गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेन्द्र भाई पटेल, मुलुभाई बेरा, नरहरि अमीन, सी आर पाटिल, किरीटभाई सोलंकी, महापौर प्रतिभा जैन जी, भाई कार्तिकेय जी, इतर सर्व आदरणीय व्यक्ती, उपस्थित बंधू आणि भगिनींनों!
पूज्य बापू यांचे हे साबरमती आश्रम नेहमीच एक विलक्षण उर्जेचे चैतन्यशील केंद्र राहिले आहे. आणि माझ्याप्रमाणे जसे प्रत्येकाला जेव्हा जेव्हा इथे येण्याची संधी मिळत असते तेव्हा बापू यांची प्रेरणा आपण आपल्या अंतकरणात स्पष्ट रूपाने अनुभव करू शकतो. सत्य आणि अहिंसेचे आदर्श असतील, राष्ट्रपूजेचा संकल्प असेल, गोरगरीब, वंचितांच्या सेवेत नारायणाची सेवा पाहण्याची भावना असावी, साबरमती आश्रमाने बापूंचे हे संस्कार आजही जिवंत ठेवले आहेत. माझे सौभाग्य आहे की आज मी इथे साबरमती आश्रमाच्या पुनर्विकास आणि विस्तार कार्याची पायाभरणी केली आहे. बापूंचा आधी जो पहिला आश्रम होता जेव्हा ते सुरुवातीला इथे आले होते त्या कोचरब आश्रमाचा सुद्धा विकास केला गेला आहे आणि मला आनंद आहे की आज त्याचे सुद्धा लोकार्पण होत आहे. दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर गांधीजींनी आपला पहिला आश्रम कोचरब आश्रमातच बनवलेला होता. गांधीजी येथे चरखा चालवत असायचे, कारपेंटरी म्हणजे सुतारकाम शिकत होते. दोन वर्ष कोचरब आश्रमात राहिल्यानंतर गांधीजी साबरमती आश्रमामध्ये आश्रयाला गेले होते. या आश्रमाच्या पुनर्विकासानंतर आता गांधीजी यांच्या त्या दिवसांच्या आठवणी कोचरब आश्रमात आणखीन चांगल्या पद्धतीने संरक्षित राहतील. मी पूज्य बापू यांच्या चरणी नमन करतो आहे, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आहे. मी सर्व देशवासीयांना सुद्धा या महत्त्वपूर्ण प्रेरणादायी ठिकाणांच्या विकास कार्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देत आहे.
मित्रांनो,
आज 12 मार्च ती ऐतिहासिक तारीख सुद्धा आहे, आजच्याच दिवशी बापूंनी स्वातंत्र्य चळवळीची दिशा बदलली आणि दांडीयात्रा, स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली.स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा आजची तारीख अशाच ऐतिहासिक प्रसंगाची, नव्या युगाची सुरुवात करणाऱ्या घटनेची साक्षीदार ठरलेली आहे.12 मार्च 2022 ला याच साबरमती आश्रमातून देशाने आजादीच्या अमृत महोत्सवाचा प्रारंभ केला होता. याच दांडी यात्रेने स्वतंत्र भारताची पवित्र भूमी निश्चित करण्यात, तिची पार्श्वभूमी तयार करण्यात, त्या पवित्र भूमीला पुन्हा स्मरण करून पुढची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.आणि या अमृत महोत्सवाच्या प्रारंभानंतर अमृतकाळात भारताच्या प्रवेशाचा श्री गणेशा सुद्धा झाला. या अमृत महोत्सवाने देशांमध्ये लोकसभागाचे असेच वातावरण निर्माण केले जसे स्वातंत्र्यापूर्वी दिसून येत होते. प्रत्येक हिंदुस्तानी व्यक्तीला खरे तर याबाबतीत आनंद होईल की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, या अमृत महोत्सवाची व्यापकता केवढी होती आणि त्यामध्ये गांधीजींच्या विचारांचे प्रतिबिंब केवढे होते. देशातील लोकांना हे ठाऊक आहे की स्वातंत्र्याच्या अमृतकाळात या कार्यक्रमाच्या दरम्यान 3 कोटीपेक्षा अधिक लोकांनी पंचप्राणाची शपथ घेतली होती. याच काळा देशांमध्ये 2 लाखापेक्षा जास्त अमृत वाटिकांची स्थापना झाली. 2 कोटी पेक्षा अधिक झाडे लावून त्या झाडांच्या संपूर्णपणे विकासाची काळजी घेण्यात आली. एवढेच नाही तर जलसंवर्धनाच्या दिशेने एक खूप मोठे क्रांतिकारी कार्य झाले, ज्यामध्ये 70 हजार पेक्षा अधिक अमृत सरोवर निर्माण करण्यात आले. आणि आपल्याला आठवत असेल “हर घर तिरंगा अभियान” सुद्धा संपूर्ण देशामध्ये देशभक्तीच्या अभिव्यक्तीचे एक अतिशय सशक्त माध्यम बनले होते. ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाच्या माध्यमातून कोट्यावधी देशवासीयांनी देशाच्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली होती. याच अमृत महोत्सवाच्या काळात 2 लाखापेक्षा जास्त दगडी फलकही लावण्यात आले आहेत. आणि यासाठीच साबरमती आश्रम स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबरच विकसित भारताच्या संकल्पाचे सुद्धा तीर्थक्षेत्र बनले आहे.
मित्रांनो,
जो देश आपल्या वारश्याचे जतन करू शकत नाही, तो देश आपले भविष्य सुद्धा गमावून बसतो. बापूंचा हा साबरमती आश्रम केवळ देशासाठीच नाही तर संपूर्ण मानव जातीसाठी एक ऐतिहासिक वास्तू आहे. परंतु, स्वातंत्र्याच्यानंतर सुद्धा या वास्तुच्या बाबतीत सुद्धा न्याय होऊ शकला नाही. बापूंचा हा आश्रम कधी 120 एकरामध्ये पसरलेला होता. काळानुरूप अनेक कारणांनी याची कक्षा कमी होत होत केवळ 5 एकरामध्येच हा आश्रम सामावून गेला होता. एकेकाळी इथे 63 छोटे-मोठे निर्माण कार्यासाठीची घरे होती. आणि त्यामधून सुद्धा आता केवळ 36 घरेच शिल्लक राहिली आहेत याचे 6-3, 3-6 असे झाले आहे. आणि या 36 घरांमधून सुद्धा केवळ 3 घरांमध्येच पर्यटक प्रवेश करू शकतात. ज्या आश्रमाने इतिहास रचलेला आहे, ज्या आश्रमाने देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात एवढी मोठी भूमिका निभावली होती, त्या आश्रमाला पाहण्यासाठी, त्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी, त्या आश्रमाची अनुभूती घेण्यासाठी जगामधून लोक इथे येत असतात. या साबरमती आश्रमाचे जतन करणे हे आता आपल्या सर्व 140 कोटी भारतीयांची जबाबदारी आहे.
आणि मित्रांनो,
आज साबरमती आश्रमाचा जो विस्तार शक्य झालेला आहे त्यामध्ये येथे राहणाऱ्या कुटुंबीयांची खूप मोठी भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच आश्रमाची 55 एकर जमीन परत मिळू शकली आहे. ज्या ज्या लोकांनी या कार्यामध्ये सकारात्मक भूमिका निभावलेले आहे मी त्या सर्व कुटुंबीयांची प्रशंसा करतो आहे, त्यांचे आभार मानतो आहे. आता आमचा हा प्रयत्न असणार आहे की या आश्रमातील सर्व जुन्या वास्तू मूळ स्थितीत जतन केल्या जाव्यात.ज्या घरांना नव्याने पुन्हा बनवण्याची गरज असेल, माझा तर सतत हाच प्रयत्न असतो की याची गरजच भासू नये, जे काही करायचे असेल ते आहे ते मूळ स्थितीत ठेवूनच करावे, देशाला असे वाटले पाहिजे की यातून आपल्या पारंपारिक बांधकाम शैलीचे जतन झालेले आहे. आगामी काळात या पुनर्बांधणीमुळे देश-विदेशातील लोकांमध्ये एक नवीन आकर्षण निर्माण होईल.
मित्रांनो,
स्वातंत्र्यानंतर जी जी सरकारे स्थापन झाली, त्यांच्यामध्ये देशाचा हा अनमोल वारसा जतन करण्याचा ना विचार होता आणि ना राजकीय इच्छाशक्ती होती. एक तर त्यांना परकीय दृष्टिकोनातून भारताकडे पाहण्याची सवय होती आणि दुसर म्हणजे भेदभाव तुष्टीकरण करण्याची असाहाय्यता होती, ज्या कारणामुळे भारताचा हा वारसा,आपली महान संपत्ती अशाच कारणामुळे नष्ट होत गेली. अतिक्रमण, अस्वच्छता, अव्यवस्था, या सर्व वाईट चालींनी आपल्या वारशांना विळखा घातलेला आहे. मी काशीचा संसद सदस्य आहे, मी काशीचे आपल्याला उदाहरण देतो आहे. तिथे दहा वर्षांपूर्वी काय परिस्थिती होती हे संपूर्ण देशाला माहिती आहे. परंतु आता सरकारने आपली इच्छाशक्ती दाखवली, तेव्हा लोकांनी सुद्धा सहकार्य केले आणि काशी विश्वनाथ धामच्या पुनर्बांधणीसाठी 12 एकर जमीन मिळाली. आज त्याच जमिनीवर वस्तुसंग्रहालय, भोजन सुविधा, मुमुक्षु भवन, अतिथीगृहे, मंदिर चौक, व्यापार पेठ, प्रवासी सुविधा केंद्र इत्यादी अनेक प्रकारच्या सुविधा विकसित केल्या आहेत. या पुनर्बांधणीनंतर आता आपण बघा की 2 वर्षात 12 कोटीहून अधिक भाविक विश्वनाथजींच्या दर्शन करण्यासाठी आले आहेत. त्याचप्रमाणे अयोध्येतील श्री रामजन्मभूमीच्या विस्तारासाठी आम्ही 200 एकर जमीन मोकळी केली आहे. यापूर्वी, या जमिनीवरही अतिशय दाट बांधकाम होते. आज त्याच जागेवर रामपथ, भक्तीपथ, जन्मभूमी पथ आणि इतर सुविधा विकसित केल्या जात आहेत. अयोध्येतही गेल्या 50 दिवसांत एक कोटीहून अधिक भाविकांनी भगवान श्रीरामाचे दर्शन घेतले आहे. काही दिवसांपूर्वी मी द्वारकेमध्येही अनेक विकासकामांचे लोकार्पण केले आहे.
त्याचप्रमाणे मित्रांनो,
एकप्रकारे आपल्याला आपला वारसा जतन करण्याचा मार्ग गुजरातच्या भूमीने देशाला दाखवला होता. लक्षात घ्या, सरदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सोमनाथ मंदिराचा झालेला जीर्णोद्धार ही सुद्धा एक विलक्षण अशी ऐतिहासिक घटना होती. गुजरातने आपल्या अशा अनेक वारसा स्थळांना जतन करून ठेवले आहे. हे अहमदाबाद शहर जागतिक वारसा असलेले शहर आहे. राणी की वाव, चंपानेर आणि धोलावीरा यांचीही जागतिक वारसा यादीत गणना केली जाते. हजारो वर्षे जुन्या बंदर शहर अशी ओळख असलेल्या लोथल शहराची चर्चा जगभरात होते आहे. गिरनार शहराचे विकास कार्य असो, अथवा पावागड, मोढेरा, अंबाजी या स्थळांचा विकास असो, अशा सर्व महत्त्वाच्या ठिकाणी त्यांचा वारसा समृद्ध करण्यासाठी कामे झाली आहेत.
मित्र हो,
आम्ही स्वातंत्र्य लढ्याशी जोडले गेलेल्या तसेच आपल्या राष्ट्रीय प्रेरणेशी नाते असलेल्या ठिकाणांसाठी विकासाची मोहीम सुरू केली आहे. दिल्लीत आपण बघितलंच असेल एक राजपथ होता. आम्ही राजपथ हा कर्तव्यपथ या रूपात विकसित करायचे काम केले. कर्तव्यपथावर आम्ही सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा उभारला. अंदमान निकोबार द्वीपसमूहात आम्ही स्वातंत्र्यलढा आणि नेताजींशी जोडल्या गेलेल्या ठिकाणांचा विकास आणि त्यांना योग्य ओळख देण्याचे काम केले. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांशी संबंध असणाऱ्या ठिकाणांचा ही विकास केला. त्यांना योग्य ओळख दिली. बाबासाहेब आंबेडकरांशी निगडित ठिकाणांचा आम्ही पंचतीर्थ म्हणून विकास केला. तेथे एकता नगर मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी आज संपूर्ण जगातील आकर्षणाचं केंद्रस्थान झालं आहे. आज सरदार पटेल यांना नमन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक तिथे जातात. आपण दांडीकडे बघितले तर किती बदल झाला आहे ते कळते. हजारो लोक आज दांडी येथे जातात. आता साबरमती आश्रमाचा विकास हे त्या दिशेने उचललेले अजून एक मोठे पाऊल आहे.
मित्र हो,
भविष्यात येणारी पिढी...या आश्रमात येणारे लोक... इथे येऊन समजतील की साबरमतीच्या या संताने चरख्याच्या बळावर देशातील जन- मन भारुन टाकले होते. देशातील जन-मन प्रभावित केले होते. आणि जेव्हा स्वातंत्र्याचे अनेक प्रवाह सुरू होते त्या प्रवाहांना गती देण्याचे काम केले. शतकांच्या गुलामीमुळे जो देश नैराश्याच्या खाईत पडला होता त्यामध्ये बापूंनी जन आंदोलन उभे करून एक नवी आशा भरण्याचे काम केले, नवीन विश्वास भरला. आजही त्यांची दूरदृष्टी आपल्या देशाला उज्वल भविष्याची स्पष्ट दिशा दाखवते. बापूंनी ग्रामस्वराज्य आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहिले होते. आता आपणच बघा की आम्ही ‘वोकल फॉर लोकल’ यावर बोलतो. हल्लीच्या लोकांच्या लक्षात यावे म्हणून शब्दाचा वापर कसाही असो पण मुळात ती गांधीजींची स्वदेशीची भावना आहे, दुसरे काय. आत्मनिर्भर भारताची महात्मा गांधीजींची संकल्पना होती तीच त्यामध्ये आहे. आज मला आत्ताच आमचे आचार्यजी सांगत होते की नैसर्गिक शेतीसाठी ध्यास घेऊन ते काम करत आहेत. त्यांनी मला सांगितले की गुजरातेत 9 लाख परिवार, मोठा आकडा आहे हा, 9 लाख शेतकरी कुटुंब आता नैसर्गिक शेतीकडे वळली आहेत. जे गांधीजींचे स्वप्न होते, रसायनमुक्त शेती. ते मला म्हणाले की गुजरातमध्ये या खेपेस युरियाच्या वापरात 3 लाख मेट्रिक टन एवढी घट झाली आहे. म्हणजे धरती मातेच्या रक्षणाचे कामसुद्धा होत आहे. हा महात्मा गांधींचा विचार नाही तर दुसरं काय आहे. आचार्यजींच्या मार्गदर्शनाखाली गुजरात विद्यापीठाने एक नवीन उभारी घेतली आहे. आमच्या या महापुरुषांनी आपल्यासाठी बरेच काही राखून ठेवले आहे . आम्हाला ते आधुनिक स्वरूपात जीवनात कसे आणावे ते शिकावे लागेल. आणि माझे प्रयत्न हेच असतील. खादी, आज खादीची ताकद एवढी वाढली आहे की याचा कधी विचारही केला नव्हता की खादी एकेकाळी जी नेत्यांच्या वेशभूषेपर्यत अडकून पडली होती तिला आम्ही बाहेर काढले. गांधींच्या प्रति समर्पणाची ही आमची पद्धत आहे. आमचे सरकार गांधीजींच्या याच आदर्शावर पावले टाकत ग्रामीणांच्या गरिबांच्या कल्याणाला प्राधान्य देत आहे. आत्मनिर्भर भारताचे अभियान चालवत आहे. आज गाव मजबूत होत आहे. ग्राम स्वराज्याचे बापूंचे स्वप्न साकार होत आहे. आमच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत पुन्हा एकदा स्त्रिया महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. स्वयंसहायता गट असो त्यात काम करणाऱ्या आमच्या माता भगिनी आहेत. आज देशात स्वयंसहायता गटात काम करणाऱ्या एक कोटींहून जास्त भगिनी लखपती दिदी झाल्या आहेत आणि माझ्या तिसऱ्या कार्यकाळात 3 कोटी लखपती दीदी तयार करण्याचे माझे स्वप्न आहे. आज आपल्या गावातील स्वयंसहायता गटातील भगिनी ड्रोन पायलट बनवत आहेत. शेती आधुनिक करण्याच्या दिशेने त्या नेतृत्व करत आहेत. ही सगळी सशक्त भारताची उदाहरणे आहेत. सर्वसमावेशक भारताचे हे चित्र आहे. आमच्या या प्रयत्नांमुळे गरिबाला गरीबेशी झुंज घेण्याचे आत्मबळ मिळाले आहे. दहा वर्षात आमच्या सरकारच्या धोरणांमुळे 25 कोटी लोक गरीबीतून बाहेर निघाले आणि माझा असा ठाम विश्वास आहे की पूज्य बापूंचा आत्मा जिथे कुठे असेल आम्हाला आशीर्वाद देत असेल. आज जेव्हा भारत स्वातंत्र्याच्या अमृतकाळात नवीन झेंडे रोवत आहे आज जेव्हा भारत पृथ्वीपासून अंतराळापर्यंत नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहे. आज जेव्हा भारत विकसित होण्याचा संकल्प घेऊन पुढे निघाला आहे, अशावेळी महात्मा गांधीजींचे हे तपोवन आम्हा सर्वांसाठीच एक मोठे प्रेरणास्थान आहे. आणि म्हणूनच साबरमती आश्रम , कोचरब आश्रम ,गुजरात विद्यापीठ अशी ही सर्व स्थाने आधुनिक जगातील माणसांशी जोडून ठेवण्याच्या विचारांचे आम्ही आहोत. विकसित भारताचा संकल्प त्याची प्रेरणा आमच्या श्रद्धेला अजून ताकद देते आणि माझी अशी इच्छा आहे की शक्य असेल तर, कारण मला हा पूर्ण विश्वास आहे माझ्यासमोर साबरमती आश्रमाचे चित्र उभे आहे ते साकार होताना आपण बघाल तेव्हा हजारोंच्या संख्येने लोक इथे येतील इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच गुजरात सरकारला माझे सांगणे आहे, अहमदाबाद महानगरपालिकेला असं ही सांगेन की एक काम करता येऊ शकेल का बघा, आपण एक खूप मोठी गाईड्स शी स्पर्धा भरवू जेणेकरून लोक गाईड म्हणून पुढे येतील. कारण ही एक हेरिटेज सिटी आहे, कोण अति उत्तम गाईड म्हणून काम करेल याची मुलांमध्ये स्पर्धा लागेल. साबरमती आश्रमात सर्वोत्तम गाईड म्हणून सेवा कोण देऊ शकेल असे कोण कोण आहे याची एकदा मुलांमध्ये ही स्पर्धा होईल . प्रत्येक शाळेमध्ये स्पर्धा होईल तेव्हा साबरमती आश्रम केव्हा तयार झाला,तो काय आहे , काय करत होता हे येथील प्रत्येक मूल हे जाणून घेईल. आणि दुसरे म्हणजे 365 दिवस आम्ही ठरवू की प्रत्येक दिवशी अहमदाबादच्या वेगवेगळ्या शाळांमधून कमीत कमी 1000 मुले साबरमती आश्रमात येऊन किमान एक तास घालवतील आणि जी मुले शाळेतून गाईड म्हणून तयार झालेली असतील ती या मुलांना सांगतील की गांधीजी इथे बसत असतात, येथे जेवत असत ,येथे स्वयंपाकघर , इथे गोशाळा होती सर्व गोष्टी सांगतील. आपण इतिहास जगू शकतो . कोणत्याही अतिरिक्त निधीची गरज नसते अतिरिक्त मेहनत जरुरीची नसते तर एक नवीन दृष्टिकोन द्यायला लागतो आणि मला हा विश्वास आहे की बापूंचे आदर्श, त्यांच्याशी संलग्न असलेले हे प्रेरणा तीर्थ राष्ट्र निर्मितीच्या आमच्या प्रवासात आणखी जास्त मार्गदर्शन करत राहतील आम्हाला नवीन बळ देत राहतील.
मी देशवासीयांना आज हा नवा प्रकल्प आपल्या चरणांपाशी समर्पित करतो आणि या विश्वासासह मी इथे आलो आहे आणि हे स्वप्न माझे आजचे नाही . याची मला आठवण आहे, मी मुख्यमंत्री असल्यापासून या कामाच्या मागे लागलो होतो. माझा बराच वेळ न्यायालयात सुद्धा गेला. कारण का कोण जाणे पण वेगवेगळी माणसे नवीन नवीन संकटे उभी करत होती. त्यावेळी भारत सरकार सुद्धा यात अडचणी आणत होते. परंतु कदाचित ईश्वराचा आशीर्वाद आहे, जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे म्हणून सर्व समस्यांमधून मुक्त होत आता ते स्वप्न साकार करता येत आहे. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि राज्य सरकारकडे माझी हीच विनंती आहे की लवकरात लवकर याचे काम सुरू होवो आणि लवकरात लवकर पूर्ण होवो कारण हे काम पूर्ण होताना झाडे लावणे हे महत्त्वाचे काम आहे. हा भाग आतून जंगलाप्रमाणे होण्यासाठी वेळ लागेल झाडांची वाढ होण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा लागेलच परंतु लोकांना ते जाणवणे सुरू होईल आणि मी पुन्हा एकदा विश्वास बाळगतो की मला तिसऱ्या कार्यकाळात पुन्हा एकदा…आता मला जास्त काही सांगण्यासारखे नाही.
खूप खूप धन्यवाद