महामहीम
सन्माननीय महोदय,
भारताने आपल्या जी-20 अध्यक्षपदांतर्गत शाश्वत विकास आणि हवामान बदल या दोन्ही विषयांना मोठे प्राधान्य दिले आहे.
एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य याला आम्ही आमच्या अध्यक्षपदाचा आधार बनवला.
आणि एकत्रित प्रयत्नांतून अनेक विषयांवर एकमत मिळवण्यातही आम्ही यशस्वी झालो.
मित्रहो,
हवामान बदलामध्ये भारतासह ग्लोबल साउथच्या सर्व देशांचा खूपच कमी वाटा आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे, पण हवामान बदलाच्या दुष्परिणामांचा त्यांना खूप जास्त प्रमाणात सामना करावा लागत आहे.
साधन संपत्तीचा अभाव असला, तरी हे देश हवामान कृती साठी वचनबद्ध आहेत.
ग्लोबल साउथच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हवामान विषयक अर्थपुरवठा आणि तंत्रज्ञान आवश्यक आहे.
ग्लोबल साउथच्या देशांना अशी अपेक्षा आहे की, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी विकसित देशांनी त्यांना जास्तीतजास्त मदत करावी.
हे स्वाभाविकही आहे आणि न्याय्य देखील आहे.
मित्रहो,
2030 पर्यंत हवामान कृतीसाठी अनेक ट्रिलियन डॉलर्सचा हवामान वित्तपुरवठा आवश्यक आहे, यावर G-20 मध्ये सहमती झाली आहे.
हवामान वित्त पुरवठा, जो उपलब्ध, सहज मिळणारा आणि किफायतशीर असेल.
मला आशा आहे की यूएई चा क्लायमेट फायनान्स फ्रेमवर्क (हवामान वित्तपुरवठा चौकट) उपक्रम या दिशेने चालना देईल.
हानी आणि मालमत्ता नुकसान निधी कार्यान्वित करण्याबाबत काल घेण्यात आलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे भारत स्वागत करतो.
यामुळे कॉप 28 शिखर परिषदेत नवीन आशा निर्माण झाली आहे.
कॉप परिषदेत क्लायमेट फायनान्सशी संबंधित इतर विषयांवरही ठोस उपाय शोधले जातील, अशी आम्हाला आशा आहे.
प्रथम, कॉप-28 मध्ये क्लायमेट फायनान्सवरील नवीन सामूहिक प्रमाणबद्ध उद्दिष्टांबाबत खरी प्रगती होताना दिसेल.
दुसरे, हरित हवामान निधी आणि अनुकूलन निधीमध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही, या निधीची त्वरित पुन्हा भरपाई केली जाईल.
तिसरे, बहुपक्षीय विकास बँका विकासासाठी तसेच हवामान कृतीसाठी परवडणारा वित्तपुरवठा करतील.
आणि चौथे, विकसित देश 2050 पूर्वी त्यांचे कार्बन उत्सर्जन निश्चितपणे संपवतील.
युएई च्या हवामान गुंतवणूक निधी स्थापन करण्याच्या घोषणेचे मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.
खूप खूप धन्यवाद!
धन्यवाद.