Lays foundation stone of building for Faculty of Technology, Computer Centre and Academic Block of the University
Releases Commemorative Centenary Volume - Compilation of Centenary Celebrations; Logo Book - Logo of Delhi University and its colleges; and Aura - 100 Years of University of Delhi
Takes Metro Ride to reach University of Delhi
“Delhi University has not been just a university but a movement”
“If during these hundred years, DU has kept its emotions alive, it has kept its values vibrant too”
“India’s rich education system is the carrier of India's prosperity”
“Delhi University played a major part in creating a strong generation of talented youngsters”
“When the resolve of an individual or an institution is towards the country, then its achievements are equated with the achievements of the nation”
“The third decade of the last century gave new momentum to the struggle for India’s independence, now the third decade of the new century will give impetus to the development journey of India”
“Indian values like democracy, equality and mutual respect are becoming human values”
“World's largest heritage museum - ‘Yuge Yugeen Bharat’ is going to be built in Delhi”
“Soft power of India is becoming a success story of the Indian youth”

दिल्ली विद्यापीठाच्या या सुवर्णमय  समारंभासाठी उपस्थित देशाचे शिक्षण मंत्री  धर्मेंद्र प्रधान जी, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंह जी, प्राध्यापक वर्ग,शिक्षक गण आणि माझ्या युवा मित्रांनो,

आपण या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण दिले तेव्हा मी  इथे नक्कीच यायचे असे ठरवले.इथे यायचे म्हणजे घरातल्या  माणसांमध्ये आल्याप्रमाणेच आहे.

दिल्ली विद्यापीठाचे हे जग जाणून घेण्यासाठी आपण शंभर वर्षांचा प्रवास उलगडणारी चित्रफित पाहिली.केवळ हे दिग्गज पाहिले तरी दिल्ली विद्यापीठाची महती लक्षात येते.माझ्या समोर असलेल्या काही जणांना मी विद्यार्थी दशेपासून ओळखतो, आता ते थोर झाले आहेत.आज इथे आल्यानंतर या जुन्या मित्रांना भेटण्याची संधी नक्कीच मिळेल याचा  मला अंदाज होताच आणि   तशी संधी मिळतही आहे. 

मित्रांनो,

दिल्ली विद्यापीठाचा कोणताही विद्यार्थी असो,कॉलेज फेस्ट असला,मग तो आपल्या महाविद्यालयाचा असो किंवा दुसऱ्या महाविद्यालयाचा, त्याच्यासाठी सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे कोणत्याही प्रकारे त्या महोत्सवातला सहभाग.माझ्यासाठीही ही अशीच संधी आहे. दिल्ली विद्यापीठाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात, या उत्सवी वातावरणात आपणा सर्वांमध्ये येण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे.मित्रहो, महाविद्यालयाच्या परिसरात आल्याचा आनंद तेव्हाच होतो आपण मित्रांबरोबर  येतो.दोन मित्र गप्पा मारता मारता जगभरातल्या विषयांवर बोलतील, इस्रायल पासून ते अगदी चंद्रा पर्यंत कुठलाही विषय बाकी राहायचा नाही.कोणता चित्रपट बघितला, ओटीटी वर कोणती मालिका चांगली आहे, अमुक एक रील बघितले की नाही, गप्पांचा अथांग सागर असतो.म्हणूनच मी पण आज तुम्हा सर्वांप्रमाणेच दिल्ली मेट्रोने युवा मित्रांबरोबर गप्पा मारत इथे आलो आहे.बातचीत करता - करता काही किस्से समजले,काही मनोरंजक माहितीही मिळाली.

 

मित्रांनो,

आजची संधी एका आणखी कारणामुळे खास आहे. दिल्ली विद्यापीठाने अशा काळात आपली 100 वर्षे पूर्ण केली आहेत जेव्हा देश स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त अमृत महोत्सव साजरा करत आहे.कोणत्याही देशाची विद्यापीठे, त्यातल्या शैक्षणिक संस्था त्या देशाच्या कर्तृत्वाचे  खरेखुरे प्रतिबिंब असतात. दिल्ली विद्यापीठाच्या या 100 वर्षांच्या प्रवासातही किती ऐतिहासिक टप्पे आले! यामधे अनेक प्राध्यापक,अनेक विद्यार्थी आणि कितीतरी लोकांचे आयुष्य जोडले गेले आहे.एका अर्थाने दिल्ली विद्यापीठ हे केवळ एक विद्यापीठ नव्हे तर एक चळवळ राहिले आहे. या विद्यापीठाने प्रत्येक क्षण अनुभवला आहे.या विद्यापीठाने प्रत्येक क्षण जिवंत केला आहे.या ऐतिहासिक क्षणी विद्यापीठाचे सर्व प्राध्यापक,कर्मचारी आणि सर्व आजी - माजी विद्यार्थ्यांना मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. 

मित्रांनो,

आज या आयोजनातून आजीआणि माजी विद्यार्थी एकत्र आले आहेत. स्वाभाविकपणे सदाबहार चर्चाही होतील.नॉर्थ कॅम्पस

मधल्या लोकांसाठी कमला नगर, हडसन लाईन आणि मुखर्जी नगराशी जोडलेल्या आठवणी, साऊथ कॅम्पस मधल्या लोकांसाठी सत्य निकेतनचे किस्से,आपण कोणत्याही वर्षी उत्तीर्ण झाला असाल तरी  दिल्ली विद्यापीठातील दोन जण यावर तासन् तास बोलू शकतात ! या सर्वांमध्ये दिल्ली विद्यापीठाने आपल्या जाणीवा, आपली मुल्ये कायम जपली आहेत. 

“निष्ठा धृति सत्यम”, हे विद्यापीठाचे बोधवाक्य प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनासाठी मार्गदर्शक दीप आहे.

 

मित्रांनो,

आपल्याकडे म्हटले जाते,

ज्ञान-वानेन सुखवान्, ज्ञान-वानेव जीवति।

ज्ञान-वानेव बलवान्, तस्मात् ज्ञान-मयो भव॥

म्हणजेच ज्याच्याकडे ज्ञान आहे तोच सुखी आहे,बलवान आहे. खऱ्या अर्थाने तोच जीवन जगतो ज्याच्याकडे ज्ञान आहे. म्हणूनच भारताकडे नालंदा सारखी विद्यापीठे होती तेव्हा भारत सुख- समृद्धीच्या शिखरावर होता.जेव्हा भारताकडे तक्षशीला सारखी विद्यापीठे होती तेव्हा भारताचे विज्ञान जगाला मार्ग दाखवत होते. भारताची समृद्ध शिक्षण व्यवस्था भारताच्या समृद्धीची वाहक होती.

त्या काळात जगाच्या सकल उत्पादनात भारताचा मोठा वाटा होता.मात्र शेकडो वर्षांच्या गुलामीच्या कालखंडाने आपली विद्या  मंदिरे, शिक्षणाची ही केंद्रे उद्वस्त  केली.भारताचा हा बौद्धिक ओघ थांबल्यानंतर भारताची प्रगतीही खुंटली.

प्रदीर्घ काळानंतर देश स्वतंत्र झाला.त्याआधी स्वातंत्र्याच्या भावनेची  धगधगती  ज्वाला मूर्त रूपात साकारण्यासाठी भारतातल्या विद्यापीठांनी महत्वाची भूमिका बजावली होती. या विद्यापीठांद्वारे एक अशी युवा पिढी घडवली गेली जी त्या काळातल्या आधुनिक जगतालाही आव्हान देऊ शकत होती.

दिल्ली विद्यापीठही या चळवळीचे एक महत्वाचे केंद्र होते.

दिल्ली विद्यापीठाचे सर्व विद्यार्थी, मग ते कुठल्याही अभ्यासक्रमात शिकत असोत, त्यांना आपल्या संस्थेचा हा इतिहास माहित असेल. भूतकाळाची ही माहिती आपल्या अस्तित्वाला आकार देत असते, आदर्शांना आधार देते आणि भविष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विस्तारते. 

मित्रांनो,

कुणी व्यक्ती असो अथवा संस्था, जेव्हा त्याचे संकल्प देशासाठी असतात, तेव्हा त्यांचे यश देखील देशाच्या यशा सोबत पुढे जात असते. एकेकाळी दिल्ली विद्यापीठात केवळ 3 महाविद्यालये होती. आज 90 पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. एकेकाळी भारताची अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीत होती, आज भारत जगातल्या प्रमुख 5 अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. आज दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या जास्त झाली आहे. याच प्रमाणे, देशात सुद्धा, लिंग गुणोत्तरात मोठी सुधारणा झाली आहे. म्हणजे, शैक्षणिक संस्थांची मुळे जितकी खोल असतील, देशाच्या फांद्या तितक्याच उंचीवर पोचतात. आणि म्हणून भविष्यासाठी देखील विद्यापीठ आणि देशाचे संकल्प यांच्यात एकवाक्यता असायला पाहिजे, परस्पर संबंध असायला पहिजे.

25 वर्षांनंतर, जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल, तेव्हा दिल्ली विद्यापीठ आपल्या स्थापनेची 125 वर्षे साजरी करेल. तेव्हा ध्येय होते भारताचे स्वातंत्र्य, आता आपले ध्येय आहे 2047पर्यंत विकसित भारताची निर्मिती. गेल्या शतकाच्या तिसऱ्या दशकात, जर गेल्या शतकाच्या इतिहासावर नजर टाकली तर गेल्या शतकाच्या तिसऱ्या दशकात स्वातंत्र्य लढ्याला नवा वेग मिळाला होता. आता या शतकाचे हे तिसरे दशक भारताच्या विकास यात्रेला गती देईल. आज देशभरात मोठ्या संख्येने विद्यापीठे, महाविद्यालये सुरु केली जात आहेत. गेल्या काही वर्षांत IIT, IIM, NIT आणि AIIMS सारख्या संस्थांच्या संख्येत देखील सातत्याने वाढ झाली आहे. या सर्व संस्था नव्या भारताच्या निर्मितीचा मार्ग बनत आहेत. 

मित्रांनो,

शिक्षण म्हणजे केवळ शिकवण्याची प्रक्रिया नाही, तर शिकण्याची देखील प्रक्रिया आहे. अनेक वर्ष शिक्षणाचा भर यावरच होता की विद्यार्थ्यांना काय शिकवले गेले पाहिजे. मात्र आम्ही आता यावर भर देत आहोत, की विद्यार्थ्यांना काय शिकायचं आहे. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार झाले आहे. आता विद्यार्थ्यांना ही मोठी सुविधा मिळाली आहे की ते आपल्या इच्छेनुसार आपल्या आवडीचे विषय निवडू शकतात. शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहेत. या संस्था स्पर्धात्मक बनविण्यासाठी आम्ही राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन आराखडा घेऊन आलो आहोत. यामुळे देशभरातल्या संस्थांना एक प्रकारचे प्रोत्सहान मिळात आहे. आम्ही संस्थांची स्वायत्तता शैक्षणिक गुणवत्तेशी देखील जोडली आहे. संस्थांचे काम जितके चांगले असेल, तितकी त्यांना स्वायत्तता मिळत आहे.

 

मित्रांनो,

शिक्षण क्षेत्रात घेण्यात आलेल्या भविष्यवादी निर्णय आणि धोरणांचा असा परिणाम झाला आहे की आज भारतीय विद्यापीठांना जागतिक ओळख मिळत आहे. 2014 मध्ये QS जागतिक क्रमवारीत केवळ 12 भारतीय विद्यापीठे असत, मात्र आज ही संख्या 45 झाली आहे. आपल्या शैक्षणिक संस्था जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, या सगळ्याच्या मागे सर्वात मोठी मार्गदर्शक शक्ती कोणती आहे - भारताची युवा शक्ती. या सभागृहात बसलेल्या माझ्या युवकांची शक्ती. 

मित्रांनो,

एक काळ असा होता, जेव्हा विद्यार्थी कुठल्याही संस्थेत प्रवेश घेताना सर्वात आधी नोकरी मिळण्याला प्राधान्य देत होते. म्हणजे प्रवेश घेण्याचा अर्थ डिग्री आणि डिग्रीचा अर्थ नोकरी, शिक्षण इथपर्यंतच मर्यादित झालं होतं. मात्र आज युवक आयुष्य यात अडकवून ठेवू इच्छित नाही. त्यांना काही तरी नवीन करायचं आहे, आपली रेष स्वतः तयार करायची आहे.

2014 पूर्वी भारतात केवळ काही शे स्टार्टअप होते. आज भारतात स्टार्टअप्सची संख्या एक लाखाच्या देखील पुढे गेली आहे. 2014-15 च्या तुलनेत आज 40 टक्क्यांपेक्षा जास्त पेटंट साठी अर्ज येत आहेत. जे पेटंट दिले जात आहेत, त्यात देखील 5 पट वाढ झाली आहे. जागतिक नावोन्मेश नर्देशांक, ज्यात भारत 81 व्या क्रमांकावर होता, 80 च्याही पुढे. तिथून पुढे जाऊन आज आपण 46 वर पोचलो आहोत, ते स्थान आपण प्राप्त केले आहे. आताच काही दिवसांपूर्वी मी अमेरिकेच्या दौऱ्याहून परत आलो. तुम्ही सर्वांनी बघितलं असेल, आज भारताचा सन्मान किती वाढला आहे, गौरव किती वाढला आहे. याचं कारण काय आहे, कशामुळे आज भारताचा गौरव इतका वाढत आहे? उत्तर तेच आहे. कारण, भारताची क्षमता वाढली आहे, भारताच्या युवकांवर जगाचा विश्वास वाढत आहे. याच दौऱ्यात भारत आणि अमेरिका यांच्यात Initiative on Critical and Emerging Technology म्हणजे, iCET करार झाला आहे. हा एक करार झाल्यामुळे, आपल्या युवकांसाठी जमिनीपासून अवकाशापर्यंत, सेमी कंडक्टर पासून कृत्रिम बुद्धीमत्तेपर्यंत, सर्व क्षेत्रांत नव्या संधी निर्माण होणार आहेत.

जे तंत्रज्ञान पूर्वी भारताच्या आवाक्याबाहेर होते, आता आपल्या युवकांना ते उपलब्ध होईल, त्यांचा कौशल्य विकास होईल. अमेरिकेच्या मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि अप्लाइड मटेरियल सारख्या कंपन्यांनी भारतात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि मित्रांनो, भविष्यातला भारत कसा असेल, आपल्यासाठी कुठल्या कुठल्या संधी निर्माण होत आहेत, याची ही नांदी आहे.

 

मित्रांनो ,

इंडस्ट्री ‘फोर पॉइंट ओ’ची क्रांती देखील आपल्या दरवाजापर्यंत येऊन ठेपली आहे. कालपर्यंत AI आणि AR-VR चे जे किस्से आपण सायन्स फिक्शन चित्रपटात पाहात होतो, ते आज आपल्या प्रत्यक्ष जीवनाचा भाग बनत आहेत. ड्रायव्हिंगपासून शस्त्रक्रियेपर्यंत रोबोटिक्स आता एक नवीन सर्वसामान्य बाब बनत आहे. ही सर्व क्षेत्रे भारताच्या युवा पिढीसाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी नवे मार्ग तयार करत आहेत. गेल्या वर्षांमध्ये भारताने आपले अंतराळ क्षेत्र खुले केले आहे, भारताने संरक्षण क्षेत्र खुले केले आहे, भारताने ड्रोनशी संबंधित धोरणांमध्ये खूप मोठे बदल केले आहेत. या सर्व निर्णयांमुळे देशातील जास्तीत जास्त युवा वर्गाला पुढे जाण्याची संधी मिळाली आहे.

 

मित्रांनो ,

भारताच्या विकास प्रवासामुळे हजारो युवा वर्गाला, आपल्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे लाभ होत आहेत याची आणखी एक बाजू आहे. आज जगातील लोकांना भारताला, भारताच्या ओळखीला, भारताच्या संस्कृतीला जाणून घेण्याची  इच्छा आहे. कोरोनाच्या काळात जगातील प्रत्येक देश आपल्या स्वतःच्या गरजांची पूर्तता करताना त्रासून गेला होता. मात्र, भारत आपल्या गरजांची पूर्तता करण्याबरोबरच इतर देशांना देखील मदत करत होता. 

साहजिकच जगात एक उत्सुकता निर्माण झाली की भारताचे असे कोणते संस्कार आहेत जे संकटाच्या काळातही सेवेचा संकल्प निर्माण करतात. भारताचे वाढते सामर्थ्य असो, भारताची जी-20 अध्यक्षता असो, या सर्वांमुळे भारताविषयीचे कुतूहल वाढत आहे. यामुळे आपले मानव्य शाखेचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अनेक संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. योगासारखे आपले विज्ञान, आपली संस्कृती, आपले उत्सव, आपले साहित्य, आपला इतिहास, आपला वारसा, आपल्या पद्धती, आपल्या पाककृती या सर्वांचीच चर्चा होऊ लागली आहे. प्रत्येकासाठी नवे आकर्षण निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे त्या भारतीय युवा वर्गाची मागणी देखील वाढू लागली आहे जे जगाला भारताविषयी सांगू शकतील, आपल्या वस्तू जगापर्यंत पोहोचवू शकतील. आज लोकशाही, समता आणि परस्परांविषयी आदर यांसारखी भारतीय मूल्ये जगासाठी मानवी मापदंड बनत आहेत. सरकारी मंचांपासून राजनैतिकतेपर्यंत अनेक क्षेत्रांपर्यंत भारतीय युवा वर्गासाठी सातत्याने नव्या संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. देशात इतिहास, वारसा आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्रांनी देखील युवा वर्गासाठी अनेक शक्यता तयार केल्या आहेत.

आज देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये आदिवासी संग्रहालये तयार होत आहेत. पीएम-संग्रहालयाच्या माध्यमातून स्वतंत्र भारताच्या विकास प्रवासाचे दर्शन घडत आहे. आणि तुम्हाला हे ऐकून देखील आनंद होईल की दिल्लीमध्ये ‘युगे युगीन भारत’ हे जगातील सर्वात मोठे वारसा संग्रहालय उभारले जाणार आहे. कला, संस्कृती आणि इतिहासाशी संबंधित युवा वर्गासाठी पहिल्यांदाच आपल्या आवडीचे रुपांतर व्यवसायात करण्याच्या इतक्या संधी निर्माण होत आहेत. याच प्रकारे आज जगात भारतीय शिक्षकांची वेगळी ओळख तयार झाली आहे. माझी जागतिक नेत्यांसोबत भेट होत असते, त्यांच्यापैकी अनेक जण आपल्या कोणत्या ना कोणत्या भारतीय शिक्षकांचे किस्से सांगत असतात आणि अतिशय अभिमानाने सांगत असतात.

भारताची ही ‘सॉफ्ट पॉवर’ भारतीय युवा वर्गाची यशोगाथा बनू शकते. यासाठी आपल्या विद्यापीठांना, आपल्या संस्थांना सज्ज व्हायचे आहे, आपली मानसिकता तयार करायची आहे. प्रत्येक विद्यापीठाला आपला स्वतःचा एक आराखडा तयार करावा लागेल, आपली उद्दिष्टे निश्चित करावी लागतील.

ज्यावेळी तुम्ही या संस्थेची 125 वर्षे साजरी कराल, त्यावेळी तुमची गणना जगातील आघाडीच्या मानांकनवाल्या विद्यापीठांमध्ये होण्यासाठी तुमच्या प्रयत्नांमध्ये वाढ करा. तुमच्याकडे भविष्यवेधी नवोन्मेष व्हावेत, जगातील सर्वोत्तम संकल्पना आणि नेते तुमच्या संस्थांमधून बाहेर पडावेत, यासाठी तुम्हाला सातत्याने काम करावे लागेल.

मात्र, इतक्या साऱ्या बदलांमध्ये तुम्ही लोक पूर्णपणे बदलून जाऊ नका. काही गोष्टी आहेत तशाच ठेवा मित्रांनो, नॉर्थ कॅम्पसमध्ये पटेल चेस्टचा चहा... नूडल्स... साऊथ कॅम्पसमध्ये चाणक्याज चे मोमोज... यांची चव बदलणार नाही हे देखील तुम्हाला सुनिश्चित करावे लागेल.

 

मित्रांनो ,

ज्यावेळी आपण आपल्या जीवनात एखादे उद्दिष्ट निर्धारित करतो, त्यावेळी सर्वात आधी आपल्याला आपले मन, आपला मेंदू सज्ज करावा लागतो. एका राष्ट्राची मानसिकता तयार करण्याची ही जबाबदारी त्याच्या शैक्षणिक संस्थांना पूर्ण करायची असते. आपली नवी पिढी भविष्यासाठी सज्ज असावी, आव्हानांना स्वीकारण्याची  आणि त्यांना तोंड देण्याची क्षमता असावी यासाठीचे शिक्षण, संस्थेचा दृष्टीकोन आणि मिशन यामुळेच शक्य होते.

दिल्ली विद्यापीठ आपला हा प्रवास पुढे नेत या संकल्पांना नक्कीच पूर्ण करेल, असा माझा विश्वास आहे. याबरोबरच तुम्हा सर्वांना... या शताब्दी वर्षाच्या प्रवासाची ज्या प्रकारे तुम्ही वाटचाल केली आहे तिला आणखी जास्त सामर्थ्याने, अधिक दिमाखदार पद्धतीने आणि आणखी जास्त स्वप्ने आणि संकल्प सोबत घेऊन सिद्धी प्राप्त करण्याचा मार्ग तयार करत पुढे जा, यश तुमच्या पायाशी लोळण घेऊ देत, तुमच्या सामर्थ्याने देशाची प्रगती होऊ दे, हीच कामना करत तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

धन्यवाद!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet extends One-Time Special Package for DAP fertilisers to farmers

Media Coverage

Cabinet extends One-Time Special Package for DAP fertilisers to farmers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 2 जानेवारी 2025
January 02, 2025

Citizens Appreciate India's Strategic Transformation under PM Modi: Economic, Technological, and Social Milestones