Initiates funds transfer into bank accounts of more than 10 lakh women
Lays foundation stone and dedicates to the nation Railway Projects worth more than Rs 2800 crore
Lays foundation stone for National Highway Projects worth more than Rs 1000 crore
Participates in Griha Pravesh celebrations of 26 lakh beneficiaries of PMAY
Launches Awaas+ 2024 App for survey of additional households
Launches Operational Guidelines of Pradhan Mantri Awas Yojana – Urban (PMAY-U) 2.0
“This state has reposed great faith in us and we will leave no stone unturned in fulfilling people’s aspirations”
“During the 100 days period of the NDA government at the Centre, big decisions have been taken for the empowerment of the poor, farmers, youth and women”
“Any country, any state progresses only when half of its population, that is our women power, has equal participation in its development”
“Pradhan Mantri Awas Yojana is a reflection of women empowerment in India”
“Sardar Patel united the country by showing extraordinary willpower”

जय जगन्नाथ!

जय जगन्नाथ!

जय जगन्नाथ!

ओदिशाचे राज्यपाल रघुबर दास जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन मांझी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जुआल ओराम जी, धर्मेंद्र प्रधान जी, अन्नपूर्णा देवी जी, ओदिशाचे उपमुख्यमंत्री के. व्ही. सिंहदेव जी, श्रीमती प्रभाती परिडा जी, खासदार, आमदार, देशाच्या कानाकोपऱ्यातून आज आमच्यासोबत उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि ओदिशामधील माझ्या बंधू-भगिनींनो.

ओडिशा-रो प्रिय भाई ओ भौउणी मानंकु,

मोर अग्रिम सारदीय सुभेच्छा।

भगवान जगन्नाथाच्या कृपेने आज मला पुन्हा एकदा ओदिशाच्या पवित्र भूमीला भेट देण्याचे भाग्य लाभले आहे. भगवान जगन्नाथाची कृपा होते, भगवान जगन्नाथाच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो, तेव्हा भगवान जगन्नाथांच्या सेवेबरोबरच जनता जनार्दनाची सेवा करण्याचीही भरपूर संधी मिळते.

 

मित्रहो,

आज देशभरात गणेशोत्सव साजरा होत असून, गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. आज अनंत चतुर्दशीचा पवित्र सण सुद्धा आहे. आज विश्वकर्मा पूजाही होते. भारत हा जगातील एकमेव देश आहे, जिथे विश्वकर्माच्या रूपात श्रम आणि कौशल्याची पूजा केली जाते. मी सर्व देशवासियांना विश्वकर्मा जयंतीच्या सुद्धा शुभेच्छा देतो.

मित्रहो,

अशा पवित्र दिवशी मला ओदिशामधील माता-भगिनींसाठी सुभद्रा योजनेचा शुभारंभ करण्याची संधी मिळाली आहे. आणि महाप्रभूंच्या कृपेने ही योजना सुभद्रा मातेच्या नावाने सुरू झाली आहे आणि इंद्रदेव स्वतः आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. आज देशातील 30 लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना भगवान जगन्नाथाच्या भूमीपासून ते देशभरातील विविध गावांमधल्या लाखो कुटुंबांना पक्की घरे सुद्धा देण्यात आली आहेत. त्यापैकी 26 लाख घरे आपल्या देशातील गावांमध्ये आणि 4 लाख घरे आपल्या देशातील विविध शहरांमध्ये देण्यात आली आहेत. या ठिकाणी ओदिशाच्या विकासासाठी हजारो कोटी रूपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी सुद्धा झाली आहे. या निमित्ताने मी तुम्हा सर्वांचे, ओदिशामधील सर्व लोकांचे, सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो.

 

बंधू-भगिनींनो,

ओडिशामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले तेव्हा मी शपथविधीसाठी आलो होतो. त्यानंतरचा ही माझी पहिलीच भेट आहे. निवडणुका सुरू होत्या, तेव्हा मी तुम्हाला सांगितले होते की जर येथे दुहेरी इंजिनचे सरकार स्थापन झाले तर ओदिशा विकासाची नवी झेप घेईल. आपल्या ग्रामीण भागातील गरीब, दलित आणि आदिवासींनी, आपल्या वंचित कुटुंबांनी जी स्वप्ने पाहिली आहेत, आपल्या माता, भगिनी, मुली, महिलांनी जी स्वप्ने पाहिली आहेत, आपल्या तरुणांनी, आपल्या मुलींनी जी स्वप्ने पाहिली आहेत, आपल्या कष्टकरी मध्यमवर्गीयांनी जी स्वप्ने पाहिली आहेत, त्या सर्वांची सर्व स्वप्ने पूर्ण होतील, हा माझा विश्वास आणि महाप्रभूंचा आशीर्वाद आहे. आज तुम्ही पाहत आहात की आम्ही दिलेली आश्वासने अभूतपूर्व वेगाने पूर्ण होत आहेत. आम्ही म्हटले होते की सरकार स्थापन होताच जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडू. सरकार स्थापन होताच आम्ही भगवान जगन्नाथ मंदिर परिसराचे बंद दरवाजे उघडले. आम्ही सांगितल्याप्रमाणे मंदिराचे रत्न भांडारही उघडले. भाजप सरकार रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी काम करत आहे. आमचे मोहन जी, के. व्ही. सिंह देव जी, भगिनी प्रभाती परिडा जी आणि सर्व मंत्री, यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्वतः जनतेपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि यासाठी मी येथील माझ्या संपूर्ण टीमचे, माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून कौतुक करतो.

बंधू-भगिनींनो,

आजचा दिवस आणखी एका कारणासाठी खास आहे. केंद्रातील एनडीए सरकारला आज 100 दिवस पूर्ण होत आहेत. या काळात गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला शक्तीच्या सक्षमीकरणासाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. मागच्या 100 दिवसांत गरिबांसाठी 3 कोटी पक्की घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. युवा वर्गासाठी 2 लाख कोटी रुपयांचे पीएम पॅकेज मागच्या 100 दिवसांत जाहीर करण्यात आले आहे. युवा वर्गाला याचा खूप फायदा होईल. याअंतर्गत खासगी कंपन्यांमध्ये पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या युवा वर्गाचे पहिले वेतन सरकार देणार आहे. ओदिशासह संपूर्ण देशात 75 हजार नवीन वैद्यकीय जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी 25 हजार गावे पक्क्या रस्त्यांनी जोडण्याच्या आराखड्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. ओदिशामधल्या माझ्या गावांनाही याचा फायदा होईल. अर्थसंकल्पात आदिवासी मंत्रालयाच्या तरतुदीमध्ये जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे. देशभरातील सुमारे साठ हजार आदिवासी गावांच्या विकासासाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. मागच्या 100 दिवसांत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट पेन्शन योजनाही जाहीर करण्यात आली आहे. कर्मचारी, दुकानदार आणि मध्यमवर्गीय उद्योजकांचा आयकरसुद्धा कमी करण्यात आला आहे.

 

मित्रहो,

मागच्या 100 दिवसांत ओदिशासह संपूर्ण देशात 11 लाख नवीन लखपती दिदी तयार झाल्या आहेत. तांदूळ उत्पादक शेतकरी तसेच तेलबिया आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकताच मोठा निर्णय घेण्यात आला आहे. परदेशी तेलाच्या आयातीवर शुल्क वाढविण्यात आले आहे, जेणेकरून ते देशातील शेतकऱ्यांकडून जास्त दराने खरेदी करता येईल. याशिवाय बासमतीच्या निर्यातीवरील शुल्क कमी करण्यात आले आहे. त्यामुळे तांदळाच्या निर्यातीला चालना मिळेल आणि बासमती उत्पादक शेतकऱ्यांना जास्त फायदा होईल. खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. मागच्या 100 दिवसांमध्ये सर्वांच्या हितासाठी अशी अनेक मोठी पावले उचलण्यात आली आहेत.

मित्रांनो,

कोणताही देश, कोणतेही राज्य तेव्हाच प्रगती करते जेव्हा त्याच्या विकासात तिथल्या अर्ध्या लोकसंख्येचा म्हणजे आपल्या नारीशक्तीचा समान सहभाग असतो. म्हणूनच महिलांची प्रगती, महिलांचे वाढते सामर्थ्य हा ओदिशाच्या विकासाचा मूलमंत्र असणार आहे. येथे भगवान जगन्नाथ जी यांच्यासह देवी सुभद्राची उपस्थिती देखील आपल्याला तेच सांगत आहे आणि तीच शिकवण देत आहे. येथे मी सुभद्रा देवीचे रूप असलेल्या सर्व माता, भगिनी आणि कन्यांना नतमस्तक होऊन अभिवादन करतो. मला आनंद आहे की, भाजपच्या नव्या सरकारने आपल्या प्रारंभिक निर्णयांमध्ये आपल्या माता भगिनींना सुभद्रा योजनेची भेट दिली आहे. या योजनेचा लाभ ओदिशातील 1 कोटींपेक्षा जास्त महिलांना  होणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना एकूण 50,000 रुपये रक्कम दिली जाईल.

 

हे पैसे वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. ही रक्कम  माता भगिनींच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.मध्ये कुणीही दलाल नसेल, थेट तुमच्या खात्यात. भारतीय रिझर्व बँकेच्या डिजिटल चलनाच्या प्रायोगिक प्रकल्पाशी ही योजना संलग्न करण्यात आली आहे. हे डिजिटल चलन तुम्ही सर्व भगिनी मनात येईल तेव्हा डिजिटल पद्धतीने खर्च देखील करू शकाल. देशातील डिजिटल चलनाच्या अशा प्रकारच्या या पहिल्या योजनेत सहभागी झाल्याबद्दल मी ओदिशातील सर्व माता, भगिनी, मुली आणि महिलांचे अभिनंदन करतो. सुभद्रा जोजोना मा ओ भौउणी मानंकु सशक्त करू, मा सुभद्रांक निकट-रे एहा मोर प्रार्थना।

बंधू आणि भगिनींनो,

मला सांगण्यात आले आहे की, ओदिशातील प्रत्येक माता ,भगिनी आणि मुलीपर्यंत सुभद्रा योजना पोहोचवण्यासाठी संपूर्ण प्रदेशात अनेक यात्रा काढल्या जात आहेत. यासाठी माता-भगिनींना जागरूक केले जात आहे. योजनेशी संबंधित सर्व माहिती दिली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे भाजपचे लाखो कार्यकर्तेही या सेवा अभियानात पूर्ण ताकदीने सहभागी झाले आहेत. या जनजागृतीसाठी मी सरकार, प्रशासन तसेच भाजप आमदार, भाजप खासदार आणि भाजप पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांचे खूप-खूप अभिनंदन करतो.

 

मित्रांनो,

भारतातील महिला सक्षमीकरणाचे आणखी एक प्रतिबिंब म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. या योजनेमुळे अगदी छोट्या गावांमध्येही आता मालमत्ता महिलांच्या नावावर होऊ लागल्या आहेत. आजच येथे देशभरातील सुमारे 30 लाख कुटुंबांचा गृहप्रवेश करून देण्यात आला .आता तिसऱ्या कार्यकाळात आमचे सरकार स्थापन होऊन अवघे तीन महिनेच उलटले आहेत, इतक्या कमी कालावधीत 15 लाख नवीन लाभार्थ्यांना आज मंजुरी पत्रे देण्यात आली आहेत.10 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. हे पवित्र कार्य आम्ही ओदिशाच्या महाप्रभूंच्या पवित्र भूमीवरून केले आहे आणि ओदिशातील गरीब कुटुंबांचा मोठ्या संख्येने यात समावेश आहे. ज्या लाखो कुटुंबांना आज पक्के घर मिळाले आहे, किंवा पक्के घर मिळण्याचे निश्चित झाले आहे, त्यांच्यासाठी आयुष्याची ही नवी सुरुवात आहे, भक्कम सुरुवात आहे.

बंधू-भगिनींनो,

इथे येण्यापूर्वी मी आपल्या एका आदिवासी कुटुंबाच्या घरी त्यांच्या गृहप्रवेश सोहळ्यासाठी गेलो होतो. त्या कुटुंबाला देखील आपले नवीन घर पीएमआवास योजनेत मिळाले आहे. त्या कुटुंबाचा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान मी कधीच विसरू शकत नाही. त्या आदिवासी कुटुंबाने, माझ्या बहिणीने मला आनंदाने खीर खाऊ घातली! आणि खीर खाताना मला माझ्या आईची आठवण येणं साहजिक होतं, कारण माझी आई हयात असताना मी माझ्या वाढदिवसाला नेहमीच तिचा आशीर्वाद घ्यायला जायचो आणि माझी आई मला गूळ भरवायची. आज आई तर नाही, पण आज एका आदिवासी आईने मला माझ्या वाढदिवसाला खीर भरवून मला आशीर्वाद दिला. हा अनुभव, ही भावना माझ्या संपूर्ण आयुष्याची मिळकत आहे. गाव, गरीब, दलित, वंचित आणि आदिवासी समाजाच्या जीवनात होत असलेला हा बदल, त्यांचा हा आनंदच मला अधिक कष्ट करण्याची उर्जा देतो.

 

मित्रांनो,

विकसित राज्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी ओदिशाकडे आहेत. इथल्या तरुणांची प्रतिभा, महिलांचे सामर्थ्य, नैसर्गिक साधनसंपत्ती, उद्योगांच्या संधी, पर्यटनाच्या अफाट संधी, काय नाही  इथे? गेल्या दहा वर्षात केंद्रात असताना सरकारने सिद्ध करून दाखवले आहे की ओदिशाला आमचे किती प्राधान्य आहे. दहा वर्षांपूर्वी केंद्राकडून ओदिशाला जेवढा निधी मिळत होता, आज त्याच्या तिप्पट निधी मिळत आहे. मला आनंद आहे की, आता ओदिशात त्या योजना देखील राबवल्या जात आहेत ज्या पूर्वी राबवल्या जात नव्हत्या. आता ओदिशातील लोकांना देखील आयुष्मान योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराचा लाभ मिळेल. एवढेच नाही, तर आता केंद्र सरकारने 70 वर्षांवरील वृद्धांसाठीही पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले आहेत. तुमचे उत्पन्न कितीही असले तरी तुमच्या घरात जर 70 वर्षांवरील वृद्ध असतील, त्यांचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर त्यांच्या उपचाराची जबाबदारी मोदी घेतील. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींनी तुम्हाला हे आश्वासन दिले होते आणि मोदींनी ते आश्वासन पूर्ण करून दाखवले आहे.

मित्रांनो,

गरिबी विरोधात भाजपच्या मोहिमेचा सर्वात मोठा लाभ ओदिशात राहणाऱ्या दलित, वंचित आणि आदिवासी समुदायांना झाला आहे. आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती असो, आदिवासी समाजाला त्यांची पाळेमुळे असलेल्या जमिनी, वन हक्क देणे असो, आदिवासी तरुणांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी देणे असो किंवा ओदिशाच्या आदिवासी महिलेला देशाचे सन्माननीय राष्ट्रपतीपद देणे असो, हे काम पहिल्यांदा आम्हीच केले आहे.

 

मित्रांनो,

ओदिशात असे कित्येक आदिवासी क्षेत्र आणि आदिवासी समुदाय होते, जे पिढ्यानपिढ्या विकासापासून वंचित राहिले होते.

 

केंद्र सरकारने आदिवासींपेक्षाही मागास असलेल्या जनजातींसाठी प्रधानमंत्री जनमन योजना सुरू केली आहे. ओडिशामध्ये अशा 13 आदिवासी जमाती निश्चित करण्यात आल्या आहेत. जनमन योजनेअंतर्गत सरकार या सर्व समाजांपर्यंत विकास योजनेचे लाभ पोहोचवत आहे.

आदिवासी क्षेत्रांना सिकल सेल ऍनिमिया पासून मुक्त करण्यासाठी देखील अभियान चालवले जात आहे. गेल्या तीन महिन्यात या अभियाना अंतर्गत 13 लाखाहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आहे.

बंधू आणि भगिनींनो,

आज आपला देश पारंपरिक कौशल्यांचे संरक्षण करण्यावर देखील अभूतपूर्व रीतीने लक्ष केंद्रित करत आहे. आपल्या देशात शेकडो, हजारो वर्षांपासून लोहार, कुंभार, सोनार, मूर्तिकार अशी कामे करणारे लोक आहेत. अशा वेगवेगळ्या 18 व्यवसायांना लक्षात घेऊन, गेल्या वर्षी विश्वकर्मा दिवसाच्या निमित्ताने विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेवर सरकार 13 हजार कोटी रुपये खर्च करत आहे. या योजनेत आजवर 20 लाख लोकांनी आपले नाव नोंदवले आहे. या योजनेअंतर्गत विश्वकर्मा बंधू भगिनींना प्रशिक्षण दिले जात आहे. आधुनिक साधने खरेदी करण्यासाठी त्यांना हजारो रुपयांची मदत दिली जात आहे. सोबतच कोणत्याही हमी शिवाय कमी व्याजदराचे कर्ज बँकांकडून दिले जात आहे. गरिबांसाठी आरोग्य सुरक्षेपासून सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेपर्यंतची ही हमी, त्यांच्या आयुष्यात येत असलेले हे परिवर्तन, हीच विकसित भारताची खरी ताकद बनेल.

 

मित्रांनो,

ओदिशाला लांबच लांब समुद्रकिनारा लाभला आहे. इथे खूप मोठी खनिज संपदा आहे, खूप मोठी नैसर्गिक संपत्ती आहे. आपल्याला याच संसाधनांना ओदिशाचे सामर्थ्य बनवायचे आहे. येत्या पाच वर्षात आम्हाला ओदिशाच्या रस्ते आणि रेल्वेच्या संपर्क सुविधेला नव्या उंचीवर स्थापित करायचे आहे. आज देखील येथे रेल्वे आणि रस्त्या संबंधित अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले आहे. आज मला लांजीगड रोड - अंबोदला - डोइकालू रेल्वे मार्ग देशाला समर्पित करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. लक्ष्मीपूर रोड - सिंगाराम - टिकरी रोड रेल्वे मार्ग देखील राष्ट्राला समर्पित केला जात आहे. यासोबतच, ढेंकनाल - सदाशिवपुर - हिंडोल रोड रेल्वे मार्ग देखील राष्ट्राला समर्पित केला जात आहे. पारादीपची संपर्क सुविधा सुधारण्यासाठी देखील आज अनेक कामे सुरू झाली आहेत. मला जयपुर - नवरंगपूर या नव्या रेल्वे मार्गाची पायाभरणी करण्याचे देखील सौभाग्य लाभले आहे. या प्रकल्पामुळे ओदिशातील युवकांसाठी मोठ्या संख्येने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. तो दिवस दूर नाही, जेव्हा पुरी पासून कोणार्क पर्यंतच्या रेल्वे मार्गावर देखील जलद गतीने काम सुरू होईल. लवकरच ओदिशाला हायटेक ‘नमो भारत रॅपिड रेल’ देखील मिळणार आहे. या आधुनिक पायाभूत सुविधांमुळे ओदिशासाठी संधींची नवी कवाडे खुली होणार आहेत.

मित्रांनो,

आज 17 सप्टेंबर या दिवशी देश हैदराबाद मुक्ती दिवस देखील साजरा करत आहे. स्वातंत्र्यानंतर आपला देश ज्या स्थितीत होता, विदेशी सत्ताधारी ज्याप्रमाणे देशाला अनेक तुकड्यात विभाजित करण्याची मनिषा बाळगून होते. संधीसाधू लोक ज्याप्रमाणे सत्ता हस्तगत करण्यासाठी देश तुकड्यात विभाजित करायला तयार झाले होते. त्या परिस्थितीत सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेतला. अनन्यसाधारण इच्छाशक्ती दाखवत त्यांनी देशाला एका सुत्रात बांधले. हैदराबादमध्ये भारत विरोधी कट्टरपंथी ताकदींना वेसण घालून 17 सप्टेंबर या दिवशी सरदार पटेल यांनी हैदराबादला स्वातंत्र्य मिळवून दिले. म्हणूनच हैदराबाद मुक्ती दिवस, ही केवळ एक तारीख नाही. ती देशाच्या अखंडतेसाठी, राष्ट्राप्रती आपली कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी एक प्रेरणा देखील आहे.

 

मित्रांनो,

आजच्या या महत्त्वपूर्ण दिवशी आपल्याला त्या आव्हानांवरही लक्ष केंद्रित करायचे आहे, जी देशाची अवनती करण्यासाठी सज्ज आहेत. आज जेव्हा आपण गणपती बाप्पाला निरोप देत आहोत, तेव्हा मी याच्याशी संबंधित एका मुद्द्यावर बोलू इच्छितो. गणेश उत्सव, आपल्या देशासाठी केवळ आस्थेचा पर्वकाळ नाही. गणेशोत्सवाने आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. जेव्हा सत्तेची लालसा तृप्त करण्यासाठी इंग्रज देशाचे विभाजन करण्यात मग्न होते. देशाला जातींच्या नावावर झुंजवणे, समाजात विष कालवणे, ‘फुट पाडा आणि राज्य करा‘ हे इंग्रजांचे हत्यार बनले होते, तेव्हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरु करुन त्याद्वारे भारताचा आत्मा जागृत केला होता. उच्च नीच, भेदभाव, जात-पात या सर्वांना बाजूला सारून आपला धर्म एकमेकांशी बंधुभाव बाळगण्याची शिकवण देतो, गणेश उत्सव याचे प्रतीक बनला होता. आज देखील जेव्हा गणेश उत्सव होतो, प्रत्येक जण त्यामध्ये सहभागी होतो. कसलाही भेद नाही, कोणताही फरक नाही, संपूर्ण समाज एक शक्ती बनून, सामर्थ्यावान बनून उभा राहतो.

बंधू आणि भगिनींनो,

‘फुट पाडा आणि राज्य करा‘ या नीतीचे अनुसरण करून चालणाऱ्या इंग्रजांच्या नजरेत त्यावेळी देखील ‘गणेश उत्सव’ खटकत होता. आज देखील, समाजाला विभाजित करण्यात आणि खंडित करण्यात मग्न असलेल्या सत्तापिपासू लोकांना गणेश पूजनामुळे त्रास होत आहे. तुम्ही पाहिलेच असेल की, काँग्रेस आणि त्यांच्याशी संबंधित परिसंस्थेतील लोक गेल्या काही दिवसांपासून भडकलेले आहेत, कारण मी गणपती पूजेमध्ये सहभागी झालो होतो. इतकेच नव्हे तर कर्नाटक राज्यात, जिथे यांचे सरकार आहे, तिथे तर या लोकांनी आणखीनच मोठा अपराध केला. या लोकांनी भगवान गणेशाच्या प्रतिमेलाच गजाआड केले. याची छायाचित्रे पाहून संपूर्ण देश विचलित झाला. हे तिरस्कार पूर्ण विचार, समाजात विष कालवण्याची ही मानसिकता, हे आपल्या देशासाठी खूपच धोकादायक आहे. म्हणूनच अशा तिरस्कार पसरवणाऱ्या ताकदींना आपण रोखायचे आहे.

मित्रांनो,

आपल्याला एकमेकांच्या सोबतीने आणखी अनेक मोठी उद्दिष्टे साध्य करायची आहेत. आपल्याला ओदिशाला, आपल्या देशाला सफलतेच्या नव्या उंचीवर स्थापित करायचे आहे. ओड़िसा बासींकरो समर्थनो पाँईं मूँ चीरअ रुणी, मोदी-रो आस्सा, सारा भारत कोहिबो, सुन्ना-रो ओड़िसा. विकासाची ही गती भविष्यात आणखीन वाढेल याचा मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्यासोबत म्हणा…….

जय जगन्नाथ!

जय जगन्नाथ!

जय जगन्नाथ!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

खूप खूप धन्यवाद !

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi