महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी पीयूष गोयल जी, रामदास आठवले जी, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, अजितदादा पवार जी, राज्य सरकार मधील मंत्री मंगल प्रभात जी, दीपक केसरकर जी, इतर सर्व मान्यवर, महिला आणि पुरुषहो,
महाराष्ट्रातील सर्व बंधू-भगिनींना माझा नमस्कार!
आज मला महाराष्ट्र आणि मुंबईसाठी 30 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमीपूजन आणि लोकार्पणाची संधी मिळाली आहे. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि आजूबाजूच्या भागातील कनेक्टविटी आणखी चांगली होईल. यामध्ये रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांव्यतिरिक्त महाराष्ट्रातील तरुणांच्या कौशल्य विकासाच्या खूप मोठ्या योजना देखील समाविष्ट आहेत. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती देखील होईल. तुम्ही कदाचित वर्तमानपत्रांमध्ये वाचले असेल, टीव्हीवर पाहिले असेल. दोन-तीन आठवड्यांपूर्वीच केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी वाढवण बंदराला देखील मंजुरी दिली. 76 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे येथे 10 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होतील.
मित्रांनो,
गेल्या एका महिन्यापासून मुंबई, देश-विदेशातील गुंतवणूकदारांच्या उत्सवाची साक्षीदार बनली आहे. लहान-मोठ्या प्रत्येक गुंतवणूकदाराने आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे उत्साहाने स्वागत केले आहे. लोकांना माहित आहे की, एनडीए सरकारच स्थैर्य देऊ शकते, स्थायित्व देऊ शकते. तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मी सांगितले होते की, तिसऱ्या कार्यकाळात एनडीए सरकार तिप्पट वेगाने काम करेल आणि आज हे होताना आपण पाहात आहोत.
मित्रांनो,
महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे. महाराष्ट्राकडे सशक्त वर्तमान आहे आणि महाराष्ट्राकडे समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. महाराष्ट्र ते राज्य आहे, ज्याची विकसित भारताच्या निर्मितीमध्ये खूप मोठी भूमिका आहे. महाराष्ट्राकडे उद्योगांची ऊर्जा आहे. महाराष्ट्राकडे शेतीची ऊर्जा आहे. महाराष्ट्राकडे आर्थिक क्षेत्राची ऊर्जा आहे. याच ऊर्जेने मुंबईला देशाचे आर्थिक केंद्र बनवले आहे. आता माझे लक्ष्य आहे, महाराष्ट्राच्या याच ऊर्जेने महाराष्ट्राला जगातील सर्वात मोठे आर्थिक ऊर्जा केंद्र बनवण्याचे. माझे लक्ष्य आहे, मुंबईला जगाची फिनटेक कॅपिटल बनवण्याचे. माझी अशी इच्छा आहे, महाराष्ट्र पर्यटनात भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य बनावे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार असलेले विशाल किल्ले आहेत. येथे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांची मनमोहक दृश्यं आहेत. येथे सह्याद्रीच्या डोंगरातल्या सफरीचा रोमांच आहे. येथे कॉन्फरन्स टूरिझम आणि मेडिकल टूरिझमच्या अमाप संभावना आहेत. भारताच्या विकासाची नवी गाथा लिहिण्याच्या दिशेने महाराष्ट्र चालला आहे आणि आपण सर्व याचे सहप्रवासी आहोत. आजचा हा कार्यक्रम, महायुती सरकारच्या याच लक्ष्यांना समर्पित आहे.
मित्रांनो,
21व्या शतकातील भारताच्या आकांक्षा-
भारताच्या Aspirations यावेळी अतिशय मोठ्या उंचीवर आहेत. या शतकाची जवळ-जवळ 25 वर्षे उलटली आहेत. देशाच्या जनतेला सातत्याने वेगवान विकासाची अपेक्षा आहे. पुढील 25 वर्षात भारताला विकसित बनवण्याची इच्छा आहे आणि यामध्ये मुंबईची, महाराष्ट्राची भूमिका खूप मोठी आहे. महाराष्ट्रात, मुंबईत सर्वांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारावा, येथे Quality of life चांगले असावे, हे आमचे ध्येय आहे, म्हणूनच, मुंबईच्या आजूबाजूच्या भागांची कनेक्टिव्हिटी अधिक चांगली करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईत कोस्टल रोड आणि अटल सेतू आता पूर्ण झाले आहेत. आणि तुम्हाला आठवत असेल, जेव्हा अटल सेतू तयार होत होता, तेव्हा या विरोधात खूप जास्त प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्यात आल्या. या प्रकल्पाला अडकवण्याचा, लटकवण्याचा खूप प्रयत्न झाला; पण आज यामुळे किती फायदा होत आहे, याचा अनुभव प्रत्येकाला येत आहे. मला असे सांगण्यात आले की, जवळ-जवळ 20 हजार वाहने याचा दररोज वापर करत आहेत आणि एक अंदाज असा आहे की, अटल सेतूमुळे दररोज 20-25 लाख रुपयांच्या इंधनाची बचत होत आहे आणि केवळ इतकेच नाही, लोकांना पनवेलला जायला आता जवळपास 45 मिनिटे कमी लागतात; म्हणजेच वेळेचा फायदा आणि पर्यावरणाचाही फायदा. याच दृष्टीकोनाने आम्ही मुंबईची परिवहन प्रणाली आधुनिक बनवत आहोत. मुंबई मेट्रोच्या विस्ताराचे काम देखील जलद गतीने सुरू आहे. 10 वर्षांपूर्वी मुंबईत केवळ 8 किलोमीटरची मेट्रो लाईन होती. 10 वर्षांपूर्वी फक्त 8 किलोमीटर, तर आता ही सुमारे 80 किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. इतकेच नाही तर मुंबईत आता जवळपास 200 किलोमीटर मेट्रो नेटवर्कवर काम सुरू आहे.
मित्रांनो,
आज भारतीय रेल्वेचा जो कायापालट होत आहे, त्याचा मुंबईला, महाराष्ट्राला देखील खूप फायदा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नागपूर, आणि अजनी स्थानकाचे re-development, जलद गतीने प्रगतीपथावर आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक स्थानकावर नव्या फलाटांचे देखील लोकार्पण झाले आहे. यामुळे 24 डबेवाल्या ट्रेन म्हणजेच जास्त लांबीच्या ट्रेन देखील येथून धावू शकणार आहेत.
मित्रांनो,
गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांची लांबी वाढून तिप्पट झाली आहे. गोरेगांव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प प्रगती आणि निसर्गाच्या ताळमेळाचे अतिशय दिमाखदार उदाहरण आहे. आज ठाण्याहून बोरिवली पर्यंतच्या ट्विन टनेल बोगद्यावर देखील काम सुरू होत आहे. यामुळे ठाणे आणि बोरिवलीमधील अंतर केवळ काही मिनिटांवर येणार आहे. NDA सरकारचा हा देखील सातत्यपूर्ण प्रयत्न आहे की आपल्या तीर्थक्षेत्रांचा विकास व्हावा, तीर्थयात्रांमध्ये सुविधा वाढत रहाव्यात.
आपल्या सर्वांना माहित आहे की, सध्या लाखो वारकरी पंढरपूरच्या वारीत पूर्ण भक्तिभावाने सहभागी होत आहेत. पुणे ते पंढरपूर हा प्रवास सुरळीत व्हावा आणि वारकऱ्यांना सुविधा मिळाव्यात, याची काळजी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने घेतली आहे. संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग सुमारे 200 किलोमीटरपर्यंत पूर्ण झाला असून, संत तुकाराम पालखी मार्गही 110 किलोमीटरहून जास्त पूर्ण झाला आहे. लवकरच हे दोन्ही मार्ग प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होतील. सर्व वारकऱ्यांना मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो, आणि पंढरीच्या विठुरायाला कोटि-कोटि दंडवत घालतो!
बंधू आणि भगिनींनो,
दळणवळणाच्या अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांचा लाभ, पर्यटन, कृषी आणि उद्योग या सर्व क्षेत्रांना होत आहे. त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. दळणवळणाच्या चांगल्या सुविधांमुळे महिलांना सोई, सुरक्षितता आणि सन्मान लाभतो, म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीए सरकारची ही कामे गरीब, शेतकरी, महिला शक्ती आणि युवाशक्ती यांचे सबलीकरण करणारी आहेत. महाराष्ट्रातील महायुती सरकारही त्याच बांधिलकीने काम करत आहे. महाराष्ट्र सरकारने दरवर्षी 10 लाख तरुणतरुणींना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे, याचा मला आनंद आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणादरम्यान शिष्यवृत्तीही दिली जात आहे.
मित्रहो,
भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कौशल्य विकास आणि रोजगारांची आवश्यकता आहे. आमचे सरकार या दिशेने सातत्याने काम करत आहे. गेल्या 4-5 वर्षात कोरोनासारखे मोठे संकट असतानाही भारतात विक्रमी रोजगार निर्माण झाला आहे. नुकताच भारतीय रिझर्व्ह बँक-RBI ने रोजगाराबाबत सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, गेल्या 3-4 वर्षांत देशात सुमारे 8 कोटी नवीन रोजगार निर्माण झाले आहेत. या आकडेवारीने, रोजगाराबाबत खोट्या कथा रचणाऱ्यांची तोंडे बंद झाली आहेत. हे असत्य कथाकथनकार लोक गुंतवणुकीचे शत्रू, पायाभूत सुविधा उभारणीचे शत्रू, भारताच्या विकासाचे शत्रू आहेत. यांचे प्रत्येक धोरण तरुणांचा विश्वासघात करते आणि रोजगार रोखते आणि आता त्यांचे बिंग फुटत आहे. भारतातील समजूतदार जनता यांची प्रत्येक थाप आणि कट-कारस्थान नाकारत आहे. जेव्हा जेव्हा पूल बांधला जातो, रेल्वे मार्ग बांधला जातो, रस्ता बांधला जातो, उपनगरीय लोकल गाडीचा डबा बांधला जातो, तेव्हा कुणाला ना कुणाला नक्कीच रोजगार मिळतो. भारतात पायाभूत सुविधांच्या उभारणीचा वेग जसजसा वाढत आहे, तसतसा रोजगार निर्मितीचा वेगही वाढत आहे. येणाऱ्या काळात नवीन गुंतवणुकीमुळे या संधी आणखी वाढणार आहेत.
मित्रांनो,
एनडीए सरकारच्या विकासाचा नमुना (मॉडेल) वंचितांना प्राधान्य देणारा राहिला आहे. अनेक दशकांपासून तळागाळातील घटकांना आम्ही प्राधान्य देत आहोत. नव्या सरकारने शपथ घेताच गरीब आणि शेतकऱ्यांसाठी पक्क्या घरांचे मोठे निर्णय घेतले आहेत. आतापर्यंत 4 कोटी गरीबांना कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत. येत्या काही वर्षांत आणखी 3 कोटी गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी घरे मिळणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील लाखो गरीब, दलित, मागास आणि आदिवासी कुटुंबांचाही समावेश आहे. चांगली घरे ही प्रत्येक कुटुंबाची गरजच नाही तर प्रतिष्ठेचीही बाब आहे. त्यामुळे शहरांमध्ये राहणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीयांचे स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही झटत आहोत.
मित्रहो,
रस्त्यावरील विक्रेत्यांना, फेरीवाल्यांनाही सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठी आम्ही बांधिल आहोत. याकरता स्वनिधी योजना अतिशय उपयुक्त आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत 90 लाख कर्ज मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी सुमारे 13 लाख कर्ज महाराष्ट्रातील आपल्या मित्रांना मिळाली आहेत. मुंबईतही 1.5 लाख फेरीवाल्यांना स्वनिधी योजनेचा लाभ मिळाला आहे. बँकांकडून स्वनिधीची मिळणारी मदत त्यांच्या व्यवसायाला बळकटी देत आहे आणि एका अभ्यासानुसार स्वनिधी योजनेशी संबंधित लोकांच्या उत्पन्नात दरमहा सुमारे 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे, म्हणजेच एका वर्षात 20-25 हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न वाढले आहे.
मित्रांनो,
स्वनिधी योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य मला तुमच्यासमोर नमूद करायचे आहे. या योजने अंतर्गत कर्ज घेत असलेले रस्त्यावरील फेरीवाले आणि विक्रेते असलेले माझे बंधू आणि भगिनी, हे संपूर्ण कर्ज प्रामाणिकपणे परतही करत आहेत आणि हा आहे माझ्या गरिबांचा स्वाभिमान, ही आहे माझ्या गरीब बंधू-भगिनींची ताकद! आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, स्वनिधीच्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत 3.25 लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार केले आहेत. म्हणजेच ते आपल्या कामाने डिजिटल इंडियालाही बळ देत आहेत आणि भारताला नवी ओळख मिळवून देत आहेत.
मित्रहो,
महाराष्ट्राने भारतामध्ये सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रवादाची जाणीवही रुजवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, अशा अनेक थोर व्यक्तीमत्वांचा वारसा या भूमीत आहे. महाराष्ट्राच्या थोर सुपुत्र-सुकन्यांनी ज्या प्रकारे एकजीव समाजाची आणि सशक्त राष्ट्राची कल्पना केली होती, त्या दिशेने आपल्याला पुढे जायचे आहे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, समृद्धीचा मार्ग सुसंवाद आणि सामंजस्यातच आहे. याच भावनेतून या विकासकामांसाठी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. खूप खूप आभार!
भारतमातेचा विजय असो!
भारतमातेचा विजय असो!
भारतमातेचा विजय असो!
खूप खूप आभार!