Quoteमहाराष्ट्रातील पीएमएवाय-शहरी अंतर्गत पूर्ण झालेली 90,000 हून अधिक घरे राष्ट्राला केली समर्पित
Quoteसोलापूर येथील रे नगर गृहनिर्माण संस्थेच्या 15,000 घरांचे लोकार्पण
Quoteपीएम-स्वनिधीच्या 10,000 लाभार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यांचे वितरण
Quote"श्री राम यांच्या आदर्शांचे पालन करून आणि देशात प्रामाणिकपणाचे राज्य चालवून देशात सुशासन सुनिश्चित करण्यासाठी आमचे सरकार पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील"
Quote"हजारो कुटुंबांची स्वप्ने पूर्ण होतात आणि त्यांचे आशीर्वाद माझी सर्वात मोठी संपत्ती बनतात तेव्हा प्रचंड समाधान मिळते"
Quote"22 जानेवारीला राम ज्योती ही गरिबीचा अंधार दूर करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल"
Quote'श्रमाची प्रतिष्ठा','स्वावलंबी कामगार'आणि 'गरीबांचे कल्याण' हा सरकारचा मार्ग आहे
Quote"गरिबांना पक्के घर, शौचालय, वीज जोडणी, पाणी मिळायला हवे, अशा सर्व सुविधाही सामाजिक न्यायाची हमी आहेत"

महाराष्ट्राचे राज्यपाल  श्री रमेश बैंस जी, मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे जी, उप-मुख्‍यमंत्री देंवेंद्र फडणवीस जी, अजित दादा पवार जी, महाराष्ट्र सरकारमधील अन्य  मंत्रिगण, लोकप्रतिनिधी, श्री नरसय्या आडम  जी आणि सोलापूरच्या बंधू-भगिनींनो , नमस्‍कार!

पंढरपूरचा विठ्ठल आणि सिद्धेश्वर महाराज यांना मी नमस्कार करीत आहे. हा काळ आपल्या सर्वांसाठी भक्तिभावाने भारलेला आहे. 22 जानेवारीला तो ऐतिहासिक क्षण येणार आहे जेव्हा आपले प्रभू राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. आपल्या सर्वांच्या आराध्याचं दर्शन  तंबूत घेण्याची अनेक दशकांची जुनी वेदना आता दूर होणार आहे.

 

|

राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी मी काही संतांच्या मार्गदर्शनाखाली यमनियमांमध्ये आहे  आणि त्यांचे पालनही मी अत्यंत काटेकोरपणे करत आहे.  तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मला या 11 दिवसांत ती साधना करता यावी, जेणेकरून माझ्याकडून काही कमी राहू नये.  या पवित्र कार्यात  सहभागी होण्याची संधी ही तुमच्या आशीर्वादाची साक्ष आहे आणि  कृतज्ञ भावनेने मी तिथे जाणार आहे.

मित्रांनो,

माझ्या या अनुष्ठानाची  सुरुवात महाराष्ट्रातील नाशिकच्या पंचवटीच्या भूमीतून झाली, हाही योगायोगच म्हणावा लागेल...  रामभक्तीच्या या वातावरणात आज महाराष्ट्रातील 1 लाखाहून अधिक कुटुंबांचा गृहप्रवेश  होत आहे. आता मला सांगा, माझा आनंद अनेक पटींनी वाढणारच ना ? तुमच्याही आनंदात भर पडणार ना ? मला खूप आनंद होत आहे की महाराष्ट्रातील ही  1 लाखांहून  अधिक गरीब कुटुंबे 22 जानेवारी रोजी संध्याकाळी आपल्या  पक्क्या घरात राम ज्योती प्रज्वलित करतील. सर्वजण राम ज्योती प्रज्वलित करणार ? संध्याकाळी करणार ? संपूर्ण हिंदुस्तानात करणार ?

आता रामाच्या नावाने आपल्या मोबाईलचा फ्लॅशलाइट  चालू करा आणि राम ज्योतीचा संकल्प करा. आपण सर्वांनी  मोबाईलचा फ्लॅश चालू करा...प्रत्येकाने. ज्यांच्या  हातात मोबाईल आहे, त्यांनी सर्वांनी करा ...तिथे खूप दूरवर लोक आहेत...एवढ्या मोठ्या संख्येने लोक आले आहेत. फ्लॅश लाइटनंतर कळत आहे, एवढी मोठी गर्दी आहे. कृपया हात वर करून सांगा ... 22 तारखेला संध्याकाळी राम ज्योती प्रज्वलित करणार ? शाब्बास.

आज महाराष्ट्रातील विविध शहरांसाठी 2000 कोटी रुपयांच्या  7 अमृत प्रकल्पांचाही शुभारंभ करण्यात आला आहे.  मी सोलापूरच्या जनतेचे आणि महाराष्ट्रातील माझ्या बंधू भगिनींचे अभिनंदन करतो. आत्ताच मी माननीय मुख्यमंत्र्यांचे भाषण  ऐकत होतो, त्यांनी एक गोष्ट सांगितली की मोदीजींमुळे महाराष्ट्राचा गौरव  वाढत आहे. शिंदे साहेब, हे ऐकून तर आनंद होतोच   आणि राजकारण्याला होतोच. पण सत्य हे आहे की महाराष्ट्रातील लोकांच्या मेहनतीमुळे आणि तुमच्यासारख्या प्रगतिशील  सरकारमुळेच महाराष्ट्राचे नाव उंचावत आहे आणि यासाठी  संपूर्ण महाराष्ट्र अभिनंदनास पात्र आहे.

 

|

मित्रांनो, 

प्रभू रामाने नेहमी आपल्याला वचनाचे पालन करण्याची शिकवण दिली आहे. सोलापूरच्या हजारो गरिबांसाठी, हजारो  मजूर साथींसाठी जो संकल्प आम्ही घेतला होता, तो आज पूर्ण होत असल्याचा आनंद मला वाटत आहे.  पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकार्पण आज झाले आहे. आणि मी त्याची पाहणी केली ... मलाही वाटलं की  जर... मलाही लहानपणी अशा घरात राहण्याची संधी मिळाली असती तर ! या गोष्टी जेव्हा मी पाहतो तेव्हा मला खूप समाधान मिळते. हजारो कुटुंबांची स्वप्ने जेव्हा साकार होतात तेव्हा त्यांचा आशीर्वाद ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे.  जेव्हा मी या प्रकल्पाची पायाभरणी करायला आलो होतो तेव्हा मी तुम्हा सर्वांना ग्वाही  दिली होती की तुमच्या घरांच्या चाव्या देण्यासाठी मी स्वतः येईन. आज हे आश्वासन पूर्ण झालं. तुम्हाला माहीतच आहे, मोदींची  हमी म्हणजे ती पूर्ण होणारच याची खात्री. मोदीची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची संपूर्ण गॅरंटी. 

आता ही लाखो रुपयांची घरे तुमची मालमत्ता आहे. ज्या कुटुंबांना ही घरे मिळाली आहेत त्यांच्या अनेक पिढ्यांनी   बेघर म्हणून जगताना किती कष्ट झेलले आहेत, हे मी जाणतो.  या घरांसोबतच कष्टाचे हे  दुष्टचक्र खंडित होईल आणि तुम्ही जे सोसले आहे ते सर्व तुमच्या मुलांना सोसावे  लागणार नाही,असा विश्वास मला आहे.  22 जानेवारीला तुम्ही जी रामज्योत प्रज्वलित कराल ती तुमच्या सर्वांच्या जीवनातून गरिबीचा अंधार दूर करण्यासाठी प्रेरणा बनेल. तुमचे जीवन आनंदाने भरून जावो, हीच प्रभू रामाकडे  माझी प्रार्थना  आहे.

आताच रामजींचे झालेले सुंदर भाषण ऐकले आणि  मला खूप आनंद झाला. जेव्हा 2019 मध्ये मी त्यांना भेटलो होतो, तेव्हा ते खूप बारीक होते. आज पहा, यशाच्या फळांचे सेवन वजनात वाढ करते.  हाही मोदी गॅरंटीचा परिणाम आहे. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो,तुम्हाला ही घरं मिळताना , नव्या जीवनाची सुरुवात होताना माझ्या याच सदिच्छा आहेत-“आपले जीवन सुखाने भरून राहो, हीच राम प्रभूची इच्छा आहे”. 

माझ्या कुटुंबीयांनो ,

आमचे सरकार पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत आहे की, श्रीरामाच्या आदर्शांचे पालन करून देशात सुशासन असावे, आणि देशात इमानदारीचे  राज्य असावे. रामराज्यातूनच  'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास'   यासाठी प्रेरणा मिळाली. संत तुलसीदासजी मानसमध्ये म्हणतात की-

जेहि विधि सुखी होहिं पुर लोगा। करहिं कृपानिधि सोई संजोगा ।।

म्हणजे जनता ज्यामुळे सुखी होते, अशीच कार्ये कृपानिधान श्री रामचंद्र जी करत असत. जनताजनार्दनाच्या सेवेसाठी याहून मोठी प्रेरणा काय असू शकते. म्हणूनच 2014 मध्ये सरकार स्थापन होताच मी म्हणालो होतो...माझे सरकार गरिबांच्या कल्याणासाठी  समर्पित सरकार आहे. त्यामुळे गरिबांच्या अडचणी कमी होऊन त्यांचे जीवन सुसह्य होईल अशा योजना आम्ही एकापाठोपाठ एक राबवल्या.

 

|

मित्रांनो,

घर आणि शौचालय नसल्यामुळे गरिबांना प्रत्येक पायरीवर अपमानित व्हावे लागले. विशेषतः आमच्या माता, बहिणी आणि मुलींसाठी ही खूप मोठी शिक्षा होती. आणि म्हणून सर्वप्रथम आम्ही गरीबांसाठी घरे आणि शौचालये बांधण्यावर भर दिला. आम्ही 10 कोटींहून अधिक शौचालये बांधली आणि ती गरिबांना हस्तांतरित केली. ती केवळ शौचालये नाहीत..तर  सन्मानाचे स्थान आहे, आम्ही माझ्या माता-भगिनींच्या सन्मानाची हमी दिली आहे.

आम्ही 4 कोटींहून अधिक पक्की घरे बांधून गरिबांना दिली. तुम्ही विचार करू शकता… ज्यांना ही घरे  मिळाली  आहेत  त्यांना विचारा… त्यांना आयुष्यात किती समाधान आहे. ही  फक्त तीस हजार, आम्ही आधीच चार कोटींहून अधिक पक्की घरं बांधून गरिबांना दिली आहेत...किती समाधान वाटले असेल. विचार दोन प्रकारचे असतात. एक- लोकांना भडकवत राहा,  राजकीय लाभासाठी  लोकांना भडकवत राहा. आमचा मार्ग श्रमाचा सन्मान आहे, आमचा मार्ग आहे आत्मनिर्भर श्रमिक, आमचा मार्ग आहे गरिबांचे कल्याण. आणि मला तुम्हाला सांगायचे आहे की जे नवीन घरात राहायला जाणार आहेत त्यांनी मोठी स्वप्ने पहा, छोटी स्वप्न पाहू नका. आणि हीच मोदींची  गॅरंटी आहे.  तुमची स्वप्ने ... हा माझा संकल्प आहे.

पूर्वीच्या काळात शहरांमध्ये जिकडे तिकडे झोपडपट्ट्याच तयार झाल्या, त्या झोपडीवासियांना आज आम्ही पक्की घरे बनवून देण्याचे काम करत आहोत. सरकारचा हा प्रयत्न आहे की उपजीविकेसाठी गावातून येणाऱ्या लोकांना भाड्याने झोपडपट्टयांमध्ये राहावे लागू नये. आज शहरात अशा वसाहती तयार केल्या जात आहेत जिथे अशा सहकाऱ्यांना योग्य भाड्यावर घर मिळू शकेल. एक मोठी मोहीम आम्ही राबवत आहोत. आमचा हा प्रयत्न आहे की जिथे लोक काम करतात, तिथे आजूबाजूलाच राहण्याची व्यवस्था असावी.

माझ्या कुटुंबियांनो,

आपल्या देशात प्रदीर्घ काळ गरिबी हटाओच्या घोषणा होत राहिल्या. मात्र, या घोषणांनंतरही गरिबी काही कमी झाली नाही. अशी गणिते मांडली जायची.... अर्धी भाकरी खाऊ. अरे बाबा का म्हणून.... अर्धी भाकरी खाऊ आणि तुम्हाला मत देऊ.... असे सांगायचे लोक. का म्हणून अर्धी भाकरी खायची... मोदी आहेत अख्खी भाकरी खाऊ. सर्वसामान्य जनतेचे हेच स्वप्न, हाच संकल्प, हाच तर फरक आहे.

आणि मित्रहो,

जशी सोलापूरच्या कामगारांची नगरी आहे ना, माझे कार्यक्षेत्र पूर्वी अहमदाबाद होते. ती देखील कामगारांची नगरी आहे, ती देखील वस्त्रोद्योग कामगारांची नगरी आहे. अहमदाबाद आणि सोलापूर यांच्यात इतके जवळचे नाते आहे.

माझ्या अहमदाबादमध्ये येथून पद्मशाली, अनेक कुटुंबे अहमदाबादमध्ये राहतात. आणि माझ्या आयुष्यात हे भाग्य लाभले, माझ्या पूर्वीच्या काळात आमची पद्मशाली कुटुंबे महिन्यातून तीन-चार वेळा मला जेवायला घालायची. लहान चाळींमध्ये राहायची ही कुटुंबे, तीन लोकांना बसायला जागा नसायची, पण त्यांनी कधीही मला उपाशी झोपू दिले नाही आणि माझ्यासाठी तर आश्चर्य होते. एक दिवस सोलापूरच्या कोणत्या तरी सदगृहस्थाने.... अनेक वर्षे झाली नाव मला आठवत नाही, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे तयार केलेले, विणकाम केलेले एक सुंदर चित्र मला पाठवले. महाराष्ट्रातील साताऱ्याचे लक्ष्मणराव नावाचे वकील साहेब ज्यांची माझे आयुष्य घडवण्यात मोठी भूमिका होती. कुठून तरी ते चित्र.... त्या चित्राला त्यांनी आपल्या पुण्य कलेने अशा प्रकारे साकारले होते आणि ते अद्भुत चित्र त्यांनी पाठवले होते... आज देखील सोलापूर माझ्या हृदयात विराजमान आहे.

 

|

माझ्या कुटुंबियांनो,

आपल्या देशात बऱ्याच काळापासून या ज्या गरिबी हटावोच्या घोषणा होत राहिल्या ना, मात्र, या घोषणांनंतरही गरिबी काही कमी झाली नाही आणि याचे सर्वात मोठे कारण हे होते की गरिबांच्या नावाने योजना तर तयार केल्या जायच्या पण त्यांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळत नव्हता. पूर्वीच्या सरकारांमध्ये गरिबांच्या हक्काचे पैसे मधल्या मध्येच दलाल लूटत होते. म्हणजेच पूर्वीच्या सरकारांची नीयत, नीती आणि निष्ठा डळमळीत होती. आमची नीयत स्वच्छ आहे आणि नीती गरिबांना सशक्त करण्याची आहे. आमची निष्ठा देशाविषयी आहे. “आमची निष्ठा देशाप्रति आहे,  भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी आहे.”

म्हणूनच मोदी यांनी गॅरंटी दिली होती की सरकारी लाभ आता थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील... कोणतेही मध्यस्थ असणार नाहीत. आम्ही लाभार्थ्यांच्या मार्गात उभे असलेल्या मध्यस्थांना हटवण्याचे काम केले आहे. हे काही लोक जे आरडाओरडा करत असतात, त्याचे हेच कारण आहे... त्यांचे मलई खाणे बंद झाले आहे, आम्ही गेल्या 10 वर्षात 30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट गरीब, शेतकरी आणि युवा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. जनधन, आधार आणि मोबाईल कवच तयार करून आम्ही अशा सुमारे 10 कोटी बनावट लाभार्थ्यांना हटवले ज्यांचा जन्म देखील झाला नव्हता आणि जे तुमच्या कल्याणाचे पैसे खात होते. जी मुलगी जन्मालाच आली नव्हती ती विधवा होत होती, सरकारकडून पैसे हडप केले जात होते. जी व्यक्ती जन्माला आलेली नाही, तिला आजारी दाखवून पैसे हडप केले जात होते.

मित्रांनो,

जेव्हा आमच्या सरकारने गरिबांना सर्वोच्च प्राधान्य देत काम केले, गरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना सुरू केल्या, तर याचे परिणाम देखील दिसत आहेत. आमच्या सरकारच्या 9 वर्षात 25 कोटी लोक गरिबीमधून बाहेर पडले आहेत. हा आकडा लहान नाही आहे, दहा वर्षांच्या तपश्चर्येचा हा परिणाम आहे. गरिबांसाठी आयुष्य खर्ची घालण्याच्या संकल्पाचा परिणाम आहे आणि जेव्हा खरी इच्छा, निष्ठा आणि पावित्र्याने काम केले जाते तेव्हा त्याचे परिणाम आपल्या डोळ्यांसमोरच दिसू लागतात साहेब आणि याच कारणामुळे बाकी सहकाऱ्यांना देखील हा विश्वास मिळाला आहे की ते देखील गरिबीला हरवू शकतात.

 

|

मित्रांनो,

देशातील 25 कोटी लोकांनी गरिबीवर ज्या प्रकारे मात केली, ते देशातील लोकांचे सर्वात मोठे यश आहे. मी नेहमीच सांगत आलो आहे की गरिबांना साधनसंपत्ती मिळाली तर त्यांच्यात इतके सामर्थ्य आहे की ते गरिबीवर मात करू शकतात. म्हणूनच आम्ही देशातील गरिबांना सुविधा दिल्या, साधने दिली आणि  त्यांची प्रत्येक चिंता दूर करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला. एक काळ होता जेव्हा गरिबांना सर्वात मोठी चिंता असायची, ती म्हणजे दोन वेळची भाकरी. आज आमच्या सरकारने देशातील गरिबांना मोफत रेशन देऊन त्यांना अनेक चिंतामधून मुक्त केले आहे.... अर्धी भाकरी खाऊन ते घोषणा देणार नाहीत.

कोरोनाच्या काळात सुरू करण्यात आलेल्या या योजनेला पुढील पाच वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे आणि मी देशवासियांना हे आश्वासन देत आहे,  25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत, याचे मला समाधान आहे. आणि मला हे देखील माहीत आहे की येणारी पाच वर्षे जे गरिबीतून बाहेर पडले आहेत त्यांना देखील ताकद देत राहावी लागेल जेणेकरून कधी कोणत्या कारणामुळे ते पुन्हा गरिबीत परतू नयेत, पुन्हा संकटात सापडू नयेत. आणि म्हणूनच ज्या योजना आहेत ना, त्यांचा फायदा देखील त्यांना मिळत राहणार आहे. प्रत्यक्षात त्यांना जास्त देण्याची आज इच्छा होत आहे कारण त्यांनी हिमतीने माझ्यासोबत माझा संकल्प पूर्ण करण्यासाठी 25 कोटी लोक... 50 कोटी बाहू आज माझे सहकारी बनले आहेत.  

आणि मित्रांनो,

आम्ही केवळ मोफत रेशनाचीच व्यवस्था केलेली नाही तर रेशन कार्डशी संबंधित समस्यांचे देखील निराकरण केले. पूर्वी एका ठिकाणी बनवलेले रेशन कार्ड, दुसऱ्या राज्यात चालतच नव्हते. जर एखादा सहकारी कामासाठी दुसऱ्या राज्यात जात होता तर त्याला त्या ठिकाणी रेशन घेताना अनेक अडचणी यायच्या. आम्ही एक देश, एक रेशनकार्डची व्यवस्था तयार केली. यामुळे एकच रेशनकार्ड संपूर्ण देशभरात चालते. जर सोलापूरची एखादी व्यक्ती चेन्नईला जाऊन व्यवसाय, चरितार्थ चालवतो तर त्याला नवे रेशनकार्ड काढण्याची गरज नाही. चेन्नईमध्येही याच रेशनकार्डने त्याला अन्न मिळत राहील आणि हीच तर मोदींची गॅरंटी आहे.

 

|

मित्रांनो,

प्रत्येक गरिबाला ही चिंता नेहमीच सतावत असते की जर तो आजारी पडला तर मग उपचार कसे मिळवणार. आणि एकदा का गरीब कुटुंबात आजाराचा शिरकाव झाला तर मग कष्ट करून गरिबीतून बाहेर पडण्याचे सर्व नियोजन मोडून पडते. ही गोष्ट विचारात घेऊन आमच्या सरकारने 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देणारी आयुष्मान योजना सुरू केली.  आज या योजनेने गरिबांचे एक लाख कोटी रुपये खर्च होण्यापासून वाचवले आहेत.

तुम्ही कल्पना करू शकता की जर मी एक लाख कोटी रुपयांची योजना जाहीर करेन तर माहीत नाही सहा-सहा दिवसांपर्यंत वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन सुरू राहतात. टीव्हीतही चमकत राहतात. पण ही मोदींच्या गॅरंटीची ताकद आहे... तुमच्या खिशातील एक लाख कोटी रुपये या योजनेने वाचवले आणि जीव वाचवला आहे आणि आज सरकार पीएम जनौषधी केंद्रांवर 80 टक्के सवलतीने औषधे देत आहे.

यामुळे गरीबांचे 30 हजार कोटी रुपये खर्च होण्यापासून वाचले आहेत. दूषित पाणी हे देखील गरीब कुटुंबातील आजाराचे एक मोठे कारण आहे.  म्हणूनच आमचे सरकार आज जल जीवन अभियान राबवत आहे, प्रत्येक घराला पाण्याच्या जोडणीने जोडत आहे.

मित्रांनो,

या योजनांचे सर्वाधिक लाभार्थी मागास आणि आदिवासी समुदायातील आहेत. गरिबांना पक्के घर मिळायला हवे, शौचालये मिळायला हवीत, त्यांच्या घरात वीज जोडणी असावी, पाणी असावे, अशा सर्व सुविधा मिळायला हव्यात… खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाची ही मोदींची हमी आहे. या सामाजिक न्यायाचे स्वप्न संत रविदासजींनी पाहिले होते. या भेदभावरहित संधीबद्दल कबीरदासजींनी भाष्य केले होते. या सामाजिक न्यायाचा मार्ग ज्योतिबा फुले - सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवला होता.

 

|

माझ्या कुटुंबियांनो,

गरीबातील गरीबांना आर्थिक सुरक्षेचे कवच मिळावे ही देखील मोदींची हमी आहे. 10 वर्षांपूर्वीपर्यंत गरीब कुटुंबे जीवन विम्याचा विचारही करू शकत नव्हती. आज त्यांच्याकडे प्रत्येकी 2 लाख रुपयांचे अपघात आणि जीवन विमा संरक्षण आहे. हे विमा संरक्षण मिळाल्यानंतर, हा आकडा तुम्हाला देखील प्रसन्न करेल. ज्यांच्या कुटुंबाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला आहे, अशा गरीब कुटुंबांना 16 हजार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत आणि ते विम्याच्या स्वरूपात त्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत .

मित्रांनो,

ज्यांच्याकडे बँकेची हमी देण्यासाठी काहीच नव्हते, त्यांच्यासाठी आज मोदींची हमी सर्वात जास्त उपयुक्त ठरते आहे. येथेही या मंडळीत असे अनेक मित्र आहेत ज्यांचे 2014 पर्यंत बँक खातेही नव्हते. जेव्हा त्यांच्याकडे बँक खातीच नव्हती, तेव्हा त्यांना बँकांकडून कर्ज कसे मिळू शकले असते? जनधन योजना राबवून आमच्या सरकारने 50 कोटी गरीब लोकांना देशाच्या बँकिंग व्यवस्थेशी जोडले. आज पीएम स्वनिधीच्या 10 हजार लाभार्थ्यांनाही येथील बँकांकडून मदत देण्यात आली आहे… आणि मला येथे काही टोकन देण्याची संधी मिळाली आहे.

देशभरातील रस्त्यावर आणि पदपथांवर छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक… आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये भाजीपाला विकण्यासाठी येणारे लोक . दूध विकणारे लोक.  वृत्तपत्रे विकणारे लोक.  रस्त्यावर उभे राहून खेळणी विकणारे लोक… आणि ज्यांना कोणी विचारले नाही, त्यांची मोदींनी पूजा केली आहे. आज पहिल्यांदाच मोदींनी त्यांना विचारले आहे आणि त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

या सहकाऱ्यांना पूर्वी बाजारातून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागत होते, कारण त्यांच्याकडे बँकेला देण्यासाठी हमी नव्हती. मोदींनी त्यांची हमी घेतली. मी बँकांना सांगितले, ही माझी हमी आहे, त्यांना पैसे द्या, हे गरीब लोक त्याची परतफेड करतील. गरिबांवर माझा विश्वास आहे. आणि आज या फेरीवाल्यांना हमीशिवाय बँकेकडून कर्ज मिळत आहे. अशा मित्रांना आतापर्यंत हजारो कोटी रुपये देण्यात आले आहेत .

माझ्या कुटुंबियांनो,

सोलापूर हे तर उद्योगांचे शहर आहे, मेहनती कामगार बंधू - भगिनींचे शहर आहे. इथे बांधकाम, लघु आणि सूक्ष्म उद्योगांशी संबंधित अनेक लोक जोडलेले आहेत. सोलापूरच्या वस्त्रोद्योगाची देशात आणि जगातही ओळख आहे. सोलापूरच्या चादरीबद्दल कोणाला माहीत नाही? देशातील गणवेशाचे काम करणाऱ्या एमएसएमईचा सर्वात मोठा समूह सोलापुरात आहे. मला सांगण्यात आले आहे की, येथे परदेशातूनही

गणवेशाची मोठ्या प्रमाणात मागणी येते.

मित्रांनो,

कपडे शिवण्याचे हे काम अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. पिढ्या बदलल्या, फॅशन बदलली, पण कपडे शिवणाऱ्या या सहकाऱ्यांचा कोणी विचार केला होता का? मी त्यांना माझे विश्वकर्मा मित्र मानतो. अशा प्रत्येक विश्वकर्मा साथीदारांचे जीवन बदलण्यासाठी आम्ही पंतप्रधान विश्वकर्मा योजना तयार केली आहे. आणि कधीकधी तुम्हाला माझे जॅकेट दिसते, नाही का ? सोलापूरचा माझा एक मित्र यापैकी काही जॅकेट बनवतो आणि मला पाठवतो. मी नको म्हटले तरी तो पाठवत राहतो. एकदा मी त्याला फोन केला आणि त्याला खूप ओरडलो. म्हटले अरे भाऊ, मला पाठवू नको. तर बोलला नाही साहेब, ते आजही मला मिळाले आहे, खरं तर ...मी घेऊन आलो आहे.

मित्रांनो,

विश्वकर्मा योजनेअंतर्गत या मित्रांना प्रशिक्षण दिले जात आहे आणि आधुनिक उपकरणे दिली जात आहेत. त्यांना त्यांचे काम वाढवण्यासाठी बँकांकडून हमीशिवाय लाखो रुपयांचे कर्जही मिळत आहे. त्यामुळे सोलापूरच्या सर्व विश्वकर्मा मित्रांनी लवकरात लवकर या योजनेत सहभागी व्हावे, असे मी आवाहन करतो. सध्या तर विकसित भारत संकल्प यात्रा गावागावांमध्ये, गल्लीबोळात  पोहोचत आहे. त्यात मोदींची हमी असलेली गाडी आहे. यामध्ये तुम्ही पंतप्रधान विश्वकर्मासह सरकारच्या प्रत्येक योजनेशी जोडले जाऊ शकतात.

माझ्या कुटुंबियांनो,

विकसित भारताची निर्मिती करण्यासाठी आत्मनिर्भर भारताची निर्मिती करणे आवश्यक आहे . आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यात आपल्या छोट्या, लघु आणि कुटीर उद्योगांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे केंद्र सरकार एमएसएमई आणि लघु उद्योगांना सातत्याने प्रोत्साहन देत आहे. कोरोना काळात जेव्हा एमएसएमईवर संकट होते, तेव्हा सरकारने त्यांना लाखो कोटी रुपयांची मदत केली होती. यामुळे लघुउद्योगांमधील रोजगार संपण्यापासून मोठ्या संख्येने वाचले.

आज सरकार देशातील प्रत्येक जिल्ह्यात ‘एक जिल्हा एक उत्पादन योजना’ देखील राबवत आहे. व्होकल फॉर लोकल ही मोहीम आज आपल्या छोट्या उद्योगांबद्दल जागरूकता देखील वाढवत आहे. आज जगात भारताची प्रतिष्ठा ज्याप्रकारे वाढत आहे, त्यामुळे मेड इन इंडिया उत्पादनांच्या शक्यताही वाढत आहे. केंद्र सरकारच्या या सर्व मोहिमांचा फायदा सोलापूरच्या लोकांना होत आहे, येथील उद्योगांना होत आहे.

माझ्या कुटुंबियांनो,

आपल्या केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवणार आहे. मी देशवासियांना हमी दिली आहे की, माझ्या आगामी कार्यकाळात मी भारताला जगातील पहिल्या तीन देशांमध्ये आणणार म्हणजे आणणारच. आणि तुमच्या जोरावर, मला वाटते की माझी हमी पूर्ण होईल. तुमच्या आशीर्वादांची ताकद आहे. अर्थव्यवस्थेच्या या विस्तारात महाराष्ट्रातील सोलापूरसारख्या आपल्या अनेक शहरांची मोठी भूमिका आहे. त्यामुळे दुहेरी इंजिन असलेले सरकार या शहरांमध्ये पाणी आणि सांडपाणी यासारख्या सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे. शहरांना चांगले रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गांनी जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग असो किंवा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग असो, यावरही वेगाने काम सुरू आहे. रत्नागिरी, कोल्हापूर आणि सोलापूर दरम्यानच्या चौपदरी महामार्गाचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे

तुम्ही सर्व कुटुंबियांनी अशाच विकासासाठी आम्हा सर्वांना खूप आशीर्वाद दिले आहेत. हे आशीर्वाद असेच कायम पाठीशी राहू द्या, याच विश्वासासह, मित्रांनो ज्यांना आज  हक्काची पक्की घरे मिळाली आहेत, त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन. माझ्या सोबत बोला, दोन्ही हात वर करुन बोला-

भारत माता की - जय…आवाज संपूर्ण महाराष्‍ट्रात पोहचायला हवा-

भारत माता की – जय

भारत माता की – जय

भारत माता की – जय

हा जो जयजयकार तुम्ही करत आहात ना.. या जयजयकारात देशातील प्रत्येक गरीबामध्ये नवीन विश्वास निर्माण करण्याची ताकद आहे. 

खूप-खूप धन्यवाद.

 

  • कृष्ण सिंह राजपुरोहित भाजपा विधान सभा गुड़ामा लानी November 21, 2024

    जय श्री राम 🚩 वन्दे मातरम् जय भाजपा विजय भाजपा
  • Devendra Kunwar October 08, 2024

    BJP
  • दिग्विजय सिंह राना September 20, 2024

    हर हर महादेव
  • krishangopal sharma Bjp July 20, 2024

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏
  • krishangopal sharma Bjp July 20, 2024

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏
  • krishangopal sharma Bjp July 20, 2024

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏
  • Jitender Kumar Haryana BJP State President July 04, 2024

    I need some secure money in my mobile in all QR code with safe transaction
  • JBL SRIVASTAVA May 27, 2024

    मोदी जी 400 पार
  • DEVENDRA SHAH March 11, 2024

    #MainHoonModiKaParivar कुछ नेताओं ने काला धन ठिकाने लगाने के लिए विदेशी बैंकों में अपने खाते खोले। प्रधानमंत्री मोदी ने देश में करोड़ों गरीब भाइयों-बहनों के जनधन खाते खोले। मैं हूं मोदी का परिवार!
  • Dr Swapna Verma March 09, 2024

    Jay hind jay
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Kumbh Mela 2025: Impact On Local Economy And Business

Media Coverage

Kumbh Mela 2025: Impact On Local Economy And Business
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 डिसेंबर 2024
December 29, 2024

Citizens Appreciate PM's Dedication to National Progress - #MannkiBaat

Appreciation for PM Modi’s vision of Viksit Bharat – Vikas bhi, Virasat bhi