“सुरत शहराच्या वैभवात नवा हिरा जोडला गेला”
“सुरत हिरे बाजार भारतीय कलाकुसर, कारागीर, साहित्य आणि संकल्पना यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करतो. ही इमारत नव्या भारताच्या क्षमता आणि संकल्पांचे प्रतीक”.
"आज सुरत लाखो तरुणांसाठी स्वप्न पूर्ण करणारे शहर बनले आहे"
"मोदींची हमी सुरतच्या लोकांना आधीपासूनच परिचित आहे"
"जर सुरतने ठरवले, तर रत्न- आभूषणे यांच्या निर्यातीत आपला वाटा दोन अंकी होऊ शकतो"
“सुरत सातत्याने आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्रांशी जोडले जात आहे. जगातील फार कमी शहरांमध्ये अशी आंतरराष्ट्रीय संपर्क सुविधा उपलब्ध आहे”
“सुरतची प्रगती झाली तर गुजरातची प्रगती होईल आणि गुजरातची प्रगती झाली तर देशाचीही प्रगती होईल”

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, सुरतचे स्थानिक खासदार सी.आर. पाटील, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, देशाच्या हिरे उद्योगातील नामवंत, आणि इतर मान्यवर महिला आणि सद्गृहस्थ, नमस्कार!

सुरत म्हणजे सुरत! सुरतकडे इतिहासाचा अनुभव आहे, वर्तमानाचा वेग आहे आणि भविष्याची दूरदृष्टी आहे, या सर्वांचे नाव आहे सुरत!! आणि हे सुरत माझे सुरत आहे. कोणत्याही कामामध्ये एकही कसर सोडली जात नाही, असे हे सुरत आहे. त्याच प्रमाणे सर्व गोष्टींच्या बाबतीत सुरतकरांना कितीही घाई, गडबड असली तरी, भोजन तसेच खाण्या-पिण्याच्या दुकानामध्ये जर अर्धा तास रांग लावावी लागत असेल तरीही त्यांच्या मते काही हरकत  नाही, त्यांच्याकडे तितका धीर नक्कीच आहे. प्रचंड पाऊस असो आणि अगदी गुडघ्यापर्यंत पाणी भरलेले असो, परंतु पकोडे -भजीच्या दुकानामध्ये जायचं आहे म्हणजे जायचंच. शरद पौर्णिमा, चंडी पाडवा, या दिवशी जगातले सगळे लोक घराच्या गच्चीवर जातात. आणि इथं, आमचे  सुरतकर रस्त्याच्या कडेला संपूर्ण कुटुंबाबरोबर घारी म्हणजे मिठाई खात असतात. आणि त्यामध्ये त्यांना आनंद इतका मिळत असतो की, हे साहेब जवळच्या कोणत्याही स्थळांना फिरायला जात नाहीत, मात्र संपूर्ण विश्वामध्ये फिरतात. मला आठवते की, 40-45 वर्षांपूर्वी सौराष्ट्रातील बंधू सुरतच्या दिशेने गेले, त्यावेळी मी सोराष्ट्रातील आमच्या जुन्या मित्रांना विचारत होतो की, तुम्ही सौराष्ट्र सोडून सुरतेमध्ये आला आहात, तर कसे वाटते? त्यावेळी ते म्हणत होते सुरतमध्ये आणि आमच्या काठियावाडमध्ये खूपच फरक आहे. ही गोष्ट मी 40-45 वर्षांपूर्वींची सांगतोय. मी विचारत होतो, काय फरक आहे? तर ते सांगत होते, काठियावाडमध्ये जर समोरा-समोर मोटारसायकलींची धडक झाली तर दोघांमध्ये तलवार बाहेर काढण्यापर्यंत वितंडवाद होत असे. मात्र सुरतमध्ये अशा प्रकारे मोटारसायकलींची धडक झाली तर, लगेच म्हणतात, असं आहे भाई, चूक तर तुझी आहे आणि माझीही चूक आहे, आता दे सोडून!  इतके अंतर आहे.

मित्रांनो, आज सुरत शहराच्या  भव्यतेमध्ये  आणि एक हिरा जोडला गेला आहे. आणि हा हिरा काही लहान-मोठा नाही , तर तो दुनियातला सर्वश्रेष्ठ आहे. या चमचमत्या हि-याच्या  लखलखाटापुढे जगातल्या मोठमोठ्या इमारतींची चमक फिकी पडत आहे. आणि आत्ताच वल्लभ भाई, लालजी भाई यांनी अतिशय नम्रतेने याबाबतीत काही गोष्टी सांगत होते. आणि कदाचित इतक्या मोठ्या मोहिमेला यशस्वी करण्यामागे त्यांची ही नम्रता, सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा स्वभाव, यासाठी त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे  जितके अभिनंदन करावे, तितके कमीच आहे. वल्लभ भाईंनी सांगितले की, मला पाचच मिनिटे मिळाली आहेत. परंतु वल्लभ भाई, तुमच्याबरोबर किरण जोडला गेला आहे. आणि किरणामध्ये तर संपूर्ण सूर्याला समजून घेण्याचे सामर्थ्य असते. आणि म्हणूनच तुम्हाला मिळालेली पाच मिनिटे म्हणजे एका खूप मोठ्या शक्तीचा परिचय देणारी आहेत.

 

आता जगामध्ये कोणीही हिरे बाजाराचे नाव उच्चारले तर त्याबरोबर सुरतचे नाव घेतले जाईल. भारताचे नावही घेतले जाईल. सुरत हिरे बाजार पाहताना, भारतीय डिजाईन, भारतीय डिजाईनर्स, भारतीय सामुग्री आणि भारतीय संकल्पना यांचे सामर्थ्य दिसून येते. ही वास्तू, नवीन भारताचे नवे सामर्थ्य आणि नवीन संकल्पाचे प्रतीक आहे. मी सुरत हिरे बाजार वास्तू निर्मितीसाठी हिरे उद्योगाचे, सुरतचे, गुजरातचे, संपूर्ण देशाचे अभिनंदन करतो. 

मला काही भाग पाहण्याची संधी मिळाली. कारण तुम्हाला माझी वाट पहावी लागावी, असे काही मला वाटत नव्हते. तरीही मी यांना म्हणालो, खूप जुने मित्र आहेत, त्यामुळे काही ना काही सांगत असतो. मी म्हणालो, तुम्ही पर्यावरण क्षेत्रातले वकील आहात, हरित वास्तू म्हणजे नेमके काय आहे, हे जरा बोलावून दाखवा. आणखी दुसरी एक गोष्ट मी म्हणालो, संपूर्ण देशातून स्थापत्य विशारद आणि संरचना अभियांत्रिकी विषयाचे जे विद्यार्थी आहेत, त्यांना सांगा की, इमारतीची रचना आधुनिक पद्धतीने कशी केली जाते, याचा तुम्ही सर्वजण इथे या आणि अभ्यास करा. आणि मी असेही सांगितले की,  लॅंड स्केप कसे असावे, पंचतत्वाची संकल्पना कशी असते, हे पाहण्यासाठीही लॅंडस्केपच्या क्षेत्रामध्ये  जे काम करतात, त्यांनाही आमंत्रित केले जावे.

मित्रांनो,

आज सुरतच्या लोकांना, इथल्या व्यापारी वर्गाला, व्यावसायिकांना आणखी दोन भेटी मिळत आहेत. आजच सुरत विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे लोकार्पण झाले आहे. आणि दुसरे एक मोठे काम झाले आहे, ते म्हणजे सुरत विमानतळाला आता आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. सुरतकरांची अनेक वर्षांची मागणी आज पूर्ण झाली आहे. आणि मला आठवते की, ज्यावेळी मी आधी सुरतला येत होतो, त्यावेळी सुरतच्या विमानतळापेक्षा जास्त  बसस्थानकच  चांगले आहे की, विमानतळ चांगले आहे, याचा विचार केला तर लक्षात यायचे बस स्थानकच जास्त चांगले आहे. आणि विमानतळ तर एक झोपडीप्रमाणे आहे. मात्र आज कुठून कुठपर्यंत पोहोचलो, याचे सामर्थ्य सुरतमध्ये दिसून येते.

सुरतवरून दुबईला आजपासून विमानसेवा सुरू होत आहे. लवकरच हॉंगकॉंगसाठी विमानसेवा सुरू होईल. गुजरात बरोबरच आणि आज ज्यावेळी हे सुरतचे विमानतळ बनले आहे, त्यावेळी गुजरातमध्ये आता तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ झाली आहेत. यामुळे हि-यांशिवाय, इथल्या वस्त्रोद्योग उद्योग, पर्यटन उद्योग, शिक्षक आणि कौशल्यासहित प्रत्येक क्षेत्राला लाभ होईल.  या शानदार टर्मिनल आणि आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरतवासियांचे,   गुजरातवासियांचे  खूप खूप अभिनंदन करतो.

माझ्या कुटुंबियांनो,

सुरत शहराबरोबर माझे जे आपुलकीचे संबंध आहेत, त्यांचे वर्णन शब्दात करण्याची आवश्यकता नाही. तुम्हा लोकांना ते खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. सुरतने मला खूप काही शिकवले आहे. आणि सुरतेने एक महत्वाची गोष्ट शिकवली, ती म्हणजे ज्यावेळी तुम्ही प्रयत्न करता, त्यावेळी आपण खूप मोठ मोठ्या आव्हानांचा, संकटांचा सामना करण्यासाठी काहीही करू शकतो. सुरतच्या मातीमध्येच असा काही गुण आहे की, त्यामुळे ती व्यक्तीला सर्वांपेक्षा वेगळी बनवते. आणि सुरतकरांमध्ये असे काही सामर्थ्य निर्माण होते की, संकटालाही त्यांच्याशी दोन हात करणे अवघड होते.

 

आपल्या सर्वजणांना माहिती आहे की, सुरत शहराचा प्रवास कितीतरी चढ-उतारांनी भरलेला आहे. इंग्रजांनी इथले वैभव पाहून सर्वात प्रथम सुरतला येणे पसंत केले. एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या सागरी जहाजांची निर्मिती सुरतमध्ये होत असे. सुरतच्या इतिहासामध्ये अनेकवेळा मोठ-मोठी संकटे आली, परंतु सुरतकरांनी एकत्र येवून त्या संकटाशी दोन हात केले. असे सांगतात की,  असाही एक काळ होता,   84 देशांच्या जहाजांचे ध्वज इथे फडकत असायचे. आणि आज हे माथूर भाई सांगत होते की, आता 125 देशांचे ध्वज इथे फडकणार आहेत.

कधी गंभीर आजाराच्या साथीच्या संकटाला सुरतला तोंड द्यावे लागले तर कधी तापीला महापूर आला. ज्यावेळी अनेक प्रकारच्या निराशेची भावनेचा प्रसार केला गेला आणि सुरतच्या अस्मितेला, चैतन्यालाच आव्हान दिले गेले,  असाही काळ मी अतिशय जवळून पाहिला आहे. परंतु माझा पूर्ण विश्वास होता की, सुरत अशा संकटातून बाहेर पडेल, नव्या सामर्थ्याने विश्वामध्ये आपले स्थान निर्माण करेल. आणि आता पाहिले तर लक्षात येते, आज हे शहर जगामध्ये सर्वात वेगवान विकास करणा-या अव्वल 10 शहरांमध्ये आहे.

सुरतचे स्ट्रीट फूड, सुरतची स्वच्छता, सुरतमध्ये कौशल्य विकासाचे होणारे काम, सर्व काही सर्वोत्तम होत आहे. कधी काळी सुरतची ओळख ‘सन सिटी’ अशी होती. इथल्या लोकांनी आपल्या परिश्रमाने, आपल्या सर्व शक्तिनिशी, परिश्रमाची पराकाष्ठा करून या शहराला ‘डायमंड सिटी’ म्हणजे हि-यांचे शहर बनवले. सिल्क सिटी बनवले. तुम्ही सर्वांनी अधिक परिश्रम केले आणि सुरत ब्रिज सिटी म्हणजे ‘सेतू नगरी’ बनवली. आज लक्षावधी युवकांसाठी सुरत एक स्वप्न नगर बनले आहे. आणि सुरत आता आयटी क्षेत्रामध्येही वेगाने वाटचाल करीत आहे. अशा आधुनिक सुरतला हिरे बाजाराच्या रूपाने इतकी मोठी वास्तू मिळणे, ही एक ऐतिहासिक गोष्ट बनणार आहे.

मित्रांनो,

आजकाल तुम्ही सर्वजण मोदींची हमी याविषयी खूप चर्चा सुरू असल्याचे ऐकत असणार. अलिकडच्या दिवसांमध्ये ज्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत, त्यानंतर ही चर्चा तर जास्तच वाढली आहे. परंतु सुरतच्या लोकांना मोदी यांची हमी खूप आधीपासून माहिती आहे. इथल्या परिश्रमी लोकांनी मोदींच्या हमीला वास्तवामध्ये परिवर्तित होताना पाहिले आहे. आणि या हमीचे उदाहरण म्हणजे - हा सुरत हिरे बाजारही आहे.

मला चांगले आठवते की, अनेक वर्षांपूर्वी तुम्ही सर्व सहकारी कोणत्या ना कोणत्या समस्या मला सांगत होता. इथे तर हिरे व्यापाराशी संबंधित कारागिर, लहान -मोठे व्यापारी यांच्याशी संबंधित जोडले गेलेल्या  लाखो लोकांचा संपूर्ण समाजच आहे. मात्र त्यांची मोठी  समस्या अशी होती की, लहान-लहान गोष्टींसाठी त्यांना खूप दूर -लांबवर जावे लागत होते. रॉ डायमंड पाहणे आणि खरेदी करणे यासाठी तर परदेशी जातानाही त्यांना अनेक समस्या येत होत्या. पुरवठा आणि मूल्य साखळीशी संबंधित समस्यांमुळे संपूर्ण व्यवसायावर प्रभाव पडत होता. हिरे उद्योगाशी संबंधित, या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी वारंवार माझ्याकडे केली जात  होती.

या अशा एकंदर वातावरणातच 2014 मध्ये दिल्लीत जागतिक हिरे परिषद झाली होती.  आणि तेव्हाच मी, हिरे क्षेत्रासाठी विशेष अधिसूचित क्षेत्र स्थापन करण्याची घोषणा केली होती.  यामुळे सुरत हिरे बाजाराचे स्वप्न साकार करण्याचा मार्ग मोकळा झाला. आम्ही कायद्यात सुधारणाही केल्या.  आता सुरत हिरे बाजाराच्या रूपाने आज आंतरराष्ट्रीय व्यापाराचे एक मोठे केंद्र तयार झाले आहे.  कच्चा हिरा असो, पैलू पाडलेला हिरा असो, प्रयोगशाळेत घडवलेला हिरा (लॅब ग्रोन डायमंड) असो किंवा तयार दागिने असो, आज प्रत्येक प्रकारचा व्यवसाय एकाच छताखाली शक्य झाला आहे.  कामगार असो, कारागीर असो, व्यापारी असो, सुरत हिरेबाजार हे प्रत्येकासाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा एकवटलेले, उपलब्ध असलेले केंद्र बनले आहे. 

 

इथे आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि सुरक्षित तिजोरी (सेफ व्हॉल्ट) अशा सुविधा उपलब्ध आहेत.  दागिन्यांच्या किरकोळ व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल हे दागदागिन्यांचे विक्री केंद्र आहे.  सुरतचा हिरा उद्योग आधीपासूनच 8 लाखांहून अधिक लोकांना रोजगार देत आला आहे.  आता सुरत हिरेबाजारा मधूनही दीड लाख नवीन लोकांना रोजगार मिळणार आहे.  या उद्योगाला नवीन उंचीवर नेण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेतलेल्या, हिरे व्यवसायातील सर्व सहकाऱ्यांचे मी कौतुक करू इच्छितो.

मित्रांनो,

सुरतने गुजरात आणि देशाला खूप काही दिले आहे, मात्र सुरतमध्ये यापेक्षा कितीतरी अधिक क्षमता आहे.  माझ्या मते, ही सुरुवात आहे, आपल्याला आणखी पुढे जायचे आहे.  तुम्हा सर्वांना माहीत आहे की, गेल्या 10 वर्षांत भारत जगात  10 व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवरून  5 व्या स्थानावर पोहोचला आहे.  आणि आता मोदींनी देशाला हमी दिली आहे की त्यांच्या तिसऱ्या डावात भारताचा समावेश जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये नक्कीच होईल.

सरकारने येत्या 25 वर्षांसाठीचे लक्ष्यही निश्चित केले आहे.  5 ट्रिलियन (5 लाख कोटी) डॉलर्सचे लक्ष्य असो, 10 ट्रिलियन (10 लाख कोटी) डॉलर्सचे लक्ष्य असो, आम्ही या सर्वांवर काम करत आहोत.  देशाची निर्यात विक्रमी उच्चांकावर नेण्यासाठी आम्ही काम करत आहोत.  अशा परिस्थितीत सुरतची आणि विशेषतः सुरतच्या हिरे उद्योगाची जबाबदारी अनेक पटींनी वाढली आहे.  सुरतचे सर्व दिग्गज इथे उपस्थित आहेत.  सुरत शहराने देशाच्या वाढत्या निर्यातीत आपला सहभाग आणखी कसा वाढवता येईल याचेही लक्ष्य निश्चित केले पाहिजे.

हिरे क्षेत्र, तसेच रत्ने आणि दागिने क्षेत्रासाठी हे आव्हान आणि संधी, दोन्ही आहे.  सध्या भारत, हिरे दागिन्यांच्या निर्यातीत खूप पुढे आहे.  सिल्व्हर कट डायमंड आणि लॅब ग्रोन डायमंड अशा हिरेप्रकारांमध्येही आपण आघाडीवर आहोत. मात्र आपण जर  रत्न आणि दागिने क्षेत्राचा एकत्र विचार केला, तर जगातील एकूण निर्यातीत भारताचा वाटा केवळ साडेतीन टक्के आहे.  जर सुरतने निर्धार केला तर लवकरच आपण रत्न-दागिन्यांच्या निर्यातीत दुहेरी आकडा गाठू शकतो.  आणि मी तुम्हाला हमी देतो, तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये सरकार तुमच्या पाठीशी आहे.

आम्ही या क्षेत्राची आधीच, निर्यात प्रोत्साहनासाठी लक्षं केंद्रीत केलेले क्षेत्र म्हणून निवड केली आहे.  स्वामित्व हक्क (पेटंट) मिळालेल्या नक्षीला प्रोत्साहन देणे असो, निर्यात उत्पादनांमध्ये विविधता आणणे, इतर देशांच्या सहकार्याने चांगले तंत्रज्ञान शोधणे, प्रयोगशाळेत घडवलेल्या किंवा हिरव्या हिऱ्यांना (ग्रीन डायमंड) प्रोत्साहन देणे असो, केंद्र सरकार असे अनेक प्रयत्न करत आहे.

हिरव्या हिऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात विशेष तरतुदीही केल्या आहेत.  या सर्व प्रयत्नांचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला घ्यायचा आहे. आज तुम्हीही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे वातावरण अनुभवत असाल, तुम्ही जगभर फिरता, जगातील अनेक देशांतील लोक इथे बसले आहेत, आज जागतिक वातावरण भारताच्या बाजूने आहे.  आज जगभरात भारताची प्रतिष्ठा शिखरावर आहे.  जगभरात भारताचा गवगवा होत आहे.  मेड इन इंडिया आता एक मजबूत नामांकीत नाव (ब्रँड) बनले आहे. तुमच्या व्यवसायाला त्यातून मोठा फायदा होणे नक्की आहे, आभूषण उद्योगालाही तो  मिळणे निश्चित आहे.  म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगेन, संकल्प करा आणि तो सिद्धीस न्या. 

मित्रांनो,

तुम्हा सर्वांचे बळ वाढवण्यासाठी सरकार सुरत शहराचे बळही वाढवत आहे.  आमचे सरकार सुरतमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर विशेष भर देत आहे.  आज सुरतचे स्वतःचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.  आज सुरतची स्वतःची मेट्रो रेल्वे सेवा आहे.  आज सुरत बंदरात अनेक महत्त्वाच्या उत्पादनांची हाताळणी होते.  आज सुरतमध्ये हजीरा बंदर, खोल समुद्रातले द्रवरूप नैसर्गिक वायू उत्खननाचे केंद्र (एलएनजी टर्मिनल) आणि बहुविध मालहाताळणी करणारे बंदर (मल्टी-कार्गो पोर्ट) आहे. सुरत सतत आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्रांशी जोडले जात आहे.  आणि जगातील फार कमी शहरांमध्ये अशी आंतरराष्ट्रीय दळणवळण व्यवस्था आहे.  सुरतलाही बुलेट ट्रेन प्रकल्पाशी जोडण्यात आले आहे.  इथे वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे कामही वेगाने सुरू आहे.  यामुळे उत्तर आणि पूर्व भारताशी सुरत, रेल्वेने भक्कमपणे जोडले जाणार आहे. दिल्ली-मुंबई दृतगती महामार्ग सुरतच्या व्यापार उदीमाला नव्या संधी देणार आहे.

 

अशाप्रकारे आधुनिक दळणवळण व्यवस्था असलेले सुरत हे एकप्रकारे देशातील एकमेव शहर आहे.  आपण सर्वांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.  सुरत पुढे गेले तर गुजरात पुढे जाईल आणि गुजरात पुढे गेला तर माझा देश पुढे जाईल.  याच्याशी इतर अनेक शक्यता निगडीत आहेत.  इतक्या देशांतील लोकांचे इथे येणे-जाणे होणे म्हणजे एकप्रकारे सुरतचे जागतिक शहरात रूपांतर होत आहे आणि छोटा भारत (मिनी इंडिया) तर सुरत बनलेच आहे.

अलीकडेच जी-20 शिखर परिषद झाली, तेव्हा आम्ही संवादासाठी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला.  चालकाला हिंदी येते, त्याच्यासोबत बसलेल्या पाहुण्याला फ्रेंच येते, अशा परिस्थितीत मग ते एकमेकांशी कसे बोलतील? मग आम्ही मोबाईल अॅपद्वारे अशी व्यवस्था केली, की सोबतचा प्रवासी फ्रेंच बोलत होता, ते चालकाला हिंदीत ऐकू येत होते, तर चालकाचे हिंदी बोलणे, प्रवाशाला फ्रेंचमध्ये ऐकू येत होते.

माझी अशी इच्छा आहे की जगभरातील लोक आमच्या हिरेबाजारात यावेत, भाषेच्या दृष्टीने संवादासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल, भारत सरकार तुम्हाला नक्कीच करेल. आणि मोबाईल फोन, मोबाईल अॅपच्या माध्यमातून, भाषिणी अॅपच्या माध्यमातून, आम्ही हे काम सोपे करणार आहोत.

मी मुख्यमंत्र्यांनाही असे सुचवेन की, येथील नर्मद विद्यापीठाने विविध भाषांमधील दुभाषी तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू करावेत आणि येथील मुलांनीही जगातील अनेक भाषा शिकाव्यात, जेणेकरून जेव्हा इथे विविध भाषा बोलणारे व्यापारी येतील, तेव्हा दुभाष्यांचे मोठे काम आपल्या तरुण पिढीला मिळू शकेल.  आणि जागतिक भव्य केंद्र तयार करण्यासाठीच्या अनेक गरजांपैकी, संवाद-संभाषण ही एक अतिशय महत्त्वाची गरज आहे.  आज तंत्रज्ञान खूप मदत करत आहेच, परंतु त्याच वेळी सोबत हे देखील आवश्यक  आहे.  मला विश्वास आहे की लवकरच आपण नर्मद विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही विद्यापीठांमध्ये भाषांतरकार- दुभाषी असा अभ्यासक्रम सुरू करू.

सुरत हिरे बाजार आणि सुरत विमानतळाच्या नवीन टर्मिनलसाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.  पुढील महिन्यात व्हायब्रंट गुजरात परिषदही होणार आहे.  यासाठी मी गुजरातला शुभेच्छा देतो.  आणि गुजरातच्या या प्रयत्नामुळे देशालाही मदत होत आहे आणि म्हणूनच मी गुजरातचे विशेष अभिनंदन करतो.

विकासाचा हा उत्सव साजरा करण्यासाठी आज तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आला आहात, पहा किती बदल झाला आहे.  देशातील प्रत्येक व्यक्ती विकासासाठी कटिबद्ध होत चालला आहे, हा भारतासाठी आगेकूच करण्याचा सर्वात मोठा शुभ संकेत आहे.  मी पुन्हा एकदा वल्लभभाई आणि त्यांच्या संपूर्ण चमुचे मनापासून खूप खूप अभिनंदन करतो.  आणि मला माहीत आहे, जर कोविडची समस्या मध्येच आली नसती तर कदाचित आम्ही हे काम लवकर पूर्ण केले असते. मात्र कोविडमुळे काही कामात अडथळे आले.  पण आज हे स्वप्न पूर्ण झालेले पाहून मला खूप आनंद होत आहे.  माझ्याकडून खूप खूप अभिनंदन.

धन्यवाद.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi