जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर श्री मनोज सिन्हा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ. जितेंद्र सिंह जी, संसदेतील माझे सहकारी, या धरतीचे सुपुत्र गुलाम अली जी आणि जम्मू-काश्मीरच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो!
पृथ्वीवरील स्वर्गामध्ये आल्याचा हा अनुभव, ही अनुभूती शब्दांपलीकडची आहे. निसर्गाचे हे अनोखे रूप, ही हवा, ह्या दऱ्याखोऱ्या, हे वातावरण आणि त्यासोबतच तुम्हा काश्मिरी बंधू-भगिनींचे खूप सारे प्रेम!
आणि राज्यपाल साहेब मला सांगत होते की, जम्मू-काश्मीरचे सर्व लोक स्टेडियमच्या बाहेरही उपस्थित आहेत. दोनशे पंच्याऐंशी ब्लॉकमधील जवळपास एक लाख लोक तंत्रज्ञानाद्वारे जोडले गेले आहेत. आज मी जम्मू-काश्मीरच्या जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. हे नवीन जम्मू आणि काश्मीर आहे ज्याची आपण अनेक दशकांपासून वाट पाहत होतो. हेच ते नवे जम्मू आणि काश्मीर आहे ज्यासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बलिदान दिले. या नव्या जम्मू-काश्मीरच्या डोळ्यांत भविष्याची चमक दिसत आहे. या नव्या जम्मू-काश्मीरच्या संकल्पांमध्ये आव्हानांवर मात करण्याची हिंमत आहे. देश तुमचे हसरे चेहरे पाहत आहे आणि आज 140 कोटी देशवासीयांना दिलासा मिळाला आहे.
मित्रांनो,
आताच मनोज सिन्हा जी यांचे भाषण आपण सर्वांनी ऐकले. त्यांनी मुद्दे इतक्या अप्रतिम पद्धतीने मांडले, विकासाचे मुद्दे इतक्या तपशिलाने समजावून सांगितले, कदाचित त्यांच्या भाषणानंतर कोणाच्याही भाषणाची गरज भासली नसती. पण तुमचे प्रेम, तुमचे एवढ्या मोठ्या संख्येने इथे येणे, लाखो लोकांचे सामील होणे, तुमच्या प्रेमामुळे मला जितका आनंद होतोय तितकाच मी ऋणीही आहे. या प्रेमाचे ऋण फेडण्यासाठी मोदी कोणतीही कसर सोडणार नाहीत. आणि 2014 नंतर मी इथे जेव्हाही आलो तेव्हा मी हेच म्हणालो की तुमचे मन जिंकण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे, आणि दिवसेंदिवस तुमचे हृदय जिंकण्याच्या दिशेने योग्य दिशेने जात असल्याचे मला दिसत आहे, तुमचे हृदय मी जिंकले आहे आणि आणखी जिंकण्याचा मी प्रयत्न करतच राहीन. आणि ही आहे ‘मोदींची हमी’…आणि तुम्हाला माहिती आहे, मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी.
मित्रांनो,
काही वेळापूर्वीच मी जम्मूला आलो होतो. तिथे मी पायाभूत सुविधा आणि शिक्षणाशी संबंधित 32 हजार कोटी-बत्तीस हजार कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू केला होता. आणि आज इतक्या कमी वेळात मला श्रीनगरला येऊन तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मिळाली आहे. आज मला येथील पर्यटन आणि विकासाशी संबंधित अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्याचे सौभाग्य मिळाले आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित योजनाही शेतकऱ्यांसाठी समर्पित करण्यात आल्या आहेत. 1000 तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्रेही देण्यात आली आहेत. विकासाची ताकद...पर्यटनाच्या शक्यता...शेतकऱ्यांची क्षमता...आणि जम्मू-काश्मीरच्या तरुणांचे नेतृत्व...एक विकसित जम्मू-काश्मीर बनवण्याचा मार्ग येथून निघणार आहे. जम्मू-काश्मीर हा केवळ एक प्रदेश नाही. हे जम्मू-काश्मीर भारताचे मस्तक आहे. आणि उंचावलेले मस्तक विकास आणि आदराचे प्रतीक असते. त्यामुळे विकसित जम्मू-काश्मीर हे विकसित भारताचे प्राधान्य आहे.
मित्रांनो,
एक काळ असा होता की जे कायदे देशात लागू होते ते जम्मू-काश्मीरमध्ये लागू होत नव्हते. एक काळ असा होता जेव्हा संपूर्ण देशात गरीब कल्याण योजना लागू केल्या जात होत्या... पण जम्मू-काश्मीरच्या माझ्या बंधू-भगिनींना त्याचा लाभ मिळत नव्हता. आणि आता बघा, काळ कसा बदलला आहे. आज श्रीनगर येथून तुमच्यासाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी योजना सुरू झाल्या आहेत. आज श्रीनगर केवळ जम्मू-काश्मीरसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी पर्यटनाचा नवीन पैलू बनत आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर व्यतिरिक्त देशातील इतर ५० हून अधिक शहरांतील लोकही आपल्याशी जोडले गेले आहेत, आज श्रीनगरशीही देश जोडला गेला आहे. आज स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत 6 प्रकल्प देशाला समर्पित करण्यात आले आहेत. याशिवाय स्वदेश दर्शन योजनेचा पुढील टप्पाही सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत जम्मू-काश्मीर आणि देशातील इतर ठिकाणांसाठीही सुमारे ३० प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. आज प्रसाद योजनेअंतर्गत 3 प्रकल्पांचे लोकार्पण झाले आहे, आणखी 14 प्रकल्पही सुरू करण्यात आले आहेत. पवित्र हजरतबल दर्ग्यात लोकांच्या सोयीसाठी जी विकासकामे केली जात होती तीही पूर्ण झाली आहेत.
सरकारने अशी 40 हून अधिक ठिकाणे देखील ओळखली आहेत जी येत्या दोन वर्षांत पर्यटन स्थळे म्हणून विकसित केली जातील. आज ‘देखो अपना देश पीपल्स चॉईस’ ही मोहीमही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ही एक अतिशय अनोखी मोहीम आहे. देशातील लोक ऑनलाइन जातील आणि सांगतील की हे पाहण्यासारखे ठिकाण आहे आणि त्यात जी अव्वल ठरतील, त्यांच्यासाठी सरकार ती लोकांच्या पसंतीची ठिकाणे म्हणून पर्यटन स्थळांच्या रूपात विकसित करेल. लोकसहभागातून हा निर्णय घेतला जाणार आहे. आजपासून अनिवासी भारतीयांना, जे जगभरात राहतात ना, माझी विनंती आहे की, तुम्ही डॉलर, पौंड आणा अथवा न आणा, पण भारतीय नसलेल्या किमान पाच कुटुंबांना भारत पाहायला पाठवा. आणि म्हणून आज अनिवासी भारतीयांना भारतात येण्यासाठी प्रोत्साहन देत आहे, त्यांच्या मित्रांना प्रोत्साहन देत आहे. आणि म्हणूनच ‘चलो इंडिया’ मोहीम सुरू होत आहे. या मोहिमेअंतर्गत ‘चलो इंडिया’ संकेतस्थळाच्या माध्यमातून इतर देशांमध्ये राहणाऱ्या लोकांना भारतात येण्यास प्रेरित केले जाईल. या योजनांचा आणि मोहिमांचा मोठा लाभ जम्मू-काश्मीरमधील तुम्ही लोकांना मिळणारच आहे. आणि, तुम्हाला माहिती आहे, मी आणखी एका उद्देशाने काम करत आहे.
मी भारतातील सर्व पर्यटकांना सांगतो, तुम्ही जा, पण माझेही एक काम करा, आणि माझे काम काय? तर मी त्यांना सांगतो की प्रवासाच्या एकूण बजेटपैकी किमान 5-10% स्थानिक वस्तू ते जिथे जातील तिथून त्यांनी खरेदी कराव्यात. जेणेकरून तेथील लोकांना उत्पन्न मिळेल, त्यांचा रोजगार वाढेल आणि तरच पर्यटन वाढेल. फक्त गेलात, पाहिले आणि निघून गेलात, असे चालणार नाही. आपण 5%, 10% अशी काहीतरी खरेदी केली पाहिजे, आज मी देखील खरेदी केली. श्रीनगरला आलो, एक छान गोष्ट पाहिली, आवडली, मीही विकत घेतली. आणि म्हणूनच, मी याद्वारे अर्थव्यवस्था मजबूत करू इच्छितो.
मित्रहो,
या योजनांमुळे येथे पर्यटन उद्योगही विकसित होतील आणि रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील. या विकासकामांबद्दल मी जम्मू-काश्मीरमधील माझ्या बंधू-भगिनींचे अभिनंदन करतो. आणि आता मला तुम्हाला एका नवीन क्षेत्रात आमंत्रित करायचे आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हा परिसर पसंतीचे ठिकाण आहे. आता माझे दुसरे मिशन आहे - 'वेड इन इंडिया', भारतात लग्न करा. जे लोक भारताबाहेर लग्नासाठी जातात, प्रचंड पैसा आणि डॉलर्स खर्च करतात... नाही, 'वेड इन इंडिया'. आता काश्मीर आणि जम्मूचे लोक, आमच्या श्रीनगरचे लोक आता आम्हाला 'वेड इन इंडिया' करावे, असे सांगतात. लोकांना येथे लग्नासाठी यावे, असे वाटले पाहिजे. इथे या, बुकिंग करा, 3 दिवस, 4 दिवस इथे लग्नाची वरात घेऊन या, थाटामाटात खर्च करा, इथल्या लोकांना उपजीविका मिळेल. त्या मोहिमेचे मी सुद्धा समर्थन करतो आहे.
आणि मित्रहो,
जेव्हा हेतू चांगला असतो आणि संकल्प पूर्ण करण्याचा ध्यास असतो, तेव्हा चांगले परिणामही मिळतात. जम्मू-काश्मीरमध्ये G-20 चे आयोजन कशा प्रकारे करण्यात आले, हे संपूर्ण जगाने पाहिले. कधी कधी लोक म्हणायचे – जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी कोण जाणार? आज जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनाचे सर्व विक्रम मोडले जात आहेत. एकट्या 2023 या वर्षात 2 कोटीपेक्षा जास्त पर्यटक येथे आले आहेत. मागच्या 10 वर्षात अमरनाथ यात्रेत आजवरचे सर्वात जास्त भाविक सहभागी झाले. वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी विक्रमी संख्येने भाविक येत आहेत. परदेशी पर्यटकांची संख्याही पूर्वीच्या तुलनेत अडीच पटीने वाढली आहे. आता तर मोठमोठे स्टार्स, सेलिब्रिटी, परदेशी पाहुणे सुद्धा काश्मीरमध्ये आल्याशिवाय राहत नाहीत, ते इथल्या खोऱ्यांमध्ये फिरायला येतात, इथे व्हिडीओ आणि रील्स बनवतात आणि ते व्हायरल होतात.
मित्रहो,
पर्यटनाबरोबरच जम्मू-काश्मीरमधली शेती आणि कृषी उत्पादनांची क्षमता मोठी आहे. जम्मू-काश्मीरचे केशर, जम्मू-काश्मीरचे सफरचंद, जम्मू-काश्मीरचे ड्राय फ्रूट्स, जम्मू-काश्मीरची चेरी, जम्मू-काश्मीर हा एक मोठा ब्रँड आहे. आता कृषी विकास कार्यक्रमामुळे हे क्षेत्र अधिक सक्षम होईल. 5 हजार कोटी रुपयांच्या या कार्यक्रमामुळे जम्मू-काश्मीरच्या कृषी क्षेत्रात पुढील 5 वर्षांमध्ये अभूतपूर्व विकास होईल. विशेषत: फलोत्पादन आणि पशुधनाच्या विकासात त्याची खूप मदत होईल. आणि आत्ताच जेव्हा मी हमीदा ताईंसोबत बोलत होतो, तेव्हा पशुपालन क्षेत्र कशा प्रकारे सक्षम होणार आहे, हे आपण हमीदा ताईंकडून शिकू शकतो. या क्षेत्राच्या विकासामुळे रोजगाराच्या हजारो नवीन संधीही निर्माण होतील. भारत सरकारने या ठिकाणी किसान सन्मान निधी म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट सुमारे 3 हजार कोटी रुपये पाठवले आहेत. फळे आणि भाजीपाला दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील साठवण क्षमतेतही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठी साठवण योजना काही दिवसांपूर्वीच सुरू झाली आहे. या अंतर्गत जम्मू-काश्मीरमध्येही अनेक नवीन गोदामे बांधली जाणार आहेत.
मित्रहो,
आज जम्मू-काश्मीर विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे. येथील लोकांना एक नाही तर दोन एम्सची सुविधा मिळणार आहे. एम्स जम्मूचे उद्घाटन करण्यात आले आहे, आणि एम्स काश्मीरचे काम वेगाने सुरू आहे. या ठिकाणी 7 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि 2 मोठी कर्करोग रुग्णालये स्थापन करण्यात आली आहेत. आयआयटी आणि आयआयएमसारख्या आधुनिक शैक्षणिक संस्थाही उभारण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 2 वंदे भारत रेल्वेगाड्याही धावत आहेत. श्रीनगर ते संगलदान आणि संगलदान ते बारामुल्ला अशी रेल्वे सेवा सुरू झाली आहे. जोडणीच्या विस्तारामुळे जम्मू-काश्मीरमधील आर्थिक घडामोडींना वेग आला आहे. जम्मू आणि श्रीनगरला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी नवीन पायाभूत सुविधा प्रकल्प आणले जात आहेत. येत्या काळात जम्मू-काश्मीरची यशोगाथा संपूर्ण जगासाठी आकर्षणाचे केंद्र बनणार आहे, हे तुम्हाला दिसेल. आणि तुम्ही रेडिओवर पाहिले असेल, ऐकले असेल, प्रत्येक वेळी मी माझ्या मन की बात कार्यक्रमात जम्मू आणि काश्मीरच्या यशाबद्दल काही ना काही सांगण्याची संधी घेतो. इथली स्वच्छता मोहीम, इथली हस्तशिल्पे… इथली कलाकुसर, याविषयी मी मन की बात कार्यक्रमात सतत बोलत असतो. एकदा मी मन की बात मध्ये नदरू बद्दल आणि कमळ काकडीबद्दल अगदी तपशीलवार माहिती दिली होती. येथील तलावांमध्ये ठिकठिकाणी कमळे पाहायला मिळतात. 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या लोगोवरही कमळ आहे. हा सुखद योगायोग म्हणावा की निसर्गाचा संकेत, की भाजपचे चिन्हसुद्धा कमळ आहे आणि या कमळाशी जम्मू-काश्मीरचे गहिरे नाते आहे.
मित्रहो,
जम्मू-काश्मीरच्या तरुणांना प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्यासाठी आमचे सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. युवा वर्गासाठी कौशल्य विकासापासून ते खेळापर्यंतच्या नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आज जम्मू-काश्मीरमधल्या प्रत्येक जिल्ह्यात आधुनिक क्रीडा सुविधा निर्माण केल्या जात आहेत. 17 जिल्ह्यांमध्ये बहुउद्देशीय क्रीडा सभागृहे बांधण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये जम्मू आणि काश्मीरने अनेक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. आता जम्मू आणि काश्मीर ही देशाची हिवाळी क्रीडा राजधानी म्हणून उदयाला येत आहे - हे माझे जम्मू आणि काश्मीर आहे.
नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेत देशभरातून सुमारे एक हजार खेळाडू आले होते, त्यांनी भाग घेतला होता.
मित्रांनो,
आज जम्मू कश्मीर विकासाची नवी शिखरे गाठत आहे, कारण जम्मू-काश्मीर आज मोकळेपणाने श्वास घेत आहे. प्रतिबंधातून हे स्वातंत्र्य कलम 370 हटल्यानंतर आले आहे. अनेक दशकांपासून राजकीय फायद्यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जम्मू-काश्मीरच्या जनतेची दिशाभूल केली आणि 370 च्या नावाखाली देशाची दिशाभूल केली. 370 मुळे जम्मू-काश्मीरला फायदा होत होता की काही राजकीय घराणीच त्याचा फायदा घेत होते? आपली दिशाभूल झाल्याचे सत्य जम्मू-काश्मीरच्या जनतेला कळून चुकले आहे. काही कुटुंबांच्या फायद्यासाठी जम्मू-काश्मीरला बेड्यांमधे जखडण्यात आले होते. आज 370 नाही, त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील तरुणांच्या प्रतिभेचा पूर्ण सन्मान केला जात आहे आणि त्यांना नवीन संधी मिळत आहेत. आज येथे प्रत्येकासाठी समान हक्क आणि समान संधी आहेत. पाकिस्तानातून आलेले निर्वासित, आमचे वाल्मिकी समाजाचे बंधू-भगिनी, आमचे स्वच्छता कर्मचारी बंधू-भगिनी, त्यांना 70 वर्षांपासून मतदानाचा हक्क मिळाला नाही, तो आता मिळाला आहे. एससी प्रवर्गाचा लाभ मिळावा, ही वाल्मिकी समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. विधानसभेत अनुसूचित जमातीसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 'पद्दारी जमाती', 'पहाडी जातीय समूह', 'गड्डा ब्राह्मण' आणि 'कोली' समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. आमच्या सरकारमध्ये इतर मागासवर्गीयांना पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेत आरक्षण देण्यात आले. घराणेशाहीवादी पक्षांनी जम्मू-काश्मीरमधील लोकांना अनेक दशकांपासून या अधिकारांपासून वंचित ठेवले आहे. आज प्रत्येक वर्गाला त्याचे हक्क परत केले जात आहेत.
मित्रांनो,
जम्मू-कश्मीर मध्ये घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा फटका बसला तो, आपल्या जम्मू कश्मीर बँकेला. येथील पूर्वीच्या सरकारांनी ही बँक उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. नातलग आणि जवळच्या लोकांनी ही बँक भरून या घराणेशाहीवाद्यांनी बँकेचे कंबरडे मोडले होते. चुकीच्या कारभारामुळे बँकेचे इतके नुकसान झाले होते की तुम्हा सर्वांचे हजारो कोटी रुपये बुडण्याचा धोका होता, तो काश्मीरच्या गरीब माणसाचा पैसा होता, तो कष्टकरी जनतेचा पैसा होता, तुमच्या आणि माझ्या भावा-बहिणींकडे पैसे होते जे बुडणार होते. जम्मू काश्मीर बँक वाचवण्यासाठी आमच्या सरकारने एकामागून एक सुधारणा केल्या. बँकेला एक हजार कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णयही घेण्यात आला. आम्ही जम्मू काश्मीर बँकेतील चुकीच्या नोकर भर्तीवरही कठोर कारवाई केली. आजही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अशा हजारो भर्तींची चौकशी करत आहे. गेल्या 5 वर्षांत जम्मू-काश्मीरमधील हजारो तरुणांना बँकांमध्ये पूर्ण पारदर्शकतेने नोकऱ्या मिळाल्या आहेत. सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे आज जम्मू काश्मीर बँक पुन्हा मजबूत झाली आहे. या बँकेचा नफा, जी बुडणारी बँक होती, ही मोदींची हमी बघा, बुडणारी बँक होती, आज त्याचा नफा 1700 कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. हा तुमचा पैसा आहे, हा तुमच्या हक्काचा पैसा आहे, मोदी तर केवळ चौकीदारासारखे बसले आहेत. पाच वर्षांपूर्वी बँकेचा व्यवसाय सव्वा लाख कोटी रुपयांवर घसरला होता, केवळ सव्वा लाख कोटी रुपये. आता बँकेचा व्यवसाय सव्वा दोन लाख कोटींच्या पुढे गेला आहे. 5 वर्षांपूर्वी बँकेतील ठेवीही 80 हजार कोटींपेक्षाही कमी झाल्या होत्या, म्हणजेच आता त्या जवळपास 2 पट होत आहेत. आता बँकांमधील लोकांच्या ठेवीही सव्वा लाख कोटींच्या पुढे गेल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी बँकेचा एनपीए 11 टक्क्यांच्या पुढे गेला होता. आता हे प्रमाणही हळूहळू 5 टक्क्यांच्या खाली आले आहे. गेल्या 5 वर्षांत जम्मू काश्मीर बँकेच्या समभागाची किंमतही जवळपास 12 पटीने वाढली आहे. ज्या बँकेच्या समभागाची किंमत 12 रुपयांपर्यंत घसरली होती, ती आता 140 रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. जेव्हा प्रामाणिक सरकार असते आणि जनतेच्या कल्याणाचा हेतू असतो, तेव्हा प्रत्येक संकटातून जनतेची सुटका होऊ शकते.
मित्रांनो,
स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीर हे घराणेशाहीच्या राजकारणाचा सर्वात जास्त बळी ठरले. आज देशाचा विकास आणि जम्मू-काश्मीरच्या विकासावर नाराज होऊन घराणेशाही जोपसणारे लोक माझ्यावर वैयक्तिक हल्ले करत आहेत. हे लोक म्हणत आहेत की मोदींना परिवार नाही. पण देश त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात लोक म्हणत आहेत- मी आहे मोदींचा परिवार! मी आहे मोदींचा परिवार! मी नेहमीच जम्मू-काश्मीरला माझे कुटुंब मानले आहे. कुटुंबातील सुहृद हृदयात राहतात, मनात राहतात. म्हणूनच काश्मिरींच्याही मनात ही भावना आहे – मी मोदींचा परिवार आहे! मी आहे मोदींचा परिवार! मोदी आपल्या कुटुंबाला ही ग्वाही देऊन येथून जात आहेत की जम्मू-काश्मीरच्या विकासाची ही मोहीम कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. येत्या 5 वर्षांत जम्मू-काश्मीरचा अधिक वेगाने विकास होईल.
मित्रांनो,
शांतता आणि प्रार्थनेचा महिना रमजान काही दिवसांत सुरू होणार आहे. जम्मू-काश्मीरच्या भूमीवरून मी या पवित्र महिन्याच्या संपूर्ण देशाला शुभेच्छा देतो. रमजान महिन्यापासून सर्वांना शांतता आणि सौहार्दाचा संदेश मिळावा, अशी माझी इच्छा आहे.
आणि माझ्या मित्रांनो,
ही भूमी तरी आदि शंकराचार्यांची तपोभूमी राहिली आहे. आणि उद्या महाशिवरात्री आहे, मी तुम्हाला आणि तमाम देशवासियांना महाशिवरात्रीच्या पवित्र सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आजच्या या प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा, जम्मू-काश्मीरमधील लाखो लोकांमध्ये, तुमच्यामध्ये येणे, तुमचे प्रेम आणि तुमचे आशीर्वाद मिळणे हे माझ्यासाठी मोठे सद्भाग्य आहे.
खूप खूप धन्यवाद!