भारत माता की जय,
भारत माता की जय,
भारत माता की जय,
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी , केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अनुराग ठाकूर , भारती पवार , निसिथ प्रामाणिक , महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार जी , सरकारचे इतर मंत्री , इतर मान्यवर आणि माझ्या तरुण मित्रांनो , आज भारताच्या युवा शक्तीचा दिवस आहे . हा दिवस त्या महान व्यक्तीला समर्पित आहे ज्याने गुलामगिरीच्या काळात भारताला नवीन उर्जेने भारले होते . हे माझे सौभाग्य आहे की स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी मी नाशिकमध्ये तुम्हा सर्व तरुणांमध्ये उपस्थित आहे. मी तुम्हा सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज भारताच्या नारीशक्तीचे प्रतीक असलेल्या राजमाता जीजाऊ माँ साहेबांचीही जयंती आहे. राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीदिनी त्यांना वंदन करण्यासाठी, मला महाराष्ट्राच्या वीर भूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो!
मित्रांनो,
भारतातील अनेक महान थोरांची नाळ या महाराष्ट्राच्या भूमीशी जोडली गेली आहे, हा केवळ योगायोग नाही. या पुण्यभूमीचा, या वीरभूमीचा आणि या तपस्वी भूमीचा हा परिणाम आहे. या भूमीवर राजमाता जीजाऊ माँ साहेबांसारख्या मातृशक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महान नायक निर्माण केले. या भूमीने आपल्याला देवी अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर यांसारख्या महान महिला दिल्या. या भूमीने आपल्याला लोकमान्य टिळक, वीर सावरकर, आनंद कान्हेरे, दादासाहेब पोतनीस , चापेकर बंधूंसारखे अनेक सुपूत्र दिले. नाशिक - पंचवटीच्या या भूमीवर प्रभू श्रीरामांनी बराच वेळ व्यतित केला होता. मी आज या भूमीलाही नमन करतो, आदराने नमन करतो. जानेवारीपर्यंत, 22 जानेवारीपर्यंत आपण सर्वांनी देशातील तीर्थक्षेत्रे, मंदिरे स्वच्छ करावीत, स्वच्छतेचे अभियान चालवावे, असे आवाहन मी केले होते. आज मला काळाराम मंदिराला भेट देण्याचे आणि मंदिर परिसराची स्वच्छता करण्याचे सौभाग्य लाभले आहे. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर देशातील सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घ्या आणि श्रमदान करा, तुमचे योगदान द्या अशी मी पुन्हा एकदा देशवासियांना विनंती करतो आग्रह करतो.
माझ्या तरुण मित्रांनो,
आपल्या देशातील ऋषी-मुनी आणि संतांपासून ते सामान्य माणसांपर्यंत प्रत्येकाने नेहमीच युवा शक्तीला सर्वोच्च स्थान दिले आहे. श्री अरबिंदो म्हणत असत की जर भारताला आपले उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर भारतातील तरुणांना स्वतंत्र विचाराने पुढे जावे लागेल. स्वामी विवेकानंदही म्हणत असत की भारताच्या आशा भारताच्या युवकांच्या चारित्र्यावर, बांधिलकीवर आणि बौद्धिकतेवर अवलंबून आहेत. श्री अरविंद , स्वामी विवेकानंदांचे हे मार्गदर्शन आज 2024 मध्ये भारताच्या तरुणांसाठी एक मोठी प्रेरणा आहे. भारताने आज जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये प्रवेश केला आहे, कारण यामागे भारताच्या युवकांची ताकद आहे. आज भारत जगातील पहिल्या तीन स्टार्ट - अप परिसंस्थांमध्ये आला आहे, कारण याच्या मागे भारताच्या युवकांची ताकद आहे. आज भारत एकापाठोपाठ एक नवोन्मेष करत आहे. आज भारत विक्रमी पेटंट दाखल करत आहे. आज भारत जगाचे एक मोठे उत्पादन केंद्र बनत आहे, तर याचा आधार भारताचे युवक आहेत, भारतातील तरुणांचे सामर्थ्य आहे.
मित्रांनो,
काळ नक्कीच प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात एक सुवर्ण संधी देतो. भारताच्या तरुणांसाठी काळाची ती सुवर्ण संधी आत्ताच आहे, अमृतकाळाचा हा काळ आहे. आज तुम्हाला इतिहास घडवण्याची, इतिहासात तुमचे नाव नोंदवण्याची संधी आहे. जरा आठवून बघा…
आजही आपण सर एम . विश्वेश्वरैया यांच्या स्मरणार्थ अभियंता दिन साजरा करतो. 19व्या आणि 20व्या शतकात त्यांनी दाखवलेल्या अभियांत्रिकी कौशल्याची बरोबरी करणे अजूनही कठीण आहे. आजही आपण मेजर ध्यानचंद यांचे स्मरण करतो. हॉकीच्या स्टिकने त्यांनी दाखवलेली जादू आजतागायत लोक विसरलेले नाहीत. आजही आपण भगतसिंग , चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त यांच्यासारख्या अगणित क्रांतिकारकांचे स्मरण करतो. त्यांनी आपल्या शौर्याने इंग्रजांना परास्त केले होते. आज आपण महाराष्ट्राच्या वीर भूमीवर आहोत. आजही आपण सर्वजण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करतो कारण त्यांनी शिक्षणाला सामाजिक सक्षमीकरणाचे माध्यम बनवले होते.
स्वातंत्र्यापूर्व काळात अशा सर्व महान व्यक्तींनी देशासाठी काम केले, ते जगले तर देशासाठी, ते लढले तर देशासाठी, त्यांनी स्वप्ने जपली तर देशासाठी, त्यांनी संकल्प केले तर देशासाठी आणि त्यांनी देशाला एक नवीन दिशा दाखवली. आता अमृतकाळाच्या या काळात, आज ती जबाबदारी तुमच्या सर्वांच्या माझ्या तरुण मित्रांच्या खांद्यावर आहे. आता तुम्हाला अमृतकाळात भारताला एका नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. असे काम करा की, पुढच्या शतकातील त्या काळातील पिढी तुमची आठवण काढेल, तुमचे शौर्य लक्षात ठेवेल.
तुम्ही तुमचे नाव भारताच्या आणि संपूर्ण जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांमध्ये लिहू शकता. म्हणूनच मी तुम्हाला 21 व्या शतकातील भारताची सर्वात भाग्यवान पिढी मानतो. मला माहीत आहे की तुम्ही हे करू शकता, भारतातील युवक ही उद्दिष्टे साध्य करू शकतात. माझा सर्वात मोठा विश्वास तुमच्या सर्वांवर, भारताच्या तरुणांवर आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात मेरा युवा भारत संघटनेशी युवक ज्या वेगाने जोडले जात आहेत त्याबद्दलही मी खूप उत्साही आहे. मेरा युवा भारत माय भारत संघटनेच्या स्थापनेनंतरचा हा पहिला युवा दिन आहे. या संघटनेच्या स्थापनेला 75 दिवसही पूर्ण झालेले नाहीत आणि सुमारे 1 कोटी 10 लाख तरुणांनी त्यात स्वतःची नोंदणी केली आहे. मला विश्वास आहे की तुमची ताकद, तुमची सेवा भावना, देशाला आणि समाजाला नव्या उंचीवर नेईल.
तुमचे प्रयत्न, तुमची मेहनत, तरुण भारताची शक्ती जगभरात झळाळून उठेल. आज माय भारत संघटनेत नोंदणी केलेल्या सर्व तरुणांचे मी विशेष अभिनंदन करतो. आणि मी पाहतोय की 'माय भारत" च्या नोंदणीमध्ये आपले तरुण आणि तरुणी दोघांमध्येही स्पर्धा सुरु आहे, की कोण अधिक नोंदणी करतं ते. कधी तरुण पुढे जातात, तर कधी तरुणी पुढे जातात. खूप जोराची स्पर्धा सुरू आहे.
मित्रांनो,
आमच्या सरकारला आता 10 वर्षे पूर्ण होत आहेत. या 10 वर्षांत आम्ही युवकांना आकाश खुले करण्यासाठी, युवकांना भेडसावणारे प्रत्येक अडथळे दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. आज शिक्षण असो, रोजगार असो, उद्योजकता असो, उदयोन्मुख क्षेत्रे असोत, स्टार्ट - अप्स असोत, कौशल्ये असोत, क्रीडा असोत, देशातील तरुणांना आधार देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात एक आधुनिक गतिशील परिसंस्था तयार होत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तुम्हाला 21 व्या शतकातील आधुनिक शिक्षण देण्यासाठी लागू करण्यात आले आहे. तरुणांसाठी देशात एक आधुनिक कौशल्य परिसंस्था देखील तयार होत आहे. ज्या तरुणांच्या हाती कारागीरचे कौशल्य आहे, त्यांना मदत करण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या मदतीने कोट्यवधी युवकांना कौशल्याशी जोडण्यात आले आहेत. देशात सातत्याने नवीन आय . आय . टी ., नवीन एन . आय . टी . उघडल्या जात आहेत. आज संपूर्ण जग भारताकडे एक कौशल्य शक्ती म्हणून पाहत आहे. आपल्या तरुणांना परदेशात त्यांचे कौशल्य दाखवता यावे यासाठी परदेशात जाणाऱ्या तरुणांना सरकार प्रशिक्षणही देत आहे. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, इटली, ऑस्ट्रिया इत्यादी अनेक देशांशी सरकारने केलेल्या देवाणघेवाण करारांमुळे आपल्या तरुणांना खूप फायदा होईल .
मित्रांनो,
तरुणांसाठी नवीन संधी खुल्या करण्यासाठी सरकार प्रत्येक क्षेत्रात पूर्ण ताकदीने काम करत आहे. देशातील ड्रोन क्षेत्रासाठीचे नियम सोपे करण्यात आले आहेत.आज सरकार अॅनिमेशन,दृश्य परिणाम ( व्हिज्युअल इफेक्ट्स ), गेमिंग आणि कॉमिक क्षेत्रांना प्रोत्साहन देत आहे. अणु ऊर्जा क्षेत्र, अंतराळ आणि मॅपिंग क्षेत्र देखील खुले करण्यात आले आहे. आज प्रत्येक क्षेत्रात आधीच्या सरकारच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट वेगाने काम होत आहे. हे मोठे महामार्ग कोणासाठी बांधले जात आहेत? तुमच्यासाठी...भारतातील तरुणांसाठी. या नव्या वंदे भारत गाड्या धावत आहेत...त्या कोणाच्या सोयीसाठी आहेत? तुमच्यासाठी भारतातील तरुणांसाठी. आपली माणसे परदेशात जायची, तिथली बंदरे, विमानतळ बघायची आणि भारतात असे कधी होईल, असा विचार करायची. आज भारतातली विमानतळ जगातील सर्वात मोठ्या विमानतळांशी स्पर्धा करत आहेत. तुम्ही कोरोनाच्या काळात पाहिले असेल की, परदेशात लस प्रमाणपत्राच्या नावाने कागद दिला जात होता. हाच भारत आहे ज्याने लसीकरणानंतर प्रत्येक भारतीयाला डिजिटल प्रमाणपत्र दिले. आज जगात अनेक मोठे देश आहेत जिथे लोक मोबाईल डेटा वापरण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतात. त्याच वेळी, तुम्ही भारतातील तरुण आहात, जे एवढ्या स्वस्त दरात मोबाईल डेटा वापरत आहेत, हे जगातील लोकांसाठी एक आश्चर्य आहे, हे कल्पनेच्या पलीकडचे आहे.
मित्रांनो,
आज देशाची भावस्थितीही तरुण आहे आणि देशाचा रंगढंग ही तरुण आहे. आणि जो तरुण आहे तो अनुसरण करत नाही, तो स्वतः नेतृत्व करतो. त्यामुळे आज भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आघाडीवर आहे.चांद्रयान आणि आदित्य एल-1चे यश आपल्या डोळ्यासमोर आहे. स्वदेशी मेड इन इंडिया आयएनएस विक्रांत जेव्हा समुद्राच्या लाटांशी टक्कर देते , तेव्हा आपल्या सर्वांना अभिमान वाटतो. लाल किल्ल्यावरून स्वदेशी मेड इन इंडिया तोफा गरजतात , तेव्हा देशात नवचैतन्य जागृत होते. जेव्हा भारतीय बनावटीचे लढाऊ विमान तेजस आकाशाला भिडते तेव्हा आपला ऊर अभिमानाने भरून येतो.आज भारतात मोठमोठ्या मॉल्सपासून छोट्या दुकानांपर्यंत सर्वत्र यूपीआयचा वापर होत असून याने जगाला आश्चर्यचकीत केले आहे. अमृतकाळाची सुरुवात वैभवशाली झाली आहे. आता तुम्हा युवा वर्गाला या अमृत काळाला आणखी पुढे नेऊन विकसित राष्ट्र निर्माण करायचे आहे.
मित्रांनो,
तुमच्या स्वप्नांचा विस्तार करण्याची हीच वेळ आहे. आता केवळ समस्यांवर उपाय शोधायचे नाहीत. केवळ आव्हानांवर मात करायची गरज नाही. आपल्याला स्वतःसाठी नवीन आव्हाने उभी करायची आहेत. आपण 5 ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे. आपल्याला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था व्हायचे आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाचे स्वप्न साकार करायचे आहे. सेवा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राप्रमाणेच आपल्याला भारताला जगातील उत्पादन केंद्र बनवायचे आहे. या आकांक्षांसोबतच आपल्यावर भविष्याच्या जबाबदाऱ्याही आहेत. हवामान बदलाचे आव्हान असो किंवा नैसर्गिक शेतीला चालना देणे असो, आपल्याला उद्दिष्टे निश्चित करून ती निर्धारित वेळेत साध्य करायची आहेत.
मित्रांनो,
अमृतकाळच्या आजच्या तरुण पिढीवर माझा विश्वास असण्यामागे आणखी एक खास कारण आहे आणि ते एक खास कारण आहे. या काळात देशात एक तरुण पिढी तयार होत आहे, जी गुलामगिरीच्या दबावातून आणि प्रभावातून पूर्णपणे मुक्त आहे. या पिढीतील तरुण उघडपणे सांगत आहेत – विकास आणि वारसाही. हे लोक, आयुर्वेद, मग तो योग असो की आपल्या देशातील आयुर्वेद, भारताची नेहमीच ही एक ओळख राहिली आहे.पण स्वातंत्र्यानंतर त्याचा असाच विसर पडला. आज जग हे स्वीकारत आहे. आज भारतातील तरुण योग-आयुर्वेदाचे सदिच्छादूत बनत आहेत.
मित्रांनो,
तुम्ही तुमच्या आजी-आजोबांना विचारा, ते तुम्हाला सांगतील की त्यांच्या काळात स्वयंपाकघरात बाजरीची भाकरी , कोडो-कुटकी, नाचणी-ज्वारी हेच तर उपलब्ध असायचे. पण गुलामगिरीच्या मानसिकतेत या अन्नाचा संबंध गरिबीशी होता. याला स्वयंपाकघरातून बाहेर करण्यात आले. आज हे धान्य पौष्टीक अन्न म्हणून भरडधान्याच्या रूपात स्वयंपाकघरात परत येत आहे. सरकारने या भरड धान्यांना श्री अन्न म्हणून नवी ओळख दिली आहे. आता तुम्हाला या श्री अन्नचे सदिच्छादूत व्हायचे आहे. श्रीअन्नने तुमचे आरोग्यही सुधारेल आणि देशातील लहान शेतकऱ्यांनाही फायदा होईल.
मित्रांनो ,
शेवटी मी राजकारणाच्या माध्यमातून देशसेवा करण्याविषयी सांगेन. जेव्हा जेव्हा मी जागतिक नेत्यांना किंवा गुंतवणूकदारांना भेटतो तेव्हा मला त्यांच्यामध्ये विलक्षण आशा दिसते. या आशेचे, या आकांक्षेचे कारण आहे - लोकशाही, भारत ही लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत तरुणांचा सहभाग जितका अधिक असेल तितके देशाचे भवितव्य उत्तम असेल. या सहभागाचे अनेक मार्ग आहेत. जर तुम्ही सक्रिय राजकारणात आलात तर घराणेशाहीच्या राजकारणाचा प्रभाव तितकाच कमी होईल. घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचे किती नुकसान केले आहे, हे तुम्हाला माहीत आहे. लोकशाहीत सहभागी होण्याचा आणखी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे मतदानाद्वारे आपले मत नोंदवणे. तुमच्यापैकी बरेच जण असे असतील, जे यावेळी आयुष्यात पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. .पहिल्यांदाच मतदान करणारे मतदार आपल्या लोकशाहीला नवी ऊर्जा आणि ताकद देऊ शकतात. त्यामुळे, मतदान करण्यासाठी तुमचे नाव यादीत येण्यासाठी , शक्य तितक्या लवकर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा. तुमच्या राजकीय विचारांपेक्षा तुम्ही तुमच्या मताचा वापर करण्यासाठी आणि देशाच्या भवितव्यासाठी सहभागी होणे अधिक महत्त्वाचे आहे.
मित्रांनो,
पुढील 25 वर्षांचा हा अमृत काळ तुमच्यासाठी कर्तव्य काळ देखील आहे. जेव्हा तुम्ही तुमची कर्तव्ये सर्वोपरी ठेवाल तेव्हा समाजाची प्रगती होईल आणि देशाचीही प्रगती होईल. त्यामुळे तुम्हाला काही सूत्रे लक्षात ठेवावी लागतील.शक्य तितक्या स्थानिक, स्थानिक उत्पादनांचा प्रचार करा, फक्त मेड इन इंडिया स्वदेशी उत्पादनांचा वापर करा. कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ आणि व्यसनापासून दूर राहा, या गोष्टींना तुमच्या जीवनापासून दूर ठेवा.आणि माता, भगिनी आणि मुलींच्या नावाने अपशब्द वापरणाऱ्या, शिव्या देणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवा, हे बंद करा. मी लाल किल्ल्यावरूनही हे आवाहन केले होते, आज मी त्याचा पुनरुच्चार करत आहे.
मित्रांनो,
मला विश्वास हे की तुम्ही सर्वजण , आपल्या देशातील प्रत्येक तरुण प्रत्येक जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि सामर्थ्याने पार पाडाल. सशक्त, समर्थ आणि सक्षम भारताच्या स्वप्न पूर्तीचा आपण जो दिवा प्रज्वलित केला आहे तो या अमृतकाळात अमर ज्योत बनून जगाला उजळवून टाकेल. या संकल्पासह, तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद !
भारत माता की जय। दोन्ही मुठी बंद करून आणि पूर्ण ताकदीने, तुमचा आवाज तुम्ही ज्या राज्यातून आला आहात तिथपर्यंत पोहोचला पाहिजे.
भारत माता की जय,
भारत माता की जय,
भारत माता की जय,
भारत माता की जय,
वंदे मातरम,
वंदे मातरम,
वंदे मातरम,
वंदे मातरम,
वंदे मातरम,
वंदे मातरम,
वंदे मातरम,
वंदे मातरम,
वंदे मातरम,
धन्यवाद!