झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री चंपई सोरेन जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अर्जुन मुंडा जी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते , अन्य मान्यवर आणि झारखंडच्या बंधू आणि भगिनींनो, जोहार ! आज झारखंडला 35 हजार कोटी रुपयांहून अधिक योजनांची भेट मिळाली आहे. मी माझ्या शेतकरी बांधवांचे , माझ्या आदिवासी समाजातील लोकांचे आणि झाऱखंडच्या जनतेचे या योजनांसाठी खूप-खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आज इथे सिंद्री खत कारखान्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. सिंद्री इथला हा खत कारखाना सुरु करण्याचा मी संकल्प केला होता. ही मोदी की गॅरंटी' होती आणि आज ही गॅरंटी पूर्ण झाली आहे. मी 2018 मध्ये या खत निर्मिती कारखान्याची पायाभरणी करण्यासाठी आलो होतो. आणि आज केवळ सिंद्री कारखान्याची सुरुवात झाली नाही तर माझ्या देशातील, माझ्या झारखंडच्या युवकांसाठी रोजगाराच्या हजारो नव्या संधींची सुरुवात झाली आहे. या खत कारखान्याच्या लोकार्पणाबरोबरच आज भारताने स्वयंपूर्णतेच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. दरवर्षी भारतात जवळपास 360 लाख मेट्रिक टन युरियाची आवश्यकता असते . 2014 मध्ये जेव्हा आमचे सरकार स्थापन झाले तेव्हा देशात 225 लाख मेट्रिक टन युरियाचे उत्पादन होत होते. ही मोठी तफावत भरून काढण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणात युरियाची आयात करावी लागत होती.
म्हणून आम्ही देशाला युरियाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प केला. आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे गेल्या 10 वर्षात युरियाचे उत्पादन 310 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढले आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये आमच्या सरकारने रामागुंडम, गोरखपुर, बरौनी हे खत निर्मिती कारखाने पुन्हा सुरु केले. आता आज यात सिंद्रीचे नाव देखील जोडले गेले आहे. तालचेर खत कारखाना देखील पुढल्या दीड वर्षात सुरु होईल. आणि मला पूर्ण विश्वास आहे, देशातील जनतेवर विश्वास आहे की , त्याच्या उद्घाटनासाठी देखील मी नक्की येईन. या पाच कारखान्यांमुळे भारत 60 लाख मेट्रिक टनांहून अधिक युरियाचे उत्पादन करू शकेल. म्हणजेच भारत वेगाने युरियाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे केवळ परदेशी चलनाची बचत होणार नाही तर पैसे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी खर्च होतील.
मित्रांनो,
आजचा दिवस झारखंडमध्ये रेल्वे क्रांतीचा नवा अध्याय देखील लिहीत आहे. नवीन रेल्वे मार्गांचा प्रारंभ, विद्यमान रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण आणि इतर अनेक प्रकल्प आज इथे सुरु झाले आहेत. धनबाद-चन्द्रपुरा रेल्वेमार्गाच्या पायाभरणीमुळे या प्रदेशांमध्ये भूमिगत आगीपासून सुरक्षित एक नवा मार्ग उपलब्ध होईल. याशिवाय देवघर-दिब्रुगढ रेल्वे सुरु झाल्यामुळे बाबा वैद्यनाथचे मंदिर आणि माता कामाख्याचे शक्तिपीठ एकमेकांना जोडले जाईल. काही दिवसांपूर्वीच मी वाराणसीमध्ये, वाराणसी-कोलकाता-रांची द्रुतगती मार्गाची पायाभरणी केली. हा द्रुतगती मार्ग चतरा, हजारीबाग, रामगढ़ आणि बोकारो सह संपूर्ण झारखंडमध्ये वाहतुकीची गती अनेक पटीने वाढवणार आहे. याशिवाय शेतकरी बंधू -भगिनींना , मग ते पीक असो, आपल्या खाद्यान्नातला कोळसा असेल, आपल्या कारखान्यांमध्ये सिमेंट सारखे उत्पादन असेल, पूर्व भारताकडून देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवणे खूप सोयीचे होईल. या प्रकल्पांमुळे झारखंडची प्रादेशिक संपर्क व्यवस्था अधिक उत्तम होईल, इथल्या आर्थिक विकासालाही गती मिळेल.
मित्रांनो ,
गेल्या 10 वर्षांत आम्ही आदिवासी समुदाय, गरीब, युवक आणि महिलांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देऊन झारखंडसाठी काम केले आहे.
मित्रांनो,
आपल्याला 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. तुम्ही पाहिले असेल कालच अर्थव्यवस्थेसंदर्भात जी आकडेवारी आली आहे, ती खूपच उत्साहवर्धक आहे. भारताने सर्व अंदाजांपेक्षा उत्तम कामगिरी करत ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत 8.4 टक्क्यांचा विकास दर साध्य करून दाखवला आहे. भारताचे सामर्थ्य किती वेगाने वाढत आहे हे यावरून दिसून येते. हीच गती कायम राखत आपला देश विकसित बनेल. आणि विकसित भारतासाठी झारखंडला देखील विकसित बनवणे तितकेच आवश्यक आहे. केंद्र सरकार या दिशेने झारखंडला सहकार्य करत आहे. मला विश्वास आहे की भगवान बिरसा मुंडा यांची भूमी विकसित भारताच्या संकल्पांसाठी ऊर्जेचा स्रोत बनेल.
इथे मी अतिशय कमी शब्दांमध्ये माझे म्हणणे मांडून तुम्हाला धन्यवाद देऊन आता धनबादला जात आहे. तिथेही मोकळे मैदान असेल, वातावरण देखील तापलेले असेल. स्वप्ने देखील मजबूत असतील, संकल्प देखील मजबूत असतील आणि म्हणूनच मी लवकरात लवकर अर्ध्या तासात जाऊन तिथून झारखंडला देशाला आणखी अनेक गोष्टी सांगेन. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या सर्व योजनांसाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. जोहार।