माँ कामाख्या दिव्य लोकपरियोजनेचे केले भूमिपूजन
3400 कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक रस्ते सुधारणा प्रकल्पांची केली पायाभरणी.
क्रीडा आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी प्रकल्पांची केली पायाभरणी.
"कामाख्या मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होऊन आसाम हे ईशान्येकडील पर्यटनाचे प्रवेशद्वार बनेल"
"आपली तीर्थक्षेत्रे, मंदिरे आणि श्रद्धास्थाने ही आपल्या संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या प्रवासाच्या अमिट खुणा आहेत"
“लोकांचे जीवन सुलभ बनवण्याला सध्याच्या सरकारचे प्राधान्य ”
“केंद्र सरकार ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांच्या विकासासाठी नवीन योजना सुरू करणार”
"मोदींची हमी म्हणजे पूर्ततेची हमी"
"सरकार यावर्षी पायाभूत सुविधांवर 11 लाख कोटी रुपये खर्च करण्यासाठी वचनबद्ध"
दिलेल्या हमींची पूर्तता करण्यासाठी रात्रंदिवस काम करण्याचा मोदींचा निर्धार
"भारत आणि भारतीयांसाठी आनंदी आणि समृद्ध जीवन निर्माण करणे, भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवणे आणि 2047 पर्यंत भारताचे विकसित भा

भारत माता की जय!

भारत माता की जय!

आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया जी, मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, रामेश्वर तेली जी, आसाम सरकारचे मंत्री, खासदार आणि आमदार, विविध परिषदांचे प्रमुख आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!

आपूनालोक होको लू के मोर,

ऑन्तोरीक हुबेस्सा ज्ञापोन कोरिलू।

आज मला पुन्हा एकदा माता कामाख्याच्या आशीर्वादाने, आसामाच्या विकासाशी संबंधित प्रकल्प तुम्हाला सोपवण्याचे भाग्य लाभले आहे. काही वेळापूर्वीच येथे 11 हज़ार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले आहे. हे सर्व प्रकल्प, आसाम आणि  नॉर्थ ईस्ट बरोबरच, दक्षिण आशियामधील इतर देशांसोबत या भागाशी संपर्कव्यवस्थेला आणखी बळकट करतील. हे प्रकल्प आसाममध्ये पर्यटन क्षेत्रात नवे रोजगार निर्माण करतील आणि क्रीडा गुणवत्तेला देखील नवीन संधी देतील. ते वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य निगा केंद्राच्या रुपात देखील आसामच्या भूमिकेचा विस्तार करतील. मी आसाममधील, ईशान्येमधील माझ्या सर्व कुटुंबियांचे या प्रकल्पांबद्दल खूप खूप अभिनंदन करतो. मी काल संध्याकाळी येथे आलो, ज्या प्रकारे गुवाहाटीच्या लोकांनी रस्त्यावर येऊन स्वागत सन्मान केला आणि आबालवृद्ध सर्वच जण आम्हाला आशीर्वाद देत होते. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मी टीव्हीवर पाहिले की तुम्ही लोकांनी लाखो दिवे पेटवले होते. तुमचे हे प्रेम, तुमची ही आपुलकी, हा माझा सर्वात मोठा ठेवा आहे. तुमचा हा स्नेह, तुमचा आशीर्वाद मला सातत्याने ऊर्जा देत राहिले आहेत. मी तुम्हा सर्वांचे जितके आभार मानेन तितके कमी आहेत.

 

बंधू आणि भगिनींनो,

गेल्या काही दिवसात मला देशातील अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळाली आहे. अयोध्येतील भव्य आयोजनानंतर आता मी या ठिकाणी कामाख्याच्या दारी आलो आहे. आज मला येथे माता कामाख्या दिव्यलोक प्रकल्पाचे भूमीपूजन करण्याची संधी मिळाली आहे. या दिव्यलोकाची जी कल्पना करण्यात आली आहे, मला त्याबद्दल सविस्तर सांगण्यात आले आहे. ज्यावेळी हे तयार होईल, तेव्हा देशातील आणि जगभरातून येणाऱ्या मातेच्या भक्तांना असीम आनंदान भरून टाकेल. माता कामाख्या दिव्यलोक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दर वर्षी आणखी जास्त संख्येने भाविक येथे येतील आणि दर्शन घेऊ शकतील. आणि मी पाहात आहे की माता कामाख्याच्या दर्शनाला जितक्या जास्त संख्यने भाविक येतील तितक्या प्रमाणात संपूर्ण ईशान्येमध्ये हे पर्यटनाचे प्रवेशद्वार बनेल. जो कोणी येथे येईल, संपूर्ण ईशान्येच्या पर्यटनाच्या दिशेने वळेल. एका प्रकारे हे त्याचे प्रवेशद्वार बनणार आहे. इतके मोठे काम या दिव्यलोक प्रकल्पाशी जोडलेले आहे. मी हिमंता जी आणि त्यांच्या सरकारची या दिमाखदार प्रकल्पाबद्दल प्रशंसा करतो.     

मित्रहो,

आपली तीर्थक्षेत्रे, आपली मंदिरे, आपल्या श्रद्धेची ठिकाणे ही केवळ दर्शन करण्याचीच ठिकाणे आहेत, असे नाही आहे. आपल्या हजारो वर्षांच्या सभ्यतेच्या प्रवासाच्या या अमिट खुणा आहेत. भारताने प्रत्येक संकटाचा सामना करताना कशा प्रकारे स्वतःला अढळ राखले, त्याचे साक्षीदार आहेत. आपण पाहिले आहे की एके काळी ज्या सभ्यता खूप मोठ्या प्रमाणात समृद्ध असायच्या आज त्यांचे केवळ भग्नावशेष शिल्लक आहेत. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर ज्यांनी दीर्घ काळ सरकारे चालवली त्यांना देखील श्रद्धेच्या या पवित्र स्थानांचे महत्त्व लक्षात आले नाही. त्यांनी राजकीय फायद्यासाठी आपल्याच संस्कृतीबद्दल, आपल्या भूतकाळाबद्दल लाजिरवाणे होण्याचा एक कल तयार केला होता. कोणताही देश आपल्या भूतकाळाला अशा प्रकारे नष्ट करून, त्याचे विस्मरण करून आपली पाळेमुळे कापून कधीही विकसित होऊ शकत नाही. मात्र, गेल्या 10 वर्षात भारतात परिस्थिती बदलली आहे, याचे मला समाधान आहे. भाजपाच्या डबल इंजिन सरकारने विकास आणि वारसा यांना आपल्या धोरणाचा भाग बनवले आहे. याचे परिणाम आज आपल्याला आसामच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात देखील दिसत आहेत. आसाममध्ये श्रद्धा, अध्यात्म आणि इतिहासाशी संबंधित सर्व स्थानांना आधुनिक विकासाने जोडले जात आहे. वारशांचे संवर्धन करण्याच्या या अभियानासोबतच विकासाचे अभियान देखील तितक्याच वेगाने  सुरू आहे. गेल्या 10 वर्षांचा विचार केला तर आपल्या देशात विक्रमी संख्येने आम्ही महाविद्यालये उभारली आहेत, विद्यापीठे स्थापन केली  आहेत. पूर्वी मोठ्या संस्था केवळ मोठ्या शहरातच असायच्या.आम्ही आयआयटी, एम्स, आयआयएम सारख्या संस्थांचे जाळे संपूर्ण देशभरात विस्तारले आहे. गेल्या 10 वर्षात देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या जवळजवळ दुप्पट झाली आहे. आसाममध्ये भाजपा सरकारच्या आधी 6 वैद्यकीय महाविद्यालये होती, आज 12 वैद्यकीय महाविद्यालये आहेत. आसाम आज कर्करोगावरील उपचाराचे ईशान्य भागातील एक मोठे केंद्र बनू लागले आहे.

 

मित्रहो,

देशवासियांचे जीवन सुकर व्हावे, हा आमच्या सरकारचा प्राधान्यक्रम राहिलेला आहे. आम्ही 4 कोटींपेक्षा जास्त गरीब कुटुंबांसाठी पक्की घरे बनवली आहेत. आम्ही घरो-घरी पाणी, घरो-घरी वीज पोहोचवण्याचे अभियान देखील चालवले आहे. उज्ज्वला योजनेने आज आसामच्या लाखो भगिनी-कन्यांना धुरापासून मुक्ती दिली आहे. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत तयार झालेल्या शौचालयांमुळे लाखो भगिनी-कन्यांच्या प्रतिष्ठेचे रक्षण झाले आहे.

मित्रहो,

विकास आणि वारशावरील आम्ही लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याचा थेट लाभ देशातील युवा वर्गाला झाला आहे. आज देशात पर्यटन आणि तीर्थयात्रांविषयीचा उत्साह वाढत आहे. काशी कॉरिडॉर तयार झाल्यानंतर तिथे विक्रमी संख्येने भाविक येत आहेत. गेल्या एका वर्षात साडेआठ कोटी लोकांनी काशीला भेट दिली आहे. 5 कोटींपेक्षा जास्त लोकांनी उज्जैनमध्ये महाकाल महालोकचे दर्शन घेतले आहे. 19 लाखांपेक्षा जास्त लोकांनी केदारधामची यात्रा केली आहे. अयोध्या धाममध्ये प्राण प्रतिष्ठा होऊन काही दिवसच झाले आहेत. केवळ 12 दिवसात अयोध्येत 24 लाखांपेक्षा जास्त लोकांनी दर्शन घेतले आहे. माता कामाख्या दिव्यलोक तयार झाल्यानंतर येथे देखील आपल्याला असेच दृश्य दिसणार आहे.

 

मित्रहो,

ज्यावेळी तीर्थयात्री येतात, भाविक येतात, तेव्हा गरिबातील गरीबाची देखील कमाई होते. रिक्षावाला असो, टॅक्सीवाला असेल, हॉटेलवाले असोत, फेरीवाले असोत, सर्वांच्या उत्पन्नात वाढ होत असते. म्हणूनच या वर्षाच्या अर्थसंकल्पात आम्ही पर्यटनावर खूप भर दिला आहे. केंद्रातील भाजपा सरकार पर्यटनाशी संबंधित ऐतिहासिक स्थळांच्या विकासाकरिता नवीन अभियान सुरू करणार आहे.

आसाममध्ये, ईशान्येमध्ये तर यांच्या भरपूर संभावना आहेत. म्हणूनच भाजपा सरकार ईशान्येच्या विकासावर विशेष भर देत आहे.

मित्रहो,

गेल्या 10 वर्षात ईशान्य भागात विक्रमी संख्येने पर्यटक  आले आहेत. अखेर हे कसे काय घडले? पर्यटनाची ही केंद्रे, ईशान्येकडील हे सुंदर प्रदेश यापूर्वी देखील येथे होते. पण त्यावेळी इतके पर्यटक येथे येत नव्हते. हिसांचार होत असताना, साधने-संसाधने यांचा अभाव असताना, सोयीसुविधांचा अभाव असताना, शेवटी कोणाला येथे यायला आवडले असते? तुम्हाला ठाऊक आहेच की 10 वर्षांपूर्वी आसामसहित संपूर्ण ईशान्य भागात परिस्थिती कशी होती. संपूर्ण ईशान्य प्रदेशात रेल्वे प्रवास आणि हवाई प्रवासाच्या सुविधा अतिशय मर्यादित होत्या. रस्ते लहान होते आणि खराबही होते. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तर सोडूनच द्या, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ये-जा करण्यात देखील कितीतरी तास लागत होते. या सर्व परिस्थितीत आज भाजपाच्या डबल इंजिन सरकारने बदल घडवला आहे.

मित्रहो,

गेल्या 10 वर्षात आमच्या सरकारने येथे विकासावर होणाऱ्या खर्चात चौपट वाढ केली आहे. 2014 नंतर रेल्वे मार्गांची लांबी 1900 किलोमीटरपेक्षा जास्त करण्यात आली आहे. 2014 च्या तुलनेत रेल्वे अर्थसंकल्पात जवळ-जवळ 400 टक्के वाढ करण्यात आली आहे. आणि तेव्हा तर तुमच्या आसाममधून पंतप्रधान निवडून यायचे, त्यांच्यापेक्षा जास्त काम तुमचा हा सहकारी करतोय.

वर्ष 2014 पर्यंत इथे केवळ 10 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग होते. गेल्या 10 वर्षातच आम्ही 6 हजार किलोमीटरचे नवीन राष्ट्रीय महामार्ग बांधले आहेत. आज आणखी दोन नवीन रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे इटानगरपर्यंतची कनेक्टिव्हिटी अधिक चांगली होईल आणि तुम्हा सर्वांच्या अडचणी आणखी कमी होतील.

 

मित्रांनो,

मोदींची हमी म्हणजे हमी पूर्तीची हमी असे आज संपूर्ण देश म्हणत आहे. गरीब, महिला, तरुण, शेतकरी यांना मुलभूत सुविधा देण्याची हमी मी दिली आहे. आज यापैकी बहुतेक हमींची पूर्तता होत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेतही आपण हे अनुभवले आहे. सरकारी योजनांपासून वंचित राहिलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोदींचे हमी वाहन आले आहे. विकसित भारत संकल्प यात्रेत देशभरातील जवळपास 20 कोटी लोक थेट सहभागी झाले आहेत. या यात्रेचा लाभ आसाममधील लोकांनाही मोठ्या प्रमाणात मिळाला आहे.

मित्रांनो,

प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याची भाजपाच्या डबल इंजिन सरकारची बांधिलकी आहे. प्रत्येक नागरिकाचे जीवन सुसह्य व्हावे हा आमचा उद्देश आहे. 3 दिवसांपूर्वी सादर झालेल्या अर्थसंकल्पातही हे उद्दिष्ट प्रतीत होत आहे. अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत सुविधांवर 11 लाख कोटी रुपये खर्च करण्याचे आश्वासन दिले आहे. ही रक्कम किती मोठी आहे याचा अंदाज दुसऱ्या आकडेवारीवरून लावता येईल. 2014 पूर्वीच्या 10 वर्षांत, माझ्या बंधू आणि भगिनींनो, हा आकडा लक्षात ठेवा, 2014 पूर्वीच्या 10 वर्षांत पायाभूत सुविधांवरील एकूण अर्थसंकल्पीय तरतूद 12 लाख कोटी रुपये होती, 10 वर्षांत 12 लाख कोटी रुपये म्हणजे आपले सरकार पुढच्या एका वर्षात जवळपास तेवढाच खर्च करणार आहे जेवढा खर्च मागील केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षात केला होता. देशात किती मोठ्या प्रमाणावर बांधकामे होणार आहेत याची तुम्ही कल्पना करू शकता आणि जेव्हा एवढी मोठी रक्कम बांधकामात गुंतवली जाते तेव्हा नवीन रोजगार निर्माण होतात तसेच उद्योगांना नवी चालना मिळते.

मित्रांनो,

या अर्थसंकल्पात आणखी एका मोठ्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षात आम्ही प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याची मोहीम राबवली. आता आम्ही वीज बिलाबाबत काम करतोय, आसामच्या बंधू-भगिनींनो आणि देशवासीयांनो, मी तुम्हाला एक अतिशय महत्वपूर्ण गोष्ट सांगतोय ती म्हणजे, आता आम्ही वीज बिल शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नरत आहोत. अर्थसंकल्पात सरकारने छतावरील सौरऊर्जा प्रणालीसाठी खूप मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत सुरुवातीला एक कोटी कुटुंबांना छतावर सौरऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी सरकार मदत करेल. त्यामुळे त्यांचे वीज बिलही शून्य होईल आणि त्याच बरोबर सर्वसामान्य कुटुंबही त्यांच्या घरी वीज निर्मिती करून ती विकून पैसे कमावतील.

 

मित्रांनो,

देशातील 2 कोटी भगिनींना लखपती बनवण्याची हमी मी दिली होती. गेल्या काही वर्षांचा आढावा मी घेतल्यावर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आजपर्यंत आमच्या 1 कोटी भगिनी लखपती दीदी झाल्या आहेत. मित्रांनो, जेव्हा आपल्या देशातील स्वयंसहायता बचत गटामधील 1कोटी भगिनी लखपती दीदी बनतात, तेव्हा सर्वसामान्यांमध्ये किती आमूलाग्र परिवर्तन झालेले असते. आता या अर्थसंकल्पात आम्ही लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट आणखी व्यापक केले आहे. आता 2 कोटींऐवजी 3 कोटी भगिनींना लखपती दीदी बनवले जाईल. आसामच्या माझ्या हजारो-लाखो भगिनींना याचा नक्कीच फायदा होणार आहे. इथल्या बचतगटाशी निगडित सर्व भगिनींना संधीच संधी उपलब्ध होणार आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर इथे आलेल्या माता-भगिनींमध्ये, माझ्या लखपती दीदीही नक्कीच आलेल्या असतील. या अर्थसंकल्पात आपल्या सरकारने अंगणवाडी आणि आशा भगिनींनाही आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले आहे. त्यामुळे त्यांनाही आता 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळाली आहे. भगिनी -कन्यांचे जीवन सुसह्य करणारे सरकार असताना संवेदनशीलतेने काम केले जाते.

बंधू आणि भगिनींनो, 

मोदी जेव्हा हमी देतात तेव्हा त्याच्या पूर्ततेसाठी अहोरात्र काम करण्याची हिंमतही दाखवतात. त्यामुळेच आज ईशान्य प्रदेशाला मोदींच्या हमीवर विश्वास आहे. आसामचेच उदाहरण घेतले तर, वर्षानुवर्षे अशांत असलेल्या भागात आता चिरस्थायी शांतता प्रस्थापित होत आहे. राज्यांमधील सीमा विवाद सोडवला जात आहे. भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर येथे 10 हून अधिक मोठे शांतता करार झाले आहेत. गेल्या काही वर्षांत ईशान्येतील हजारो तरुणांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून विकासाचा मार्ग निवडला आहे. आसाममध्ये माझ्या पक्षाच्या संघटनेसाठी मी अनेक वर्षे काम केले आहे. मी एक अशी व्यक्ती आहे जिने इथल्या प्रत्येक भागात फिरताना अनेक अडथळ्यांचा जसे कि रस्ता रोको, बंद आणि गुवाहाटीमधील बॉम्बस्फोट सारख्या घटनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. आज तो भूतकाळ झाला आहे मित्रांनो, लोक शांततेने वावरत आहेत. आसाममधील 7 हजारांहून अधिक तरुणांनीही शस्त्रे म्यान केली असून देशाच्या विकासात एकमेकांसोबत काम करण्याचा संकल्प केला आहे. अनेक जिल्ह्यांमधून एएफएसपीए हटवण्यात आला आहे. हिंसाचारामुळे प्रभावित झालेली क्षेत्र आज त्यांच्या आकांक्षेनुसार विकसित होत आहेत आणि सरकार त्यांना पूर्ण सहकार्य करत आहे.

 

मित्रांनो,

कोणताही देश, कोणतेही राज्य छोटे उद्दिष्ट ठेवून वेगाने विकास साधू शकत नाही. याआधीच्या सरकारांनी मोठे लक्ष्य ठेवले नाही किंवा त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी कठोर परिश्रमही केले नाहीत. पूर्वीच्या सरकारांची ही विचारसरणीही आम्ही बदलली आहे. जग ज्या प्रकारे पूर्व आशियाकडे पाहते त्याच प्रकारे ईशान्येचा विकास होताना मला दिसत आहे. आज ईशान्येमुळे, दक्षिण आशिया आणि पूर्व आशिया यांच्यातील संपर्क सुविधा विस्तारत आहे. आज, दक्षिण आशिया उप-प्रादेशिक आर्थिक सहकार्याच्या अंतर्गत अनेक रस्त्यांच्या सुधारणांचे कामही सुरू झाले आहे. जरा कल्पना करा, जेव्हा असे सर्व कनेक्टिव्हिटी प्रकल्प पूर्ण होतील, तेव्हा हे क्षेत्र व्यापार-उद्योगाचे किती मोठे केंद्र बनेल. मला माहीत आहे की, पूर्व आशियासारखा विकास व्हावा हेच आसाम आणि ईशान्येतील प्रत्येक तरुणाचे स्वप्न आहे. मला आसाम आणि ईशान्येतील प्रत्येक तरुणाला सांगायचे आहे - माझ्या तरुण मित्रांनो, तुमचे स्वप्न, तुमचे स्वप्न मोदींचा संकल्प आहे. आणि तुमच्या स्वप्नपूर्तीत मोदी कोणतीही कसर ठेवणार नाहीत आणि ही मोदींची हमी आहे.

बंधू आणि भगिनींनो,

आज जी काही कामे सुरू आहेत, त्यांचे एकच ध्येय आहे. ते ध्येय म्हणजे भारत आणि भारतीयांसाठी सुखी आणि समृद्ध जीवन. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्याचे लक्ष्य आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये आसाम आणि ईशान्येचा मोठा वाटा आहे. या विकास प्रकल्पांसाठी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आता कामाख्या आईचा मोठा आशीर्वाद लाभणार आहे, खूप आशीर्वाद मिळणार आहे. आणि मित्रांनो म्हणूनच मी एका भव्य, दिव्य आसामचे चित्र साकारताना पाहतोय. तुमची स्वप्ने सत्यात उतरतील, हे आम्ही स्वतः अनुभवू याची मी तुम्हाला खात्री देतो. पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार. दोन्ही हात उंचावून माझ्यासोबत म्हणा – भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय!

खूप खूप धन्यवाद!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024

Media Coverage

Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 25 डिसेंबर 2024
December 25, 2024

PM Modi’s Governance Reimagined Towards Viksit Bharat: From Digital to Healthcare