लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल जी, येथील खासदार आणि लक्षद्वीपच्या माझ्या सर्व कुटुंबियांनो ! नमस्कार !
एल्लावरकुम सुखम आण एन्न विशुसिकिन्नू
आज लक्षद्वीपमधील सकाळ पाहून मन प्रसन्न झाले. लक्षद्वीपचे सौंदर्य शब्दात मांडणे फार अवघड आहे. यावेळी मला अगत्ती, बंगारम आणि कवरत्ती येथे तुम्हा सर्व कुटुंबियांना भेटण्याची संधी मिळाली आहे. लक्षद्वीपचे भौगोलिक क्षेत्रफळ जरी लहान असले तरी लक्षद्वीपच्या लोकांचे हृदय समुद्राप्रमाणे विशाल आहे. तुमच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी भारावून गेलो आहे, मी तुमचे आभार मानतो.
एंडे कुडुंब-आन्गंगले,
स्वातंत्र्यानंतर अनेक दशके केंद्रात जी सरकारे होती , त्यांचे प्राधान्य केवळ त्यांच्या राजकीय पक्षाच्या विकासाला होते. जी दूर-सुदूरची राज्ये आहेत, सीमावर्ती भागात आहेत किंवा जी समुद्राच्या मधोमध आहेत, त्यांच्याकडे लक्ष दिले गेले नाही. गेल्या 10 वर्षांत आमच्या सरकारने सीमावर्ती भाग, समुद्राच्या टोकाकडील जो भाग आहे , त्या भागांना आम्ही प्राधान्य दिले आहे. भारतातील प्रत्येक प्रदेशाचे , प्रत्येक नागरिकाचे जीवन सुखकर करणे , त्यांना सुविधांशी जोडणे हे केंद्र सरकारचे प्राधान्य आहे. आज येथे सुमारे 1200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले. हे इंटरनेट, वीज, पाणी, आरोग्य आणि लहान मुलांच्या देखभालीशी संबंधित प्रकल्प आहेत. या सर्व विकास प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.
एंडे कुडुंब-आन्गंगले,
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारने लक्षद्वीपमधील लोकांचे राहणीमान सुलभ करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. येथे पीएम आवास योजना ग्रामीण 100 टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहचली आहे. प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत मोफत अन्नधान्य पोहोचत आहे, किसान क्रेडिट कार्ड आणि आयुष्मान कार्ड देण्यात आली आहेत. आयुष्मान आरोग्य मंदिर, आरोग्य आणि निरामयता केंद्र उभारण्यात आले आहे. सरकारी योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. डीबीटीच्या माध्यमातून केंद्र सरकार प्रत्येक लाभार्थीच्या बँक खात्यात थेट पैसे पाठवत आहे. यामुळे पारदर्शकता देखील आली आणि भ्रष्टाचार देखील कमी झाला. मी तुम्हाला विश्वास देतो, लक्षद्वीपच्या लोकांचे हक्क हिरावून घेणार्या कोणालाही सोडणार नाही.
एंडे कुडुंब-आन्गंगले,
2020 मध्ये, मी तुम्हाला हमी दिली होती की तुमच्यापर्यंत 1000 दिवसांमध्ये जलद इंटरनेट सुविधा पोहचेल. आज कोची-लक्षद्वीप सबमरीन ऑप्टिकल फायबर प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. आता लक्षद्वीपमध्येही इंटरनेट 100 पट अधिक वेगाने उपलब्ध होणार आहे. यामुळे सरकारी सेवा असो, उपचार असो, शिक्षण असो, डिजिटल बँकिंग असो, अशा अनेक सुविधा अधिक चांगल्या होतील. लक्षद्वीपमध्ये लॉजिस्टिक सेवांचे केंद्र बनण्याच्या क्षमतेला यामुळे बळ मिळेल. लक्षद्वीपमध्येही प्रत्येक घरात पाइपद्वारे पाणी पोहोचवण्याचे काम वेगाने सुरू आहे. खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारा नवीन प्रकल्प हे अभियान पुढे नेईल. या प्रकल्पामधून दररोज दीड लाख लिटर पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. त्याचे प्रायोगिक प्रकल्प सध्या कवरत्ती, अगत्ती आणि मिनिकॉय बेटावर उभारले गेले आहेत.
एंडे कुडुंब-आन्गंगले,
मित्रांनो, लक्षद्वीपला आल्यानंतर माझी भेट अली मानिकफान यांच्याशी झाली. त्यांच्या संशोधनाचा, त्यांच्या अभिनव शोधांचा या संपूर्ण प्रदेशाला खूप फायदा झाला आहे. 2021 साली अली मानिकफान यांना पद्मश्री सन्मान देण्याची संधी आम्हाला मिळाली ही आमच्या सरकारसाठी खूप आनंदाची बाब आहे. भारत सरकार इथल्या युवकांच्या पुढील शिक्षणासाठी , नवोन्मेषासाठी नवनवीन मार्ग आखत आहे. आजही येथील युवकांना लॅपटॉप मिळाले आहेत, मुलींना सायकली मिळाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी लक्षद्वीपमध्ये उच्च शिक्षण संस्था नव्हत्या. त्यामुळे येथील युवकांना शिक्षणासाठी बाहेर जावे लागायचे. आमच्या सरकारने आता लक्षद्वीपमध्ये उच्च शिक्षणासाठी नवीन संस्था सुरु केल्या आहेत. आंड्रोट आणि कदमत बेटांवर नवीन कला आणि विज्ञान महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. मिनिकॉयमध्ये नवीन पॉलिटेक्निक उभारण्यात आले आहे. याचा मोठा फायदा येथील विद्यार्थ्यांना होत आहे.
एंडे कुडुंब-आन्गंगले,
मित्रांनो, आमच्या सरकारने हज यात्रेकरूंच्या सोयीसाठी जे प्रयत्न केले आहेत, त्याचा लाभ लक्षद्वीपच्या लोकांनाही झाला आहे. हज यात्रेकरूंसाठी व्हिसाचे नियमही सोपे करण्यात आले आहेत. हजशी संबंधित बहुतांश प्रक्रिया आता डिजिटल झाली आहे. सरकारने महिलांना मेहरमशिवाय हजला जाण्याची परवानगीही दिली आहे. या सर्व प्रयत्नांमुळे उमराहला जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
एंडे कुडुंब-आन्गंगले,
आज भारत सीफूडच्या बाबतीतही जागतिक बाजारपेठेत आपला हिस्सा वाढवण्यावर भर देत आहे. याचा फायदा लक्षद्वीपलाही होत आहे. येथील ट्युना मासळी आता जपानला निर्यात केली जात आहे. इथे निर्यात दर्जाच्या मासळीसाठी अनेक संधी आहेत, ज्या येथील मच्छीमार कुटुंबांचे जीवन बदलू शकतात. इथे सी-विड शेतीशी संबंधित संधींचाही शोध घेतला जात आहे. लक्षद्वीपचा विकास करताना आमचे सरकार पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही याकडेही पूर्ण लक्ष देत आहे. बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणालीसह उभारलेला हा सौर ऊर्जा प्रकल्प अशाच प्रयत्नांचा एक भाग आहे. लक्षद्वीपचा हा पहिला बॅटरी समर्थित सौर ऊर्जा प्रकल्प आहे. त्यामुळे डिझेलपासून वीज निर्मिती करण्याची नामुष्की कमी होईल. यामुळे येथील प्रदूषण कमी होईल आणि सागरी परिसंस्थेवर कमीत कमी परिणाम होईल.
एंडे कुडुंब-आन्गंगले,
स्वातंत्र्याच्या अमृत काळात विकसित भारताच्या निर्मितीमध्ये लक्षद्वीपचीही मोठी भूमिका आहे. लक्षद्वीपला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर ठळकपणे आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. अलिकडेच पार पडलेल्या जी 20 बैठकीमुळे लक्षद्वीपला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे. स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत लक्षद्वीपसाठी गंतव्यस्थान-विशिष्ट प्रारुप आराखडा तयार केला जात आहे. आता लक्षद्वीपमध्ये दोन सर्वात स्वच्छ समुद्रकिनारे (ब्लू फ्लॅग बीच ) आहेत. मला सांगण्यात आले आहे की कदमत आणि सुहेली बेटांवर देशातील पहिला वॉटर व्हिला प्रकल्प उभारला जात आहे.
लक्षद्वीप आता क्रूझ पर्यटनासाठी एक प्रमुख ठिकाण बनत आहे. पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत जवळपास 5 पट वाढ झाली आहे. परदेशात जाण्यापूर्वी देशातील किमान 15 ठिकाणांना भेट देण्याचे आवाहन मी देशातील जनतेला केल्याचे तुमच्या लक्षात असेल. ज्यांना जगातील विविध देशांमधील बेटे पहायची आहेत आणि तेथील समुद्राने भारावून गेले आहेत, त्यांनी आधी लक्षद्वीप पाहावे असे मी त्यांना सांगू इच्छितो. मला विश्वास आहे की एकदा का इथले सुंदर समुद्रकिनारे त्यांनी पाहिले की ते दुसऱ्या देशात जायचे विसरून जातील.
एंडे कुडुंब-आन्गंगले,
मी तुम्हा सर्वांना विश्वास देतो की केंद्र सरकार जीवन सुलभता , प्रवास सुलभता , व्यवसाय सुलभता यासाठी शक्य ती सर्व पावले उचलत राहील. विकसित भारताच्या उभारणीत लक्षद्वीप सशक्त भूमिका बजावेल या विश्वासासह विकास प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.
तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार!