केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे मित्र अश्विनी वैष्णवी जी, राजीव चंद्रशेखर जी, जीपीएआयचे मावळते अध्यक्ष जपानचे मंत्री हिरोशी यशोदा जी, सदस्य देशांचे अन्य मंत्री, इतर प्रतिष्ठित व्यक्ती आणि उपस्थित मान्यवर ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी शिखर परिषदेत मी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे.
मला आनंद आहे की पुढच्या वर्षी भारत या शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहे. ही शिखर परिषद एका अशा वेळी होत आहे की जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेला घेऊन संपूर्ण विश्वात खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. या चर्चेमधून सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे विचार, प्रतिक्रिया समोर येत आहेत.
आणि यामुळेच या शिखर परिषदेची जोडल्या गेलेल्या प्रत्येक देशावर एक मोठी जबाबदारी असणार आहे. मागच्या काही दिवसात मला अनेक राजकीय आणि उद्योग क्षेत्रातल्या नेत्यांशी भेटण्याची संधी मिळाली मी त्यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये सुद्धा या शिखर परिषदेविषयी चर्चा केली आहे. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ते च्या प्रभावाखालून सध्याच्या आणि येणाऱ्या अनेक पिढ्या असे कोणीच सुटू शकणार नाही. आपल्याला खूपच सतर्क राहून आणि खूपच सावधानता बाळगून वाटचाल करावी लागणार आहे.आणि यासाठी मी समजतो की या शिखर परिषदेतून पुढे येणारे विचार या परिषदेतून मिळणाऱ्या सूचना संपूर्ण मानव जातीसाठी जे मूलभूत मूल्य आहे त्याचे संरक्षण करणे आणि त्याला योग्य दिशा देण्याचे काम करेल.
मित्रांनो,
आज भारत एआय तंत्रज्ञानासंबंधित प्रतिभा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेशी जोडल्या गेलेल्या नवीन संकल्पना यातला सर्वात मुख्य घटक आहे. भारताचे तरुण तंत्रज्ञ, संशोधक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या येणाऱ्या संबंधित मर्यादांवर तोडगा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतामध्ये आम्ही एक खूपच उत्साहाने भरलेली कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित नवोन्मेशाची भावना बघत आहोत.
इथे येण्याच्या आधी मला ए आय एक्सपो अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित प्रदर्शनीमध्ये जाण्याची संधी मिळाली. कृत्रिम बुद्धिमत्ता कशाप्रकारे जीवनात बदल घडवू शकते हे आम्ही या प्रदर्शनामध्ये बघू शकतो. युवा ए आय इनिशिएटिव्ह अर्थात युवा कृत्रिम बुद्धिमत्ता उपक्रमाच्या माध्यमातून निवड झालेल्या तरुणांच्या संकल्पना पाहून मला खूप आनंद होणे स्वाभाविकच आहे.
हे तरुण तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामाजिक बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसी संबंधित उपयोगितेची चर्चा तर आता गावागावांमध्ये होत आहे. नुकतेच आम्ही कृषी क्षेत्रामध्ये एआय चाट- बोट अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता संवाद सुविधेला सुरुवात केली आहे, यामुळे शेतकऱ्यांना आपल्या निवेदनासंदर्भातली ताजी माहिती, केलेल्या व्यवहारांची माहिती आणि सरकारी योजनेची संबंधित सर्व ताजी माहिती मिळवण्यासाठी मदत होणार आहे. आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेऊन भारतामध्ये आपल्या आरोग्य क्षेत्रात सुद्धा पूर्ण तऱ्हेने बदल आणण्याच्या दिशेने काम करत आहोत. आपली शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्यासाठीच्या कामात सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
मित्रांनो, भारतामध्ये आमचा विकास मंत्र आहे सबका साथ सबका विकास. एआय फॉर ऑल या भावनेतून प्रेरणा घेऊनच सरकारची धोरणे आणि उपक्रम तयार केले जात आहेत. आमचा प्रयत्न आहे की, आम्ही सामाजिक विकास आणि सर्वसमावेशक वृद्धीच्या कामात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेचा पूर्णपणे उपयोग करून घेतला पाहिजे.
भारत एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार आणि नैतिकतेला धरून करण्यासाठी तऱ्हेने कटिबद्ध आहे. आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ते संबंधित राष्ट्रीय कार्यक्रम राबवला आहे. आम्ही भारतामध्ये एआय मिशन सुद्धा सुरू करणार आहोत. या मोहिमेचे उद्दिष्ट भारतामध्ये एआय कम्प्युट पावर अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित संगणकियत क्षमता निर्माण करणे आहे. यामुळे भारतात स्टार्टअप आणि संशोधकांना आणखी चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. या मोहिमेच्या माध्यमातून कृषी, आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये एआय एप्लीकेशन्स ला प्रोत्साहन दिले जाईल.
आम्ही आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून एआय कौशल्यांना द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांपर्यंत पोहोचवणार आहोत. आमच्याजवळ राष्ट्रीय एआय पोर्टल आहे ज्या माध्यमातून देशामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे. आपण ऐरावत उपक्रमाच्या संदर्भात ऐकले असेल. या एकीकृत प्लॅटफॉर्म चा उपयोग खूपच लवकर सर्व संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळा उद्योग आणि स्टार्ट अप करू शकतील.
मित्रांनो,
एआय बरोबर आपण एक नव्या युगामध्ये प्रवेश करत आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा विस्तार केवळ तंत्रज्ञानापेक्षा खूप अधिक आहे. एआय तंत्रज्ञान आपल्या नवीन भविष्याला घडवण्याचा एक मोठा आधार बनणार आहे. या एआय तंत्रज्ञानाची खूप मोठी ताकद आहे आणि ती म्हणजे लोकांना परस्पर जोडण्याची त्याची ताकद आहे. एआय तंत्रज्ञानाचा योग्य वापर केवळ एका देशाची आर्थिक प्रगती सुनिश्चित करणार नाही तर यामुळे समानता आणि सामाजिक न्यायाची भावना सुद्धा दृढ होणार आहे.
यासाठीच एआय तंत्रज्ञानाला सुद्धा आपल्या भविष्यासाठी एका वेगळ्या प्रकारच्या एआय तंत्रज्ञानाची गरज भासणार आहे. याचाच अर्थ याला एआय तंत्रज्ञानाला सर्वसमावेशी बनवले पाहिजे. सर्व संकल्पनांना आपण स्वीकारले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राची विकास यात्रा जेवढ्या वेगाने सर्वसमावेशक होईल त्याचा प्रभाव सुद्धा तेवढ्याच वेगाने सर्व समावेशी असणार आहे. आपण पाहिले आहे की, मागच्या शतकामध्ये तंत्रज्ञान वापरा संबंधी मोठी असमानता होती, ज्या कारणामुळे सध्या समाजात असमानता आणखी वाढलेली होती.
आता आपल्याला यासारख्या चुकांपासून संपूर्ण मानवतेला वाचवायचे आहे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, जेव्हा तंत्रज्ञानाबरोबर डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज म्हणजेच लोकशाही मूल्य जोडली जातात तेव्हा ते सर्वसमावेशीकरण्याच्या दिशेने गुणाकार पद्धतीने काम करते. यासाठीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्राची भविष्यातली दिशा सुद्धा मानवी मूल्यांवर आणि लोकशाही मूल्यांवर पूर्ण पद्धतीने अवलंबून असेल.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आपली एफिशियन्सी अर्थात क्रयशक्ती वाढवण्यात खूप मोठ्या प्रमाणावर मदत करते. परंतु हे आपल्यावर निर्भर आहे की आपण यात सुद्धा भावनेला वाव दिला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या क्रयशक्तीला नक्कीच वाढू शकते परंतु हे आपल्यावर निर्भर आहे की आपण यासंदर्भातले मूल्ये जपली पाहिजेत, याच दिशेने हा मंच वेगवेगळ्या देशांमध्ये सहयोग वाढवण्यासाठी मदत करू शकेल.
मित्रांनो,
कोणत्याही पद्धतीला शाश्वत पद्धतीने उपयोगात आणण्यासाठी त्याला परिवर्तनशील, पारदर्शी आणि विश्वासार्ह बनवावे लागते. यामध्ये कोणतीही शंका नाही की, एआय तंत्रज्ञान परिवर्तनशील तर आहेच आहे, परंतु हे आपल्यावर निर्भर आहे की आपण याला जास्तीत जास्त कशाप्रकारे पारदर्शी बनवू शकतो.
जर आपण उपयोगात येणारा डेटा आणि अल्गोरिदम अर्थात समस्या सोडवण्यासाठी वापरात येणाऱ्या पद्धती यांना पारदर्शी आणि कोणत्याही परस्पर भेदभाव रहित ठेवू शकलो तर ही एक चांगली सुरुवात असेल. आपल्याला जगामधल्या सर्व लोकांमध्ये हा विश्वास निर्माण करावा लागेल की, कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान त्यांच्या फायद्यासाठी आहे, त्यांच्या लाभासाठी आहे. आपल्याला जगातल्या विभिन्न देशांना हा विश्वास द्यावा लागणार आहे की, या तंत्रज्ञानाच्या विकास यात्रेमध्ये कोणत्याही देशाला मागे ठेवले जाणार नाही.
जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित नैतिक, आर्थिक आणि सामाजिक समस्या विचारात घेतल्या जातील तेव्हाच कृत्रिम बुद्धिमत्तेवर विश्वास वाढेल. उदाहरणार्थ, जर अप-स्कील आणि री-स्किलिंग हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढीचा भाग बनले, तर तरुण लोक विश्वास ठेवण्यास सक्षम असतील की कृत्रिम बुद्धिमत्ता त्यांच्या भवितव्यासाठी आहे. त्याचबरोबर डेटा सुरक्षिततेकडे लक्ष दिल्यास, लोक विश्वास ठेवण्यास सक्षम असतील की कृत्रिम बुद्धिमत्ता त्यांच्या गोपनीयतेमध्ये हस्तक्षेप न करता विकास करेल. जर ग्लोबल साउथ शिखर परिषदेला माहित असेल की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासात त्यांचाही मोठा वाटा आहे, तर ते कृत्रिम बुद्धिमत्तेला भविष्याचा मार्ग म्हणून ते स्वीकारू शकतील.
मित्रांनो,
कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनेक सकारात्मक पैलू आहेत, परंतु त्याच्याशी संबंधित नकारात्मक पैलू देखील तितकाच चिंतेचा विषय आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता हे 21व्या शतकातील विकासाचे सर्वात मोठे साधन बनू शकते आणि तसेच 21व्या शतकाला नष्ट करण्यातही सर्वात मोठी भूमिका बजावू शकते. डीपफेकचे आव्हान आज संपूर्ण जगासमोर आहे. याशिवाय सायबर सुरक्षा, डेटा चोरी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने दहशतवाद्यांच्या हाती येण्याचाही मोठा धोका आहे. जर कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज शस्त्रे दहशतवादी संघटनांपर्यंत पोहोचली तर त्याचा जागतिक सुरक्षेवर मोठा परिणाम होईल. आपण या विषयावर चर्चा केली पाहिजे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर कसा रोखता येईल यावर ठोस योजना तयार केली पाहिजे. म्हणूनच, जी20 अध्यक्षपदाच्या काळात, आम्ही जबाबदार मानव-केंद्रित कृत्रिम बुद्धिमत्तेवर देखरेखीसाठी एक संरचना तयार करण्याचा प्रस्ताव दिला. जी20 नवी दिल्ली जाहीरनाम्याने सर्व सदस्य देशांच्या 'कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तत्त्वां'च्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे. 'कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराशी संबंधित जोखमींबद्दल सर्व सदस्यांमध्ये एक समज होती. ज्याप्रमाणे आमच्याकडे विविध आंतरराष्ट्रीय समस्यांसाठी करार आणि प्रोटोकॉल आहेत, त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिक वापरासाठी जागतिक संरचना तयार करण्यासाठी आम्हाला एकत्र काम करावे लागेल. यामध्ये उच्च-जोखीम किंवा सीमावर्ती 'कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांची चाचणी आणि उपयोजन करण्यासाठी प्रोटोकॉल देखील समाविष्ट असतील. त्यासाठी दृढनिश्चय, बांधिलकी, समन्वय आणि सहकार्याची सर्वाधिक गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर सुनिश्चित करण्यासाठी आपण एकत्र अशी पावले उचलली पाहिजेत. आज या शिखर परिषदेच्या माध्यमातून भारत संपूर्ण जागतिक पातळीवर आवाहन करतो की आपण या दिशेने एक क्षणही वाया घालवू नये. या वर्षात अवघे काही दिवस उरले असून, नवीन वर्ष येऊन ठेपले आहे. आपल्याला दिलेल्या कालमर्यादेत जागतिक चौकट पूर्ण करायची आहे. मानवतेचे रक्षण करण्यासाठी हे करणे अत्यंत आवश्यक आहे.
मित्रांनो,
कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ एक नवीन तंत्रज्ञान नाही, तर ती जगभरातील चळवळ बनली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून काम करणे अत्यंत गरजेचे आहे. येत्या दोन दिवसात तुम्ही सर्वजण अनेक विषयांवर चर्चा कराल. जेव्हा मी कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञांना भेटतो तेव्हा मी माझ्या प्रश्नांना थांबवू शकत नाही. आज तुम्हा तज्ज्ञांशी बोलत असताना माझ्या मनात अनेक गोष्टी येत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेने जनरेट केलेल्या माहितीची विश्वासार्हता कशी वाढवता येईल याचा विचार करायला हवा? असे कोणते डेटा सेट असू शकतात ज्याचा वापर करून आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांची प्रशिक्षण आणि चाचणी करू शकतो? कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने बाजारात आणण्यापूर्वी किती टेस्टिंग करायला हव्यात याचाही विचार करायला हवा. आम्ही असे कोणतेही सॉफ्टवेअर वॉटरमार्क सादर करू शकतो, ज्यावरून ही माहिती किंवा उत्पादन कृत्रिम बुद्धिमत्ता व्युत्पन्न झाले आहे असे दर्शवेल? याद्वारे, कृत्रिम बुद्धिमत्तेने निर्माण केलेली माहिती वापरणाऱ्या व्यक्तीला त्याच्या मर्यादांची जाणीव होईल.
मी भारतातील केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या दिग्गजांना एक गोष्ट सांगू इच्छितो. सरकारकडे विविध योजनांशी संबंधित विविध प्रकारचा डेटा असतो. पुराव्यावर आधारित निर्णय घेताना त्याचा वापर कसा करता येईल? कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांना प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही असा डेटा वापरू शकतो का? आम्ही एक ऑडिट यंत्रणा स्थापन करू शकतो ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने त्यांच्या क्षमतेच्या आधारावर लाल, पिवळे किंवा हिरव्यामध्ये वर्गीकृत केली जाऊ शकतात. रोजगारामध्ये लवचिकता सुनिश्चित करणारी संस्थात्मक यंत्रणा आपण स्थापन करू शकतो? का आम्ही प्रमाणित जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण अभ्यासक्रम आणू शकतो का? कृत्रिम बुद्धिमत्ता-चालित भविष्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी आम्ही मानके सेट करू शकतो? सरकारशी संबंधित लोकांनी आणि तुम्ही सर्व तज्ञांनी अशा अनेक प्रश्नांचा विचार केला पाहिजे.
मित्रांनो,
तुम्हाला माहिती आहे की भारतात शेकडो भाषा बोलल्या जातात, तसेच हजारो बोलीभाषा आहेत. डिजिटल समावेश वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने स्थानिक भाषांमध्ये डिजिटल सेवा कशा उपलब्ध करून देता येतील याचाही विचार करा. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने ज्या भाषा आता बोलल्या जात नाहीत त्या कशा पुनरुज्जीवित केल्या जाऊ शकतात यावर देखील काम करा. संस्कृत भाषेचा ज्ञानसाठा आणि साहित्य खूप समृद्ध आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने ते कसे पुढे नेले जाऊ शकते याचा देखील विचार करा. वैदिक गणिताचे हरवलेले खंड कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने पुन्हा एकत्र करता येतील का याचाही प्रयत्न व्हायला हवा.
मित्रांनो,
मला विश्वास आहे की ही शिखर परिषद विचारांची देवाणघेवाण करण्याची उत्तम संधी देईल. या शिखर परिषदेला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधीसाठी हा एक उत्तम शिकण्याचा अनुभव असावा असे मला वाटते. पुढील दोन दिवसांमध्ये तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध पैलूंचा अभ्यास कराल. मला आशा आहे की आम्हाला त्याचे विशिष्ट परिणाम मिळतील. त्यांची अंमलबजावणी करून, आम्ही निश्चितपणे जबाबदार आणि शाश्वत भविष्य घडवण्याचा मार्ग तयार करू. यासाठी मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.
खूप खूप धन्यवाद.
नमस्कार.