केंद्रीय मंत्री मंडळातले उपस्थित सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,
आज देश वीर साहिबजादांच्या अमर बलिदानाचे स्मरण करत आहे, त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहे.स्वातंत्र्याच्या अमृतकाळात वीर बाल दिवस रूपाने नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला आहे. गेल्या वर्षी देशाने प्रथमच 26 डिसेंबर, वीर बाल दिवस म्हणून साजरा केला तेव्हा अवघ्या देशाने भाव विभोर होऊन साहिबजादांच्या वीर गाथा ऐकल्या होत्या. वीर बाल दिवस, भारतीयत्वाच्या रक्षणासाठी, कोणतीही सीमा न ठेवता कोणतेही कृत्य करण्याच्या संकल्पाचे प्रतिक आहे. अत्युच्च शौर्य गाजवताना लहान वय आड येत नाही याचे स्मरण आपल्याला हा दिवस करून देतो. हे या महान वारश्याचे पर्व आहे, जिथे गुरू म्हणतात -
सूरा सो पहचानिए, जो लरै दीन के हेत, पुरजा-पुरजा कट मरै, कबहू ना छाडे खेत! माता गुजरी, गुरु गोबिंद सिंह जी आणि त्यांचे चारही साहिबजादे यांचे शौर्य आणि आदर्श आजही प्रत्येक भारतीयाला सामर्थ्य देतात. म्हणूनच वीर बाल दिवस, म्हणजे त्या सच्च्या वीरांचे असीम शौर्य आणि त्यांची माता यांच्या प्रती राष्ट्राची आदरपूर्वक श्रद्धांजली आहे. आज मी बाबा मोती राम मेहरा, त्यांच्या कुटुंबाचे हौतात्म्य आणि दिवाण टोडरमल यांच्या भक्तीचेही श्रद्धेने स्मरण करतो.आपल्या गुरुंप्रती अगाध भक्ती, राष्ट्र भक्तीचे स्फुलिंग चेतवते त्याचे हे उदाहरण होते.
माझ्या कुटुंबीयांनो,
वीर बाल दिवस आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही साजरा केला जाऊ लागला आहे याचा मला संतोष आहे. या वर्षी अमेरिका, ब्रिटन,ऑस्ट्रेलिया,न्युझीलंड, संयुक्त अरब अमिराती आणि ग्रीस मध्येही वीर बाल दिवसाशी संबंधित कार्यक्रम होत आहेत.भारताच्या वीर साहिबजादे यांना अवघे जग अधिक जाणून घेईल त्यांच्या महान कर्तृत्वातुन शिकवण घेईल.तीनशे वर्षांपूर्वी चमकौर आणि सरहिंदच्या लढाईत जे घडले तो अमीट इतिहास आहे. हा इतिहास अतुलनीय आहे.हा इतिहास आपण कधीच विसरू शकत नाही. भावी पिढ्यांनीही हा इतिहास स्मरणात ठेवणे अतिशय आवश्यक आहे.अन्याय आणि अत्याचार यांच्या घोर अंधकारातही आपण क्षणभरही निराशेला थारा दिला नाही.आपण भारतीयांनी स्वाभिमानाने अत्याचारांचा सामना केला.सर्वच वयोगटातील आपल्या पूर्वजांनी तेव्हा सर्वोच्च बलिदान दिले होते.स्वतः साठी जगण्याऐवजी त्यांनी या मातीसाठी प्राणार्पण करणे स्वीकारले.
मित्रांनो,
जोपर्यंत आपण आपल्या वारश्याचा योग्य तो सन्मान केला नाही, जगानेही त्याची कदर केली नाही. आज आपण आपल्या वारश्याबाबत अभिमान बाळगत आहोत तर जगाचा दृष्टीकोनही बदलला आहे. आज देश गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडत आहे याचा मला आनंद आहे. आजच्या भारताचा आपल्या लोकांवर, आपल्या सामर्थ्यावर,आपल्या प्रेरणास्थानांवर पूर्ण विश्वास आहे.आजच्या भारतासाठी साहिबजादांचे बलिदान हा राष्ट्रीय प्रेरणेचा विषय आहे.आजच्या भारतात भगवान बिरसा मुंडा यांचे बलिदान,गोविंद गुरु यांचे बलिदान अवघ्या राष्ट्राला प्रेरणा देत आहे. जेव्हा एखादा देश आपला वारसा अभिमानाने मिरवत आगेकूच करतो तेव्हा जगही त्याकडे सन्मानाने पाहते, सन्मान देते.
मित्रांनो,
आज संधींची भूमी म्हणून संपूर्ण जग भारताला अग्रस्थान देत आहे. आज भारत अशा स्थानी आहे,जिथे मोठ्या-मोठ्या समस्यांचे निराकरण करण्यात भारत मोठी भूमिका बजावत आहे.अर्थव्यवस्था असो,विज्ञान असो,संशोधन असो,खेळ असो, नीती-रणनीती असो,आज प्रत्येक क्षेत्रात भारत नव-नवी शिखरे गाठत आहे. म्हणूनच लाल किल्यावरुन मी सांगितले होते, हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे, हा भारताचा काळ आहे.येत्या 25 वर्षात भारत अत्युच्च सामर्थ्याचे दर्शन घडवेल आणि यासाठी आपल्याला पंच प्रण अनुसरावे लागतील, आपले राष्ट्रीय चरित्र अधिक बळकट करावे लागेल. आपल्याला एक क्षणही वाया दवडायचा नाही, आपल्याला एक क्षणही थांबायचे नाही.गुरुजींनी आपल्याला ही शिकवण त्यावेळीही दिली होती आणि त्यांची हीच शिकवण आजही आहे. या मातीची आन-बान-शान यासाठी आपले जीवन व्यतीत करायचे आहे.अधिक उत्तम देश घडवण्यासाठी आपल्याला जीवन खर्च करायचे आहे.या महान राष्ट्राचे संतान म्हणून देशाला विकसित करण्यासाठी आयुष्य वेचायचे आहे, एकत्र यायचे आहे,झुंजायचे आहे आणि विजय प्राप्त करायचा आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
युगा-युगातून एकदाच येणाऱ्या कालखंडातून भारत सध्या जात आहे.स्वातंत्र्याच्या सोनेरी भविष्यकाळ घडवणाऱ्या अनेक बाबी या अमृत काळात जुळून आल्या आहेत.आज भारत जगातल्या सर्वात युवा देशांपैकी एक आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळातही भारत इतका युवा नव्हता.त्या युवा शक्तीने देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिले तर आताची विशाल युवाशक्ती देशाला कल्पनातीत यशोशिखरांवर नेईल.
भारत असा देश आहे जिथे नचिकेत सारखे बालक ज्ञानाच्या शोधार्थ आकाश पाताळ एक करते. भारत असा देश आहे जिथे लहान वयातच अभिमन्यू कठीण चक्रव्यूह भेदण्यासाठी निघतो. भारत असा देश आहे जिथे ध्रुव बालक अशी कठोर तपश्चर्या करतो ज्याची आजही तुलना नाही. भारत असा देश आहे जिथे बालक चंद्रगुप्त, लहान वयातच एका साम्राज्याचे नेतृत्व करण्याच्या दिशेने पाऊले टाकतो. भारत असा देश आहे जिथे एकलव्यासारखा शिष्य अकल्पनीय गुरु दक्षिणा देतो. भारत असा देश आहे जिथे खुदीराम बोस, बटुकेश्वर दत्त, कनकलता बरुआ, राणी गाइडिनिल्यू, बाजी राऊत यासारख्या वीरांनी क्षणाचाही विचार न करता देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले.ज्या देशाची इतकी मोठी प्रेरणा आहे त्या देशाला कोणतेही लक्ष्य साध्य करणे अशक्य नाही.म्हणूनच आज देशाची मुले,युवावर्गावर माझा विश्वास आहे. हीच मुले भविष्यातला भारत घडवणारे कर्णधार आहेत. आता इथे ज्या मुलांनी मार्शल आर्टची प्रात्यक्षिके दाखवली .. त्यांचे हे अद्भुत कौशल्य भारतात वीर बालक-बालिकांचे सामर्थ्य किती शक्तिशाली आहे याचे दर्शन घडवणारे होते.
माझ्या कुटुंबियांनो,
आपल्या युवाशक्तीसाठी येणारी 25 वर्षे खूप मोठी संधी घेऊन येत आहेत. भारताचा युवा वर्ग कुठल्याही क्षेत्रातील असो, कुठल्याही समाजात जन्माला आलेला असो, त्यांची स्वप्ने अमर्यादीत आहेत. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सरकारपाशी स्पष्ट असा कृती आराखडा आहे, स्पष्ट दृष्टिकोन आहे, स्पष्ट धोरण आहे, सरकारच्या हेतूमध्ये कुठल्याही प्रकारची संदिग्धता नाही. आज भारताने जे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण बनवले आहे, ते 21 व्या शतकातील युवा वर्गात नवे सामर्थ्य विकसित करेल. आज 10 हजार अटल टिंकरिंग लॅब्ज (सर्जनात्मक प्रयोगशाळा), आपल्या विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषाची, संशोधनाची एक नवी आस निर्माण करत आहेत.आपण स्टार्ट अप इंडिया मोहिमेकडेच पहा! 2014 मध्ये आपल्या देशात स्टार्टअप संस्कृती विषयी खूप कमी लोकांना माहीत होते. आज भारतात सव्वा लाख नवीन स्टार्टअप (नवंउद्योग) आहेत. या स्टार्टप्समध्ये युवा वर्गाची स्वप्ने आहेत, काहीतरी करून दाखवण्याचे प्रयत्न आहेत. आज मुद्रा योजनेमुळे 8 कोटींहून जास्त नवंतरुण-तरुणींनी पहिल्यांदा आपला स्वतःचा व्यवसाय, आपले स्वतःचे काहीतरी स्वतंत्र काम सुरू केले आहे. हे सर्व तरुण-तरुणी, गाव-गरीब-दलित-मागासवर्गीय-आदिवासी-वंचित वर्गातील आहेत. या तरुण-तरुणींकडे, बँकेला हमी देण्या इतपत सुद्धा काही नव्हते. त्यांची हमी सुद्धा मोदींनी घेतली आहे. आमचे सरकार, त्यांचे मित्र बनले आहे. आम्ही बँकांना सांगितले की तुम्ही कुठलीही भीती न बाळगता युवा वर्गाला मुद्राकर्ज द्या. लाखो-कोटी रुपयांचे मुद्राकर्ज मिळाल्यामुळे, कोट्यवधी तरुण तरुणींनी आपले नशीब बदलून टाकले आहे.
मित्रहो,
आपले खेळाडू आज प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नवे विक्रम रचत आहेत. यातील बहुतेक खेळाडू छोट्या छोट्या गावांमधील, खेड्यापाड्यांतील, गरीब आणि कनिष्ठ मध्यम वर्गातील कुटुंबांमधून आले आहेत. यांना खेलो इंडिया मोहिमेद्वारे आपल्या घराजवळच चांगल्या क्रीडा सुविधा मिळत आहेत. पारदर्शक निवड प्रक्रिया आणि आधुनिक प्रशिक्षणासाठी योग्य ती व्यवस्था उपलब्ध होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गरिबांची मुले-मुली सुद्धा तिरंग्याचा मान वाढवत आहेत. यातून हेच दिसते की जेव्हा युवा वर्गाच्या हिताला प्राधान्य दिले जाते तेव्हा त्याचे परिणाम किती छान मिळतात.
मित्रांनो,
आज जेव्हा मी भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याची गोष्ट करतो तेव्हा त्याचे सर्वात मोठे लाभार्थी माझ्या देशातील तरुण-तरुणीच आहेत. तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होण्याचा अर्थ आहे चांगले आरोग्य, चांगले शिक्षण! तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होण्याचा अर्थ आहे, जास्तीत जास्त संधी, जास्तीत जास्त रोजगार! तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होण्याचा अर्थ आहे दर्जेदार जीवन, दर्जेदार उत्पादन! 2047 सालातील विकसित भारत कसा असेल, याचे बहुव्यापी कल्पनाचित्र, कल्पनेच्या एका मोठ्या पटलावर आपल्या युवा वर्गालाच रेखाटायचे आहे. सरकार एका मित्राच्या रूपात, एका सहकाऱ्याच्या रूपात आपल्या सोबत सर्वशक्तिनीशी उभे आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी, युवा वर्गाच्या सूचना आणि त्यांच्या संकल्पांना एकत्र जोडण्यासाठी एक राष्ट्रव्यापी मोहीम सुरू आहे. मी सर्व तरुण-तरुणींना माय गोव्ह संकेतस्थळावर, विकसित भारताशी निगडित सूचना टाकण्याची परत एकदा विनंती करेन. देशातील युवाशक्तीला एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी एक आणखी मोठा मंच, खूप मोठी संस्था सरकारने बनवली आहे. ही संघटना, हा मंच आहे, मेरा युवा भारत (माझा तरुण भारत) म्हणजेच माय भारत! मेरा युवा भारत हा मंच आता देशातल्या तरुण मुली आणि मुलांसाठी एक खूप मोठी संघटना बनत चालली आहे. सध्या ज्या विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहेत, या यात्रांदरम्यान सुद्धा लाखो युवक-युवती, या माय भारत मंचावर नोंदणी करत आहेत. मी देशातल्या सर्व तरुण-तरुणींना पुन्हा एकदा सांगेन की आपण माय भारत वर जाऊन स्वतःची नोंदणी करा.
माझ्या कुटुंबियांनो,
आज वीर बाल दिनानिमित्त मी देशातील सर्व तरुण-तरुणींना, आपल्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन करतो. जेव्हा भारतातील युवावर्ग तंदुरुस्त होईल तेव्हा ते आपापल्या आयुष्यात आणि कारकिर्दीमध्येही नावाजले जातील. भारतातील युवावर्गाने स्वतःसाठी काही नियम बनवले पाहिजेत आणि त्यांचे पालन केले पाहिजे. जसे, तुम्ही एका दिवसात किंवा आठवड्यात किती शारीरिक व्यायाम करता? तुम्हाला उत्कृष्ट पोषक अन्न भरडधान्याबाबत माहिती आहे, पण तुम्ही त्याचा आहारात समावेश केला आहे का? डिजिटल डिटॉक्स (जास्तीत जास्त वेळ डिजिटल उपकरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न), तुम्ही डिजिटल डिटॉक्स करण्यावर किती लक्ष, किती वेळ देता? तुमच्या मानसिक तंदुरुस्तीसाठी तुम्ही काय करता? तुम्ही दिवसभरात पुरेशी झोप घेता का, की तुम्ही झोपेकडे पुरेसे लक्ष देत नाही?
असे अनेक प्रश्न आजच्या आधुनिक तरुण पिढीसमोर आव्हान म्हणून उभे ठाकले आहेत. आणखी एक फार मोठी समस्या आहे, जिच्याकडे एक राष्ट्र म्हणून, एक समाज म्हणून आपण लक्ष देण्याची गरज आहे. ही समस्या आहे, व्यसनाधीनता आणि अंमली पदार्थांची. भारतातील युवाशक्तीला या समस्येपासून वाचवायचे आहे. त्यासाठी सरकारांबरोबरच कुटुंब आणि सामाजिक शक्तीचेही योगदान वाढवणे गरजेचे आहे. आज, वीर बाल दिनानिमित्त, मी सर्व धार्मिक नेत्यांना आणि सर्व सामाजिक संस्थांना देशात अंमली पदार्थांच्या विरोधात एक मोठे जनआंदोलन उभारण्याचे आवाहन करतो. सक्षम आणि सशक्त युवा शक्ती निर्माण करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. सर्वांनी एकत्र परिश्रम करण्याची ही शिकवण आपल्या गुरूंनी आपल्याला दिली आहे. सर्वांच्या प्रयत्नांतूनच भारत विकसित होईल. महान गुरु परंपरेला, हौतात्म्याला नवा सन्मान मिळवून देणाऱ्या आणि नव्या उंचीवर नेणाऱ्या शूर साहिबजाद्यांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करून मी माझे भाषण संपवतो. तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
वाहे गुरुजींचा खालसा, वाहे गुरुजींची फतेह!