केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सहकारी श्री भूपेंद्र यादव जी, श्री अश्विनी कुमार चौबे जी, इतर देशांमधून आलेले मंत्रीगण, राज्यांचे मंत्री, इतर प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो.
सर्वात आधी मी तुम्हा सर्वांची क्षमा मागु इच्छितो, कारण मी आज सकाळी 6 वाजता बाहेर गेलो होतो, तेंव्हा मला वाटले होते की जंगलात फेरफटका मारुन वेळेवर परत येईन, पण मला परत यायला एक तास उशिर झाला. तुम्हा सर्वांना वाट पहावी लागली यासाठी मी सर्वांची क्षमा मागतो. आपल्या देशाने वाघांची जी संख्या गाठली आहे, व्याघ्र परिवाराचा जो विस्तार होत आहे, हा एक गौरवपूर्ण क्षण आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की वाघांचा सन्मान करण्यासाठी आपण आपापल्या जागेवर उभे राहून त्यांना मानवंदना देऊ. धन्यवाद
आज आपण एका महत्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार बनलो आहोत. व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. व्याघ्र प्रकल्पाची सफलता केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी गौरवास्पद आहे. भारताने वाघांचे केवळ रक्षणच केले नाही तर त्यांच्या भरभराटीसाठी एक योग्य परिसंस्था उपलब्ध करून दिली आहे. आपण आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करत आहोत, त्याच वर्षात जगातील एकूण वाघांपैकी 75 टक्के वाघ भारतात आहेत. भारतातील व्याघ्र प्रकल्प 75,000 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापत असून गेल्या दहा ते बारा वर्षांत देशातील वाघांची संख्या 75 टक्क्यांनी वाढली आहे, हा योगायोगच म्हणावा लागेल. हे सर्वांच्या प्रयत्नामुळेच शक्य झाले आहे आणि यासाठी मी संपूर्ण देशाचे अभिनंद करतो.
मित्रांनो,
आज जगभरातील वन्य जीव प्रेमी लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की, जेंव्हा जगातील वाघांचा अधिवास असलेल्या इतर काही देशात त्यांच्या संख्येत घट होत आहे किंवा काही देशात ही संख्या स्थिर आहे असे असताना भारतात मात्र वाघांच्या संख्येत वाढ होत आहे, हे कसे काय ? याचे उत्तर भारतीय परंपरा, भारताची संस्कृती आणि भारतीय समाजाचा जैवविविधतेप्रती, पर्यावरणप्रती जो नैसर्गिक कल आहे यामध्येच दडलेले आहे. भारत पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यातील संघर्षावर विश्वास न ठेवता दोन्हीच्या सहअस्तित्वाला समान महत्त्व देतो. भारतात वाघांच्या संदर्भात हजारो वर्ष जुना इतिहास आहे. मध्य प्रदेशात सापडलेल्या दहा हजार वर्ष जुन्या गुहा चित्रात वाघांची चित्र आढळून आली आहेत. मध्य भारतात राहणारा भारिया समाज आणि महाराष्ट्रातील वारली समाज यांच्या सारखे अनेक भारतीय समाज वाघाची पूजा करतात तर भारतातील अनेक समुदाय वाघाला भाऊ मानतात. दुर्गामाता आणि भगवान अयप्पा यांचे वाहन देखील वाघच आहे.
मित्रांनो,
भारत असा देश आहे जिथे निसर्गाचे रक्षण करणे हा संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळेच भारताने वन्यजीव संवर्धनात अनेक टप्प्यावर अद्वितीय यश मिळवले आहे. जगाच्या एकूण भूभागापैकी केवळ 2.4 टक्के भूभाग असूनही, ज्ञात जागतिक जैवविविधतेमध्ये भारताचा वाटा सुमारे 8 टक्के आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा व्याघ्र अधिवास असलेला देश आहे. याशिवाय जवळपास तीस हजार हत्तींसह भारत जगातील सर्वात मोठा आशियाई हत्ती अधिवास असलेला देश आहे! भारतातील सुमारे तीन हजार गेंड्यांची संख्या देशाला जगातील सर्वात मोठा एक शिंगी गेंड्यांचे अधिवास स्थान बनवते. आशियाई सिंहांचा अधिवास असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. भारतातील सिंहांची संख्या 2015 मध्ये सुमारे 525 वरून 2020 मध्ये सुमारे 675 पर्यंत वाढली आहे. भारतातील बिबट्याची संख्या केवळ 4 वर्षांत 60 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. गंगेसारख्या नद्यांच्या स्वच्छतेच्या कामामुळे जैवविविधतेला मदत झाली आहे. यामुळे धोक्यात गणल्या गेलेल्या काही जलचर प्रजातींच्या संख्येत सुधारणा दिसून आली आहे. हे सर्व यश लोकांच्या सहभागामुळे आणि संवर्धनाच्या संस्कृतीमुळे प्राप्त झाले आहे. सबका प्रयास.
वन्यजीवांची जोमाने वाढ व्हावी यासाठी परिसंस्थेची भरभराट होणे महत्त्वाचे आहे. हे भारतात पूर्वीपासून घडत आले आहे. स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना, भारताने रामसर स्थळांच्या यादीत नव्या अकरा पाणथळ जागा जोडल्या आहेत. यामुळे भारतात रामसर स्थळांची एकूण संख्या 75 वर पोहोचली आहे. जंगल आणि वृक्षाच्छादन देखील वाढत आहे. 2019 च्या तुलनेत भारताने 2021 पर्यंत दोन हजार दोनशे चौरस किलोमीटर जंगल आणि वृक्षाच्छादित क्षेत्राची भर घातली. गेल्या दशकात सामुदायिक राखीव वनांची संख्या 43 वरून शंभरावर गेली. ज्यांच्या परिसरात पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अधिसूचित करण्यात आले आहे, अशा राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांची संख्या एका दशकात नऊ वरून चारशे अडुसष्ठपर्यंत वाढली आहे.
मित्रांनो,
वन्यजीवन संवर्धनासाठीच्या या सर्व प्रयत्नात मला माझ्या गुजरातमधील दीर्घ कालीन अनुभवाचाही लाभ झाला. माझ्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आम्ही सिंह संरक्षणाचे काम केले होते. आपण वन्यजीवन संरक्षणाची कक्षा भौगोलिक क्षेत्रापुरती मर्यादित ठेऊ शकत नाही, हे मी तिथेच आत्मसात केले आहे. यासाठी वन्य जीव आणि स्थानिक लोकांमध्ये एक दृढ नाते निर्माण झाले पाहिजे. हा नातेसंबंध भावनिकही असला पाहिजे आणि आर्थिक देखील असला पाहिजे.म्हणूनच आम्ही गुजरातमध्ये वन्य प्राणी मित्र कार्यक्रम सुरू केला. शिकारीसारख्या घटनांवर नजर ठेवण्यासाठी ही यंत्रणा सुरू करण्यात आली होती, त्यासाठी रोख बक्षीसही ठेवण्यात आले होते. आम्ही गीरच्या सिंहांसाठी एक पुनर्वसन केंद्रही उघडले. आम्ही गीर परिसरात वनविभागात महिला बीट गार्ड आणि वनपाल यांची भर्ती देखील केली. याद्वारे सिंह आहेत तर आपण आहोत, आपण आहोत तर सिंह आहेत ही भावना निरंतर दृढ होत गेली. आज आपण देखील पाहू शकता की पर्यटन आणि पर्यावरणपूरक पर्यटनाची एक विशाल परिसंस्था आता गीरमध्ये स्थापित झाली आहे.
मित्रहो,
गीरमध्ये राबवलेल्या उपक्रमांप्रमाणेच प्रोजेक्ट टायगरच्या यशस्वितेचेही अनेक आयाम आहेत. त्यामुळे पर्यटन उपक्रमात वाढ झाली आणि आम्ही आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमांमुळे व्याघ्र प्रकल्पातील मानव-प्राणी संघर्षात मोठी घट झाली. मार्जार कुळामुळे व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची संख्या वाढली असून त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकट झाली आहे. मार्जार कुळातील वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाने सर्वत्र स्थानिक लोकांच्या जीवनावर आणि तिथल्या पर्यावरणावर सकारात्मक परिणाम झाला आहे.
मित्रहो,
काही महिन्यांपूर्वी, आम्ही भारतातील जैवविविधता समृद्ध करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे काम केले आहे. भारतातून अनेक दशकांपूर्वी चित्ता नामशेष झाला होता. आम्ही या शानदार मार्जार कुळातील प्राण्याला नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणले आहे. बिग कॅट्सचे हे पहिले आंतरखंडीय यशस्वी स्थानांतरण आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानात काही दिवसांपूर्वी 4 सुंदर चित्त्याची पिल्ले जन्माला आली आहेत. सुमारे 75 वर्षांपूर्वी भारतीय भूमीतून चित्ता नामशेष झाला. म्हणजे तब्बल 75 वर्षांनंतर भारताच्या भूमीवर चित्ताने जन्म घेतला. ही खूप शुभ सुरुवात आहे. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या समृद्धीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य किती महत्त्वाचे आहे, याचाही हा पुरावा आहे.
मित्रहो,
वन्यजीवांचे संरक्षण हा कोणा एका देशाचा नव्हे तर वैश्विक मुद्दा आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य ही काळाची गरज आहे. सन 2019 मध्ये, जागतिक व्याघ्र दिनानिमित्त, मी आशियातील अवैध शिकार आणि वन्यजीव व्यापाराविरुद्ध सहकार्याचे आवाहन केले होते. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स हा याच भावनेचा विस्तार आहे. याद्वारे, मार्जार कुळातील प्राण्यांशी संबंधित संपूर्ण परिसंस्थेसाठी आर्थिक आणि तांत्रिक संसाधने एकत्रित करणे सोपे होईल. त्यामुळे भारतासह विविध देशांच्या अनुभवातून तयार झालेले संवर्धन आणि संरक्षण धोरण राबविणे सोपे होणार आहे. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स जगातील 7 मोठ्या मार्जार कुळातील प्राण्यांच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करेल. म्हणजेच ज्या देशांमध्ये वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबटे, प्यूमा, जग्वार आणि चित्ता आहेत, असे देश या सहकार्याचा भाग असतील. या सहकार्यांतर्गत, सदस्य देश त्यांचे अनुभव सामायिक करू शकतील, ते त्यांच्या सहकारी देशाला अधिक त्वरित मदत करू शकतील. हे सहकार्य संशोधन, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीवरही भर देईल. एकत्रितपणे आपण या प्रजाती नामशेष होण्यापासून वाचवू, एक सुरक्षित आणि सुदृढ परिसंस्था निर्माण करू.
मित्रहो,
मानवतेचे चांगले भविष्य तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपले पर्यावरण सुरक्षित राहील आणि आपली जैवविविधता सतत विस्तारत राहील. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, संपूर्ण जगाची आहे. आमच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात आम्ही या भावनेला सतत प्रोत्साहन देत आहोत. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हे जी 20 चे ब्रीदवाक्य, हाच संदेश देते. कॉप 26 मध्ये देखील आम्ही स्वतःसाठी मोठी आणि महत्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केली आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की परस्पर सहकार्याने आपण पर्यावरण संरक्षणाचे प्रत्येक उद्दिष्ट साध्य करू.
मित्रहो,
या कार्यक्रमासाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांना, इतर राज्यांतून इथे आलेल्या पाहुण्यांनाही मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही सर्वांनी इथे आणखी एका गोष्टीचा अवश्य लाभ घ्यावा. हा जो सह्याद्रीचा प्रदेश, पश्चिम घाटाचा प्रदेश आहे, इथे अनेक आदिवासी राहतात. शतकानुशतके ते वाघांसह प्रत्येक जैवविविधता समृद्ध करण्यात योगदान देत आहेत. त्यांचे जीवन, त्यांची संस्कृती संपूर्ण जगासाठी एक उत्तम उदाहरण आहे. निसर्गाकडून जितके घेतले, तितकी परतफेड निसर्गाला केली, हा समतोल कसा साधला जातो, ते आपल्याला इथे शिकायला मिळते, या आदिवासी परंपरेत अनुभवता येते. इथे येण्यापूर्वी माझे अशा अनेक सहकाऱ्यांशी बोलणे झाले आणि त्यामुळेच मला यायला उशीर देखील झाला. द एलिफंट व्हिस्पर्स डॉक्युमेंटरी ज्याने ऑस्कर जिंकला आहे, तो निसर्ग आणि प्राणी यांच्यातील अद्भुत नातेसंबंधाचा आपला वारसा प्रतिबिंबित करतो. मिशन LiFE म्हणजेच पर्यावरण अनुकूल जीवनशैलीची संकल्पना समजून घेण्यात सुद्धा आदिवासी समाजाच्या जीवनशैलीची खूप मदत होते. माझे तुम्हाला आवाहन आहे कि आमच्या आदिवासी समाजाच्या जीवन आणि परंपरेतून तुमच्या देशासाठी, तुमच्या समाजासाठी नक्कीच काही ना काही सोबत न्या. या कार्यक्रमाला आल्याबद्दल पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि आज जी नवीन व्याघ्रसंख्या आपल्या समोर आली आहे, आगामी काळात आपण आणखीन नवीन आकडे पार करू आणि नवीन यश मिळवू याची संपूर्ण जगाला मी खात्री देतो.
खूप खूप धन्यवाद!