हर हर महादेव
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय आरोग्य मंत्री श्री मनसुख मांडविया जी, उपमुख्यमंत्री श्री बृजेश पाठक जी, विविध देशांचे आरोग्य मंत्री, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक, उपस्थित सर्व मान्यवर तसेच ‘स्टॉप टीबी पार्टनरशिप’ सह विविध संस्थांचे प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो..
माझ्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे, की ही ‘वैश्विक टीबी शिखर परिषद” वाराणसी इथं होत आहे. सौभाग्याने, मी काशीचा खासदार देखील आहे. काशी नागरी, एक असा शाश्वत प्रवाह आहे, जो हजारो वर्षांपासून मानवतेचे प्रयत्न आणि परिश्रमाचा साक्षीदार राहिला आहे. आव्हान कितीही मोठे का असेना, जेव्हा सर्वांचे एकत्रित प्रयत्न असतात, तेव्हा नवा मार्ग देखील नक्की निघतो, याचीही साक्ष ही काशी नगरी देत असते. मला विश्वास आहे, टीबी सारख्या आजारांविरोधात, आपल्या जागतिक संकल्पांना काशी एक नवी ऊर्जा देईल.
मी, ‘वन वर्ल्ड टीबी समिट’ (वैश्विक क्षयरोग निर्मूलन परिषद) मध्ये देशविदेशातून आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत करतो, त्यांचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
एक देश म्हणून भारताच्या विचारधारेचे प्रतिबिंब, ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेतून प्रकट होत असते. हा प्राचीन विचार, आज आधुनिक जगाला, एक एकात्मिक दृष्टिकोन देत आहे, एकात्मिक समाधान देत आहे. आणि म्हणूनच, जी-20 चा अध्यक्ष म्हणून भारताने या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना देखील, ‘एक देश, एक कुटुंब, एक भविष्य’ अशी ठेवली आहे. ही संकल्पना, एक कुटुंब या स्वरूपात, संपूर्ण विश्वाचा एक सामाईक भविष्य म्हणून संकल्प मांडणारी आहे. आणि आता, ‘वैश्विक क्षयरोग शिखर परिषदेच्या’ माध्यमातून, जागतिक कल्याणाचा आणखी एक संकल्प आपण पूर्ण करत आहोत.
मित्रांनो,
2014 नंतर भारताने ज्या नव्या विचार आणि दृष्टिकोनासह टीबी च्या विरुद्ध काम करण्यास सुरुवात केली, टो खरोखरच अभूतपूर्व आहे. भारताचे हे प्रयत्न, आज संपूर्ण जगाने यासाठीही समजून घेतले पाहिजेत, कारण क्षयरोगाविरुद्धच्याअ जागतिक लढ्याचे हे एक नवे मॉडेल आहे. गेल्या नऊ वर्षात, भारताने टीबी च्या विरुद्ध या लढाईत अनेक आघाड्यांवर एकत्रित काम केले आहे. जसे की लोकसहभाग, पोषाहार वाढवण्यासाठी विशेष अभियान, उचारांममध्ये अभिनव रणनीतीचा अवलंब, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि सुदृढ निरामय आयुष्य आणि रोग प्रतिबंधनाला दिलेले महत्त्व, यासाठी फिट इंडिया, खेलो इंडिया आणि योगाभ्यास यासारखे अभियान.
मित्रांनो,
क्षयरोगाविरुद्धच्या या लढ्यात, भारताने जे खूप मोठे काम केले आहे टे आहे लोकसहभाग. भारताने कसे हे विशेष अभियान राबवले, हे समजून घेणे, आज इथे आलेल्या पाहुण्यांसाठी अतिशय रोचक ठरेल.
मित्रांनो,
आम्ही ‘टीबी मुक्त भारत’ अभियानात सहभागी होण्यासाठी, देशातील लोकांना, ‘नि:क्षय मित्र’ होण्याचे आवाहन केले होते.या अभियानानंतर सुमारे 10 लाख क्षयरोग्यांना देशातील सर्वसामान्य लोकांनी दत्तक घेतले आहे. आपल्याला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल,की 10-12 वर्षांची मुले देखील, ‘नि:क्षय मित्र’ बनून क्षयरोगाविरुद्धची लढाई पुढे नेत आहे. अनेक मुले अशीही आहेत, ज्यांनी आपली ‘पिगीबैंक’ तोडत क्षयरोगाच्या रुग्णांना दत्तक घेतले आहे. क्षयरोगाच्या रुग्णांसाठी या ‘नि:क्षय मित्रांची आर्थिक मदत, एक हजार कोटी रुपयांपेक्षा वर पोहोचले आहेत. क्षयरोगाविरुद्ध जगभरात एक खूप मोठा सामुदायिक उपक्रम राबवणे, हे देखील अत्यंत प्रेरणादायक आहे. मला अतिशय आनंद आहे, की परदेशात राहणारे अनिवासी भारतीय देखील मोठ्या संख्येने या प्रयत्नांचा भाग बनले आहेत. आणि मी तुमचेही आभार मानतो, आज आपण वाराणसीच्या पाच लोकांसाठी घोषणा केली आहे.
मित्रांनो,
‘नि:क्षय मित्र’ या अभियानाने एका मोठ्या आव्हानाचा सामना करतांना टीबी च्या रुग्णांना खूप मदत केली आहे. हे आव्हान यह – क्षयरोगाच्या रुग्णांचे पोषण, त्यांचा पोषक आहार. हे लक्षात घेऊन, 2018 साली आपण क्षयरोग्यांना आर्थिक मदत म्हणून आम्ही थेट लाभ हस्तांतरणाची घोषणा केली होती. तेव्हापासून आतापर्यंत क्षयरोग्यांसाठी, सुमारे 2 हजार कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. सुमारे, 75 लाख रुग्णांना त्याचा लाभ मिळाला आहे. आता नि:क्षयमित्रांना मिळालेल्या शक्तीमुळे, क्षयरोगीना एक नवी ऊर्जा मिळाली आहे.
मित्रांनो,
जुन्या दृष्टिकोनानुसार वाटचाल करत, नवी फलनिष्पत्ती मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे. कोणीही क्षयरोगी, उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी आम्ही नव्या रणनीतीवर काम सुरु केले आहे. क्षयरोगाच्या रुग्णांच्या स्क्रीनिंगसाठी, त्यांच्या उपचारांसाठी आम्ही देशभरातील प्रयोगशाळांची संख्या वाढवली आहे. आम्ही आयुष्मान भारत योजनेशी त्यांना जोडले आहे. क्षयरोगाच्या मोफत तपासणीसाठी देखील आम्ही प्रयोगशाळांची संख्या वाढवली आहे. जिथे, क्षयरोग्यांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी आम्ही विशेष भर देत एक कार्ययोजना बनवली आहे.
आज याच मालिकेमध्ले आणखी एक मोठे कार्य म्हणजे 'क्षयमुक्त पंचायत'. या 'क्षयमुक्त पंचायत'मध्ये प्रत्येक गावातील निवडून आलेले लोकप्रतिनिधी एकत्र येऊन संकल्प करतील की आमच्या गावात एकही टीबी रुग्ण राहणार नाही. आम्ही त्यांना निरोगी ठेवू. आम्ही क्षयरोग प्रतिबंधासाठी सहा महिन्यांच्या कोर्सऐवजी केवळ 3 महिन्यांचे उपचार सुरू करत आहोत. पूर्वी रुग्णांना सहा महिने दररोज औषध घ्यावे लागत होते. आता नव्या प्रणालीमध्ये रुग्णाला आठवड्यातून एकदाच औषध घ्यावे लागणार आहे. म्हणजे रुग्णाला सुविधेतही वाढ होईल आणि त्याला औषधांमध्येही आराम मिळेल.
मित्रांनो,
भारत क्षयरोगमुक्त होण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करत आहे. आम्ही प्रत्येक क्षयरोग रुग्णाला आवश्यक असलेल्या काळजीचा पाठपुरावा करण्यासाठी नि:क्षय पोर्टल तयार केले आहे. यासाठी आम्ही डेटा सायन्सचाही अतिशय आधुनिक (अभिनव) पद्धतीने वापरही करत आहोत. आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआर यांनी संयुक्तपणे उप-राष्ट्रीय रोग पाळत ठेवण्यासाठी एक नवीन पद्धत तयार केली आहे. जागतिक स्तरावर जागतिक आरोग्य संघटनेव्यतिरिक्त असे मॉडेल बनवणारा भारत हा एकमेव देश आहे.
मित्रांनो,
अशाच प्रयत्नांमुळे आज भारतात टीबी रुग्णांची संख्या कमी होत आहे. आज इथे कर्नाटक आणि जम्मू-काश्मीरला टीबी मुक्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामासाठी पुरस्कारही देण्यात आले आहेत.
हे यश मिळवणाऱ्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. अशाच यशातून प्रेरणा घेत भारताने एक मोठा संकल्प केला आहे. क्षयरोगाचं उच्चाटन करण्याचं जागितक लक्ष्य 2030 साल हे आहे. भारत सध्या 2025 साला पर्यंत क्षयरोगाचं उच्चाटन करण्याच्या उद्दिष्टावर काम करत आहे. जगाच्या पाच वर्ष आधी, आणि एवढा मोठा देश, खूप मोठा संकल्प आहे. आणि हा संकल्प देशवासीयांच्या भरवशावर केला आहे. भारतात आम्ही कोविड काळात आरोग्य विषयक पायाभूत सुविधांची क्षमता वाढवली आहे. आम्ही ट्रेस (तपास), टेस्ट (चाचणी), ट्रॅक (शोध), ट्रीट (उपचार) आणि टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान) यावर काम करत आहोत. हे धोरण क्षयरोगा विरोधातल्या आमच्या लढ्यासाठीही खूप उपयोगी ठरत आहे. भारताच्या या स्थानिक दृष्टिकोनामध्ये प्रचंड जागतिक क्षमता आहे, ज्याचा आपल्याला एकत्रितपणे वापर करावा लागेल. आज, क्षयरोगावरील उपचाराची 80 टक्के औषधं भारतात बनवली जात आहेत. भारताच्या फार्मा कंपन्यांची ही क्षमता क्षयरोगा विरोधातल्या जागतिक मोहिमेची मोठी ताकद आहे. भारताच्या अशा सर्व अभियानांचा, सर्व नवोन्मेषाचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा, या सर्व प्रयत्नांचा लाभ जास्तीतजास्त देशांना मिळावा, असं मला वाटतं, कारण आम्ही जागतिक हितासाठी वचनबद्ध आहोत. या परिषदेत सहभागी आपण सर्व देश यासाठी एक यंत्रणा विकसित करू शकतो. मला विश्वास आहे, आमचा हा संकल्प नक्कीच पूर्ण होईल- होय, आम्ही क्षयारोगाला संपवू शकतो, ‘क्षयरोग हरेल, भारत जिंकेल’, आणि आपण जे सांगितलं- ‘क्षयरोग हरेल, जग जिंकेल’.
मित्रहो,
आपल्याशी संवाद साधताना मला अनेक वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. मला तो आपल्या सर्वांना सांगायचा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी कुष्ठरोग संपवण्यासाठी खूप काम केलं होतं, हे आपणा सर्वांना माहीत आहे. ते जेव्हा साबरमती आश्रमात राहत होते, तेव्हा त्यांना एकदा अहमदाबाद इथल्या एका कुष्ठरोग रूग्णालयाचं उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. गांधीजींनी तेव्हा लोकांना सांगितलं की मी उद्घाटन करायला येणार नाही. गांधीजींचं स्वतःचं एक वैशिष्ट्य होतं. म्हणाले, मी उद्घाटनाला येणार नाही. म्हणाले, मला तर त्या वेळी आनंद वाटेल, जेव्हा तुम्ही मला त्या कुष्ठरोग रुग्णालयाला कुलूप लावायला बोलवाल. तेव्हा मला आनंद होईल. म्हणजे, कुष्ठारोगाचं उच्चाटन करून त्यांना ते रुग्णालयच बंद करायचं होतं. गांधीजींच्या निधना नंतरही ते रुग्णालय अनेक दशकं असंच सुरु राहिलं. 2001 साली गुजरातच्या जनतेने जेव्हा मला सेवेची संधी दिली, तेव्हा माझ्या मनात हेच होतं की गांधीजींचं एक काम शिल्लक आहे, कुलूप लावायचं, चला, मीच थोडा प्रयत्न करतो. तेव्हा कुष्ठरोगा विरोधातल्या अभियानाला नवी गती दिली गेली. आणि परिणाम काय झाला? गुजरात मधला कुष्ठरोगाचा दर 23 टक्क्यावरून, 1 टक्क्याच्याही खाली आला. 2007 साली मी मुख्यमंत्री असताना, त्या कुष्ठरोग रुग्णालयाला कुलूप लागलं, रुग्णालय बंद झालं, गांधीजींचं स्वप्नं पूर्ण केलं. यामध्ये अनेक सामाजिक संघटनांनी, जनभागीदारीने महत्वाची भूमिका बजावली. आणि म्हणूनच क्षयरोगा विरोधातल्या भारताच्या यशाची मला पूर्ण खात्री आहे.
आजचा नवीन भारत, आपली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ओळखला जातो. भारताने उघड्यावरील शौचामुक्त होण्याची शपथ घेतली, आणि ती पूर्ण करून दाखवली. भारताने सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचं उद्दिष्टही वेळे आधीच पूर्ण करून दाखवलं. भारताने पेट्रोलमध्ये निर्धारित टक्केवारीच्या इथेनॉल मिश्रणाचं उद्दिष्टही ठरल्या वेळेपूर्वी साध्य करून दाखवलं आहे. जनभागीदारीचं हे सामर्थ्य, संपूर्ण जगाचा विश्वास संपादन करत आहे. क्षयरोगा विरोधातला भारताचा लढाही जे यश मिळवत पुढे वाटचाल करत आहे, त्यामागेही जनभागीदारीचीच ताकद आहे. होय, माझं आपल्याला एक आवाहनही आहे. क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये अनेकदा जागरूकतेचा अभाव दिसतो, कुठल्या ना कुठल्या जुन्या सामाजिक समजांमुळे ते, हा आजार लपवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यासाठी आपल्याला या रुग्णांना जास्तीतजास्त जागरूक करण्याकडेही तेवढंच लक्ष द्यावं लागेल.
मित्रहो,
काशीमध्ये गेल्या काही वर्षांत आरोग्य सेवेचा झपाट्याने विस्तार झाल्यामुळे, क्षयरोगासह विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांनाही त्याचा फायदा झाला आहे. आज या ठिकाणी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या वाराणसी शाखेची पायाभरणीही झाली. सार्वजनिक आरोग्य सर्वेक्षण युनिटचं कामही सुरू झालं आहे.
आज BHU मध्ये बाल संगोपन संस्था असो, रक्तपेढीचं आधुनिकीकरण असो, आधुनिक ट्रॉमा सेंटरची स्थापना असो, सुपर स्पेशालिटी ब्लॉक असो, बनारसच्या लोकांना याचा खूप लाभ मिळत आहे. पंडित मदन मोहन मालवीय कर्करोग उपचार केंद्रामध्ये आतापर्यंत सत्तर हजारापेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. या सर्वांना उपचारासाठी लखनौ, दिल्ली किंवा मुंबईला जायची गरज भासली नाही. त्याचप्रमाणे बनारसमध्ये कबीरचौरा रुग्णालय असो, जिल्हा रुग्णालय असो, डायलिसीस, सिटी स्कॅन सारख्या अनेक सुविधा वाढवण्यात आल्या आहेत. काशी क्षेत्रातल्या गावांमध्येही आरोग्य सुविधा विकसित केल्या जात आहेत. आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्सिजन प्लांट बनवले जात आहेत, ऑक्सिजन युक्त बेड उपलब्ध केले जात आहेत. जिल्ह्यात आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्र देखील अनेक सुविधांनी परिपूर्ण बनवली गेली आहेत. आयुष्मान भारत योजने अंतर्गत बनारसच्या दीड लाखापेक्षा जास्त नागरिकांनी रुग्णालयात भरती होऊन मोफत उपचार मिळवले आहेत. जवळजवळ सत्तर ठिकाणच्या जन औषधी केंद्रांमध्ये रुग्णांना स्वस्त औषधंही मिळत आहेत. या सर्व प्रयत्नांचा लाभ ईशान्य भारतातल्या नागरिकांना, बिहार मधून येणाऱ्या नागरिकांना सुद्धा मिळत आहेत.
मित्रहो,
क्षयरोग मुक्तीच्या अभियानात भारत आपला अनुभव, आपलं कौशल्य, आपल्या इच्छा शक्तीच्या बळावर काम करत आहे. भारत प्रत्येक देशा बरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठीही सदैव तत्पर आहे. क्षयरोगा विरोधातला आमचा लढा, सर्वांच्या प्रयत्नांनीच सफल होईल. मला विश्वास आहे, आजचे आपले प्रयत्न आपल्या सुरक्षित भविष्याचा पाया मजबूत करतील, आपल्याला आपल्या भावी पिढ्यांना एक अधिक चांगलं जग देता येईल. मी आपलाही खूप आभारी आहे. आपण भारताची एवढी प्रशंसा केली. मला निमंत्रण दिलं. मी आपले मनापासून आभार मानतो. हीच शुभ सुरुवात, आणि ‘जागतिक क्षयरोग दिना’ च्या दिवशी, याचं यश आणि दृढ संकल्पा सह पुढे जाण्यासाठी मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.
खूप खूप धन्यवाद!