भारत माता की जय!
भारत माता की जय!
राजस्थानचे मुख्यमंत्री श्रीमान भजनलाल जी शर्मा, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी राजनाथ सिंह जी, गजेंद्र शेखावत जी, कैलाश चौधरी जी, पीएसए प्राध्यापक अजय सूद जी, सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल हरी कुमार, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, वरिष्ठ अधिकारीवर्ग, तिन्ही सेनेतील सर्व शूर वीर.... आणि इथे उपस्थित असलेले पोखरणच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो !
आज आपण सर्वांनी जी दृश्ये पाहिली, आपल्या तिन्ही सेनेच्या शूरवीरांचा जो पराक्रम पाहिला, तो अद्भूत आहे. आकाशामध्ये होणारी ही गर्जना... जमिनीवर दिसणारे शौर्य....चारी दिशांतून होणारा विजयाचा घोष... हे आहे, नवीन भारताचे आव्हान!! आज आपले पोखरण, पुन्हा एकदा भारताची आत्मनिर्भरता, भारताचा आत्मविश्वास, आणि भारताचा आत्मगौरव या त्रिवेणीचा साक्षीदार बनले आहे. हे तेच पोखरण आहे, जे भारताच्या अण्वस्त्र शक्तीचाही साक्षीदार आहे. आणि आज याच भूमीवर आपण स्वदेशीकरणातून सशक्तीकरणाची क्षमता किती प्रचंड आहे, ते पहात आहोत. शूरांची भूमी असलेल्या या राजस्थानात आज हा भारत शक्तीचा उत्सव होत असला तरी, त्यामध्ये होणा-या जयघोषाचे पडसाद फक्त भारतामध्येच नाही, तर अवघ्या दुनियेत ऐकू येत आहेत.
मित्रांनो,
कालच भारताने एमआयआरव्ही या आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त दीर्घ पल्ल्याची क्षमता असलेल्या अग्नि -5 क्षेपणास्त्राचे परीक्षण यशस्वी केले आहे. जगातील अतिशय कमी देशांकडे या पद्धतीचे आधुनिक तंत्रज्ञान आहे, अशा पद्धतीची आधुनिक क्षमता आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनण्यासाठी आणखी एक मोठी, उंच झेप भारताने घेतली आहे.
मित्रांनो,
विकसित भारताची कल्पना, आत्मनिर्भर भारताशिवाय पूर्ण होणे शक्य नाही. भारताला विकसित व्हायचे असेल, तर आपल्याला दुस-या देशांवर असलेले अवलंबित्व कमी करायलाच हवे. आणि म्हणूनच आज भारत, खाद्य तेलापासून ते आधुनिक लढावू विमानापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनण्यावर भर देत आहे. आजचा हा कार्यक्रम, याच संकल्पाचा एक भाग आहे. आज ‘मेक इन इंडिया’ ची यशस्वी गाथा आपल्यासमोर आहे. आपल्या तोफा, लढावू विमाने, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्रांची कार्यप्रणाली, या होणा-या गर्जना तुम्ही ऐकत आहात, हे सर्व पहात आहात, हीच तर भारताची शक्ती आहे. हत्यारे आणि दारूगोळा, संप्रेषणाची विविध उपकरणे, सायबर आणि अंतराळापर्यंत आपण ‘मेड इन इंडिया’ च्या उड्डाणाचा अनुभव घेत आहोत - हीच तर भारताची शक्ती आहे. आपल्या वैमानिकांनी आज भारतामध्ये बनवलेल्या ‘तेजस’ या लढाऊ विमानांची, अत्याधुनिक आणि वजनाला हलक्या असलेल्या हेलिकॉप्टरची, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची उड्डाणे पाहिली- हीच तर भारताची शक्ती आहे. आमचे नाविक संपूर्णपणे भारतामध्ये बनविण्यात आलेल्या पाणबुडीचा वापर करतात. ‘डिस्ट्रॉयर्स‘ म्हणजे विनाशिका आणि एअरक्राफ्ट कॅरिअर लाटांना भेदून जात आहेत - हीच तर भारताची शक्ती आहे. आमच्या पायदळाचे जवान, भारतामध्ये बनविण्यात आलेल्या आधुनिक अर्जुन टॅंकर आणि तोफांनी देशाच्या सीमा सुरक्षित ठेवत आहेत - हीच तर भारताची शक्ती आहे.
मित्रांनो,
गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही देशाच्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्यासाठी एका पाठोपाठ एक मोठी, आणि महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. आम्ही धोरणात्मक स्तरावर नीतीगत सुधारणा केल्या. इतर आवश्यक गोष्टींमध्ये सुधारणा घडवून आणल्या. आम्ही खाजगी क्षेत्राला यामध्ये सामावून घेतले. आम्ही एमएसएमई, स्टार्टअप यांना प्रोत्साहन दिले. आज देशामध्ये उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये संरक्षण कॉरिडॉर बनत आहेत. यामध्ये आत्तापर्यंत 7 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे. आज हेलिकॉप्टर बनविणा-या आशियातील सर्वात मोठ्या कारखान्यामध्ये काम सुरू झाले आहे. आणि आज मी आपल्या तिन्ही लष्करांचेही अभिनंदन करतो. आपल्या तिन्ही लष्करातील जवानांनी शेकडो हत्यारांची सूची बनवून निर्धार केला आहे की, आता ही हत्यारे ते बाहेरून मागवणार नाहीत. आपल्या लष्कराने या हत्यांराच्या निर्मितीसाठी भारतीय परिसंस्थेला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. आपल्या सेनेसाठी लागणारी शेकडो लष्करी उपकरणे आता भारतातील कंपन्यांकडूनच खरेदी केली जात आहेत, याचा मला आनंद वाटतो. गेल्या 10 वर्षांमध्ये जवळपास 6 लाख कोटी रूपयांची संरक्षण उपकरणे स्वदेशी कंपन्यांकडून खरेदी करण्यात आली आहेत. या 10 वर्षांमध्ये देशाच्या संरक्षण उत्पादनामध्ये दुप्पटीपेक्षा जास्त वाढ झाली असून, ही खरेदी 1 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त झाली आहे. या कामामध्ये आपले नवयुवक महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये 150 पेक्षा जास्त नवीन स्टार्ट अप सुरू झाले आहेत. त्यांच्याकडे 1800 कोटी रूपयांच्या लष्करी सामुग्रीची मागणी नोंदवण्याचा निर्णय आपल्या सेनेने घेतला आहे.
मित्रांनो,
संरक्षण क्षेत्रामध्ये लागणा-या गरजांची पूर्तता करण्यामध्ये आत्मनिर्भर होणारा भारत, लष्करांमध्ये आत्मविश्वासाची हमी देत आहे. युद्धाच्या काळामध्ये ज्यावेळी जवानांना माहिती असते की, ते वापरत असलेली हत्यारे, त्यांची - त्यांच्या देशात बनली आहेत, ही हत्यारे कुठेही कमी पडणार नाहीत; अशावेळी त्यांचे मनोबल अनेकपटींनी वाढते. गेल्या 10 वर्षांमध्ये भारताने आपली लढाऊ विमाने बनवली आहेत. भारताने आपले एअरक्राफ्ट कॅरिअर बनवले आहे. ‘सी-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट भारतामध्ये बनविण्यात येत आहे. आधुनिक इंजिनाची निर्मितीही आता भारतात केली जाणार आहे. आणि तुम्हा मंडळींना माहिती आहे, काही दिवसापूर्वीच मंत्रिमंडळाने आणखी एक मोठा- महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता पाचव्या आवृत्तीमधील लढावू विमानाचेही आपल्या भारतामध्ये डिझाइन करून ते विकसित करण्यात येणार आहे तसेच त्याची निर्मिती देशातच केली जाणार आहे. भविष्यामध्ये भारताचे लष्कर आणि भारताचे संरक्षण क्षेत्र किती मोठे होणार आहे, आणि यामध्ये युवकांना रोजगाराच्या आणि स्वरोजगार निर्मितीच्या किती संधी निर्माण होणार आहेत, याची तुम्ही कल्पना करू शकता. कोणे एके काळी भारत, दुनियेतील सर्वात मोठा संरक्षण साहित्य आयात करणारा देश होता. आज भारत संरक्षण क्षेत्रामध्येही एक मोठा निर्यातक देश बनत आहे. आज भारताकडून होणारी संरक्षण निर्यात पाहिली आणि त्याची तुलना 2014 मध्ये झालेल्या निर्यातीबरोबर केली, तर लक्षात येते की, भारताच्या निर्यातीमध्ये आठपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्यानंतर अनेक दशके ज्यांनी सत्ता उपभोगली, ती मंडळी दुर्दैवाने देशाच्या सुरक्षेविषयी फारसे गंभीर नव्हते. उलट देशात अशी परिस्थिती होती की, स्वातंत्र्यानंतर देशामध्ये पहिला मोठा घोटाळा सेनेसाठी लागणा-या सामुग्रीच्या खरेदीमध्ये झाला. त्यांनी जाणून-बुजून भारताला संरक्षणविषयक गरजांच्या बाबतीत परदेशांवर निर्भर ठेवले. तुम्ही मंडळींनी, 2014 च्या आधी नेमकी कशी परिस्थिती होती, याचे थोडे स्मरण करावे. त्यावेळी कोणत्या गोष्टीची चर्चा केली जात होती? त्यावेळी संरक्षण सामुग्रीच्या सौद्यांमध्ये होत असलेल्या घोटाळ्यांची चर्चा होत असे. अनेक दशके प्रलंबित राहणा-या संरक्षण विषयक सौद्यांची चर्चा होत होती. आता लष्कराकडे फक्त अमूक इतक्याच दिवसांसाठी दारूगोळा शिल्लक आहे, याविषयी चिंता व्यक्त केली जात होती. त्यांनी आपल्या ऑर्डिनन्स फॅक्टरींना तर पूर्णपणे नष्ट केले होते. आम्ही त्याच ऑर्डिनन्स फॅक्टरींना जीवनदान दिले. या फॅक्टरींचा कायापालट करून सात मोठ्या कंपन्या तयार करण्यात आल्या. त्यांनी एचएएल कंपनी पूर्णपणे नष्ट करण्याच्या टप्प्यापर्यंत आणली होती. आम्ही डबघाईला आलेल्या एचएएल कंपनीचे आता विक्रमी नफा कमावणारी कंपनीमध्ये रूपांतरित केली आहे. त्यांनी कारगिल युद्धानंतरही सीडीएस म्हणजेच सरसेनाध्यक्ष पद निर्माण करण्याची इच्छाशक्ती दाखवली नाही. आम्ही हे पद प्रत्यक्षात तयार केले. आधीचे सरकार अनेक दशकांपर्यंत आमच्या वीर हुतात्मा सैनिकांसाठी एक राष्ट्रीय स्मारकही बनवू शकले नाहीत. हे कर्तव्यही आमच्याच सरकारने पूर्ण केले. आधीच्या सरकारला तर, आपल्या सरहद्दींवर आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचीही भीती वाटत होती. परंतु आज तुम्ही पाहिले, तर लक्षात येईल, एकापेक्षा एक आधुनिक रस्ते, आधुनिक बोगदे आमच्या सीमावर्ती भागांमध्ये आम्ही बनवत आहोत.
मित्रांनो,
मोदींची हमी याचा अर्थ काय असतो, या गोष्टीचा आमच्या सैनिकांच्या परिवारांनीही अनुभव घेतला आहे. चार दशकांपर्यंत ओआरओपी म्हणजेच वन रॅंक वन पेन्शन या प्रश्नावर सैनिकांच्या परिवारांबरोबर खोटे बोलले गेले होते. मात्र मोदी सरकारने ओआरओपी लागू करून हमी पूर्णही केली. याचा फायदा आता ज्यावेळी राजस्थानामध्ये मी आलोच आहे, त्यामुळे सांगतो. राजस्थानातील पावणे दोन लाख माजी सैनिकांना ओआरओपीचा लाभ मिळाला आहे. त्यांना ओआरओपी अंतर्गत पाच हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त निधी मिळाला आहे.
मित्रांनो,
ज्यावेळी देशाची ताकद वाढते, त्यावेळी देशाच्या लष्कराचीही ताकद वाढते. गेल्या 10 वर्षांच्या अथक परिश्रमांनी आणि प्रामाणिक प्रयत्नांनी आम्ही विश्वातील पाचवी सर्वांत मोठी आर्थिक शक्ती बनलो आहोत. त्यामुळे आपल्या सैन्याचे सामर्थ्यही वाढले आहे. आगामी वर्षांमध्ये ज्यावेळी आपण जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत, त्यावेळी भारताच्या सैन्याचे सामर्थ्यही नवीन उंचीवर जावून पोचलेले असेल. आणि भारताला तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनविण्यामध्ये राजस्थानची खूप मोठी भूमिका असणार आहे. विकसित राजस्थान, विकसित सेनेलाही तितकीच शक्ती देईल. याच विश्वासाने भारत शक्तीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आणि तिन्ही लष्करांच्या संयुक्त प्रयत्नांना अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या बरोबर सर्वांनी जयघोष करावा....
भारत माता की जय !
भारत माता की जय !
भारत माता की जय !
खूप -खूप धन्यवाद !!