भारत माता की जय.
भारत माता की जय.
भारत माता की जय.
गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्ले जी, येथील तरुण मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारीगण, इतर मान्यवर आणि गोव्यातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.समस्त गोंयकारांक, मना-कालझा सावन नमस्कार। तुमचो मोग अनी उर्बा पूड़ोंन, म्हाका गोयांत योन सदांच खोस सता।
मित्रहो,
गोवा येथील सुंदर समुद्रकिनारे आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ' आपले गोवा ' म्हणून ओळखले जाते. गोवा हे देशभरातील आणि परदेशातील लाखो पर्यटकांचे सुट्ट्यांच्या काळातील पर्यटनाचे आवडते ठिकाण आहे . कोणत्याही हंगामात येथे एक भारत श्रेष्ठ भारतची अनुभूती येते. यासोबतच गोव्याची आणखी एक ओळख आहे. गोव्याच्या या भूमीने अनेक महान संत , प्रसिद्ध कलाकार आणि विद्वानांनाही जन्म दिला आहे. आज मी त्यांचे देखील स्मरण करत आहे. संत सोहिरोबानाथ अंबिये, नाटककार कृष्ण भट्ट बंडकर, गायक केसरबाई केरकर, आचार्य धर्मानंद कोसंबी आणि रघुनाथ अनंत माशेलकर यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांनी गोव्याची ओळख समृद्ध केली आहे. येथून काही अंतरावर असलेल्या मंगेशी मंदिरासोबत भारतरत्न लता मंगशेकरजींचे अतिशय जवळचे नाते होते. आज लतादीदींची पुण्यतिथी देखील आहे. मी त्यांना माझ्याकडून श्रद्धांजली अर्पण करतो. याच मडगावच्या दामोदर सालमध्ये स्वामी विवेकानंद यांना एक नवी प्रेरणा मिळाली होती. येथील ऐतिहासिक लोहिया मैदान या गोष्टीचा दाखला आहे की ज्या वेळी देशासाठी काही तरी करण्याचा विचार पुढे येतो तेव्हा गोव्याचे नागरिक कोणतीही कसर बाकी ठेवत नाहीत. कन्कोलिमचे चिफटेंस स्मारक गोव्याच्या शौर्याचे प्रतीक आहे.
मित्रहो,
यावर्षी एक महत्त्वाचे आयोजन देखील होणार आहे. याच वर्षी सेंट फ्रान्सिस झेवियर, ज्यांना तुम्ही “गोयंचो सायब” म्हणून ओळखता त्यांच्या पवित्र अवशेषांचे एक्स्पोजिशन म्हणजे सार्वजनिक दर्शन कार्यक्रम आयोजित होणार आहे. हे एक्स्पोजिशन आपल्याला शांतता आणि सद्भावनेचा संदेश देते. जॉर्जियाच्या राणी संत केटेवान यांचा उल्लेख तर मी मन की बात मध्ये देखील केल्याचे मला आठवते. सेंट क्वीन केटेवान यांचे पवित्र अवशेष घेऊन जेव्हा आपले परराष्ट्रमंत्री जॉर्जियाला गेले होते, तेव्हा त्यांचा जणु काही संपूर्ण देशच रस्त्यावर उतरला होता. सरकारचे मोठ-मोठे प्रतिनिधी त्या वेळी विमानतळावर आले होते. ख्रिस्ती समुदाय आणि इतर धर्मांचे लोक ज्या प्रकारे गोव्यात मिळून मिसळून राहत आहेत, ते एक भारत-श्रेष्ठ भारतचे एक अद्भुत उदाहरण आहे.
मित्रहो,
आता काही वेळापूर्वीच गोव्याच्या विकासाकरिता 1300 कोटी रुपयांच्या योजनांचे लोकार्पण आणि भूमीपूजन झाले आहे. शिक्षण, आरोग्य आणि पर्यटनाशी संबंधित प्रकल्प गोव्याच्या विकासाला आणखी गती देतील. आज येथे National Institute of Technology आणि नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ वॉटर स्पोर्ट्सचे देखील उद्घाटन झाले आहे. यामुळे येथे शिकण्याच्या आणि शिकवणाऱ्यांच्या सुविधा आणखी वाढतील. आज येथे ज्या Integrated Waste Management Facility चे उद्घाटन झाले आहे, त्या सुविधेद्वारे गोवा स्वच्छ राखण्यात मदत मिळेल. आज येथे 1900 पेक्षा जास्त युवांना सरकारी नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. मी तुम्हा सर्वांचे या सर्व कल्याणकारी कामांसाठी खूप-खूप अभिनंदन करतो.
माझ्या कुटुंबियांनो,
गोवा क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने कितीही लहान राज्य असले तरी सामाजिक विविधतेच्या दृष्टीने खूप मोठे आहे. येथे विविध समुदायाचे लोक, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहतात, अनेक पिढ्यांपासून राहात आहेत. म्हणूनच गोव्यातील हेच लोक जेव्हा भाजपाच्या सरकारला निवडून देतात तेव्हा याचा संदेश संपूर्ण देशामध्ये दिला जातो. सबका साथ-सबका विकास हा भाजपाचा मंत्र आहे. देशात काही पक्षांनी नेहमीच भीती पसरवण्याचे, लोकांमध्ये असत्य पसरवण्याचे राजकारण केले आहे. मात्र, गोव्याने अशा पक्षांना चोख प्रत्युत्तर दिले आहे आणि वारंवार दिले आहे.
मित्रहो,
आपल्या इतक्या वर्षांच्या राजवटीत गोव्यातील भाजपा सरकारने सुशासनाचे एक मॉडेल विकसित केले आहे. "स्वयंपूर्ण गोवा" या अभियानाला ज्या प्रकारे गोवा गती देत आहे, ते खरोखरच अभूतपूर्व आहे. याचाच हा परिणाम आहे की आज गोव्यातील लोकांची गणना देशातील सर्वात सुखी लोकांमध्ये होत आहे. डबल इंजिनामुळे गोव्याच्या विकासाची गाडी अतिशय वेगाने पुढे जात आहे. गोवा ते राज्य आहे, जिथे 100 टक्के घरांमध्ये नळाने पाणी पुरवले जात आहे. गोवा ते राज्य आहे जिथे 100 टक्के घरांमध्ये विजेच्या जोडण्या आहेत. गोवा ते राज्य आहे जिथे स्वयंपाकाच्या एलपीजीची व्याप्ती 100 टक्के झाली आहे. गोवा ते राज्य आहे जे पूर्णपणे केरोसिनमुक्त आहे. गोवा पूर्णपणे हागणदारीमुक्त राज्य बनले आहे. केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांपैकी अनेक योजनांमध्ये गोव्याने 100 टक्के संतृप्तता साध्य केली आहे आणि आपल्या सर्वांना हे माहीत आहे ज्यावेळी संतृप्तता साध्य होते तेव्हा भेदभाव नष्ट होतो. जेव्हा संतृप्तता असते तेव्हा प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत संपूर्ण लाभ पोहोचतो. जेव्हा संतृप्तता असते तेव्हा लोकांना आपले अधिकार मिळवण्यासाठी लाच द्यावी लागत नाही. म्हणूनच मी वारंवार सांगतो की संतृप्तता हीच खरी धर्मनिरपेक्षता आहे. गोव्याला, देशाला मोदी यांची गॅरंटी आहे. याच संतृप्ततेच्या लक्ष्याकरिता आता देशात विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली होती. गोव्यातही 30 हजारांपेक्षा जास्त लोक या यात्रेत सहभागी झाले. जे काही लोक सरकारच्या योजनांपासून वंचित राहिले होते, त्यांना देखील मोदींच्या गॅरंटीवाल्या गाडीचा खूप लाभ मिळाला आहे.
बंधू आणि भगिनींनो,
काही दिवसांपूर्वी जो अर्थसंकल्प मांडण्यात आला, त्यात देखील संतृप्ततेच्या, गरिबातील गरिबाच्या सेवेच्या आमच्या संकल्पाला बळकटी देण्यात आली आहे. तुम्हाला माहीत आहेच की आम्ही 4 कोटी गरीब कुटुंबांना पक्की घरे देण्याचे आमचे लक्ष्य पूर्ण केले आहे. आता आमची गॅरंटी आहे की आणखी 2 कोटी गरीब कुटुंबांना घरे बांधून देऊ. आणि मी गोव्यातील माझ्या सहकाऱ्यांनो तुम्हाला देखील सांगत आहे, तुमच्या गावात, तुमच्या भागात जर एखादे कुटुंब पक्क्या घरापासून वंचित असेल, जर ते आजही झोपडपट्ट्यांमध्ये राहात असेल तर त्यांना सांगा मोदीजी आले होते, मोदी जींनी गॅरंटी दिली आहे तुमचे देखील पक्के घर तयार होईल. या अर्थसंकल्पात पीएम आवास योजने अंतर्गत तिच्या विस्ताराची घोषणा करण्यात आली आहे. आम्ही पाच लाखांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा देणाऱ्या आयुष्मान योजनेचा देखील विस्तार केला आहे. आता आशा सेविका आणि अंगणवाडी कामगारांना देखील मोफत उपचारांची गॅरंटी मिळाली आहे.
मित्रांनो,
या अर्थसंकल्पात आपल्या मच्छीमार मित्रांवरही खूप लक्ष देण्यात आले आहे. मत्स्य संपदा योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या मदतीत आता आणखी वाढ करण्यात येणार आहे. यामुळे मच्छिमारांना अधिक सुविधा आणि संसाधने उपलब्ध होतील. तसेच सागरी खाद्य निर्यातीत मोठी वाढ होऊन मच्छिमारांच्या मिळकतीत वाढ होईल. अशा प्रयत्नांमुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रातच लाखो नवीन रोजगार निर्माण होण्याची संधी आहे.
मित्रांनो,
मच्छिमारांच्या हितासाठी जेवढे काम आमच्या सरकारने केले आहे तेवढे यापूर्वी कोणी केलेले नाही. मच्छिमारांसाठी आम्ही स्वतंत्र मंत्रालय तयार केले. आम्हीच मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली. आमच्या सरकारने मच्छिमारांच्या विम्याची रक्कम 1 लाख रुपयांवरून वाढवून 5 लाख रुपये केली आहे. त्यांच्या होड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आमचे सरकार अनुदानही देत आहे.
बंधू आणि भगिनींनो,
भाजपाचे दुहेरी इंजिन सरकार गरिबांच्या कल्याणासाठी मोठ्या योजना राबवण्याबरोबरच पायाभूत सुविधांवर विक्रमी गुंतवणूक करत आहे. देशात रस्ते, रेल्वे आणि विमानतळांचा विस्तार किती झपाट्याने होत आहे हे तुम्ही स्वतः अनुभवत आहात. यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी 11 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर 10 वर्षांपूर्वी पायाभूत सुविधांवर 2 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी खर्च केला जात होता. विकास प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात. यामुळे प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न वाढते.
मित्रांनो,
आमचे सरकार गोव्यातील कनेक्टिव्हिटी सुधारण्याबरोबरच ते लॉजिस्टिक केंद्र बनवण्याचे काम करत आहे. गोव्यात आम्ही बांधलेले मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सातत्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेशी जोडले जात आहे. गेल्या वर्षी, देशातील दुसरा सर्वात लांब केबल ब्रिज - न्यू झुआरी पुलाचे उद्घाटन झाले. गोव्यातील पायाभूत सुविधांचा झपाट्याने होणारा विकास, नवे रस्ते, नवे पूल, नवे रेल्वे मार्ग, नवीन शैक्षणिक संस्था, सर्व काही इथल्या विकासाला नवी गती देणार आहे.
मित्रांनो,
निसर्ग, संस्कृती आणि वारसा या बाबतीत भारत नेहमीच समृद्ध राहिला आहे. जगातील लोक विविध प्रकारच्या पर्यटनासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये जातात. भारतातील प्रत्येक प्रकारचे पर्यटन एकाच देशात, एकाच व्हिसावर उपलब्ध आहे. पण 2014 पूर्वी देशात जे सरकार होते, त्यांनी या सगळ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. पर्यटन स्थळांच्या विकासासाठी, आपल्या समुद्रकिनाऱ्यांच्या विकासासाठी, बेटांच्या विकासासाठी पूर्वीच्या सरकारांकडे कोणतीही दूरदृष्टी नव्हती. चांगले रस्ते, चांगल्या रेल्वेगाड्या आणि विमानतळ नसल्यामुळे अनेक पर्यटनस्थळे अनोळखीच राहिली. गेल्या 10 वर्षांत या सर्व उणिवा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. गोव्याचे दुहेरी इंजिन सरकार सुद्धा येथील पर्यटन संधी वाढवत आहे. गोव्याच्या अंतर्गत भागात पर्यावरणस्नेही-पर्यटनाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याचा थेट फायदा तेथील स्थानिकांना होणार आहे. गोव्यातील खेड्यापाड्यात पर्यटक पोहोचल्यावर तेथे रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील. पणजी ते रेईस मेगोसला जोडणारा रोपवे बांधल्यानंतर येथील पर्यटकांची संख्या आणखी वाढणार आहे. या प्रकल्पासोबत आधुनिक सुविधाही विकसित केल्या जाणार आहेत. फूड कोर्ट, रेस्टॉरंट, विश्रामगृह यासह विविध सुविधांमुळे ते गोव्यातील नवे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
मित्रांनो,
आमचे सरकार आता गोव्याला नवीन प्रकारचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करत आहे. हे कॉन्फरन्स टुरिझम आहे. आज सकाळीच मी भारत ऊर्जा सप्ताह कार्यक्रमात उपस्थित होतो. जी-20 च्या अनेक महत्त्वाच्या बैठकाही गोव्यात झाल्या आहेत. गोव्याने गेल्या काही वर्षांत मोठ्या राजनैतिक बैठकांचे आयोजन केले आहे. जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा, जागतिक बीच व्हॉलीबॉल दौरा, सतरा वर्षांखालील फिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा...सदतीसाव्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धा ...या सर्वांचे आयोजनही गोव्यात करण्यात आले. अशा प्रत्येक घटनेने गोव्याचे नाव आणि गोव्याची ओळख जगभर पोहोचत आहे. येत्या काही वर्षांत दुहेरी इंजिन सरकार गोव्याला अशा कार्यक्रमांचे मोठे केंद्र बनवणार आहे. आणि तुम्हीसुद्धा जाणताच की अशा प्रत्येक आयोजनामुळे गोव्यातील लोकांना रोजगार मिळतो आणि येथील लोकांचे उत्पन्न वाढते.
मित्रांनो,
गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी येथे विकसित करण्यात आलेल्या आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधांचाही येथील क्रीडापटू, खेळाडूंना मोठा उपयोग होणार आहे. मला सांगण्यात आले आहे की गोव्यात विकसित भारत संकल्प यात्रा सुरू असताना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या गोव्याच्या खेळाडूंचाही सन्मान करण्यात आला होता. गोव्याच्या अशा प्रत्येक युवा खेळाडूचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो.
आणि मित्रांनो,
जेव्हा आपण खेळाविषयी एव्हढे बोलतोय तेव्हा गोव्याचा फुटबॉल कोण विसरेल? आजही गोव्याचे फुटबॉलपटू आणि येथील फुटबॉल क्लब यांची देशात आणि जगात स्वतःची वेगळी ओळख आहे. आमच्या सरकारने गोव्यातील ब्रह्मानंद शंखवलकर यांना फुटबॉलसारख्या खेळातील अमूल्य योगदानाबद्दल दोन वर्षांपूर्वी पद्म पुरस्काराने सन्मानित केले होते. आज आमचे सरकार खेलो इंडियाच्या माध्यमातून फुटबॉलसह अनेक खेळांना प्रोत्साहन देत आहे.
मित्रांनो,
क्रीडा आणि पर्यटनाशिवाय गेल्या काही वर्षांत गोव्याची आणखी एक ओळख देशभरात निर्माण झाली आहे. आमचे सरकार गोव्याला मोठे शैक्षणिक केंद्र म्हणून चालना देत आहे. येथील अनेक संस्था देशभरातील विद्यार्थ्यांसाठी स्वप्नवत संस्था बनल्या आहेत. आज सुरू झालेल्या नवीन संस्था गोव्यातील तरुणांना देशात निर्माण होत असलेल्या नवीन संधींसाठी सज्ज करतील. आमच्या सरकारने तरुणांसाठी देखील अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा केली आहे. संशोधन आणि नवोन्मेषासाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधी उभारला जाईल. यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात नाविन्यपूर्णतेला चालना मिळेल आणि याचा फायदा उद्योगांना आणि आपल्या तरुणांना होईल.
बंधू आणि भगिनींनो,
गोव्याच्या जलद विकासासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. गोव्यातील सर्व कुटुंबीयांवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला विश्वास आहे की मोदींच्या हमीमुळे गोव्यातील प्रत्येक कुटुंबाचे आयुष्य सुधारेल. या विकासकामांसाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.
खूप खूप धन्यवाद.
भारत माता की जय.
भारत माता की जय.
भारत माता की जय.