प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर गृहनिर्माण योजनांतर्गत गुजरातमध्ये बांधण्यात आलेल्या 1.3 लाखांपेक्षा जास्त घरांचे केले उद्घाटन आणि भूमीपूजन
“ इतक्या मोठ्या प्रमाणात तुमचे आशीर्वाद आमचा संकल्प अधिक दृढ करतात”
“ आजचा काळ हा इतिहास घडवण्याचा काळ आहे”
“ प्रत्येकाच्या डोक्यावर पक्क्या घराचे छप्पर असावे हे सुनिश्चित करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे”
“ येत्या 25 वर्षात भारत एक विकसित देश बनावा अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. त्यासाठी प्रत्येक जण शक्य होईल तितके योगदान देत आहे”
“ घरांची उभारणी वेगाने करण्यासाठी आमच्या गृहनिर्माण योजनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत आहे”
“ आम्ही विकसित भारत चे- युवा, महिला, शेतकरी आणि गरीब या चार स्तंभाचे सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध आहोत”
“ ज्यांच्याकडे कोणतीच गॅरेंटी नव्हती त्यांच्यासाठी मोदी हेच गॅरेंटी बनले आहेत”
“ प्रत्येक गरीब कल्याण योजनेचे सर्वात मोठे लाभार्थी दलित, ओबीसी आणि आदिवासी कुटुंबे आहेत”

नमस्कार..

गुजरातच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, केम छो...मजा मा. आज विकसित भारत-विकसित गुजरात हे फार मोठे अभियान सुरु होत आहे. आणि मला असे सांगण्यात आले आहे की, गुजरातमधील विधानसभेच्या सर्वच्या सर्व 182 जागांवर गुजरातच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. विकसित गुजरातच्या या प्रवासात तुम्ही सर्वजण इतक्या उत्साहाने सहभागी झाला आहात...मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो.

नुकतेच गेल्या महिन्यात मला व्हायब्रंट गुजरात परिषदेसाठी येथे येण्याची संधी मिळाली होती. व्हायब्रंट गुजरात उपक्रमाला आता 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. तुम्ही सर्वांनी यावर्षीचे या कार्यक्रमाचे आयोजन देखील अत्यंत दिमाखदार पद्धतीने केले होते.  गुंतवणुकीच्या दृष्टीने गुजरातसाठी आणि देशासाठी देखील हा अत्यंत उपयुक्त कार्यक्रम होता. आणि मी विचार करत राहिलो की जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील अशा पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करू शकलो नव्हतो जसे तुम्ही यावेळी केले होते. माझ्यापेक्षा देखील अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही हे करून दाखवले म्हणून मला अधिकच आनंद झाला. तर माझ्यातर्फे, या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी, या यशासाठी मी गुजरातच्या सर्व लोकांचे, गुजरात सरकारचे आणि मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण संघाचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो.    

मित्रांनो,

कोणत्याही गरीब माणसासाठी त्याचे स्वतःचे घर, त्याच्या उज्ज्वल भविष्याची गॅरंटी असते. पण काळाबरोबर कुटुंबे विस्तारित होत आहेत, आणि म्हणून नव्या घरांची गरज देखील वाढत चालली आहे. प्रत्येकाच्या डोक्यावर पक्के छत असावे, स्वतःच्या मालकीचे घर असावे, स्वतःच्या स्वप्नांचा महाल असावा यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. याच विचारासह आज गुजरातमध्ये सव्वा लाख घरे उभारण्यात आली आहेत. कोणी कल्पनाही करू शकत नाही, संपूर्ण देशात सुद्धा कधी इतक्या मोठ्या प्रमाणात हे काम झाले नसेल. आज सव्वा लाख घरांचे काम झाले आहे, कदाचित त्याहीपेक्षा अधिक, जसे काही या घरांमध्ये दिवाळी आली असावी. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाला घर मिळाले आणि गावागावात तुम्हां सर्वांना घर मिळाले. ज्या कुटुंबांना आज घर मिळाले आहे त्यातील सर्व कुटुंबियांचे माझ्यातर्फे खूप-खूप अभिनंदन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. अशी कामे पूर्ण होतात म्हणुन तर देशवासीय म्हणतात- मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याचीच गॅरंटी

बंधू आणि भगिनींनो,

आज या कार्यक्रमासाठी बनासकांठाचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत आणि मला असे सांगण्यात आले आहे की, 182 विधानसभा क्षेत्रांमध्ये, प्रत्येक विधानसभा मतदार संघातील हजारो लोक या कार्यक्रमासाठी एकत्र झाले आहेत. इतक्या भव्य प्रमाणात या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी गुजरात भाजपचे, गुजरातच्या जनतेचे आणि गुजरात सरकारचे अभिनंदन करतो. आणि मला इथे टीव्हीवर वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे लोक दिसत आहेत.अनेक जुन्या चेहेऱ्यांचे मला दुरुन दर्शन करण्याची संधी मिळत आहे. दूर-दूरचे, दुर्गम भाग सगळेच दिसत आहे मला. किती मोठा, भव्य कार्यक्रम झाला आहे हा. मी अनेक वर्षे संघटनाचे कार्य केले आहे, तेव्हा लाखो लोकांना एकाच ठिकाणी जमावाने ही काही साधी बाब नाही. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही आम्हाला आशीर्वाद देत आहात, ही गोष्ट आमच्या संकल्पशक्तीला आणखीनच बळ देते. तुमची निर्धारशक्ती आम्हाला जाणवते आहे. आमचा बनासकांठा जिल्हा म्हणजे आमचा संपूर्ण उत्तर गुजरात.... आपल्याकडे पाणी आणण्यासाठी घागरी घेऊन दोन-दोन किलोमीटर पर्यंत लांब चालत जावे लागत असे. पण उत्तर गुजरातमधील आमच्या शेतकऱ्यांनी ‘प्रत्येक थेंबातून अधिक पीक’, ठिबक सिंचन, आधुनिक सिंचन यांसारख्या नव्या उपक्रमांचा वापर केल्यामुळे आज या भागातील कृषी क्षेत्र, मग ते महेसाणा असो, अंबाजी असो, पाटण असो..हा संपूर्ण भागच नव्या उंचीवर पोहोचत आहे. अंबाजी धाम येथील विकास कार्ये पाहून मला अत्यंत आनंद झाला. येत्या काळात येथे येणारे भाविक आणि पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. आता बघा, तारंगाहिल भागात प्रगती होत आहे, अंबाजी अत्यंत वेगाने विकास करते आहे, आणि आणखी एक विशेष बाब म्हणजे, या भागात सुरु होत असलेल्या नव्या रेल्वे मार्गामुळे अबू रोड पर्यंत म्हणजेच अहमदाबाद पासून अबू रोड पर्यंत एक नवी ब्रॉड गेज रेल्वे लाईन उपलब्ध होणार आहे. आणि या कामाचे काय झाले ते तुमच्या लक्षात असेलच. इंग्रजांच्या काळात शंभर वर्षांपूर्वी याची योजना तयार झाली होती. मात्र पुढची शंभर वर्षे या कामाला स्थगित ठेवण्यात आले होते, काम पुढे सरकलेच नव्हते. आज शंभर वर्षांनंतर हे काम होत आहे. या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होणार आहेत. या मार्गामुळे अजितनाथ जैन मंदिरापर्यंत पोहोचणे सुलभ होणार आहे. अंबाजी मातेच्या मंदिरापर्यंत सुगम रेल्वे संपर्क स्थापित होणार आहे. आणि नुकतेच मला वर्तमानपत्रात वाचायला मिळाले, मी तेथे होतो तेव्हा मला काहीच माहित नव्हते. माझे वडनगर गाव आता सर्वांनी शोधून काढले आहे. सुमारे 3 हजार वर्षांपूर्वीपासून वसलेले हे गाव जगभरातील लोकांसाठी आश्चर्य ठरले आहे. आणि असे म्हणतात की पूर्वी फार मोठ्या संख्येने पर्यटक हाटकेश्वर मंदिराचे दर्शन करण्यासाठी येत असत, आता हे पर्यटक पुरातन गोष्टी पाहण्यासाठी येतात. येथे अंबाजी, पाटण, तारंगाजी...तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटी..एका अर्थी हे संपूर्ण क्षेत्रच पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. आज आमचा हा उत्तर गुजरात देखील नडाबेटला जाण्यासाठी उत्सुक असतो. चोहीकडे विकास दिसू लागला आहे. उत्तर गुजरातला यामुळे खूप मोठे लाभ मिळणार आहेत. हा भाग विकासाची नवी उंची गाठणार आहे.

मित्रांनो,

आम्ही नोव्हेंबर-डिसेंबर तसेच जानेवारी या महिन्यांमध्ये संपूर्ण देशभरात विकसित भारत संकल्प यात्रांचे यशस्वी आयोजन झालेले बघितले. गावागावात मोदींच्या गॅरंटीची गाडी जात असे. गावात कोणी लाभार्थी लाभापासून वंचित राहून गेला असेल त्याला शोधून काढत असे. आणि संपूर्ण देशातील लाखो गावांमध्ये भारत सरकार थेट पोहोचले आहे अशी घटना स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या 75 वर्षांमध्ये प्रथमच घडली आहे. आणि आपल्या गुजरातमध्ये देखील कोट्यवधी लोक या कार्यक्रमात सहभागी झाले.तसेच गेल्या 10 वर्षांत सरकारच्या प्रयत्नांमुळे देशात जे सर्वात मोठे कल्याणकार्य झाले असेल, ज्याला मी स्वतः सर्वात मोठे कार्य मानतो आणि जे समजल्यावर तुम्हा सर्वांना देखील समाधान वाटेल, ते काम म्हणजे, गेल्या 10 वर्षांत 25 कोटी देशवासीय दारिद्र्यरेषेच्या बाहेर पडले आहेत.

सरकार या 25 कोटी लोकांसोबत प्रत्येक पावलावर उभे राहिले आणि या 25 कोटी सहकाऱ्यांनी सरकारच्या योजनांचा लाभ घेतला, योग्य पद्धतीने पैशाचा विनियोग केला, योजनेनुसार आपल्या जीवनाला आकार दिला आणि 25 कोटी लोक गरिबीवर मात करण्यात यशस्वी झाले. म्हणजेच माझे 25 कोटी नवे सहकारी बनले ज्यांनी गरिबीवर मात केली आहे. तुम्हाला कल्पना येऊ शकेल की मला किती आनंद होत असेल, माझा विश्वास किती वाढला आहे की हो... या योजना आपल्याला गरिबीतून बाहेर काढू शकतील. आणि म्हणूनच आगामी काळात देखील मला भारतात गरिबी संपवण्यासाठी तुमची मदत पाहिजे. तुम्ही ज्या प्रकारे गरिबीवर मात केली आहे, तशाच प्रकारे इतर गरीबांना देखील गरिबीवर मात करता यावी याकरिता माझे सहकारी बनून, गरिबीवर मात करण्याच्या या लढाईत मला साथ द्याल. तुम्हाला जी ताकद मिळाली आहे ती इतर गरिबांना देखील मिळेल, हे काम तुम्ही नक्की कराल. आता ज्या भगिनींसोबत संवाद साधण्याची संधी मला मिळाली, त्यांचा जो आत्मविश्वास मी पाहिला, घर मिळाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात जो एक विश्वास निर्माण झाला आहे आणि घरे देखील मी पाहात होतो, अशी सुंदर घरे दिसत होती, मनाला वाटत होते की... वा.... खरोखरच माझ्या गुजरातप्रमाणेच माझ्या देशातील लोक देखील सुखी संपन्न जीवनाच्या दिशेने पुढे जात आहेत.   

 

मित्रहो,

आजचा काळ इतिहास घडवण्याचा काळ आहे, इतिहास रचण्याचा काळ आहे. हा तशाच प्रकारचा काळ आहे जो आपल्याला स्वातंत्र्याच्या काळात पाहायला मिळाला होता. स्वातंत्र्याच्या या संग्रामात स्वदेशी चळवळ असो, भारत छोडो चळवळ असो, दांडी यात्रा असो, तो जनतेचा संकल्प बनला होता, देशासाठी आज तशाच प्रकारचा संकल्प विकसित भारताच्या निर्मितीचा खूप मोठा संकल्प बनला आहे. 

देशातील प्रत्येक बालकाची अशी इच्छा आहे की येत्या 25 वर्षात भारत एक विकसित देश झाला पाहिजे. यासाठी सर्वजण आपापले योगदान देत आहेत. आणि गुजरातचा तर नेहमीच हा विचार राहिला आहे, मी जेव्हा तिथे होतो तेव्हा देखील, राज्याच्या विकासातून देशाचा विकास करण्याचा गुजरातचा संकल्प राहिला आहे. विकसित भारतासाठी विकसित गुजरात, हा कार्यक्रम याच मालिकेचा एक भाग आहे.

बंधू आणि भगिनींनो,

पीएम आवास योजना लागू करण्यात गुजरात नेहमीच आघाडीवर राहिला आहे, याचा मला आनंद आहे. याअंतर्गत शहरी भागात 8 लाखांहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. पीएम आवास योजना ग्रामीण अंतर्गत 5 लाखांहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. नवीन तंत्रज्ञान आणि जलद घरे बांधण्यासाठी आम्ही आमच्या गृहनिर्माण योजनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. गुजरातमधील राजकोटमध्ये लाइट हाऊस प्रकल्पांतर्गत 1100 हून अधिक घरे बांधण्यात आली आहेत.

मित्रहो,

गरिबांच्या घरांसाठी मोदींनी सरकारी तिजोरी खुली केली आहे. आणि पूर्वी काय परिस्थिती होती, मला आठवते, वलसाडच्या दिशेने आमच्या हडपती समाजासाठी घरे बांधली गेली होती. एक दिवसही कोणी राहायला गेले नाही. हडपती देखील राहायला तयार नव्हते, विचार करा कशी स्थिती असेल. आणि हळू-हळू ती आपोआपच बसत गेली. आणि अशाच प्रकारे आम्ही भावनगरला जातो, त्यावेळी वाटेत अनेक घरे दिसतात. पण कोणताही माणूस त्यात दिसत नाही. हळू-हळू त्या घराच्या खिडक्या दरवाजे सर्व लोकांनी चोरून नेल्या. हे सर्व मी 40 वर्षांपूर्वीचे सांगत आहे. सर्व काही उद्ध्वस्त झाले होते. कारण कोणी राहायलाच जात नव्हते, असे सर्व काही बनवले होते. 2014 पूर्वीच्या 10 वर्षांमध्ये जितका पैसा गरिबांच्या घरांसाठी दिला जात होता, त्याच्या सुमारे 10 पट गेल्या 10 वर्षात देण्यात आला. या वर्षाच्या अर्थसंकल्पात देखील आम्ही 2 कोटी नव्या घरांची घोषणा केली आहे, जेणेकरून प्रत्येक गरिबाकडे पक्के घर नक्की असेल. 

मित्रहो,

2014 पूर्वी ज्या गतीने गरिबांसाठी घरे बांधली जात होती, त्यापेक्षा कितीतरी जास्त गतीने आज गरिबांसाठी घरे तयार होत आहेत. पूर्वी गरिबांच्या घरांसाठी केवळ पैसे मिळायचे, खूपच कमी पैसे मिळत असायचे आणि ते देखील कापाकापी, कंपनी, मध्यस्थ, कोणी 15 हजार रुपये हडप करायचे, कोणी 20 हजार रुपये हडप करायचे, लुटायचे, आता पैसे देखील सव्वा दोन लाख रुपयांपेक्षा जास्त मिळत आहेत आणि थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पोहोचत आहेत. आज गरिबांना आपले स्वतःचे घर स्वतः बनवण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे, त्यामुळे घरे देखील वेगाने तयार होत आहेत, अधिक चांगली बनत आहेत. पूर्वी लहान घरे असायची. घर कसे असेल, हे सरकारचे लोक ठरवायचे. घरे जरी बांधली गेली तरी शौचालय, वीज-पाणी, गॅस कनेक्शन यांसारख्या सुविधा गरीब कुटुंबाना अनेक वर्षे मिळत नव्हत्या. यावर देखील गरिबांचे हजारो रुपये खर्च होत असायचे. म्हणूनच पूर्वी अनेक घरांमध्ये गृहप्रवेशच होऊ शकले नाहीत. आज घरांसोबत या सर्व सुविधा मिळत आहेत. अशा स्थितीत आज प्रत्येक लाभार्थी अतिशय आनंदाने आपल्या पक्क्या घरात गृहप्रवेश करत आहे. ही जी घरे आहेत, त्यापैकी कोट्यवधी बहिणींच्या नावावर पहिल्यांदाच एखाद्या मालमत्तेची नोंदणी झाली आहे. पूर्वी तर असे असायचे की घरे तर पुरुषाच्या नावावर, पती किंवा मुलाच्या नावावर, दुकान असेल तर देखील पुरुषाच्या नावावर, शेत असेल तर ते देखील पुरुषाच्या नावावर, घरात वाहन असेल तर ते देखील पुरुषाच्या नावावर . मग आम्ही हा निर्णय घेतला की गरिबांना ही जी घरे देणार आहोत, ती घरे वरिष्ठ भगिनीच्या नावावर करायची. माता-भगिनी आता घराच्या मालक बनल्या आहेत. 

बंधू आणि भगिनींनो,

गरीब, तरुण, आपल्या देशाचा अन्नदाता, आपला शेतकरी आपली मातृशक्ती, आपल्या  महिला-भगिनी हे सर्व या विकसित भारताचे आधारस्तंभ आहेत.यासाठीच त्यांचे सक्षमीकरण करणे ही आमची कटीबद्धता आहे आणि जेव्हा मी गरिबांविषयी चर्चा करत आहे त्यात प्रत्येक समाजातील कुटुंबीय समाविष्ट असतात. ही जी घरे मिळालेली  आहेत त्यामध्ये सुद्धा प्रत्येक जातीपातीचे गरीब कुटुंबीय आहेत, ज्यांना मोफत अन्नधान्य मिळत आहे ते सुद्धा प्रत्येक जातीतल्या लाभार्थ्यांना मिळत आहे. मोफत उपचार मिळत आहेत ते सुद्धा प्रत्येक जातीतल्या गरीब लाभार्थ्यांना मिळत आहेत, ज्यांना स्वस्त दरात खत मिळत आहे ते सुद्धा प्रत्येक जातीतल्या शेतकऱ्यांना मिळत आहे, पीएम किसान सन्मान निधी प्रत्येक जातीतल्या शेतकऱ्यांना मिळत आहे. गरीब परिवार मग तो कोणत्याही समाजाचा असेल ज्यांच्या मुला मुलींसाठी यापूर्वी बँकांचे दरवाजे बंद असायचे, ज्यांच्याजवळ बँकांना हमी देण्यासाठी काही नव्हते, ज्यांच्याजवळ कोणतीही गॅरंटी नव्हती, त्यांची गॅरंटी मोदी यांनी घेतली आहे. मुद्रा योजना ही अशाच प्रकारची गॅरंटी  आहे, या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक समाजातले गरीब तरुण विना तारण कर्ज घेत आहेत आणि आपला लहान- मोठा उद्योग करत आहेत. आपले विश्वकर्मा मित्र, आपले रस्त्यावरचे, पदपथावरचे फेरीवाले  मित्र, त्यांची गॅरंटीही मोदींनी घेतलेली आहे आणि यामुळेच आज त्यांचे जीवनमान सुद्धा बदलत आहे. गरीब कल्याणच्या प्रत्येक योजनेचे सर्वात मोठे लाभार्थी माझे हे दलित बंधू-भगिनी आहेत, माझे ओबीसी समाजातले बंधू-भगिनी आहेत, मागास दुर्लक्षित समाजातले लोक आहेत, आपले आदिवासी कुटुंबीय आहेत. मोदींच्या गॅरंटीचा सर्वात अधिक लाभ जर कोणाला झालेला आहे तर ते हे सर्व कुटुंबीय आहेत.

 

बंधू आणि भगिनींनो,

मोदी यांनी भगिनींना लखपती दीदी बनवण्यासाठी खूप मोठी गॅरंटी दिलेली आहे. आपल्या सर्वांनी हे ऐकले असेल की मोदी साहेब हे काय करत आहेत.मी हे निश्चित केले आहे की गावागावात लखपती दीदी करायच्या आहेत. आतापर्यंत देशात 1 कोटी लखपती दीदी तयार झालेल्या  आहेत. यामध्ये सर्वात मोठ्या संख्येने गुजरात मधील माझ्या माता-भगिनी आहेत.आता आमचा हाच प्रयत्न राहणार आहे की येणाऱ्या काही वर्षांमध्ये 3 कोटी भगिनींना लखपती बनवायचे आहे. याचा गुजरात मधील हजारो भगिनींना फायदा होणार आहे. हे जे नव्याने लखपती दीदी बनवणे चालले आहे यामुळे गरीब कुटुंबांना नवीन ताकद मिळणार आहे. आमच्या आशा सेविका असोत, आमच्या अंगणवाडी मधील भगिनी असोत, त्यांच्यासाठी सुद्धा या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत.आता या भगिनींना आपल्या औषधोपचारांची काळजी करावी लागणार नाही त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या औषधोपचाराची काळजी आता मोदी करणार आहेत.सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांना आता आयुष्यमान योजनेच्या अंतर्गत मोफत औषधोपचाराची सुविधा मिळणार आहे.

मित्रांनो,

मागील वर्षांमध्ये आमचा सतत हा प्रयत्न राहिला आहे की, गरीब आणि मध्यम वर्गाचा खर्च कशा प्रकारे कमी केला जाईल, मोफत अन्नधान्य असो, स्वस्तात औषधोपचार असो, स्वस्त औषधे असोत, स्वस्त मोबाईलचे बिल असो,या माध्यमातून खूप मोठी बचत होत आहे.उज्वला योजनेच्या लाभार्थी भगिनींना गॅस सिलेंडर सुद्धा स्वस्त दरात उपलब्ध करून दिला जात आहे.एलईडी बल्बची जी क्रांती आम्ही घेऊन आलो आहोत, यामुळे घराघरात विजेचे बिल कमी झालेले आहे.आता आमचा हाच प्रयत्न राहणार आहे की, सामान्य कुटुंबांना विजेचे येणारे बिल सुद्धा शून्य असेल आणि याच विजेच्या माध्यमातून त्यांची मिळकत सुद्धा होऊ शकेल.

यासाठी आता केंद्र सरकारने एक खूप मोठी योजना बनवलेली आहे. या योजने अंतर्गत, सुरुवातीला एक कोटी कुटुंबाच्या घरांवर सौरऊर्जेचे पॅनल लावले जाणार आहेत, ज्या प्रकारे आपण राधनपुर जवळ सौरऊर्जेचा खूप मोठा फार्म बनवलेला आहे. कच्छमध्ये सुद्धा आहे आणि आता प्रत्येक घराच्या वरती आणि या कारणाने घरामध्ये वीज मोफत मिळणार आहे.या माध्यमातून जवळजवळ 300 युनिट वीज मोफत मिळावी अशा प्रकारची व्यवस्था निर्माण होईल आणि आपले हजारो रुपये वाचणार आहेत आणि यातून अधिक वीज निर्माण करू शकलो तर ती वीज सरकार खरेदी करेल आणि आपली वीज विकून अधिक मिळकत होईल.गुजरात मध्ये तर मोढेरा येथे आम्ही सोलर अर्थात सौरऊर्जेचे गाव बनवले आहे.आता संपूर्ण देशात अशीच क्रांती येणार आहे. आमचे सरकार अन्नदात्याला ऊर्जादाता बनवण्यासाठी काम करत आहे.शेतकऱ्यांच्यासाठी सोलर पंप आणि पडीक जमिनीवर लहान लहान सौर ऊर्जेचे प्रकल्प उभे करण्यासाठी सुद्धा सरकार मदत देत आहे. गुजरात मध्ये शेतकऱ्यांसाठी सुद्धा सौर ऊर्जेच्या माध्यमातून एक वेगळा फिडर देण्याचे काम सुरू आहे.ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सुद्धा सिंचन करण्यासाठी विजेची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

मित्रांनो,

गुजरात राज्याची ओळख एक व्यापारी राज्य म्हणून आहे. आपल्या या विकास यात्रेमध्ये गुजरात राज्याने औद्योगिक विकासाला नवी गती प्राप्त करून दिली आहे. उद्योगांचे उर्जा स्थान असल्याकारणाने गुजरात मधील युवकांना अभूतपूर्व अशा संधी प्राप्त होत आहेत.आज गुजरात मधील तरुण प्रत्येक क्षेत्रामध्ये गुजरात राज्याला नव्या उंचीवर घेऊन जात आहेत. हे सर्व अभियान गुजरात मधील युवकांना नवीन संधी प्राप्त करून देतील त्यांची मिळकत वाढवतील आणि विकसित गुजरात राज्याला एका नव्या उंचीवर घेऊन जात आहेत.डबल इंजिनचे सरकार प्रत्येक ठिकाणी आपल्या सोबत आहे, पावलोपावली आपल्याबरोबर आहे.खूप आनंद झाला आपणा सर्वांना भेटून. आज ज्या ज्या लोकांना घरे मिळालेली आहेत त्या सर्वांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी मी पुन्हा एकदा शुभेच्छा देत आहे. आपण खात्री बाळगावी आणि आपल्या मुला बाळांना सांगावे की, तुम्ही ज्या कठीण परिस्थितीमध्ये जीवन जगला आहात अशा कठीण परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना जीवन जगावे लागू नये, मोदी साहेब त्यांना हालअपेष्टात राहू देणार नाहीत.आपण सर्वांनी जे कष्ट घेतले असतील, आपल्या मुलाबाळांना ते कष्ट सोसावे लागणार नाहीत, असा गुजरात आपल्याला बनवायचा आहे आणि असाच देश सुद्धा बनवायचा आहे.

आपणा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.

धन्यवाद!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Ayushman driving big gains in cancer treatment: Lancet

Media Coverage

Ayushman driving big gains in cancer treatment: Lancet
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Tamil Nadu meets Prime Minister
December 24, 2024

Governor of Tamil Nadu, Shri R. N. Ravi, met Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

The Prime Minister's Office posted on X:

"Governor of Tamil Nadu, Shri R. N. Ravi, met PM @narendramodi.”