''भारताच्या इतिहासातला हा असा कालखंड आहे जेव्हा भारत प्रचंड मोठी झेप घेणार आहे''
''भारतासाठी हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे''
''आपल्यासाठी आपला स्वातंत्र्यलढा ही मोठी प्रेरणा आहे, तेव्हा राष्ट्रीय प्रयत्न एकाच उद्दिष्टाभोवती केंद्रित झाले होते, ते म्हणजे -स्वातंत्र्य ''
''तुमची उद्दिष्टे, तुमचे संकल्प यांचे ध्येय एकच असायला हवे - विकसित भारत
''संकल्पनेची( 'आयडिया ' -Idea ) सुरुवात ( आय 'I') स्वतःपासून होते, जसे इंडियाची सुरुवात '‘I’आय'पासून होते, विकासाच्या प्रयत्नांची सुरुवातही स्वतःपासून होते
''नागरिक, मग ते कुठल्याही भूमिकेत असो, जेव्हा स्वतःचे कर्तव्य बजावू लागतात, तेव्हा देश पुढे जाऊ लागतो''
''या देशाचे नागरिक म्हणून आपल्यासाठी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. आपल्यासमोर अमृत काळाची 25 वर्षे आहेत, आपल्याला दिवसाचे 24 तास काम करायचे आहे''
'' युवा शक्ती परिवर्तनाचे दूत आणि परिवर्तनाचे लाभार्थी दोन्ही ठरणार आहे ''
“प्रगतीचा रोडमॅप केवळ सरकार ठरवणार नाही तर देश ठरवणार आहे. सर्वांच्या प्रयत्नांतूनच विकसित भारताची उभारणी होणार आहे ''

नमस्कार!

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, धर्मेंद्र प्रधान जी, देशभरातील राज्यपाल, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, बंधू आणि भगिनींनो!

आजचा दिवस ‘विकसित भारत’च्या संकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘विकसित भारत’शी संबंधित ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल मी सर्व राज्यपालांचे विशेष अभिनंदन करतो. देशातील तरुणांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी उचलणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना तुम्ही एका व्यासपीठावर आणले आहे. शैक्षणिक संस्थांच्या भूमिकेमुळे वैयक्तिक विकास होतो आणि राष्ट्राची उभारणी वैयक्तिक विकासातून होते. भारत सध्या ज्या युगात आहे, त्या काळात वैयक्तिक विकासाची मोहीम अत्यंत महत्त्वाची बनली आहे. युवांचा आवाज कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

प्रत्येक देश त्याच्या इतिहासातील एक टप्पा अनुभवतो जेव्हा तो त्याच्या विकासाच्या प्रवासाला अनेक पट पुढे नेतो. हे त्या राष्ट्रासाठी ‘अमृत काळ’ (सुवर्ण युग) सारखे आहे. भारतासाठी हा ‘अमृत काळ’ आता आला आहे. भारताच्या इतिहासातील हा तो काळ आहे जेव्हा तो प्रचंड मोठी झेप घेणार आहे. आपल्या आजूबाजूला अशी असंख्य उदाहरणे आहेत की ज्यांनी ठराविक काळात अशी प्रचंड मोठी झेप घेतली आणि स्वतःचे रूपांतर विकसित राष्ट्रांमध्ये केले. म्हणूनच मी म्हणतो, आता भारताची वेळ आली आहे, हीच योग्य वेळ आहे. या ‘अमृत काळ’च्या प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग केला पाहिजे; आपण एक क्षणही गमावू शकत नाही.

मित्रांनो,

स्वातंत्र्यासाठीचा आपला प्रदीर्घ लढाही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्य हेच अंतिम उद्दिष्ट मानून, एका ध्येयाने, उत्साहाने आणि निर्धाराने आम्ही रणांगणात उतरलो तेव्हा आम्ही यशस्वी झालो. या काळात सत्याग्रहाचा, क्रांतीचा मार्ग असो, स्वदेशी जागृती असो किंवा सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांची जाणीव असो, हे सर्व प्रवाह एकत्रितपणे स्वातंत्र्य चळवळीला बळ देणारे ठरले. याच काळात बनारस हिंदू विद्यापीठ, लखनौ विद्यापीठ, विश्व भारती, गुजरात विद्यापिठ, नागपूर विद्यापीठ, अन्नामलाई विद्यापीठ, आंध्र विद्यापीठ, केरळ विद्यापीठ आणि इतर अनेक संस्थांनी राष्ट्राची चेतना बळकट करण्यात योगदान दिले. हा तो काळ होता जेव्हा तरुणांमध्ये स्वातंत्र्याविषयीची नवी जाणीव सर्व प्रवाहांमध्ये पसरली होती. स्वातंत्र्यासाठी समर्पित एक संपूर्ण पिढी उदयास आली. जे काही करायचे आहे ते स्वातंत्र्यासाठी केले पाहिजे आणि ते आता केले पाहिजे, अशी विचारधारा देशात निर्माण झाली. कोणी सूतकताई केली तर तीही स्वातंत्र्यासाठी. परदेशी मालावर कोणी बहिष्कार टाकला तर तोही स्वातंत्र्यासाठी. कुणी कविता म्हटली तर तीही स्वातंत्र्यासाठी. कुणी पुस्तकात किंवा वर्तमानपत्रात लिहिलं तर तेही स्वातंत्र्यासाठी. कुणी पत्रिका वाटल्या तर तेही स्वातंत्र्यासाठी.

 

त्याचप्रमाणे आज प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक संस्थेने, प्रत्येक संघटनेने मी जे काही करेन ते ‘विकसित भारत’साठीच व्हायला हवे, ही प्रतिज्ञा घेऊन पुढे जायला हवे. तुमची ध्येये, तुमच्या संकल्पांचे एकच उद्दिष्ट असले पाहिजे - ‘विकसित भारत’. एक शिक्षक या नात्याने, देशाला ‘विकसित भारत’चे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही काय करू शकता याचा विचार करा. एक विद्यापीठ म्हणून, भारताच्या वेगवान विकासासाठी तुम्ही काय करू शकता याचा विचार करा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तरी विचार करा की भारत विकसित होण्याच्या मार्गावर वेगाने वाटचाल करण्यासाठी काय आणि कसे केले जाऊ शकते?

मित्रांनो,

तुम्ही प्रतिनिधित्व करत असलेल्या शिक्षण संस्थांमधील तुमची भूमिका ही तरुणांची ऊर्जा या ध्येयाकडे वळवण्याची आहे. तुमच्या संस्थांमध्ये येणाऱ्या प्रत्येक तरुणाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे विचार विविधांगी असले तरी त्यांना ‘विकसित भारत’ उभारण्याच्या प्रवाहाशी जोडले गेले पाहिजे. तुम्ही सर्वांनी तुमच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत आणि विकसित भारत@2047 च्या दृष्टीकोनात योगदान देण्यासाठी चाकोरीबाहेरचा विचार करावा अशी माझी इच्छा आहे. देशातील प्रत्येक महाविद्यालय आणि विद्यापीठातील अधिकाधिक तरुण या मोहिमेत सामील व्हावेत यासाठी तुम्ही विशेष मोहिमा सुरू कराव्यात, नेतृत्व द्यावे आणि गोष्टी सोप्या भाषेत व्यक्त कराव्यात. विकसित भारत@2047 विभाग आज माय गव्ह वर सुरू करण्यात आला आहे. त्यात ‘विकसित भारत’ च्या दृष्टिकोनाशी संबंधित संकल्पनांचा एक विभाग आहे.'आयडिया' या शब्दाची सुरुवात 'आय' ने होत असल्याने, विभागाला व्यक्ती स्वतः काय करू शकतात त्या संकल्पनांची आवश्यकता आहे. 'आय' अक्षर जसे आयडियामध्ये पहिले येते तसेच ते इंडिया मधेही पहिले येते. याचा अर्थ असा की जर आपल्याला यश मिळवायचे असेल, ध्येय गाठायचे असेल आणि योग्य परिणाम घडवून आणायचे असतील तर हे सर्व आपल्या स्वतःपासून म्हणजे 'आय' पासून सुरू होते. या ऑनलाइन संकल्पना पोर्टलवर --माय गव्ह प्लॅटफॉर्म --वर पाच वेगवेगळ्या संकल्पनांसाठी सूचना दिल्या जाऊ शकतात.सर्वोत्कृष्ट 10 सूचनांसाठी पुरस्काराचीही तरतूद आहे.

मित्रांनो,

जेव्हा मी सूचनांबद्दल बोलतो तेव्हा तुमच्यासमोर विचारांची विस्तृत कक्षा आहे. आगामी काळात देशाचा कणा असणारी, नेतृत्व आणि दिशा देणारी पिढी घडवायची आहे. देशाच्या कल्याणाला प्राधान्य देणारी आणि आपले कर्तव्य सर्वात श्रेष्ठ मानणारी तरुण पिढी आपण देशासाठी तयार केली पाहिजे. आपण स्वतःला फक्त शिक्षण आणि कौशल्यापुरते मर्यादित ठेवू नये. नागरिक म्हणून आपणही देशातील नागरिकांना अहोरात्र जागृत कसे ठेवता येईल, या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. कॅमेरे लावलेले असले किंवा नसले तरी त्यांनी ट्रॅफिक सिग्नल चे नियम तोडू नयेत यासाठी समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. लोकांमध्ये अशी कर्तव्याची भावना असली पाहिजे की त्यांनी वेळेवर कार्यालयात पोहोचले पाहिजे आणि आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली पाहिजे. येथे जे काही उत्पादने घेतली जातात, त्यांचा दर्जा इतका उत्कृष्ट असावा की ग्राहकांना त्यावर 'मेड इन इंडिया' लेबल पाहून अभिमान वाटावा.

जेव्हा देशाचा प्रत्येक नागरिक मग तो कोणतेही काम करत असो, तो आपली कर्तव्ये चोखपणे बजावेल तेव्हा देशही आगेकूच करेल. आता नैसर्गिक संसाधनांशी संबंधित विषय आहे. जल संवर्धनाविषयी गांभीर्य वाढेल,वीज बचतीविषयी गांभीर्य वाढेल, भू मातेच्या संरक्षणासाठी रसायनांचा वापर कमी होईल, सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्याबाबत गांभीर्य वाढेल तेव्हा समाजावर,देशावर, प्रत्येक क्षेत्रावर मोठा सकारात्मक प्रभाव पडेल.अशा सकारात्मक प्रभावाची अनेक उदाहरणे मी आपल्याला देऊ शकतो.

 

ही छोटी-छोटी उदाहरणे आहेत हे आपणही मान्य कराल.मात्र यांचा प्रभाव बराच मोठा असतो. स्वच्छता लोक चळवळीला नवी उर्जा कशी देता येईल,यासाठीही आपल्या सूचना महत्वाच्या असतील. आधुनिक जीवनशैलीच्या दुष्परिणामांवर मात करत आपल्या युवा पिढीने कसे सामोरे जावे  यासाठीही आपल्या सूचना महत्वाच्या ठरतील. मोबाईलच्या जगाव्यतिरिक्त आपल्या युवकांनी बाहेरचे जगही पाहणे तितकेच आवश्यक आहे.  एक शिक्षक म्हणून असे अनेक विचार आपल्याला वर्तमान आणि भावी पिढीतही रुजवायचे आहेत.  आपल्या विद्यार्थ्यासाठी आपल्याला आदर्श ठरायचे आहे.देशाचे नागरिक जेव्हा देशहिताचा विचार करतील तेव्हा  एक बळकट समाज निर्माण होईल.  आपण हे जाणताच की ज्याप्रमाणे समाजमन असते त्याची झलक आपल्याला शासन-प्रशासनातही दिसून येते. शिक्षण क्षेत्राबद्दल बोलायचे  झाल्यास  त्याच्याशी संबंधित अनेक विषय आहेत.तीन-चार वर्षाच्या अभ्यासक्रमानंतर आपल्या शिक्षण संस्था प्रमाणपत्र देतात. पदवी देतात.मात्र  प्रत्येक विद्यार्थ्याकडे एखादे तरी कौशल्य असणे अनिवार्य आहे हे आपल्याला सुनिश्चित करायला नको  का, यासंदर्भातल्या चर्चा,याच्याशी संबंधित सूचनाच विकसित भारताचा मार्ग स्पष्ट करतील. म्हणूनच आपण  आपल्या परिसरात, प्रत्येक संस्थेत आणि राज्य स्तरावर या विषयांवर व्यापक मंथन प्रक्रियेच्या रूपाने  अशा चर्चा पुढे न्यायला हव्यात.

मित्रहो,

विकसित भारत निर्मितीचा हा अमृतकाळ म्हणजे परीक्षेच्या दिवसात  आपण जो पाहतो तसा काळ आहे. विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षेतल्या कामगिरीबद्दल आत्मविश्वास असतो मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ते कोणती कसर बाकी ठेवत नाही. प्रत्येक विद्यार्थी आपला जीव ओतून अभ्यास करतो, क्षण आणि क्षण त्या एकाच ध्येयासाठी वेचतात.जेव्हा परीक्षेची तारीख जाहीर होते तेव्हा असे वाटते संपूर्ण घराची परीक्षेची तारीख आली आहे.केवळ विद्यार्थी नव्हे अवघे घर एका शिस्तीत प्रत्येक काम करते. आपल्यासाठी देशाचे नागरिक म्हणून परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे.आपल्या समोर 25 वर्षांचा अमृत काळ आहे.आपल्याला चोवीस तास या अमृत काळ आणि विकसित  भारत उद्दिष्टांसाठी काम करायचे आहे. एक कुटुंब म्हणून  हे वातावरण तयार करणे ही आपणा सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे.

 

मित्रहो,

आज जगातली लोकसंख्या झपाट्याने वयस्कर होत आहे आणि भारत युवा शक्तीने सळसळत आहे.येत्या 25-30 वर्षांच्या काळात कामाचे वय असलेल्या लोकसंख्येच्या संदर्भात भारत अग्रेसर असेल असे तज्ञांचे मत आहे. म्हणूनच भारताच्या युवकांवर अवघ्या जगाचे लक्ष आहे.युवाशक्ती, परिवर्तनाचे दूत आहेत आणि परिवर्तनाचे लाभार्थीही आहेत.आज जे युवा महाविद्यालय आणि विद्यापीठात आहेत त्यांच्या करिअरची दिशेला ही 25 वर्षे  आकार देणारी ठरणार आहेत. हेच युवक नवे कुटुंब बनवणार आहेत, नवा समाज घडवणार आहेत. म्हणूनच विकसित भारत कसा असावा हे निश्चित करण्याचा सर्वात मोठा हक्क आपल्या युवा शक्तीचा आहे. हीच भावना बाळगत सरकार,विकसित भारताच्या कृती आराखड्याशी देशाच्या प्रत्येक युवकाला जोडू इच्छिते. विकसित भारत घडवण्याच्या नीती-रणनीती मध्ये युवकांचा आवाज मिसळू इच्छिते. आपण युवकांच्या सर्वात जास्त संपर्कात असता म्हणून आपणा सर्व मित्रांचे योगदान अतिशय महत्वाचे ठरणार आहे.

मित्रहो,

आपल्याला प्रगतीच्या ज्या पथदर्शी आराखड्यानुसार वाटचाल करायची आहे तो केवळ सरकार निश्चित करणार नाही तर देश निश्चित करेल. देशाच्या प्रत्येक नागरिकाचे यात योगदान असेल,सक्रीय भागीदारी असेल.सबका प्रयास म्हणजे लोक भागीदारी एक असा मंत्र आहे ज्याद्वारे मोठ-मोठे संकल्प पूर्णत्वाला जातात.स्वच्छ भारत अभियान असो,डिजिटल इंडिया अभियान असो, कोरोनाशी मुकाबला असो,व्होकल फॉर लोकल होण्याची बाब असो आपण सर्वांनी सबका प्रयास या मंत्राचे सामर्थ्य अनुभवले आहे. सबका प्रयास यातूनच विकसित भारत साकारला जाणार आहे. आपण सर्व विद्वान वर्ग,स्वतः देशाच्या विकासाच्या या दृष्टीकोनाला आकार देणारे लोक आहात,युवा शक्तीला उपयोगात आणणारे  लोक आहात.म्हणूनच आपणाकडून अपेक्षा अधिक आहेत. देशाचे भविष्य लिहिण्याचे हे महाअभियान आहे. आपली प्रत्येक सूचना विकसित भारत इमारतीची भव्यता अधिकच खुलवणार आहे. या कार्यशाळेसाठी आपणा सर्वाना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.आजपासून चळवळीचा जो प्रारंभ होत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की 2047 पर्यंत आपण विकसित भारत घडवू शकतो, सर्वजण मिळून घडवू शकतो. आजपासून यात्रेचा प्रारंभ होत आहे, नेतृत्व शिक्षणक्षेत्रातल्या धुरिणांकडे विद्यार्थ्यांकडे,  शिक्षण जगतातल्या संस्थांच्या हाती आहे आणि हा आपणातच देश घडवणाऱ्या आणि स्वतः लाही घडवणाऱ्या पिढीचा कालखंड आहे.या सर्वाना माझ्या खूप-खूप शुभेच्छा. धन्यवाद.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025

Media Coverage

India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 डिसेंबर 2024
December 24, 2024

Citizens appreciate PM Modi’s Vision of Transforming India