केरळचे राज्यपाल श्री आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री श्री पिनाराई विजयन जी, राज्यमंत्री, माझे सहकारी श्री वी. मुरलीधरन जी, इस्रो परिवारातील सर्व सदस्य, यांना माझा नमस्कार!
आपल्या धाडसी साथीदारांच्या सन्मानार्थ, आपण सर्वांनी उभे राहून, टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा गौरव करूया. भारत मातेचा विजय असो!
भारत मातेचा विजय असो!
भारत मातेचा विजय असो!
भारत मातेचा विजय असो!
खूप खूप धन्यवाद!
प्रत्येक राष्ट्राच्या विकासाच्या प्रवासात काही क्षण असे येतात, जे वर्तमाना सोबतच येणाऱ्या पिढ्यांची देखील व्याख्या करतात. आज भारतासाठी हा असाच क्षण आहे. आपली आजची पिढी खूप भाग्यवान आहे, त्यांना जल, जमीन, आकाश आणि अंतराळात ऐतिहासिक कामांचे यश लाभत आहे. काही दिवसांपूर्वी मी अयोध्येत म्हटले होते की, ही एका नव्या युगाची सुरुवात आहे. या नव्या युगात भारत जागतिक व्यवस्थेत आपले स्थान सातत्याने विस्तारत आहे. आणि हे आपल्या अंतराळ कार्यक्रमातही अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे.
मित्रांनो,
गेल्या वर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तिरंगा ध्वज फडकवणारा भारत हा पहिला देश ठरला. आज शिवशक्ती पॉइंट संपूर्ण जगाला भारताच्या क्षमतेची ओळख करून देत आहे. आता, विक्रम साराभाई अंतराळ केंद्रामध्ये, आपण सर्वजण आणखी एका ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार आहोत. काही वेळापूर्वी, देशाला प्रथमच आपल्या चार गगनयान प्रवाशांची ओळख झाली. ही केवळ चार नावे आणि चार मानव नाहीत, तर 140 कोटी आकांक्षा अंतराळात घेऊन जाणाऱ्या या चार शक्ती आहेत. 40 वर्षांनंतर एक भारतीय अंतराळात जाणार आहे. पण या खेपेस वेळही आपली, उलटगणतीही आपली आणि यानही आपले! मला आज या अंतराळवीरांना भेटण्याचे, त्यांच्याशी बोलण्याचे आणि त्यांना देशासमोर सादर करण्याचे भाग्य लाभले याचा मला आनंद आहे. संपूर्ण देशाच्या वतीने मी या सहकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज 21व्या शतकातील भारताच्या यशात तुमचे नावही जोडले गेले आहे.
तुम्ही आजच्या भारताचा विश्वास आहात. तुम्ही आजच्या भारताचे शौर्य, साहस आणि शिस्त आहात. भारताचा मान वाढवण्यासाठी, अंतराळात तिरंगा फडकवण्यासाठी तुम्ही गेली अनेक वर्षे अहोरात्र काम करत आहात. तुम्ही भारताच्या त्या अमृत पिढीचे प्रतिनिधी आहात, जिच्यात आव्हाने पेलण्याची तळमळ आहे, आव्हानांनाच आव्हान देण्याची क्षमता आहे. तुमच्या कठोर प्रशिक्षणक्रमामध्ये योगाची मोठी भूमिका आहे. या मोहिमेत, निरोगी मन आणि निरोगी शरीर या दोघांमध्ये समन्वय असणे खूप महत्वाचे आहे! तुम्ही असेच झटत रहा, खंबीर रहा. देशाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, देशाच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. तुम्हाला प्रशिक्षण देण्यात व्यग्र असणाऱ्या, गगनयान प्रकल्पाशी संबंधित असलेल्या इस्रोच्या सर्व सहकाऱ्यांनाही मी माझ्या शुभेच्छा देतो.
पण यासोबतच मला काही चिंताही व्यक्त करायच्या आहेत. आणि काही लोकांना त्या गोष्टी कटू वाटू शकतात. माझी देशातील जनतेला आणि विशेषत: देशातील प्रसारमाध्यमांना कळकळीची हात जोडून विनंती आहे, या चार मित्रांनी गेली काही वर्षे अविरत तपश्चर्या आणि साधना केली आहे, आणि आपला चेहरा जगाला न दाखवता केली आहे. पण अजून बरेच काही करायचे आहे. आणि त्यांना खूप कठीण परीक्षांना सामोरे जायचे आहे. त्यांना अजून आपले शरीर आणि मन घट्ट करायचे आहे. पण आपल्या देशातील लोकांच्या मानसिकतेप्रमाणे आता हे चौघेही नामांकीत (सेलिब्रिटी) झाले आहेत. आता जेव्हा ते कुठेही जातील तेव्हा कुणीतरी त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी धावेल आणि कुणाला त्यांच्यासोबत सेल्फी, फोटो आणि स्वाक्षऱ्या हव्या असतील. आता काही माध्यमांचे लोकही माईकचे (ध्वनीग्राहक) दांडे घेऊन उभे राहतील. त्यांच्या कुटुंबियांचे डोके खातील. लहानपणी काय करत होते, इथपर्यंत कसे आले? शिक्षकांकडे जातील, शाळेत जातील. थोडक्यात काय तर त्यांच्या साधनेत व्यत्यय येईल, असे वातावरण निर्माण होईल.
आणि म्हणूनच माझी हात जोडून प्रार्थना आहे, आता त्यांचा खरा प्रवास सुरु होतोय. आपण त्यांना जेवढे सहकार्य करु, त्यांच्या कुटुंबाला सहकार्य करु तेवढे बरे…..त्यांना बाधक ठरतील अशा गोष्टी टाळलेल्याच बऱ्या! त्यांचे लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रीत राहिले पाहिजे, हातात तिरंगा आहे, अंतराळ आहे, 140 कोटी देशवासीयांचे स्वप्न आहे, हाच आपल्या सर्वांचा संकल्प आहे. हीच भावना आहे, म्हणूनच आपण जमेल तितके अनुकूल वातावरणच तयार करु. मला वाटते देशाचे सहकार्य खूप महत्वाचे आहे. माझ्या माध्यमातील सहकाऱ्यांचे सहकार्य खूप महत्त्वाचे आहे. आत्तापर्यंत ही नावे लोकांसमोर आली नव्हती, त्यामुळे आमचे काम सुरळीत सुरु होते. मात्र आता त्यांच्याही अडचणी वाढणार आहेत. आणि कदाचित कधी-कधी त्यांनाही वाटू लागेल- चला, सेल्फी घेऊ, काय बिघडते? परंतु या सर्व गोष्टींपासून आपण दूर राहिले पाहिजे.
मित्रांनो,
या कार्यक्रमापूर्वी मला गगनयानाबद्दलही सविस्तर माहिती देण्यात आली. विविध उपकरणांची माहिती देण्यात आली. त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. गगनयानामध्ये वापरलेली बहुतांश उपकरणे मेड इन इंडिया (स्वदेशी बनावटीची) आहेत हे जाणून मला खूप आनंद झाला. हा किती मोठा योगायोग आहे की जेव्हा भारत जगातील सर्वोच्च तिसरी अर्थव्यवस्था होण्यासाठी झेप घेत आहे, त्याच वेळी भारताचे गगनयान देखील आपल्या अंतराळ क्षेत्राला नवीन शिखरावर घेऊन जाणार आहे. आज इथे अनेक प्रकल्पांचे लोकार्पण देखील झाले. यामुळे जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाचे सामर्थ्य तर वाढेलच, शिवाय रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील
आणि मित्रांनो,
मला आनंद आहे की आपल्या अंतराळ क्षेत्रात महिला शक्तीला खूप महत्त्व दिले जात आहे. चांद्रयान असो किंवा गगनयान, महिला शास्त्रज्ञांशिवाय अशा कोणत्याही मोहिमेची कल्पनाही करता येणार नाही. आज इस्रोमध्ये 500 हून अधिक महिला महत्वाच्या पदांवर आहेत. मी येथे उपस्थित असलेल्या सर्व महिला शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि अभियंते यांचे मनापासून कौतुक करतो. मात्र यामुळे पुरुष वर्गाने नाराज होऊ नये, त्यांचे तर अभिनंदन होतच असते.
मित्रांनो,
भारताच्या अंतराळ क्षेत्राचे खूप मोठे योगदान आहे, ज्याची फारशी चर्चा होत नाही. तरुण पिढ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्तीचे बीज पेरण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. इस्रोचे यश पाहून अनेक मुलांना वाटते की ते मोठे झाल्यावर ते देखील शास्त्रज्ञ बनतील. यानाची ती उलटगणती ..लाखो मुलांना प्रेरणा देते. घरी कागदापासून विमाने उडवणारे जे वैमानिक अभियंते आहेत , त्यांना मोठे झाल्यावर तुमच्यासारखे अभियंता आणि शास्त्रज्ञ बनायचे आहे. आणि कोणत्याही देशासाठी, तरुण पिढीची ही इच्छाशक्ती खूप मोठी संपत्ती असते. मला आठवतंय , चांद्रयान-2 उतरण्याची वेळ जवळ आली होती. देशभरातील मुले तो क्षण पाहत होती.
त्या क्षणी मुले खूप काही शिकली. त्यानंतर आला 23 ऑगस्ट 2023 हा दिवस . चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगने तरुण पिढीमध्ये नवीन ऊर्जा भरली. हा दिवस अंतराळ दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. तुम्ही सर्वांनी तुमच्या अंतराळ प्रवासात भारताला असे अनेक एकाहून एक सरस असे यशाचे क्षण दिले आहेत. अंतराळ क्षेत्रात आपण अनेक विक्रम केले आहेत. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचण्यात भारताला यश आले. एकाच मोहिमेत शंभराहून अधिक उपग्रह प्रक्षेपित करणारा देश म्हणजे आपला भारत देश आहे. चांद्रयानच्या यशानंतरही तुम्ही अनेक यशस्वी कामगिरी केली आहे. तुम्ही आदित्य-L1 ला पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर त्याच्या कक्षेत सुरक्षितपणे पोहोचवले आहे. जगातले काही मोजकेच देश हे करू शकले आहेत. 2024 सुरू होऊन काही आठवडेच झाले आहेत, इतक्या कमी काळात तुम्ही एक्सपोसॅट आणि इनसॅट-3 डीएस चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.
मित्रांनो,
तुम्ही सर्वजण मिळून भविष्यासाठी नवीन संधींची कवाडे खुली करत आहात. आगामी दहा वर्षांत भारताची अंतराळ अर्थव्यवस्था पाच पटीने वाढून 44 अब्ज डॉलर्स होईल असा अंदाज आहे. अंतराळ क्षेत्रात भारत एक मोठे जागतिक व्यावसायिक केंद्र बनणार आहे. येत्या काही वर्षांत आपण पुन्हा एकदा चंद्रावर जाणार आहोत. आणि या यशानंतर आपण आणखी मोठे ध्येय ठेवले आहे. आता आपल्या मोहिमा तंत्रज्ञानाच्या दृष्टिने अधिक आव्हानात्मक असतील. आपण चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करू आणि ते पृथ्वीवर परत आणू. यामुळे चंद्राबद्दलची आपली माहिती आणि समज अधिक व्यापक होईल. यानंतर शुक्र देखील इस्रोच्या लक्ष्यांपैकी एक आहे. 2035 पर्यंत, अंतराळात भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक असेल, जे आपल्याला अंतराळातील अज्ञात विस्ताराचा शोध घेण्यास मदत करेल. एवढेच नाही तर या अमृतकाळात भारताचे अंतराळवीर भारतीय यानातून चंद्रावर उतरताना दिसतील.
एकविसाव्या शतकातील भारत, विकसित होत असलेला भारत, आज आपल्या सामर्थ्याने जगाला अचंबित करत आहे. गेल्या दहा वर्षांत आपण सुमारे 400 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. त्याउलट त्यापूर्वीच्या दहा वर्षांत केवळ 33 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले होते . दहा वर्षांपूर्वी संपूर्ण देशात एक किंवा दोन स्टार्टअप्स होते . आज त्यांची संख्या दोनशेच्या वर गेली आहे. यातील बहुतांश स्टार्टअप युवकांनी सुरू केले आहेत. आज यापैकी काही लोक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. दूरदृष्टी, प्रतिभा आणि त्यांच्या उद्योजकतेची प्रशंसा करतो. अलीकडच्या काळात हाती घेतलेल्या अंतराळ सुधारणांमुळे या क्षेत्राला नवी चालना मिळाली आहे. गेल्या आठवड्यातच आम्ही अंतराळासाठी थेट परदेशी गुंतवणुकीचे धोरणही जारी केले आहे. याअंतर्गत अंतराळ क्षेत्रातही 100 टक्के परदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे. या सुधारणेमुळे जगातील मोठ- मोठ्या अंतराळ संस्था भारतात येऊ शकतील आणि इथल्या तरुणांना संपूर्ण जगासमोर त्यांची प्रतिभा आणि कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल.
एकविसाव्या शतकातील भारत, विकसित होत असलेला भारत, आज आपल्या सामर्थ्याने जगाला अचंबित करत आहे. गेल्या दहा वर्षांत आपण सुमारे 400 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. त्याउलट त्यापूर्वीच्या दहा वर्षांत केवळ 33 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले होते . दहा वर्षांपूर्वी संपूर्ण देशात एक किंवा दोन स्टार्टअप्स होते . आज त्यांची संख्या दोनशेच्या वर गेली आहे. यातील बहुतांश स्टार्टअप युवकांनी सुरू केले आहेत. आज यापैकी काही लोक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. दूरदृष्टी, प्रतिभा आणि त्यांच्या उद्योजकतेची प्रशंसा करतो. अलीकडच्या काळात हाती घेतलेल्या अंतराळ सुधारणांमुळे या क्षेत्राला नवी चालना मिळाली आहे. गेल्या आठवड्यातच आम्ही अंतराळासाठी थेट परदेशी गुंतवणुकीचे धोरणही जारी केले आहे. याअंतर्गत अंतराळ क्षेत्रातही 100 टक्के परदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे. या सुधारणेमुळे जगातील मोठ- मोठ्या अंतराळ संस्था भारतात येऊ शकतील आणि इथल्या तरुणांना संपूर्ण जगासमोर त्यांची प्रतिभा आणि कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल.
मित्रांनो,
आपण सर्वांनी मिळून 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प पूर्णत्वास नेण्यात अंतराळ क्षेत्राची भूमिका फार मोठी आहे. आणि अंतराळ शास्त्र हे केवळ रॉकेट शास्त्र नाही तर ते सर्वात मोठे सामाजिक शास्त्र देखील आहे. अंतराळ तंत्रज्ञानाचा समाजाला सर्वाधिक फायदा होतो, सर्वांनाच फायदा होतो. आज आपल्या दैनंदिन जीवनात जे काही तंत्रज्ञान वापरले जाते, त्यात अंतराळ तंत्रज्ञानाची खूप मोठी भूमिका आहे. शेतीमध्ये पिकांची देखभाल असो, हवामान, चक्रीवादळ आणि इतर आपत्तींची माहिती असो, सिंचन सुविधा असो, गाडी चालविण्यास मदत करणारे नकाशे असो, अशी अनेक कामे उपग्रह डेटाद्वारे केली जातात. भारतातील लाखो मच्छिमारांना नाविकच्या माध्यमातून अचूक माहिती मिळवून देण्यामागे अंतराळ क्षेत्राची मोठी ताकद आहे. आपले उपग्रह केवळ आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्यातच मदत करत नाहीत तर ते दुर्गम भागात शिक्षण, दळणवळण आणि आरोग्य सेवा पुरवण्यातही मदत करतात. म्हणूनच विकसित भारताच्या उभारणीत तुम्हा सर्वांची , इस्रोची आणि संपूर्ण अंतराळ क्षेत्राची मोठी भूमिका आहे. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. 140 कोटी देशवासियांच्या वतीने मी टीम गगनयानला विशेष शुभेच्छा देतो.! पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद!