केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी एस. जयशंकर जी, गजेंद्र सिंह शेखावत जी, युनेस्कोच्या महासंचालक ऑद्रे औजुले जी, मंत्रिमंडळातील माझे इतर सदस्य राव इंद्रजीत सिंह जी, सुरेश गोपी जी, आणि जागतिक वारसा समितीचे अध्यक्ष विशाल शर्मा जी, इतर सर्व मान्यवर, महिला आणि पुरुष गण ,
आज भारत गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव साजरा करत आहे. सर्वप्रथम, मी तुम्हा सर्वांना आणि सर्व देशवासियांना ज्ञान आणि आध्यात्माच्या या पवित्र पर्वाच्या शुभेच्छा देतो. अशा महत्वपूर्ण दिनी आज 46 व्या जगतिक वारसा समितीच्या या बैठकीचा प्रारंभ होत आहे. आणि भारतात प्रथमच याचे आयोजन होत आहे. आणि स्वाभाविक आहे माझ्यासह सर्व देशवासियांना याचा विशेष आनंद आहे.मी याप्रसंगी जगभरातून आलेले सर्व मान्यवर आणि अतिथींचे स्वागत करतो. विशेषतः मी युनेस्कोच्या महासंचालक ऑद्रे ऑज़ुले यांचेही अभिनंदन करतो. मला विश्वास आहे, जागतिक स्तरावरील प्रत्येक आयोजनाप्रमाणे हा कार्यक्रम देखील भारतात यशाचे नवे विक्रम स्थापित करेल.
मित्रहो,
आताच मी परदेशातून परत आणलेल्या प्राचीन वारशाचे प्रदर्शन पाहत होतो. गेल्या काही वर्षांत, आम्ही भारतातील 350 हून अधिक प्राचीन वारसा कलाकृती परत आणल्या आहेत. प्राचीन कलाकृती परत मायदेशी येणे हा जागतिक औदार्य आणि इतिहासाप्रति आदराची भावना दर्शवतो. येथील विलोभनीय प्रदर्शन हा देखील एक विलक्षण अनुभव आहे. जसजसे तंत्रज्ञान विकसित होईल, तसतसे या क्षेत्रात संशोधन आणि पर्यटनाच्याही अफाट संधी निर्माण होत आहेत.
मित्रहो ,
जागतिक वारसा समितीचा हा कार्यक्रम भारतासाठी अभिमानास्पद बाब आहे. मला सांगण्यात आले आहे की आमच्या ईशान्य भारतातील ऐतिहासिक ‘मोइदम’ युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. हे भारताचे 43 वे जागतिक वारसा स्थळ आणि ईशान्य भारतातील पहिले वारसा स्थळ असेल, ज्याला सांस्कृतिक जागतिक वारसा दर्जा प्राप्त होत आहे. मोईदम त्याच्या वैशिष्ट्यांमुळे खूप खास आहे. जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्यानंतर त्याची लोकप्रियता आणखी वाढेल आणि जगासाठी आकर्षण ठरेल असा मला विश्वास आहे.
मित्रहो,
आजच्या कार्यक्रमासाठी जगभरातील तज्ञांची उपस्थिती या शिखर परिषदेची व्याप्ती आणि समृद्धी दर्शवते. जगातील सर्वात प्राचीन नांदत्या संस्कृतींपैकी एक असलेल्या भूमीवर हा कार्यक्रम होत आहे. आपण पाहिले आहे...जगात विविध वारसा केंद्रे आहेत. मात्र भारत इतका प्राचीन आहे की इथला वर्तमानाचा प्रत्येक क्षण त्याच्या गौरवशाली भूतकाळाचे प्रतिबिंब आहे. दिल्लीचेच उदाहरण घ्या...जग दिल्लीला भारताची राजधानी म्हणून ओळखते. पण, हे शहर हजारो वर्ष जुन्या वारशाचे केंद्र आहे. इथे तुम्हाला पावलोपावली ऐतिहासिक वारसा पाहायला मिळेल. येथून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर अनेक टन वजनाचा लोहस्तंभ आहे. एक असा स्तंभ , जो 2 हजार वर्षांपासून त्याजागी उभा आहे , मात्र अजूनही त्यावर गंज चढलेला नाही. यावरून लक्षात येते की भारताचे धातुशास्त्र त्याकाळीही किती प्रगत होते. यावरून स्पष्ट होते की भारताचा वारसा हा केवळ इतिहास नाही . भारताचा वारसा एक विज्ञान देखील आहे.
भारताच्या वारशातून सर्वोच्च दर्जाच्या अभियांत्रिकीच्या गौरवशाली प्रवासाचे दर्शन घडते. दिल्लीपासून काही शेकडो किलोमीटर अंतरावर 3,500 मीटर उंचीवर केदारनाथ मंदिर आहे. आजही ते ठिकाण भौगोलिकदृष्ट्या इतके दुर्गम आहे की लोकांना कित्येक किलोमीटर चालत जावे लागते किंवा हेलिकॉप्टरने जावे लागते. ती जागा अजूनही कोणत्याही बांधकामासाठी खूप आव्हानात्मक आहे...वर्षातील बहुतांश काळ बर्फवृष्टीमुळे तिथे काम पूर्ण होणे अशक्य आहे. मात्र , तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, केदारघाटीमध्ये एवढे मोठे मंदिर आठव्या शतकात बांधण्यात आले होते . त्याच्या स्थापत्य रचनेत प्रतिकूल हवामान आणि हिमनद्यांचा संपूर्ण विचार केला गेला. एवढेच नाही तर मंदिरात कुठेही दगडांना जोडून ठेवण्यासाठी कुठलेही मिश्रण म्हणजेच मोर्टारचा वापर करण्यात आलेला नाही. मात्र ते मंदिर अजूनही तग धरून आहे. त्याचप्रमाणे दक्षिणेत राजा चोलने बांधलेल्या बृहडेश्वर मंदिराचेही उदाहरण आहे. मंदिराची स्थापत्य मांडणी, आडवे-उभे आकार , मंदिराची शिल्पे, मंदिराचा प्रत्येक भाग हे जणू एक आश्चर्यच वाटतात .
मित्रहो,
मी ज्या गुजरात राज्यातून आलो आहे, तिथे धोलावीरा, लोथल सारखी ठिकाणे आहेत. धोलाविरा येथे इ.स.पू. 3000 ते इ.स.पू. 1500 वर्षे जुने शहरी नियोजन आहे … तेव्हा ज्या प्रकारची जल व्यवस्थापन प्रणाली आणि व्यवस्था होती… ती 21 व्या शतकातही तज्ञांना अचंबित करत आहे. लोथलमध्ये किल्ल्याचं आणि सपाट जमीनीवरील स्थापत्यशास्त्राचे नियोजन… रस्ते आणि सांडपाणी व्यवस्था… त्याकाळी प्राचीन संस्कृती किती आधुनिक होती हे दर्शवते.
मित्रहो,
भारताचा आणि भारतीय संस्कृती इतिहास, हा इतिहासातील दाखल्यांपेक्षाही अधिक प्राचीन आणि व्यापक आहे. म्हणूनच, जसजसे नवीन दाखले समोर येत आहेत… जसजशी इतिहासाची शास्त्रीय पडताळणी होत आहे… तसतसा आपल्याला भूतकाळाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन विकसित करावा लागत आहे. येथे उपस्थित असलेल्या जागतिक पातळीवरील तज्ञांनी उत्तर प्रदेशातील सिनौली येथे सापडलेल्या पुराव्यांची दखल घ्यायला हवी. सिनौलीबाबतचे निष्कर्ष ताम्रयुगातील आहेत. परंतु, ते सिंधू संस्कृतीपेक्षाही वैदिक संस्कृतीशी अधिक साधर्म्य दर्शवत आहेत. 2018 मध्ये या ठिकाणी 4 हजार वर्ष जुना रथ सापडला होता, तो घोड्यांच्या सहाय्याने ओढला जाणारा रथ होता. हे संशोधन, हे नवीन दाखले असे सुचवत आहेत की, भारताला जाणून घेण्यासाठी, पूर्व संकल्पनांपासून मुक्त असलेल्या नवीन विचारांची गरज आहे. नव्या दाखल्यांच्या प्रकाशात इतिहासाबद्दल जी नवी जाणीव विकसित होत आहे, तिचा एक भाग बनून आपण ती पुढे घेऊन जा, असे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो.
मित्रहो,
वारसा म्हणजे केवळ इतिहास नसून मानवतेची सामायिक जाणीव आहे. जेव्हा आपण जगात कुठेही एखादा वारसा पाहतो, तेव्हा आपले मन वर्तमानातील भू-राजकीय घटकांच्या पलीकडे जाऊन पोहोचते. आपल्याला वारशाच्या या क्षमतेचा जगाच्या कल्याणासाठी उपयोग करायचा आहे. आपल्याला आपल्या वारशाच्या माध्यमातून एकमेकांचे हृदय जोडायचे आहे. आणि आज 46 व्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीच्या माध्यमातून भारताचे संपूर्ण जगाला आवाहन आहे...या, आपण सर्वजण एकत्र येऊया...एकमेकांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी... या...आपण एकत्र येऊया...मानवाच्या कल्याणाची भावना वाढवण्यासाठी! या...आपण एकत्र येऊया...आपला वारसा जतन करून पर्यटन वाढवण्यासाठी, जास्तीतजास्त रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी.
मित्रहो,
जगाने असा काळही पाहिला आहे, जेव्हा विकासाच्या शर्यतीत वारशाकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. पण, आजचा काळ खूप जागरूक आहे. भारताचा तर दृष्टीकोन आहे- विकासही, आणि वारसाही! गेल्या 10 वर्षात भारताने एकीकडे आधुनिक विकासाच्या नव्या आयामांना स्पर्श केला, तर दुसरीकडे 'वारशाचा अभिमान बाळगण्याची' प्रतिज्ञाही घेतली. वारसा जतन करण्यासाठी आम्ही अभूतपूर्व पावले उचलली आहेत. काशी येथील विश्वनाथ कॉरिडोर असो...अयोध्येत राम मंदिराची उभारणी असो...प्राचीन नालंदा विद्यापीठाच्या नवीन परिसराचे बांधकाम असो...देशाच्या कानाकोपऱ्यात अशी अनेक कामे होत आहेत. वारशा संदर्भात भारताचा संकल्प संपूर्ण मानवतेच्या सेवेशी निगडीत आहे. भारताची संस्कृती केवळ ‘स्वयं’, म्हणजेच ‘मी स्वतः’ नव्हे, तर ‘वयं’, म्हणजे, ‘आपण’, असा विचार करते. Not Me, Rather Us! म्हणजेच, केवळ मी नव्हे, तर आपण! ही भारताची भावना आहे. हाच विचार घेऊन भारताने नेहमीच जगाच्या कल्याणाचा भागीदार बनण्याचा प्रयत्न केला. आज संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करते. आज आयुर्वेद शास्त्राचा लाभ संपूर्ण जगाला मिळत आहे. हा योग, हा आयुर्वेद...हा भारताचा वैज्ञानिक वारसा आहे. गेल्या वर्षी आम्ही G-20 परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले. या परिषदेची संकल्पना होती- ‘एक पृथ्वी, एक कुटुंब,एक भविष्य’. आम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली? आम्हाला याची प्रेरणा ‘वसुधैव कुटुंबकम’ या विचारातून मिळाली. अन्न आणि पाणी टंचाईसारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी भारत भरड धान्यांच्या वापरला प्रोत्साहन देत आहे...आमचा विचार आहे- ‘माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः’ म्हणजेच, ही धरती आमची आई आहे, आम्ही तिची मुले आहोत. हाच विचार घेऊन आज भारत आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा गट आणि मिशन Life यासारखे उपाय देत आहे.
मित्रहो,
भारत, जागतिक वारशाचे संवर्धन, ही देखील आपली जबाबदारी समजत आहे. यासाठी, आम्ही भारताच्या वारशासह ग्लोबल साउथ मधील देशांच्या वारशाचे रक्षण करण्यासाठी देखील सहकार्य करत आहोत. कंबोडियाचे अंकोर-वाट, व्हिएतनामची चाम टेम्पल्स, म्यांमारच्या बागान मधील स्तूप, भारत अशा अनेक वारशांच्या जतनासाठी सहयोग देत आहे. आणि आज मी या दिशेने आणखी एक महत्त्वाची घोषणा करत आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्रासाठी भारत 1 दशलक्ष डॉलर्सचे योगदान देणार आहे. या अनुदानाचा वापर क्षमता विकास, तांत्रिक सहाय्य आणि जागतिक वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी केला जाईल. विशेषतः हा पैसा ग्लोबल साउथच्या देशांना उपयोगी पडेल. भारतातील तरुण व्यावसायिकांसाठी जागतिक वारसा व्यवस्थापनातील प्रमाणपत्र कार्यक्रमही सुरू करण्यात आला आहे. मला विश्वास आहे, की सांस्कृतिक आणि सृजनशील उद्योग जागतिक विकासामधील एक मोठा घटक बनतील.
मित्रहो,
सर्वात शेवटी, मी परदेशातून आलेल्या सर्व पाहुण्यांना आणखी एक विनंती करेन...आपण संपूर्ण भारताला जरुर भेट द्यावी. आम्ही आपल्या सुविधेसाठी महत्वाच्या वारसा स्थळांची पर्यटन मालिकाही सुरु केली आहे. मला विश्वास आहे, की या अनुभवाने आपली ही भेट अविस्मरणीय ठरेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जागतिक वारसा समितीच्या बैठकीसाठी शुभेच्छा! मनःपूर्वक धन्यवाद, नमस्कार!