महोदय

महामहिम,

महोदय आणि महोदया

नमस्कार!

जागतिक सरकार शिखर परिषदेत  मुख्य भाषण देणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.आणि हे  भाग्य मला दुसऱ्यांदा मिळत आहे. या निमंत्रणासाठी आणि शानदार  स्वागतासाठी मी महामहिम शेख मोहम्मद बिन रशीद जी यांचा खूप खूप  आभारी आहे.मी माझे बंधू महामहिम  शेख मोहम्मद बिन झायेद यांचेही आभार मानतो. अलीकडच्या काळात त्यांना अनेकदा भेटण्याची संधी मला  मिळाली. ते केवळ दूरदृष्टी असलेले  नेतेच नाहीत तर संकल्प आणि वचनबद्धता दर्शवणारे देखील  नेते आहेत.

 

मित्रांनो,

जगभरातील विचारवंतांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी जागतिक सरकार शिखर परिषद हे एक प्रमुख माध्यम बनले आहे. महामहिम  शेख मोहम्मद बिन रशीद यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा यात मोठा वाटा आहे. दुबई ज्या प्रकारे जागतिक अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू बनत आहे, ही  मोठी गोष्ट आहे.कोविड दरम्यान एक्सपो 2020 चे आयोजन  असो किंवा कॉप -28 चे आयोजन, ही ‘दुबई गाथेची' उत्तम उदाहरणे आहेत.या शिखर परिषदेसाठी मी तुमचे अभिनंदन करतो आणि या परिषदेच्या  यशासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो.
 
मित्रांनो,

आज आपण   21 व्या शतकात आहोत. एकीकडे जग आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे, तर दुसरीकडे गेल्या शतकापासून सुरू असलेली आव्हानेही तितकीच व्यापक होत आहेत.अन्न सुरक्षा असो, आरोग्य सुरक्षा असो, जल सुरक्षा असो, ऊर्जा सुरक्षा असो, शिक्षण असो, समाजाला सर्वसमावेशक बनवणे असो, प्रत्येक सरकारला  आपल्या नागरिकांप्रती अनेक जबाबदाऱ्या आहेत. तंत्रज्ञान हे नकारात्मक असो वा सकारात्मक, प्रत्येक प्रकारे एक प्रमुख व्यत्यय ठरत आहे. दिवसेंदिवस दहशतवाद मानवतेसमोर नवीन आव्हान घेऊन येत आहे.हवामानाशी संबंधित आव्हानेही काळाबरोबर आणखी मोठी होत आहेत. एका बाजूला देशांतर्गत चिंता आहेत तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय व्यवस्था विस्कळीत झालेली दिसते.आणि या सगळ्यामध्ये प्रत्येक सरकारसमोर आपली प्रासंगिकता वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. हे प्रश्न, ही आव्हाने, ही परिस्थिती या पार्श्वभूमीवर  जागतिक सरकार शिखर परिषदेचे महत्त्व आणखी वाढले आहे.
 
मित्रांनो,

आज प्रत्येक सरकारसमोर प्रश्न असा आहे की, त्यांनी कोणत्या दृष्टिकोनानुसार वाटचाल करावी. मला वाटते की, आज जगाला अशा सरकारांची गरज आहे जी सर्वसमावेशक असतील, जी  सर्वांना सोबत घेऊन चालतील. आज जगाला अशा सरकारांची गरज आहे, जी  स्मार्ट असतील , जी तंत्रज्ञानाला मोठ्या बदलाचे माध्यम बनवतील. आज जगाला स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक अशा सरकारांची गरज आहे. आज जगाला हरित आणि पर्यावरणीय आव्हानांबाबत गंभीर असलेल्या सरकारांची गरज आहे.आज जगाला अशा सरकारांची गरज आहे जी जीवन  सुलभता, न्याय सुलभता, परिवहन  सुलभता, नवोन्मेष सुलभता आणि व्यवसाय सुलभता यांना प्राधान्य देतात.

 

मित्रांनो,

सरकारचा  प्रमुख म्हणून मी सतत काम करत आहे त्याला आता 23 वर्षे पूर्ण होत आहेत.भारतातील एका मोठ्या राज्याच्या सरकारमध्ये  13 वर्षे  असताना गुजरातच्या जनतेची सेवा केली आणि आता केंद्र सरकारमध्ये देशवासियांची सेवा करताना 10 वर्षे पूर्ण होत आहेत.सरकारचा अभाव देखील  नसावा  आणि सरकारचा दबाव देखील नसावा, असे माझे मत आहे.  त्यापेक्षा लोकांच्या जीवनात सरकारी हस्तक्षेप कमीत कमी असावा हे सुनिश्चित करणे  हे सरकारचे काम आहे, असे मी मानतो.

कोविड नंतर जगभरात सरकार वरील  विश्वास कमी झाला आहे असे आपण बऱ्याच तज्ञांकडून ऐकतो.पण भारतात मात्र याच्या अगदी उलट अनुभव पाहायला मिळाला. गेल्या काही वर्षांत देशातील जनतेचा भारत सरकारवरील विश्वास अधिकच दृढ झाला आहे.आमच्या सरकारचा हेतू आणि वचनबद्धता या दोन्हींवर जनतेचा पूर्ण विश्वास आहे.हे कसे घडले? कारण राज्यकारभारात आम्ही  जनभावनांना प्राधान्य दिले आहे.देशवासीयांच्या गरजांबाबत आम्ही संवेदनशील आहोत. लोकांच्या गरजा आणि लोकांची स्वप्ने दोन्ही पूर्ण करण्यावर आम्ही लक्ष दिले आहे.

या 23 वर्षांतील सरकारमधील माझे सर्वात मोठे तत्त्व आहे - किमान शासन , कमाल प्रशासन. मी नेहमीच असे वातावरण निर्माण करण्यावर भर दिला आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये उद्यमशीलता  आणि ऊर्जा दोन्ही वाढेल. वरून खालपर्यंत  आणि खालून वरपर्यंत या  दृष्टिकोनासह, आम्ही संपूर्ण समाज दृष्टिकोन देखील अनुसरला आहे. आम्ही सर्वांगीण दृष्टिकोनावर भर दिला आणि लोकसहभागाला सर्वोच्च प्राधान्य दिले. सरकारने जरी  एखादी मोहीम सुरू केली तरी कालांतराने देशातील जनतेने त्याची स्वत: जबाबदारी घ्यावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले आहेत. लोकसहभागाच्या या तत्त्वाला अनुसरून आपण भारतात अनेक मोठी परिवर्तने पाहिली आहेत. आमची  स्वच्छता मोहीम असो, मुलींच्या शिक्षणाची मोहीम असो किंवा डिजिटल साक्षरता असो, याचे   यश केवळ लोकसहभागातूनच सुनिश्चित झाले आहे.

मित्रांनो,

सामाजिक आणि आर्थिक समावेशनाला आमच्या सरकारचे प्राधान्य राहिले आहे. ज्यांची बँक खाती नाहीत अशा 50 कोटींहून अधिक लोकांना आम्ही बँकिंगशी जोडले. त्यांना जागरूक करण्यासाठी आम्ही एक मोठी मोहीम राबवली.

याचाच परिणाम म्हणजे आज आम्ही फिनटेक आणि डिजिटल पेमेंटमध्ये खूप पुढे गेलो आहोत. आम्ही महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाला चालना दिली आहे. आम्ही भारतीय महिलांचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सक्षमीकरण करत आहोत. काही महिन्यांपूर्वी कायदा करून आम्ही भारतातील महिलांना संसदेत आरक्षणही दिले आहे. आज आम्ही भारतातील तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करत आहोत आणि त्यांच्या कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करत आहोत. अत्यंत कमी वेळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप परिसंस्था, म्हणजेच स्टार्ट-अप परीसंस्थेची एवढी मोठी झेप घेत आज आपण जगात तिसर्‍या क्रमांकावर पोहोचलो आहोत.

 

मित्रांनो, 

सबका साथ-सबका विकास या मंत्राने वाटचाल करताना आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्याच्या दृष्टिकोनावर भर देत आहोत. म्हणजेच, कोणताही लाभार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, शासनानेच त्यांच्यापर्यंत पोहोचावे. प्रशासनाच्या या मॉडेलमध्ये भेदभाव आणि भ्रष्टाचार या दोन्ही गोष्टींना वाव राहत नाही. एका अभ्यासानुसार, गेल्या दहा वर्षांत भारतातील 250 दशलक्ष नागरिक गरीबिमधून बाहेर पडले आहेत, आणि त्यामागे प्रशासनाच्या या मॉडेलने महत्वाची भूमिका बजावली आहे.

मित्रहो,

जेव्हा सरकार पारदर्शकतेला प्राधान्य देते, तेव्हा त्याचे परिणाम दिसून येतात आणि भारत हे त्याचे उदाहरण आहे. आज भारतातील 130 कोटींहून अधिक नागरिकांकडे त्यांची डिजिटल ओळख आहे. लोकांची डिजिटल ओळख, त्यांच्या बँका, त्यांचे मोबाईल, सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत. आम्ही तंत्रज्ञानाच्या मदतीने एक प्रणाली विकसित केली आहे- थेट लाभ हस्तांतरण (DBT). या प्रणालीच्या मदतीने आम्ही गेल्या 10 वर्षांत 400 अब्ज डॉलर्स लोकांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केले आहेत. असे करून आम्ही भ्रष्टाचाराची मोठी शक्यता मुळापासून नष्ट केली आहे. आम्ही देशाचे 33 अब्ज डॉलर्सहून अधिक पैसा चुकीच्या हातात जाण्यापासून वाचवला आहेत.

मित्रांनो,

हवामान बदलाच्या प्रश्नावर बोलायचे झाले तर, त्याला सामोरे जाण्यासाठी भारताचा स्वतःचा दृष्टिकोन आहे. आज भारत सौर, पवन, जल, यासह जैवइंधन, हरित हायड्रोजनवरही काम करत आहे. आमची संस्कृती आम्हाला शिकवते की आपल्याला निसर्गाकडून जे मिळाले आहे ते परत देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे भारताने जगाला एक नवा मार्ग सुचवला आहे, ज्याचे पालन करून आपण पर्यावरणाला खूप मदत करू शकतो. हा मार्ग आहे- मिशन लाईफ- म्हणजेच, Lifestyle For Environment, अर्थात पर्यावरण पूरक जीवन पद्धतीचा, हे मिशन प्रो प्लॅनेट पिपल, म्हणजेच ग्रह-अनुकूल मानव, हा मार्ग दाखवते. कार्बन क्रेडिटचा दृष्टीकोन देखील आपण बऱ्याच काळापासून पाहत आहोत. आता यापलीकडे जाऊन ग्रीन क्रेडिटचा विचार करायला हवा. COP-28 दरम्यान दुबई येथे मी याबद्दल सविस्तर विचार मांडले होते. 

 

मित्रांनो,

जेव्हा आपण भविष्याकडे पाहतो तेव्हा प्रत्येक सरकारला आज अनेक प्रश्न भेडसावत असतात. आपण आपले राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि आंतरराष्ट्रीय परस्परावलंबन यांच्यात संतुलन कसे निर्माण करू शकतो? आपल्या राष्ट्रीय हितासाठी काम करत असताना, आंतरराष्ट्रीय कायद्याशी आपली बांधिलकी कशी जपायची? राष्ट्रीय प्रगतीचा विस्तार करताना आपण जगाच्या भल्यासाठी अधिक योगदान कसे देऊ शकतो? आपल्या संस्कृती आणि परंपरांपासून शहाणपण घेत आपण वैश्विक मूल्ये कशी समृद्ध करू शकतो? आपण डिजिटल तंत्रज्ञानाचा फायदा कसा घेऊ शकतो आणि समाजाला त्याच्या नकारात्मक परिणामांपासून कसे वाचवू शकतो? जागतिक शांततेसाठी प्रयत्न करत असताना दहशतवादाविरुद्ध आपण एकत्र कसे काम करू शकतो? आज आपण स्वतःच्या देशाचा कायापालट करत असताना जागतिक प्रशासन संस्थांमध्येही सुधारणा व्हायला नकोत? असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. हे सर्व प्रश्न लक्षात घेऊनच आपल्याला आपल्या सरकारांना दिशा द्यायची आहे, भविष्याचे नियोजन करायचे आहे.

  • आपल्याला एकत्र येऊन एकसंध, सहकारी आणि सहयोगी जगाच्या मूल्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल.
  • आपल्याला विकसनशील जगाचे प्रश्न मांडण्यात आणि  जागतिक निर्णय प्रक्रियेत ग्लोबल साउथच्या सहभागाला प्रोत्साहन द्यावे लागेल.
  • आपल्याला ग्लोबल साउथचा आवाज ऐकावा लागेल, त्यांच्या प्राथमिकता जगासमोर मांडाव्या लागतील.
  • आपल्याला आपली संसाधने आणि क्षमता गरजू देशांबरोबर शेअर करावी लागेल.
  • एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रिप्टोकरन्सी, सायबर गुन्ह्यांमुळे उद्भवणाऱ्या आव्हानांसाठी आपल्याला जागतिक प्रोटोकॉल तयार करावा लागेल.
  • आपल्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाला प्राधान्य देतानाच आपल्याला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या प्रतिष्ठेचाही आदर करावा लागेल. 

याच विचारांना अनुसरून आपण केवळ सरकारांसमोरील आव्हानेच सोडवू शकत नाही तर जागतिक बंधुताही मजबूत करू. जगाचा मित्र म्हणून भारत याच विचाराने पुढे जात आहे. आमच्या G20 अध्यक्षपदाच्या काळातही आम्ही ही भावना पुढे नेली. "एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य" या भावनेने आम्ही पुढे जात आहोत.

मित्रांनो,

आपल्या सर्वांकडे प्रशासनाबाबतचे अनुभव आहेत. आपल्याला केवळ एकमेकांबरोबर काम करायचे नसून, एकमेकांकडून शिकायचे आहे. हेही या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे. येथे मिळालेले उपाय जगाचे भविष्य घडवतील. या आत्मविश्वासासह, आपल्या सर्वांना शुभेच्छा!

धन्यवाद !

धन्यवाद !

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage