मंचावर उपस्थित सर्व मान्यवर स्त्री आणि पुरूष गण !
आज आपले सर्वांचे प्रेरणास्रोत पूज्य बापू आणि लाल बहादूर शास्त्री जी यांची जन्मजयंती आहे. काल 1 ऑक्टोबर रोजी राजस्थानसह संपूर्ण देशाने स्वच्छतेबाबत एक खूप मोठा कार्यक्रम हाती घेतला. स्वच्छता अभियानाला लोकचळवळ बनवल्याबद्दल मी सर्व देशवासियांचे आभार मानतो.
मित्रहो,
पूज्य बापू, स्वच्छता, स्वावलंबन आणि सर्वसमावेशक विकासाचे समर्थक होते. मागील 9 वर्षांमध्ये बापूंची हीच मूल्ये देशाने अधिक व्यापक बनवली आहेत. आज चित्तौड़गढ़ मध्ये 7 हज़ार 200 कोटी रुपयांच्या ज्या प्रकल्पांचा शुभारंभ झाला आहे, त्यातही याचेच प्रतिबिंब आहे.
मित्रहो,
वायू आधारित अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी देशात गॅस पाइपलाइन नेटवर्क विस्तारण्याचे अभूतपूर्व अभियान सुरू आहे. मेहसाणा पासून भटिंडा पर्यंत गॅस पाइपलाइन टाकण्यात येत आहे. या पाइपलाइनच्या पाली-हनुमानगढ़ खंडाचे आज लोकार्पण करण्यात आलं आहे. यामुळे राजस्थानमध्ये उद्योगांचा विस्तार होईल, हजारो नवीन रोजगार निर्माण होतील. यामुळे आपल्या भगिनींच्या स्वयंपाक घरात पाईपद्वारे स्वस्त गॅस पोहोचवण्याच्या आमच्या अभियानाला गती मिळेल.
मित्रहो,
आज इथे रेल्वे आणि रस्त्यांशी संबंधित महत्वपूर्ण प्रकल्पांचे लोकार्पण देखील झाले. या सर्व सुविधांमुळे मेवाडमधील लोकांचे जीवन सुसह्य होणार आहे. येथे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. ट्रिपल आयटी (IIIT) च्या नवीन संकुलाच्या उभारणीमुळे शैक्षणिक केंद्र म्हणून कोटाची ओळख आणखी मजबूत होईल.
मित्रहो,
राजस्थान हे असे राज्य आहे ज्याला भूतकाळाचा वारसा देखील आहे, वर्तमानाचे सामर्थ्य देखील आहे आणि भविष्यातील संधी देखील आहेत. राजस्थानची ही त्रिशक्ती देशाचे सामर्थ्य देखील वाढवते. आता येथे नाथद्वारा पर्यटक माहिती आणि सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे जयपूरमधील गोविंददेव जी मंदिर, सीकरमधील खाटूश्याम मंदिर आणि राजसमंदमधील नाथद्वाराच्या पर्यटन सर्किटचा भाग आहे. यामुळे राजस्थानचा गौरवही वाढणार असून पर्यटन उद्योगालाही मोठा फायदा होणार आहे.
मित्रहो,
चित्तौडगढजवळील भगवान कृष्णाला समर्पित असलेले 'सांवालिया सेठ' मंदिर देखील आपल्या सर्वांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. दरवर्षी लाखो भाविक ‘सांवलिया सेठ’ जींच्या दर्शनासाठी येतात. व्यापाऱ्यांमध्येही या मंदिराला विशेष महत्त्व आहे.
मित्रहो,
भारत सरकारने स्वदेश दर्शन योजनेंतर्गत सांवलिया जी यांच्या मंदिरात आधुनिक सुविधा निर्मितीचे काम केले आहे. कोटय़वधी रुपये खर्चून येथे वॉटर लेझर शो, पर्यटन सुविधा केंद्र, अॅम्फी थिएटर, कॅफेटेरिया अशा अनेक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामुळे सांवलिया सेठच्या भक्तांची मोठी सोय होईल असा मला विश्वास आहे.
मित्रहो,
राजस्थानच्या विकासाला भारत सरकारचे मोठे प्राधान्य आहे. राजस्थानमधील द्रुतगती मार्ग, महामार्ग आणि रेल्वे यासारख्या आधुनिक पायाभूत सुविधांवर आम्ही अधिक लक्ष केंद्रित केले आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग असो, किंवा अमृतसर-जामनगर द्रुतगती मार्ग, हे राजस्थानमधील लॉजिस्टिकशी संबंधित क्षेत्राला आणखी बळ देणार आहेत. काही दिवसांपूर्वीच उदयपूर-जयपूर वंदे भारत रेल्वेगाडी सुरू झाली आहे. राजस्थान हे भारतमाला प्रकल्पाच्या सर्वात मोठ्या लाभार्थ्यांपैकी एक महत्त्वाचे राज्य आहे.
मित्रहो,
राजस्थानचा इतिहास आपल्याला वीरता, वैभव आणि विकास यांना एकत्र घेऊन पुढे जायला शिकवतो. आजचा भारतही याच संकल्पाने पुढे वाटचाल करत आहे. सर्वांच्या प्रयत्नाने आम्ही विकसित भारत घडवण्याचा प्रयत्न करत आहोत.
जो भाग , जो वर्ग पूर्वी वंचित आणि मागासलेला होता, आज त्यांच्या विकासाला देशाचे प्राधान्य आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षांपासून देशात आकांक्षी जिल्हा कार्यक्रम यशस्वीपणे सुरू आहे. या अभियानाअंतर्गत मेवाड आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांचाही विकास करण्यात येत आहे. आता केंद्र सरकारने हा कार्यक्रम आणखी एक पाऊल पुढे नेला आहे. आम्ही आता आकांक्षी तालुके आणि त्यांच्या जलद विकासावर लक्ष केंद्रित करत आहोत.
आगामी काळात या मोहिमेअंतर्गत राजस्थानमधील अनेक तालुके देखील विकसित केले जाणार आहेत. वंचितांना प्राधान्य देण्याच्या संकल्पाअंतर्गत केंद्र सरकारने व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमही सुरू केला आहे. इतकी वर्षे जी सीमावर्ती गावे शेवटची गावे मानली जात होती, ती गावे आता पहिली गावे मानून आम्ही त्यांचा विकास करत आहोत. राजस्थानच्या सीमावर्ती भागातील डझनभर गावांना याचा मोठा फायदा होणार आहे. अशा विषयांवर थोड्या अवधीनंतर मोकळ्या मैदानात अधिक तपशीलवार बोलणे अधिक समयोचित ठरेल, इथे तुम्हाला काही बंधने पाळावी लागतात , तर मी तिथे अनेक गोष्टी बोलेन. राजस्थानच्या विकासाचे आमचे संकल्प लवकर पूर्ण होवोत अशी इच्छा व्यक्त करत मी मेवाडच्या लोकांचे नवीन प्रकल्पांसाठी अभिनंदन करतो.
तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद।