याच शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीतून जवळपास 800 कोटी रुपये मिळाले आहेत. आणि या घराणेशाहीवाद्यांनी तुमच्या बरोबर काय केले याचे एक उदाहरण मी देतो. येथील बरौनीचा खत कारखाना बराच काळ बंद पडून होता. याची काळजी या घराणेशाहीवाद्यांना कधीच वाटली नाही. मोदींनी शेतकरी आणि शेतमजुरांना हमी दिली होती की त पुन्हा हा कारखाना सुरू करतील. आज हा खत कारखाना आपली सेवा देत असून तरुणांना रोजगारही देत आहे. आणि म्हणूनच लोक म्हणतात – मोदींची हमी म्हणजे हमी पूर्ण होण्याची हमी.
मित्रांनो,
निवडणुकीत जे हे इंडी आघाडीवाले आहेत, त्यांना आता ते कुठेच नाही हे माहीत आहे. आणि आपला पराभव निश्चित पाहून, भगवान राम स्वतः इंडी आघाडीच्या निशाण्यावर आले आहेत. येथे बेतियामध्ये माता सीतेची अनुभूती आहे, लव-कुश यांची अनुभूती आहे. इंडी आघाडीचे लोक ज्या प्रकारे भगवान श्री राम आणि राम मंदिराच्या विरोधात बोलत आहेत ते संपूर्ण बिहारच्या लोकांना दिसत आहे. आणि भगवान श्रीरामांचा अपमान करणाऱ्यांना कोण पाठीशी घालत आहे हेही बिहारमधील जनता पाहत आहे. या घराणेशाहीवाद्यांनीच रामलल्ला यांना अनेक दशके तंबूत ठेवले. हे तेच घराणेशाहीवादी आहेत ज्यांनी राम मंदिर बांधले जाऊ नये यासाठी जीवापाड प्रयत्न केले. आज भारत आपल्या वारशाचा आणि संस्कृतीचा आदर करत आहे, परंतु या लोकांना यामुळेही त्रास होतो आहे.
मित्रांनो,
हा परिसर निसर्गप्रेमी थारू जमातीचा परिसर आहे. निसर्गाच्या साथीने प्रगतीची जी जीवनशैली आपण थारू समाजात पाहतो ती आपल्या सर्वांसाठी एक वस्तुपाठ आहे. आज निसर्गाचे रक्षण करताना भारताचा विकास होत असेल, तर त्यामागे थारूसारख्या जमातींची प्रेरणा आहे. म्हणूनच मी म्हणतो की विकसित भारत घडवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न, प्रत्येकाची प्रेरणा आणि प्रत्येकाच्या शिकवणूकीची गरज आहे. पण त्यासाठी एनडीए सरकारला आज 400 चा टप्पा पार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आहे की नाही? किती? 400..किती? 400.. देशाला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी - एनडीए 400 पार, एनडीए 400 पार. लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी - एनडीए 400 पार, एनडीए 400 पार. तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी - एनडीए 400 पार, गरिबांना कायमस्वरूपी घरे देण्यासाठी - एनडीए... 400 पार. एक कोटी घरांमध्ये सौर पॅनल बसवण्यासाठी - एनडीए 400 पार, 3 कोटी लखपती दीदी बनवण्यासाठी - एनडीए 400 पार. वंदे भारत ट्रेन देशाच्या कानाकोपऱ्यात धावण्यासाठी - एनडीए 400 पार, विकसित भारत-विकसित बिहारसाठी- एनडीए... 400 पार. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझ्यासोबत बोला -
भारत माता की जय!
दोन्ही हात उंचावून पूर्ण ताकदीनिशी बोला-
भारत माता की जय!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
खूप-खूप धन्यवाद.