नमस्कार,
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अजित पवार जी, पुण्याचे खासदार आणि मंत्रीमंडळातील माझे युवा सहकारी भाई मुरलीधर, दूरदृश्य प्रणालीमार्फत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर मंत्री, महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ मंत्रीगण देखील मला समोर दिसत आहेत, खासदार, आमदार आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो!
पुण्यातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना माझा नमस्कार
दोन दिवसापूर्वी मला अनेक मोठ्या प्रकल्पांच्या लोकार्पण आणि पायाभरणीसाठी पुण्यात यायचे होते. मात्र, मुसळधार पावसामुळे तो कार्यक्रम रद्द करावा लागला. यामुळे माझेच नुकसान झाले, कारण पुण्याच्या कणाकणात राष्ट्रभक्ती सामावलेली आहे, पुण्याच्या कणाकणात समाज भक्ती सामावलेली आहे, अशा पुण्याला भेट देणे ही कृतीच मुळात खूप ऊर्जावान बनवणारी आहे. तर, मी आज पुण्यात येऊन शकलो नाही या कारणाने माझे खूप मोठे नुकसान झाले आहे. पण आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना पाहण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले आहे. आज पुण्याची ही भूमी, भारतातील थोर पुरुषांची, महान व्यक्तींची प्रेरणा भूमी, महाराष्ट्राच्या विकासाच्या नव्या अध्यायाची साक्षीदार बनत आहे. आत्ताच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या टप्प्यातील मार्गाचे लोकार्पण झाले आहे. या मार्गावरही आता मेट्रोच्या फेऱ्या सुरू होईल. स्वारगेट कात्रज टप्प्याची देखील आज पायाभरणी झाली आहे. आजच आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाची देखील पायाभरणी करण्यात आली आहे. पुणे शहरात जीवन सुलभीकरण वृद्धिंगत करण्याचे आमचे जे स्वप्न आहे ते साकार करण्याच्या दिशेने आपण जलद गतीने प्रवास करत आहोत याचा मला आनंद वाटतो.
बंधू आणि भगिनींनो,
आज पंढरपूरच्या विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्याच्या सर्व भक्तांना देखील एक प्रेमाची भेट मिळाली आहे. सोलापूरला थेट हवाई संपर्क सुविधेने जोडण्यासाठी विमानतळाचे आद्ययावतीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सोलापूर मधील टर्मिनल इमारतीची क्षमता वाढवण्यात आली आहे. प्रवाशांसाठी नव्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. यामुळे देश-विदेशात प्रत्येक स्तरावर विठोबाच्या भक्तांसाठी अनेक सुविधा उपलब्ध होतील. भक्त प्रिय विठ्ठलाचे दर्शन करण्यासाठी भाविक आता थेट सोलापूरला पोहोचू शकतील. त्यामुळे येथील व्यापार, व्यवसाय आणि पर्यटनाला देखील प्रोत्साहन मिळेल. या विकास कार्यांसाठी मी महाराष्ट्रातील लोकांना, तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आज महाराष्ट्राला नव्या संकल्पांबरोबरच मोठ्या उद्दिष्टांची गरज आहे. यासाठी आपल्याला पुण्यासारख्या आपल्या शहरांना प्रगतीचे शहरी विकासाचे केंद्र बनवणे गरजेचे आहे. आज पुणे ज्या गतीने वाढत आहे त्याच गतीने येथे लोकसंख्येचा दबाव देखील वाढत आहे. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहराच्या विकासाच्या गतीला खीळ बसू नये याउलट ही वाढती लोकसंख्या या शहराचे सामर्थ वाढवेल यासाठी आपल्याला आत्तापासूनच आवश्यक ती पावले उचलणे गरजेचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा पुण्याची सार्वजनिक वाहतूक सेवा आधुनिक बनेल, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शहराचा विस्तार तर होईलच पण त्याच वेळी शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी उत्कृष्ट संपर्क सुविधा उपलब्ध असेल. आज महायुतीचे सरकार याच विचारातून आणि दृष्टिकोनातून दिवस रात्र काम करत आहे.
मित्रांनो,
पुणे शहराच्या आधुनिक गरजा लक्षात घेत ही कामे फार पूर्वी सुरू केली जाणे आवश्यक होते. पुण्यात मेट्रोसारखी आधुनिक वाहतूक प्रणाली फार पूर्वी कार्यरत व्हायला हवी होती. मात्र हे दुर्भाग्य आहे की गेल्या काही दशकात आपल्या देशात शहरी विकासासाठी आवश्यक असणारे नियोजन आणि दृष्टिकोन या दोन्हीचाही अभाव होता. एखाद्या योजनेवर जरी चर्चा होत असली तरीही त्याची फाईल मात्र अनेक अनेक वर्षे अडकून पडलेली असे. एखादी योजना तयार झाली तरीही एक एक प्रकल्प कित्येक दशके तसाच लटकत राहिलेला असायचा. त्या जुन्या कार्य संस्कृतीमुळे झालेले खूप मोठे नुकसान आपल्या देशाला, महाराष्ट्राला आणि पुण्याला देखील सहन करावे लागले आहे. जरा आठवून पहा, पुण्यात मेट्रो सुरु करण्याबाबत सर्वात आधी 2008 मध्ये चर्चा झाली होती. मात्र या प्रकल्पाचा शिलान्यास 2016 मध्ये तेव्हा झाला जेव्हा आमच्या सरकारने अनेक अडचणी दूर करत जलद गतीने निर्णय घेण्यास सुरुवात केली. आणि आज पहा… आज पुणे मेट्रो जलद गतीने धावत आहे आणि तिचा विस्तारही होत आहे.
आज देखील, एकीकडे आम्ही जुन्या कामांचे लोकार्पण केले आहे तर सोबतच स्वारगेट ते कात्रज मार्गाची पायाभरणी देखील केली आहे. यावर्षीच मार्च महिन्यात मी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी पर्यंतच्या मेट्रो सेवेचे देखील लोकार्पण केले होते. 2016 पासून आज पर्यंत या सात आठ वर्षात पुणे मेट्रोचा हा विस्तार… विविध मार्गांवर कामाची ही प्रगती आणि नव्या मार्गांची पायाभरणी…. आज जर जुने विचार आणि कार्यपद्धती अस्तित्वात असती तर यापैकी कोणतेही काम पूर्ण होऊ शकले नसते…. यापूर्वीचे सरकार तर आठ वर्षाच्या कालावधीत मेट्रोचा एक खांब देखील उभा करू शकले नव्हते. मात्र आमच्या सरकारने पुढे मेट्रोचे आधुनिक जाळे तयार केले आहे.
मित्रांनो,
राज्याच्या प्रगतीसाठी विकासाला प्राधान्य देणारे सरकार राज्याला निरंतर लाभणे आवश्यक असते. या निरंतरतेत जेव्हा जेव्हा अडथळे येतात तेव्हा महाराष्ट्राला खूप मोठे नुकसान सहन करावे लागते.
मेट्रो संबंधित प्रकल्प असोत, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे प्रकल्प असोत किंवा शेतकऱ्यांसाठी सिंचनाशी संबंधित अनेक महत्त्वाची कामे असोत, डबल इंजिन सरकारच्या येण्याआधी महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प रुळावरून खाली घसरले होते.
याचे आणखी एक उदाहरण म्हणजे- बिडकीन औद्योगिक क्षेत्र! आमच्या सरकारच्या काळात माझे मित्र देवेंद्रजी यांनी ऑरिक सिटीची संकल्पना मांडली होती.त्यांनी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर वरून शेंद्रा-बिडकीन या औद्योगिक क्षेत्राचा पाया घातला.राष्ट्रीय औद्योगिक क्षेत्रविकास (नॅशनल इंडस्ट्रीयल कॉरिडॉर) कार्यक्रमांतर्गत याचे काम सुरू केले जाणार होते.पण, हे कामही मधेच ठप्प झाले.आता ते अडथळे दूर करण्याचे काम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारने केले आहे.आज बिडकीन औद्योगिक नोड देखील राष्ट्राला समर्पित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये सुमारे आठ हजार एकरवर बिडकीन औद्योगिक क्षेत्राचा विस्तार करण्यात येणार आहे. अनेक मोठ्या उद्योगांना यासाठी जमीन देण्यात आली आहे. यामुळे येथे हजारो कोटींची गुंतवणूक होईल.यामुळे हजारो तरुणांना रोजगारही उपलब्ध होईल.गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे हा मंत्र आज महाराष्ट्रातील तरुणांची मोठी ताकद बनत आहे. विकसित भारताच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आपल्याला अनेक टप्पे पार करावे लागतील.भारत आधुनिक झाला पाहिजे...भारताचे अत्याधुनिकीकरणही झाले पाहिजे...पण ते आपल्या मूलभूत मूल्यव्यवस्थेवर आधारीत असायला पाहिजे. भारत विकासित व्हायला हवा आणि आपण प्रगती करायला पाहिजे तसेच अभिमानाने आपल्या मूल्यांचा वारसा घेऊन पुढे जात रहायला हवे.भारताची पायाभूत सुविधा आधुनिक असावी...आणि ती भारताच्या गरजा आणि भारताच्या प्राधान्यक्रमांवर आधारित असावी. भारतीय समाजाने एकाच दिलाने आणि एकाच ध्येयाने वेगाने पुढे जावे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे.
महाराष्ट्रासाठी भविष्यात तयार होणाऱ्या पायाभूत सुविधा जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितकेच विकासाचे फायदे प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचणेही महत्त्वाचे आहे. जेव्हा प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक समाज देशाच्या विकासात सहभागी होईल तेव्हाच हे घडेल.जेव्हा देशातील महिला विकसित भारताच्या संकल्पाचे नेतृत्व करतील,तेव्हा हे घडेल.समाजात परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी जेव्हा महिला उचलतात, तेव्हा काय घडू शकते, याची महाराष्ट्राची भूमी साक्षीदार आहे.याच भूमीने आणि याच भूमीतून सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केवढी मोठी चळवळ सुरू केली.येथेच भगिनी-मुलींसाठी पहिली शाळा उघडण्यात आली. त्याची स्मृती, हा वारसा जतन करणे महत्त्वाचे आहे.आज मी याच देशातील पहिल्या मुलींच्या शाळेत सावित्रीबाई फुले स्मारकाची पायाभरणी केली आहे. या स्मारकात कौशल्य विकास केंद्र, ग्रंथालय आणि इतर आवश्यक सुविधाही निर्माण केल्या जात आहेत याचा मला आनंद आहे. हे स्मारक सामाजिक जाणिवेच्या त्या जनआंदोलनाच्या सर्व आठवणी जिवंत करेल.हे स्मारक आपल्या समाजाला आणि आपल्या नवीन पिढीला प्रेरणा देईल.
बंधू आणि भगिनींनो,
स्वातंत्र्यापूर्वी देशात जी सामाजिक परिस्थिती,जितकी गरिबी आणि भेदभाव होता त्यामुळे आमच्या मुलींचे शिक्षण खूप कठीण झाले होते.सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या विभूतींनी मुलींसाठी शिक्षणाची बंद असलेली दारे उघडली. पण, स्वातंत्र्यानंतर अजूनही त्या जुन्या मानसिकतेतून देश पूर्णपणे मुक्त झालेला नाही.यापूर्वीच्या सरकारने अनेक भागात महिलांचा प्रवेश बंद केला होता.शाळांमधून शौचालयासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव होता. त्यामुळे शाळा असूनही मुलींसाठी शाळांचे दरवाजे बंद होते. मुली मोठ्या झाल्यावर त्यांना शाळा सोडावी लागत असे. सैनिकी शाळांमध्ये मुलींच्या प्रवेशावर बंदी होती. लष्करातील कामांच्या अनेक क्षेत्रात महिलांच्या नियुक्तीवर बंदी होती.तसेच अनेक महिलांना गरोदरपणात नोकरी सोडावी लागे.जुन्या सरकारांची ती जुनी मानसिकता आम्ही बदलली, जुन्या व्यवस्था बदलल्या.आम्ही स्वच्छ भारत अभियान सुरू केले.याचा सर्वात मोठा लाभ देशातील मुलींना, आपल्या माता-भगिनींना झाला. त्यांना उघड्यावर शौचास जाण्यास लागण्यापासून दिलासा मिळाला. शाळांमध्ये बांधलेली स्वच्छतागृहे आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे यामुळे शालेय स्तरावर मुलींचे गळतीचे प्रमाण कमी झाले.आम्ही लष्करी शाळा तसेच महिलांसाठी लष्करातील सर्व पदे मुक्त ठेवली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही कडक कायदे केले,आणि या सगळ्याबरोबरच देशाने नारीशक्ती वंदन कायद्याच्या माध्यमातून लोकशाहीत महिलांना नेतृत्वाची हमीही दिली आहे.
मित्रांनो,
"जेव्हा आपल्या मुलींसाठी प्रत्येक क्षेत्राचे दरवाजे उघडतील तेव्हाच आपल्या देशाच्या विकासाचे खरे दरवाजे उघडू शकतीलत. मला विश्वास आहे, की सावित्रीबाई फुले स्मारक आमच्या संकल्पांना आणि महिला सक्षमीकरणाच्या आमच्या मोहिमेला अधिक ऊर्जा देईल.”
मित्रांनो,
महाराष्ट्रातील प्रेरणास्थाने महाराष्ट्राची ही भूमी सदैव देशाला मार्गदर्शन करत राहील, असा मला विश्वास आहे. 'विकसित महाराष्ट्र, विकसित भारत' हे ध्येय आपण सर्व मिळून साध्य करू. याच विश्वासाने, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.