श्री सद्गुरु चरण कमलेभ्यो नमः।
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी महेंद्र नाथ पांडे जी, उत्तर प्रदेश सरकार मधील मंत्री बंधु अनिल जी, सद्गुरु आचार्य पूज्य श्री स्वतंत्रदेव जी महाराज, पूज्य श्री विज्ञानदेव जी महाराज, इतर मान्यवर, देशभरातून येथे आलेले भाविक आणि माझ्या कुटुंबियांनो,
काशी येथील वास्तव्याचा आजचा माझा दुसरा दिवस आहे. नेहमीप्रमाणे, काशीमध्ये घालवलेला प्रत्येक क्षण खरोखरच अद्भुत असतो, अद्भुत अनुभवांनी भरलेला असतो. तुम्हाला आठवत असेल, दोन वर्षांपूर्वी आपण अखिल भारतीय विहंगम योग संस्थानाच्या वार्षिक समारंभात अशाच पद्धतीने एकत्र आलो होतो. मला पुन्हा एकदा विहंगम योग संत संस्थानाच्या शताब्दी सोहळ्याच्या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे. विहंगम योग साधनेच्या या यात्रेने 100 वर्षांचा अविस्मरणीय प्रवास पूर्ण केला आहे. महर्षी सदाफल देवजींनी मागच्या शतकात ज्ञान आणि योगसाधनेची दिव्य ज्योत प्रज्वलित केली होती. शंभर वर्षांच्या या प्रवासात, या दिव्य ज्योतीने देशभरातील आणि जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले आहे. या पावन प्रसंगी येथे 25 हजार कुंडीय स्वरवेद ज्ञान महायज्ञही आयोजित करण्यात आला आहे. या महायज्ञातील प्रत्येक आहुती विकसित भारताचा संकल्प अधिक दृढ करेल, असा विश्वास मला वाटतो, या विश्वासामुळे मला मनापासून आनंद वाटतो. या प्रसंगी मी महर्षी सदाफल देवजींना विनम्र अभिवादन करतो आणि पूर्ण भक्तीभावाने त्यांच्याप्रती माझ्या हृदयस्थ भावना समर्पित करतो. आपल्या गुरूंची परंपरा अखंडपणे पुढे नेणाऱ्या सर्व संतांनाही मी विनम्र अभिवादन करतो.
माझ्या कुटुंबियांनो,
आपणासारख्या संतांच्या सान्निध्यात काशीच्या जनतेने मिळून विकासाचे आणि नवनिर्मितीचे अनेक नवे विक्रम रचले आहेत. काशीचा कायापालट करण्यासाठी सरकार, समाज आणि संत असे सगळे एकत्रितपणे काम करत आहेत. आज स्वरवेद मंदिराचे पूर्णत्व हे या दैवी प्रेरणेचे उदाहरण आहे. हे महान मंदिर महर्षी सदाफल देव जी यांच्या शिकवणीचे आणि उपदेशाचे प्रतीक आहे. या मंदिराचे दिव्यत्व आपल्याला जितके आकर्षित करते तितकीच त्याची भव्यताही आपल्याला थक्क करते. त्यामुळे मंदिरात फेरफटका मारत असताना मी स्वतःसुद्धा मंत्रमुग्ध झालो होतो. स्वरवेद मंदिर हे भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक सामर्थ्याचे आधुनिक प्रतीक आहे. या मंदिराच्या भिंतींवर अगदी कुशलरित्या स्वरवेद कोरलेले मी पाहिले. वेद, उपनिषद, रामायण, गीता, महाभारत अशा धर्मग्रंथातील दैवी संदेशही त्यात चित्रांच्या माध्यमातून कोरले गेले आहेत. त्यामुळे हे मंदिर अध्यात्म, इतिहास आणि संस्कृतीचे जिवंत उदाहरण आहे. येथे हजारो भाविक एकाच वेळी विहंगम योगसाधना करू शकतात. त्यामुळे हे महान मंदिर एक योगतीर्थ देखील आहे आणि त्याच बरोबर ते ज्ञानतीर्थ देखील आहे. या अद्भुत आध्यात्मिक उभारणीसाठी मी स्वरवेद महामंदिर ट्रस्ट आणि त्याच्या लाखो अनुयायांचे अभिनंदन करतो. हे अनुष्ठान पुर्णत्वाला नेणारे पूज्य स्वामी श्री स्वतंत्रदेव जी आणि पूज्य श्री विज्ञानदेव जी यांचे मी विशेष अभिनंदन करतो.
माझ्या कुटुंबियांनो,
भारत हे असे राष्ट्र आहे जे शतकानुशतके जगासाठी आर्थिक समृद्धीचे आणि भौतिक विकासाचे उदाहरण राहिले आहे. आम्ही प्रगतीचे मापदंड तयार केले आहेत आणि समृद्धीचे टप्पे निर्धारित केले आहेत. भारताने कधीही भौतिक प्रगतीला भौगोलिक विस्तार आणि शोषणाचे माध्यम होऊ दिले नाही. भौतिक प्रगतीसाठी आपण आध्यात्मिक आणि मानवी प्रतीकांचीही रचना केली. काशीसारख्या चैतन्यशील सांस्कृतिक केंद्रांचे आशीर्वाद आम्ही घेतले, आम्ही कोणार्कसारखी मंदिरे बांधली! सारनाथ आणि गया येथे आम्ही प्रेरणादायी स्तूप बांधले. आपल्याकडे नालंदा, तक्षशिलासारखी विद्यापीठे स्थापन झाली! म्हणूनच, भारतातील या आध्यात्मिक रचनांच्या परिसरातच आपल्या शिल्पांनी आणि कलांनी उत्कृष्टतेचा कळस गाठला. येथून ज्ञान आणि संशोधनाचे नवे मार्ग खुले झाले, उद्यम आणि उद्योगांशी संबंधित अनंत कल्पनांचा जन्म झाला, श्रद्धेबरोबरच योगविद्येसारखे विज्ञानही बहरले आणि येथूनच संपूर्ण जगासाठी मानवी मूल्यांचे अखंड प्रवाह प्रवाहित झाले.
बंधु आणि भगिनिंनो,
गुलामगिरीच्या काळात भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अत्याचारी लोकांनी सर्वप्रथम आपल्या या प्रतिकांना लक्ष्य केले. स्वातंत्र्यानंतर या सांस्कृतिक प्रतिकांची पुनर्निर्मिती करणे गरजेचे होते. जर आपण आपल्या सांस्कृतिक अस्मितेचा आदर केला असता तर देशामध्ये एकता आणि स्वाभिमानाची भावना अधिक दृढ झाली असती. मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही. स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्मितीलाही विरोध झाला. आणि या विचारसरणीने अनेक दशके देशावर वर्चस्व गाजवले. याचा परिणाम असा झाला की देश हीनभावनेच्या गर्तेत कोसळत राहिला आणि आपल्या वारशाचा अभिमान बाळगण्याचाही विसर पडला.
पण बंधू आणि भगिनींनो,
आज स्वातंत्र्यप्राप्तीला 7 दशके उलटून गेल्यानंतर पुन्हा एकदा कालचक्र फिरले आहे. देश आता लाल किल्ल्यावरून ‘गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्ती’ आणि ‘आपल्या वारशाचा अभिमान’ अशा घोषणा देत आहे. सोमनाथपासून सुरू झालेल्या या कामाला आता मोहिमेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आज काशीमधील विश्वनाथ धामाची भव्यता भारताच्या अविनाशी वैभवाच्या गाथेचे गुणगान करीत आहे. आज महाकाल महालोक आपल्या अमरत्वाचा दाखला देत आहे. आज केदारनाथ धामसुद्धा विकासाच्या नव्या शिखराला स्पर्श करत आहे. बुद्ध सर्किट विकसित करून भारत पुन्हा एकदा जगाला बुद्धाच्या तपोभूमीमध्ये आमंत्रित करत आहे. देशात राम सर्किट्सच्या विकासासाठीही वेगाने काम सुरू आहे. आणि, अयोध्येतील राम मंदिराचे बांधकामही येत्या काही आठवड्यांत पूर्ण होणार आहे.
मित्रांनो,
देश आपले सामाजिक वास्तव आणि सांस्कृतिक ओळख समाविष्ट करेल तेव्हाच आपण सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करू शकतो. त्यामुळेच आज आपली तीर्थक्षेत्रेही विकसित होत आहेत आणि आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये भारत नवनवीन विक्रमही निर्माण करत आहे. आज देशातील विकासाचा वेग काय आहे हे एकट्या बनारसला पाहिल्यावरच कळून येतो. काशी विश्वनाथ धामच्या या संकुलाच्या उभारणीला गेल्या आठवड्यातच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. तेव्हापासून बनारसमधील रोजगार आणि व्यवसायाला नवी गती मिळाली आहे. आधी विमानतळावर पोहोचताच शहरात कसे पोहोचायचे याची चिंता सतावत असे. खराब रस्ते, सगळीकडे गोंधळ, ही बनारसची ओळख होती. पण, आता बनारस म्हणजे विकास! आता बनारस म्हणजे श्रद्धेसह आधुनिक सुविधा! आता बनारस म्हणजे स्वच्छता आणि बदल! बनारस आज विकासाच्या अनोख्या वाटेवर चालला आहे. वाराणसीमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी गेल्या 9 वर्षांत ऐतिहासिक काम करण्यात आले आहे. वाराणसीला सर्व शहरांशी जोडणारे रस्ते एकतर चौपदरी किंवा सहापदरी करण्यात आले आहेत. पूर्णपणे नवीन रिंगरोडही बांधण्यात आला आहे. वाराणसीमध्ये नवीन रस्त्यांचे जाळे टाकले जात आहे, जुन्या रस्त्यांसोबतच नवीन क्षेत्रेही विकसित केली जात आहेत.
बनारसमध्ये रेल्वे स्थानकांचा विकास असो, बनारसमधून नवनवीन गाड्यांची सुरूवात असो, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर असो, विमानतळावरील सुविधांचा विस्तार असो, गंगेवरील घाटांची पुनर्बांधणी असो, गंगेमधील क्रुझपर्यटन असो, बनारसमध्ये आधुनिक रुग्णालयांचे निर्माण असो, नवीन आणि आधुनिक दुग्धशाळेची स्थापना असो, गंगेच्या काठावरील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी मदत असो, आमचे सरकार या ठिकाणच्या विकासात कोणतीही कसर सोडत नाहीए. बनारसच्या तरुणांच्या कौशल्य विकासासाठी येथे प्रशिक्षण संस्थाही उघडण्यात आल्या आहेत. सांसद रोजगार मेळाव्यातून हजारो तरुणांना रोजगारही मिळाला आहे.
बंधू आणि भगिनींनो,
मी येथे या आधुनिक विकासाचा उल्लेख करत आहे कारण आपल्या आध्यात्मिक प्रवासातील सर्वात मोठी समस्या म्हणजे पायाभूत सुविधांचा अभाव होती. उदाहरणार्थ, बनारसला येणार्या प्रवाशांना शहराबाहेरील या स्वरवेद मंदिराला भेट द्यायला नक्कीच आवडेल. पण, त्यांच्यासाठी आजसारखे रस्ते नसते, तर त्यांची इच्छा असूनही ते पूर्ण करू शकले नसते. पण, आता बनारसला येणाऱ्या भाविकांसाठी स्वरवेद मंदिर हे प्रमुख ठिकाण म्हणून उदयास येणार आहे. यामुळे आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि लोकांच्या प्रगतीचे मार्ग खुले होतील.
माझ्या कुटुंबियांनो,
विहंगम योग संस्था आपल्या आध्यात्मिक कल्याणासाठी जेवढी समर्पित आहे, तेवढीच ती समाजसेवेसाठीही कार्यरत आहे. सदाफल देवजींसारख्या महर्षींचीही ही परंपरा आहे. सदाफल देवजी हे योगनिष्ठ संत असण्यासोबतच स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्यसैनिक देखील होते. आज स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात त्यांचे संकल्प पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्या प्रत्येक अनुयायाची आहे. मागच्या वेळी जेव्हा मी तुमच्यामध्ये आलो तेव्हा देशाच्या काही अपेक्षा तुमच्यासमोर ठेवल्या होत्या. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर नऊ संकल्प आणि नऊ आग्रह ठेवत आहे. आणि आता विज्ञानदेवजींनीही मला मागच्या वेळी जे बोलले होते त्याची आठवण करून दिली.
माझा पहिला आग्रह आहे -
प्रथम - पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा आणि अधिकाधिक लोकांना जलसंधारणाविषयी जागरूक करा.
दुसरे- गावोगाव जा आणि लोकांना डिजिटल व्यवहारांबद्दल जागरूक करा, त्यांना ऑनलाइन पेमेंटबद्दल शिकवा.
तिसरे- आपले गाव, आपला परिसर, आपले शहर स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी कार्य करा.
चौथे- स्थानिक उत्पादनांचा शक्य तितका प्रचार करा, मेड इन इंडिया उत्पादनांचाच वापर करा.
पाचवा- जितका शक्य असेल तितका आधी स्वतःचा देश बघा, स्वतःच्याच देशात फिरून घ्या आणि दुसऱ्या देशात जायचे असेल तर संपूर्ण देश बघितल्याशिवाय परदेशात जायचा विचार करु नका. आजकाल मी मोठ्या श्रीमंतांनाही सांगत असतो की परदेशात लग्न का करतात, म्हणून मी त्यांना म्हणतो 'वेड इन इंडिया', 'भारतात लग्न करा'.
माझे सहावे सांगणे आहे - शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबद्दल अधिकाधिक जागरूक करत राहा. मागच्या वेळीही मी तुम्हाला हा आग्रह केला होता, आता पुन्हा सांगत आहे. पृथ्वी मातेला वाचवण्यासाठी ही एक अतिशय महत्त्वाची मोहीम आहे.
माझा सातवा आग्रह आहे - तुमच्या दैनंदिन जीवनात श्री-अन्न म्हणून भरडधान्य समाविष्ट करा, त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करा, ते एक सुपर फूड आहे.
माझा आठवा आग्रह आहे – फिटनेस असो, योग असो किंवा खेळ असो, त्याला तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा.
आणि नववा आग्रह आहे - किमान एका गरीब कुटुंबाचा आधार बना, त्यांना मदत करा. भारतातील गरिबी दूर करण्यासाठी हे आवश्यक आहे.
सध्या आपण बघत आहात की विकास भारत संकल्प यात्रा सुरु आहेत. काल संध्याकाळी याच्याशी संबंधित कार्यक्रमात मी सहभागी झालो. काही काळानंतर मी येथून पुन्हा विकास भारत संकल्प यात्रेत सहभागी होणार आहे. या प्रवासाबद्दल जनजागृती करणे ही तुम्हा सर्वांची आणि प्रत्येक धर्मगुरूचीही जबाबदारी आहे. मला असे वाटते की हे सर्व आपले वैयक्तिक संकल्प देखील बनले पाहिजेत. ‘गावों विश्वस्य मातरः’ हे जे आदर्श वाक्य आहे ते आपल्या आस्थेसोबतच आपल्या व्यवहाराचा भाग बनले तर भारताचा विकास अधिक वेगाने होईल. या भावनेसह, मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि मला दिलेल्या सन्मान आणि आदराबद्दल मी मनापासून पूज्य संतांचे आभार मानतो!
माझ्यासोबत बोला -
भारत माता की – जय.
भारत माता की – जय.
भारत माता की – जय.
धन्यवाद.