भारत माता की जय !
भारत माता की जय !
भारत माता की जय !
तामीळनाडूचे राज्यपाल श्री. आर. एन. रवीजी, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिनजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, ज्योतिरादित्य सिंधिया जी आणि या मातीतील माझे सहकारी, एल. मुरुगन जी, तामीळनाडू सरकारमधील मंत्री, खासदार आणि आमदार, आणि तामीळनाडूतील माझ्या कुटुंबियांनो!
वणक्कम !
येनद तमिल कुड़ुम्बमे, मुदलिल उन्गल अणै वरक्कुम 2024 पुत्तांड नल वाल्थ-क्कल
2024 हे वर्ष सर्वांसाठी शांततापूर्ण आणि समृद्ध असावे अशा मनापासून शुभेच्छा. 2024 मध्ये माझा पहिला सार्वजनिक कार्यक्रम तामिळनाडूमध्ये होत आहे हे माझे भाग्य आहे. आजचे सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे विकास प्रकल्प तामिळनाडूची प्रगती बळकट करतील. रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, ऊर्जा आणि पेट्रोलियम पाईपलाईनच्या या प्रकल्पांसाठी मी तुमचे अभिनंदन करतो. यापैकी अनेक प्रकल्प प्रवास सुलभतेला चालना देतील आणि रोजगाराच्या हजारो संधी निर्माण करतील.
मित्रांनो,
तामीळनाडूतील अनेक लोकांसाठी 2023चे शेवटचे काही आठवडे कठीण होते. मुसळधार पावसामुळे आपण आपले अनेक सहकारी नागरिक गमावले. मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. पीडित कुटुंबांची स्थिती पाहून मला खूप दुःख झाले. या संकटाच्या काळात केंद्र सरकार तामिळनाडूच्या लोकांसोबत उभे आहे. राज्य सरकारला आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोत. काही दिवसांपूर्वीच आपण थिरू विजयकांत जी यांना गमावले. केवळ चित्रपटसृष्टीतच नव्हे तर राजकारणातही ते कॅप्टन होते. चित्रपटांमधील त्यांच्या कामाने त्यांनी लोकांची मने जिंकली. एक राजकारणी म्हणून त्यांनी नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य दिले. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. मी त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि चाहत्यांबद्दलही संवेदना व्यक्त करतो.
मित्रांनो,
आज जेव्हा मी येथे आहे, तेव्हा मला तामिळनाडूचे आणखी एक सुपुत्र डॉ. एम. एस. स्वामीनाथन जी यांचेही स्मरण होते. आपल्या देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या वर्षी आम्ही त्यांनाही गमावले.
येनद तमिल कुड़ुम्बमे,
स्वातंत्र्याचा अमृत काळ म्हणजे आगामी 25 वर्षे भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचे आहे. जेव्हा मी विकसित भारताबाबत बोलतो, तेव्हा त्यात आर्थिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही पैलूंचा समावेश होतो. म्हणूनच मला यात तामीळनाडूची विशेष भूमिका दिसते. तामिळनाडू हे भारताच्या समृद्धीचे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब आहे. तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा आणि ज्ञानाचा प्राचीन खजिना आहे. संत तिरुवल्लुवरपासून सुब्रमण्य भारतीपर्यंत अनेक संत, ज्ञानींनी अद्भुत साहित्य लिहिले आहे. या मातीने सी. व्ही. रमणपासून अनेक प्रतिभावान वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानातील विद्वान निर्माण केले आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी जेव्हा मी तामिळनाडूला येतो, तेव्हा मी एका नव्या उर्जेने भारून जातो.
येनद कुड़ुम्बमे,
तिरुचिरापल्ली शहरात, समृद्ध इतिहासाचे पुरावे जागोजागी दिसून येतात. येथे आपण पल्लव, चौल, पांड्य आणि नायक यांसारख्या विविध राजवंशांच्या सुशासनाचे प्रारुप पाहतो. माझे बरेच तामीळ मित्र आहेत, त्यांच्याशी माझे खूप जवळचे संबंध आहेत आणि मला त्यांच्याकडून तामीळ संस्कृतीबद्दलही बरेच काही शिकायला मिळाले आहे. मी जगात कुठेही गेलो तरी तामिळनाडूबद्दल बोलल्याशिवाय राहू शकत नाही.
मित्रांनो,
तामिळनाडूमधील सांस्कृतिक प्रेरणेचा देशाच्या विकास आणि वारशामध्ये सतत विस्तार होत राहावा, हा माझा प्रयत्न आहे. दिल्लीतील नव्या संसद भवनात पवित्र सेंगोलची स्थापना झाल्याचे तुम्ही पाहिलेच आहे. तामिळ परंपरेने संपूर्ण देशाला दिलेल्या सुशासनाच्या प्रारुपातून प्रेरणा घेण्याचा हा प्रयत्न आहे. काशी-तामिळ संगमम्, सौराष्ट्र-तामिळ संगमम् यासारख्या अभियानांचाही हाच उद्देश आहे. ही अभियाने सुरू झाल्यापासून देशभरात तामीळ भाषा आणि तामीळ संस्कृतीबद्दलचा उत्साह वाढला आहे.
येनद कुड़ुम्बमे,
भारताने गेल्या दहा वर्षांत आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. रस्ते-रेल्वे असो, बंदरे-विमानतळ असोत, गरीबांसाठी घरे असोत किंवा रुग्णालये असोत, आज भारत भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे. आज भारत जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आहे. आज संपूर्ण जगात भारत एक नवी आशा म्हणून उदयाला आला आहे. मोठे गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करत आहेत. आणि तामिळनाडूच्या लोकांनाही याचा थेट लाभ मिळत आहे. तामिळनाडू मेक इन इंडियाचा मोठा ब्रँड अॅम्बेसेडर बनत आहे.
येनद कुड़ुम्बमे,
आमचे सरकार राज्याच्या विकासातून देशाचा विकास साधण्याच्या मंत्रावर चालत आहे. मागच्या एका वर्षाच्या कालावधीत केंद्र सरकारच्या चाळीसहून अधिक वेगवेगळ्या मंत्र्यांनी 400 हून अधिक वेळा तामिळनाडूचा दौरा केला आहे. जेव्हा तमिळनाडूचा जलद विकास होईल तेव्हाच भारताचाही विकास जलद गतीने होईल. विकासाचे एक खूप महत्वपूर्ण माध्यम संपर्क सुविधा देखील आहे. यामुळे व्यापार, व्यवसायात देखील वृद्धी होईल तसेच लोकांना सुविधाही प्राप्त होतील. विकासाची हीच भावना आज आपण येथे तिरुचिरापल्लीमध्ये देखील पाहत आहोत. त्रिची आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलमुळे येथील क्षमता तीन पटीने वाढेल. यामध्ये पूर्व आशिया, मध्यपूर्व आणि जगातील इतर भागांपर्यंत त्रिचीची संपर्क सुविधा आणखी सशक्त होईल. तसेच त्रिचीसह परिसरातील मोठ्या क्षेत्रात गुंतवणुकीच्या, नव्या व्यापाराच्या नव्या संधी निर्माण होतील. या भागात शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन या क्षेत्रांना आणखी चालना मिळेल. येथील विमानतळाची क्षमता तर वाढली आहेच, सोबतच हे विमानतळ महामार्गाला जोडणाऱ्या एलिव्हेटेड मार्गामुळे देखील मोठी सोय होणार आहे. त्रिची विमानतळ संपूर्ण जगाला स्थानिक कला आणि संस्कृती, तमिळ परंपरांचा परिचय करून देईल यांचा मला आनंद आहे
येनद कुड़ुम्बमे,
आज तमिळनाडूची रेल्वे संपर्क सुविधा आणखी मजबूत बनवण्यासाठी 5 नवे प्रकल्प सुरू होत आहेत. यामुळे प्रवास आणि मालवाहतूक तर सोपी होईलच पण या क्षेत्रातील उद्योगांना, विज निर्मितीला देखील बळ मिळेल. आज ज्या रस्ते प्रकल्पांचे लोकार्पण झाले आहे, त्यामुळे श्रीरंगम, चिदंबरम, मदुराई, रामेश्वरम, वेल्लोर यासारखी महत्वपूर्ण ठिकाणे जोडली गेली आहेत. ही शहरे आपली धार्मिक आस्था, अध्यात्म आणि पर्यटनाची मोठी केंद्रे आहेत. यामुळे सामान्य नागरिकांसोबतच तीर्थाटन करणाऱ्या यात्रेकरुंची देखील मोठी सोय होणार आहे.
येनद कुड़ुम्बमे,
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारने बंदरांना अग्रस्थानी ठेवून विकास साधण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. समुद्र किनाऱ्यावरील पायाभूत सुविधांचा विकास आणि मच्छीमार बांधवांचे जीवन सुधारण्यासाठी आम्ही अनेक कामे केली आहेत. मत्स्योद्योगासाठी प्रथमच स्वतंत्र मंत्रालय स्थापित करण्यात आले, वेगळा अर्थसंकल्प देखील आम्ही सादर केला आहे. प्रथमच, मच्छीमार बांधवांना देखील किसान क्रेडिट कार्डची सुविधा देण्यात आली. मच्छीमारांना खोल समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या बोटींच्या आधुनिकीकरणासाठी देखील सरकार मदत करत आहे. पीएम मत्स्य संपदा योजनेमुळे मत्स्य व्यवसायाशी संबंधित बांधवांना खूप मोठी मदत मिळत आहे.
येनद कुड़ुम्बमे,
सागरमाला योजनेच्या माध्यमातून आज तमिळनाडूसह देशातील वेगवेगळ्या बंदरांना चांगल्या रस्त्यांनी जोडले जात आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे आज भारताची बंदर क्षमता आणि जहाजांच्या टर्नअराउंड कालावधीत खूपच सुधारणा झाली आहे. कामराज बंदर देखील आज देशातील सर्वात जलद गतीने विकसित होणाऱ्या बंदरांपैकी एक बंदर आहे. आमच्या सरकारने या बंदराची क्षमता जवळपास दुपटीने वाढवली आहे. आता जनरल कार्गो बर्थ-टू आणि कॅपिटल ड्रेजिंग च्या पाचव्या टप्प्याच्या उद्घाटनामुळे तामिळनाडूतून होणाऱ्या आयात निर्यातीला नवीन बळ मिळेल. यामुळे विशेष रूपाने ऑटोमोबाईल क्षेत्रातील तामिळनाडूच्या क्षमतांचा विस्तार होईल. तामिळनाडूच्या उद्योग क्षेत्राला, रोजगार निर्मितीला आण्विक अणुभट्टी आणि गॅस पाईपलाईनमुळे देखील चालना मिळेल
येनद कुड़ुम्बमे,
आज केंद्र सरकार तामिळनाडूच्या विकासासाठी या राज्यावर विक्रमी आकड्यात धन खर्च करत आहे. 2014 पूर्वीच्या 10 वर्षात केंद्र सरकारकडून राज्यांना सूमारे 30 लाख कोटी रुपये देण्यात आले होते. मात्र आमच्या सरकारने मागच्या दहा वर्षात राज्यांना 120 लाख कोटी रुपये दिले आहेत. 2014 पूर्वीच्या 10 वर्षांमध्ये तामिळनाडूला जितकी मदत केंद्र सरकारकडून मिळत होती त्याच्या अडीच पट मदत आमच्या सरकारने दिली आहे. पूर्वीच्या सरकारच्या तुलनेत आमच्या सरकारने तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठी तीन पट जास्त रक्कम खर्च केली आहे. तामिळनाडूमध्ये रेल्वे सेवा आधुनिक बनवण्यासाठी देखील आमचे सरकार पूर्वीच्या तुलनेत अडीच पट जास्त रक्कम खर्च करत आहे. आज तामिळनाडूमधील लाखो गरीब कुटुंबांना केंद्र सरकारकडून मोफत अन्नधान्य मिळत आहे, मोफत उपचार मिळत आहेत. आमच्या सरकारने पक्की घरे, शौचालय, नळ जोडणी, गॅस जोडणी यासारख्या अनेक सुविधा लोकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.
येनद कुड़ुम्बमे,
विकसित भारताच्या निर्मितीसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. तामिळनाडू मधील जनता आणि येथील युवाशक्तीच्या सामर्थ्यावर माझा दृढ विश्वास आहे. तमिळनाडूच्या युवकांमध्ये एका नव्या विचाराचा, नव्या उत्साहाचा उदय होत असल्याचे मी पाहत आहे. हाच उत्साह विकसित भारताची ऊर्जा बनेल. पुन्हा एकदा या विकास कार्यांसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
भारत माता की जय !
भारत माता की जय !
भारत माता की जय !
वणक्कम !